Category Archives: My Life

… वाल्हे…….. वाल्या कोळ्याची भूमि

जेजुरीहून आज वाल्ह्याला जायचे. अंतर १०-१२.कि.मी.च असेल. फारच थोडे
अंतर. आम्ही चार पाच जण एकत्र निघालो. ३-४ कि.मी. चालून झाल्यावर
माझी तब्येत पाहून डॉक्टरांनी मला “डॉक्टरी सल्ला” म्हणजे जवळ जवळ हुकुमच करून
गाडीत बसायला लावले. पायी वारीला हे ६-७ कि.मी.चे गालबोट लागणार
ह्याचे वाईट वाटले. पण मोठे उद्दिष्ट लक्षात घॆऊन निमूटपणे गाडीत बसलो.
वाल्ह्याला आलो.

आज संपूर्ण वारीच आपल्या मुक्कामी वाल्ह्याला दुपारच्या जेवण्याच्या वेळी
आली असावी. अगदी थोडे अंतर हेच कारण.

वाल्हे लक्षात रहाण्याचे कारण इथली भूमि. गावच्या लोकांना ही
वाल्या कोळ्याची भूमि वाटते, तसे मानतातही गावचे लोक.टेकडी, डोंगरावर
वाल्या कोळ्याच्या खुणा म्हणून लहान दगडांनी भरलेला रांजण वगैरे आहे
असे म्हणतात.आमच्यातील काहीजण तिकडे जाऊन आले पण तसे काही विशेष त्यांना
आढळले नाही.

पण मला वाल्हे लक्षात राहण्याचे कारणही ही भूमीच! आमच्या दिंडीचा तळ
जिथे पडला होता ती जमीन खाच खळगे आणि खड्या-खुड्ड्यांची. दगड खडे
गोटे तर होतेच. आमचा तंबू जेथे ठोकला होता ती भूमीही तशीच.त्यात
आणखी भर म्हणून आम्ही पुरुष मंडळी ज्या बाजूला झोपणार तिथून एक
उथळसा पण बऱ्यापैकी खोलगट चर लांबवर गेला होता. मी जिथे झोपलो तिथे
माझी पाठ आणि खांदा यामध्ये एक उंचवट्याचा दगड! पक्का रोवलेला. कोण
आणि कसा काढणार? झोपलो तसाच. कंबर त्या चराच्या गटारीत आणि पाठी
खांद्याशी हे धोंडोपंत! चांगलेच रुतायचे आणि टोचायचे.कसेही झोपा, ह्या
कुशीवर किंवा त्या कुशीवर झोपा, की कसेही पडा, सरका-सरकायला जागाच
नव्हती. गटारवजा तो चर आणि हे दगडूशेठ काही चुकवता यॆईनात.तसाच
पडलो बराच वेळ.

वरती फक्‍त आकाश आणि खाली खडकाळ, उंचसखल जमीन. शेजारी वाहती
गटारे, पाण्याची डबकी, जवळपास कुत्री मांजरं पहुडलेली. अशा संगतीत
आयुष्यभर झोपणाऱ्या असंख्य कष्टकऱ्यांची,सर्व संसार रस्त्यावरच
असणाऱ्या खेडेगाव, वस्त्यातील, गावा-शहरातील अनेक गरीबांची आठवण आली
आणि तंबूतील ह्या अडचणी विसरून,तसाच रेटून झोपलो.

पण मध्यरात्र उलटल्यावर रात्री२.३० वा. जागा झालो. डोळे उघडे
ठेवून पहाटेपर्यंत पडून राहिलो.

मूलभूत सोयी

जेजुरीला निघाल्यापासूनच सर्दी पडसे, ताप होताच. तशात आणखी
पोट बिघडले. औषधे घेतली. रात्री नीट झोपही लागली नाही.

