हद्दपार ते नोबेल विजेता -१

मॅरिएटा

“ महाराज, आरोपीने काही वर्षे मजुरीची कामे केली म्हणजे काही विशेष केले असे अजिबात नाही.ते सामाजिक कर्तव्य आहे. पण तो कविताही करतो. कविता करणे हे समाजासाठी अजिबात महत्वाचे नाही. त्याच्या कविता अश्लील,बीभत्स असतात असाही आरोप लेनिनग्राडच्या मुख्य वर्तमानपत्राने केला आहे. ह्याचा अर्थ त्या समाजाला घातकच होत. आरोपी हा समाजावर आलेले एक बांडगुळ आहे. समाजालाच त्याला पोसावे लागते. हा परोपजीवी आरोपी समाजाला भार झाला आहे. तरी त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी असे जनतेच्या सरकारला वाटते.”

सरकारी वकीलाचे हे आरोप ऐकल्यावर ‘जनतेच्या न्यायाधीशांनी’ आरोपीला विचारले, “ तुला कवि म्हणून कुणी मान्यता दिली ? तुझी कवींमध्ये गणना कुणी केली ?”“
त्यावर तिशीतल्या तरूण आरोपीने निर्भयपणे न्यायाधीशांना, सांगितले,” कोणीही नाही.” नंतर त्याने न्यायाधीशांकडे पाहात सरकारलाच विचारले,” माझी मानव वंशात कुणी गणना केली? मी माणूस आहे अशी तरी नोंद कुणी केली आहे?मला माणूस म्हणून तरी मान्यता कुणी दिली ?”

कवि जोसेफ ब्रॅाडस्कीचे ही उत्तरे ऐकल्यावर सरकारी वकील आणि न्यायाधीश स्तब्ध झाले. पण ठोठवायची म्हणजे ठोठवायचीच ह्या न्यायाने न्यायमूर्तींनी ब्रॅाडस्कीला पाच वर्षे आर्क्टिक प्रदेशातील एका मजुरांच्या छावणीत काम करण्याची शिक्षा सुनावली.

ही घटना १९६४ सालची. कवि,साहित्यिक, जोसेफ ब्रॅडस्कीला इतकी कठोर शिक्षा झाल्याचे समजल्यावर त्या काळातली रशियातली श्रेष्ठ कवियत्री ॲना ॲव्खमातोव्हाने व इतर कवी आणि साहित्यिकांनी सरकारला एक पत्र लिहिले आणि जोसेफच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली. जोसेफची शिक्षा माफ करावी अशी विनंती केली. युरोपमधील बऱ्याच प्रख्यात कवि आणि साहित्यिकांनीही जोसेफ ब्रॅाडस्कीवर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला. त्यामध्ये प्रख्यात कवि डब्ल्यु. एच. ॲाडेनचा मोठा पुढाकार होता.

ह्या घडामोडी पाहिल्यावर प्रश्न चिघळू नये म्हणून रशियन सरकारने जोसेंफ ब्रॅाडस्कीची अठरा महिन्या नंतर सुटका केली.
ह्या अठरा महिन्याच्या काळात सक्तीच्या मजुरीची कष्टाची कामे करावी लागली. पण ज्या पत्र्याच्या खोलीत भाडे देऊन राहात होता तिथे सांडपाण्याची सोय नव्हती. पाणी जायला गटारे होती . पण ती कायमची तुंबलेली होती. एकच मोठी चैन होती. ती म्हणज संडासासाठी एक आडोसा होता !

ब्रॅाडस्कीचा जन्म १९४० साली लेनिनग्राद (सेंट पिटसबर्ग) येथे झाला. तो दोन वर्षाचा असताना हिटलरने लेनिनग्राडला ९०० दिवस वेढा घातला होता. असंख्य लोक मारले गेले. उपासमारी, रोगराईने किती मेले त्याचा पत्ता नाही. ह्या संकटातूनही ब्रॅाडस्कीचे आईवडील व तो स्वतः बचावले. पण त्याचा काका मात्र मृत्युमुखी पडला.

