Category Archives: My Life

अमेरिकन मी होणार ! झालोच!

रेडवुड सिटी

१९५६ साली बी.एस्सीची परिक्षा दिली. पास होईन का नाही हीच धागधुग होती. मला आणि माझ्या प्रोफेसरांनाही. काहींना तर खात्री होती; मी पास होणार नाही ह्याची. पण अखेर पास झालो. त्यानंतर कानाला खडा लावला की झाली-दिली ही परीक्षा शेवटची.

नोकरीसाठी अर्ज करायला सुरवात केली. काळ बेकारीचा होता. सर्वच अर्जांना होकार आले नाहीत. पत्रिका पाहूनच मुलगी नापसंत ठरावी तसे अर्जाच्या पहिल्या फेरीतच मी गारद व्हायचो. पण दोन तीन ठिकाणी माझ्यासाठी मुलाखतीतूनच नोकरीच्या पायघड्या घातल्या होत्या. पण मी त्यांना नकार देत होतो.हे झाले. पण माझा निश्चय मी पाळला होता. ज्या नोकऱ्यांसाठी अगोदर लेखी परीक्षा असे तिथे मी कधी गेलो नाही. पण नंतरचे कलेक्टर,परराष्ट्र अधिकारी,वन अधिकारी (कांन्झरव्हेटर) , मुख्याधिकारी पाहिल्यावर आपणही ह्या परीक्षा द्यायला हरकत नव्हती असे वाटले. आता निवृत्त होऊनही किती तरी-पंचवीस-वर्ष झाली.
पण परवा मात्र मला तोंडी व अंशात्मक लेखी परीक्षा माझा नियम मोडून द्यावी लागली. तरी बरं लेखी परीक्षा एका ओळीची होती.

इतर वाचन चालू असले तरी परीक्षेच्या पुस्तकांचे म्हणजे गाईड्सचे माझे वाचन कधीच बंद पडले होते. त्यामुळे अमेरिकन नागरिकत्वासाठी पूर्व तयारीसाठी एक पुस्तक होते ते वाचायला सुरवात केली. बरं हे पाठ्यपुस्तक माझ्यासाठीच तयार केले असावे. कारण प्रश्नांची उत्तरे लगेच त्या खालीच दिली होती. मग मी का ते वाचणार नाही? हे इतके चांगले गाईड परिक्षकानेच दिल्याच्या आनंदात त्यातली शंभर प्रश्नोत्तरे मी दिवसातून एकदा रोज वाचू लागलो. देवाचा नित्यनेम इतक्या मनापासून केला असता तर रोज दहा वेळा,देवाने प्रत्यक्ष दर्शन दिले असते!

बरं नुसते मी स्वत: वाचून स्वस्थ बसणाऱा विद्यार्थी नव्हतो. रोज मी घरातील कुणाला तरी पकडायचो व त्या पुस्तकातील प्रश्न मला विचारून त्यांना मी माझी परीक्षा घेणे भाग पाडू लागलो. प्रथम सगळेजण सौजन्य म्हणून बळी पडले माझ्या विनंतीवजा हट्टाला. पण नंतर प्रत्येक जण मी त्या पुस्तकात बोट घालून हाका मारत येताना दिसलो की काही तरी निमित्त काढून कुठेतरी गायब होत. मला टाळण्यासाठी सर्वांनी तीन तीनदा आंघोळी करायला सुरवात केली. जणू जुलाब होताहेत म्हणून पटापट संडासात जाऊन दडून बसू लागले. घरात सगळ्या वस्तु असल्या तरी दिवसातून चार पाच वेळा बाजारात जात. काही नाही तरी दातकोरणीच्या काड्यासाठी जाऊ लागले. तास न् तास बाहेरच असत. कामाला गेलेले तर तीन तीन चार चार दिवस आॅफिसातच राहात. शाळा काॅलेजात जाणारे सुद्धा आज हा क्लास आहे,त्याचा तो क्लास आहे हे निमित्त सांगून हाॅस्टेलात कुणाच्या तरी खोलीत पडून राहात. टेनिसच्या क्लासचे, आज आमची स्पर्धा आहे, अंतिम सामना आहे असे सांगून बारा बारा तास तो सामना खेळत! विम्बल्डन वगैरेच्या अनेक खेळाडूंचे वेळेचे विक्रम त्यांनी मोडीत काढले. अशावेळी माझा मीच प्रश्न वाचून पुस्तक बंद करून उत्तरे देऊ लागलो. कुणी सापडलाच चुकुन माकून तर मी त्याच्याकडून माझी शंभर प्रश्नांची तीन वेळा उजळणी करून घ्यायला लावत असे ! कुणाशी बोलणे म्हणजे ती प्रश्नोत्तरेच मी म्हणत असे. त्यामुळे माझ्या वाऱ्यालाही कोणी उभे राहिनासे झाले. बरं इथे अमेरिकेतच असल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला अशी काही विनंती करण्याचीही सोय नाही. स्वावलंबन हाच उपाय मी चालू ठेवला. तरीही दया येऊन, अखेरच्या काही दिवसात माझ्या तिन्ही नातींनी व मुलाने मला पुष्कळच मदत केली.

परीक्षेचा दिवस आला. पहिले आश्चर्य घडले.नातीने लावलेला गजर होण्या आत मी पहाटे पाच वाजता उठलो. कित्येक वर्षांनी,पहाट कशाला म्हणतात आणि ती कशी असते ह्या प्रश्नांच्या उत्तरानेच दिवस सुरु झाला!
“नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तासच आधी येणे” अशी तंबी परीक्षेच्या आमंत्रण-पत्रातच दिली होती. पण सावधगिरी म्हणून आम्ही बरेच आधी पोचलो होतो. त्यामुळे धावपट्टीवरील गर्दीमुळे नेमके आपलेच विमान त्या तळा भोवती दिवसभर घिरट्या घालते त्याप्रमाणे आम्हीही रस्ते ओलांडत एका हाॅटेलात काॅफी पित वेळ काढत बसलो. योग्य वेळी दरवाजापाशी दोन तीन जणांच्या रांगेत उभे राहिलो. चेहरा हसतमुख ठेवा ही सगळ्यांची सूचना मी काटेकोरपणे पाळत होतो. द्वारपालाकडे तो शतजन्मीचा दोस्त आहे ह्या भावनेने मी त्याच्याकडे पाहून हसत होतो. तो एकदा माझ्या कडे व पासपोर्टमधील फोटोकडे वारंवार पाहून ‘ तो हाच का कोण येडपट आहे’ ह्या नजरेने माझ्याकडे पाहात होता. काय झाले कुणास ठाऊक! तो”कामाटकार “ Isn’t it? “म्हणत हसू लागला. मी तर हसतच होतोआता सतीशही हसत हसत हो म्हणाल्यावर त्याने आनंदाने दार उघडून आम्हाला आत सोडले.
अमेरिकेत सर्व तपशील एकदम अचूक ठेवतात व कळवतात, त्याचा प्रत्यय येत होता. माझ्यापत्रात A काउंटर सांगितलेच होते. तिथे ठळकपणे तो काउंटर दिसत होता. माझे नाव गाव विचारले. फोटो काढला. पुढे वळून Aवेटिंग हाॅल मध्ये थांबायला सांगितले.

आता परिक्षेच्या हाॅलमध्ये आल्यासारखे वाटायला लागले. माझ्यासह आणखी दोघे तिघे होते. फक्त मीच ताणतणावात होतो. हातात पासपोर्ट आणि एकदोन पुरावे धरून होतो. हात पाय बोटे काहीही थरथरत नव्हती. पण शंभर अधिक उठल्याबरोबरचे पहाट म्हणजे काय? ती कशी असते ह्या दोन अशा एकूण एकऱ्शे दोन उत्तरांचा जप चालू होता. पूर्वी उजळणी म्हणत होतो. पण वयामुळे आपोआप आध्यात्मिक झाल्यामुळे ‘जप’ म्हणालो. अध्यात्म संपले व आतून माझी परीक्षा घेणारी बाईच ओठ,तोंड वेडे वाकडे करत ‘शॅढॅसिव’? म्हणत माझ्याकडे पाहात आली!
आत जाऊ लागलो. सतीश “काही टेन्शन घेऊ नका बाबा,all the best”वगैरे म्हणाला. मी मान हलवून आत गेलो.
बोलवायला आलेली बाईच परीक्षक होती. माझी जन्म तारीख,मी राहतो तो घरचा पत्ता विचारला. सांगितला. अगोदर इंग्रजी वाचनाची परीक्षा घेतली. माझी! तुम्हालाही प्रश्न पडला असणार इतका वाचणारा मी,माझी वाचनाची परिक्षा?माझी? काय करणार मी तरी. डोळ्यांच्या डाॅक्टरांकडे तक्त्यात असतात तेव्हढ्या ढब्बू अक्षरांतील तीन वाक्ये पुढे ठेवली.मी माझ्या स्पष्ट शब्दोच्चारात पहिले वाक्य खणखणीतआवाजात वाचून दाखवले. सिनेटर किती असतात असे ते प्रश्नार्थक वाक्य होते. ते मी त्याच प्रश्नार्थक भावाने,प्रश्नार्थक आवाजात त्या बाईंकडे पाहात वाचले. तेही टेबलावर पुढे झुकून. बाई गांगरल्या. आणि घाबरत त्यांनीच ,”One Hundred” असे बरोब्बर उत्तर दिले! मी सुद्धा बावरलो. बरोबर या अर्थी मी फक्त मान हलवली!आता पुढचा प्रश्न मी काय विचारणार म्हणून बाईच सावरून बसल्या! माझी वाचनाची परीक्षा संपली,एका वाक्यात!
नंतर मला इंग्रजी लिहिता येते का ह्याची चाचणी झाली.

बाईं सांगतील ते मी लिहायचे अशी ती चाचणी होती. बाईंनी There are one hundred senators हे मगाचे उत्तरच मला लिहायला सांगितले.सोप्पे !असे म्हणत मी ते सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिले. झाली लिहिण्याची परीक्षा. अरे ही तर एका वाक्यांचीच परीक्षा दिसतेय असे वाटलें. बाईं मला इंग्रजी समजते का ह्याचीपरीक्षा दहा प्रश्नांच्या उत्तरांवरून ठरवणार होत्या. त्यातही त्यांनी विचारलेल्या पहिल्या सहा प्रश्नांची उत्तरे मी जर बरोबर दिली तर ती परीक्षा तिथेच संपणार होती. म्हणजे मी इंग्रजीत हुषार हे नक्की होणार होते. मनात म्हणालो मी तर शंभर उत्तरांचा अभ्यास पक्का करून आलोय. विचारा कसेही उलट सुलट, कोणत्याही क्रमाने. माझ्या इथल्या दोन आणि पुण्याच्या एका नातीने ‘सारेग रेगम गरेमग गरमा गरम’ अशा प्रचंड उलथापालथी करून माझी तयारी करवून घेतली आहे. पहिलाच प्रश्न,” राष्ट्रगीताचे बोल काय आहेत?” हा होता. तिघींनीही हा प्रश्न मला नेहमी शेवटी विचारला होता. माझ्या अभ्यासाची सांगता त्या राष्ट्रगीताच्या प्रश्नाने करीत. त्यामुळे पहिला प्रश्न हा असणारच नाही या खात्रीने क्षणभर वाचा बंद पडून गप्प होतो. पण जाऊ द्या बाईंनी परीक्षेची सुरवात राष्ट्रगीताने केली अशी मीच माझी समजूत घालून उत्तर बरोबर दिले. चला,”कोन बनेगा नागरिक?”स्पर्धेतील पहिला एक हजाराचा प्रश्न मी सोडवला.

मग ‘झेंड्यावर तेराच पट्टे का आहेत’ हा प्रश्न विचारला. त्याचे खरे उत्तर ‘ कारण झेंड्यावर तेव्हढीच जागा होती’ हे आहे.पण मी मात्र अभ्यास केलेले उत्तरच दिले.त्यानंतर दोन तीन प्रश्नांचीही उत्तरे बरोबर दिल्यावर What is the rule of the law ? ह्या प्रश्नाला तर मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेतील भाषणाच्या स्टाईलने बुबळे वर करून छताकडे पाहात उत्तर देऊ लागलो. उत्तर सविस्तर देत होतो. बुबळे अजूनही छताकडेच लागलेली. माझी ती खेचर मुद्रा पाहून रामदेवबाबाही खुष होऊन त्यांचा तो प्रख्यात कायम मिटलेलाच एक डोळा पुन्हा मारत,दाढीतून कौतुकाने माझ्याकडे हसत पाहात राहिले असते. पण ह्या बाई मात्र माझे ते भेसूर रूप पाहून ‘नऊशे अकराला’फोन करताना जी स्थिती होते तशी होऊन धडधडत्या छातीवर हात ठेवून पुढचा प्रश्न विचारु लागल्या. पण अनुभवाने त्या शाहाण्या न होता गडबडीत त्यांनी नको तो पुढचा प्रश्न विचारला. तो होता “११ सप्टेंबर २००१ रोजी काय घडले? “ अमेरिकन नागरिक होण्याअगोदरच देशभक्तीचाही मी सराव करत असल्यामुळे मी त्या भयंकर घटनेचे नाट्यपूर्ण आवाजात साभिनय उत्तर देऊ लागलो. डोळे मोठे करत,संपूर्ण देशाला धक्का बसल्याचा अभिनय करत, टेबलावर पुढे झुकून प्रत्येक शब्दावर कमी जास्त जोर देत गंभीर आवाजात चढ उतार करत, बाईंकडे पाहात, “ Terrorists attacked United States of America!” असे सांगू लागलो.तशा प्रत्येक शब्दानिशी बाई बसल्या जागीच आपली फिरती खुर्ची एकदम मागे लोटत भिंतीवर आ-द-ळ-णा—र होत्या.पण तेव्हढ्यात माझे ते ऐतिहासिक नाट्यपूर्ण उत्तर संपल्यामुळे त्या आदळल्या नाहीत! खैर माझी. नाही तर माझी त्याच दिवशी अमेरिकेतून हकालपट्टी झाली असती!