पहाटे ४.००/४.३० वा. तंबूतील एकाने बातमी आणली. जेजुरीच्या
एस. टी. स्टँडवर सुलभ शौचालयाची सोय आहे. आमच्यासारख्या
शहरी लोकांना हे ऐकून बरे वाटले. मी एस.टी. स्टॅंडवर आलो. अंधार
थोडा कमी कमी होत होता. सर्व एस.टी. स्टँडना जी कळा आली आहे
तीच अवकळा जेजुरीच्या स्टँडलाही आली आहे. इमारत चांगली पण
जुनाट झालेली. सभोवती मात्र खूप मोकळी जागा. तिथे बरेच वारकरी
झोपलेले तर काही जण मोकळ्या मैदानात”बसलेले”!

दोन-चार तरुण मंडळी उभी होती. त्यांच्यापाशी जाऊन मी एस.टीच्या सुलभ
शौचालयाची चौकशी केली.पण त्यांना काही माहिती नव्हती. पण एकाने
समोरच्या भल्या मोठ्या मैदानाकडे हात करून,”अहो, हे काय! हे सगळं सुलभ
शौचालयच आहे की, बघा!”

मी मोठ्याने हसलो; पुढे जाऊन चौकशी केल्यावर ठावठिकाणा मिळाला.

माझी वारी: पुन्हा सासवड……तेथून जेजुरी

पंढरपूरहून सासवडला आम्ही रात्री पोहोचलो. सासवडला आमचा
रात्रीचा मुक्काम छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये होता.शाळेची इमारत
भली मोठी होती. पण त्यापेक्षाही शाळेचे मैदान फार मोठे होते.विद्यार्थी
मोठे भाग्यवान.

शाळाचुकार विद्यार्थी जसा मास्तरांचा डोळा चुकवून हळूच वर्गात
येऊन बसावा त्याप्रमाणे आम्ही दुसरे दिवशी सकाळी पुन्हा वारीत सामील
झालो. सासवडहून निघाल्यावर पुढचा मुक्काम जेजुरीला.पुण्यापासून
वारकऱ्यांसाठी अनेक उदार लोक ठिकठिकणी चहा, फराळ जेवणाची सोय
करतात. वारीतील अनेक गोरगरीबांना त्याचा फायदा होतो. पुणे सासवड सोडले
की अशा सोयी कमी होतात असे ऐकले होते. पण तशी काही फारशी तफावत
दिसली नाही.जेजुरीपर्यंत अनेकांनी उदार हस्ते अशा सोयी केल्या होत्या.
दात्यांची संख्या कमी असेल पण दिंडीशिवाय येणाऱ्या अनेक गरीब
वारकऱ्यांसाठी त्या पुरेशा होत्या. पुढे नातेपुतेपासून ते वाखरीपर्यंत
अनगरकर मंडळींनी(अनगरचे पुढारी आणि समस्त गावकऱ्यांनी) तर
माऊलीच्या वाटेवर रोज सकाळी-दुपारी चहा नाश्ता, दुपारी जेवणाची
चांगली सोय केली होती. अनेक गोरगरीब शेतमजूर,कष्टकऱ्यांचे दुवे ह्या आणि
इतर अनेक दात्यांना मिळाले असतील ह्यात शंका नाही.

सासवड ते जेजुरीची ही वाटचाल,पुणे ते सासवड आणि त्यातील
घाटाची चढण ह्या पेक्षा पुष्कळच सोपी. पण मी अंगात ताप घेऊनच
जेजुरीपर्यंत आलो. आमच्या दिंडीचा मुक्काम जेजुरीच्या एस.टी. स्टॅंड शेजारी
होता.आमच्या दिंडी सकट अनेक दिंड्यांचा तळ तिथे पडला होता. माझे अंग
दुखत होते. ताप भरला होता.

जेजुरीला माऊलीच्या पालखीचा जिथे मुक्काम असतो तिथे सर्व
दिंड्या एकत्र येतात. त्यांच्या काही तक्रारी, अडचणी, सूचना असल्या
तर त्या ऐकल्या जातात व पालखीबरोबरचे प्रमुख त्या ऐकून त्यावर
निर्णय जाहीर करतात, निवारण करतात. मग आरती हॊऊन हा कार्यक्रम
संपतो. ही फक्त रूपरेखा झाली. पण सर्व दिंड्यांचे एकत्र येणे,
त्यानंतर माऊलीची पालखी येण्यापासून तिचे ह्या दिंड्या मोठ्या
चढाओढीने भजने, अभंग,नामघोष करून स्वागत करतात.ह्या सर्व
गोष्टीतील आणि तिथे जमलेल्या अफाट गर्दीतीलही शिस्त, मग निस्तब्ध शांतता,
ज्ञानराज माऊलीची आरती वगैरे पहण्यासारखे असते,असे डॉक्टरांनी
सांगितले. पुढेही वारीत दोन तीन ठिकाणी हा कार्यक्रम असतो. पण आजचे
ठिकाण जवळच आहे म्हणून मी जायचे ठरवले.

