Category Archives: My Life

मधूची सायकल

टीव्हीवर बातम्या पाहात होतो. मध्ये मोटारीची जाहिरातही आली. तिच्यातल्या सुंदर मोटारी पाहून मी सतीशला म्हणालो, “काय सुंदर चकचकीत दिसतात ह्या मोटारी.! “ नव्या आहेत त्या बाबा.” सतीश म्हणाला.

त्यावर मी माझी एक आठवण सांगत म्हणालो,” आमचा आतेभाऊ मधू त्याच्या सायकलची इतकी देखभाल करायचा! हा कंटाळत कसा नाही वाटण्या इतकी तो रोज घासून घासून पुसायचा. तेलाची धार एकाच ठिकाणी पण चेन गरगर फिरवित सगळ्या चेनला व्यवस्थित तेल पाजायचा. मग लहान बाळाचे तोंड पुसावे तितक्याच काळजीने चेन वरच्यावर पुसुन घ्यायचा.

दोन्ही चाकांची मडगार्डस तर बाहेरून कुणीही चकाचक करेल. मधुच्या सायकलची मडगार्डस आतूनही स्वच्छच नव्हे तर चमकतही असत! रात्री खाली रस्त्यावर त्या मडगार्डसचा प्रकाशच चाकाबरोबर फिरत येई. सीटही तो मेण लावून चमकवत असे. मग सायकलचा साचा -मधला त्रिकोणही-स्वच्छ का नसणार? चाकांची प्रत्येक तार व रिमही चमचम चांदीची वाटत असे. प्रत्येक स्पोक तो एकदा कोरड्या फडक्याने मग किंचित ओल्या फडक्याने व ते झाल्यावर रुमालावर अत्तराचा थेंब टाकावा तसा तेलाचा थेंब टाकलेल्या फडक्याने प्रत्येक तार (स्पोक) पुसायचा. ही फडकी काही शेमाॅयची किंवा पिवळी मऊ फ्लॅनेलची नसत. जुन्या गंजीफ्राकाची चार फडकी असत. हे घासून पुसून झाले की तो हबकडे वळे. तिथेही हीच किमया करू लागे.

आम्ही एकदा, बिरबलाने बहुरुप्याच्या नंदीबैलाची परीक्षा घ्यावी तसे, त्याच्या सायकलच्या ब्रेकस्चे रबरी मोजे किंवा शूज स्वच्छ आहेत की नाही ते पाहू लागलो. ब्रेकसची रबरे राहू द्या दोन्ही टायर्सवरही धुळीचा एक कण नव्हता!

मधुला सायकलची देखभल करताना कुठे किती जोर लावून घासावे, खरारा कितपत आणि कुठे करावा हे माहित होते.काही भागांना, लहान बाळाचे नॅपकिनने स्पंज करावे तितक्या हळुवारपणे तो करायचा! उपजत म्हणतात ते ज्ञान मधूचेच असावे !

त्यावेळी सायकलला लावायचे दिवे लहान असले तरी कंदीलासारखे वातीचे असत. त्यांचीही तो निगा राखत असे. त्याच्या दिव्याची भिंगासारखी काच स्वच्छ असे.यामुळे त्याच्या दिव्याचा प्रकाशाला कधीही काविळ होत नसे! नंतर तर डायनॅमोचे किंवा बॅटरीचे दिवे आले. त्यामुळे मधुच्या उत्साहाला आणखीच भरती येत असे. नशीब! मधु, दिव्यातून पडणारा प्रकाशही घासून पुसून स्वच्छ करत नव्हता!

आम्हा सगळ्यांनाच संशय असे की मधु त्याची सायकल रस्त्यावर चालवत नसणार. आवडत्या कुत्र्याला फिरवून आणावे तशी तिला तो फिरवून आणत असावा.

रात्री मधुच्या घरी गेलो तर, अंधारात घड्याळातील रेडियमचे काटे चमकावेत तशी,त्याची सायकल चकचकत असे. मधुच्या सायकलमुळेच, त्यांच्या वाड्यापुरती तरी अमावस्याही पौर्णिमा होत असे!

झाडे वाचवा आरे वाचवा ! कार-शेड हटवा आरे वाचवा!

मुंबई

मुंबईच्या मेट्रो ट्रेनचा तिसरा टप्पा करण्यास सुरवात झाली. त्यासाठी कार शेड करण्यासाठी २७०० झाडे तोडायला सुरुवात झाली. गेला एक महिना दर शनिवारी आणि रविवारी ‘झाडे वाचवा आरे वाचवा ‘ कार शेड हटवा ‘ अशा अनेक घोषणा देत हातात लहान फलक घेऊन तरुण मुले मुली कार्यकर्ते रस्त्याच्या एका बाजूला लांबलचक रांग करून उभी असतात. ह्या मध्ये काही
एनजीओज्, बरेच वैयक्तिक, काही राष्ट्र सेवा दलाचे(अजून सेवा दल जिवंत आहे हे पाहून आश्चर्यच वाटले!) काही तरुण मंडळांचे असे निरनिराळ्या गटाची तरुण मंडळी भाग घेतात. हिंदी इंग्रजी मराठीत घोषणा चालू असतात.

हे निदर्शन ११.००-३० पासून सुरु होते. दोन पर्यंत संपते.
गेले दोन तीन शनिवार रविवार मी आणि स्मिता जाऊ जाऊ म्हणत होतो. पण कुठे करतात निदर्शने, किती वाजता ही काहीही माहिती कुठेही सहजासहजी मिळत नव्हती. फक्त एखाद्या-एखाद्याच-चॅनेलवर फक्त शनिवारी रनिवारी हे आंदोलन असते असे सांगितले होते. हल्ली चळवळ्यांनाही वाटते की कुठेतरी सोशल मिडियावर टाकले की भरपूर प्रसिद्धी होते. भ्रम आहे.जाऊ दे. कल्याणीने शोधून वेळा सांगितल्या. बरे झाले नाही तर आम्ही सहाला उठून जाणार होतो. आरामात दहाला निघालो. ११.०० वाजता पोचलो.

फारशी मंडळी दिसत नव्हती. उगी २०-२५ इकडे तिकडे दिसली. पण पोलिसांच्या गाड्या, निदर्शकांना पकडून लांब दूर सोडून देण्यासाठी जाळीची मोठी गाडी हे सगळे पाहिल्यावर मला विशेष स्फुरण आले. तो लाठी हल्ला, ती आरडा ओरड, निदर्शनाच्या घोषणा,पोलिसांची फळी मोडण्यासाठीची निदर्शकांची रेटारेटी. त्यासाठी “इन्किलाब इन्किलाब! नही हटेंगे नही हटेंगे” घोषणा मध्येंच पोलिस धक्काबुक्की करत माझी मानगुट पकडून मला ढकलत मोटारीत कोंबताहेत, चॅनेलवाल्यांचे सगळे कॅमेरे माझ्यावर,त्यांची गडबड आणि बडबड हे सर्व दृश्य वारंवार डोळ्यांसमोर आणू लागलो. त्याची मनातल्या मनात दोन वेळा ‘रंगीत’ तालीमही झाली. आज हुतात्मा व्हायची केव्हढी मोठी संधी मिळाली ह्या हौतात्म्याच्या स्वप्नांत दंग होऊन, ती’अमर रहे’ ची मिरवणुक;माझ्यावर पडणारे हारांचे ढीग त्यामुळे चेहरा कुणाचा दिसतच नव्हता. मीच का हा हुतात्मा ही शंकाही आली. लगेच मी तिथेच करायचे श्रद्धांजलीचे भाषणही करु लागलो. हे सर्व स्वगतच चालले होते.प्रत्यक्षात फौजदार-पोलिसांना मी म्हणत होतो,” आमच्या पेक्षा तुमचीच संख्या जास्त दिसतेय साहेब! चॅनेलवर पोलिसांचीच निदर्शने अशी बातमी दाखवतील!” तोही हसला आणि म्हणाला,” येऊ द्या, तशी बातमीही येऊ द्या, तुम्हीच द्या!”

लवकरच अनेक जण पुटुपुटु करत कुठून कुठून येऊ लागले. रांग लांब लांब लांब होत चालली. मला आणि स्मिताला कुणी एक एक फ्लेक्सी दिला. तो रस्त्यावरील रहदारीला दाखवत, देणाऱ्याच्या मागोमाग घोषणा पूर्ण करत ओरडत होतो. ‘Save Aarey Save Mumbai’
‘कार शेड हटाव झाडे बचाव;’बचाव बचाव आरे बचाव;’ ‘आरे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची!’ ‘हटवा रे हटवा कार शेड हटवा,वाचवा रे वाचवा आरे वाचवा!’ (ही माझी), ‘जाॅनी जाॅनी येस पप्प…’ वापरून कुणी केलेली चांगली घोषणा; ह्या घोषणाबाजीतच काही तरूण मंडळी मोठा डफ वाजवत त्यांच्या कला पथकाची गाणी म्हणत होती. आणखीही बऱ्याच घोषणा चालूच होत्या. सगळीकडे तरुणांचा उत्साह दिसत होता. माझ्या एव्हढी नाही पण म्हातारी म्हणावीत असे दोघे तिघेच असतील.