अशा रीतीने पहिली साही उत्तरे बरोबर दिल्यामुळे परीक्षक बाईंचे पुढचे श्रम व भीतीही नाहीशी झाली.
त्यानंतर मी भरलेल्या अर्जाची, त्यातली माहिती व माझ्याकडून येणाऱ्या उत्तरात तफावत नाही याची पडताळणी सुरु झाली. तीही बरोबर ठरली. मग, तुम्हाला शपविधीला हजर राहण्याचे पत्र येईल तेव्हा ग्रीन कार्ड न विसरता घेऊन या. ते नसेल तर परत पाठवले जाईल किंवा तशा अर्थाचे काही तरी सांगितले. माझे तिकडे लक्ष नव्हते.आणि एक छापील पत्र मला काही खुणा करून दिले. आपल्याकडील म्हणजे माझ्या पद्धतीप्रमाणे मी त्या Pinjalinan बाईंना मला नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहेना? तुम्हाला काय वाटते? वगैरे प्रश्न विचारले. त्यावर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या म्हणाल्या,”ते पत्र दिले ना तुम्हाला आता,ते वाचा.त्यात Congratulations म्हटलेय की.”

कागदपत्रे व ते पत्र सावरत बाहेर आलो. सतीशने दोन तीनदा “बाबा कसा झाला इंटरव्ह्यू” म्हणून विचारले,पण मी अजूनही अध्यात्माच्याच गुंगीत असल्यामुळे उरलेल्या ९४ उत्तरांचाच जप करीत होतो! तेव्हढ्यात सुधीरचा फोन आला.त्याने माझे अभिनंदन केले. सतीशने त्याला त्या आॅफिसातूनच कळवले असावे. मी सतीशला काही सांगणार तोपर्यंत आम्ही घरापाशी आलोही होतो!

वारीच्या सुरवातीचा अभंग

वारीला पुन्हा एकदा जायचे असे गेली दहा वर्षे म्हणत असतो. पण जमत नाही. तशी मागच्या दोन तीन वर्षात एक-दोन तुकड्या तुकड्यांच्या वाऱ्या झाल्या तेव्हढ्याच.

काल पुण्यात पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा देवळात ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज मुक्कामाला होते. निदान त्याच्या पादुकांचे तरी दर्शन घ्यावे म्हणून जुन्या पु्ण्यात गेलो.

बस मधून जातानांच वारकरी दिसत होते. काही बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेले. तर दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेत जशी जागा मिळेल तिथे अनेकजण दाटीवाटीने आरामात होते. पुण्याच्या मुक्कामात घेऊ असे ठरवून आलेले वारकरी घोळक्याने चालले होते.

प्लास्टिकची इरली, चपला, बूट,बांगड्या,कानातले डूल, माळा,करदोडे, गोफ, नाड्या, टोप्या, सदरे,कपडे, खजूर राजगिऱ्याचे लाडू, वड्या, आलेपाक,डाळे चुरमुरे, माळा, टाळ, फुगे,खेळणी, आणि काय काय आणि किती सांगावे! इतकेच काय शहरात कधी रस्त्यावर न दिसणारी न्हावी मंडळीही आपल्या आयुधानिशी वारकऱ्यांना टवटवीत करीत होती, ह्या गडबडीतच लोकांनी पादुकांच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा वळणे घेत वाढतच होत्या.ही रांग इथे संपली म्हणून उभा राहिलो तर “माऊली मागं मागं” ऐकत ऐकत मी मागे जाऊ लागलो तर माझ्या मागचे हे “मागे मागेचे”पालुपद संपेचना! मी जिथून निघालो होतो त्या बस स्टाॅपपाशीच परत आलो!

अनुभवी लोकांनी ह्याचे कारण सांगितले. आदल्या रात्री जोरदार पाऊस झाला होता. तेव्हा पालख्व्या गावात आल्या आल्या दर्शनाला येणारी ती सगळी गर्दी आज आली होती. दिंड्यांबरोबरच आता जवळपासच्या उपनगरातून वारीला जाणारे हजारो वारकरीही येतच होते.

टाळ मृदुंगाचे दणदणीतआवाज नव्हते. पण आपल्या वाद्यांची वारकरी देखभाल करत होते. टाळांचा आवाज मधून मधून यायचा. मृदुंगावर बोटेही अधून मधून टण टण् उमटत होती. हे सर्व बेतानेच चालले होते.पण कोपऱ्या कोपऱ्या वरची तरुण युवा मंडळं लाऊडस्पीकरवरून भाविकांचे स्वागत करत होते. काही तरुण मंडळी भक्तांना वारकरी बंधू-भगिनींना प्रसाद घेण्याचा आग्रह करत होते. त्या जोडीनेच “रांगेने या, रांगेने या असे ओरडतही होते.

गंध लावणारे तर बरेच म्हणजे बरेच होते. मलाच तीन चार वेळातरी गंधखुणांचे शिक्के लावून घ्यायला लागले! डोक्यावर काॅऊंटी कॅप आणि कपाळावर हे वारीचे रजिस्टर्ड पोष्टाच्या गंधाचे शिक्के! बरेच जण येता जाता माझ्याकडे “ काय सुंदर त्ये ध्येनं” पुटपुटत बघत जात. बरं ते पुसण्याची सोय नाही. कपाळ रिकामे दिसले की ती
‘U-ट्युब’ उमटलीच भाळी!मी भाविक झालो तरी चिल्लर-मोड किती बाळगणार!

वारीला जायला मिळणार नाही हे नक्की असले तरी जुन्या पुण्यात निवडुंग्या विठोबा आणि पालखी/ पासोड्या विठोबाच्या राज्यात आल्यावर वारीच्या कपडेपटात,रंगपटात, ग्रीनरुममध्ये आल्यासारखे वाटत होते. नाही वारी तरी,तीन चार तास वारीच्या प्रत्यक्ष प्रयोगाची संपूर्ण रंगीत तालीम जुन्या पुण्याच्या भव्य स्टेजवर पाहिल्याचे समाधान मिळाले.

ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबारायाच्या दोन्ही पादुकांचे दर्शन काही झाले नाही. पंढरपुरला जाऊनही लाखो वारकरी कळसालाच हात जोडून परत येतात तसे बाहेर ठेवलेल्या रिकाम्या पालख्यांनाच हात लावून रिकाम्या हाताने परत निघालो. मंडईत दगडूशेठ-दत्ताच्या देवळाच्या बाजूला लहान मोठी हलवायांची दुकानं आहेत.जिलबीचे ‘खंबीर’ (भिजवलेले तयार पीठ-Readymix),चहा,मिठाई मिळणाऱ्या दुकानात बसलो.@एक प्लेट गरम जिलबी खाल्ली. मस्त आणि स्वस्तही. चहासुद्धा प्यालो. तोही अप्रतिम! लक्ष्मीरोडवर गेलो.तिथे वारकऱ्यांप्रमाणे मीही खरेदी करु लागलो.

शनिपारावर बस पकडली. कारण बाजीराव रोडचा काही भाग आणि मंडईकडे येणारे रस्ते तुडुंब रहदारीमुळे वाहनांसाठी बंद केले होते काही वेळ. बसेस येत नव्हत्या. डेक्कनवर आलो आणि कोथरुड डेपोची बस पकडून घरी आलो. बराच वेळ गेला होता.पादुकांच्या दर्शनला जाऊन आल्याच्या गंधाच्या खुणा पुसट झाल्या होत्या. त्यामुळे माझ्याकडे संशयास्पद भाविक म्हणूनही कुणी पाहिले नाही.

आषाढी वारी संपतच आली. आणि मी वारीच्या सुरवातीच्या दिवसाच्या फेरफटक्याचे वर्णन अगदी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ च्या थाटात लिहितोय!

वर्षभराच्या साठवणी!

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत. एप्रिल लागणार म्हणले की वर्षाचा गहू भरण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यांमघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, हा सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी, सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळतही असेल.किंवा अकोल्यालाही काली मूंछ तांदूळ मिळत असेल.

तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

परपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत होत गेली- ही शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं, अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी तरी ? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून, दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा, तेव्हा हुश्श वाटायचे.

त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेतही पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो,त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपले अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, तशाच काही छद्मी आणि कावेबाजपणे हसणाऱ्या केशरी मिरच्या तर काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकत फिरायचे. प्रत्येकाचे हातरुमाल मोंढ्याच्या किंवा मार्केटच्या बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे “बाळा जो जो रे,”स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी,”चिमणी पाखरं”,माहेरची साडी”हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे येव्हढे “शोककारी दु:खकारी” होऊन पाच किलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत.

त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल,आणली मड्डम ! अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छय्यम छय्यम नको, किंचित कुरळ्या,काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घ्या” म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य, डाळी भरणे, तिखट, मीठ करणे , शिकेकई कुटणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची. आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.
फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो.

सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टाॅलस्टाॅयच्या निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.
त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची.

सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची.

आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!
आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा.

ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.पाहातच राहत असू आम्ही. तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा.

वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते.

दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच !

माझा मित्र बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

झाले मेरु -मंदार धाकुटे!

तारखा, वार , दिवस रोजच येतात आणि जातात . पण एखादीच तारीख , तो वार , तो दिवस कायमचा लक्षात राह्तो. दुपारचे दोनही रोजच वाजतात . पण २३ जुलै २०१३ आणि त्या दिवशीचे दुपारचे दोन ह्यांना अनन्य महत्व आहे . हा दिवस आपल्या सर्वांच्याच लक्षात राहणार आहे . कौतुक आपल्या डोळ्यांतून ओसंडेल आणि ऊर अभिमानाने भरून येईल . आपल्या कल्याणीचे किती कौतूक करावे असे होईल . कारण याच दिवशी–२३ जुलै २०१३ दुपारी २. ०० वाजता कल्याणीने हिमालयाचे २२०००फूट उंचीवरचे छामसेर(समशेर) कांगडा शिखर सर केले , जिंकले!

हिमालय, २२००० फूट, छामसेर शिखर, प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्यक्ष पराक्रमालाच आव्हान आहे. कल्याणीने ते शांतपणे स्वीकारले. चिकाटी, दृढ निश्चय, मनाचा शांतपणा आणि अंगभूत उत्साहाच्या जोरावर तिने हिमालय चढून ती छामसेर (समशेर) कांगडा शिखरावर गेली. कल्याणी ”समशेर’ बहाद्दर झाली .

कल्याणीच्या या धाडसी, साहसी मोहिमेचे थोडक्यात वर्णन आपण तिच्याच शब्दांत . ऐकू या…।

“पुण्याहून आम्ही अकराजण दिल्ली-मनाली-लेहला जाण्यासाठी निघालो. दिल्लीला पोचलो . दिल्लीहून मनालीला आम्ही बसने आलो . मनालीहून लेहला जाण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. कारण वाटेत एक रात्र मुक्काम केला होता ”

“लेहला आल्यापासून श्वासोश्वास घेणे अवघड होऊ लागले . कारण तिथली उंची! तिथून २४०किमीचा प्रवास करून कारझोकला आलो . इथे आमच्यापैकी एकाला श्वासोश्वास घेणे फारच अवघड, जड होऊ लागले. त्याला आम्ही लगेच लेहला माघारी पाठवले . तिथे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . तो बरा झाला . पण मोहिमेत काही परत येऊ शकला नाही ”

“कारझोकला तिथल्या वातावरणाची, विरळ हवेशी जुळवून घेण्याची सवय होण्यासाठी आम्ही रोज दोन-तीन तास चढ-उतर करत असू . हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या बाजूने हिमालय चढून जाणार होतो त्या वाटेकडे निघालो. ते १५ किमीचे अंतर चालून जायला आम्हाला ७ तास लागले !”

” तिथेच त्या क्युरूच या ठिकाणी आमचा दुसरा तळ आम्ही ठोकला . इथेही आम्ही तिथल्या हवेची सवय होण्यासाठी तीन-चार तास चढ-उतार केली .”