मी एकटाच निघालो. मैदान जवळच म्हटले तरी एक दीड कि.मी.
असेल. त्याशिवाय प्रचंड गर्दीचे लोंढे होतेच.

मी त्या मैदानात पोचलो.गर्दी होतीच. वारकरी होते, आजूबाजूच्या
लहान गावातील, खेड्यातील,वाड्या-वस्तीतील लोक, जेजुरीतील लोक असा मोठा
जनसमुदाय जमला होता.

मैदानाच्या एका बाजूला माऊलीच्या मुक्कामासाठी मोठ्या सुबक
चौथऱ्यावर एक मोठा सुंदर तंबू होता. हार फुलांच्या माळा आणि
विजेच्या दिव्यांनी नटला होता.

एक एक दिंडी येऊ लागली. मैदानाच्या चारी बाजूंनी त्या दिंड्या
आपापल्या जागी उभ्या राहू लागल्या. पण हे सर्व संगीतमय वातावरणात
चालले होते. माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी आपण आलो आहोत हे जाणून
दिंड्या,माऊली वगैरे टाळमृदुंगाच्या साथीने, मोकळ्या राना-मैदानात
गाण्याची सवय झालेल्या तापल्या गळ्याने, जोरात म्हणत येत होते.

दिंडीतील वारकऱ्यांच्या गायकीतील जोष आणि तन्मयता
अनुभवण्यासारखी असते.

सर्वांचे कान टाळमृदुंगाच्या आवाजाने भरले होते आणि डोळे
श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीकडे लागले होते.

अधून मधून लोक मध्येच उठून माऊली, माऊली, श्रीज्ञानदेव-
तुकारामाचा गजर करत उभे रहायचे. पण माझ्या जवळ बसलेले गृहस्थ
म्हणायचे, “अहो, अजून वेळ आहे; उठू नका.अजूनही दिंड्या इकडून येताहेत.
माऊली (हात दाखवून) तिकडून येणार आहे.”

माऊलीच्या स्वागतासाठी तंबूच्या दोन्ही बाजूला उभ्या
असलेल्या दिंड्यांतून वारकरी म्हणत असलेल्या अभंगांचे शब्द नीट कळत नव्हते
पण टाळ मृदुंगाच्या नादातून साध्या सुरेख चालीवर तरंगत आलेले सूर
कानावर येत होते. चहूकडून येणाऱ्या सुरांच्या गोपाळकाल्याने
वातावरण भारावून गेले होते. तेव्हढ्यात माऊलीची पालखी आली.

चोपदाराने आपल्या हातातील दंडा उंच उभारल्या बरोबर
सर्वदूर क्षणात शांतता झाली. सर्व काही स्तब्ध. फक्‍त शांतता.
दिंड्यातील टाळ मृदुंगही गप्प झाले. पण एका कोपऱ्यात मात्र टाळांचा
आवाज ऐकू येतच होता. म्हणजे त्यांची काही तरी तक्रार असणार.
पालखीबरोबरची मोठी माणसे तिकडे जाऊन तक्रार ऐकून आली असावीत.
तक्रार मोठ्यांदा सांगण्यात आली व त्यावरील निकालही दिला. मग
काही निवेदने व इतर सोपस्कार झाले. पालखी मुक्कामासाठी माऊलीच्या
तंबूकडे निघाली. दर्शनासाठी गर्दीही पुढे सरकू लागली.

