Category Archives: Uncategorized

आमचा ‘ पासिंग शो ‘

बेलमाँट

बहुसंख्य लहान मुलांना मुलींना काही तरी गोळा करण्याचा , जमवण्याचा , जमवून ते जपून ठेवण्याची हौस छंद आवड -काही नाव द्या- असते . मला आणि माझ्या बरोबरीच्या काही सवंगड्यांना सुरुवातीला काचेच्या,सिमेन्ट सारख्या टणक, लहान मोठ्या गोट्या जमवण्याची आवड होती. गोट्या खेळत असल्यामुळे ती जोपासणेही सहज होत असे. मोठ्या गोटीला, गोटी कसे म्हणायचे, गोटूलाच म्हणावे लागेल, अशा गोट्या ढंपर म्हणून ओळखल्या जायच्या. काचेच्या गोट्यांतही विविध रंगासोबतच त्यांच्या पोटात नक्षीही असे. पोटात, अंतरात नक्षी खेळत असलेल्या पारदर्शी गोट्यांना तितक्याच सुंदर नावाने म्हणजे ‘बुलबुल’ म्हणून त्याओळखले जायचे .

गोट्यांनंतर काड्याच्या पेटीचे छाप जमवणे सुरू केले. काड्याच्या पेट्या घरोघरी असायच्या. किराणा दुकानदार. पानपट्टीवाले संख्येने किती तरी असत. त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या छापांच्या काड्यापेट्यांची बंडले असत.

छाप जमवण्यास सुरुवात झाल्यावर दोस्तांशी गप्पा मारत जात असलो तरी प्रत्येकाचे लक्ष चारी बाजूना बारकाईने असे. काही जण गप्पांत रमले की, मला नाही तर त्याला रिकामी काड्यापेटी किंवा चिरडली गेलेली काड्यापेटी दिसली की कशाचेही भान न राहता त्या काड्यापेटींवर झडप घालायला झेपावत असू. एकदम दोन्ही मिळणे फार कठिण. एक जरी मिळाली तरी लढाई जिंकल्याचा आनंद असायचा. मग तुला कोणता छाप मिळाला ह्याची चर्चा. “हाऽत्तीच्या! घोडा छापच की” म्हणत तो किंवा मी ती काड्याची पेटी पुन्हा फेकून देत असू. कारण हा घोडा छाप सर्रास सापडत असे. पत्त्याच्या पानाचा छाप, किंवा नुसता एकच किलवर आणि इस्पिक छाप मिळाले की काही तरी मिळाले असे वाटे. अदला बदलीत किंचित वरचढ ठरणारे हे छाप असत. तांबड्या रंगाचा आडवा चौकटच्या एक्क्याचा छाप असलेली काडीपेटी सापडली की तो दिवस सोन्याच व्हायचा आम्हा दोस्त मंडळीचा.

एकेकटे फिरताना, भाजी आणायला संध्याकाळी फाटकावर जाताना, रविवारी गावातल्या मुख्य भाजीबाजारात जातांना किंवा, आई किंवा काकूंबरोबर देवळात जाताना, ह्या छापांची आणि तशीच अगदी वेगळ्या नेहमीच न मिळणाऱ्या छापांची कमाई होत असे!

कधी कधी आमची ही हौस- छंद-आवड अगदी व्यसनाची पातळी गाठायची. कुणी दोघे- तिघे अगर एकटा माणूस सिग्रेट विडी ओढताना दिसले किंवा आता ‘तो/ ते विडी सिग्रेट शिलगावणार ‘ असा अंदाज आला की आशाळभूतपणे तो किंवा त्यांच्यातले एक दोघे तरी रिकामी काडीपेटी केव्हा फेकतील ह्याची वाट पाहात उभे असू. सहज दोस्त उभे आहेत किंवा कोणी एकटा असला तर, कुणाची वाट पाहातोय अशी ॲक्शन करत उभे राहायचो. नशिब जोरावर असेल तर दोन काड्याच्या पेट्या खाली पडलेल्या दिसायच्या. दिसल्या की त्याच सहजतेने ती काड्याची पेटी उचलून पुढे सटकायचे. घोडा छाप निघाली की चिडून ती पायाखाली चिरडून पुढे जायचो; कुणी विडी सिग्रेट ओढतेय का ते पाहात ! हा तपश्चर्येचाच काळ होता आमच्यासारख्या ‘ एका ध्येयाने पछाडलेल्या ‘ ‘ एकच श्वास एकच ध्यास ‘ घेतलेल्या पोरांचा. काड्यापेटींचे वेग वेगळे भारी वाटणारे छाप जमा करणाऱी छंदोमय झालेली मुले आम्हीच ! आमच्यासारखी आणखीही पुष्कळ असतील.

प्रत्येकाकडे दुर्मिळ, सहज न मिळणारे काड्या पेटींचे एक दोन छाप तरी नक्कीच असत. त्यांची अदला बदल देवाण घेवाण सहसा होत नसे. प्रत्येकासाठी ते छाप Trophy च असत. माझ्याकडे आणि धाकट्या भावाकडेही अशी मौल्यवान रत्ने होती. एका काड्यापेटीच्या वर संत तुकारामांचा छाप होता . त्याची छपाई व चित्रही सुंदर! दुसरा एक छाप टारझनचा होता. त्यालाही तोड नव्हती. सुरवातीला दुर्मिळ असणारा पण नंतर काही महिन्यांत तो तितकासा वैशिष्ठ्यपूर्ण न राहिलेला म्हणजे जंगलातून झेप घेतलेला वाघ व झाडावर बंदूक रोखून बसलेला शिकारी. पिवळसर व हिरव्या रंगाचे मिश्रण त्या छापात होते. काडीपेटी ती अशी कितीशी मोठी ? त्यावर हे चित्र छापणे सुद्धा फार अवघड आहे असे त्या वयातही वाटायचे. दुसरा एक छाप होता, समई छाप. किंचित गडद तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पितळेची चकचकीत समई, चारपाच तेवणाऱ्या ज्योती आणि त्यांच्या भोवती पिवळ्या प्रकाशाते वलय. आमच्या भाषेत- येकदम मस्त! असेच उदगार संत तुकाराम महाराजांचा छाप पाहिल्य्वर सगळ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडत. फक्त” येकदम मस्त हाय ब्ये!” ही भर पडायची.

गोट्यांच्या मागोमाग काड्यांच्या पेटीचे छाप जमवण्याचा नाद लागला व तोही संपला. काड्यापेटीची सखीसोबती सिग्रेटच्या पाकिटांच्या मागे लागलो. त्यावेळी बिडी सिग्रेट पिणे म्हणत जरी त्यात ओढण्याची क्रिया असली तरी पिणे हेच क्रियापद प्रचलित होते.

ह्या दोन्ही नादासाठी रस्ते धुंडाळणे हे समान कर्तव्य होते. ते इमान इतबारे पार पाडत असू. त्यासाठी शाळेच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नव्हती. काड्यापेटीचे छाप असोत की सिग्रेटची पाकिटे, शाळा सुद्धा आमच्या संशोधनाचे केंन्द्र होते. मोरे मास्तर, पवार मास्तर, हे ह्या दोन्हींसाठी भरवशाचे .

काड्याच्या पेटीत जशी घोडाछाप सार्वत्रिक होती तशी सिग्रेटीत दोन ब्रॅन्ड लोकप्रिय होते. चहात जसा कडक चाय पिणारे तसे सिग्रेटमध्ये लई कडक चार मिनार होती ! त्यानंतर सर्वाना सहज सहन होणारी म्हणजे पीला हत्ती किंवा पिवळा हत्ती. ही पाकिटे जमवायला कौशल्याची हुन्नरीची आवश्यकता नव्हती. कुठेही गेलो आणि पाहिले तरी सहज ह्या दोन्ही छापांची पाकिटे मुबलक मिळायची. त्यानंतर बर्कले व त्याही नंतर कॅपस्टन हे दोन प्रतिष्ठित छाप होते. सर्वात वरिष्ठ म्हणजे गोल्ड फ्लेक्स सिगरेट. तिला सिग्रेट- शिग्रेट म्हणण्याचे धाडस कुणी करत नसे. ती लोकसंबोधने जनतेच्या जिव्हाळ्याचे जे दोन ब्रॅन्ड चार मिनार आणि पिवळ्या हत्तींसाठी राखीव होती ! कारण ते सर्वसामान्य कामगारांना, कारकुनांना आणि हेडक्लार्कना परवडणारे होते.

छाप कोणताही असो सर्व सिग्रेटींची पाकीटे दहाची असत. नंतर काही काळांनी काही ब्रॅन्डनीं वीसचीही पाकिटे आणली ती दोन्हीही गुण्या गोविंदाने पानपट्टीच्या टपऱ्यांत एकमेकाशेजारी बसत. तसेच बर्कले, कॅपस्टन, आणि गोल्ड फ्लेक्स ह्यांचे पन्नास सिगरेटींचे टिन असत. इस्त्रीच्या कपड्यातील, गॅागल लावलेले तरूण कधीतरी रुबाबात हातात हा टिन तिरपा धरून जाताना जिसत. पण अशी शान मोजके मोटरवाले होते त्यांना जास्त शोभून दिसे. गोल्ड फ्लेकस शिवाय ते दुसऱ्या सिगरेटीचा झुरकाही घेत नसावेत. पण चार मिनारवाले ह्या सर्वांना तुच्छ समजत. बायकी शिग्रेटी पिणारे म्हणत त्यांना.

ही पाकिटे जमा करायचोच पण कधी सटीसहीमाहीला कॅमल किंवा अबदुल्ला नावाचे एखादे पाकीट मिळे ! ही वार्ता सिग्रेटची पाकिटे जमवणाऱ्या आमच्या सारख्या नादिष्ट मुलांच्या गोटांत वाऱ्यासारखी पसरे! दुध पिणाऱ्या गणतीचे दर्शन घ्यायला पुढे येणाऱ्या नंतरच्या काळात धावपळ झली नसेल तितकी पळापळी केली असेल पोरांनी! हे कधी न ऐकलेले ना पाहिलेली छापाची पाकिटे कशी दिसतात इतके पाहायला मिळाले तरी धन्य वाटायचे.

पण दुर्मिळ असल्यामुळे व कसलीही माहिती नसल्यामुळे लहानशा ओढ्याला अचानक आलेल्या पुराचा लोंढा जसा लगेच ओसरतो तशी आमची उत्सुकताही ओसरायची ! ओळखीची माणसेच बरी हाच सनातन नियम पटायचा.

हे चार मिनार, पिवळा हत्ती, कॅपस्टन वगैरे जमा करण्याच्या मोसमातच एक वेगळा ब्रॅन्ड त्याच्या अत्यंत अनोळखी नावा मुळे, पाकिटाच्या रंगसंगतीमुळे व त्यावर असणाऱ्या स्टायलिश माणसाचा फोटो आणि त्याच्या तितक्याच स्टायलिश हॅट मुळे त्या पाकिटाची किंमत ( मूल्य वगैरे शब्द कुणाला माहित?! आणि म्हणता येणार होते!) आमच्या अदलाबदलीच्या मार्केटमध्ये वधारली! ज्यांच्याकडे ही पाकिटे होती ते मोटारीतून गोल्डफ्लेकसचा टिन घेऊन उतरणाऱ्या रुबाबदार श्रीमंताप्रमाणे आव आणीत आमच्यात वावरत !

पण ह्या सिग्रेटचे नावही सुंदर आहे . ‘ पासिंग शो ‘ वा! सिगरेटचे झुरके घेण्याला इतके काव्यमयच नव्हेतर वास्तवही म्हणता येईल नाव आहे. ‘ घटकाभरचा खेळ, घटकाभर करमणुक, क्षणभराचा विरंगुळा!’ ‘फार नाही, दोन घटका मजेत घालवा’ ‘दोन घटका लगेच सरतील,’ त्यावेळी हे अर्थ माहित नव्हते. नाव सोपे आणि निराळे होते. हे समजत होते. ते नाव लक्षात राहण्याचे त्यातील सहजता हेही कारण असेल.