आरे रस्ता म्हणजे दुतर्फा सुंदर झाडी असलेला! पूर्वी सिनेमाच्या गाण्यांचे शूटिंग होत असे ती आरे मिल्क काॅलनीची सुंदर बाग आणखी पुढे होती.,रस्ता अरुंद. त्यावरूनच बसेस मोटारी रिक्षा दुचाकी वाहनांची गर्दी. रविवार असल्यामुळे तर खूपच. त्यामुळे जातानाचे लोक परतताना बस मधून,मोटारीतून मलाच हात दाखवत thumsup करत जाऊ लागले असे वाटू लागले.बरेच लोक मला ओळखू लागलेत! ह्या भ्रमात मी घोषणाही जोरात देऊ लागलो.!

मधून मधून मी पाणी पीत होतो. चांगली दिड दोन किलोमीटर लांबीची रांग झाली होती. माझ्यासमोर एक पोलिस होता. त्याला मी म्हणालो, “असं काही तरी तुम्ही रोज पाहात असाल. मनात हसत असाल. काय ओरडताहेत उगीच. काही फरक पडणार नाही!” तो न बोलता फक्त हसला. सर्व काही शांततापूर्ण वातावरणात, गाणी म्हणत मध्येच जोशाने तर कधी नेहमीच्या आवाजात घोषणा चालू होत्या. उत्साह यावा म्हणून त्याच घोषणा चाल बदलून म्हणत. त्यामुळे पुन्हा आवाज जोरदार निघत!

स्मिताने थोडा वेळ रस्त्याच्या पलीकडे जाऊन Record for the posterity असावे म्हणून फोटो काढले. पण तिचा नाही आला फोटो. मला खरंच सुचले नाही! मी त्या अति सौम्य,साध्या वरणासारख्या निदर्शनात घोषणा देण्यातच रमलो होतो.

स्मिताच्या प्रोत्साहनामुळे माझा कालचा रविवार म्हणजे ‘पल भर के लिये तो आंदोलन करें,झूटा ही सही!’ के नाम झाला! झूटा ही नव्हते पण शांततामय होते.

Secret Life of Dr. Walter Mitty सारखा मी तेव्हढ्यातही रस्त्याच्या कडेची पांढरी लक्ष्मण रेखा ओलांडून मुठी वळवून; पोलिसांची नजर चुकवून; पळत पळत रस्त्याच्या मध्यभागी जाऊन “ नही हटेंगे नही हटेंगे” “नही चलेगी नही चलेगी कार शेडकी तानाशाही”, “आली रे आली जनता आली कारशेड खल्लास केली” अशा घोषणा देतोय; मी गेलेला पाहून इतरही रस्त्यामध्ये येताहेत, आॅलिव्ह ग्रीनची जाळीची हेल्मेट घालून अंगभर असणाऱ्या ढाली पुढे घेऊन पोलिसांची फलटण हवेत बंदुकी उडवत माझ्याच दिशेने येत आहे ह्या स्वप्नरंजनात स्वत:चे समाधान करून घेत होतो.प्रत्यक्षात मी समोरच्या पोलिसाच्या-तो पाठमोरा असूनही- धाकाने,रस्त्या कडेच्या खड्यात उभा होतो. खंबीरपणे पाय रोवून. काय समजलात मला!

१:३०-४५ वाजत आले. स्मिता म्हणाली,”बाबा,जाऊ या.” जिथे आम्ही सुरवातीला येऊन थांबलो होतो तिथे गेलो. पाण्याची बाटली घेतली. पाणी प्यालो. आरे काॅलनीतच होतो.त्यामुळे तिथे आरेचे ताकही मिळाले.

मी माझ्या शेजारी असलेल्या निदर्शकांचा निरोप घेत पुढे निघालो. रिक्षाने १७ किमिचे अंतर पार करून घरी आलो.
तर आता निदर्शनाचे स्मिताने काढलेले फोटो पहा.

हिशोबातील खर्चिक लेख

शीव

ता.११ सप्टेंबर २०१९ पासूनचा खर्च:-
रु. २०.०० किल्ली बनवून घेतली.
रु. ७.०० चहा.
ता.१२ सप्टेंबर २०१९
रु.२४०.००दाराच्या अंगच्या व कडीकोयंड्याच्या कुलुपाच्या किल्ल्या बनवून घेतल्या.
रु. ३०.०० ताक
रु. १९०.०० चाॅकलेट्स मेलडी आणि किसमि – १०० चाॅकलेटांची दोन पाकिटे!
रु. १०.०० पार्ले ग्लुको बिस्किट्स
रु. ४०.०० किल्यासाठी- दोन key chains
ता. १३ सप्टेंबर २०१९


रु. २८:०० दोन समोसे आणि एक चहा(८रु.) बनारस दुग्धालयात.हे दुकान सायन स्टेशनकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. बरेच वेळा त्यावरून जातो पण कधीही जावेसे वाटले नाही. पण आजची परिस्थितीच निराळी होती. दरवाज्याच्या अंगच्या कुलपाची (latch key) एक जास्तीची किल्ली बनवून घ्यायचे काम परवा पासून चालू आहे. एक किल्ली ती काय! जणू काही ‘बंद अकलका दरवाजे का तालेकी’ किल्लीच ती.


काल माझ्याकडे तशी एकच किल्ली होती. त्याबरहुकुम बनविण्यासाठी ती देणे भागच होते.पण मग मी घरात कसा जाणार? ह्यावर उपाय म्हणून स्मिता तिची किल्ली ठेवून गेली होती. काल दुपारी जास्तीची बनवून घेतलेली व मूळची अशा दोन्ही किल्या घेऊन आलो. पण नविन करून घेतलेली किल्ली कुलपातच जाईना.पुन्हा आज किल्लीवाल्याकडे जाणे आले.गेलो. तर तो आपली सर्व हत्यारे व display (!) साठी दोन तीन तारांना अडकवून लावलेल्या जुन्या पुराण्या व गंजलेल्या किल्ल्यांचे ते गबाळ गुंडाळून, मोटरसायकलवरून निघण्याच्या तयारीतच होता.बरे झाले ती चालू झाली नाही. मी गेलो. त्याने म्हटले तुमची नेहमीची किल्ली व जी दुरुस्त करायची ती अशा दोन्ही किल्ल्या द्या. मी गडबडीत मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दिल्या.

घरी आलो. तर लॅच की नव्हती. दोन्ही खिसे उलटे सुलटे करून पाहिले. स्मिताने ठेवलेली किल्ली मी घरातच विसरलो होतो तर ती खिशात कुठून मिळणार? माणूसच मी. प्रथम, आता काय करायचे? ह्या विचारात आणि काळजीत पडलो. मग म्हणालो,” स्मिता येईपर्यंत फक्त आठ तासांचाच प्रश्न आहे. काढू या इकडे तिकडे फिरत. बागेत बाकावर बसू.मध्येच त्यावर आडवे पडू. जवळ रुपम टाॅकीज आहे तिथे सिनेमे पाहू, लागोपाठ दोन.(पण ते दोन्ही रद्दी होते.) पाण्याची बाटली विकत घेऊ.” खिशात पैसे होते ना! अलिकडे भूक लागली आहे जोरात, असे होत नाही. पण आता मात्र लगेच काही तरी खाऊन घेऊ हा विचार आला. निरिक्षण:- संकटात खूप भूक लागते. वर लिहिलेल्या बनारसी दुग्धालयात जाऊन न आवडणारे सामोसे खाल्ले.


स्मिताला आणि कल्याणीला फोन करुन सांगावे व त्यांनाही काळजीत टाकावे हा एक सुविचारही आला.पण जवळ फोनही नव्हते. नंबरही लक्षात नाहीत. हाॅटेलातून बाहेर पडल्यावर लक्षात आले,”अरे त्या चावीवाल्याकडून आपली किल्ली आणावी. घरात जाऊन जास्तीची किल्ली घ्यावी व ही किल्ली त्याला पुन्हा आणून द्यावी. अरे व्वा! अशा बिकट प्रसंगी, कधी नाही ते, हे मला सुचले ह्यावर मीच माझ्यावर किती तरी वेळ खूष झालो ! ह्या खुषीत बराच वेळ गेला. मग काय! ढांगा टाकत तिथे पोचलो तर चावीवाला आपले सर्व गबाळे आवरून नमाज पढायला गेला होता! आज शुक्रवार आहे विसरलो होतो. गेले तीन दिवस मला तिथे तिन्ही त्रिकाळ पाहून मला चावीवाल्याचा नविन ॲप्रेंटिस समजू लागलेला रसवाला म्हणाला,”बाबा, नादिरके पास काम सिखते हो का?अच्छा है काम. कभी भी खुदका पेट खुद भरना अच्छा रहेता.चाबीवाला येईल;थांबा इथे.” हे सगळे, मी डोळ्यांसकट चेहऱ्याचे उदगार चिन्ह करून ऐकून घेतले.