मी तापाने फणफणलो आहे, थकलेला आहे हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी
बसलेल्या त्या माहितगार माणसाने माझा हात धरून,तशा त्या गर्दीतून मला
सुरळीतपणे मुख्य रस्त्यावर आणले आणि माझ्या दिंडीचा तळ जेथे होता त्या
रस्त्याला मला लावून दिले.

शेतकीखात्यातून निवृत्त झालेल्या त्या सज्जनाचे नाव विचारायचे मी विसरलो.
त्यानेही सांगितले नव्हते.

पंढरीच्या वारीत अशीच असंख्य अनामिक, साधी माणसं मदत करत असतात.
त्यामुळेच वारीत प्रत्येकजण दुसऱ्याला “माऊली” म्हणत असावा!

माझी वारी: थेट पंढरपूर……………!

खरी गोष्ट अशी की……. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा सासवडला
दोन दिवसांचा मुक्काम असतो. आषाढी एकादशीला पंढरपूरात माऊलीबरोबर गेलो
तरी विठ्ठलाचे दर्शन दोन दोन दिवस थांबूनही नीट मिळत नाही ही वस्तुस्थिती
आहे; आणि अनेक वारकऱ्यांचा तसाच अनुभवही आहे. पांडुरंगाचे थोडे
निवांतपणे दर्शन घ्यावे आणि पुन्हा सासवडला मुक्कामाला यायचे. दुसरे दिवशी
पुन्हा माऊलीबरोबर पंढरीच्या वारीला निघायचे असा आमचा बेत होता.

आम्ही सासवडहून संध्याकाळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो.
आमच्या महिला मंडळाने चांगली भजने, भक्‍तीगीते म्हटली. आवाजात एखादी
उणीव काढता आली असती पण म्हणण्यातला भाव फार चांगला होता. आमचा
प्रवास ह्या हरिनामाच्या संकीर्तनात फार लवकर झाल्यासारखा वाटला.

पंढरपुरात पोहचल्यावर नामदेवाच्या पायरीवर डोके ठेवले आणि आम्ही
विठोबाच्या दर्शनासाठी बारीत उभे राहिलो.वर्षभर विठोबाच्या दर्शनासाठी
रांगा लागलेल्या असतात. पण आम्ही त्या दिवशी मोठ्या भाग्याचे! आम्हाला
अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही.

गर्दी नव्हती. दर्शनासाठी मोठ्या रांगाही नव्हत्या. तरीही बडवे
मंडळी सवयीनुसार दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला पांडुरंगापुढून क्षणात
पुढे ढकलतच होते!

आम्ही आता गाभाऱ्यात आलो होतो. त्यामुळे, नामदेवाचे हट्ट पुरवणारा,
भक्‍तांच्या काजा त्यांच्या संकटकाळात धावून जाणारा, सर्व संतांचे
परब्रम्ह अशा त्या सावळ्या पांडुरंगाचे आम्हाला दर्शन होत होते. गाभाऱ्यात
असलेले रांगेतील आम्ही, ते सावळ्या तेजाचे, कटेवरी हात ठेवून भक्‍तांसाठी
तिष्ठत उभ्या असलेल्या, महाराष्ट्राचे साक्षात लोकदैवत असलेल्या विठोबाचे
रूप तिथूनही डोळ्यात साठवत होतो.

आज माझे दैव विशेष बलवत्तर असावे. मी विठोबाच्या समोर उभा होतो.
कपाळावर चंदनाच्या उटीत बुक्क्याचा ठसठशीत ठिपका असलेला टिळा,
डोक्यावर चमचमणारा मुकुट, गळ्यात भरगच्च ताजा वैजयंती हार,
मोरपंखी असा सुंदर निळा पोषाख घातलेला, कमरेला लाल पट्टा,
खांद्यावरून गेलेल्या तांबूस पिवळ्या शेल्याचा भरजरी पट्टा, झळाळणारा
पितांबर नेसलेला तो पांडुरंग पुन्हा जवळून पाहिला. त्याच्या समचरणावर
दोन तीनदा डोके ठेवले! इतके मनसोक्‍त दर्शन मी घेतले तरी बडव्यांनी मला
पुढे ढकलले नाही! पंढरीनाथ महाराज की जय म्हणत मी पुढे सरकलो. हे मी
इतरांना सांगितल्यावर माझ्या या अप्रूप भाग्याचे कौतूक, हेवा न करता
“तुम्ही पैसे पेटीत न टाकता विठ्ठलाच्या पायाशी ठेवले होते” असे व्यावहारिक
सत्य सांगितल्यावर माझे ते भाग्याचे, दैवाचे विचार जमिनीवर आले!

