वारी पूर्ण झाली. मी घरी आलो. डोळ्यासमोर अजूनही वारीच दिसायची.
कानात टाळ मृदुंगाचे आवाज घुमत होते. मनात वारीचेच विचार आणि माझ्या
सहवारकऱ्यांच्या आठवणी.
तीन चार दिवस घरातील सर्वांना पंढरीच्या पायी वाटचालीच्या,
आळंदीपासून माझ्या सोबत असलेल्या वारकरी सज्जनांच्या, सुहृदांच्या आठवणी
सांगत होतो.
ठरल्याप्रमाणे आळंदीला माझे चंद्रपूरचे मित्र डॉ.अंदनकर भेटले;त्यांच्या
बरोबर आलेली त्यांची चंद्रपूरची मित्रमंडळी भेटली.आता इथून
पंढरपुरापर्यंत आम्ही चौदा वारकरी एकत्र वारी करणार! डॉक्टर आणि श्री.
शंकरराव आदे हे दोघे अनुभवी वारकरी.डॉक्टारांनी यापूर्वी सहा सात वेळा
पंढरपूरची पायी वारी केली आहे.बाकीचे आम्ही सर्व अगदी “पहिलटकरी”
होतो वारीत.
य़ा वारीच्या निमित्ताने आम्हा दोघा मित्रांची–डॉक्टरांची आणि माझी–
जवळपास चाळीस वर्षांनी भेट झाली! ह्या भेटीचा आनंद तर काही वेगळाच
होता. वारीत चालताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.त्यांची तब्येत
बिघडली म्हणून त्यांना माघारी परतावे लागले. पण त्यांची जवळ जवळ अर्धी
वारी झाली होती. डॉक्टर परत गेले खरे पण ते आणि आम्ही दर दोन एक दिवसांनी
एकमेकांची चौकशी करत असू. त्यांना बरे वाटते आहे हे समजल्यावर
सगळ्यांनाच बरे आणि हायसे वाटले.एका परीने त्यांचे मन वारीतच होते.वारी
संपल्यावर मी त्यांना फोन केला तेव्हा डॉक्टर पूर्ण बरे झाले आणि आता ते
आपल्या हॉस्पिटल मध्ये जातात आणि ऑपरेशन्स वगैरे करू लागले हे त्यांच्याकडून
ऐकल्यावर मला खरा आनंद झाला.
लोणंदपर्यंत डॉक्टर,मी आणि श्री. कमलाकर कुमरवार वारीत एकत्र असायचो.वाटेत
गप्पा मारताना ते, त्यांचा व्यवसाय ते स्वत: आणि त्यांचा मुलगा नविन कल्पनांनी
कसा वाढवतोय, त्यांची आणि डॉक्टरांची कशी घनिष्ठ मैत्री आहे हे सांगत.
त्यांना गुडघेदुखीचा फार त्रास होत असे. पण ते दुखणे सहन करत ते सावकाश
विश्रांती घेत सगळे टप्पे पार करत. कमलाकर अणि डॉक्टर दोघेही आपले
दुखणे अंगावर काढत चालत आहेत ह्याची मला थोडी फार कल्पना होती.
गुडघे फारच दुखू लागले तर काही अंतर कमलाकर गाडीतून पार करत.पण
असे क्वचित. ह्या दोघांमुळे आम्ही लोणंदपर्यंत आलो हे जाणवले नाही.
दिंडीत आम्हाल पहिले काही दिवस २८ क्रमांकाचा तंबू मिळाला होता.आमचा हा
तंबू म्हणजे एक नमूना होता. पालाची एक बाजू अगदी वर तर दुसरी बाजू फार
खाली. शंकरराव आदे सारखे अनुभवी सुद्धा ह्या तंबूच्या दोऱ्या आवळून
थकले.त्यांना मदत करणारे श्री.फडणवीस, सुनील सिद्धमशेट्टीवारही रोज ही
कसरत करतान बेजार व्हायचे. बरं दिंडीच्या मालकांना सांगावे तर आणखीनच
गंमत व्हायची. दिडीचे मालक,चालक प्रमुख दोघे भाऊ होते.एक भाऊ मुका तर
दुसरा बहिरा. पण दोघेही कर्तबगार आणि हुशार. एकदा मुके बंधू भेटायचे तर
दुसऱ्या वेळी बहिरे! दोघे एकदम भेटूनही उपयोग होईना! मग एकदा आमच्या
तंबूची दुर्दशा बहिऱ्या मालकांना कागदावर लिहून दाखवली. मग आम्हाला
दुसरा तंबू मिळाला.पण हे सर्व होण्यास आठ दहा दिवस गेले!
आम्ही संध्याकाळी सर्वजण तंबूत मुक्कामाला आलो की महिला मंडळ
श्री.फडणविसांची गंमत करत असे. फडणविसांनी त्यांना सांगितलेल्या काही
गोष्टींवरून त्यांची खिल्ली उडवत. फडणविसही खिलाडूपणे त्यात सामील हॊऊन
पुन्हा एखादी घटना तक्रारवजा सुरात सांगत आणि त्यावरूनही सौ.घरोटे,
विद्याताई मसादे, सौ.ज्योती तारे त्यांची फिरकी घेत.पण वारीत चालताना
फडणविसांची आपल्याला खात्रीची सोबत असायची असे माझ्यापाशी, महिलामंडळ
आवर्जून सांगत.
मुक्कामाला आलो की आमचे(एक्स्प्लोरर)-संशोधक-म्हणजे श्री. सुनील सिद्धमशेट्टीवार
आणि फडणवीस. पाण्याचा टॅंकर कुठे आहे, टॅंकरपाशी अजून गर्दी नाही,
“बहिर्दिशा” कोणत्या दिशेला वगैरे साध्या पण गरजेच्या बाबींची अचूक
माहिती हे दोघेजण सांगत. भल्या पहाटे, पहाट कसली, खरं म्हणजे उत्तर रात्रीच
तीन साडे तीन वाजता हे दोघे बहाद्दर “बढिया” आंघोळीसकट सर्व आटोपून
“तैय्यार”! आम्हा इतरांचे सर्व आटोपे पर्यंत ह्या दोघांची पुन्हा एक झोपही
होत असे! पुन्हा सगळ्यांना सामानासकट गाडीकडे घेऊन जाण्यातही पुढे.माझी जड
बॅग सुनील तर कधी श्री. शंकरराव आदे घेत.आणि रात्री तंबूत आणूनही ठेवीत.
रात्री जेवणाच्या पंगतीला ह्या तिघांची तसेच श्री आवताडे आणि
श्री.रेभणकर यांची मला सोबत असायची.शिवाय श्री. फडणविस आणि सुनील
सिद्धमशेट्टीवार हे दोघे चंद्रपूरकर दिंडीतल्या एखाद्या पंगतीला जेवायलाही
वाढीत.
सिद्धमशेट्टीवार यांना भजने, श्लोक, स्तोत्रे चांगली पाठ आहेत आणि आपल्या
उत्तम आवाजात ते म्हणतही छान. आम्ही ११ जुलैला सासवडहून थेट पंढरपूरला
जाताना गाडीत त्यांच्या आणि विशेषत: सौ. आदे आणि सौ घरोटे यांच्या
भजनांनी बहार आणली. खरोखर त्या दिवशी हरीनामाचा गजर आणि संकीर्तनच
झाले आमच्या गाडीत!
श्री. शंकरराव आदे अनुभवी वारकरी.तंबूच्या एखद्या कोपऱ्याची दोरी
ताणून बांधणे,वाटचाल संपून मुक्कामाला तंबूत आल्याबरोबर कपडे वाळत
घालण्याचे दोरी बांधणे, पाऊस येणार असे दिसले की, तंबूवर प्लास्टिक्सचे कापड
सुनीलच्या मदतीने टाकणे. गाड्यांत सर्व सामान नीट रचून ठेवणे, ह्या गोष्टीत
त्यांचा नेहमी मोठा हातभार असे.
सौ.ज्योती तारे, सौ.घरोटे, सौ आदे, विद्याताई मसादे अणि त्यांची बहिण बेबीताई
ह्या महिलांमुळे आमच्या तंबूत सतत काही ना काही चालू असायचे.एखाद्या
संध्याकाळी हरिपाठाच्या अभंगाबरोबर इतर स्तोत्र, भजने ह्यांच्यामुळेच म्हटली
जात असत. कधी विद्याताई किंवा त्यांची बहिण बेबीताई संध्याकाळी गरम चहा
घेऊन येत; तर कधी सरबत कर असे काहीना काही चालू असायचे.
सौ.ज्योती तारे ह्यांच्या वाचनाची आवड, त्यांचे वाचन त्यांच्या बोलण्यातून
जाणवत असे.उत्तम संस्कार करणाऱ्या, चांगले आदर्श आणि मूल्ये मुलांपुढे
ठेवणाऱ्या आपल्या वडिलांविषयी त्या भरभरून सांगत.ऍडव्होकेट विद्याताई
गुडघ्यांच्या त्रासामुळे गाडीतून येत असत पण जेव्हा लवकर येत तेव्हा दिंडीच्या
मुक्कामाचे ठिकाण शोधून काढणे, हिशोब ठेवणे अशी महत्वाची कामे त्यांनी
व्यवस्थित सांभाळली. त्यांच्या बेबीताईंची, चालून दमून भागून आल्यावर
सुद्धा एखादी बादली पाणी भरून आणणे, चहा आणणे वगैरे बारिक सारिक कामे
चालू असायची.
जे ज चांगले आपल्या वाचनात आले की ते लिहून ठेवणाऱ्या,
भजनांची गोडी असणाऱ्या आणि म्हणणाऱ्या, वाटचालीत नेहमी त्यांच्या बरोबर
असणाऱ्या सौ.ज्योती तारे, बहुधा भंडी शेगावहून वाखरीला येताना, आपल्या
बरोबर दिसत नाहीत त्या कुठे मागे राहिल्या की काय हे लक्षात आल्यावर ज्योती
सुखरूप असावी, लवकर भेटावीम्हणून धावा करणाऱ्या, रडणाऱ्या, हळव्या सौ.
घरोटे; “पांडुरंग विठ्ठला। पंढरिनाथ विठ्ठला। विठू किती दमला॥” हे
भजन ठेक्यात, गोड म्हणणाऱ्या सौ. आदे या सर्वांची आठवण आमच्या तंबूतील
सगळ्यांना येणार यात नवल नाही.
सौ. ज्योती तारे, आपल्या बरोबरचे इतर सांगाती, रस्ता ओलांडून, पुन्हा वळून
जाताना तसेच पुढे गेले; आपण मागे राहिलो हे त्या लोकांच्या लक्षातही कसे आले
नाही! मग त्या तशाच एकट्या पुढे निघाल्या. एव्हढ्या अफाट लोकसागरात
बरोबरीचे मागे आहेत की पुढे गेले हे समजणेच फार कठिण. थोडी वाट पाहून त्या
लोकगंगेच्या लाटेबरोबर पुढे जाणे इतकेच आपल्या हातात असते. तशाच त्याही मग
पुढे निघाल्या. आपल्या बरोबरचे आणि आपली चुकामूक झाल्यावर त्या तेव्हढ्या
अफाट गर्दीतही–गर्दी हा शब्दसुद्धा वारी नावाच्या महासागराचे वर्णन करण्यास
अपुराच आहे–आपण एकटेच असतो!
अशा एकट्या अवस्थेत त्या एकाकी निघाल्या. कितीही धैर्य गोळा करून निघाल्या,
गर्दी वारीतील भाविकांची असली तरी, तसे सर्व अनोळखीच.वाट आणि प्रदेशही
नवखाच. केव्हातरी जीवात धाकधुक झालीच असणार. पण ह्या बहाद्दर बाई
निश्चयाने पुढे पुढेच आल्या आणि अखेर पोलिसांना विचारून नेमक्या मुक्कामाच्या
ठिकाणी आल्या!आपले धैर्य कसोटीवर घासून सिद्ध करावे लागलेल्या ह्या
प्रसंगाची त्यांना आणि इतरांनाही सदैव आठवण राहील.
मुक्काम हलवून सकाळी सहा साडेसहाला आमच्या तंबूतले इतर आणि मी व
श्री.आवताडे बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर थोडा वेळ कुणाच्या ना कुणाच्या पण
अनेक वेळा माझ्या आणि श्री. आवताडे यांच्या बरोबर असणारे श्री. रेभणकर
थोड्याच वेळात अंतर्धान पावत! गायब होत! आणि एकदम संध्याकाळी मुक्कामाच्या
ठिकाणी तंबूत प्रकट होत.आल्यावर प्रथम माझी चौकशी करत. मग
सर्वांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला शांतपणे, हसतमुखाने तोंड देणारे,आपल्या
वैशिष्ठ्यपूर्ण पोषाखाने आमचेच काय पण सर्व वारीचेच लक्ष वेधून घेणारे,
कधी एखाद्या मलंग तर कधी गाडगेबाबांसारखे भासणारे, सरळ मनाचे,मस्त
अवलियासारखे स्वानंदात मग्न असणाऱ्या रेभणकरांना विसरणे कठिण आहे.
आठवण ठेवून चंद्रपूरला पोहोचल्यावर त्यांनी मला फोन केला तेव्हा मला
आनंद झाला.
कसलाही नवस नव्हता की व्रत घेतले नव्हते पण श्री. आवताडे यांनी आळंदी ते
पंढरपूर ही वारी अक्षरश: अनवाणी पायांनी केली.
काट्याकुट्यांतून, रणरणत्या उन्हात भाजून तापून निघालेल्या डांबरी
रस्त्यावरून, दगडगोट्यातून, अणकुचीदार खडे पायाला टोचत असताना,
तापलेल्या धुळीतून, वावरातल्या काळ्या चिकण मातीच्या चिखलातून अनवाणी
पायांनी २५०/२६० किलोमीटरची ही वारी करणे म्हणजे श्री. आवताडे यांची एक
प्रकारे मोठी तपश्चर्याच नाही का? असा हा तपस्वी वारकरी लोणंदपासून
माझ्या बरोबर होता.हा माझा सन्मानच होता. अगदी वाखरीच्या पुढे
पांडुरंगाच्या पंढरीत प्रवेश करून आम्ही पंढरपूरात आठ दहा मिनिटे
सोबतीनेच चालत होतो.
रोज संध्याकाळी तंबूत मुक्कामाला आल्यावर “थकलो” म्हणण्याचा खरा अधिकार
फक्त श्री.आवताडे यानांच होता यात शंका नाही.ह्या एका गोष्टीमुळेही आवताडे
सगळ्यांच्या लक्ष्यात राहतील.
सौ. ज्योती तारे मध्यंतरी एका वाटचालीत एकट्या मागे राहिल्या होत्या.त्यावेळी
त्यांच्या सुखरूपतेसाठी देवाचा धावा करणाऱ्या सौ. घरोटे वारीच्या
अगदी अखेरच्या क्षणी आमच्यातून हरवल्या!
पंढरपूरच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आम्हा सर्वांच्यापुढे त्या
केव्हा गेल्या हे आम्हाला आणि त्यांनाही समजले नाही. त्या बराच वेळ तशाच
पुढे गेल्या. इकडे आम्ही काळजीत. वाट पहात, शोधत त्या चौकात उभे. चारी
बाजूंनी लोकांचे, वाहनांचे लोंढे! सौ.ज्योती आणि विद्याताईंची बहिण
चौकाच्या तोंडाशी थांबल्या.मी सांगोला रस्त्यावर शोधायला गेलो आणि श्री.
फडणविस सोलापूर रस्त्यावर. बऱ्याच वेळानंतर मी जेव्हा परत चौकात आलो तेव्हा
सौ.घरोटे सौ. ज्योतीशी बोलत उभ्या असलेल्या पाहिल्यावर मी सुटकेचा नि:श्वास
टाकला. जीव भांड्यात पडला.सौ.ज्योतीलाही तसेच वाटले असणार.चला,
फिट्टंफाट झाली. त्या दोघींना एकमेकींसाठी कराव्या लागलेल्या प्रार्थना,
चिंता सार्थकी लागल्या.
सर्वांना काही ना काही मदत करणारे श्री. फडणविस आणि श्री.सुनील
सिद्धमशेट्टीवार हे दोघे पुन्हा माझ्या मदतीला धावले. क्रांतिवीर नाना पाटील
चौकापर्यंत माझे सामान घॆऊन हे दोघे सहवारकरी सज्जन मी एसटीत बसेपर्यंत
माझ्याबरोबर होते.
या वारीत काही चांगले अनुभव आले. अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला, पहायला
मिळाल्या. काय अनुभव मिळाला अथवा वारी करून काय मिळविले याचे उत्तर देता
येणार नाही.पण जे काही माझ्या हातून-खरं तर पायांनी-घडले तोच एक मोठा
अनुभव होता. ह्याचे सर्व श्रेय माझे मित्र डॉ. अंदनकर यांना आहे. माझ्या
सारख्या “पहिलटकऱ्या” वारकऱ्याची ही वारी सुखरूपतेची, आनंदाची
झाली ती डॉ.अंदनकर आणि वर उल्लेख केलेल्या आमच्या तंबूतील सर्व सज्जन
सुह्रुदांच्या मुळेच हे अगदी खरे. ह्या सर्वांच्या सोबतीच्या ऋणात राहणे हे ही
एका परीने भाग्यच आहे.
वारीला निघालो तेव्हा ह्या सर्वांना माझे “लोढणे” हॊऊ नये असे मला
वाटायचे.आणि मी त्यांना “लोढणे” झालो नाही हा माझा मोठा आनंद आहे.