“पर्वतावर इतरत्र बर्फ होता पण आम्ही ज्या बाजूने चढून जाणार होतो तिकडे बर्फ नव्हता . ठिसूळ, खडकाळ घसरडी अशी ती बाजू होती .बर्फ असता तर बरे झाले असते . कारण बर्फातून चढून जाण्यासाठी बूट असतात त्यांच्या spikesमुळे पायाची पकड तरी घट्ट होते. आमच्या बाजूच्या पर्वताचा भाग ठिसूळ,खडकाळ आणि घसरडा . त्यामुळे घसरतच पुन्हा चढायचे . दोन फुट वर गेले की एक फुट खाली . गणितातल्या त्या पालीसारखे!”

“चढण वाढत जाऊ लागली तसे श्वास घेणेही अवघड होऊ लागले . तो घेणेही एक ‘चढण’च वाटायचे . तरीही २१ जुलैला आम्ही दहाजण १८,००० फूटावर जाऊन पोहचलो . इथे आम्ही आमचा Base-Camp तळ ठोकला . त्या दिवशी हवा फार ढगाळ झाली होती . सगळीकडे अगदी ढगाळ झाले होते .. उद्या शेवटची चढाई करायची असे ठरले होते. पण हवा अशीच राहिली तर काय करायचे अशी सगळ्याना काळजी लागली . कारण मग पाऊस पडणार . पुन्हा जास्तच निसरडे होणार . बर्फही पडण्याची शक्यता . अशा विचारात आम्ही सगळे होतो . पण सुदैवाने हवा निवळली . आम्ही२३ जुलैला पहाटे ३.३० वाजता शिखरावर चढायला सुरुवात केली . पंधरा पावले चढून गेल्यावर थांबावे लागत असे . इतका दम लागत होता . त्यामुळे आमच्यातील पाचजण पहिल्या काही १५-२० पावलातच परत मागे तळावर गेले.”

“आता आम्ही पाचजणच चढत होतो . दम लागायचाच . थांबल्यावर थोडे बरे वाटायचे . पुन्हा चढायला सुरुवात करायची . चढ होताच . अगदी काटकोनी नव्हता पण ७०-७५ अंशाचा तरी होताच. अखेर चढत-थांबत आम्ही पाचजण दुपारी दोन वाजता छामसेर शिखरावर पोहचलो . शिखर गाठले! उभे राहिलो . फोटो काढले . तिथे आम्ही फार तर अर्धा तास होतो . Base-Campसोडल्यापासून १०तासांनी आम्ही शिखरावर पोहचलो होतो.”

“आता उतरायचे वेध लगले. उतरताना घसरायची भिती तशी जास्तच . आम्ही आमच्या Base-campला रात्री ८. ३० वाजता पोह्चलो. . Summitवरून Base-Campपर्यंत यायला आम्हाला ७ तास लागले . म्हणजे एकूण १७ तास झाले . मी फक्त कॅडबरी खाल्ली असेल तेव्हढीच . पण Base-Campला येईपर्यंत खाण्याची जेवण्याची आठवणही झाली नाही . पाणीही जास्त जात नव्हते .”

“शेवटपर्यंत, शिखरावर आम्ही फक्त पाचजणच होतो. त्यापैकी मी एकटीच मुलगी . आणि आमच्या अकराजणात सर्वात लहान मीच . एकोणीस वर्षांची . आमचे ग्रुप-लीडर माझ्या बाबांच्या वयाचे, पन्नाशीचे .दुसरी एक मुलगी ती चोवीस वर्षांची; एक आजोबा ते ६०-६५ वर्षांचे . बाकीचे तिशीतले . वर आम्ही जे पाचजण शिखरावर पोचलो त्यात आमचे Group-leader, मी , आणि बाकीचे तिशीतले असावेत .”

आपल्यापैकी हिमालयात एखाद्या शिखरावर चढून जाणारी , अशा साहसी मोहिमेत भाग घेणारी कल्याणी हि पहिलीच . माझे भाग्य असे की , आकाशात स्वत: विमन-उड्डाण करून आकाशी झेप घेणारी कल्याणीची थोरली बहिण मृण्मयी आणि हिमालयातील २२,००० फूट उंचीवरचे शिखर जिंकणारी ही कल्याणी या दोघींचेही पराक्रम मला प्रत्यक्ष पहायला, ऐकायला मिळाले . मलाही बरोबर घेऊन मृण्मयीने आकाशात झेप घेतली आणि विमानातून सृष्टी दाखवली . कुणी सांगावे! कल्याणीही तिच्याबरोबर मलाही एव्हरेस्टवर घेऊन जाईल! ह्या परते माझे दुसरे भाग्य ते काय?

कल्याणीच्या यशात तिच्या आई – बाबांचा, त्यानी तिला दिलेल्या उत्तेजनाचा, पाठिंब्याचा फार फार मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही .

रेशनकार्ड ते ग्रीन कार्ड

सध्या कार्ड-संस्क्रुतीचे युग आहे. ओळख-पत्रापासून ते क्रेडिटकार्डपर्यंत नुसती कार्डेच कार्डे! मला माहित आहेत ती फक्त रेशन कार्ड आणि पोस्टकार्ड. ह्या दोन्हीशीच जास्त संबंध आला माझा.

रेशन कार्डानेही आपले रंगरूप बदलले. पूर्वी फक्त पोटापाण्याच्या वस्तूंसाठीच ते होते. आता तो एक महत्वाचा दस्त ऐवज झालाय. इतर अनेक अर्जांसोबत रहिवाशी असल्याचा पुरावा, घराच्या पत्त्याचा पुरावा,बॅंकेत खाते उघडताना अशा अनेक कारणासाठी ते आता वापरले जाते. त्यामुळे ते मिळवण्यासाठीही कचेरीत लांब रांगा लागलेल्या असतात. बरं ते आता निरनिराळ्या रंगातही मिळू लागलय. केशरी, तांबडे, पांढरे वगैरे वगैरे!

मध्यम वर्गात अलिकडे अमेरिकेचा उदय झाला. अमेरिकेत जाणाऱ्यांची जशी वर्दळ वाढू लागली तसे व्हिसा, जेट लॅग हे शब्द ऐकू येऊ लागले.मी ओळखत असलेल्या कार्डांबरोबर ग्रीन कार्डाचाही बोलबाला कानावर येऊ लागला.कुणाला व्हिसा मिळाला की त्या घरात जल्लोष होई, सत्यनारायणाची जंगी पूजा व्हायची. अमेरिकेचा विसा मिळायला पूर्वजन्मीचे पुण्य लागते,कुंडलीत तसे योग असावे लागतात, एखाद्याच्या(च) ते भाग्यात असते अशा दैवी गोष्टींना उत आला.एखाद्याला व्हिसा नाही मिळाला तर त्याला दुखवट्याची पत्रे येत!

व्हिसाबरोबर ओघाने ग्रीन कार्डाचेही महात्म्य वाढले. पण अनेकांना ह्या ग्रीन कार्डासाठी काय करावे लागते, आपल्या देशातूनच प्रयत्न करावा लागतो की अमेरिकेत जाऊनच केलेले बरे, कोण कोणती कागदपत्रे लागतात याची नेमकी माहिती नसते. बरं ज्यांना ग्रीन कार्ड मिळाले आहे त्यांना विचारले तर ’ते माझ्या मुलाला/मुलीला माहित आहे’, ’रोज नियम बदलतात’, ’काही खरं नाही हो’ अशी गूढ, रहस्यमय माहिती देतात. त्यामुळे ग्रीन कार्डाभोवतीचे वलय आणखीच गडद होते. पण ते मिळालेल्या माणसाभोवती मात्र एक तेजोवलय निर्माण होते!

नुकताच मीही ग्रीन कार्डाच्या भोवऱ्यातून बाहेर आलो. मी पुण्याला असतानाच सतीशने कोण कोणती कागदपत्रे आणायला लागतील त्याची यादी सांगितली होती. त्यापैकी जी मिळणार नाहीत, दप्तरात नोंदच नाही असे काही असेल तर तशा अर्थाचे प्रमाणपत्र त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आणायचे. नातेवाईकांचे त्याकरता प्रतिद्न्यापत्र नोटरीकडून प्रमाणित करून घ्यायचे ते सांगितलेच, शिवाय ही सर्टिफिकिटे, प्रतिद्न्यापत्रे यांचा मजकूरही सांगितला. अमेरिकेतील त्या खात्यांना ज्या पद्धतीचा आणि स्पष्ट अर्थबोध होईल अशा साध्या भाषेतील होता तो मजकूर. वास्तव काय आहे हे नेहमीच्या सोप्या आणि खरे काय आहे ते सांगणारा मजकूर असतो. मी तयारीला लागलो. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून माझा जन्म दाखला, माझ्या लग्नाचे प्रमाणपत्र, ते नसल्यास संबधित अधिकाऱ्याकडून तशा अर्थाचे पत्र, माझ्या ज्येष्ठ नातेवाईकांचे माझे लग्न अमुक तारखेला झाले ते आम्ही त्याचे काका, मामा, मावशी…भाऊ, बहीण ..आहोत म्हणून आम्हाला माहित आहे आणि हे आम्ही शपथेवर सांगतो… असे प्रतिद्न्यापत्र, सतीशचा जन्मदाखला, बस्स, इतकीच कागदपत्रे लागणार होती.

सतीशचा जन्म दाखला मिळवण्यासाठी, माझे शेजारी अकोल्याचेच म्हणुन त्यांना भेटलो. त्यांनी माझ्याकडून सर्व नावे, तारीख मागितली. मी ती ठळक इंग्रजी अक्षरात, पासपोर्टमध्ये जशी स्पेलिंग आहेत तशीच लिहून दिली. सर्व काळजी घेऊन. “होईल काका हे काम दोन तीन दिवसात”, असे त्यांनी सांगितल्यावर,इतक्या लवकर काम होईल हे ऐकल्यावर माझा कंठ दाटून आला यात नवल ते काय!.

आता मी माझ्या कागदपत्रांसाठी सोलापूरला गेलो. माझंच गाव, सर्व कार्यालये कुठे आहेत त्याची सगळी माहिती मला होती. एक दोन दिवसात होतील कामे असा माझा अंदाज. गेलो सोलापूरला. जन्म दाखल्यासाठी फी भरून अर्ज दिला. “आठ दिवस लागतील, नंतर या” असा पहिलाच झटका मिळाला. मी कामाची तातडी सांगितली. पण फारसा उपयोग झाला नाही.मग ओळखी-पाळखीने कामं लवकर होतील या अनुभवाने त्याच्या शोधात लागलो. सुनीलच्या ओळखी भरपूर. आपल्यापैकी एकाचा एक मामा आहे त्याला भेटू असे म्हणून आम्ही त्या दुय्यम अधिकाऱ्याकडे गेलो. त्याने मला एक अर्ज द्यायला सांगितला. मी लिहून दिला. “अहो असा नाही, असे म्हणत एक मोठा ताव घेतला आणि लिहा असे म्हणाला. त्यांना पाहिजे तसे लिहून दिले. “नावं, त्याची स्पेलिंग बरोबर लिहून द्या. नंतर काही बदल करता येणार नाही. मी सर्व काही माझ्या पासपोर्टमध्ये लिहिली होती तशी लिहून दिली. “बरं झालं, आजच आलात. मी पुण्याला वरच्या ऑफिसात चाललोय. तिथून उद्या परवा मंजूर करून तसा जन्म दाखला तुम्हाला देतो”. इतके ठामपणे सांगितल्यावर कुणाला धन्य धन्य वाटणार नाही?

मी आता माझ्या लग्नाच्या प्रमाणपत्राच्या पाठीमागे लागलो. “त्याची त्या ऑफिसात झाडून सगळ्यांशी घसट आहे. त्याला सांगा तुमचं काम.झालच म्हणून समजा.” “त्याला गाठले. “उद्या ११.४५ वाजता डाक बंगल्यापाशी या. मग आपण त्या निबंधकांच्या ऑफिसात जाऊ.” मी ११.३० वाजता डाक बंगल्यापाशी पोहोचलो. साडे बारा वाजले, १.३० वाजला, २.४५ वाजले आणि फटफटीवरून ते ग्रहस्थ एका माण्साला घेऊन आले. इतका उशीर झाला वगैरे त्याचे काही वाटत असल्याचे एकही चिन्ह त्या ग्रहस्थाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.. “यांचं छोटसं काम आहे मिनिस्टरांकडे. ते करून आलोच पंधरा वीस मिनिटात असे सांगून डाक बंगल्यात गेले ते दोघे जण. मी पुन्हा डाक बंगल्याचा पहारा करत उभा राहिलो. चार वाजता ग्रहस्थ आला आणि म्हणाला,” मिनिस्टरने जेवायलाच थांबवून घेतले. चला निघू या आता” असे म्हणत आम्ही निघालो. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात आलो. ह्यांच्या सर्वांशी गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने कुणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले. काय काम आहे असे म्हटल्यावर मी माझा अर्ज दिला. आमचे ग्रहस्थ साहेबाला सांगू लागले. साहेबांनी माझा अर्ज टेबलावर कागदाच्या ढिगाऱ्यात कुठे तरी ठेवून दिला. थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. ते ऑफिसात “वटट” असणारे ग्रहस्थ म्हणाले दोन दिवसात काम होईल.