मतितार्थ इतकच की ज्यासाठी हट्टाहास केला होता तो पांडुरंगाने
पुरवला. अगदी आषाढी एकादशीला नाही तर आगाऊ वर्दी न देता आम्ही
एकदम त्याच्या देवळात धडकलो होतो. हजार वर्षे सारा मराठी मुलुख, मराठी
संतांची मांदियाळी ज्याची उत्कटतेने भक्ती करते, त्या विठोबाचे आम्हाला इतके
निवांत दर्शन झाले, ह्याचा आनंद फार मोठा होता.

ह्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊली, संतश्रेष्ठ
तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर तसेच इतर अनेक संतांच्या
पालख्यांबरोबर ह्या सर्व संतांचे असंख्य वारकरी भक्‍त निघाले आहेत,त्या
लक्षावधी वारकऱ्यांबरोबर आपणही जात आहोत ह्याचे समाधान किती होते ते
शब्दात कसे सांगता यॆईल?

आम्ही पारंपारिक पद्धतीत थोडी सोयीची तडजोड केली इतकेच.

माझी वारी: मजल दरमजल

रात्री मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेटलो. चंद्रपूरची मंडळी आली होती.डॉ. अंदनकर भेटले.  किती वर्षांनी भेटलो ह्याचा हिशोब विसरून आम्ही भेटल्याचा आनंद घेतला.

सर्वजण भल्या पहाटे उठलो. ज्ञानेश्वरमाऊलीची पालखी सकाळी  सहा-साडेसहाला पंढरपूरला जाण्यासाठी निघणार होती. आम्ही पहाटे ५.४५ वाजता निघालो. लहान मोठ्या गल्ली बोळातून, रस्त्यांवरून, चहूकडून वारकऱ्यांचे लोंढे येत होते. पताका, निशाणे उंचावत दिंड्याही येत होत्या आणि मुख्य रस्त्याला लागणाऱ्या चौकात धडकत होत्या.

नादब्रम्ह काय असते; भजना अभंगांचा टिपेचा सूर, जय जयरामकृष्ण हरी, ज्ञानोब्बामाऊली तुकाराम हे सर्व कसे मनातून उमटत
येते; उत्साह, उल्हास, उत्कंठा किती अपरंपार असते याचा अनुभव येत होता.

कालच डोळे भरून पाहिलेला माऊलीच्या पालखीचा रथ केव्हा आपल्यात येतो याची आजही हजारो वारकऱ्यांत तितकीच उत्कंठा
होती. १८-२० दिवस आपल्या सोबत माऊली आहे की माऊली सोबत आपण आहोत हे द्वैत नकळत विरघळून जाते याचे प्रत्यंतर आजपासूनच येत होते.

आळंदी ते पुणे हा माझ्या पायांना ओळखीचा रस्ता.काही विसाव्याच्या ठिकाणी थांबत, संध्याकाळी पाच वाजता आम्ही पुण्याला इंजिनीअरींग कॉलेजच्या चौकात आलो.माऊलीची पालखी अजून खूप मागे होती.

चौकातून मी सर्वांचा निरोप घेतला. आमची इतर मंडळी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली.मी घरी निघालो.ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या येणार असल्यामुळे मुख्य रस्ते इतर सर्व वाहनांना बंद होते. त्यामुळे घरी पोचायला मला २.३० तास लागले.

ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा आणि अर्थातच सर्व वारकऱ्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम होता.
११ जुलै रोजी सकाळी सहा वाजताच चि.श्री. श्रीकांत आणि चि.सौ. स्मिता, आम्ही सर्वजण पुण्यातून जिथून निघणार होतो तिथे मला सोडवायला आले होते. सर्वांच्या ओळखी झाल्या. मी आता एकटा नाही, ह्याची खात्री पटल्यामुळे स्मिताईचा जीव भांड्यात पडला
असणार. ती आता निर्धास्त झाली हे तिच्या चेहऱ्यावरूनच मला कळत होते. पण तरीही माझ्या पायाचे दुखणे, लंगडणे हे ध्यानात असल्यामुळे ती मला,”बाबा, पायाचा त्रास हॊऊ लागला की परत या. आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. स्वत:ला जपा.” असे म्हणालीच. माझ्या “काळजीवाहू सरकारची” ही मुख्यमंत्री! लेकीची माया, ती का अशी लपून राहणार?

आम्हा सर्वांना हडपसरच्या दिशेने सोडून ते दोघे घरी परतली.

हडपसरच्या थोडे अगोदरच आम्ही वारीच्या जनसागरात विलीन झालो.

चला! “पुंडलीक वरदा हारी विठ्ठल!” “श्रीज्ञानदेव तुकाराम!” “श्री पंढरीनाथमहाराज की जय” “गुरुमहाराज की जय!” असे थोडे मोठ्याने
(मध्यमवर्गीय शहरी पांढरपेशा असे किती मोठ्याने म्हणणार?) म्हणत म्हणत आमची पायी वाटचाल सुरू झाली. माऊलीच्या पालखीच्या विसाव्याची ठिकाणे माहिती करून घेतली होतीच. आमची दिंडी विसाव्याच्या ठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी कुठे
थांबणार याची माहिती अगोदरच एका तक्त्याद्वारे आम्हाला दिली होती.

प्रथम आम्ही सर्व मंडळी एकमेकांच्या सोबतीने, मग आपोआप काही वेळाने ३/४-५/६ जणांच्या गटा-गटाने चालत होतो. बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांची भजने, टाळमृदुंगाच्या साथीने दिंडीतील वारकरी म्हणत असलेले अभंग ऐकत आमची वाटचाल सोपी होत होती.

दिवे घाट लागला. चढण सुरू झाली. दुपारचे उन चांगलेच तापले होते. वडकी नाल्याची जेवणाची विश्रांती आटोपून बरेच वारकरी पुढे निघाले होते. पण टळटळीत दुपार.एकादशीचा फराळ असला तरी त्याचीही थोडी सुस्ती अंगावर येणारच. त्यातून घाटातील अवघड चढण.पाणी पीत पीत,भजने म्हणत, टाळ मृदुंग वाजवत वारी घाट चढत होती. पण ह्या सगळ्या गोष्टीतच सुस्ती शिरली होती. आवाज वर चढत नव्हते, टाळ मृदुंगात सकाळचा उत्साही नाद नव्हता. वारीचा वेग कमी झाला होता.

दोन अडीच लाखांची ती लोकगंगा वळणे घेत हळू हळू वर चढत चढत अखेर माथ्या जवळ यॆऊ लागली. यानंतर पठार की मग सासवड असे कितीसे दूर ह्या भावनेने वारीला पुन्हा वेग आला. पावले भराभर पडू लागली. टाळ जोरात वाजू लागले. मृदुंगही खणखणीत बोलू लागले.

घाट चढून जाताना जसे आम्ही थोडे पुढे निघालो तेव्हा माझी आणि बरोबर असणाऱ्या सोबत्यांची चुकामुक झाली. आम्हाला एकमेकांचा ठावठिकाणा समजेना. त्याचे असे झाले………….

……. वाटेत सुनील सिद्धमशेट्टीवारांचा डॉक्टरांना फोन आला. फोनवरचे बोलणे आजूबाजूच्या आवाजांमुळे त्यांना नीट ऐकू यॆईना. त्यांनी फोन मला दिला. वारकऱ्यांच्या रांगांतून मी रस्त्याच्या कडेला आलो. “आपल्या गाड्या, घाट संपल्याबरोबर उजव्या बाजूला थांबल्या आहेत. तिथे सर्वांनी थांबायचे आहे.” मी हा निरोप डॉक्टरांना सांगावा म्हणून वारीकडे पाहू लागलो तर डॉक्टर दिसेनात. इतरही कोणी दिसेनात. थोडा वेळ वारकऱ्यांच्या गर्दीतून पुढे पहात, थोडे पुढे चालत जा, पुन्हा मागे या असे झाले तरी डॉक्टर दिसेनात की इतर सोबतीही दिसेनात. डॉक्टरांचा मोबाईल माझ्याकडे आणि निरोपही माझ्यापाशीच राहिला. काय करावे?