जनकल्याण बॅंकेच्या रखवालदाराच्या खुर्चीवर बसलो.पण बॅंकेचे गिऱ्हाईक आल्यावर चुकुन मीच उभा राहायचो. हे लक्षात आल्यावर नंतर तिथेच बाजूच्या अरुंद कट्ट्यावर बसलो. रखवालदाराची असली तरी खुर्ची आपल्या नशिबात नाही हे पुन्हा लक्षात आले. तास दीड तास वाट पाहात बसलो. रसवाल्याची किती विक्री झाली हे पाहात त्याच्या गल्ल्याचा अंदाज घेत वेळ काढत होतो. अखेर तो किल्लीवाला आला.त्याच्या कडून किल्ली घेतली.घरी आलो. कुलुप उघडून घरात आल्यावर घर म्हणजे Home Sweet Home हे जाणवले. दुपारी चार साडेचारला जेवलो. सहा वाजता पुन्हा त्याला किल्ली द्यायला गेलो पण जाताना दरवाजाचे अंगचे कुलुप लागू नये ह्याची दक्षता घेऊन निघालो. किल्ली देऊन परत आलो. साधे कडीचे कुलुप उघडून घरात आलो!!! हुश्श! हे तुम्ही म्हणायचे.


ता. १४ सप्टेंबर २०१९
रु. १०.०० केळी ३
रु. ३५.०० पार्लेची नवीन चाॅकलेट कुकीज्- मिलानो.
रु. २५.०० सिताफळे, फक्त दोन तीही लहान.
रु. १२.०० अमूलची बिस्किटे.
रविवार ता. १५ सप्टें २०१९ – अखेर आज किल्ली बनवून घेण्याच्या रामायणाचे पारायण संपले. (गदिमांनी ळ चे घननीळा लडिवाळा हिंदोळा वगैरे ळ चे चार शब्द लिहून गाणे लिहिले तर किती कौतुक केले डाॅ. करंबेळकरांनी सुंदर लेख लिहून. मी वर बाणातला ण वापरून सलग तीन शब्द त्यातला एक तर ण वापरून एक जोडाक्षरही लिहिले ! ह. ना. आपटे म्हणतात तसे’पण लक्षात कोण घेतो?!’ मला तर सुखाची किल्ली मिळाल्याचा आनंद झाला! रोज कमीत कमी दोन चार हेलपाटे घातले असतील. असे चार दिवस हेलपाटे घालत होतो.काल तर सोसायटीचा रखवालदार म्हणाला “ आजोबा, शतपावली किती वेळा घालता. तीही इतका वेळ?” मी काय उत्तर देणार. नुसते हसलो. हसणे व माझा चेहरा दोन्ही केविलवाणा झाला असणार. कारण तो लगेच म्हणाला,” नाही तसे काही नाही सहज विचारले!” कुलपाच्या किल्लीसाठी इतके हेलपाटे तर यशाची गुरुकिल्ली सापडायला जन्म-मरणाचे किती खेटे घालायला लागतील! ! असो.


तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडला असेल; गेले चार दिवस किल्ली पुराण चालू आहे माझे. असो. “असो असो लिहिता,म्हणता आणि पुन्हा दहा वाक्ये लिहतात तुम्ही “ असे तुम्ही म्हणाल. पण खरेच आता असो.चला एकदाचे अखेरचे ‘असो’ लिहून झाले! अ……


रविवार १५ सप्टें २०१९
रु. १५.०० एव्हरेडी बॅटरी सेल्
सोमवार ता.१६ सप्टें२०१९ माझा जमा नसलेला हिशोब चालूच आहे !

हिशेबनीस- सदाशिव पं. कामतकर

वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.

जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार

मी एक ओळीत जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार… !
माणूस आयुष्यभर शिकत असतो. जन्मभर विद्यर्थी असतो हे अनुभवाचे बोल प्रत्येकाला पाठ असतात. हे बोल ऐकल्यावर अनेकांना गुरु दत्तानी एकवीस गुरू केल्याची कथाही आठवते. त्याच त्या चुका वारंवार करत जीवनाच्या शाळेतील मी किती पारंगत विद्यार्थी आहे हे सगळ्यांना माहिती झाले आहे.
अनेक चुकांतील एक माझी नेहमीची ठळक चूक कोणती ते…..


आज मी उन्हे उलटण्याच्या सुमारास म्हणजे सावल्या लांब पडण्यास सुरुवात झाली नव्हती पण लवकरच पडू लागतील अशा वेळे आधी निघालो. साडे चार वाजता. फाटकातून बाहेर पडलो आणि नाॅटरडेम हायस्कूलच्या दिशेने निघालो.चुला व्हिस्टा’च्या वळणापाशी आलो. जावे का ह्या चढाच्या रस्त्याने? स्वत:लाच विचारले. “पण चढ खूप मोठा आहे. आपण ल्युनार्डीवरून ‘चुला व्हिस्टाकडे’ वळून दोन तीनदा गेलोय. कारण काय तर इकडूनही चढच आहे. पण ह्यापेक्षा कमी म्हणून तिकडून आलो होतो. पण हा जमेल का चढून जायला?” मळ्यात जाऊन “काय वांगी घेऊ का ?” असे वांग्यांच्या झाडांनाच विचारून भरपूर वांगी तोडून घेणाऱ्या भिकंभटासारखे मीही स्वत:लाच विचारून, जाऊ का नको ते ठरवत होतो! शेवटी देवाचे नाव घेतले व चुला व्हिस्टाचा चढ च-ढ-त,च—ढ—त निघालो.


वर मध्ये स्वल्प विराम टाकलाय पण एक एकेक पावलानंतर अर्धविराम घेत मी चाललो होतो. एका बाजूने डोंगर,झाडी दुसऱ्या हातालाएकीकडे खोलगट दऱ्या. घाटातला रस्ता म्हणावा तसा. पण झाडी दोन्ही बाजूला.आणि दोन्ही बाजूला घरे! काही झाडीतून दिसणारी, काही डोकावणारी! व वरच्या चढा चढाच्या हाताला वर वर बांधलेली. इकडे खाली उताराच्या बाजूलाही घरे. सगळी सुंदर! मी ज्या घाटातल्या रस्त्यावरून चढत जाण्याचा प्रयत्न करत होतो तो रहदारीचा. पण फार वर्दळीचा नाही. तिथे राहणाऱ्यांच्याच मोटारींची रहदारी. चढण त्रासाची होती. हे लोक मोटारीतूनही कशी सारखी ही चढण पार करत असतील व उतरतही कशी असतील!


अखेर वाटेत तीन चार वेळा प्रत्येक थांब्याला अर्धा एक मिनिट थांबत, ती रम्य आणि मनोहारी चढण पाहात पाहात पठारावर आलो. आणि हे काय आता आलीच की ती कार्लमाॅन्टची शाळा म्हणत पाय एक दो-न करत पडू लागले. डोंगर-चढाच्या चंद्रभागेचा रस्ता चढून-उतरून घरी आलो. एक तास लागला असेल. घाटातली अर्धचंद्राकार वळणाची गल्ली तीच चुला व्हिस्टाचीच; आज दुसऱ्या बाजूने आलो इतकेच.पण शहरातल्या खंडाळ्यातून फिरून आलोय इतका ताजा आनंद झाला!
ल्युनार्डीवरून भर रहदारीच्या नेहमीच्या रस्त्याने घरी सुखरूप आलो.
………………


वरचा संपूर्ण परिच्छेद मी पत्राच्या रूपात मुलांना पाठवला. त्याला काय उत्तर आले आले ते पाहा.
“बाबा, “आज उन्हे उलटण्याच्या ……निघालो” ह्याची काय गरज आहे? साडे चार वाजता निघालो. इतके पुरे.