ब्रॅाडस्कीचे आयुष्य गरीबीत गेले. त्याच्या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे सरकारी मदतीने उभ्या राहिलेल्या इमारतीत राहात होती. ती मोठी संपूर्ण गल्ली अशा सामुहिकरीत्या राहणाऱ्या कुटंबांची गर्दी असलेल्या इमारतींनींच भरलेली होती. एका मोठ्या खोलीत तीन चार कुटुंबे राहात असत. पडदे, उंच कपाटे ह्याच मधल्या भिंती ! सहा सात कुटुंबाना एकच स्वैपाक घर, एकच न्हाणीघर व संडास ! आपल्याला निश्चितच मोठ्या अडचणीची व अवघडलेल्या मनःस्थितीत राहण्याची गैरसोय वाटेल अशी गोष्ट म्हणजे इतक्या कुटुंबाना मिळून एकच स्वैपाक घर! त्यातल्या त्यात सामायिक संडास म्हणजे फार मोठी अडचण गैरसोय वाटणार नाही. पण पाश्चात्य देशातील मध्यम, कनिष्ठ मध्यमवर्गीयांना अशा गोष्टी हालाखीच्या आणि मोठ्या गैरसोयी वाटत असतात.

प्रत्येक कुटुंबाला महिन्यातील एक आठवडा सामायिक स्वैपाकघर, न्हाणीघर आणि संडास स्वच्छ करावा लागत असे. तिकडे जाण्याची सामायिक मार्गिकाही घासून पुसून स्वच्छ करणे भाग असे. तो म्हणतो,” आमची पाळी असली की एक दिवस आधी आई, आमच्याकडे बघून पण स्वतःशी बोलल्यासारखे म्हणायची , “सर्व स्वच्छ करण्याची पाळी आपली आहे. कोण करणार आहे?” इतके म्हणत ती दुसऱ्या कामाला लागत असे. तिला माहित असे की हे काम तिलाच करावे लागणार !

१९७२ पर्यंत अशा मोहल्यात ब्रॅाडस्कीचे बाळपण व तरुणपणाची वर्षे गेली. ह्या घरात ब्रॅाडस्की राहिला, वाढला. कविताही लिहित होता.

ब्रॅाडस्की अशा तरुण वयात होता की घरात सोयी गैरसोयी होत्या नव्हत्या ह्याचे त्याला विशेष महत्व नसेल पण स्वतःसाठी लहानशी का होईना वेगळी खोली नाही ही त्याची मोठी अडचण होती. उंच कपाटे, पुस्तके,वस्तूंनी भरलेली शेल्फ ह्यांचा आडोसा असलेला एक कोपरा त्याचा होता!
तो सांगतो,” मला आणि माझ्या वयाच्या अनेकांच्या मनातील ही दुखरी जागा होती. मैत्रीणीला घरी आणणेही जमत नसे. मग प्रेम कसले साजरे करतो मी! त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण Marina Basmanova बाहेर फिरायला जात असू. आम्हा प्रेमिकांचे चालणे, विहरणे, किती मैल झाले असेल ते मोजता येणार नाही. काही शतक, किंवा हजारो मैल आम्ही आमच्या प्रितीच्या धुंदीत चाललो असू ! ही सारी त्या सामायिक खोलीतल्या एका कोपऱ्याची मेहरबानी!”

हद्दपार झाला तेव्हा ब्रॅडस्कीला आपली प्रेयसी मरिनाला व तिच्यापासून झालेल्या पाच वर्षाच्या लहानग्या मुलाला लेनिनग्रादलाच सोडून यावे लागले. त्या दोघांच्या सुरक्षिततेसाठी मरिनाचे आडनावच मुलालाही लावावे लागले.