काड्यापेट्यांचे छाप, सिगरेटची पाकिटे जमवणे हा खेळही होता आणि नाद होता. छंद आवड हौस हे शब्दही आम्हाला कधी आमच्या वाटेवर भेटले नाहीत. त्यामुळे नाद होता म्हणणेच योग्य. बरं ह्या वस्तु अखेर शब्दशः टाकाऊच. बरीच माणसे, मुलं छाप पाकिटे गोळा जमवतात हे पाहून ते कौतुकाने आपणहून रिकामी काडेपेटी किंवा रिकामे सिगरेटचे पाकीट देत. काहीजण तर एकच शिल्लक असली तर ती खिशात ठेवून सिगरेटचे पाकिट देत.

गोट्या जमवणे थांबले, मग काड्यापेटींचे छाप जमवण्यामागे लागलो. तेही बंद कधी झाले त्याचा पत्ता नाही आणि सिगरेटची पाकिटे जमवता जमवता तोही नाद कसा आणि कुठे संपला तेही समजले नाही.

हा खेळ अखेर ‘पासिंग शो’ च होता!

‘बॅट बाॅल’ आणि…

आम्ही मुले स्वतंत्रपणे आणि काही वेळा आमच्या काकांच्या आणि वडिलांबरोबरही बॅडमिन्टन, रिंगटेनिस खेळत असू. बॅडमिन्टनसाठी लागणाऱ्या रॅकेटस मोजक्या होत्या. त्यामुळे आळीपाळीने खेळणे ओघानेच आले. बॅडमिंन्टनचा उत्साह संपला की त्याच मोठ्या अंगणात बॅट- बाॅल खेळत असू.

सुरवातीला सिद्धेश्वरच्या जत्रेत मिळणाऱ्या बॅटी होत्या. खऱ्या बॅटीशी किंचित सारखेपणा असायचा. तोही फक्त आकारात. ती बॅट म्हणजे बॅटीच्या आकाराची केवळ फळी होती. पण त्याकडे आमचे लक्ष नसे. रबरी चेंडू आणि ती बॅट म्हणजे आमचा बॅट बाॅल; म्हणजेच क्रिकेट खेळणे असे. रबरी बॅाल (टेनिसचा नव्हे) हरवायचा किंवा बॅटीचा मार खाऊन फुटायचा. जशी बॅट तसाच बाॅल. समान दर्जाचे. रबरी बाॅल फुटला की श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरच्या जत्रेतून लाकडी बाॅल आणायचो. टिकाऊ आणि टाळक्यात, कपाळाला लागला की किती कडक आणि दणकट तेही समजायचे. त्यामुळे तो बाॅल अडवण्याचा, कॅच पकडण्याचा आमच्यापैकी कुणीही प्रयत्न करीत नसे. असल्या हिरोगिरीच्या वाटेला जात नसू.

खऱ्या बॅटी बॅाल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कुकरेजाचे दुकान ! हे दुकान म्हणजे क्रिकेटच्या बॅटी बॅाल आणि फुटबॅाल हॅाकी आणि इतरही सर्व खेळांच्या साहित्याचे दुकान, -भांडारच! त्यावेळी संपूर्ण शहरात असे एकच दुकान होते. गावातल्या सगळ्या शाळा कॅालेजांची, खेळाच्या सामानाची खरेदी इथूनच होत असे. कुकरेजा कं.चे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची मानाची ढाल कुकरेजांनी ठेवली होती. कुकरेजा शिल्ड जिंकण्यासाठी सर्व हायस्कुलांत दरवर्षी अटीतटीची लढाई असायची. विशेषतः आमची शाळा, न्यु हायस्कूल आणि ॲन्ग्लो उर्दु ह्यांच्यात.

आम्हाला कुकरेजा आणि कं.चे दुकान आणखी एका कारणाने माहितीचे होते. बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्त करायला तिथे जात असू. दुकानात एक अत्यंत कुशल आणि कसबी कारागीर होता. हा कारागिर अगदीशिडशिडा. आणि मालक कुकरेजा ( हे गृहस्थ, मालक कुकरेजाच होते का कोणी व्यवथापक होते हे माहित नाही. पण आम्हाला ते मालकच वाटत.) जाडे होते. ह्या दोघांना पाहिले की लॅारेल हार्डीची आठवण यायची. त्यांचा वेष ठरलेला असे. जाड कापडाचा ढगळ पायजमा आणि त्यावर कधी अर्ध्या बाह्यांचा रंगीत, कधी पांढरा शर्ट. केस पांढरट. भांग साधा पाडलेला . पण व्यवसथित विसकटलेले. त्यांचा कारागीर उंच आणि शिडशिडीत. पंजाबी लुंगी, वर पैरणीसारखा अर्ध्या बाह्यांचा चोकटीचा सदरा किंवा बनियन. डोक्यावर फेटा नसे पण मध्यभागी केसांचा बुचडा बांधलेला असे. सदा कामात गढलेला. बॅडमिन्टनच्या रॅकेटस ची जाळी घट्ट विणत बसलेला दिसे तर कधी क्रिकेटच्या बॅटला तळाशी चांभारी दोऱ्यासारखी ट्वाईन काटेकोरपणे गुंडाळत असे. त्यासाठी तो बॅट, मागे- पुढे- -बाजुला सरकवता येईल असा, जमीनीवर ठेवलेल्या साचात ठेवायचा. ट्वाईन बॅटला ज्या ठिकाणी गुंडाळायची तिथे ब्रशने सरस लावायचा. मग ट्वाईनचे एक टोक तिथे घट्ट चिकटवून ठेवायचा. त्यानंतर साचा हळू हळू फिरवायला लागे. आणि ट्वाईन इकडे तिकडे न भरकटू देता बरोबर एकाखाली एक अगदी सरळ रेषेत जवळ आणत आपोआाप तो गुंडाळत असे. ही पट्टी झाली की तीन चार बोटांचे अंतर ठेवून त्यावर सरसाचा ब्रश फिरवून झाला की दुसऱ्या पट्टीसाठी ट्वाईन गुंडाळणे सुरू. अशा तऱ्हेने तो ट्वाईनच्या दोन पण बहुतेक बॅटीना तीन पट्ट्या लावायचा.

आम्ही आमचे काका आबासाहेबांच्याबरोबर बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्तीसाठी कुकरेजाकडे घेऊन जायचो. रॅकेटची जाळी सैल झाली असेल तर दोन तीन दिवसांनी या म्हणायचा. कधी मधली एखाद दुसरी तार तुटली असेल तर तो अर्ध्या तासात सुंदर विणून द्यायचा. जाळी पुन्हा पहिल्या सारखी दिसायची. एखाद्या तारेची वेलांटी फ्रेम मधून सैल झालेली दिसल्यावर तो काय करायचा माहित नाही. पण खालच्या बाजूने, वरच्या बाजूने दोन तारा तो अशा काही खाली वर ताणत असे. आणि तळहातावर ती रॅकेट मारत असे त्यावेळी “तंन्नन” असा झंकारणारा आवाज ऐकायला मजा येई. जाळी आता पक्की झाली ह्याची खात्री होई.

असेच एकदा आम्हाला आमचे वडील अचानक कुकरेजा मध्ये क्रिकेटची बॅट घ्यायला घेऊन गेले. तेव्हाचा आनंद काय वर्णावा. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळायला जाणाऱ्या बॅटसमनला किंवा बॅालरला काय वाटत असेल ह्याची काही कल्पना नव्हती. पण शाळेच्या टीम मधून न्यू हायस्कूल किंवा ॲंग्लो उर्दु विरुद्ध पार्कच्या मैदानावर खेळायला जाताना बॅट्समन किंवा गोलंदाजाला काय वाटत असेल तोच आनंद, तीच धाकधुक, तसाच उत्साह आम्हालाही आला होता.

खरी क्रिकेटची बॅट! आणि तो चमकणारा, पॅालिशने चकाकणाऱ्या लाल रंगाचा लेदर बॅाल! तो बॅाल हातात घ्यायला मिळाला, नव्हे ह्या बॅटने व बॅालने आता बॅटबॅाल न खेळता ‘ क्रिकेट ‘ खेळणार हाच विचार वारंवार आम्हा तिघाही भावांच्या मनात येत होता. आमच्यासाखे भाग्यवान आम्हीच!

दुकानात आम्ही तीन चार बॅटी स्टाईलमध्ये धरून बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून पाहिल्या. तिघांनाही बॅट व्यवस्थित धरता येईल अशी एकमेव बॅट मिळणे शक्य नव्हते. त्यातून कुकरेजानीच मार्ग काढला. आमच्याकडे पाहात त्यांनी एक दोन प्रसिद्ध ‘नॅान्जर’च्या बॅटी ( बॅटीना खेळाडूच्या शरीरयष्टी म्हणण्यपेक्षा उंची ध्यानात घेऊन नंबर दिलेला असे. ५,६ ७ वगैरे.) पाहून त्यातली त्यांनी योग्य त्या नंबरची बॅट दिली. oiling करून झाल्यावर बॅट घेऊन जा असे त्यांनी सांगितले. स्टम्पस? कमीत कमी तीन तरी लागायचे पण बजेटमध्ये स्टम्प बसत नव्हते त्यामुळे बॅालिंग न करता उडवले आम्ही ते !

भरपूर खेळलो आम्ही त्या बॅटने. गल्लीतल्या मॅचेस मध्ये नवीन होती तोपर्यंत आमची बॅट हिरॅाईन होती. एकदा बॅटीचे हॅन्डलच सैल झाले. कुकरेजा कडे गेलो. बिनफेट्याचा तो कसबी शीख कारागीर यायचा होता. कुकरेजाशेठनी बॅट पाहिली. थोडा वेळ थांबा म्हणाले. थोड्या वेळाने तो शीख कारागीर येताना पाहिला. बिचारा एका पायाने लंगडा होता ते आम्हाला समजले. एका पायाच्या चौड्यांने चालायचा. त्या पायाची टाच टेकतच नव्हती. उंच होता मुळात त्यात एक पाय नेहमीसारखा टाकायचा पण तो दुसरा पाय चौड्यावर चालण्यामुळे दर पावला गणिक तो एका बाजूने जास्त उंच व्हायचा.

त्याने बॅटीकडे नुसती नजर टाकली. काही न बोलता, सैल झालेल्या हॅन्डलच्या पाचरात जिथे अंतर होते तिथे सरस भरला आणि त्या साच्यात बॅट ठेवली. व हॅन्डलचे पाचर जिथे खुपसले होते त्या बॅटीच्या दोन्ही भागांना त्याने रबरी हातोड्याने योग्य तेव्हढ्याच शक्तीने हळू हळू ठोकू लागला. “ठीक हो गयी है. पण ट्वाईन लावली तर बरेच दिवस टिकेल.” पैशाचा अंदाज घेतला. परवडेल वाटल्यावरून हो म्हणालो. त्याची ती आखीव रेखीव पण तितकीच दोरा बळकट गुंडाळण्याची कामगिरी ओणवे होऊन पाहात राहीलो. बॅट हातात दिली त्यांनी. पुन्हा बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून मुद्दाम हॅन्डलवर जोर देत जमिनीवर बॅटीने टक टक करत बॅटिंग करून पाहिली. बॅट नविन झाली ह्या खुषीत आलो घरी !

बॅटीचा दोस्त लाल चेंडूची मात्र रया जाऊ लागली. पण दुसरा लेदर बॅाल घेणे शक्य नव्हते. त्या ऐवजी खेळण्याच्या इतर मोठ्या दुकानात सीझन बॅाल नावाचा एक बॅाल मिळायचा. तो स्वस्त व बरेच दिवस टिकत असे. पण नडगीवर किंवा हॅन्डल धरलेल्या दोन्ही हातांना लागला की ठो ठो करण्याची वेळ यायची. पण असल्या किरकोळ कारणांनी कुणी क्रिकेट खेळणे थांबवते का?

बॅटीच्या हॅन्डलला रबरी कव्हर बसवताना पाहणे हा सुद्धा एक नेत्रसुभग सोहळा असायचा. कुकरेजाचा हा वाकबगार कलावंत-कारागीर तुम्हाला पाहिजे ते कव्हर ( ‘परवडणे’ हा आमचा परवलीचा शब्द असायचा.) निवडा म्हणायचा. बॅट नवीन घेताना जे कव्हर असे ते फुकट असे. कारण बॅटीसह ते गृहप्रवेश करायचे. त्याची गुणवत्ता तितकीच. नवीन घेणे बरेच दिवस लांबणीवर टाकायचो आम्ही. पण बदलायची वेळ टळून गेली. उघड्या हॅन्डलने खेळून हात खरचटू लागले. टोलाच नाही चेंडू नुसता तटवला तरी हाताला झिणझिण्या यायच्या. आता मात्र तसे नवीन कव्हर बसवणे आणि हॅन्डल पक्के करून घेण्यासाठी गेलो.

चांगले रबरी काटेरी ठिपकेदार कव्हर ज्यामुळे पकड छान यायची खेळताना तसे घ्यावे असे पहिल्यांदा वाटायचे पण किंमत ऐकल्यावर मग “हे केव्हढ्याला, ते केव्हढ्याला” करत एक परवडणारे( पुन्हा तो परवलीचा शब्द आलाच) कव्हर नक्की करत असू.

आता इथून त्या शीखाची कामगिरी सुरू. पहिल्यांदा तो ते कव्हर दोन्ही बाजूंनी ओढून ताणून पाहात असे. बॅटीच्या हॅन्डलला पांढरी पावडर लागायची. तीच पावडर रबरी कव्हरमध्येही जायची. कव्हर चांगले चोळले जाई. त्यानंतर तो ते कव्हर आत खुपसताखुपसता मध्ये पावडर हाताला लावायचा, रबरी कव्हर मध्यम लांबीचे करी. उघडे तोंड हॅन्डलच्या डोक्यावर घट्ट दाबून ठेवल्या सारखे करतो ना करतो तोच कव्हरची वर राहिलेली बाजू सरसर करीत खाली आणत जाई! बॅटीचे दोन्ही खांदे बेताने झाकले जातील इतके ते कव्हर खाली न्यायचा. थोडा भाग अजून वर दिसत असे तो भाग खाली सरकवत सरकवत हॅन्डलच्या कपाळपट्टीला खाली वळवत गुंडाळून टाके. वारे पठ्ठे ! एका झटक्यात, हवेत हात फिरवून बंद मुठीतला रुपया प्रेक्षकांना दाखवणाऱा कुकरेजाच्या दुकानातील हा आमचा लंगडा कलाकार जादूगारच होता आमच्यासाठी !

ढगळ मापाचा वाढत्या अंगाचा अभ्रा असला तरी तो उशीला घालण्यासाठी अर्धा तास झटापट करणारे आम्ही. आम्हाला तो कसबी शीख जादूगार वाटला तर आश्चर्य नाही.

पुस्तकांच्या गराड्यांत

बेलमाँट

गेले काही दिवस पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलो आहे. आजपर्यंत पाचसहा लायब्रऱ्यात जाऊन बराच काळ तिथे काढला. सर्व ठिकाणी अनेक चांगल्या पुस्तकांच्या नंदनवनात वाचक म्हणून वावरत होतो.

सध्या बेलमॅान्टच्या लायब्ररीत मात्र मी व्हॅालन्टियर म्हणून जातो. म्हणूनच सुरुवातीला लिहिले की पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलोआहे.

पुस्तके मासिके वाचण्यासाठी माझ्या लायब्ररींच्या भेटी जनरल लायब्ररीपासून सुरुवात झाली. त्यानंतर वल्लभदास वालजी वाचनालय, बळवंत वाचनालय,नवजीवन ग्रंथालय, ते मुंबई मराठी ग्रंथालय – विशेषतः तिथल्या संदर्भ ग्रंथालयापर्यंत पर्यटन झाले. . त्यानंतर माउन्टन व्हयू लायब्ररी, मर्चंटस् वॅाक, रेडवुड शोअर्स, सॅन कार्लोस रेडवुडसिटी ह्या लायब्रऱ्यात सुद्धा जाऊन आलो. सॅन कार्लोस लायब्ररीपासून माझे व्हॅालंन्टियरचे दिवस सुरू झाले.

पण आज जास्त करून लिहिणार आहे ते, विशेषतः बेलमॅान्टच्या वाचनालयाशी संबंधित आहे. कारण सध्या मी बेलमॅान्टच्या लायब्ररीत व्हॅालन्टियर म्हणून जात आहे. तिथे देणगी म्हणून येणाऱ्या पुस्तकांशी माझा सतत संबंध येतो.

निरनिराळी, अनेक विषयांवरची, कादंबऱ्या, आठवणींची, चरित्रे, आत्मचरित्रे, अभिजात (classic), काव्यसंग्रह , इतिहासाची, उत्कृष्ठ छायाचित्रांची, आर्थिक राजकीय विषयांवरची किती किती, अनेक असंख्य पुस्तके समोर येत असतात.

काही पुस्तके अगोदर वाचली असल्यामुळे ओळखीची असतात. त्यातलीही काही पुस्तके तर केव्हा कुठे वाचली कोणी दिली ह्यांच्याही आठवणी जाग्या करतात. ह्यातच काही योगायोगांचीही भर पडते. थोरल्या मुलाने अगोदर केव्हा तरी – केव्हा तरी नाही- दोन तीन दिवसांपूर्वी विचारले असते ,” बाबा सध्या अचानक ज्योतिषावरची पुस्तके दिसायला लागलीत.तुमच्या पाहण्यात आलीत का?” त्यावर मी नाही म्हणालो. इतक्यात तरी काही दिसली नाहीत.” असे म्हणालो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, चिनी ज्योतिष, अंकशास्त्रावर आधारित भविष्याची, तुमची जन्मतारीख आणि भविष्य अशी पुस्तके आली की! योगायोग म्हणायचा की चमत्कार हा प्रश्न पडला.

फेब्रुवारीत धाकटा मुलगा म्हणाला की ते सगळे एप्रिलमध्ये युरोपातील ॲमस्टरडॅम लंडन पॅरीस ला जाणार आहेत. दोन चार दिवस माझ्या ते लक्षात राहिले. नंतर विसरलो. ऐका बरं का आता. मी लायब्ररीतल्या कॅाम्प्युटरवर पाहिले. स्टीव्ह रीकची पुस्तके दिसली नाहीत. एक आढळले. पण ते दुसऱ्या गावातल्या लायब्ररीत होते. माझ्यासाठी राखून ठेवा असे नोंदवून ठेवले. दोन दिवस गेले. तिसरे दिवशी लंडन का पॅरिसवरचे स्टीव्ह रीकचे पुस्तक समोर आले. अगदी समोर. वा! हे जाऊ द्या. मी लायब्ररीतल्या बाईंनाही सांगून ठेवले होते. दोन तीन दिवसांनी त्यांनी मला बोलावलेआणि नेदर्लॅंडचे पुस्तक हातात ठेवले. “ पण तुला पाहिजे त्या ॲाथरचे नाही .” मी काय बोलणार? योगायोग की चमत्कार ? हा नेहमीचा प्र्शन पुन्हा पडला!

पुस्तके देणारे बरेच लोक पुस्तके देतात ती इतक्या चांगल्या स्थितीत असतात की आताच दुकानातून आणली आहेत! अनेक पुस्तके खाऊन पिऊन सुखी अशी असतात. तर काही जिथे जागा सापडली तिथे बसून, जेव्हा मिळाला वेळ तेव्हा वाचलीअशी असतात. कव्हरचा कोपरा फाटलेला , नाहीतर कान पिरगळून ठेवावा तशी आतली बऱ्याच पानांचे कोपरे खुणेसाठी दुमडून ठेवलेली, अशा वेषांतही येतात. काही मात्र बघवत नाहीत अशा रुपाने येतात. पण अशा अवस्थेतील, फारच म्हणजे अगदी फारच थोडी असतात.

पुस्तके ज्या पद्धतीने दिली जातात ती पाहिल्यावर देणगी दार आणि त्यांची घरे कशी असतील ह्याचा ढोबळ अंदाज येतो. काही पुस्तके बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असतात तरी ती नुकतीच दुकानातून आणली आहेत असे वाटते.काहीजण कागदी पिशव्या भरून पुस्तके देतात. पण इतकी व्यवस्थित लावून रचलेली की ती पिशवी रिकामी करू नये; पिशवीकडे पाहातच राहावे असे वाटते. साहजिकच पुस्तके बाहेर काढताना मीही ती काळजीपूर्वक काढून टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळा पुस्तके खोक्यांत भरून येतात. पहिले दोन थर आखीव रेखीव. मग वरच्या थरात जशी बसतील, ठेवली जातील तशी भरलेली ! खोकी आपले दोन्ही हात वर करून उभे ! काही पुस्तके तर धान्याची पोती रिकामी करावी तशी ओतलेली. सुगीच्या धान्याची रासच! हां त्यामुळे मोऽठ्ठ्या, खोल पिपातली पुस्तके उचलून घ्यायला सोपे जाते हे मात्र खरे.

एक दोनदा तर दोन लहान मुले,पुस्तकांनी भरलेले आपले दोन्ही हात छातीशी धरून “कुठे ठेवायची ?” विचारत कामाच्या खोलीत आली ! लहान मुलांची पुस्तके होती. त्या मुलांइतकीच पुस्तके गोड की पुस्तकांपेक्षाही मुले ? ह्याचे उत्तर शोधण्याची गरजच नव्हती. दोन्ही गोड! किती पुस्तके आणि ती देणारेही किती!

आठवणी जाग्या करणारी पुस्तकेही समोर येतात. पूर्वी मुलाने ,” हे वाचा” म्हणून दिलेले Little Prince दिसल्यावर माउन्टन व्ह्यु नावाच्या लायब्ररीची आठवण येते. जिथे बसून वाचत असे ती कोचाची खुर्ची, तिच्या बाजूला खाली ठेवलेली, बरोबर घेतलेली वहीची पिशवी…. असेच आजही बेलमॅान्टच्या लायब्ररीत टाईम, न्युयॅार्क संडे मॅगझिन, रिडर्स डायजेस्ट,न्यूयॅार्कर वाचताना वही बॅालपेन असलेली पिशवी जवळच्या टेबलावर ठेवलेली असते!

मध्यंतरी धाकट्या मुलाने दिलेले बेंजॅमिन फ्रॅन्कलिनचे, आयझॅकसनने लिहिले चरित्र आले तर एकदा त्यानेच दिलेले लॅारा हिल्डनबर्डचे Unbroken भेटीला आले. माझ्या दोन्ही नातवांच्या शेल्फातील चाळलेले The Catcher in the Rye आणि Of the Mice and Man ही पुस्तके हातात आल्यावर त्यांची ती विशेष खोली, तिथली,त्यांच्या पुस्तकांनी भरलेली शेल्फंही दिसली. इकडे अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा मुलाने आणून दिलेले Ian Randची सर्वकालीन श्रेष्ठ कादंबरी Fountain Head काही दिवसांपूर्वी दिसले ! आणि त्याच लेखिकेचे Anthem ही ! धाकट्याने दिलेले Confidence Men सुद्धा मध्यंतरी अचानक भेटून गेले.

मुलीचे आवडते Little Women हे अभिजात वाड•मयाचे पुस्तक आणि तिला आवडलेले व नातीने मला दिलेले Anne of Green Gables ही दोन्ही पुस्तके इतक्या विविध, सुंदर आवृत्यांतून येत असतात की लग्नसमारंभाला नटून थटून जाणाऱ्या सुंदर स्त्रियांचा घोळकाच जमलाय! हाच सन्मान शेक्सपिअर , चार्ल्स डिकन्स,शेरलॅाक होम्स आणि लिटल प्रिन्स , हॅरी पॅाटरला, आणि ॲगाथा ख्रिस्तीलाही मिळत असतो. उदाहरणादाखल म्हणून सन्मानीयांची ही मोजकीच नावे सांगितली.

लहान मुलांच्या पुस्तकांनाही देखण्या, जरतारी आवृत्यांतून असेच गौरवले जाते. त्यापैकी काही ठळक नावे सांगायची तर C.S. Lewis ह्यांचे प्रख्यात Chronicles of Narnia , Signature Classics of C.S. Lewis. तसेच E.B. White ची Charlottes Web , Stuart Little ही पुस्तके, Alice in Wonderland, Sleeping Beauty , The Beauty and The Beast, ह्या पुस्तकांनाही असाच मान मिळतो.

अगदी अलिकडच्या योगायोगाची कहाणी; मी पूर्वी वाचलेले Dr. Andrew Weil चे पुस्तक अचानक प्रकट झाले. अरे वा म्हणालो. पुन्हा परवा त्याच डॅाक्टरांचे Natural Health Natural Medicine हे पुस्तक दिसले. म्हटलं आता मात्र हे मुलांना कळवायलाच पाहिजे.

मघाशी मी वेगवेगळ्या रुपातील आवृत्यांतून येणाऱ्या पुस्तकांच्या यादीतील आणखी एका मानकऱ्याचे नाव सांगायचे राहिले. ते म्हणजे Hermann Hess चे Siddhartha ! हे सुद्धा सार्वकालीन लोकप्रिय पुस्तक आहे. मागच्याच वर्षी मला हे मुलाने दिले होते. मी वाचले. छान लिहिलेय. आपल्या तत्वज्ञानासंबंधी व तत्वज्ञाविषयी लिहिलेले, तेही परदेशी लेखकाने ह्याचे एक विशेष अप्रूप असते. ह्याने बरेच समजून उमजून लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी, मुलांनी वाचलेले व मला,” बाबा हे वाचा तुम्हालाही समजेल,आवडेल असे पुस्तक आहे “ म्हणत दिलेले Homosepiens हे गाजलेले पुस्तक परवाच दोन तीन वेळा शेकहॅन्ड करून गेले. माझ्याकडे असलेली लायब्ररीविषयी, लायब्ररी हेच मुख्य पात्र असलेली The Library Book किंवा Troublewater Creeks Book-woman अशी पुस्तके पाहिली की लायब्ररीत लायब्रऱ्या आल्या असे वाटू लागते !

काही वेळा मी ह्या ना त्या पुस्तकांचा “ परवा हे आले होते आणि ते सुद्धा, बरं का!” असे मुलांना सांगतो. पण माझ्या आवडीच्या जेम्स हेरियटचे एकही पुस्तक आतापर्यंत तरी ह्या गराड्यात आलेले, थांबलेले पाहिले नाही! येईल, योग असेल तेव्हा ती चारीही पुस्तके येतील. !

पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गराड्यांत , किंवा प्रसिद्धीच्या सतत झोतांत असलेल्या लोकप्रिय नामवंतांना आपल्या चहात्यांची गर्दी,गराडा हवा हवासा वाटतो. पुस्तकप्रिय वाचकांनाही पुस्तकांच्या गर्दीगडबडीचा गराडाही हवा हवासा वाटत असतो ! नाहीतर आजही लायब्ररीत इतके वाचक-लोक आले असते का?

हद्दपार ते नोबेल विजेता -१

मॅरिएटा

“ महाराज, आरोपीने काही वर्षे मजुरीची कामे केली म्हणजे काही विशेष केले असे अजिबात नाही.ते सामाजिक कर्तव्य आहे. पण तो कविताही करतो. कविता करणे हे समाजासाठी अजिबात महत्वाचे नाही. त्याच्या कविता अश्लील,बीभत्स असतात असाही आरोप लेनिनग्राडच्या मुख्य वर्तमानपत्राने केला आहे. ह्याचा अर्थ त्या समाजाला घातकच होत. आरोपी हा समाजावर आलेले एक बांडगुळ आहे. समाजालाच त्याला पोसावे लागते. हा परोपजीवी आरोपी समाजाला भार झाला आहे. तरी त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी असे जनतेच्या सरकारला वाटते.”

सरकारी वकीलाचे हे आरोप ऐकल्यावर ‘जनतेच्या न्यायाधीशांनी’ आरोपीला विचारले, “ तुला कवि म्हणून कुणी मान्यता दिली ? तुझी कवींमध्ये गणना कुणी केली ?”“
त्यावर तिशीतल्या तरूण आरोपीने निर्भयपणे न्यायाधीशांना, सांगितले,” कोणीही नाही.” नंतर त्याने न्यायाधीशांकडे पाहात सरकारलाच विचारले,” माझी मानव वंशात कुणी गणना केली? मी माणूस आहे अशी तरी नोंद कुणी केली आहे?मला माणूस म्हणून तरी मान्यता कुणी दिली ?”

कवि जोसेफ ब्रॅाडस्कीचे ही उत्तरे ऐकल्यावर सरकारी वकील आणि न्यायाधीश स्तब्ध झाले. पण ठोठवायची म्हणजे ठोठवायचीच ह्या न्यायाने न्यायमूर्तींनी ब्रॅाडस्कीला पाच वर्षे आर्क्टिक प्रदेशातील एका मजुरांच्या छावणीत काम करण्याची शिक्षा सुनावली.

ही घटना १९६४ सालची. कवि,साहित्यिक, जोसेफ ब्रॅडस्कीला इतकी कठोर शिक्षा झाल्याचे समजल्यावर त्या काळातली रशियातली श्रेष्ठ कवियत्री ॲना ॲव्खमातोव्हाने व इतर कवी आणि साहित्यिकांनी सरकारला एक पत्र लिहिले आणि जोसेफच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली. जोसेफची शिक्षा माफ करावी अशी विनंती केली. युरोपमधील बऱ्याच प्रख्यात कवि आणि साहित्यिकांनीही जोसेफ ब्रॅाडस्कीवर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला. त्यामध्ये प्रख्यात कवि डब्ल्यु. एच. ॲाडेनचा मोठा पुढाकार होता.

ह्या घडामोडी पाहिल्यावर प्रश्न चिघळू नये म्हणून रशियन सरकारने जोसेंफ ब्रॅाडस्कीची अठरा महिन्या नंतर सुटका केली.
ह्या अठरा महिन्याच्या काळात सक्तीच्या मजुरीची कष्टाची कामे करावी लागली. पण ज्या पत्र्याच्या खोलीत भाडे देऊन राहात होता तिथे सांडपाण्याची सोय नव्हती. पाणी जायला गटारे होती . पण ती कायमची तुंबलेली होती. एकच मोठी चैन होती. ती म्हणज संडासासाठी एक आडोसा होता !

ब्रॅाडस्कीचा जन्म १९४० साली लेनिनग्राद (सेंट पिटसबर्ग) येथे झाला. तो दोन वर्षाचा असताना हिटलरने लेनिनग्राडला ९०० दिवस वेढा घातला होता. असंख्य लोक मारले गेले. उपासमारी, रोगराईने किती मेले त्याचा पत्ता नाही. ह्या संकटातूनही ब्रॅाडस्कीचे आईवडील व तो स्वतः बचावले. पण त्याचा काका मात्र मृत्युमुखी पडला.

ब्रॅाडस्कीचे आयुष्य गरीबीत गेले. त्याच्या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे सरकारी मदतीने उभ्या राहिलेल्या इमारतीत राहात होती. ती मोठी संपूर्ण गल्ली अशा सामुहिकरीत्या राहणाऱ्या कुटंबांची गर्दी असलेल्या इमारतींनींच भरलेली होती. एका मोठ्या खोलीत तीन चार कुटुंबे राहात असत. पडदे, उंच कपाटे ह्याच मधल्या भिंती ! सहा सात कुटुंबाना एकच स्वैपाक घर, एकच न्हाणीघर व संडास ! आपल्याला निश्चितच मोठ्या अडचणीची व अवघडलेल्या मनःस्थितीत राहण्याची गैरसोय वाटेल अशी गोष्ट म्हणजे इतक्या कुटुंबाना मिळून एकच स्वैपाक घर! त्यातल्या त्यात सामायिक संडास म्हणजे फार मोठी अडचण गैरसोय वाटणार नाही. पण पाश्चात्य देशातील मध्यम, कनिष्ठ मध्यमवर्गीयांना अशा गोष्टी हालाखीच्या आणि मोठ्या गैरसोयी वाटत असतात.

प्रत्येक कुटुंबाला महिन्यातील एक आठवडा सामायिक स्वैपाकघर, न्हाणीघर आणि संडास स्वच्छ करावा लागत असे. तिकडे जाण्याची सामायिक मार्गिकाही घासून पुसून स्वच्छ करणे भाग असे. तो म्हणतो,” आमची पाळी असली की एक दिवस आधी आई, आमच्याकडे बघून पण स्वतःशी बोलल्यासारखे म्हणायची , “सर्व स्वच्छ करण्याची पाळी आपली आहे. कोण करणार आहे?” इतके म्हणत ती दुसऱ्या कामाला लागत असे. तिला माहित असे की हे काम तिलाच करावे लागणार !

१९७२ पर्यंत अशा मोहल्यात ब्रॅाडस्कीचे बाळपण व तरुणपणाची वर्षे गेली. ह्या घरात ब्रॅाडस्की राहिला, वाढला. कविताही लिहित होता.

ब्रॅाडस्की अशा तरुण वयात होता की घरात सोयी गैरसोयी होत्या नव्हत्या ह्याचे त्याला विशेष महत्व नसेल पण स्वतःसाठी लहानशी का होईना वेगळी खोली नाही ही त्याची मोठी अडचण होती. उंच कपाटे, पुस्तके,वस्तूंनी भरलेली शेल्फ ह्यांचा आडोसा असलेला एक कोपरा त्याचा होता!
तो सांगतो,” मला आणि माझ्या वयाच्या अनेकांच्या मनातील ही दुखरी जागा होती. मैत्रीणीला घरी आणणेही जमत नसे. मग प्रेम कसले साजरे करतो मी! त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण Marina Basmanova बाहेर फिरायला जात असू. आम्हा प्रेमिकांचे चालणे, विहरणे, किती मैल झाले असेल ते मोजता येणार नाही. काही शतक, किंवा हजारो मैल आम्ही आमच्या प्रितीच्या धुंदीत चाललो असू ! ही सारी त्या सामायिक खोलीतल्या एका कोपऱ्याची मेहरबानी!”

हद्दपार झाला तेव्हा ब्रॅडस्कीला आपली प्रेयसी मरिनाला व तिच्यापासून झालेल्या पाच वर्षाच्या लहानग्या मुलाला लेनिनग्रादलाच सोडून यावे लागले. त्या दोघांच्या सुरक्षिततेसाठी मरिनाचे आडनावच मुलालाही लावावे लागले.

वयाच्या पंधराव्या वर्षी जोसेफ ब्रॅाडस्कीने शाळा सोडून दिली. मोल मजुरीची, मिळेल ती कामे करू लागला. कधी प्रेतागारात काम केले. प्रेते फाडायची. नंतर ती शिवायची. काही काळ त्याने कारखान्यांत कामगार तर काही काळ रसायनांचे पृथ:करण करणाऱ्या लॅबोरेटरीत. पण जास्त काळ तो धरणे-बंधारे, कालव्यांची कामे व त्यांचे बांधकाम आणि देखभाल करणाऱ्या भूशास्त्र इंजिनियराच्या — बांधकाम करणारे तज्ञ इंजिनिअर्स —हाताखाली, मदतनीस,हरकाम्या म्हणूनही काम करीत होता. लहान मोठी धरणे, त्यांची मजबुतीची तपासणी, कालव्यांच्या भिंतीच्या दुरुस्ती ह्या कामात तो रंगला असावा. ह्या कामामुळे त्याला रशियातील निरनिराळे प्रदेश पाहायला मिळाले. आता पर्यंत करीत असलेल्या कामामुळे त्याला, त्याच्याच शब्दांत “ खरे आयुष्य,खरे जगणे काय असते त्याची जाणीव झाली. कित्येक लोकांना जवळून पाहता आले. त्यांच्या सारखेच राहण्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांचे प्रपंच कसे चालतात त्ह्या आश्चर्याचे याचे वास्तवच समोर दिसले.” इथे आपल्याला मॅक्झिम गॅार्कीची आठवण येते. तोही असाच बिन भिंतींच्या उघड्या विश्वविद्यालयात मिळेल ते काम, शारिरीक कष्टाची कामे करून शिकला.

पण अशी कामे करीत असतांना तो कविता करू लागला होता. ब्रॅाडस्कीने १८ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली. ‘समाजाला लागलेले परजीवी बांडगुळ’ अशा आरोपावरून मजुरांच्या छावणीत सक्त मजुरी करण्यास धाडले तेव्हाही तो कविता करत होता.

ब्रॅाडस्कीला कवि म्हणून मान्यता व प्रसिद्धि मिळाली त्यामागे त्या काळची प्रख्यात कवयित्री ॲना ॲख्मातोहा Anna Akhmatova आहे. तिला त्याच्या काव्यातला ’जिवंतपणा’, ‘धग’, आणि वेगळेपण जाणवले. तुमच्या मते सध्या कवि म्हणून ज्याचे नाव घेता येईल असा कोण आहे ? असे विचारल्यावर, तिने सर्व प्रथम जोसेफ ब्रॅाड्स्कीचे नाव घेतले.

ब्रॅाडस्कीला साहित्य,वाड•मयाचे अतिशय प्रेम होते. त्यातही कवितेवर सर्वात जास्त. शेवटपर्यंत कविता त्याचे ‘पहिले प्रेम’ होते. तो सांगतो, “ प्रेमाला पर्याय असलाच तर तो एकच आहे – कविता !”

जन्मला,जगला,मेला’ ह्या शब्दांतून कोणाच्याही आयुष्याचे वर्णन होऊ शकत नाही. कवितेविषयीही ब्रॅाडस्की असेच काहीसे म्हणतो. “माणूस त्याच्या निधनाची बातमी व्हावी म्हणून जसा जगत नाही तशीच चार सुंदर शब्द सुचले म्हणून
कविता होत नाही.” जेव्हा आयुष्य, जगणे हे अगदी जवळून, आतून अनुभवाला येऊ लागते तेव्हा कविता होऊ लागते. ती
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होते.“ जुलमी राजवटीत पोलिसांच्या भीतीखाली, सतत दडपणाखाली जगणारी माणसे
अखेर अशा अवस्थेला पोचतात की “ आम्हाला सुख नको, फक्त यातना कमी होऊ देत” इतकेच ते मागत असतात.
ब्रॅाडस्की ज्या परिस्थितीत राहिला वाढला त्यातलेच हे त्याचे स्वानुभवावर आधारित बोल आहेत.

ब्रॅाडस्की श्रेष्ठ कवि होताच, तसाच उत्तम भाषांतरकारही होता. कारण त्याने पोलिश आणि इंग्लिश भाषांत प्राविण्य मिळवले होते. त्याने पोलिश कवींच्या कविता लेख भाषांतरीत केल्या. त्याच्या स्वत:च्या कवितांचे फ्रेंच,जर्मन, इटालियन, स्पॅनिश इंग्रजी व इतर काही भाषांतून, एकूण दहा भाषांत भाषांतर झाले आहे. त्याच्या रशियन कवितांचे दर्जेदार इंग्रजी कवींनी भाषांतर करून संग्रह प्रसिद्ध केले. त्यामुळे तो आणखी ख्यात झाला. कविता तो त्याच्या रशियन भाषेतच करीत असे. निबंध, लेख मात्र इंग्रजीत लिहित असे.

ब्रॅाडस्कीला १९७२ मध्ये रशियातून हद्दपार केले. राजकीय कारणांमुळे त्याला हद्दपार केले नव्हते. तो राजकीय विरोधक नव्हता.पण त्याची स्वतंत्र वृत्ती, व्यक्ति स्वातंत्र्याविषयीची मते ही स्टालिनआणि स्टालिन नंतरच्या सत्ताधीशांनाही मानवणारी नव्हती. कविता लेख भाषणे ह्यातून आपल्या विरुद्ध जनमत तयार होईल ही सगळ्या हुकुमशहांना कायमची धास्ती असते. हुकुमशहा शब्दांना फार घाबरत असतात. मग ते लिखित असोत, छापील असोत. भाषणातील असोत की कवितेतील, गाण्यांतील असोत ! म्हणूनच “कवि,कविता करणे म्हणजे समाजासाठी काही उपयुक्त,मदत करणारा मार्ग, काम नाही. समाजालाच त्याला पोसावे लागते.तो समाजाचे शोषण करत असतो. म्हणजेच तो बांडगुळ आहे.” अशा ठरवून रचलेल्या विचारसरणीमुळे सत्ताधीशांनी त्याला हद्दपार केले.

तो प्रथम पोलंडमध्ये आला. मूळचा ब्रिटिश पण नंतर अमेरिकेत राहिलेला प्रख्यात कवि डब्ल्यू. एच ॲाडेनकडे तो राहिला. त्याच्या मदतीने तो अमेरिकेत आला. आणि पाच वर्षानंतर अमेरिकन नागरिक झाला.मधली पाच वर्षे तो हद्दपार ह्या अवस्थेतच होता.ना रशियाचा नागरिक ना कुठल्या एका देशाचा; हद्द्पार ! कोणत्याही देशाना आपला न मानलेला हद्दपार !

तो म्हणतो, “ वाड•मय, पुस्तकांनी माझे आयुष्य बदलले. साहित्याने माझ्यात मोठा बदल घडवून आणला. आयुष्य घडवणाऱ्या काळात, खास करून दोस्तोयव्हस्कीच्या Notes from Underground ह्या पुस्तकाचा त्याच्यावर प्रभाव होता.

“ कविता आपल्याला काळाच्या तडाख्याला तोंड देण्यास समर्थ करते.” असे सांगून तो पुढे जे म्हणतो ते विशेषतः जुलमी, हुकुमशाही राजवटीत राहाणाऱ्या लोकांना लागू पडते. तोही अशाच राजवटीत राहात होता.तो पुढे सांगतो,” भाषा, शब्द कविता फक्त रोजच्या आयुष्यातील ताणतणाव सोसण्याची जबर इच्छाशक्ती, बळ देते असे नव्हे तर अस्तित्वावर येणाऱ्या दबावातही जगण्याचा, मुक्त होण्याचा मार्ग दाखवते.”

ब्रॅाडस्कीला लहानपणापासून लेनिनविषयी राग होता. राग लेनिनच्या राजकीय विचारसरणीमुळे नव्हता . कारण ते समजण्याचे त्याचे वयही नव्हते. पण “ लेनिनच्या सर्वत्र दिसणाऱ्या, असणाऱ्या,पराकोटीच्या ‘अति अस्तित्वाचा’ राग होता. लेनिनग्राद मध्ये अशी एकही जागा,ठिकाण, कोपरा,रस्ता, रेस्टॅारंट, इमारत नव्हती की जिथे लेनिनचे प्रचंड चित्र, पुतळा, फोटो नाही. वर्तमानपत्राच्या पहिल्यापानापासून लेनिनचे फोटो, पोस्टात,पोस्टाच्या लहानशा तिकिटावरही लेनिन, बॅंका शाळा,कोणत्याही छापील कागदावर लेनिन, लेनिन लेनिन इथे तिथे लेनिनला पाहून पाहून, सतत डोळ्यांत घुसणाऱ्या वीट आला. डोळे बिघडून आंधळा होईन असे वाटू लागले.” असे तो म्हणतो.

साहित्यातील कवितेवर त्याचे जीवापाड प्रेम होते. कवितेचा गौरव करताना तो म्हणतो,” भाषेची सर्वोच्च प्रगल्भता, परिपूर्णता आणि परिपक्वता कविता आहे!”
जे एकाकी आहेत, कोणत्या तरी भीतीच्या दडपणाखाली आहेत, अस्वस्थ आहेत त्यांनी कविता वाचल्या पाहिजेत अशी आग्रहाची शिफारस करतो. त्यामुळे त्यांना समजेल की इतरही अनेक असे जगताहेत. पण तसले जीवनही ते एक उत्सव साजरा होतोय ह्या भावनेने जगत आहेत. कविता अशी जाणीव करून देते.

अमेरिकेत ब्रॅाडस्की हा मिशिगन युनिव्हर्सिटीत, Queens College, Smith College , Mount Holyoke College मध्ये वाड•मयविषयाचा प्राध्यापक होता. तो उत्तम शिक्षक होता. इंग्लंडमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीत अतिथी प्राध्यापक होता.त्याला अनेक विद्यापीठांनी डॅाक्टरेट पदवी दिली आहे. त्यापैकी इंग्लंड मधील ॲाक्सफर्ड आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा Yale विद्यापीठांचा समावेश आहे.

तो फर्डा वक्ता, आपल्या बोलण्याने खिळवून ठेवणारा संभाषणपटू होता. चर्चा असो अथवा आपल्या मित्रांच्या गप्पागोष्टींनाही तो आपल्या संभाषणाने व विचारांनी निराळ्याच उंचीवर नेत असे.

विद्यापीठात, महाविद्यालयात शिकवताना सांगायचा की कविता मोठ्याने वाचा,म्हणा. त्यामुळे अर्थ समजण्यास जास्त सोपे जाईल. कविता पाठ होतील. ह्यामागे रशियातील शाळेत पाठांतराला महत्व होते. आपल्याकडेही परीक्षा पास होण्यासाठी पाठांतरावर भर द्यावा लागतो !

कवितेच्या आवडीपोटी त्याने एक योजना सुचवली. लोकांना कविता वाचायची सवय व्हावी; त्या आवडाव्यात ह्यासाठी निवडक कवितांच्या छोट्या पुस्तिका काढाव्यात. त्या फुकट द्याव्यात. शाळा महाविद्यलये, वाचनालयात , निवडक सार्वजनिक ठिकाणी ठेवाव्यात. सरकारने ही कल्पना काही काळ उचलून धरली. अंमलातही आणली. थोडक्या काळासाठी ही योजना असावी. पण काही तरी अनुकुल परिणाम झाला असणार.

ब्रॅाडस्की हा आपल्या कविता तशाच इतरही कवींच्या कवितांचे वाचन करीत असे. ते इतके प्रभावी होत असे की रशियन भाषा न समजणारे श्रोतेही मंत्रमुग्ध होऊन ऐकत. त्याची आदर्श व त्याला पुढे आणणाऱ्या ॲना माख्वाटोव्हा आणि रशियन Gulag मध्ये शिक्षा भोगत तिथे उपासमार आणि थंडीमुळे १९३८ साली मृत्यु पावलेल्ला त्याचा Hero मॅन्डलस्टॅम (Mandelstam) ह्यांच्या कविता फार मनापासून,अत्यंत परिणामकारक रीतीने वाचन करीत असे. अमेरिकेतील पहिल्या दोन वर्षांत त्याने ६० वेळा कविता वाचन केले !

रशियातून हद्दपार झालेल्या प्रतिभावान, बुद्धिमान, कवि, निबंधकार व लेखक आणि उत्कृष्ठ शिक्षक जोसेफ ब्रॅाडस्कीला अमेरिकेतील साहित्य जगतातील बहुतेक सर्व सन्मान मिळाले. तो १९९१ सालचा ‘अमेरिकेचा राजकवी’ ही होता.

ह्या सन्मानानंतर त्याला साहित्यातील सर्वोच्च सन्मानही मिळणार होता……

एकापेक्षा एक! एकातून अनेक!

रेडवुड सिटी

यु-ट्युबवर बरेच वेळा मी स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहात असतो. किती पदार्थ ! नव-नविन पदार्थ, माहित असलेल्या मिठाईचेही वेगवेगळे प्रकार, नेहमीचे पदार्थही किती वेगवेगळ्या रुपात येतात! थक्क होतो.
आपल्या घरीही आपण एका कणकेचीच(गव्हाच्या पिठाची) किती रूपे पाहतो, आणि किती विविध चवींचाआनंद घेतो! कोणतेही पिठ न मिसळता केलेली मुलभूत पोळी, पुऱ्या, त्या पुऱ्यांचेही पाकातल्या पुऱ्या, पाकातले चिरोटे ह्या गोड प्रकारांच्या बरोबरच आणखीही काही प्रकार जसे पाणी पुरी, तिखट-मिठाच्या पुऱ्या.बरं त्या तिखट मिठाच्या चवीला जर आणखी बढती द्यायची असली तर तिंबताना त्यात थोडे आंबट ताक घालायचे! बढतीच्या मजेबरोबर स्वादाचा बोनसही मिळतो. मेथीच्या, थोडे जिरे घालून केलेल्या पुऱ्यांचा झणकारा औरच. तशा नको असतील तर ताज्या मेथीच्या किंवा पालकाच्या पुऱ्याही मजा आणतात. ह्या पुऱ्यांना तसेच साध्या पुऱ्यांनाही वाळकाची कोशिंबीर किंवा नेहमीची कांदा-टोमॅटोच्या कोशिंबिरीची साथ असेल तर जवाब नाही.’टाॅप टेन’ गाणीही त्यापुढे बेसूर वाटतात. इतकेच काय साध्या पुऱ्यांबरोबर बटाट्याची भाजी नसेल तर त्यांना पुऱ्या म्हणत नाहीत! आणि त्यातच बरोबरीने श्रीखंड किंवा तुपाने थबथलेला,वेलदोडे खिसमिस तर असणारच, पण भरीला तुपात तळलेल्या पिकल्या केळ्यांच्या चकत्याही असलेला शिरा असेल तर मग ती जेवणाच्या वर्ल्ड कपची फायनलच! प्रत्येक घास त्या जल्लोषातच खाल्ला जातो!


पुरी-भाजी वरून आठवण झाली. बहुतेक सगळ्याच हाॅटेलात पुरीभाजी मिळत असे.पण शारदा स्टोअरवरून बक्षी ब्रदर्स कडे जाताना वाटेत टांगा स्टॅंडसमोरच तुषार हाॅटेल होते. रस्यावरच प्रवेशदार होते; त्यातून जरा आत जावे लागे. तिथे मिळणारी पुरीभाजी सालंकृत असे. मोठी प्लेट.फिकट गुलाबी- बदामी रंगाच्या फुगलेल्या पुऱ्या. बटाट्याची भाजी. भाजी बटाट्याची का,हा अडाणी प्रश्न विचारू नका. पुऱ्यांबरोबरची भाजी ही बटाट्याचीच असते हे समस्त बटाट्यांनाही माहित आहे. डाव्या बाजूला लालपिवळ्या तेलाचा किंचित ओघळ असलेले कैरीचे लालभडक लोणचे आणि वाळकाची कोशिंबिर.आणखी काय पाहिजे!


कणकेचा एक अवलिया अवतार म्हणजे आमटीतली फळं! तुपाची धार घालून ओरपून, मिटक्या मारून खाल्यानंतर पातेल्यात आमटी शिल्लक आहे की फळं हे शेरलाॅक होम्सच्या बापालाही न उलगडणारे रहस्य कायम राहते! “हेल्दि ”राहण्यासाठी फळं खा न खा पण ही फळं खाताना आणि खाल्ल्यावर साक्षात अमृताचे फळ जरी कुणी पुढे ठेवले तरी त्याकडे कुणी ढुंकुनही पाहणार नाही!

कणकेच्या पोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे दुधात तिंबून केलेल्या दशम्या; बहुधा ही दशमी रात्री केली जाते.घरातील वडील वयस्कर मंडळी ह्या दशम्यांचे खास गिऱ्हाईक.खरे फॅन! पण आपणही जेव्हा त्या खातो त्यावेळी दशम्यांच्या सात्विक चवीमुळे होणाऱ्या आनंदात आदरही मिसळलेला असतो!
थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी झाऱ्यावरच्या पोपया किंवा गाखर, दामट्या खाल्या नाहीत तर आपण लहान होतो की नव्हतो अशी रास्त शंका येते. थेट शेगडीवरच्या निखाऱ्यांवरच त्या गाखर/पोपई-दामट्या ठेवलेल्या झाऱ्याकडे पाहात,”झाली? झाली? “ विचारत, चांगली भाजल्याची तीन चार गालबोटं लागलेली ती पोपयी झाऱा आपटून ताटलीत पडली की जीव भांड्यात पडायचा.भराभ्भर व्हायच्या की पटापट ताटलीत पडायच्या. तुपाचा ठिपका टाकून फिरवला की ती पोपयी खुसखुशीत लागायची. तूप नसले तरी लोणच्याच्या खाराचे गंधही तिला तितकेच चविष्ट करायचे!


रविवारची दुपारची किंवा एखाद्या रात्रीची आमची जेवणं संपत आलेलीअसतात. आणि एक चमत्कार घडतो. परातीतले,पोळ्यांना लावण्याचे उरलेले पीठ किंवा भाकरीचे पिठ आणि तिथेच थोडीफार राहिलेल्या कणकेची नक्षीही त्यात कधी मिसळली गेली आणि हिंग मीठ कधी पडले हे समजायच्या आत पातळ केलेले ते लच्छीदार पीठ तव्यावर ओतले गेलेही! हे फक्त मोठ्याने चर्रर्र आवाज यायचा तेव्हा समजायचे! मग आता कोण हात धुवायला उठतो हो? आता तो तवा लोखंडी-तवा राहिलेला नसतो तर त्या ओतलेल्या पीठाचे ‘धिरडे’ नावाचे सोने करणारा परिस झाला असतो! हे फक्त त्या आयत्या वेळच्या धिरड्याचा रुपाया येवढा का होईना ज्याने गरम गरम घास खाल्लाय त्यालाच माहित असते.
बरं गव्हाच्या पीठाचे हे प्रकरण इथेच थांबत नाही गव्हाचाच, पिठा ऐवजी रवा मैदा झाला की त्यांचीही किती रूपे चाखायला मिळतात. शिरा,गुळाचा सांजा, रव्याचे लाडू, वड्या,उपमा, उप्पीट हे झाले आपले नेहमीचे. त्यांच्या गोडाच्या आवृत्याही असंख्य! गोड पोळ्यांचेही, पुरणपोळी, गुळाची पोळी, गुळाच्या सांज्याची किंवाशिऱ्याची पोळी,उसाच्या रसाची पोळी! अबब किती ते प्रकार! शंकरपाळ्यांचे प्रकार सांगायचे राहिलेच. गव्हाची खीर(हुग्गी)आणि त्याच कणकेचे लाडू कोण विसरेल?

स्वल्पविरामासारख्या गव्हले/ गव्हल्या,सहाणेवर झर्रकन वळवून केलेल्या प्रश्नचिन्हासारख्या मालत्या,तर दोन डब्यांवर ठेवलेल्या आडव्या काठीवर वाळत घातलेला दीर्घायुषी शेवयांचा संभार,तसेच टिकली येव्हढ्या पोह्यासारख्या नकुल्या,हे कसबी कलाकार सणासुदीच्या पंगतीना रंगत तर आणतातच पण लग्ना-मुंजीत हे रुखवत सजवून ते करणाऱ्यांच्या कौतुकांतही भर घालतात.

एका गव्हाच्या पीठाच्या पदार्थांची ही यादी अर्धवटच आहे. ती पुरी करण्याला किती दिवस जातील हे कुणी सांगू शकत नाही.

हे झाले एका गव्हाचे रामायण. तेही पूर्ण नाहीच. त्या पिठाची मिठाईतील रूपांतरे राहिलीच आहेत अजून. गव्हासारखीच ज्वारी,बाजरी,नाचणी,तांदूळ,भगर राजगिरा अशी किती तरी धान्यं रांगेत वाट पहात उभी आहेत.बरं,हरभऱ्याची डाळ, तुर-मुग,उडीद-मसूर ह्या डाळी व कडधान्ये, शेंगादाणे ही मंडळीही ताटकळत थांबली आहेतच. इतकेच काय पापड,सांडगे,वडे थापड्या,कुरडया आणि काय आणि किती! पण नाइलाज आहे.ही कधीही पूर्ण न होणाऱ्या,अव्याहत ज्ञानकोषासारखी, न संपणारी गोष्ट आहे.पण कुठेतरी ती थांबवली पाहिजे.

अन्नपदार्थ अनंत आहेत.त्याच्या विश्वाचा पसारा त्याहून अमर्याद आहे. एका दाण्यातून जिथे शेकडो दाण्यांनी भरलेली असंख्य कणसे डोलत असतात, तिथे एकातून अनेक हे फक्त ‘एकोSहं बहुस्याम’ अशी इच्छा झालेल्या परब्रम्हालाच लागू नाही; तर आमच्या रोजच्या आयुष्यातील,जेवणातल्या अन्नपदार्थांना ते जास्त लागू आहे. म्हणूनच न दिसणाऱ्या परब्रम्हापेक्षा आम्हाला आमचे रोजचे आयुष्य प्रसन्न आणि रंगीबेरंगी करणारे स्वादिष्ट-चविष्ट, खमंग-चटकदार,गोड,मधुर आणि तृप्त करणारे ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’च पुरे आहे. ते आमचे आहे.

मधुमालतीचा रोमॅंटिक वेल

चुनाभट्टी/शीव

आताच बाहेर फिरून आलो. लो. टिळक हाॅस्पिटलपर्यंत गेलो होतो. परतताना वाटेत मधुमालतीच्या फुलांचा वेल एका सोसायटीच्या भिंतीवर किंचित पसरलेला दिसला. तरूणीच्या केसांच्या बटा चेहऱ्यावरून महिरपीने उतरतात तशा त्याच्या नाजूक फांद्या भिंतीवरून कलंडून बाहेर आल्या होत्या. पहिल्या प्रथमच पाहात होतो इथे हा वेल. किंवा तो नाजूक पांढऱ्या व गुलाबी फुलांनी नुकताच फुलत असल्यामुळेही लक्ष गेले असेल.

फुले फार छान दिसतात. थोडी मोठी झाल्यावर त्यांचापांढरा व गुलाबी रंग फार सुरेख दिसतो.,सुरवातीला हया दोन्ही रंगाची फुले वेगवेगळी असतात. पण त्यांचे घोस होऊ लागले की ती एकामेकांना अगदी खेटून असतात. संपूर्ण वेल फुलांनी बहरून जातो.

आमच्या हरिभाई शाळेचे मोठे पोर्च्र त्यावरील गच्चीवरून येणाऱ्या मधुमालतीच्या बहरलेल्या वेलांनी सुशोभित होत असे. डफरीन चौकातल्या गुंजोटीकरांच्या बंगल्याच्या फाटकाच्या कमानीवर तसेच पूर्वी किल्ल्यासमोरील चव्हाणांच्या दोन्ही आवळ्या जावळ्या सुंदर बंगल्यांच्या वरच्या मजल्यावरील व्हऱ्यांड्याच्या फिकट पोपटी कमानीवरही हे फुलांनी बहरलेले वेल असायचे. आमच्या काकूंच्या बंगल्यातही काही काळ होते नंतर पुन्हा शोभानेही फाटकांच्या खांबावर येतील असे वाढवले होते.

मधुमालती हे नावही त्या नावाच्या तरुणीं इतकेच संदर व, काव्यमय आहे. म्हणूनही तो वेल,ती फुले पाहणाऱ्याला मोहित करून टाकत असावीत! फुलाच्या मधुमालती या जोडनावात अनेकांना रेमियो ज्युलिएट. लैला मजनू, शिरीन् फरहाद, हीर रांझा, उषा अनिरुद्ध या अजरामर प्रणयी जोडप्यांच्या अमर प्रितीचा सुगंधही जाणवत असेल. कारणे काहीही असोत आधी म्हटल्याप्रमाणे मधुमालतीची नाजूक सुंदर आणि हळुवार सुगंधी फुले कुणाला मोहित करणार नाहीत?

साठवण वर्षाची

चुनाभट्टी /शीव

आजकाल कोणी वर्षभरासाठीच्या कोणत्याच वस्तु करीत नाहीत किंवा धान्यही भरून ठेवत नाहीत.एप्रिल लागणार म्हटले किंवा पाडवा झाल्यावर वर्षाचा गहू, ज्वारी आणण्यासाठी मोंढ्यात जाऊन गव्हाच्या राशींच्या टेकड्यामघून वाट काढत, मी ढिगाऱ्यात हात घालून गहू पारखण्याचा अभिनय करायचो.कुणाला समजतय की हा बन्सी, तो सरबती, हा बुटका तो जोड गहू ! व्यापारी सांगतील ती नावे मीही घोकायचो. आज त्यांची नावे सिहोर, लोकवन, गुजरात लोकवन अशी झाली आहेत. तांदळालाही एचएमटी,इंद्रायणी सुरती कोलम, बासमती नावाने ओळखतात. आंबेमोहोर,सोन्याची तार,जिरेसाळ ही नावे फारशी घेतली जात नाहीत. नाशकात अजून कमोद, काळा कमोद मिळत असेल.किंवा अकोल्याला काली मूंछ तांदूळ मिळतही असेल. तुरीची डाळ घ्यायची तर बार्शीचीच व तीही हरिण छाप अशी ख्याती होती. आता तिची जागा प्रेसिडेंट,प्रेसिडेंट गोल्डने घेतली आहे.

प्रपंचाच्या प्रगतीप्रमाणे गव्हाची एक पोते, दोन पोती होत. गव्हा-ज्वारीची शंभर किलोची असत- , तांदळाची पन्नास किलोची! ते दिवस सर्व काही देशस्थी प्रमाणाचे होते! ती पोती हातगाडीवर टाकून तो हमाल मोंढ्यापासून ढकलत ओढत घरी आणायचा. बरं,अंतर काही थोडे थोडके नसायचे. मी स्कूटरवर बसून काही अंतर त्याच्या बरोबर पुढे-मागे करत यायचो.पण असं किती वेळ करणार मी? त्याला पुन्हा पत्ता देऊन पुढे घरी यायचो. तो म्हणण्यापेक्षा, ती पोती घरी येईपर्यंत आमची मध्यम वर्गीय बत्तीस-चौतीस इंची छाती सारखी धडधडत असायची. पाठीवर ती वजनदार पोती पेलून दोन जिने चढत चढत घामेघुम झालेला तो हातगाडीवाला घरात आणून व्यवस्थित ठेवायचा.
त्या अगोदर मार्चमध्ये तुरीची डाळ घेऊन झालेली असे. तांदुळ नेहमी जुनाच घ्यायचा असे काही संकेत पाळले जात होते.

उन्हाळ्यातच तांबड्या मिरच्या येत.अहो त्या तांबड्याचेही किती छटा आणि प्रकार! बरं मिरची ती मिरची असे म्हणून चालत नसे. आपला अडाणीपण दाखवणेच झाले की ते. काही चपट्या, काही भरल्या अंगाच्या, जाड पण तुकतुकीत; लालसर पण जास्त काळपटच, काही शेलाट्या अंगाच्या, काही पिवळट काटकुळ्या, काही आताच सुरकुतलेल्या पण जहाल, काही बांधेसूद, कोणी ‘लाSSल बावटेS की’, नुसते जवळून काय,दुरून पाहिले तरी ठसका आणणारी, काही जवळही येऊ न देणाऱ्या, त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनीच पहावे लागत असे. मिरच्याच्या लाल प्रदेशातून हिंडताना मी मी करणारेसुद्धा नाक डोळे पुसत मध्येच शिंकत खोकतफिरायचे. प्रत्येकाचे रुमाल बाहेर पडेपर्यंत- हृदय पिळवटणारे बाळा जो जो रे, स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी, चिमणी पाखरं,माहेरची साडी हे सिनेमे पाहून आल्यासारखे- भिजून चिंब झालेले! बरे “शोककारी दु:खकारी” होऊन पाचकिलोचे पोते घेऊन घरी आल्यावर, “अहो नुसत्या लाल म्हणजे काही मिरच्या होत नाहीत. त्या तिखट पाहिजेत. ह्या कसल्या ! मिळमिळीत तांबड्या भेंड्या आहेत.” मग त्या तसल्या किंवा ह्या तशा आणायच्या” हे ऐकायला लागायचे. आम्ही काय! संत चोखोबाच्या “ काय भुललासी वरलीया रंगा”जातीचे. त्यामुळे दिसली लाल, आणली मड्डम अशा मिरच्या आणणार! ती तिखट, झणझणीत, पातळ सालीची, व्यवस्थित भरलेली, अगदी छल्लम छ्ल्लम नको, किंचित कुरळ्या, खळ पडलेल्या गालांची, काहीशी बाकदार, नख न लावता देठ तटकन तुटणारी, अबबSS इतके छत्तीस गुण जमणारी कुठून आणणार? “आणली तीच तिखट मानून घे ”म्हणत नाक डोळे पुसत,मुसमुसत आणि जोरदार शिंक देत निघून जायचो.

जसे वर्षाचे धान्य डाळी तिखट मीठ भरणे, करणे गेले तसे ते टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला,बोरिक पावडर, पाऱ्याच्या गोळ्या ह्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या. अलिबाबाचे चाळीस चोर आरामात बसतील अशी ती पिपेही बंद पडलेल्या थेटरमधील रिकाम्या खुर्च्या प्रमाणे, रिकामी पडून आहेत. त्या पिपांवर रंगीत चादरीच्या घड्या पसरुन त्यावर वळकट्या, उशा, पांघरूणे ठेवलीत!

हे सर्व का लिहिले तर एकाने व्हाॅट्सअपवर स्वैपाकघरातील काही गोष्टींसाठी सूचनांची भली मोठी यादी पाठवली होती. त्यातील, “ वर्षाचे तिखट टिकवण्यासाठी ते बरणीत/ डब्यात भरण्यापुर्वी तळाशी हिंगाची पावडर टाका” ही युक्ति वाचल्यावर हा लेखन ‘प्रपंच’ केला.
असोSS, आक्छीSS !!

ते हृदय कसे आईचे

चुनाभट्टी/शीव

जगातील पहिली working woman आई होय. ह्या कामकरी-कष्टकरी आईचे विविध रुपात दर्शन होत असते. शेतात, निंदणी खुरपणी वेचणी कापणी करणारी, उन्हात रस्त्यावर झारीने गरम डांबर ओतणारी, पुर्वी कापड गिरण्यांतही काम करणारी, बांधकामाच्या ठिकाणी तर हमखास दिसणारी, भाजीपाला विकणारी, डोक्यावर ‘कपबशा बरण्याब्बाई’ म्हणत दुपारी फिरणारी बोहारीण आणि तशीच घरात काेणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली आपली आई ! मॅक्झिम गाॅर्कीने त्या बाईचा सन्मान The Mother ह्या कादंबरीने केला.

गेल्या १९३०-४० सालापासून कनिष्ठ मध्यम वर्गातील व मध्यम वर्गातील कमी अधिक शिकलेल्या आया घराबाहेर पडून कारखान्यात आॅफिसात काम करू लागल्या.आणि सत्तरीच्या दशकापासून तर जास्तच प्रमाणात चांगल्या शिकलेल्या बायका मुली नोकरी करु लागल्या आणि “वर्किंग वुमन”चे नाव होऊ लागले. आज बहुसंख्य आया-बाया, स्त्रिया स्वतंत्र अर्थार्जन करु लागल्यामुळेWorking Woman भोवती एक वलय निर्माण झाले आहे. आणि त्यात काही गैरही नाही. कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, दिवसभर मुलांना सांभाळण्याची त्यांची करमणुक करण्याच्या सोयी निर्माण झाल्या आहेत. त्या आवश्यकच आहेत.आणखीही सोयी होणे आवश्यकचआहे. पण अशा सोयी कामगार आया स्वत:च करत आणि आजही करताहेत. कामाच्या ठिकाणीच झाडाखाली, दोन्ही फांद्यामध्ये झोळीचाच “हॅमाॅक” करून, तर कुठे टाकीच्या सावलीत पोतं अंथरून पाळणाघर त्या आया आपल्या लेकरांसाठी आजही करतात. दोन्ही स्थानाठिकाणी, सर्वजणी आयाच आहेत ही महत्वाची समान गोष्ट आहे. आईची मायाममता सारखीच आहे. “ते हृदय कसे आईचे”हेच त्यातले खरेआहे!
जगात कशातही,कोणत्याही- सर्वांचे शेवटचे आशास्थान त्या न्यायातही- गोष्टीत समानता नाही. आहे ती फक्त ‘आई’पणात! मग ती आई घरातली असो की आॅफिसातली!

आंब्याच्या दिवसात घरोघरी आमरस होतोच. आंबे पिळून झाले की पातेल्यातली रसभरीत झालेली एक एक कोय चांगली पिळून दुसऱ्या पातेल्यात टाकली जायची. मग त्या कोयी दुधापाण्यात पुन्हा कोळून रसाच्या पातेल्यात तो रस ओतायचा. रस तयार ह्यायचा. पण त्यात एक गंमत असे. सर्व कोयी कोळल्या नसत. एक कोय अगोदरपासूनच त्या रसात असे. विचारले तर ‘शास्त्र म्हणून” ठेवायची असते असे म्हणत. जेवताना प्रत्येकजण रस मस्त”व्हडी अप्पाS”म्हणत ओरपून ओरपून तर मध्येच पोळीच्या मध्यस्थीशिवाय थेट वाटी तोंडाला लावूनच रिकामी करत असे.’आता पुरेSs’ स्थिती झाली की सर्व “मातृभक्त श्याम”,आई किंवा बहिणी पुन्हा रस वाढायला लागली तर “ नको नको आईला राहू दे की म्हणत वाटीभरून घ्यायचे! जेवणं संपून इकडे तिकडे करून झाल्यावर पुन्हा स्वैपाघरात आल्यावर आई जेवायला बसलेली असे. आणि त्या पातेल्यात रसातळाला गेलेल्या चमचा दोन चमचे रसाच्या ठिपक्यातली कोय आई कोळून तो रस वाटीत घेताना दिसायचे!
त्या कोयीचे हे शास्त्र होते तर! प्रत्येक घरातील आयांचे हेच त्या ‘रसातील कोयीचे वेदोपनिषद’ असते. निळ्या पिवळ्या प्लास्टिकने झाकलेल्या पत्र्याच्या छपरात, पत्र्याच्या किंवा सिमेटच्या पत्र्यांच्या चाळीतील घरातल्या आयांचेही ‘भाकरीच्या कोराचे’ असेल, ‘वशाट चे‘ ‘कालवणाचे ‘ चे असेल पण तेही “रसात ठेवलेल्या एका कोयीचे’च शास्त्र असते!

“दया, प्रेम आणि वात्सल्य ही क्षमेची नेहमीची तीन मंदिेरे आहेत,” असे आ. विनोबा भावे म्हणतात. दयेसंबंधी सांगायला नको. प्रेमात प्रेमिकांना एकमेकांचे दोष दिसत नाहीत. मित्र तर दोषासकट आपल्या मित्राचा स्वीकार करतो. तर वात्सल्य आपल्या मुलाचे दोष पोटात घालून त्याच्यावर निरपेक्ष मायाच माया करत असते. हे तिन्ही गुण फक्त एका आईतच एकवटले आहेत!

काॅलेजात असताना रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले एक अवतरण आठवले. “God cannot be everywhere at the same moment so he created Mother!”

(मातृदिनाच्या निमित्ताने)

कैरीची चटणी

पुणे

घ्या आता! कैरीची चटणीही पाककृति झाली! कशाला केव्हा महत्व येईल ते सांगता येत नाही. कैरीचीच का कोणतीही चटणी कुणालाही करता येते. त्यासाठी साहित्य, कृति, लागणारा वेळ, त्यातल्या वजनमापांचा पसारा आणि घोळ आणि येव्हढ्या साहित्यात किती जण खातील ( आणि ती खाल्ल्या नंतर ICU मध्येच भेटतील), हासगळा प्रपंच करायला कुणी सांगितलं होतं ह्यांना किंवा हिला? अरे, रोज कोण गावजेवण घालतंय काय इथं? आं?

सगळी कथा सांगून झाल्यावर वर पुन्हा ओलं खोबरं आवडत नसेल तर साधे म्हणजे नेहमीचे म्हणजे वाळलेले म्हणजेच सुके खोबरेही चालेल इतके खुलासेवार सांगतात. साखरे ऐवजी गूळ सुद्धा हरकत नाही. तो नसलातर खांडसरी साखर आणि तीही नसली तर खडी साखर घ्यावी. पण देवळात देतात ती डिझायईनर्स खडीसाखर नको; म्हणजेच जाड मोरस साखरे सारख्या दिसणाऱ्या, अंगठीतल्या चौकोनी खड्यासारखी दिसणारी नको तर साधारणत: मिरवणुकीत,मोर्च्यावर, किंवा मैत्रीपूर्ण लढतीत दगडफेक करण्यासाठीही वापरता येतील असे खडे गोटे असणारी खडी साखर घ्यावी. पण तो खडा एकदम दण्णकन चटणीत काय कोणत्याच पाककृतीत टाकू नये. तो घरात खलबत्ता असल्यास व तो कशाला म्हणतात ते माहित असल्यास त्या खलबत्त्यात कुटून मग घालावी. मिक्सरमधूनही फोडता येते पण साधारणत: त्यासाठी चारपाच शेजारणींचे मिक्सर अगोदरच मागून घ्यावेत. चालेल त्यांनी नाके मुरडली तरी. कारण ते चारपाच मिक्सर त्या खडासाखरेने एकदम ‘खडाSSर्डम स्टाप् ‘ करत तोडून मोडून फोडले तरी आपला मिक्सर सुरक्षित राहतो हे न विसरता त्यांच्या नाक मुरडण्याकडे निगरगट्टपणे दुर्लक्ष करावे. व निगरगट्टपणा तुम्हाला काही बाहेरून आणावा लागत नाही. तो तुमच्याकडे जन्मजातच असतो. म्हणूनच तुम्ही त्यांना “ Sorry हं “हे किती गोड अभिनय करून म्हणायचे त्याचा सराव करायला सुरवात करा.(इंग्रजी किSSत्ती कि्त्ती उपयोगी आहेनां?) तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्याही चालतील. पण त्या लवंगी असल्या तर बेतानेच घ्या. मध्यम तिखट असतील तर मध्यम संख्येनेच(?) घ्या! अगदीच आळणी असतील तर मुठी दोन मुठी घ्याव्यात.परवा एकीने तिखटाच्या गोड मिरच्या किती घ्याव्यात असे त्या पाककर्तीला विचारले होते!!
तसेच हे तिखट, हिरव्या मिरच्या आवडत नसतील त्यांनी तांबड्या मिरच्या वापरायलाही हरकत नाही अशी सवलतही दिली जाते. पण पुन्हा त्या शक्यतो बेडगीच्या किंवा नंदुरबार-दोंडाईचे इथल्या असाव्यात अशा प्रेमळ दमबाजीच्या अटी असतातच. आणि त्या नसतील तर मग मेक्सिकन वापरायची स्वदेशी परवानगीही दिली जाते. पण कदापी ढब्बू मिरची घेऊ नये. कारण चटणीचा उद्देशच नाहीसा होतो, हेही सांगतात.

ह्या पर्यायांमध्ये तेलाची तर फार मोठी भूमिका असते. आता आता तेलाचे दोन तीनच प्रकार होते. खायचे आणि दिव्याचे. ऐपतदार असेल तर डोक्याला लावायचे. इतक्या तेलांत पिढ्या न् पिढ्या जात असत, जगत असत. आता अपरिहार्य आहे म्हणून अनेक प्रकार आले हे खरे. पण पाकृतीत हे बहुतेक सगळे दिले जातात. शुद्धिकरण केलेले, घाण्याचे पण त्यातही पुन्हा बैलाच्या घाण्याचे. त्यातील व्याकरण किंवा गणित जाणणारे पुन्हा “बैलाचे व लाकडी घाण्याचेच” वापरावे असे पर्याय कटाक्षाने देतात. त्यापाठोपाठ नेहमीचे शेंगदाण्याचे, हृदयविकाराच्या खवय्यांसाठी करडीच्या तेलाचा पर्याय हरकत नाही अशी परवानगी दिली जाते. आता संपर्क, सहवास वाढल्यामुळे सरसों का तेल, शुद्ध नारळाचे तेल अशी अखिल भारतीय तेलेही सुचवली जातात. तीही कर्नाटकी कडबूच्या किंवा उकडीच्या मोदकांच्या पाककृतीत! मोहरीच्या( सरसोंका तेल) तेलातील पुरणाचे कडबू किंवा उकडीचे मोदक ही किती चित्तथरारक पाककृती असेल ह्या कल्पनेनेच भीतीचा काटा उभाराहतो! एका नव प्रायोगिक पाककर्तीने शेवयाच्या खिरीला सरसों की तेलातील लसणाची फोडणी सुचवली होती. व नेहमीच्या हिंगा एैवजी हिरा हिंगच घ्यावा पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगितले होते. नंतर बातमी आली होती की ही कृति तिने तिच्या “सास भी बहुत खाती थी“ ह्या सिरियल मधील सासूला खाऊ घातली होती ! सिरियल बंद पडलीच पण ही पाककृति सध्या तुफान व्हायरल झाली आहे.

हे झाले साखर-गुळ, तिखट-हिरव्या मिरच्या, तेले या द्वंद्व समासांचे. असेच त्यातील प्रत्येक घटकाला म्हणजे शेंगदाण्यांऐवजी तीळ, कारळांऐवजी जवसही, चिंचेऐवजी आवडत असेल तर आमसूल आणि पुढे पुढे तर ह्याच चालीवर गोड पाककृतीत, काळ्या मनुका ऐवजी बेदाणे त्याऐवजी खिसमिसही चालेल, खसखस नसेल तर राजगिरा, जायफळ नसेल तर जर्दाळू (आतल्या बीया सकट?), बदाम नसतील तर शेंगादाणे ; हाच पर्याय काजूसाठीही असतो. बडिशेपे ऐवजी जिरे, बरं ते नसतील तर शहाजिरे, विड्याची पाने नसतील तर वडाचीही चालतील, खारिक नसेल तर खजूर, सुके अंजीर नसतील तर वांगीही(!) पण ती चांगली जांभळी बघून व जमल्यास वाळवून घ्यावीत( मग पदार्थ केव्हा करायचा होSs!) हे माना वेळावत किंवा तो डोक्यावरची मापाची नसलेली पांढरी ‘जिरेटोपी’ हलवत सुचवतात. परवा तर मक्याच्या चिवड्याच्या पाककृतीत मक्याचे पोहे नसतील तर अंड्याची टरफले घ्यायला हरकत नाही असे म्हटले. पण त्याच बरोबर ती टरफले गावरानी कोंबडीच्या अंड्याची असावीत किंवा ती नसतील तर बदकांची किंवा बदामी रंगाच्या अंड्याची घ्यावीत असे सुचवले होते! शाकाहाऱ्यांसाठी, शाकाहारी अंड्याची टरफले हे ओघाने आलेच.

अरे, आम्हाला काय पाहिजे असेल ते आमचे आम्हाला नीट सुखाने चार घास खाऊ द्या की रे बाबांनो!

बरं,पण त्या कैरीच्या चटणीचे काय झाले?

कार्ल मार्क्सच्या जन्म द्विशताब्दिनिमित्त

पुणे

कार्ल मार्क्स ( ५ मे १८१८-  १४ मार्च १८८२ )

आपल्या तत्वज्ञानाने जगावर कायमचा ठसा उमटवणारा कार्ल मार्क्स ह्याचीआज जन्म द्विशताब्दी. प्रख्यात नाटककार लेखक आॅस्कर वाईल्ड म्हणतो, “An idea that’s not dangerous is unworthy of being called an idea at all.” कुण्या एखाद्या विचारवंताला हे विधान सर्वथैव लागू होईल तर ते कार्ल मार्क्सलाच!

मार्क्स हा मुळत: तत्वज्ञ, अभ्यासक आणि विचारी होता. त्याच्या खळबळजनक व वेगळ्या विचारांनी प्रभावित विसाव्या शतकात झालेले जसे अनेक होते तितकाच मोठा गैरसमज त्याला भविष्यकाळातील क्रांतीचा अग्रदूत मानणाऱ्यांनी निर्माण केला. बाहेर त्याने मांडलेल्या सिद्धांतावर चर्चा वादविवाद इतर विद्वान करत असताना मार्कस् आपला बराच वेळ ब्रिटीश म्युझियममध्ये प्राचीन काळातील तत्वज्ञ व त्या काळचे अर्थतज्ञ ह्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यात घालवत असे. शंभर वर्षानंतरही मार्क्सचा विचार ‘मार्क्सिझम’ ह्या शब्दाशीच निगडित केला जातो. त्याला सामाजिक आर्थिक क्रांतीचा द्रष्टा,प्रेषित बनवणाऱ्यांनी त्याच्यातील तत्वज्ञाकडे दुर्लक्ष करून मार्क्सिस्टम्हणवून घेणाऱ्या एन्गल्स, लेनिन,स्टालिन,माओ,कॅस्ट्रो ह्यांनी आपल्या क्रांतीला व जुलमी दहशतीच्या कारभारासाठी सोयिस्कर तो अर्थ लावून त्याचा वापर केला. मार्क्स हा माणसाच्या स्वातंत्र्याच्या,स्वत:चे भवितव्य स्वत:च घडवणाऱ्या मूलभूत प्रवत्तीवर विश्वास ठेवणारा होता. (सामाजिक स्थितीचा विचार करता तो कामगार कष्टकऱ्यांचाही त्यात मुख्यत्वे समावेश करतो;माणूसच स्वत: आपले भविष्य घडवतो;विशेषत:कामगार आणि कष्टकरी.) कामगार स्वत: त्याचा सर्वतोपरी उद्धार, जोखडांतून मुक्ती करुन घेऊ शकतो ह्यावर मार्क्सचा विश्वास होता.पण त्याच बरोबर त्याच्यावर हेगेलच्या एकच एक अशा सर्वंकष सामाजिक बदलाच्या वैश्विक नियमाचाही प्रभाव होता. ह्या बदलाचे,परिवर्तनाचे रुपांतर,मला वाटते, वर सांगितलेल्या पुढाऱ्यांनी त्यांच्या क्रांतीत केले.

कोणत्याही विचाराचे, तत्वाचे किंवा तत्वज्ञानाचा विचार करणारे आपल्या दृष्टिकोनातून ते मांडतात. पूर्णपणे वैज्ञानिक असलेल्या उत्क्रांतिवादाचे स्पष्टीकरण शतकानुशतके निरनिराळ्या विद्याशाखांनी आपले अर्थ लावून केले. इतकेच काय विज्ञानाशी संबंध नसलेल्या हिटलर सारख्यांनी Survival of the Fittest चा अशास्त्रीय संबंध लावून तो आपल्या राजवटीसाठी वापरला, तिथे इतिहासाच्या तत्वज्ञानातूनही हिंसक क्रांति व जुलमी हुकुमशाहीचे समर्थन होते ह्यात आश्चर्य ते काय !

व्हाॅल्टेअरने,” जे तुम्हाला,त्यांचे भ्रामक विचार हेच तात्विक सिद्धांत व तेच सत्य आहे ह्याची खात्री करून देतात तेच तुमच्याकडून समाज- घातक गोष्टी सहज करवून घेतात;” असे म्हटलेय ते आजच्या काळातही किती स्पष्टपणे लागू आहे ते पहा! ह्यामध्ये मार्क्सवादाचे समर्थन नाही अथवा टीकाही नाही. पण कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाचा प्रभाव कायम राहणारा आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मार्क्सला डावलून कोणत्याही काळात सामाजिक आर्थिक आणि पर्यायाने राजकारणावर विचारविमर्श होऊ शकत नाही. त्याचे दास कॅपिटाॅल हे वाचायला आणि अभ्यासण्यासाठी अतिशय किचकट क्लिष्ट आहे. पण तो तितक्याच बारकाईने वाचावा व अभ्यास करावा हे अनेकजण सांगतात. जगातील इतर देशांतील वाचकांची, विचारवंतांची माहिती नाही. आणि आपल्याकडीलही सर्वांची माहिती नाही. पण मानवेंद्रनाथ राॅय व काॅ.श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी मात्र त्याचा चांगला, पूर्ण व सखोल अभ्यास केला होता ही माहिती आहे.

जेव्हा रशियात कम्युनिझम मोडकळीस आला तेव्हाही मार्क्सवादाचा हा पाडाव आहे असे लोक म्हणत असताना मी म्हणत होतो की हा मार्कसच्या तत्वज्ञानाचा पराभव नाही पण ज्यांनी तो त्यांच्या पद्धतीने अमलात आणला त्या हुकुमशहांचा पाडाव आहे असे म्हणालो होतो. तत्वज्ञान, विचार नष्ट होत नाहीत. ते विपरितरीत्या अमलात आणणारे पराभूत होतात, असे म्हटले होते. तशा अर्थाचे पत्रही मी म.टा.मध्ये लिहिले होते. असो. The Hindu मध्ये रामन जहाबेगलू (Ramin Jahanbegalu) यांचा कार्ल मार्क्सवरील लेख वाचला त्यावर, व जे ह्यात जे काही विसंगत वाटणारे आहे ते माझे, असे हे ज्ञान अज्ञान मिश्रित टिपण आहे.