पुढचे फाटकातून वगैरे कशाला? तुम्ही नेहमी फाटकावरून उड्या मारून बाहेर पडता? “चुला व्हिस्टापाशी आलो. इतके बास.नंतर तुम्ही जावे की न जावे वगैरे लिहिलेय. हॅम्लेटचे नाटक लिहिताय का भूमिका करताय? पुढचे ते देवाचे नाव कशासाठी? फिरायला निघाला होतात का लढाईला? आं?चुला व्हिस्टा तिथला चढ वगैरे अगोदर येऊन गेलंय. पुन्हा ते शिवणाचे टाके घालत काय लिहिलेय! चढ चढत किती वेळा? चढ चढतच जायचा असतो. ते लिहायची आवश्यकता नाही.बरं ते मध्ये स्वल्प वि…. ..का काय ते व्याकरण का आणले? अनावश्यक. आतातुम्ही शहरात राहता. घरे असणारच. बरे डोंगरातल्या रस्त्यावरून जाता आहात. तुम्ही अमेरिकेत असता. तिथे भरपूर झाडी आहे हे इथल्या देगाव-दवंड्यांचे गावच्या लोकांनाही माहित आहे. पुढे रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे काय.? कशासाठी प्रयत्न? आता निघालात ना फिरायला? पुन्हा प्रयत्न कसला? रहदारीचा पण फार वर्दळीचा नाही म्हणजे काय समजायचे वाचणाऱ्यांनी? असे हेही नाही तेही नाही तऱ्हेचे वाचून कुणी तो रस्ता ओलांडून गेला तर काय होईल त्याचे? अहो तुमचे हे पत्र वाचून अमेरिकेतले लोक खटला भरतील तुमच्यावर. तसेच ते पुढचे ‘मोटारीतूनही कशी ही चढण…..असतील’ ह्या वाक्याने वाचकाच्या माहितीत काय भर पडते? कित्येक वर्षे ते असे मोटारीतून जात येत आहेत.ते म्हणतील मोटारवाल्यांनी तुमच्याकडे किंवा सरकारकडे काही तक्रार केलीय का? काहीही लिहायचे आपले!


तुम्ही चालत गेला होता का बसने? मध्येच थांबे कुठून आले? काढून टाका तो सर्व मजकूर. बरं इतका वेळ तुम्हाला हा घाटाचा रस्ता चालवत नव्हता. मग एकदम ती चढण रम्य मनोहारी वगैरे कशी काय झाली?


पुढे, “पाय एक दो… “ लिहिले आहे.परेड करत होता का चालत होता? इतका वेळ एका ओळीतही पाण्याचा ओहोळ राहू द्या थेंबही नव्हता. मग ही डोंगर चढाचीच चंद्रभागा(म्हणजे काय ?!!)कुठून उगम पावली?खोडून टाका ते. बाबा तुम्हाला शाळा तर कधीही आवडत नव्हती. नेहमी ती बुडवत होता तुम्ही. कशाला ती कार्लमाॅन्ट का फाॅन्टची शाळा पाहिजे? बंद करा ती. त्यातही “अर्ध चंद्राकार काय … आज दुसऱ्या बाजूने आलो… “. तुम्हाला कुणा पोलिसाने अडवले होते का काय तिथे? कशाला हवा तो कबुली जबाब.”मी ह्या बाजूने आलो त्या बाजूने गेलो…?” खराय ना. गाळा तो मजकूर. आणि कुणाचा तरी आनंद शिळा असतो का हो? तुमचाच तेव्हढा ताजा? हल्ली काहीही शिळे नसते. बातमी,विनोद सुद्धा. आणि हो! ती ल्युनार्डी म्हणजे काय देऊळ आहे का रेल्वे स्टेशन की पार्क आहे का सरडा? कुणाला माहित आहे ल्युनार्डी? का जगातले कितवे आश्चर्य आहे ती ल्युनार्डी का खोटारडी? नको तिथे भरपूर खुलासेच्या खुलासे, विशेषणांची खैरात आणि ल्युनार्डी जसे काही कोथरुडच्या येनापुरे वडापाववाल्याही माहित अशा पद्धतीने लिहिले आहे. अहो तुमच्या ह्या पत्रापेक्षा मोटारीतला GPS चांगला की. शेवटी, फिरून घरीच येताना नेहमी? आणि सुखरूप ते काय? आजच सुखरूप आलात का? मग ते वाक्य लिहिण्याने विशेष काही सांगितले जाते का?

तुमच्या लक्षात येते का माहित नाही. तुमचे हे संपूर्ण पत्र फक्त दोन शब्दांचे आहे. “ फिरून आलो.”आणि हे शब्द फोनवरूनही पटकन पाठवता आले असते.

मुलांचे हे उत्तर वाचले आणि पत्रकाराची गोष्ट आठवली:-

वृत्तपत्रविद्येच्या वर्गात पत्रकाराने कमीत कमी शब्दात पण आशय तर स्पष्ट व्हावा असे लिहावे ह्यावर भर देत असतात. अशाच एका तासाला निरिक्षक म्हणून काही अनुभवी पत्रकारही आले होते.
प्राध्यापक शिकवत असता त्यांनी एक प्रश्न दिला. एका मच्छिमाराने मासे विकण्यासाठी दुकान टाकले. ताजे मासे विकत होता. चारी बाजूंनी काचा असलेल्या पाण्याच्या पेट्यांत निरनिराळ्या जातींचे मासे ठेवलेले. व्यवस्थित ठेवले होते. आणि दुकानाच्या समोर लोकांना माहिती व्हावी असा एक फलक त्याला ठेवायचा होता. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तो फलक लिहायला सांगितला.

विचारासाठी दिलेला वेळ संपल्यावर एक एक विद्यार्थी येऊन लिहू लागला. कुणी पाच सहा ओळींचा तर कुणी चार ओळींचा काही जणांनी तर कमालच केली. निबंध लिहावा तसे लिहिले. मुले,सर व ते अनुभवी पत्रकार सगळे चर्चा करत ते तपासून दुसऱ्या मुलांना लिहायला सांगत. होता होता एका हुषार विद्यार्थ्याने मात्र फक्त एकच वाक्य लिहिले. सगळे विद्यार्थी एकदम ओह! वाह वा म्हणू लागले. सर व निरीक्षकांचेही समाधान झाले असावे. वाक्य होते:

‘Fresh Fish Are Sold Here’

तरीही सरांनी हे आणखी सुटसुटीत करता येईल का असे अनुभवी निरीक्षक पत्रकारांना विचारले. त्यावर एक पत्रकार फळ्याकडे आले व म्हणाले, “हे बघ तुझ्या दुकानासमोर हा बोर्ड लावणार ना?” “ हो” मग here कशाला हवा? “ असे म्हणत त्यांनी त्यातला तो शब्द काढला. “Fresh Fish are sold “
“ आता पहाare कशाला हवा? तो नसला तरी अर्थ तोच राहतो ना?” “ हो सर. “ त्यांनी are काढून टाकला.

“Fresh Fish sold “

मग ते निरीक्षक म्हणाले, हे पाहा मासे ताजे नसले तर त्याचा कुबट दुर्गंध येतो. तसा वास आला तर कोणी फिरकेल का?” “ नाही सर.” “ हे पाहा तुमचे मासे चांगले ताजे आहेत हे सगळ्यांना दिसते. ताज्या माशांसाठीच लोक येतात. मग fresh शब्द अनावश्यक आहे. हो की नाही?” “ yessSSir!”
“तर आता वाक्य बघा कसे होते ते.”

Fish Sold”.

पुढे त्यांनी विचारले,” तुम्ही मासे लोकांना फुकट वाटायला दुकान टाकले आहे ?
“नाही सर. विकण्यासाठीच टाकले”
“ मग ते Soldकशाला लिहिले?”आता बघा कसे थोड्याच म्हणजे एकाच शब्दात लोकांना समजते ते.”

“FISh”

प्रोफेसरांनी, विद्यार्थ्यानी बाके वाजवली. अनुभवी पत्रकारांनी डस्टर टेबलावर ठेवून विचारले, “हे दुकान मासे विकण्याचेच आहे हेतर स्पष्ट दिसतेय. हो नां ?” सगळेच “होऽऽ ! म्हणाले. मग हा Fish शब्द तरी का हवा? म्हणत त्यांनी तोही खोडून टाकला!

माझ्या मुलांनीही माझ्या पत्राचे अनुभवी पत्रकारासारखेच केलेले संपादन तुम्ही अगोदर वाचलेच. केले. त्यांनी ता.क. लिहिला; तो असा:-


ता.क. बाबा तुम्ही रोजच फिरायला जाता, म्हणून ‘फिरून’ हा शब्द काढून टाका. तुम्ही फिरून आल्यावर पुन्हा ‘आलो’ हे निराळे का सांगायला हवे? तोही शब्द काढून टाका.बघा बरं आता वाचायला किती छान सोपे झाले.


पुन्हा ता.क. लिहू नका!

एक लहानसे चढणे

मी बरेच दिवसांपासून जायचे जायचे म्हणत होतो त्याला आज शनिवारी मुहुर्त लागला. Twin Pines Park मध्ये फिरायला गेलो. घरा जवळ मोठ्या रहदारीच्या रस्त्याला लागून. सतीश म्हणालाच होता की trail फार लहान आहे. त्याचे म्हणणे खरे ठरले. ट्रेल अशी नाहीच. पण ज्येष्ठ वृक्षांची मांदियाळी मन शांत करते. निलगिरी,आणि पाईनची गगनाला भिडताहेत की काय असे वाटायला लावणारी रुंद धडाची झाडे पाहिली की आपण आपोआप गप्प होतो.

हे पार्क नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या व सभागृहाच्या इमारतींमधून शिल्लक राहिलेली जागा वाटते.
पण तिथे म्हाताऱ्या वयस्क नागरिकांसाठी सुसज्ज इमारत आहे. लोकांना लहान प्रमाणावर काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यासाठीही छोटीश्या दोन इमारती आहेत. एक कला दालन आहे. पार्क मध्ये पिकनिक साठी हिरवळ आहे. तर दोन वेगळ्या जागी मोठ्या शेडस व टेबलांना जोडलेली बाके आहेत. ह्या सर्व गोष्टीभोवती झाडांनी फेर धरलेला असतो! सतीशच्या घरामागील ओढा तिकडेच वाहात येत पुढे जातो. गेला आठवडा पावसाचा होता. त्यामुळे ओढाही थोडा ऐटीत खळाळीची शिटी वाजवत चालला होता.


पार्कमध्ये मोठ्या खडकांवर सुंदर पितळी पाट्यांवर गावातील ज्या लोकांनी नगरसेवक मेयर म्हणून बरीच वर्षे गावासाठी मोठी लोकोपयोगी कामे केली त्यांचा गौरवपर उल्लेखाच्या सन्मानदर्शक प्लेटस आहेत. अशाच एका मोठ्या खडकावर सैनिकांच्या स्मरणार्थ कोरलेले वचन माझ्या पक्के लक्षात राहिले. “All Gave Some. Some Gave All.”

सर्व पार्क मध्ये असतात तशी इथेही काही नागरिकांनी लोकांच्या सोयीसाठी सुंदर बाक वाटेवर ठेवले आहेत. राल्स्टन अॅव्हेन्यूच्या दोन्ही बाजूला उंच टेकड्या आहेत. त्यावर घरेही आहेत आणि भरपूर झाडीही आहे. तर पार्कही एका टेकडीच्या आधारानेच वसले आहे.


एका मोठ्या पिकनिक शेडच्या मागे उंच टेकडीची चढती पाठ आहे. तिच्यावर जायला शाळा काॅलेजच्या मुलांनीच एक दोन पायवाटा केल्या आहेत. आज गर्दी नव्हती. आई वडिलांबरोबर आलेली लहान मुले झोके घसरगुंड्या खेळत होती, तीन चार जोडपी व काही म्हातारे फिरत होती तिथल्या पार्कमध्ये.

मी विचार केला जावे टेकडीवर जेव्हढे जाता येईल तितके.पाऊस पडून गेलेला. खाली पडलेली साचलेली पाने; त्यात भर वरून वाहात आलेली काटक्या पानांची भर पडलेली.पण ही सर्व पावसाने दबलेली. पायवाट ओलसर. पण निघालो. हळू हळू चढत, थांबत वर जात होतो. एक वेळ वर जाईन पण उतरतांना घसरू नये म्हणजे झालं असं स्वत:ला सावध करत जात होतो. मध्ये मध्ये थांबत होतो.पुढे वर, मागे, आजूबाजूला व जिथून आलो तिकडे खाली पाहू लागलो. वर अजूनही झाडातून टेकडी दिसते आहे आणि खाली पाहिले तर ती शेड बाके स्पष्ट दिसत होती! हात्तिच्या! मला वाटत होते की मी पुष्कळ वर आलोय. पुन्हा चढू लागलो. समोर आता वरचे उन्ह दिसत होते. आणखी थोडा वर वर गेलो. टेकडी डोंगराचा माथा जवळच वाटत होता. तरी मीच नको म्हणालो.

आपल्यालाच खालीही उतरायचे आहे. घसरायचे नाही. त्यामुळे असल्या क्षुल्लक पराक्रमाचा मोह टाळून उतरायला सुरवात केली. म्हटले सतीश वगैरे सर्वांच्याबरोबर पुढच्या शनिवार रविवारी पुन्हा येऊ. सगळ्यांबरोबर वर चढून जाऊ. ‘जपून टाक पाऊल जरा’ असे पावलागणिक बजावत हळू हळू पण न घसरता ‘धोपट मार्गा’ न सोडता’ व्यवस्थित खाली आलो!

परत जायला निघालो तर हायस्कूलची वाटणारी चार मुले टेकडीवरच चालली होती. त्यांना विचारले तुम्ही ‘हिल’चढून जाता? टेकडी उतरून पलीकडेही जाता? दोन्ही प्रश्नांना ते होच म्हणाले. रोज जात असावेत.
गावातच, हमरस्त्याच्या बाजूलाच, सुंदर झाडीची हिरवळ असलेले व त्यात लहानशी का होईना trail असलेले निसर्गरम्य ठिकाण पाहिल्यावर मला सुधीरच्या गावातल्या YMC शेजारीच असलेल्या दाट झाडीतील मैल दीड मैलाची रम्य वाट आठवली.हे पार्क हम रस्त्याजवळ असूनही आत आलो की जगाचा संपर्क तुटतो!
मी पार्कमधे आल्यावर काही फोटो काढले.घरून पार्कमध्ये येताना Notredame uni. चे व घरी परत जाताना Ralston Ave चे फोटो घेतले.


मी इतके ड्रामेबाज वर्णन केले पण टेकडी फार तर ४००-५०० फुटापेक्षा थोडी कमी असेल! घराच्या पायऱ्या चढतानाही असावा बरोबर म्हणून झेंडा घेऊनच चढतो. चार पायऱ्यांचा जिना चढून गेलो की मी लगेच झेंडा घेऊन फोटो साठी शेरपा तेनझिंग सारखा उभा राहतो. त्यामुळे दीडदोनशे फूट का होईना टेकडी चढून गेलो;त्याचे एव्हढे नाटक खपून जाईल असे वाटले.त्याचे लिहिणेही केले! चला!एक लहानसे चढणे झाले.

दसरा

शिलंगणाचे सोने लुटूनी…

आपल्याकडे बहुतेक सर्व सणावारांच्या प्रथा परंपरा वेगवेळ्या असतात. दसऱ्याचेच बघा ना. आपल्याकडे रामाचा दसऱ्याशी संबंध नाही.

महाराष्ट्रात बहुतेक गावांत गावाबाहेर असलेल्या शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालतात.त्यावेळी बरेच जणांच्या हातात उजळलेले पोत असतात. लोक आsईराजाs उदे उदेचा गजर करत असतात. हे मर्यादित अर्थाने सीमोल्लंघन आहे. आमच्या दसऱ्याला सीमोल्लंघनाची परंपरा आहे.

आपल्या मराठी साम्राज्याच्या वाढीत ह्या सीमोल्लंघनाच्या प्रथेचाही मोठा भाग आहे. मराठे शत्रूला आपल्या मुलखात येऊ न देण्यासाठी त्याच्याच मुलखात जाऊन लढण्यासाठी मोहिमेवर निघत. बऱ्याच मोहिमा दसऱ्याचा मुहुर्त गाठून होत असत किंवा मोहिम फत्ते करून विजयाचे सोने आणून दसऱ्याच्या सुमारास परत येत. शिलंगणाचे सोने लुटण्याला लाक्षणिक अर्थाबरोबरच अशी प्रत्यक्षातील पराक्रमाची ऐतिहासिक परंपराही आहे. आपल्या राज्याचा दरारा वाढवून व शत्रूला जरब बसवून राज्याच्या सीमा वाढवणारे व संपत्तीत वाढ करणारे हे सीमोल्लंघन होते. शिलंगणाचे सोने लुटून दसरा साजरा होई. शिलंगण हे सीमोल्लंघनाचे मराठमोळी बोली रूप आहे.

गावात शमीचे झाड असेल तिथे दसरा “आई राजा उदे उदे”च्या गजरात होतो. शमीचे झाड का तर महाभारतात पांडवांनी, एक वर्ष अज्ञातवासात काढायचे होते म्हणून,आपली शस्त्रे शमीच्या झाडावर दडवून ठेवली होती. (बहुतेक) विराटाच्या बाजूने लढायचे होते. त्यासाठी त्यांनी ह्या दिवशी आपली शस्त्रे बाहेर काढली. त्याच दिवशी अज्ञातवासही संपला होता. त्याची आठवण म्हणून आपल्याकडे दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करून दसरा साजरा होतो.त्यात शस्त्रपूजा आहे. आपले मराठी संस्थानिक आजही दसऱ्याला शस्त्रपूजा करतात.आपला दसरा रामायणाशी संबंधित नसून महाभारतील समरप्रसंगाशी आहे.