वयाच्या पंधराव्या वर्षी जोसेफ ब्रॅाडस्कीने शाळा सोडून दिली. मोल मजुरीची, मिळेल ती कामे करू लागला. कधी प्रेतागारात काम केले. प्रेते फाडायची. नंतर ती शिवायची. काही काळ त्याने कारखान्यांत कामगार तर काही काळ रसायनांचे पृथ:करण करणाऱ्या लॅबोरेटरीत. पण जास्त काळ तो धरणे-बंधारे, कालव्यांची कामे व त्यांचे बांधकाम आणि देखभाल करणाऱ्या भूशास्त्र इंजिनियराच्या — बांधकाम करणारे तज्ञ इंजिनिअर्स —हाताखाली, मदतनीस,हरकाम्या म्हणूनही काम करीत होता. लहान मोठी धरणे, त्यांची मजबुतीची तपासणी, कालव्यांच्या भिंतीच्या दुरुस्ती ह्या कामात तो रंगला असावा. ह्या कामामुळे त्याला रशियातील निरनिराळे प्रदेश पाहायला मिळाले. आता पर्यंत करीत असलेल्या कामामुळे त्याला, त्याच्याच शब्दांत “ खरे आयुष्य,खरे जगणे काय असते त्याची जाणीव झाली. कित्येक लोकांना जवळून पाहता आले. त्यांच्या सारखेच राहण्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांचे प्रपंच कसे चालतात त्ह्या आश्चर्याचे याचे वास्तवच समोर दिसले.” इथे आपल्याला मॅक्झिम गॅार्कीची आठवण येते. तोही असाच बिन भिंतींच्या उघड्या विश्वविद्यालयात मिळेल ते काम, शारिरीक कष्टाची कामे करून शिकला.

पण अशी कामे करीत असतांना तो कविता करू लागला होता. ब्रॅाडस्कीने १८ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली. ‘समाजाला लागलेले परजीवी बांडगुळ’ अशा आरोपावरून मजुरांच्या छावणीत सक्त मजुरी करण्यास धाडले तेव्हाही तो कविता करत होता.

ब्रॅाडस्कीला कवि म्हणून मान्यता व प्रसिद्धि मिळाली त्यामागे त्या काळची प्रख्यात कवयित्री ॲना ॲख्मातोहा Anna Akhmatova आहे. तिला त्याच्या काव्यातला ’जिवंतपणा’, ‘धग’, आणि वेगळेपण जाणवले. तुमच्या मते सध्या कवि म्हणून ज्याचे नाव घेता येईल असा कोण आहे ? असे विचारल्यावर, तिने सर्व प्रथम जोसेफ ब्रॅाड्स्कीचे नाव घेतले.

ब्रॅाडस्कीला साहित्य,वाड•मयाचे अतिशय प्रेम होते. त्यातही कवितेवर सर्वात जास्त. शेवटपर्यंत कविता त्याचे ‘पहिले प्रेम’ होते. तो सांगतो, “ प्रेमाला पर्याय असलाच तर तो एकच आहे – कविता !”

जन्मला,जगला,मेला’ ह्या शब्दांतून कोणाच्याही आयुष्याचे वर्णन होऊ शकत नाही. कवितेविषयीही ब्रॅाडस्की असेच काहीसे म्हणतो. “माणूस त्याच्या निधनाची बातमी व्हावी म्हणून जसा जगत नाही तशीच चार सुंदर शब्द सुचले म्हणून
कविता होत नाही.” जेव्हा आयुष्य, जगणे हे अगदी जवळून, आतून अनुभवाला येऊ लागते तेव्हा कविता होऊ लागते. ती
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होते.“ जुलमी राजवटीत पोलिसांच्या भीतीखाली, सतत दडपणाखाली जगणारी माणसे
अखेर अशा अवस्थेला पोचतात की “ आम्हाला सुख नको, फक्त यातना कमी होऊ देत” इतकेच ते मागत असतात.
ब्रॅाडस्की ज्या परिस्थितीत राहिला वाढला त्यातलेच हे त्याचे स्वानुभवावर आधारित बोल आहेत.

ब्रॅाडस्की श्रेष्ठ कवि होताच, तसाच उत्तम भाषांतरकारही होता. कारण त्याने पोलिश आणि इंग्लिश भाषांत प्राविण्य मिळवले होते. त्याने पोलिश कवींच्या कविता लेख भाषांतरीत केल्या. त्याच्या स्वत:च्या कवितांचे फ्रेंच,जर्मन, इटालियन, स्पॅनिश इंग्रजी व इतर काही भाषांतून, एकूण दहा भाषांत भाषांतर झाले आहे. त्याच्या रशियन कवितांचे दर्जेदार इंग्रजी कवींनी भाषांतर करून संग्रह प्रसिद्ध केले. त्यामुळे तो आणखी ख्यात झाला. कविता तो त्याच्या रशियन भाषेतच करीत असे. निबंध, लेख मात्र इंग्रजीत लिहित असे.