चला. दोन्ही कामे दोन दिवसात होणार या आनंदात मी बुडून गेलो. म्हटलं आता विजय अण्णांचे ऍफिडेविट करून घेऊ या.

प्रतिद्न्यापत्राचा मजकूर एका कागदावर छापून घेतला. तो सुनीलकडे दिला. त्याच्या ओळखीचा एकजण ह्या कामात अनुभवी होता.

वाचकहो आता माझ्या जन्म दाखल्याच्या कामाचे काय झाले तिकडे वळू. (ह.ना.आपटे, नाथ माधव यांच्या कादंबऱ्यांची आठवण आली ना?) चला आता आपण त्या “आपल्यापैकी एकाच्या ओळखीच्या माणसाच्या मामांनी” पुण्याला जाऊन जन्मदाखला आणलाही असेल. त्यांना फोन करू. “अहो, हे काय मी पुण्याच्या साहेबांच्या ऑफिसातच आहे. काम होणार. उद्या मी येतोच आहे”. उद्याचे आठ दिवस झाले. इकडे त्या सगळीकडे वट असणाऱ्या ग्रहस्थांनी काय केले ते पाहू. कारण त्यालाही आता आठ दिवस होऊन गेले होते. “मी उद्या जातोय त्यांच्याकडे. उद्या फोन करा.” चला आपली दोन्ही कामे उद्या होणार. दहा बारा दिवस राहिल्याचे सार्थक होणार. उद्या दोन्हीकडे फोन केले. पुन्हा चार दिवसांचे वायदे मिळाले. सुनीलला सांगितले मी आता जातो. तू पाठपुरावा कर. तो बिचारा आपला नोकरी व्यवसाय सांभाळून माझ्या कामाचाही पाठपुरावा करत होता.

मी पुण्याला आलो.जवळपास एक महिना उलतून गेला होता. दोन तीन दिवसात मिळणारा सतीशचा जन्म दाखला पुण्याला येऊन जुना झाला असेल अशा विचाराने माझ्या अकोल्याच्या शेजाऱ्यांकडे गेलो. त्यांच्या कडून सतीशचा जन्म दाखला आणावा म्हणून गेलो. काय कसं काय झाल्यावर त्यांना दाखला मागितला. त्यावर ते म्हणाले.” हा घ्या फोन, विजूभाऊंशी तुम्हीच बोला.” ही आणखी काय नवी भानगड असे पुटपुटत फोन घेतला. त्या विजूभाउंशी बोललो. त्यानी पुन्हा सगळी माहिती विचारून घेतली. स्पेलिंग, प्रत्येक नावाचे एकेक अक्षर उच्चारून लिहून घेतले.त्यांनी सांगितलेली फी शेजाऱ्यांकडे दिली. चार दिवसांनी फोन करा म्हणाले.

हे सगळे होईपर्यंत मे संपला, जून कधी उलटून गेला ते समजले नाही. जूलैही निघून गेला. फक्त अकोल्याहून विजूभाऊनी मात्र आठ दिवसात सतीशचा जन्म दाखला पाठवला. पण त्यात संजीवनीचे स्पेलिंग चुकले होते. पुन्हा फोन. पण त्यावर विजूभाऊंचे उत्तर,”स्पेलिंग चुकले तरी उच्चार तोच होतोय ना?” काय म्हणणार यावर आपण? चार महिन्यात एक कागद हाती आला. दरम्यान माझ्या जन्म दाखल्याचे. लग्नाच्या सर्टिफिकेटचे आणि विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्राचे काय झाले त्याची वाचकांना उत्कंठा लागली असणार. पण आता मला अमेरिकेला निघणे भागच होते. त्यामूळे वाचकहो माझ्याबरोबर तुम्हीही अमेरिकेला चला!

मिळाली तेव्हढी कागदपत्रे घेऊन अमेरिकेत पोचलो.

अमेरिकेत येऊन तीन महिने मुक्काम झाल्यावर ग्रीन कार्डासाठी अर्ज दाखल करता येतो. पण त्या अगोदर तिथल्या पोलिस खात्याकडून माझ्यावर कोणतीही पोलिसी कारवाई झाली नाही, मी कोणताही गुन्हा केला नाही, अशा अर्थाचे एक प्रमाणपत्र लागते. डिसेंबर महिन्यात सतीशने माझ्यासाठी तसा अर्ज दिला. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही रेडवूड सिटी पोलिस मुख्यालयात गेलो. आवश्यक ती फी भरलीच होती. अर्ज होताच. मला पाहिले, पासपोर्ट पाहिला. लगेच माझ्या नावावर कसलाही गुन्हा, बेकायदेशीर गोष्ट केल्याची कसलीही नोंद नाही, मी गुन्हेगार नाही असे सर्टिफिकेट त्यांनी एकही प्रश्न न विचारता ताबडतोब दिलेही!

सतीशने कागदपत्रांची यादी पाहिली. माझा जन्म दाखला मिळेल तसाच दाखल करायचा ठरले. कारण त्याबाबतीत जनामावशीचे तसे प्रतिद्न्यापत्र होते. सतीशचा जन्मदाखलाही मिळाला तसाच दाखल करायचा असे ठरले. सतीश माझा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याला जी कागदपत्रे दाखल करायची होती ती त्याने जमवली. एका दिवसात. आता राहता राहिले माझ्या लग्नासंबंधीची कागदपत्रे. ती अजूनही सोलापूरहून आली नव्हती. त्या निबंधकाच्या ऑफिसात “वट्ट्ट्ट” असणाऱ्या माणसाचे कोणी ऐकले नाही. “असे प्रमाणपत्र आजपर्यंत कुणी मागितले नाही आणि आम्ही तसे ते देतही नाही” हे ठाम उत्तर निबंधकांनी दिल्याचे कळले.(कायद्याच्या कोणत्या कलमाखाली असे सर्टिफिकेट देता येते हे नमूद केले असूनही!) मग जगदिशने सुचविलेल्या एका वकीलाला हे काम दिले. त्या वकिलालाही तेच उत्तर निबंधकाने दिले.(वकीलानेही अशा अशा कलमाखाली,साहेब, तुम्ही असे सर्टिफिकेट देऊ शकता असे सांगितले नसणार). उलट वकीलालाच त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्याकडे एक शॊध अर्ज करा, शॊध घ्या आणि प्रतिद्न्यापत्र करून द्या. वकीलाने तसे केले. पण त्यानेही एक चूक केलीच. काहीही आवश्यकता, गरज नसताना, आम्ही सांगितले नसतानाही, संजीवनीच्या पाठीमागे “लेट” असे लिहिले. विनाकारण नसते फाटे फोडायचे सगळ्यांनी ठरवले की काय वाटायला लागले. पुन्हा मुंबई, सोलापूरला फोनाफोनी. दुरुस्ती झाली. आता माझे लग्न झाले याचे प्रतिद्न्यापत्र विजय अण्णांकडून यायचे होतेच. श्याम आणि शैलाकडून घ्यायचे ठरले. सोलापूराहून एकही कागदपत्र आले नव्हते. दरम्यान फोनाफोनी चालूच होती.

माझ्या जन्मदाखल्यात अनेक चुका होत्या. त्यातील दोन चुका फक्त दुरुस्त होतील, आईचे नाव माझ्या पासपोर्टात आहे तसे(तेच बरोबर नाव होते तरीही) करून मिळणार नाही असे बरेच वेळा संगितले होते. पुन्हा खटपट, आपली बाजू मांडून सुनीलने पहिली. पण काही उपयोग झाला नाही. विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्रात जणू काही दर वेळी नवी चूक करण्याचा निश्चयच केला होता की काय त्या तज्न्य माणसाने असे वाटायला लागले. आतापर्यंतच्या चुकांवर सर्वात मोठी कडी त्याने केली म्हणजे नवीन प्रतिद्न्यापत्रात वर्तमानपत्रात हेड्लाईन शोभावी एव्हढ्या ठळक अक्षरात “देअर इज टॉयलेट इन माय हाऊस” असे शीर्षक छापून मग पुढचा (तोही स्पेलिंगच्या चुका करून ) मजकूर लिहिला होता. निर्मळ ग्राम योजनेच्या नियमाप्रमाणे ते कुठल्याही प्रतिद्न्यापत्रावर आवश्यक केले होते म्हणे! तेही फक्त सोलापुरातच की काय! कारण पुण्या मुंबईत जी दुसरी दोन तीन ऍफिडेव्हिट करून घेतली होती तिथे कुणी असा “विधी” केला नव्हता. मग सोलापूरचा नाद सोडून दिला. मिळाला तसा माझा जन्म दाखला मागवून घेतला. तो आहे तसाच दाखल करायचे ठरवले होतेच. माझ्या ल्ग्नासंबंधीची दोन प्रतिद्न्यापत्रे श्याम आणि शैलाकडून करून घ्यायचे नक्की केले. यासाठी श्रीकांतने आणि स्मिताने खटपट केली. अखेर पाहिजे होती ती कागदपत्रे आली. आली पण केव्हा? मार्च महिन्यात! तीन चार दिवसात माझी वैद्यकीय तपासणी(म्हणजे रक्ताच्या चाचण्या, तीन चार लशी टोचून घेणे इ.) होऊन त्याचे रिपोर्टही हातात आले. आता सगळी कागदपत्रे, यादी करून सोबत माझी आणि सतीशची पूर्ण माहिती भरलेले अर्ज जोडून आणि आवश्यक त्या रकमेचा चेक लावून ते बाड सतीशने पाठवून दिले. तीन दिवसांनी ते मिळाल्याचे पोच-पत्र त्यांच्याक्डून आले. आठ दहा दिवसात ३ मे रोजी बोटाचे ठसे देण्यासाठी १२.१५ वाजता या असे पत्रही आले. बोटाचे ठसे दिले. लागलीच, तिथल्या तिथेच, तुमचे बोटाचे ठसे घेतले, पुढच्या कार्यालयात पाठवले अशा अर्थाचे पत्रही दिलेही! त्यानंतर आठ दहा दिवसांनी ग्रीन कार्ड मिळण्यासंबंधात तुम्ही मुलाखतीसाठी ३ जून रोजी सकाळी ८.२५ वाजता या ऑफिसात यावे असे पत्रही आले.त्यामूळे आता अजून पंधरा दिवस आहेत, यशचे बरेच फोनही आले,”तू केव्हा येणार? माझ्या कॉन्सर्टला यायला पाहिजेस “असे त्याचे फोन येत होते. सतीशकडे येऊनही बरेच महिने झाले होते. यदाकदाचित ग्रीन कार्ड मिळालेच(!) तर मग लगेच निघावे लागेल. असा सर्व विचार करून मी सुधीरकडे पंधरा दिवसांसाठी आलो. तिथला मुक्काम आटोपून सतीशकडे पुन्हा एक जूनला आलो. त्या दिवसापासूनच नव्हे मुलाखतीचे पत्र आल्यापासून काळजी, चिंता, धाकधुक वाढली होतीच. इंटरव्ह्यू कसा होईल याची काळजी, ताण आला होता, वाढतही होता.

सुधीर सतीश सारखे सांगत होते. साधा असतो हा इंटरव्ह्यू. जुजबी माहिती विचारतात, काळजी करू नका; असे सारखे सांगत होते. पण माझे मन ते माझे मन. “चिंतनात” मग्न! असो. आदल्या रात्री सतीशने सकाळी सात वाजता निघायचे असे सांगितले. सॅनफ्रॅन्सिस्कोला जायचे होते. सकाळी रहदारी फार. गर्दी असते. तेजश्रीने सांगितले, “विरळ म्हणत होता इंटरव्ह्यू अर्धा तास तरी चालतो”. पुन्हा माझ्या पोटात गोळा आला. इतका वेळ तोंड कसे काय द्यायचे! मी म्हटले, अरे, बराच वेळ असतो की हा प्रकार! सतीश शांतपणे म्हणाला, ” बाबा, तुमचा इंटरव्ह्यू एक तास चालेल,दहा मिनिटे चालेल.प्रत्येकाचे प्रकरण निराळे असते.” तीन जून उजाडला. मी पाच वाजताचा गजर लावला होता. उठलो. सगळे आटोपले. सतीश आणि मी निघालो. आणि त्या कचेरीत आठला पाच मिनिटे कमी असताना पोचलो. बाहेरच्या प्रवेशद्वारापासूनच सुरक्षिततेची तपासणी, ओळखपत्रांची तपासणी, सुरू झाली. आत गेलो तिथे तर याहूनही थोडी जास्तच तपासणी. पण हे सर्व साध्या नेहमीच्या आवाजात सौम्यपणे सांगत चालले होते. मग दुसऱ्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याला भेटलो. त्याने माझ्या अर्जावर काहीतरी लिहिल्यासारखे केले आणि तिसऱ्या मजल्यावर जाऊन थांबायला सांगितले. गेलो आणि वाट पहात बसलो. बरोबर ८.२०-२२ मिनिटांनी एक हसतमुख अधिकारी आला. “सडॅ, सडा..शिव्ह कॅमॅ..ट म्हणत आला. इतके नागमोडी उच्चार करायला लावणाऱ्या नावाचा दुसरा तिथे कुणीही(तामिळ, तेलगू) नव्हता. त्यामुळे आम्ही दोघे लगेच उठलो. त्याने आम्हाला त्याच्या पाठोपाठ यायला सांगितले. एक दोनदा डावीकडे, उजवीकडे करत त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्याने पुन्हा आमचे हसतमुखाने स्वागत केले. आणि वरदहस्त करत मी खरे सांगेन, खोटे सांगणार नाही खरे तेच सांगेन अशी शपथ घ्यायला लावली.(सांगू तेच खरे-मी). मग त्याने आमची ओळख पत्रे(माझा पासपोर्ट) पाहून आम्ही तेच आहोत याची खात्री करून घेतली. मी अर्जात माझी जी माहिती– जन्म तारीख, सतीशचा पत्ता, वय, वगैरे दिली होती तीच पुन्हा विचारून घेतली.लगेच किती मुले(सन्स) विचारले.