चला, पुढे जावे, वाटेत भेटतील आपल्यापैकी कुणीतरी. पण कसचे काय! मी पुढे जात राहिलो. पुढे, पुढे, आणि पुढेच. तरी वाटेत इकडे तिकडे आपली मंडळी दिसतात का ते पहात चाललो होतो. कोणीच दिसेना. मी बराच पुढे आलो असेन. घाटही चढून पार केला. उजव्या बाजूला आमच्या गाड्याही दिसल्या नाहीत. एका मागून एक वारकऱ्यांच्या लाटा येतच होत्या. सर्व दिंड्यांच्या ट्रक-टेंपोही
वर्दळीने जात होत्या. सासवड ४ कि.मी. असा मैलाचा दगडही मी वाचला. वाटेत एके ठिकाणी फराळाचे वाटप चालले होते.वाटप करत होते त्यांच्यापैकी एकाला डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवलेले फोन नंबर पहायला सांगितले. एक ओळखीचे नाव “सुनील” आल्यावर तो नंबर लावायला सांगितला. पण तो नंबर काही लागत नव्हता.

डॉक्टरांचा फोन माझ्याजवळ राहिल्यामुळे तेही मला फोन करू शकत नव्हते.

मला चालत राहण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता. आता सासवड २ कि.मी. अंतरावरच होते.एका मोठ्या ढाब्यापाशी थांबलो. समोर रस्त्याच्या पलीकडे पाणी पुरवठ्याची मोठी उंच टाकी होती. आपल्यापैकी कोणीतरी भेटेल असे वाटत होते. इतक्यात अचानक फोन वाजू लागला. डॉक्टरच बोलत होते. त्यांना मी कुठे आहे ते ढाबा आणि टाकीच्या खुणा देऊन सांगितले. आपली एक गाडी येत
आहे त्यात बसा असा निरोप मिळाला. चला! सर्व भेटणार हे ऐकून बरे वाटले.

हे इतके सर्व होईपर्यंत हजारो वारकरी, रथापुढच्या अनेक दिंड्या अवघड घाट पार करून आल्याचा आपला आनंद टाळ-मृदुंगाच्या खणखणीत पण मधुर सुरा-तालावर दाखवत होते. ह्या ताला-नादाच्या उधाणाला कशाची उपमा देणार आणि कोणत्या शब्दांत त्याचे वर्णन करणार?

अर्ध्या तासानी आमची गाडी आली. सोबत्यांची पुन्हा भेट झाली. आम्ही थोड्याच वेळात सासवडला पोचलो.गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वागताच्या मोठमोठ्या कमानी होत्या. मोठे व्यासपीठ होते. प्रवेशद्वारापाशी नगराध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे स्वागत करणार होते.

पालखीचे असे “सहर्ष स्वागत”सोहळे प्रत्येक लहान सहान गावात होतच होते. आळंदीहून निघाल्यापासून माऊलीची पालखी पंढरपूरला पोहचेपर्यंत माऊलीबरोबर असल्यामुळे सर्व वारकऱ्यांना ह्या अशा “सहर्ष स्वागताच्या” कमानीतून मानाने जायला मिळणार होते.

आमचा चौदा जणांचा गट आता पंढरपूरला जाणार होता. संधाकाळी ५.३० वाजता आम्ही निघालोही पंढरपूरला!

आमची पायी वारी इथेच संपली काय? विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारीतून हा “जवळचा रस्ता” आम्ही काढला की काय? का वारीची ही संक्षिप्त आवृत्ती काढली? असे प्रश्न कुणालाही पडले असणार. पण तसे काही नव्हते.आम्ही आमच्या पायी वारीला असे काही जवळचे फाटे फोडले नव्हते. खरी गोष्ट अशी की………………….