ब्रॅाडस्कीला १९७२ मध्ये रशियातून हद्दपार केले. राजकीय कारणांमुळे त्याला हद्दपार केले नव्हते. तो राजकीय विरोधक नव्हता.पण त्याची स्वतंत्र वृत्ती, व्यक्ति स्वातंत्र्याविषयीची मते ही स्टालिनआणि स्टालिन नंतरच्या सत्ताधीशांनाही मानवणारी नव्हती. कविता लेख भाषणे ह्यातून आपल्या विरुद्ध जनमत तयार होईल ही सगळ्या हुकुमशहांना कायमची धास्ती असते. हुकुमशहा शब्दांना फार घाबरत असतात. मग ते लिखित असोत, छापील असोत. भाषणातील असोत की कवितेतील, गाण्यांतील असोत ! म्हणूनच “कवि,कविता करणे म्हणजे समाजासाठी काही उपयुक्त,मदत करणारा मार्ग, काम नाही. समाजालाच त्याला पोसावे लागते.तो समाजाचे शोषण करत असतो. म्हणजेच तो बांडगुळ आहे.” अशा ठरवून रचलेल्या विचारसरणीमुळे सत्ताधीशांनी त्याला हद्दपार केले.

तो प्रथम पोलंडमध्ये आला. मूळचा ब्रिटिश पण नंतर अमेरिकेत राहिलेला प्रख्यात कवि डब्ल्यू. एच ॲाडेनकडे तो राहिला. त्याच्या मदतीने तो अमेरिकेत आला. आणि पाच वर्षानंतर अमेरिकन नागरिक झाला.मधली पाच वर्षे तो हद्दपार ह्या अवस्थेतच होता.ना रशियाचा नागरिक ना कुठल्या एका देशाचा; हद्द्पार ! कोणत्याही देशाना आपला न मानलेला हद्दपार !

तो म्हणतो, “ वाड•मय, पुस्तकांनी माझे आयुष्य बदलले. साहित्याने माझ्यात मोठा बदल घडवून आणला. आयुष्य घडवणाऱ्या काळात, खास करून दोस्तोयव्हस्कीच्या Notes from Underground ह्या पुस्तकाचा त्याच्यावर प्रभाव होता.

“ कविता आपल्याला काळाच्या तडाख्याला तोंड देण्यास समर्थ करते.” असे सांगून तो पुढे जे म्हणतो ते विशेषतः जुलमी, हुकुमशाही राजवटीत राहाणाऱ्या लोकांना लागू पडते. तोही अशाच राजवटीत राहात होता.तो पुढे सांगतो,” भाषा, शब्द कविता फक्त रोजच्या आयुष्यातील ताणतणाव सोसण्याची जबर इच्छाशक्ती, बळ देते असे नव्हे तर अस्तित्वावर येणाऱ्या दबावातही जगण्याचा, मुक्त होण्याचा मार्ग दाखवते.”

ब्रॅाडस्कीला लहानपणापासून लेनिनविषयी राग होता. राग लेनिनच्या राजकीय विचारसरणीमुळे नव्हता . कारण ते समजण्याचे त्याचे वयही नव्हते. पण “ लेनिनच्या सर्वत्र दिसणाऱ्या, असणाऱ्या,पराकोटीच्या ‘अति अस्तित्वाचा’ राग होता. लेनिनग्राद मध्ये अशी एकही जागा,ठिकाण, कोपरा,रस्ता, रेस्टॅारंट, इमारत नव्हती की जिथे लेनिनचे प्रचंड चित्र, पुतळा, फोटो नाही. वर्तमानपत्राच्या पहिल्यापानापासून लेनिनचे फोटो, पोस्टात,पोस्टाच्या लहानशा तिकिटावरही लेनिन, बॅंका शाळा,कोणत्याही छापील कागदावर लेनिन, लेनिन लेनिन इथे तिथे लेनिनला पाहून पाहून, सतत डोळ्यांत घुसणाऱ्या वीट आला. डोळे बिघडून आंधळा होईन असे वाटू लागले.” असे तो म्हणतो.