मी दोन मुलं(मुलगे) म्हणून सांगितले. नंतर एखादा प्रश्न विचारला. आणि पुन्हा विचारले किती मुले? मी दोन म्हणालो. चूक लक्षात आली. तो अर्जात पाहू लागल्यावर मी लगेच म्हणालो ऍन्ड वन डॉटर”. तो हसला आणि यस यस म्हणत अर्जावर बरोबर अशी खूण केली. सतीशलाही त्याने एखादाच प्रश्न विचारला असेल. लगेच त्याने तुम्हाला ग्रीन कार्ड मंजूर झाल्याचे सांगितले आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का असे विचारले. मी तर इतका मोकळा मोकळा, हलकाफुल्ल झालो होतो, ताण तणाव कुठे पळून गेले होते ते लक्षातही आले नाही. मला कसले प्रश्न असणार? सतीशने अखेर विचारायचे म्हणून विचारले की मग आता माझे बाबा परत जाऊ शकतील का? तो अधिकारी म्हणाला,” नाही. कार्ड प्रत्यक्ष हातात पडल्याशिवाय जाता येणार नाही.”आणि ते कार्ड दोन-तीन आठवड्यात येईल तुमच्या पत्त्यावर हेही सांगितले. लगेच त्याने एक छापील पत्रही दिले. माझे अभिनंदन आणि ग्रीन कार्ड तुम्हाला मिळाले असे सांगणारे ते पत्र दिले. ते घेतले आणि आम्ही थॅन्क्यू थॅन्क्यू म्हणत बाहेर आलो. सहज घड्याळाकडे पाहिले -फक्त दहा मिनिटे झाली होती!

चला, ग्रीन कार्डाच्या या प्रवासाला ंमी पुण्याहून निघण्या अगोदर फार पूर्वीपासूनच सुधीरने बाबा आता ग्रीन कार्डाच्या तयारीनेच या, मी आणि सतीश तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील आणि काय करावे लागेल ते सांगू, अशी सुरवात करून कामाला लावले. सतीशने मग सगळे तपशीलवार क्ळवले त्यापासून सुरवात झाली होती.. सतीशच्या धडपडीला,सुधीरच्या सुचनांना जगदीशच्या,सुनीलच्या, श्रीकांत आणि स्मिताच्या मेहनतीला, तसेच जनामावशी, श्याम आणि शैला यांनी केलेल्या सहाय्याला, मदतीला यश आले. माझ्यासारख्या ” सदंभटाचे तट्ट्टूटू अमेरिकेच्या गंगेत न्हाले”.

ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. त्यामुळे कागदपत्रांची जमवा जमव करताना आलेले अनुभव आता मोठे विनोदी वाटतात! हसू येते.

पण सतीश म्हणतो त्याप्रमाणे, बाबा आपले सगळे रेकॉर्ड इतके सरळ, आणि कसल्याही गुंतागुंतीचे, बेकायदेशीर, वेडेवाकडे काही नसते. आपल्याला काय विचारायचे हा त्यानांच प्रश्न असतो!”त्यांनी आपल्यालाच ग्रीन कार्ड तुम्ही छापून घ्या असे सांगितले असते.” हेच खरे.

वारीतील सखे सोबती

वारी पूर्ण झाली. मी घरी आलो. डोळ्यासमोर अजूनही वारीच दिसायची.
कानात टाळ मृदुंगाचे आवाज घुमत होते. मनात वारीचेच विचार आणि माझ्या
सहवारकऱ्यांच्या आठवणी.

तीन चार दिवस घरातील सर्वांना पंढरीच्या पायी वाटचालीच्या,
आळंदीपासून माझ्या सोबत असलेल्या वारकरी सज्जनांच्या, सुहृदांच्या आठवणी
सांगत होतो.

ठरल्याप्रमाणे आळंदीला माझे चंद्रपूरचे मित्र डॉ.अंदनकर भेटले;त्यांच्या
बरोबर आलेली त्यांची चंद्रपूरची मित्रमंडळी भेटली.आता इथून
पंढरपुरापर्यंत आम्ही चौदा वारकरी एकत्र वारी करणार! डॉक्टर आणि श्री.
शंकरराव आदे हे दोघे अनुभवी वारकरी.डॉक्टारांनी यापूर्वी सहा सात वेळा
पंढरपूरची पायी वारी केली आहे.बाकीचे आम्ही सर्व अगदी “पहिलटकरी”
होतो वारीत.

य़ा वारीच्या निमित्ताने आम्हा दोघा मित्रांची–डॉक्टरांची आणि माझी–
जवळपास चाळीस वर्षांनी भेट झाली! ह्या भेटीचा आनंद तर काही वेगळाच
होता. वारीत चालताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.त्यांची तब्येत
बिघडली म्हणून त्यांना माघारी परतावे लागले. पण त्यांची जवळ जवळ अर्धी
वारी झाली होती. डॉक्टर परत गेले खरे पण ते आणि आम्ही दर दोन एक दिवसांनी
एकमेकांची चौकशी करत असू. त्यांना बरे वाटते आहे हे समजल्यावर
सगळ्यांनाच बरे आणि हायसे वाटले.एका परीने त्यांचे मन वारीतच होते.वारी
संपल्यावर मी त्यांना फोन केला तेव्हा डॉक्टर पूर्ण बरे झाले आणि आता ते
आपल्या हॉस्पिटल मध्ये जातात आणि ऑपरेशन्स वगैरे करू लागले हे त्यांच्याकडून
ऐकल्यावर मला खरा आनंद झाला.

लोणंदपर्यंत डॉक्टर,मी आणि श्री. कमलाकर कुमरवार वारीत एकत्र असायचो.वाटेत
गप्पा मारताना ते, त्यांचा व्यवसाय ते स्वत: आणि त्यांचा मुलगा नविन कल्पनांनी
कसा वाढवतोय, त्यांची आणि डॉक्टरांची कशी घनिष्ठ मैत्री आहे हे सांगत.
त्यांना गुडघेदुखीचा फार त्रास होत असे. पण ते दुखणे सहन करत ते सावकाश
विश्रांती घेत सगळे टप्पे पार करत. कमलाकर अणि डॉक्टर दोघेही आपले
दुखणे अंगावर काढत चालत आहेत ह्याची मला थोडी फार कल्पना होती.
गुडघे फारच दुखू लागले तर काही अंतर कमलाकर गाडीतून पार करत.पण
असे क्वचित. ह्या दोघांमुळे आम्ही लोणंदपर्यंत आलो हे जाणवले नाही.

दिंडीत आम्हाल पहिले काही दिवस २८ क्रमांकाचा तंबू मिळाला होता.आमचा हा
तंबू म्हणजे एक नमूना होता. पालाची एक बाजू अगदी वर तर दुसरी बाजू फार
खाली. शंकरराव आदे सारखे अनुभवी सुद्धा ह्या तंबूच्या दोऱ्या आवळून
थकले.त्यांना मदत करणारे श्री.फडणवीस, सुनील सिद्धमशेट्टीवारही रोज ही
कसरत करतान बेजार व्हायचे. बरं दिंडीच्या मालकांना सांगावे तर आणखीनच
गंमत व्हायची. दिडीचे मालक,चालक प्रमुख दोघे भाऊ होते.एक भाऊ मुका तर
दुसरा बहिरा. पण दोघेही कर्तबगार आणि हुशार. एकदा मुके बंधू भेटायचे तर
दुसऱ्या वेळी बहिरे! दोघे एकदम भेटूनही उपयोग होईना! मग एकदा आमच्या
तंबूची दुर्दशा बहिऱ्या मालकांना कागदावर लिहून दाखवली. मग आम्हाला
दुसरा तंबू मिळाला.पण हे सर्व होण्यास आठ दहा दिवस गेले!

आम्ही संध्याकाळी सर्वजण तंबूत मुक्कामाला आलो की महिला मंडळ
श्री.फडणविसांची गंमत करत असे. फडणविसांनी त्यांना सांगितलेल्या काही
गोष्टींवरून त्यांची खिल्ली उडवत. फडणविसही खिलाडूपणे त्यात सामील हॊऊन
पुन्हा एखादी घटना तक्रारवजा सुरात सांगत आणि त्यावरूनही सौ.घरोटे,
विद्याताई मसादे, सौ.ज्योती तारे त्यांची फिरकी घेत.पण वारीत चालताना
फडणविसांची आपल्याला खात्रीची सोबत असायची असे माझ्यापाशी, महिलामंडळ
आवर्जून सांगत.

मुक्कामाला आलो की आमचे(एक्स्प्लोरर)-संशोधक-म्हणजे श्री. सुनील सिद्धमशेट्टीवार
आणि फडणवीस. पाण्याचा टॅंकर कुठे आहे, टॅंकरपाशी अजून गर्दी नाही,
“बहिर्दिशा” कोणत्या दिशेला वगैरे साध्या पण गरजेच्या बाबींची अचूक
माहिती हे दोघेजण सांगत. भल्या पहाटे, पहाट कसली, खरं म्हणजे उत्तर रात्रीच
तीन साडे तीन वाजता हे दोघे बहाद्दर “बढिया” आंघोळीसकट सर्व आटोपून
“तैय्यार”! आम्हा इतरांचे सर्व आटोपे पर्यंत ह्या दोघांची पुन्हा एक झोपही
होत असे! पुन्हा सगळ्यांना सामानासकट गाडीकडे घेऊन जाण्यातही पुढे.माझी जड
बॅग सुनील तर कधी श्री. शंकरराव आदे घेत.आणि रात्री तंबूत आणूनही ठेवीत.

रात्री जेवणाच्या पंगतीला ह्या तिघांची तसेच श्री आवताडे आणि
श्री.रेभणकर यांची मला सोबत असायची.शिवाय श्री. फडणविस आणि सुनील
सिद्धमशेट्टीवार हे दोघे चंद्रपूरकर दिंडीतल्या एखाद्या पंगतीला जेवायलाही
वाढीत.

सिद्धमशेट्टीवार यांना भजने, श्लोक, स्तोत्रे चांगली पाठ आहेत आणि आपल्या
उत्तम आवाजात ते म्हणतही छान. आम्ही ११ जुलैला सासवडहून थेट पंढरपूरला
जाताना गाडीत त्यांच्या आणि विशेषत: सौ. आदे आणि सौ घरोटे यांच्या
भजनांनी बहार आणली. खरोखर त्या दिवशी हरीनामाचा गजर आणि संकीर्तनच
झाले आमच्या गाडीत!

श्री. शंकरराव आदे अनुभवी वारकरी.तंबूच्या एखद्या कोपऱ्याची दोरी
ताणून बांधणे,वाटचाल संपून मुक्कामाला तंबूत आल्याबरोबर कपडे वाळत
घालण्याचे दोरी बांधणे, पाऊस येणार असे दिसले की, तंबूवर प्लास्टिक्सचे कापड
सुनीलच्या मदतीने टाकणे. गाड्यांत सर्व सामान नीट रचून ठेवणे, ह्या गोष्टीत
त्यांचा नेहमी मोठा हातभार असे.

सौ.ज्योती तारे, सौ.घरोटे, सौ आदे, विद्याताई मसादे अणि त्यांची बहिण बेबीताई
ह्या महिलांमुळे आमच्या तंबूत सतत काही ना काही चालू असायचे.एखाद्या
संध्याकाळी हरिपाठाच्या अभंगाबरोबर इतर स्तोत्र, भजने ह्यांच्यामुळेच म्हटली
जात असत. कधी विद्याताई किंवा त्यांची बहिण बेबीताई संध्याकाळी गरम चहा
घेऊन येत; तर कधी सरबत कर असे काहीना काही चालू असायचे.

सौ.ज्योती तारे ह्यांच्या वाचनाची आवड, त्यांचे वाचन त्यांच्या बोलण्यातून
जाणवत असे.उत्तम संस्कार करणाऱ्या, चांगले आदर्श आणि मूल्ये मुलांपुढे
ठेवणाऱ्या आपल्या वडिलांविषयी त्या भरभरून सांगत.ऍडव्होकेट विद्याताई
गुडघ्यांच्या त्रासामुळे गाडीतून येत असत पण जेव्हा लवकर येत तेव्हा दिंडीच्या
मुक्कामाचे ठिकाण शोधून काढणे, हिशोब ठेवणे अशी महत्वाची कामे त्यांनी
व्यवस्थित सांभाळली. त्यांच्या बेबीताईंची, चालून दमून भागून आल्यावर
सुद्धा एखादी बादली पाणी भरून आणणे, चहा आणणे वगैरे बारिक सारिक कामे
चालू असायची.

जे ज चांगले आपल्या वाचनात आले की ते लिहून ठेवणाऱ्या,
भजनांची गोडी असणाऱ्या आणि म्हणणाऱ्या, वाटचालीत नेहमी त्यांच्या बरोबर
असणाऱ्या सौ.ज्योती तारे, बहुधा भंडी शेगावहून वाखरीला येताना, आपल्या
बरोबर दिसत नाहीत त्या कुठे मागे राहिल्या की काय हे लक्षात आल्यावर ज्योती
सुखरूप असावी, लवकर भेटावीम्हणून धावा करणाऱ्या, रडणाऱ्या, हळव्या सौ.
घरोटे; “पांडुरंग विठ्ठला। पंढरिनाथ विठ्ठला। विठू किती दमला॥” हे
भजन ठेक्यात, गोड म्हणणाऱ्या सौ. आदे या सर्वांची आठवण आमच्या तंबूतील
सगळ्यांना येणार यात नवल नाही.

सौ. ज्योती तारे, आपल्या बरोबरचे इतर सांगाती, रस्ता ओलांडून, पुन्हा वळून
जाताना तसेच पुढे गेले; आपण मागे राहिलो हे त्या लोकांच्या लक्षातही कसे आले
नाही! मग त्या तशाच एकट्या पुढे निघाल्या. एव्हढ्या अफाट लोकसागरात
बरोबरीचे मागे आहेत की पुढे गेले हे समजणेच फार कठिण. थोडी वाट पाहून त्या
लोकगंगेच्या लाटेबरोबर पुढे जाणे इतकेच आपल्या हातात असते. तशाच त्याही मग
पुढे निघाल्या. आपल्या बरोबरचे आणि आपली चुकामूक झाल्यावर त्या तेव्हढ्या
अफाट गर्दीतही–गर्दी हा शब्दसुद्धा वारी नावाच्या महासागराचे वर्णन करण्यास
अपुराच आहे–आपण एकटेच असतो!

अशा एकट्या अवस्थेत त्या एकाकी निघाल्या. कितीही धैर्य गोळा करून निघाल्या,
गर्दी वारीतील भाविकांची असली तरी, तसे सर्व अनोळखीच.वाट आणि प्रदेशही
नवखाच. केव्हातरी जीवात धाकधुक झालीच असणार. पण ह्या बहाद्दर बाई
निश्चयाने पुढे पुढेच आल्या आणि अखेर पोलिसांना विचारून नेमक्या मुक्कामाच्या
ठिकाणी आल्या!आपले धैर्य कसोटीवर घासून सिद्ध करावे लागलेल्या ह्या
प्रसंगाची त्यांना आणि इतरांनाही सदैव आठवण राहील.

मुक्काम हलवून सकाळी सहा साडेसहाला आमच्या तंबूतले इतर आणि मी व
श्री.आवताडे बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर थोडा वेळ कुणाच्या ना कुणाच्या पण
अनेक वेळा माझ्या आणि श्री. आवताडे यांच्या बरोबर असणारे श्री. रेभणकर
थोड्याच वेळात अंतर्धान पावत! गायब होत! आणि एकदम संध्याकाळी मुक्कामाच्या
ठिकाणी तंबूत प्रकट होत.आल्यावर प्रथम माझी चौकशी करत. मग
सर्वांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला शांतपणे, हसतमुखाने तोंड देणारे,आपल्या
वैशिष्ठ्यपूर्ण पोषाखाने आमचेच काय पण सर्व वारीचेच लक्ष वेधून घेणारे,
कधी एखाद्या मलंग तर कधी गाडगेबाबांसारखे भासणारे, सरळ मनाचे,मस्त
अवलियासारखे स्वानंदात मग्न असणाऱ्या रेभणकरांना विसरणे कठिण आहे.
आठवण ठेवून चंद्रपूरला पोहोचल्यावर त्यांनी मला फोन केला तेव्हा मला
आनंद झाला.

कसलाही नवस नव्हता की व्रत घेतले नव्हते पण श्री. आवताडे यांनी आळंदी ते
पंढरपूर ही वारी अक्षरश: अनवाणी पायांनी केली.
काट्याकुट्यांतून, रणरणत्या उन्हात भाजून तापून निघालेल्या डांबरी
रस्त्यावरून, दगडगोट्यातून, अणकुचीदार खडे पायाला टोचत असताना,
तापलेल्या धुळीतून, वावरातल्या काळ्या चिकण मातीच्या चिखलातून अनवाणी
पायांनी २५०/२६० किलोमीटरची ही वारी करणे म्हणजे श्री. आवताडे यांची एक
प्रकारे मोठी तपश्चर्याच नाही का? असा हा तपस्वी वारकरी लोणंदपासून
माझ्या बरोबर होता.हा माझा सन्मानच होता. अगदी वाखरीच्या पुढे
पांडुरंगाच्या पंढरीत प्रवेश करून आम्ही पंढरपूरात आठ दहा मिनिटे
सोबतीनेच चालत होतो.

रोज संध्याकाळी तंबूत मुक्कामाला आल्यावर “थकलो” म्हणण्याचा खरा अधिकार
फक्त श्री.आवताडे यानांच होता यात शंका नाही.ह्या एका गोष्टीमुळेही आवताडे
सगळ्यांच्या लक्ष्यात राहतील.

सौ. ज्योती तारे मध्यंतरी एका वाटचालीत एकट्या मागे राहिल्या होत्या.त्यावेळी
त्यांच्या सुखरूपतेसाठी देवाचा धावा करणाऱ्या सौ. घरोटे वारीच्या
अगदी अखेरच्या क्षणी आमच्यातून हरवल्या!

पंढरपूरच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आम्हा सर्वांच्यापुढे त्या
केव्हा गेल्या हे आम्हाला आणि त्यांनाही समजले नाही. त्या बराच वेळ तशाच
पुढे गेल्या. इकडे आम्ही काळजीत. वाट पहात, शोधत त्या चौकात उभे. चारी
बाजूंनी लोकांचे, वाहनांचे लोंढे! सौ.ज्योती आणि विद्याताईंची बहिण
चौकाच्या तोंडाशी थांबल्या.मी सांगोला रस्त्यावर शोधायला गेलो आणि श्री.
फडणविस सोलापूर रस्त्यावर. बऱ्याच वेळानंतर मी जेव्हा परत चौकात आलो तेव्हा
सौ.घरोटे सौ. ज्योतीशी बोलत उभ्या असलेल्या पाहिल्यावर मी सुटकेचा नि:श्वास
टाकला. जीव भांड्यात पडला.सौ.ज्योतीलाही तसेच वाटले असणार.चला,
फिट्टंफाट झाली. त्या दोघींना एकमेकींसाठी कराव्या लागलेल्या प्रार्थना,
चिंता सार्थकी लागल्या.

सर्वांना काही ना काही मदत करणारे श्री. फडणविस आणि श्री.सुनील
सिद्धमशेट्टीवार हे दोघे पुन्हा माझ्या मदतीला धावले. क्रांतिवीर नाना पाटील
चौकापर्यंत माझे सामान घॆऊन हे दोघे सहवारकरी सज्जन मी एसटीत बसेपर्यंत
माझ्याबरोबर होते.

या वारीत काही चांगले अनुभव आले. अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला, पहायला
मिळाल्या. काय अनुभव मिळाला अथवा वारी करून काय मिळविले याचे उत्तर देता
येणार नाही.पण जे काही माझ्या हातून-खरं तर पायांनी-घडले तोच एक मोठा
अनुभव होता. ह्याचे सर्व श्रेय माझे मित्र डॉ. अंदनकर यांना आहे. माझ्या
सारख्या “पहिलटकऱ्या” वारकऱ्याची ही वारी सुखरूपतेची, आनंदाची
झाली ती डॉ.अंदनकर आणि वर उल्लेख केलेल्या आमच्या तंबूतील सर्व सज्जन
सुह्रुदांच्या मुळेच हे अगदी खरे. ह्या सर्वांच्या सोबतीच्या ऋणात राहणे हे ही
एका परीने भाग्यच आहे.

वारीला निघालो तेव्हा ह्या सर्वांना माझे “लोढणे” हॊऊ नये असे मला
वाटायचे.आणि मी त्यांना “लोढणे” झालो नाही हा माझा मोठा आनंद आहे.

वारीचे वैभव!

मी थेट आळंदीपासून वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या वारीसाठी निघालो.
आळंदीला त्या रात्री, उद्यापासून आपली वारी सुरू होणार ह्याचे थोडे अप्रूप
वाटत होते. पण सासवडला पोचलो तरीही आपली पंढरपूरची वारी होतेय
असे मनात येत नव्हते. नवखेपणाच्या नवलाईचा उत्साह अजूनही संचारला
नव्हता.

सासवडचा मुक्काम संपवून जेव्हा आम्ही जेजुरीला निघालो त्या क्षणापासून
मात्र मला एकदम काहीतरी निराळे वाटू लागले. अरे वा! निघालो की मी
पंढरपूरा! लहान मुलाला पहिल्यांदाच आगगाडीत बसून प्रवासाला जाताना
वाटते तसे काही तरी मलाही वाटत होते.वारीला आपण खरच निघालोय ही
भावना काही औरच होती!

गेली अनेक शतके ही वारी चालू आहे. सर्व संतांच्या पालख्यांबरोबर
वारकऱ्यांची ही वारी विठोबाच्या भेटीसाठी अखंड चालूच आहे. आज
आपणही त्यांच्याबरोबर त्या मार्गावरून जात आहोत. किंचित का होईना आपण
आज वारकरी झालो असा फार फार पुसटसा शिक्का माझ्यावर उमटला असेल याचा आनंद
झाला होता.

लहान मुलाच्या कुतुहलाने, त्याच्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पहात होतो.
कुठेही, केव्हाही पाहिले तरी हजारो वारकऱ्यांची दाटी नदीच्या
प्रवाहासारखी सतत वहात असलेली दिसायची.

वारीचा रंग कसा सांगावा! वारीचा पोषाख पांढरा. पांढरा सदरा,
डोक्यावर पांढरे पागोटे किंवा गांधी टोपी आणि पांढरे धोतर,किंवा पायजमा.
कपाळावर नाममुद्रा– गोपीचंदनाचा टिळा त्यावर काळ्या बुक्क्याचा ठिपका.
मराठवाड्याचे वारकरी त्यांच्या गुलबक्षी तांबड्या रूमाला-पागोट्याने
उठून दिसायचे. वारकरी स्त्रीयांची रंगीत लुगडी-साड्या त्या पांढऱ्या
वारीत रंग भरायच्या. ह्या सर्वांवर वारकऱ्यांच्या हातातील गेरुच्या
रंगाची वारकरी पंथाची निशाणे, पताका जोरात फडफडत तर कधी
उंच उंच नाचत असत.

संत चोखोबाने( संत चोखा मेळा)म्हटल्याप्रमाणे,”टाळी वाजवावी गुढी
उभारावी । वाट हे चालावी पंढरीची॥ पतांकाचे भार मिळाले अपार…….”
आमची ही अडीच तीन लाख वारकऱ्यांची वारी टाळमृदुंग वाजवित,निशाणे
उंचावत, फडफडवत “हरीनाम गर्जता नाही भयचिंता” असे संत चोखोबाच्या
विश्वासाने हरीनाम गर्जत निश्चिंतपणे चालत होती.

टाळमृदुंगाच्या नादावर संतांचे अभंग तल्लीनतेने म्हणत,मध्येच आनंदाने
उड्या मारीत, कधी फुगड्या घालत,रिंगण धरून भजने म्हणताना
वारकऱ्यांच्या ओसंडणाऱ्या उत्साहाचे काय वर्णन करावे?

खेड्यापाड्यातील वारकरी बायकाही काहीना काही म्हणत, गुणगुणत चालत असत.
मग ती एकनाथांची गौळण असो,किंवा साधे “ज्ञानोबा माऊली तुकाराम,तुकाराम”
असो, मनापासून म्हणत.त्यांची काही गाणीही गमतीची असत. “जात्ये विठोबाला
(शी) भांडायाला”,किंवा कृष्णाविषयी, तो दिसल्यावर”गेली माझी घागर सुटून”
अशा गोड तक्रारीची,”द्येवा मी करत्ये धंदा व्यापार…देत्ये हो नाम उधार”…..
तरीही कोणी देवाचे नाव घेत नाही असे हताशपणे सांगणारे गाणे, म्हणत म्हणत
लांबची वाट सोपी करत.

[ह्या बाया-बापड्यांकडे अशा अनेक गाण्यांचा, लोकगीतांचा साठा आहे ह्याची
आपल्याला-निदान मला तरी नव्हती-अजूनही कल्पना नाही. ती ऐकताना
त्यांच्या पाठांतराचे तर कौतूक,आश्चर्य वाटायचेच पण हे ध्वनिमुद्रित करावे
असे सारखे वाटत होते.असो]

दूरदर्शनवर किंवा सिनेमात डोक्यावरची समई किंवा लहान कळशा, खाली पडू
न देता थोडा वेळ नृत्य केलेले पाहिले तर त्याचे किती कौतूक होते.पण वारीतील अनेक
स्त्रीया डोक्यावर तुळशीवृंदावनाची कुंडी, हाताचा आधार न देता,रोज वीस
पंचवीस किलोमीटर चालत असतात.डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या त्या
बाईच्या शेजारी डोक्यावर पाण्याने भरलेली लहान कळशी घॆऊन चालत असते
तिची दुसरी सोबती. तुळस सुकू नये म्हणून ती पाण्याची कळशी.हे असे थेट
पंढरपुरापर्यंत. ह्याला काय म्हणायचे? भक्तीमार्गातील हटयोग? काहीही
नाही.ही फक्‍त परंपरेने आलेल्या प्रथेवरची चालती बोलती भक्ती,श्रद्धा!

वारी म्हणजे एक चालते फिरते शहरच!

वारीमध्ये फक्त वारकरीच चालतात असे नव्हे. वारकऱ्यां़च्या रोजच्या गरजा
भागवणारे अनेक लहान व्यावसायिक वारीबरोबर असतात. न्हावी, पायताणे दुरुस्त
करणारे, ती विकणारे, साबण, काड्यापेट्या, मेणबत्त्या पान तंबाखू विकणारे असे
कित्येक हातावर पोट भरणारे लहान व्यावसायिक वारीबरोबर येत असतात. अगदी
पहाटेपासून, वारी जागी झाल्यापासून, आपल्या चहाच्या गाड्या तयार ठेऊन
गरम चहा देण्याऱ्या “सागर चहा,मोडलिंब”च्या अनेक हातगाड्या उभ्या असतात.
आपापल्या हातगाड्या ढकलत वारी चालू लागायच्या आत ठरलेल्या मोक्याच्या
जागा धरत तर कधी वारीबरोबर तर कधी पुढच्या थांब्याजवळ ह्या “सागर
चहा,मोडलिंब” च्या गाड्या सेवेला उभ्या असत.भजी, वडे, भेळ चुरमुरे वगैरे
पदार्थांची लहान हॉटेलं,टपऱ्या, गाड्या असतातच.लिंबाच्या सरबताच्या,
उसाच्या रसाच्या गाड्या वारकऱ्यांची तहान गोड करत. केळी, डाळिंबं,पेरु
विकणारेही भरपूर!

म्हणूनच वारी हे एक चालते फिरते शहर असते.एक दृष्टीने पाहिले म्हणजे
महंमद तुघ्लकानी राजधानी अशी हलवायला हवी होती असे वाटते. चहाची
प्रत्येक गाडी “सागर चहा, मोडलिंब”च कशी? असा प्रश्न पडला. मोडलिंबच्या
कोणी एकाने चहाची पहिली गाडी वारी सोबत आणली असावी. मग ह्या आद्य
चहावाल्याचेच नाव गाव इतरांनीही वापरायला सुरुवात केली असावी. बौद्धिक
संपदा हक्क, “फ़्रंचायझ”, “चेन ऑफ़ शॉप्स” अशा आधुनिक मालकी हक्काच्या सोयी
त्यावेळी आणि आजही अशा लहान गरीब चहाच्या हातगाडीवाल्याला कुठून लागू
पडणार? आणि अशा बिचाऱ्यांना ह्याची माहिती तरी कोण लागू देणार? बरं हे
नाव वापरणारेही बिचारे त्याच्या इतकेच लहान!

वारीच्या सुरवाती पासून ते थेट पंढरपूरपर्यंत अनेक उदार लोक चहा पणी,
खाण्याचे निरनिराळे पदार्थ, केळी, जेवणखाण मोफत देत असतात.

ऐपत असलेले आणि ऐपत नसलेले, असंख्य गोरगरीब वारकरी, थोडक्यात वारीत
कोणीही उपाशी राहात नाही!

वारीतील अनेकजण आपल्या आंघोळी, कपडे धुण्यासाठी विश्रांतीसाठी
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यांचा आश्रय घेत.त्या शेतमळ्यांचे मालक
शेतकरी मोठ्या उदार मनाचे असले पाहिजेत. पिकांना पाणी देणारे त्यांचे
पाण्याचे पंप वारीच्या दिवसात वारकऱ्यांसाठी दिवसभर धो धो पाणी देत
असत.तिथे वारकरी गर्दी करीत.

एक दोन गावातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला वारकऱ्या़ंच्या
आंघोळीसाठी फार चांगली सोय केली होती.अर्धा पाऊण किलो मीटर अंतरा पर्यंत
दहा-दहा, बारा-बारा पाण्याची कारंजी बसवली होती. त्या कारंज्याखाली
(शॉवर) शहरातील आधुनिक पद्धतीच्या आंघोळीचे(शॉवर-बाथ) सुखही
वारकरी लुटत होते. अशा सुंदर, मोफत सोयी करणाऱ्या शेतकऱ्यांना कोण दुवा
देणार नाही?

आपल्या घराच्या ओवऱ्यांवर, अंगणात, शेता-वावरात वारकऱ्यांना
विश्रांतीसाठी जागा देणारे,हे शेतकरीही वारकऱ्यांचा दुवा घेत असतील.

सुरवातीचे ३-४ दिवस मी आमच्या दिंडीच्या पाण्याच्या मोटारीखाली आंघोळ
करत असे. त्या तीन चार नळांवर बायका पुरुषांची ,तांबे, कळशा, बादल्यासह
गर्दी होई. शिवाय तिथेच नळाखाली घुसुनही बायका पुरुषांच्या आंघोळी
पहाटे ३-४ वाजल्यापासून सुरू होत.आजूबाजूला इतका चिखल, दलदल असे की
आंघोळ केली तरी आंघोळ झाल्यासारखी वाटत नसे.

लोणंद पासून मात्र मी, बहुसंख्य वारकऱ्यांसारखी वाटेत वाहत्या नळाखाली
आंघोळ करायचे ठरवले. माझ्याबरोबर माझे नेहमीचे सोबती असत. आम्ही दोघे
लवकर निघत असू. कमी गर्दीचे भरपूर पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी दोन्ही
बाजूला आमची टेहळणी चालू असे.बऱ्याच वेळाने अशी एखादी जागा
सापडायची. काही वेळेला रस्त्याच्या कडेला पाण्याच्या मोटारी असत. त्यांच्या
नळाखाली आंघोळी व्हायच्या.

एकदा आंघोळीची गंमतच झाली. रस्त्याच्या उताराला एक शेतमळा होत. तेथे
बरेच लोक न्याहारी करत होते. तो मोठा घोळका ओलांडून आम्ही पुढे जात राहिलो.
लांब पडवी असलेले शेतकऱ्याचे घर आले. थोड्या अंतरावर उसा जवळ पाण्याचा
पाईप चांगला पाणी ओतत होता. एक दोघेच आंघोळ करत, कपडे धूत होते. विचार
केला, कपडे साबण लावून भिजवून ठेवू. त्या दोघांचे आटोपत आले आहे. मग
आंघोळ करू निवांत. तोपर्यंत माझे सोबतीही “जाऊन येतो” म्हणून गेले. कपडे
साबणात भिजवून ठेवले. तेव्हढ्यात त्या दोघा वारकऱ्यांचेही आटोपले. मी
आंघोळीसाठी त्या मुसळधार पाइपाखाली वाकून बसलो. एक सेकंद,दोन सेकंद…..
तीन सेकंद झाले पण डोक्या पाठीवर पाण्याचा एक थेंबही पडला नाही. हा काय
चमत्कार म्हणून वर पाहिले तर पाणी बंद झालेले!

श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने सापडलेली गंगा एकदम सरस्वती प्रमाणे गुप्त
झाली! पायजम्यातली नाडी आत गेल्यासारखे पाणी पाइपात पुन्हा आतमध्ये
गेले. मी वेड्यासारखा पाइपात हात घालून पाहिला. मग काही अंतर पाईप
बाहेरून चाचपडत पहात राहिलो!

तेव्हढ्यात माझे सोबती आवताडेही आले. तेही चक्रावले. वीज गेली असावी असे
वाटले. पण वीज गेल्याचे तसेही काही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहिले. काही
सुचेना. परत कपडे घातले. शेतकऱ्याचा तरूण मुलगा दिसला. त्याला
सांगितले. त्याने दुर्लक्ष केले. काही वेळाने शेतकऱ्याची घरधनीण आली. तिला
मी सर्व हकिकत सांगितली. एखादी बादली पाणी दिली तरी मेहरबानी होईल असे
म्हणालो. त्या माऊलीने घरात जाऊन आपल्या घरधन्याला सांगितले असावे.तो
म्हातारा शेतकरी आला. आमच्याकडे न पाहता कुठे तरी गेला. मग काही
क्षणातच त्या पाईपाला पुन्हा पाझर फुटला!

आमच्या आंघोळी, कपडे धुणे निवांत झाले हे निराळे सांगायला नको. कोणत्या
का होईना ’माऊलीची’ कृपा झाली!

ह्याच्या अगदी उलट अनुभव एकदा आला.

एका मळ्यात चांगले नविन पद्धतीचे मोठे घर होते.थोडी वारकरी मंडळी
घराच्या अंगणात,आणि काही झाडाखाली थांबले होते.आम्ही तिथे गेलो.
पाण्याचा पाईप दिसला. मनात आले आंघोळीला ही जागा चांगली आहे.
घरातील माणसांना विचारले.त्यांनी, “इथे नाही. पुढे ढाबा आहे. तिथल्या
हौदावर आंघोळ करा”, असे सांगितले.

आम्ही पुढे निघालो. थोड्या अंतरावर ढाब्याच्या आवारात हौदाच्या तीन चार
नळाखाली लोक आंघोळी करत होते. कपडे काढले आणि नळ रिकामे झाल्यावर
आंघोळीसाठी गेलो.आता आंघोळीसाठी नळाखाली जाणार तेवढ्यात मालक आला.
त्याने आमचे दोन्ही नळ बंद केले.”इथे आंघोळ करायची नाही” असे बजावले.आणि
तो तिथेच थांबला. एक दोनदा मी विनवणी केली पण तो काही बधला नाही.
निमूटपणे परत जाऊन कपडे चढवले आणि पुढे निघालो.

वारीच्या वाटचालीत दुपारी उन्हं तापू लागली की सर्वजण सावली शोधून
कुठेही विश्रांतीसाठी आसरा घेत. आम्हीही अपवाद नव्हतो. चांगली सावलीची
झाडे झुडुपे शोधण्यातच पुष्कळ वेळ जायचा. पण दर खेपेला दाट सावली
दिसणारी जागा, जवळ गेल्यावर त्या दाट सावल्या उन्हाच्या असंख्य कवडशांनी
उसवलेल्या असायच्या. उन्हाची तिरीप चुकवत, उन-सावलीचा खेळ खेळत आम्ही
पडून विश्रांती घेत असू. खरी दाट सावली कधी लाभली नाही वारीत.दुरून
सावल्या दाट हेच खरे!

दाट सावलीची झाडाखालची जागा इतर वारकऱ्यांनी आधीच भरलेल्या
असायच्या.

वारीत आणखी एक विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे”माऊली”! श्रीज्ञानेश्वर
महाराजांच्या पालखी बरोबरच्या वारीत तर “माऊली” हा परवलीचा शब्द
आहे. एक चलनी नाणे आहे.

सर्व व्यवहार “माऊली” ह्या शब्दानेच सुरू होतात. साधे बाजूला सरका
म्हणताना किंवा म्हणण्या ऐवजी “माऊली, माऊली” असा आवाज देत तुम्हाला थोडे
बाजूला करून लोक पुढे सरकत असतात. दिंड्यांचे टृक-टेंपो, मोटारीसुद्धा भोंगा
न वाजवता, पुढे बसलेले दरवाज्यावर हात आपटत”माऊली,माऊली” असे ओरडतच
पुढे जातात. सर्व सूचना, हुकूम, आर्जव, थोडक्यात सर्वच भावना एका
“माऊली”च्या उच्चाराने वारीत व्यक्त होतात.” माऊली, माऊली” ह्या एका
संबोधनानेच सर्व व्यवहार सुरळीत होतात.

“सौभद्र” नाटकात संन्याशाचा वेष घेतलेला अर्जुन आपल्या सर्व भाव-भावना,
प्रतिक्रिया “नारायण! नारायण!”ह्यातूनच सांगत असतो. तसेच काहीसे वारीत
“माऊली,माऊली” ह्यातूनच सगळे काही होत असते.

सासवड सोडल्यावर मात्र माझी पंढरीची वारी खऱ्या अर्थाने सुरू झाली
असे वाटले त्याप्रमाणे वाल्ह्यापर्यंत माझ्या हातून वारी पूर्ण होईल का याची
थोडीशी धाकधूक होती.पण वाल्ह्यानंतर मात्र अशा शंकेची, धास्तीची
पाल एकदाही चुकचुकली नाही.

आमच्या तंबूतील डॉक्टर अंदनकर अणि श्री.आदे सोडले तर आम्ही सर्व
पहिल्यांदाच ही पंढरीची वारी करत होतो. पहिले काही दिवस तर रोज आज किती
चाललो,उद्या किती चालयचे अशी चर्चा होई.बरेच जण तर थेट पंढरपूर
यॆईपर्यंत हा विचार करत होते. मी आणि इतर काहीजणांनी हा विषय कधीच
मनात आणला नाही.

आम्ही सासवडहून थेट पंढरपूरला गेलो होतो.विठ्ठलाचे मनसोक्‍त दर्शन झाले
होते.

वारीतील मुक्कामाचा अखेरचा टप्पा-वाखरी-सोडला आणि पंढरपुरात आलो.
कृतकृत्य झाल्याचा आनंद झाला. फार मोठे समाधान लाभले. आणि काय
वाटले ते सांगता येत नाही. आम्ही विठोबाचे दर्शन अगोदरच घेतले होते.
त्यामुळे वारीतून विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा
रोमहर्षक अनुभव मात्र चुकला. उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपट नाटकाचा
शेवट कोणीतरी अगोदर सांगितल्यावर वाटते तसे काही वेळ मला पंढरपुरात
पोचल्यावर वाटले. पण ते तेव्हढ्यापुरतेच.कारण हजारो वारकऱ्यांच्या
संतसंगतीने झालेली पंढरीची पायी वारी हाच एक मोठा रोमहर्षक अनुभव
होता आणि तो अजूनही तितकाच ताजा आहे. अजूनही वारीचे टाळ मृदुंगाचे नाद,
बोल आणि ठेका ऐकू येतो आहे.

“सैन्य पोटावर चालते” असी नेपोलियन म्हणत असे. वारी टाळ मृदुंगाच्या नादा-
-ठेक्यावर चालते असे म्हटले तर वावगे होणार नाही.टाळमृदुंगाचा नादमधुर
आवाज सतत तुमच्याबरोबर असतो. अगदी सावलीसारखा. संतश्रेष्ठ
तुकाराममहाराजांनी सांगितलेले,
“सोपे वर्म आम्हा सांगितले संतीं ।
टाळदिंडी हाती घेऊनी नाचा ॥”
हेच ते सोपे वर्म,लक्षावधी वारकरी, टाळ मृदुंग वाजवत, हरीनाम गर्जत
नाचत पंढरीच्या वारीत आचरत असतात. संपूर्ण वाटचाल आनंदे भरत जात
असतात.टाळमृदुंगाचे हे नादब्रम्ह वारी संपल्यावरही काही दिवस अनाहत
नादासारखे तुमच्या मनात गुंजत राहते!

वाखरी आणि आता…. माहेर पंढरपूर!

२५ जुलै,२००७,बुधवारी पहिली एकादशी. पंढरपूरच्या वारकऱ्यांची
एकादशी उद्या, गुरुवारी. काही का असेना, आम्ही श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या
सोबतीने इथपर्यंत आलो.

आज बुधवारी पालखी सकाळी,पंढरपूरला पोहोचण्यासाठीन इघणार.
आम्हीही वाखरीहून सकाळी निघालो.

गेले १७-१८ दिवस पाऊले पंढरीची वाट चालत होती. आज ही
अवस्था संपली. आज तर पांडुरंगाच्या पायाशीच(पंढरपूरला) पोचणार
आपण! पंढरीची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यां़च्या ह्या आनंदाला,
कृतकृत्यतेला त्रिखंडात तोड नाही!

एका मागोमाग एक येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटांबरोबर आम्ही
वाखरीतून कधी निघालो हे समजलेही नाही.

वाखरी सोडली. काही अंतर पुढे आल्यावर वाटेत श्रीज्ञानेश्वर
–आणि बहुधा श्रीतुकाराम महाराजांची सुद्धा-महाराजांची पालखी
जेथे विसाव्यासाठी थांबते त्या विठ्ठल-रखुमाईच्या देवळात
थांबलो. हे देऊळ इ.स. १८३३ साली बांधलेले आहे. थिटे घराण्याच्या मालकीचे
आहे.विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतले.देवळाभोवती प्रदक्षिणा घातली.

देवळाभोवती, लहान लहान दगड गोटे एकावर एक असे ठिकठिकाणी रचून ठेवलेले
दिसले. अनेक वारकरीही तसे दगड, लगोरी सारखे, देवळाच्या आकाराचे रचत
असलेले पाहिले. एका आजोबा वारकऱ्यांना हे असे दगड का रचून ठेवतात ते
विचारले.

“या देवळाभोवती असे दगड रचून ठेवले की पुढची वारी
घडते. वारी पुन्हा घडते असे म्हणतात.”असे ते म्हातारेबुवा म्हणाले.

मी आणि श्री आवताडे यांनीही तसे दगड रचून ठेवले.पुन्हा एकदा
पंढरीची वारी आपल्या हातून घडावी!श्रद्धा-अश्रद्धेच्या सरहद्दीवर
रेंगाळणाऱ्या, कधी श्रद्धेच्या तळ्यात तर कधी अश्रद्धेच्या मळ्यात उभे
राहण्याचा हा मध्यमवर्गीय खेळ! दुसरे काय म्हणणार!

सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास पंढरपूरच्या हद्दीत आलो.
त्या अगोदरच पंढरपूरच्या विविध संस्था, पुढारी आमचे मोठमोठया
फलकांनी “सहर्ष स्वागत” करत होते. आणखी १० मिनिटे चाललात की
पंढरपूरात पोचाल असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्या प्रमाणे
मी आणि आवताडे पुढे चालत निघालो. सगळ्या महाराष्ट्राचे, सर्व
वारकऱ्यांचे माहेर, त्या पंढरपूरला आम्ही पोचलो!

माहेर म्हटल्याबरोबर मला बरडला विश्रांती घेत असताना
भेटलेला जुन्नर येथील शिवनेरी जवळचा वारकरी आठवला………..

………बरडला जाताना एके ठिकाणी रस्त्याच्या उतारावर झाडाखाली
पडलो होतो. थोड्या वेळात दोन वारकरी आले. आमच्या शेजारी तेही लवंडले.
थोडा वेळ विश्रांती झाल्यावर त्यातील एक वारकरी, कोण कुठले झाल्यावर,
बोलू लागला.शिवनेरी किल्ल्याजवळच्या गावातला. दिसण्यातही विठोबाच!

सर्व सामान्य वारकऱ्यांची विठ्ठलाविषयी असलेली भक्ती व प्रेम त्याच्या
बोलण्यातून ओसंडत होते. मी ऐकत होतो. बोलता बोलता तो म्हणाला,”अवो, लेकीला
सासराहून आपल्या माह्येरला जाताना जसं वाटतं, आनंद हुतो बघा, त्येच,
तसाच आनंद आमाला पंढरपूराला जाताना हुतो. अवो, आपलं माह्येरच हाये हो
पंढरपूर! आपून माह्येरालाच चाललोय.”
शेवटची दोन वाक्ये बोलताना म्हातारपणाकडे झुकलेल्या वारकऱ्याचे डोळे
भरून आले होते.शहरी सायबाला ते अश्रू दिसू नयेत म्हणून त्याने आपला
चेहर झट्कन वळवला.!

आपल्या संतांनी सुद्धा आपल्या अभंग, ओव्यातून हेच म्हटलय.
ज्ञानेश्वर महाराजही,”जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा जीविचीया ॥ ”
म्हणतात. पंढरपूर हेच त्यांच्या जीवाचे माहेर होते आणि ते स्वत: विठोबाला,
त्या माहेराच्या पांडुरंगाला, आपली क्षेम-खुशाली सांगताना,”क्षेम मी
दॆईन पांडुरंगा”असे म्हणतात. एकनाथ महाराजांनी तर माझे माहेर पंढरी
म्हणताना आपल्या माहेरच्या सर्वांचीच, बहिण भावंडांचीही आठवण
काढली आहे.आपल्या माहेरचे मोठेपण आणि तिथे कोण कोण आहे हे सांगताना,
आपल्या माहेराचा किती अभिमानाने आणि प्रेमाने उल्लेख करतात.आपल्या मातब्बर
बहिण भावंडांचा,आणि ती काय,काय करू शकतात याचा किती अभिमानाने
उल्लेख करतात.

आपल्या सर्व संतांची विठलाविषयीची भक्ती,प्रेम, माया, जिव्हाळा, कौतूक त्या
शिवनेरीच्या वारकरी बाबांच्या बोलण्यात होते. आणि ते सर्व त्यांच्या
डोळ्यातील पाण्यानेही सांगितले!

तिन्ही लोक आनंदे भरले आहेत का ते मला माहित नाही पण माढ्याच्या आणि
शिवनेरीच्या ह्या दोन विठोबा-वारकऱ्यांनी मात्र माझे वारीचे दिवस
आनंदाने काठोकाठ भरले!…………….

मी आणि श्री. आवताडे पुढे चालत चालत पंढरपुराच्या उंबरठ्या पर्यंत
आलो.

सर्व मराठी संतांचे आणि त्यांची शिकवण आचरणाऱ्या लक्षावधी
वारकऱ्यांचे सावळे परब्रम्ह जिथे भक्तांसाठी तिष्ठत उभे आहे, सर्व
संतांचे “जीविचिया माहेर” त्या पंढरपूरातील रस्त्यावर मी खाली वाकून
विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला नमस्कार केला.

मल इथपर्यंत पंढरपूरला श्रीज्ञानेश्वर माऊलीनी आणि पांडुरंगाने
आणले. माझ्याकडून त्यांनीच हे घडवून आणले. माझी पंढरपूरची पायी
वारी श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

वाखरी!

भंडी शेगावहून निघालो. संपूर्ण वारीलाच आता आपल्या विठोबाचे
पंढरपूर जवळ आले आहे याची जाणीव झाली असावी. का कुणास ठाऊक
पण आज वारी भरभर,झपझप चालली आहे असे वाटत होते.आपल्या
मनाच्या कल्पना, दुसरे काय!

दुपारी वाखरीच्या वाटेवर बाजीरावची विहीर येथे उभे रिंगण आणि चौथे
गोल रिंगणही होणार होते.पण आम्ही त्यासाठी आज थांबलो नाही. चालतच राहिलो.

दुपारी अडीच वाजता आम्ही वाखरीला पोहोचलो. पालखी तळावर आलो.
केव्हढा प्रचंड तळ आहे हा! श्रीज्ञानेश्वर माऊलीची पालखी ज्या गोलाकार
ओट्यावर मुक्कामासाठी विसावते तो ओटाही मोठा भव्य आहे.

आजूबाजूला माऊली बरोबर आलेल्या अनेक दिंड्यांचा मुक्कामही इथेच होता.
सर्वदूर, तंबू, राहुट्या,ट्रक्स,टेंपो, पाण्याच्या मोटारी, वारकऱ्यांचे थवे,
निशाणे, पताका……..एक मोठे गावच वसले होते.

महाराष्ट्र सरकारने इथे पाण्याची आणि विशेषत: संडासांची मोठी आणि
चांगली सोय केली होती.आम्ही लवकर पोचलो होतो. त्यामुळे सर्व काही स्वच्छ
होते.

अनेक दिंड्यांच्या तंबू, राहुट्या, पाण्याच्या मोटारींच्या चक्रव्यूहातून
नेमक्या आमच्या दिंडीचा तळ सापडायला दोन तास लागलेच!

भंडी शेगाव ते वाखरी हे वीस किलोमीटरचे अंतर किती झटकन पार केले असे
सारखे वाटत होते. आणि उद्या फक्‍त पाच किलोमीटर चालायचे. जणू दोन तीन
पावलांच्या अंतरावर पंढरपूर!

पंढरपूरच्या वेशीपाशीच आलो की आपण! इतकी वर्षे पंढरपूरला
वारीतून जायचे,जायचे असे घोकत होतो.म्हातारी जाई पंढरपुरा ।
वेशीपासून यॆई घरा॥ या वाक्प्रचारातील म्हातारीसारखे आपले झाले
होते.उद्या पंढरपूरला पोचणार या आनंदातच आम्ही सर्वजण होतो.

सर्वच वारकऱ्यांना वाखरीला पोचल्यावर पंढरपुराला आलो ह्याचा
आनंद होत असणार. विठोबा आणि आपल्यामध्ये फक्‍त चार-पाच किलोमीटरचा
रस्ता! म्हणजे पंढरपूरच्या अंगणात आलो आपण.हाकेच्या अंतरावर पांडुरंग
आपली वाट पहात उभा आहे. हे विचार, जाणीव उत्साह वाढवणारी आहे.