म्हैसुरचा दसरा मोठ्या थाटाचा! थाटामाटाने,दागदागिने, रेशमी भरजरी झुली,सोनेरी अंबाऱ्यांनी सजवलेले हत्ती व राजवैभवसंपन्न असतो हे ऐकत होतो. पण आमच्या गावचा दसरा लोकसंपन्न होता. आजही असेल. उन्हं उतरू लागली की हलगी ताशांच्या, जोश वाढवणाऱ्या,कडकडाटात,घामेघुम झालेल्या तगड्या,जाड,कांबीसारखे कडक लोकांनी आळीपाळीने पेललेली, अफाट गर्दीतून वाट काढत, झळ्ळम झळ्ळम करत उंचच्या उंच म्हणजे फारच उंच हब्बूची काठी येत असे. त्यावेळी मधून मधून मोठमोठ्या आवाजात आईराजा उदे उदेच्या गजराचे वाढत्या गर्दीत “आssई राssजा उधेssउधेssय” कधी झाले हे लक्षातही येत नसे. पण शुद्ध उदय उदय किंवा उदे उदे पेक्षा हा उssधेssउधेssय चा गजर जोरदार आणि जास्त परिणामकारक होत असे, हे खरे. आमच्या मध्यमवर्गीय मंद आवाजातले आई राजा उदे उदे चे मोठ्या आवाजातले उधेssउधेssय कधी झाले ते आम्हालाही समजत नसे. मग आबासाहेबांचे, अण्णांचे व बाबांचे( आजोबा) पुटपुटणेही थोडे मोठ्याने होई!

नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी पोत उजळला जात असे. म्हणजे काय तर पत्रावळीवर तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर पेला ठेवलेला असायचा. पत्रावळी भोवती आईने किंवा बहिणींनी साधी म्हणजे अगदी साधी रांगोळी काढलेली असे. मग आम्ही भाऊ कापसाच्या झाडाच्या बारिक फांद्या किंवा काटक्यांना कापड गुंडाळून व तेलात भिजवून आम्हीच लगोलग केलेले ते पोत घेऊन त्या पत्रावळी भोवती आई राजा उदे उदे म्हणत प्रदक्षणा घालत असू. प्रदक्षणा तरी किती लहान, स्वत:भोवती फेरी मारल्यासारखी! कारण मधल्या घरात तिथेच मोठा पलंग,एक गोदरेजचे कपाट आणि दुसरे लहान कपाट असायचे. पृथ्वी प्रदक्षणा करण्याइतकी जागा नसे. प्रदक्षणा झाली की ते लहान पोत बाजूलाच असलेल्या दुधाच्यी वाटीत विझवायचे. सगळ्यांनी मिळून ती पत्रावळ उंचावून ती कपाळाला लावून नमस्कार व्हायचा. ह्याला तळी उचलणे म्हणत. एखाद्याची तळी उचलणे ह्या वाक्प्रचाराचा हा प्रत्यक्ष कार्यानुभवच की! दसऱ्याला संध्याकाळी शिलंगणाला निघताना नवरात्रात मंडपीच्या बाजूलाच मोठ्या पेल्यात वाढवलेल्या धान्याचे पाते, लहानसे झाड टोपीत खोवून निघत असू.

निम्म्यापेक्षा जास्त गाव नविन कपडेघालून ,फेटे-रुमाल-टोप्यात आपल्या घरातील धान्याची तृणपाती खोवून पार्कच्या दिशेने निघालेच असे. सामान्यांच्या मुकुटांतील ते शिरपेच असत! हब्बूच्या काठीने केलेली शमीची पूजा आणि पार्कमधील,भोवती पार असलेल्या शमीच्या झाडाभोवतीची फेरी चालूच असे. त्याच वेळी लोकांचेही एकामागून एक येणारे लोंढे शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालू लागत. काही जणांच्या हातातील पोत तो परिसर आपल्यापरीने उजळून टाकत.

आता इतकी प्रचंड गर्दी म्हटली तरी आसपास भेळेच्या , शेंगादाणे फुटाण्यांच्या रेवड्यांच्या गाड्या दिसत नसत. असतीलही कुठे पार्कच्या लोकांनी फुलून गेलेल्या मैदानात.पण त्या असल्या काय आणि नसल्या काय तिकडे लक्षही नसे.कारण दुपारीच दसऱ्याचे पक्वान्नाचे रेsट जेवण झालेलेआणि शेजारी पाजारी नातेवाईंकांकडे सोने द्यायला गेल्यावर प्रत्येक ठिकाणी तोंड पुन्हा पुन्हा गोड होणारच असते.आणि होतच असे. लोक एकमेकांना सोने देऊन काहीजण उराभेटी घेत मैदानात पसरलेल्या व बाहेर पडत असलेल्या लोकांबरोबर बाहेर चाललेले असत. ती पांढरी, पिवळसर,रंगीत सतत हलणारी गर्दीही पाहण्यासारखी असे.

मग रात्री घरीआमचे चुलत भाऊ मुकुंद आणि शशी आतेभाऊ अरूण मधू दुसरे अगदी जवळचे नातेवाईक दत्ता काकडे वगैरे आले की झकास गप्पाटप्पा होत; हसण्या खिदळण्यात वेळ जाई. पण उद्या शाळा ही आठवण झाली की दसरा- सणाचा मोठा आनंद लहान लहान होत जाई!

आमचा सिनेमाचा गाव

रेडवुड सिटी

डबड्यातले काम करनार, कपटी आणि चक्रम!

“ हंटरवाली’ डबड्यात आलाय बे! येतो का,चल” “तुफान मेल” ही येनार हाहे डबड्यात” डबड्यात
म्हणजे त्या थिएटरचे नेमके वर्णन करणारा शब्द. लोक एखाद्या गोष्टीचे बारसे बरोबर करतात. पूर्वाश्रमीचे मेकाॅनकी थिएटर. इथे नाटके होत असत. मराठी रंगभूमीवरील अनेक नामांकित कंपन्या आपली नाटके इथे करत असत. पण नाटकांचे दिवस संपले. एके काळचे वैभवशालीयुग संपले.


तिथे सिनेमा दाखवू लागले. मला माहित आहे तेव्हापासून त्याला डबडा थेटरच म्हणत असत. मेक्यॅनिकि, मेक्यान्कि, मेक्यॅनिक, इंग्रजी बोलतोय असे वाटावे म्हणून मेकाॅन्कि असे निरनिराळे पाठभेद होते. त्या चौकालाही हेच नाव होते. चौकाचा पत्ता सांगतानाही असेच वेगवेगळे नामभेदाचे पाठ वापरले जात. नंतर त्या टाॅकीजचे नाव छानसे दिलखुष झाले. पण सगळ्यांची पहिली पसंती ‘डबडा थेटर’ ‘डबड्यात’ ह्या नावालाच होती. बरं नावं काही लोक उगीच देत नाहीत. ह्या थेटरात पडद्यापासून ते सिनेमा दाखवण्याच्या मशिनीपर्यंत एकही खुर्ची राहू द्या पण बाकडे, स्टूल काहीही नव्हते. मोठ्या बंदिस्त मैदानातील जाहीर सभेला किंवा मैदानात फिरायला आल्यासारखे वाटायचे थेटरात आल्यावर.
वरच्या मजल्यासारखा वाटणारा उतार असो की खालची सपाट जागा, बहुतांश भाग पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला असे.त्यातून कोरडी जागा शोधणे हे सिनेमा पाहण्यापेक्षा महत्वाचे काम असे. बरे बाजूच्या भिंतीही काही उंचीपर्यंत अशाच रंगलेल्या!


बसण्याची जमीन सिमेंटच्या कोब्याची. कधी काळी ती तांबड्या रंगाची असावी. कुठे कुठे रंगाच्या खुणा दिसत. जागो जागी नसली तरी बऱ्याच ठिकाणी कोबा उखडलेला. सिमेंट वाळूचे खळगे पडलेले. ह्या खळग्यांमुळेच कोणीही सिनेमाला उशीरा येत नसे. जे नवखे चुकुन माकून उशीरा येत व तिथे बसले की आजूबाजूचे प्रेक्षक “बरबटला की बे बाब्या” म्हणत हसून पिंक टाकायचे. ते खळगे ह्या पिकदाण्या झालेल्या असत!


सिनेमाचे तिकीट सर्वांना परवडण्यासारखे. सर्वांसाठी एकच दर. प्रथम एक आणा दर होता असे बारोमास येणारे प्रेक्षक सांगत. नंतर तो दोन आणे झाला. प्रेक्षक शाळकरी वयाची हाॅटेलात फडके मारणारी, ‘अलिमिन’ च्या ग्लासात बोटे बुचकळून पाणी देणारी; ‘बारक्या’ ह्या एकाच नावाने ओळखली जाणारी मुले; कामगार, रोजंदारीचे मजूर असेच हातावर पोट भरणारे सगळे.


थिएटरमध्ये एकच मशीन त्यामुळे मध्यंतर दोन चार वेळा व्हायची. ही झाली अधिकृत मध्यंतरांची संख्या. पण फिल्म तुटणे,मध्येच ‘लाइटी’जाणे ह्यामुळे सोसावी लागणारी मध्यंतरे निराळी. ह्यांची संख्या रोज बदलायची. कारण आज फिल्म किती वेळा तुटेल कोण सांगू शकणार?आवाज गेला किंवा फिल्म तुटली की पहिल्यांदा “अबे आवाऽऽऽऽज” “अब्ये तोडला की बे साल्यानं पुना तिच्या … पुढे आ किवा मा आपापल्या आवडीप्रमाणे घालून… वाक्य फुलवायचे. “ कुठ्यं ग्येला तो बे… “ इथे दोन फुल्यांपासून पाच फुल्यांच्या शिव्यांची टाकसाळ सुरु व्हायची.फिल्म तुटल्यावर भऽक्कन एक दिवा पेटायचा. त्यामुळे कुठे थुंकायचे कुणीकडे पिचकारी मारायची ह्याचे लोकांना मार्गदर्शन होत असे. पण रंगकर्म्यांचे हे कलादर्शन चालू असता शिव्यांची वीणा दुसरे घेत. ही वीणा कधी खाली ठेवली जात नसे.आॅपरेटरला व डोअर कीपरनांही ह्याची सवय झाली होती. ते उलट जबऱ्या आवाजात वाक्याच्या सुरवातीला दोन ते तीन अक्षरी ‘फुलवाती’लावून किंवा अखेरीला चार किंवा पंचाक्षरी ‘फुलवाती’ हासडून , “काय तिकीटाला बंदा रुपया मोजला का रे ….? “ त्यांच्यातला सुसंस्कृत ओरडायचा,” काय झाले बे बोंबलायला? फिलमच तुटली ना? का तुझी विजारीची नाडी तुटली?का धोतर फिटलं? आं? उगं गप बसाकी बे!” पण ह्या शिवराळ आवाजी युद्धात बहुसंख्येमुळे आमच्या गावचे नंबरी सिनेरसिकच जिंकायचे. तेव्हढ्यात झाली इतकी करमणूक पुरे म्हणत ‘आपरेटर’ अंधार करून फिल्म पुन्हा चालू करायचा.

रोज नेमाने डबड्यात येणाऱ्यांना हे नाट्यमय प्रवेश माहित असायचे. त्यामुळे ते आजूबाजूची मोकळी जागा, भिंत एकाग्रतेने पिचकाऱ्या मारत किंवा झकास खाकरून थुंकत रंगवत असायचे. आमच्यासारखे नवशे काही म्हणू लागले तर,” शिनेमा पाह्यला आलताना मग पाहा ना बे! गिन्नी चवलीत काय साबूने धुतलेले, चार मिशिनीचे थेटर मिळनार का तुला, आं?” असे तत्वज्ञान ऐकवत.

आम्ही एकदाच गेलो असू. पण संपूर्ण सिनेमा कधीच पाहिला नाही. सतत आपले कपडे कुणी रंगवत नाही ना ह्याच काळजीत असायचो! त्या चिंतेतच हिराॅईन नादिया दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून ‘कपटी’ किंवा ‘डाकू’च्या अंगावर झेप घेऊन त्याला ठोसा मारून उडवायची! तर कधी आमचा ‘ काम करनार’ जाॅन कावस असाच टेकडी उतरून त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून टकडक् टकड्क करत नादियाला ‘कपटीच्या’ तावडीतून सोडवायला यायला लागला की सगळे ‘ डबडा’ टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमायचे! किंवा ‘चक्रमने किंवा जोकरने’ कपटीला किंवा त्याच्या टोळीतल्या लोकांना काम करनारने पळवून लावले किंवा ठोसा ठोशी सुरु झाली की हा फक्त हवेत ठोसे मारल्याच्या अॅक्शन करत एखाद्या ‘कपटीला’ पाय घालून किंवा त्याच्या मागे ओणवे होऊन पाडले की प्रेक्षक हसायचे.त्यावेळचे म्युझिकही निरनिराळे आवाज काढत त्यात सामील व्हायचे.

हे ‘कपटी, डाकू’ आणि ‘काम करणार’, चक्रम किंवा जोकर काय प्रकरण आहे? तर डबड्याच्या अनुभवी समीक्षक-प्रेक्षकांच्या शब्दकोषांत व्हिलन व हिरो आणि विनोदी नट! कुणाला माहित खलनायक व नायक! काम करणार किंवा करनार हेच त्या कर्तबगार हिरोचे खरे वर्णन. कपटी आणि डाकू हे व्हिलनपेक्षाही त्याची वृत्ती व पेशा दाखवणारे सोपे यथार्थ शब्द होते. जुन्या गिरणीच्या चाळीतील किंवा हजरतखानच्या किंवा बाजूच्या मरीस्वामी चाळीतील आमच्या बरोबरीची,अगोदर सिनेमा पाहून आलेली,पोरे त्याची ष्टोरी मनापासून सांगताना कपटीच्या, काम करनारच्या सगळ्या अॅक्शन्स करीत “मग तिकडून काम करनार जाॅन कावस कसा दबकत दबत हळूच पाठीमागून येतंय आणि एकदम कपटीच्या टोळीतील एकाचे तोंड दाबून त्याला एका फाईटीत झोपवतो बे” ; कधी हंटरवाली नादियाची धाडसी कामेही करून दाखवत! पन कपटी सुद्धा बेरकी आहे त्यात.” हे सर्व प्रत्यक्ष अॅक्शनसह करून ष्टोरी सांगायचे. सर्व प्रेक्षक पोरे मोठ्या उत्सुकतेने भुवया उंच करत, कोणी तोंडाचा चंबू करत किती एकाग्रतेने ती गोष्ट ऐकत! त्या काळात आम्हा सर्वांसाठी ह्या बोध कथा संस्कारकथा व स्फूर्तीदायक गोष्टी होत्या. आम्ही डबड्यांत एकदाच जायची हिंमत दाखवली. ती सुद्धा तिथे अंग चोरून बसण्यातच जास्त दाखवली!


पुढे हेच दिलखुष डबडा टाॅकीज मीना टाॅकीज झाले!


अनेक वर्षे आपल्या स्टंटपटांनी व स्वत: केलेल्या धाडसी स्टंटसनी लोकांची करमणूक करणारी नादिया आणि जाॅन कावस ही लोकप्रिय जोडी मागे पडली. नंतरच्या काळात मा. भगवान व बाबुराव यांचे स्टंटपट आले. ह्यांचा बाज निराळाच होता.डबडा राहिले नव्हते तरी तिथले प्रेक्षक ह्यांच्यासाठीही होतेच. बरीच वर्षे ह्या ‘काम करनार’ जोडीने व चक्रमनेही त्यांची करमणूक केली.

सदाशिव पं. कामतकर

चार दिवस गॅदरिंगचे – २

रेडवुड सिटी

आमच्या शाळेच्य गॅदरिंगच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे वर्णन करताना गॅदरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य ध्यानीं आले. गॅदरिंगला शाळा आम्हाला सिनेमा दाखवत असे. कुठे मैदानात किंवा शाळेच्या सभागृहात, त्या १६मिमि पडद्यावर नाही. चांगल्या सिनेमा-थेटरात दाखवत असे! भागवतमध्ये असला तर चित्र मंदिर,कलाआणि छाया ह्या त्यांच्या तिन्ही टाॅकीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी तो पहायला मिळे. (त्यांचे उमा चित्र मंदिर बांधून झाले नव्हते.) प्रभात मध्ये असला तर मात्र दोन खेळ करावे लागत. ही झाली रुक्ष आकडेवारीसारखी माहिती. खरी गंमत होती ती आमची गर्दी पाहण्याची आणि वाहत्या वाऱ्यासारख्या एकामागून एक ऐकू येणाऱ्या गप्पांच्या त्याबरोबरच्या हसण्याच्या अनेक तऱ्हांच्या,आरोळ्या,व एकमेकांना पाहिल्यावर मारलेल्या असली हाकांच्या लहरी कानांवर झेलण्याची ! पाखरांच्या शाळेतही एव्हढा उल्हास असणारी व आनंद देणारी कलकल निनादत नसेल.

भागवत थिएटरचे आवार त्यामानाने मोठे. ते तर फुलून जायचेच पण कला व चित्रमंदिराच्या मधल्या बागेजवळची बेताची मोकळी जागाही रिकामी राहात नसे. तीच गोष्ट प्रभातची. प्रभातची लाॅबी आणि समोरची आयताकार प्रशस्त मोकळी जागा मुलांनी तुडुंब भरून जाई. दाटीवाटी-खेटाखेटी,रेटारेटीचे कुणाला काही वाटत नसे. तरी गप्पात रंगलेल्याला धक्का लागला तर एखादाच कुणी,”अब्ये लई ताकद आली का बे?” ए सुकड्या,दिसत नाही का तुला?”त्यावर हा सुक्कड लगेच,” दिसायचं काय त्यात बे? तू कुणाला नाही दिसणार बे ढब्ब्या !” हा संवादऐकल्यावर भोवतालची सात आठ पोरं मोठ्यांदा हसली की इतरही काही कारण नसता मोठ्यांदा हसायची की लगेच सगळी गर्दी हसत सुटायची ! पण तोपर्यंत “सुक्कड हाॅकीस्टिक ”आणि “तो फुटबाॅल”हसत खेळायलाही लागलेले असत!

आत गेल्यावर मग जागा धरून ठेवलेली पोरे दोस्तांच्या नावाने हाकारा सुरू करत.सिनेमा सुरू झाला तरच शांतता होईल ह्या भरवशावर मास्तर सिनेमा सुरु कारायला सांगत. ही शांतता काही वेळ प्रस्थापित होत असे. पण गाजलेले गाणे सुरु झाले की कुठून तरी ,” अरे जाधव मस्त म्हणतो हे गाणं.” असा आवाज आला की जाधव आणखी आग्रहाची वाट न पाहता लगेच सुरु करायचा म्हणायला. लगेच दुसऱ्या वर्गांचा अभिमान उसळून यायचा की एकदम चार पाच जाधव ते गाणं म्हणू लागायचे . बाकीची आम्ही ‘वगैरे” पोरं ठेका धरायला होतोच की! तीन मिनटाचे गाणे सहा मिनिटांची LPव्हायची! गंभीर किंवा करूण ‘सीन’ आला की वरच्या मजल्यावरील एखादा प्रोजेक्टरच्या झोतात, हातांनी बोटांनी’पक्षी उडतोय, हरिण,किंवा मासासळसळसतोय’ ‘ हा खेळ सावल्यांचा’ करत असे.शिक्षकांनी पाठीत रट्टा घातला की हा खेळ बंद व्हायचा.

सिनेमा काही जणांनी अगोदर पाहिला असला तर पुढचे डायलाॅग अगोदरच ऐकायला लागायचे! गाणे आले की कुणी जाधव-देशपांडे-इनामदार असे बरेच सवाई रफी,फर्माईशीची वाट न पाहता गाणे म्हणायलाही लागत. तर “चूल आणि मूल” असला तर अगोदरच सर्वतोमुखी झालेले दामुअण्णा मालवणकरांचे “अगं माया आवर,आवर” आले की प्रोजेक्टरच्या प्रकाश-झोतात तेच वाक्य ‘माया’च्या जागी निरनिराळे पाठभेद घालून भिरभिरत विहरत असत!

एरव्ही चार मुलांसमोर, घाबरून धड नीट न बोलणारेही सिनेमाच्या अंधारात मात्र आपापले विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम साजरे करीत ! सिनेमा संपल्या नंतरही मजा पुढे चालूच असे.सिनेमातले संवाद म्हणताहेत, तर कुणी गाण्यांच्या ओळी गुणगुणताहेत;,बरेच जण हसत खिदळत गप्पाटप्पा करत घोळक्या टोळक्यांनी,कुणाच्या खांद्यावर हात टाकून, काही एकमेकांना ढकलत चालले आहेत; काही जवळच्या घरी ठेवलेल्या सायकली आणून टांग मारत “जातो बे” म्हणत निघालेही असतात! अशा तऱ्हेने रमत गमत सगळे घरी परतायचो आम्ही.

गॅदरिंगचा सिनेमा ही सर्वांनाच एका शुद्ध,निर्भेळआनंदाची आणि करमणुकीची मेजवानी असे.

गॅदरिंगच्या अल्पोपहारासारखा सिनेमाही अल्पकालीनच ठरला. फार तर दोन तीन वर्षेच टिकला. पण कधीच flop झाला नाही; तो hit च ठरला!

चार दिवस गॅदरिंगचे – १

रेडवुड सिटी

आमच्या ऱ्शाळेने काही अतिशय चांगल्या गोष्टी आमच्या आठवणींसाठी दिल्या; त्यात गॅदरिंगमध्ये होणारी विद्यार्थ्यांनी कामे केलेली व वा.शि.आपटे , आमचे पद्माकर देव व गो.रा. कामतकर यासारख्या उत्तम दिग्दर्शकांनी बसवलेली आजी आणि माजी विद्यार्थी विद्यर्थ्यांनीवेगवेगळी बसवलेली त्या काळची उत्तमोत्तम नाटके, संगीतिका ह्यांची मेजवानी दिली. संशयकल्लोळ. आचार्य अत्र्यांची साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी उद्याचा संसार, कवडी चुंबक तर मो.ग. रांगणेकरांचे कुलवधु व त्यांच्या तुझं नि माझं जमेना ह्या सारख्या तीन एकांकिका तर झुंझारराव सारखे शेक्सपिअरचे जबरदस्त पण देवलांनीही त्याच ताकदीने केलेले हे रुपांतर तितकेच प्रभावीपणे बसवून सादर करणारे आमचे शिक्षक-दिग्दर्शक व विद्यार्थी -नटांची नाटके पाहणे हा अवर्णनीय आनंद होता.

त्याच बरोबर पं.जगन्नाथबुवा पंढरपुरकर, मा. कृष्णराव, पं.नारायणराव व्यास, पं विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारख्या नावाजलेल्या गवयांच्या मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभत होते. तेही फक्त चार आण्यांच्या वर्गणीत! भाग्य भाग्य म्हणजे ह्यापेक्षा काय निराळे असते?!

मी हरिभाईमध्ये जाण्या अगोदर काही वर्षे शाळेच्या गॅदरिंगची सांगता अतिशय उत्कृष्ट जेवणाने होत असे. जेवणातील बेत, काही पदार्थांची वर्णने दोन चार दिवस ऐकायला मिळत असत. पण मी त्या प्रख्यात शाळेत गेलो त्यामागे गॅदरिंग व त्यातले हे जेवण मुख्य कारणे होती. पण काय ! आमची बॅच शाळेत आली ती दुसरे महायुद्ध संपत येण्याच्या काळात. कुठले जेवण असणार. खराच हिरमुसला झालो. तरीही पहिली एक दोन वर्षे तरी शाळेने अल्पोपहार नावाचा भरगच्च असा फराळ दिला. मस्त असायचे सगळे पदार्थ.

दीड-पाउणे दोन हजार विद्यार्थी पन्नास पंचावन्न शिक्षक गडी-शिपाईअशी भरपूर लोकसंख्या असे.
हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या भव्य मैदानावर होत असे.विद्यार्थ्यांच्या दोन रांगा पीटी ला बसल्यासारख्या समोरासमोर तोंडे करून त्यांच्याच पाठीला पाठ लावून समोरासमोर बसलेल्या दोन रांगा. अशा पद्धतीने किती रांगा! काही वर्ग आणि शिक्षक वर्तुळाकारात बसलेले. काही विद्यार्थिनी व शिक्षक वाढायला असत. मुली वाढायला साव्यात असे सर्वच रांगांना वाटत असे. पण आमच्यासारख्या भिकार c-grade सिनेमाच्या टुकार हिरोंच्या वाट्याला गणिताचे, सायन्सचे आणि भूगोलाचे ‘सेकंड रन’ सिनेमाचे मास्तर येत. त्यामुळे पदार्थ कठिण आणि अवघड जाऊ लागले. पण त्यावर आमचा उपाय काढला. आम्ही पलीकडच्या मुली वाढणाऱ्या रांगांकडे पाहात प्रत्येक पदार्थ मग तो कसाही,अगदी गोड असला, तरी गोड मानून खात असू. पण दडपून खात असू!

अल्पोपहाराचे हे दृश्य खरोखर प्रेक्षणीय असे. कर्व मैदानात नाही पण एक दोन बाजू पतंगीच्या रंगीत त्रिकोणी कागदांच्या फडफडणाऱ्या पताकांच्या माळा, ठसठशीत अक्षरातील शब्दांच्या ओळी प्रमाणे बसलेले विद्यार्थी, त्यात मधूनच एक दोन गोलाकारात बसलेली विद्यार्थी, शिक्षक आणि त्या ओळीतून होत असणाऱ्या लगबगीच्या हालचाली हा पाहण्यासारखा देखावा असे. कॅमेरे फोटो ह्या देवदुर्लभ वाटणाऱ्या गोष्टी. मग हवाई चित्रिकरण कुठले! पण कुणी तसे ते टिपले असते तर आजही गुगलला किंवा गेट्टीला आपल्या मुकुटातले मानाचे शिरपेच वाटावे असे ते फोटो असते!

पण कितीही असले तरी सुखाचे दिवस थोडेच तसा हा अल्पोपहाराचा कार्यक्रमही दोन वर्षेच टिकला. गॅदरिंगचा अल्पोपहार बंद झाल्यावर ते भव्य मैदान आणखीच मोठे वाटू लागले!