साहित्यातील कवितेवर त्याचे जीवापाड प्रेम होते. कवितेचा गौरव करताना तो म्हणतो,” भाषेची सर्वोच्च प्रगल्भता, परिपूर्णता आणि परिपक्वता कविता आहे!”
जे एकाकी आहेत, कोणत्या तरी भीतीच्या दडपणाखाली आहेत, अस्वस्थ आहेत त्यांनी कविता वाचल्या पाहिजेत अशी आग्रहाची शिफारस करतो. त्यामुळे त्यांना समजेल की इतरही अनेक असे जगताहेत. पण तसले जीवनही ते एक उत्सव साजरा होतोय ह्या भावनेने जगत आहेत. कविता अशी जाणीव करून देते.

अमेरिकेत ब्रॅाडस्की हा मिशिगन युनिव्हर्सिटीत, Queens College, Smith College , Mount Holyoke College मध्ये वाड•मयविषयाचा प्राध्यापक होता. तो उत्तम शिक्षक होता. इंग्लंडमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीत अतिथी प्राध्यापक होता.त्याला अनेक विद्यापीठांनी डॅाक्टरेट पदवी दिली आहे. त्यापैकी इंग्लंड मधील ॲाक्सफर्ड आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा Yale विद्यापीठांचा समावेश आहे.

तो फर्डा वक्ता, आपल्या बोलण्याने खिळवून ठेवणारा संभाषणपटू होता. चर्चा असो अथवा आपल्या मित्रांच्या गप्पागोष्टींनाही तो आपल्या संभाषणाने व विचारांनी निराळ्याच उंचीवर नेत असे.

विद्यापीठात, महाविद्यालयात शिकवताना सांगायचा की कविता मोठ्याने वाचा,म्हणा. त्यामुळे अर्थ समजण्यास जास्त सोपे जाईल. कविता पाठ होतील. ह्यामागे रशियातील शाळेत पाठांतराला महत्व होते. आपल्याकडेही परीक्षा पास होण्यासाठी पाठांतरावर भर द्यावा लागतो !

कवितेच्या आवडीपोटी त्याने एक योजना सुचवली. लोकांना कविता वाचायची सवय व्हावी; त्या आवडाव्यात ह्यासाठी निवडक कवितांच्या छोट्या पुस्तिका काढाव्यात. त्या फुकट द्याव्यात. शाळा महाविद्यलये, वाचनालयात , निवडक सार्वजनिक ठिकाणी ठेवाव्यात. सरकारने ही कल्पना काही काळ उचलून धरली. अंमलातही आणली. थोडक्या काळासाठी ही योजना असावी. पण काही तरी अनुकुल परिणाम झाला असणार.

ब्रॅाडस्की हा आपल्या कविता तशाच इतरही कवींच्या कवितांचे वाचन करीत असे. ते इतके प्रभावी होत असे की रशियन भाषा न समजणारे श्रोतेही मंत्रमुग्ध होऊन ऐकत. त्याची आदर्श व त्याला पुढे आणणाऱ्या ॲना माख्वाटोव्हा आणि रशियन Gulag मध्ये शिक्षा भोगत तिथे उपासमार आणि थंडीमुळे १९३८ साली मृत्यु पावलेल्ला त्याचा Hero मॅन्डलस्टॅम (Mandelstam) ह्यांच्या कविता फार मनापासून,अत्यंत परिणामकारक रीतीने वाचन करीत असे. अमेरिकेतील पहिल्या दोन वर्षांत त्याने ६० वेळा कविता वाचन केले !

रशियातून हद्दपार झालेल्या प्रतिभावान, बुद्धिमान, कवि, निबंधकार व लेखक आणि उत्कृष्ठ शिक्षक जोसेफ ब्रॅाडस्कीला अमेरिकेतील साहित्य जगतातील बहुतेक सर्व सन्मान मिळाले. तो १९९१ सालचा ‘अमेरिकेचा राजकवी’ ही होता.

ह्या सन्मानानंतर त्याला साहित्यातील सर्वोच्च सन्मानही मिळणार होता……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *