Category Archives: Uncategorized

पसायदान

रेडवुड सिटी

पसायदान

ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेले ‘ पसायदान ‘हे अलौकिक, अभूतूपूर्व, आणि अदभुत आहे. त्यातील उपमा, दृष्टांत,रूपक ह्या भाषालंकार, काव्यगुण किंवा भाषागुणांशी पसायदानाच्या अलौकिकत्वाशी किंवा अभूतपूर्वतेशी संबंध नाही. कारण नऊ हजार ते दहा हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी त्यांनी सलग काही दिवस किंवा महिने सांगितली ती ज्ञानेश्वरी हाच एक, भाषेचाच नव्हे तर ज्ञानाचाच एक मौल्यवान अलंकार आहे. धनाढ्य श्रीमंतापासून पार गरीबालाही हा दागिना सहज धारण करता येतो! अशा ज्ञानेश्वरीचेच पसायदान हे मधुर परिपक्व फळ आहे. त्यामुळे त्यातील काव्यात्मकतेमुळे ते अलौकिक झाले आहे असे अजिबात नाही. तर त्यांनी मागितलेले कृपाप्रसादाचे दानच खरोखर जगावेगळे आहे. पसायदानातील एकेक ओवी वाचताना ह्याचा प्रत्यय येतो. आजपर्यंत विश्वातील सर्वांच्या भल्यासाठी मोठ्या मनाने अशी प्रार्थना केली नव्हती.

पसायदानाच्या अभूतपूर्व वेगळेपणाचे रहस्य ज्ञानदेवांच्या चरित्रात आणि चारित्र्यात आहे. कारण त्यांचे जीवनही इतर असंख्यांसारखे सुरळीत एका चाकोरीतील नव्हते.

धर्मशास्त्रात, संन्याशाने संन्यासाश्रमाचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रमी होऊन पुन्हा मुलाबाळांसह प्रपंच करण्याची घटना विठ्ठलपंतांच्या घटनेआधी झाली नसावी. धर्मशास्त्रात पूर्वी कधी न घडलेल्या दोषावर निर्णय नसणार. त्यामुळे ह्यावर काय निर्णय घ्यावा हे त्यावेळच्या धर्मशास्त्री पंडिताना प्रश्न पडला असावा. त्यांच्याजवळ शास्त्रानुसार उत्तर नव्हते. तोडगा नव्हता. विठ्ठलपंतांच्या कुटुंबाला वाळीत टाकलेआणि त्यानंतर त्यांना पराकोटीचे देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले! म्हणजे मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. आई-वडील गेल्यावर, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना रोजचे जगणेही समाजाने अवघड करून टाकले होते. धर्मशास्त्राच्या आधाराने त्यांना शुद्ध करून पुन्हा ब्राम्हण्याची दीक्षा देण्यासही नकार दिला.

निवृत्तीनाथांच्यामुळे ज्ञानदेव व इतर भावंडे आत्मज्ञानाच्या उच्च पदावर आरुढ झाली होती.

निवृत्तिनाथांना शुद्धिपत्र, पुन्हा दीक्षा द्या म्हणणे हे काहीच पसंत नव्हते. आपल्याला त्याची काहीच आवश्यकता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ते ह्या सर्वाच्या पलीकडे पोचले होते. पण ज्ञानेश्वरांना सामाजिक घडी मोडायची नव्हती. त्यांचे म्हणणे आपण हे मानले नाही तर सामान्य लोकही त्याकाळच्या पद्धति झुगारून देतील. आपल्यामुळे समाज विस्कळित होईल असे काही करु नये असे त्यांचे म्हणणे होते.

ज्ञानेश्वरांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या,छळ करणाऱ्या धर्ममार्तंडाच्या विरुद्ध किंवा समाजातील कुणा विरुद्ध कधीही, एकही कठोर,वावगा,अपशब्द काढला नाही. इतकेच काय त्यांच्या कोणत्याही ग्रंथात किंवा ओव्या- अभंगात एकही वाईट,अपशब्द आढळत नाही.काढायचाच म्हणून अगदी भिंग घेऊन शोधून पाहिले तर ज्ञानेश्वरीत अडाणी या अर्थी गावढा हा एक शब्द सापडतो, असे ह. भ.प. गुरुवर्य मामासाहेब सोनोपंत दांडेकरांनी म्हटले आहे.ज्ञानेश्वरांमध्ये सत्वगुणाचा परमोच्च उत्कर्ष झालेला होता. ते सात्विकतेची मूर्तीच होती.ज्ञानेश्वरांनी कोणालाही उपदेश केला नाही. आयुष्यभर फक्त जे जे चांगलेआहे ; उदात्त उन्नत उत्तम आहे तेच त्यांनी नेहमी लोकांसमोर ठेवले.आपल्या वाणीने आणि आचरणाने फक्त चांगले तेच लोकांसमोर ठेवल्याने समाजात बदल होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे ग्रंथ- विशेषत: ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ- होत. मग, निर्मळ निरपेक्ष आणि लोकांचे निरंतर कल्याण चिंतणारे ज्ञानेश्वर स्वत: पसायदानात प्रकट होतात ह्यात आश्चर्य ते काय? चित्रामध्ये चित्रकाराचे, गायन-वादनात त्या त्या कलावंतांचे, साहित्यात लेखकाचे प्रतिबिंब उमटलेले असते असे म्हणतात. पसायदानात स्वत: अलौकिकत्व झालेले ज्ञानेश्वरच त्यात आहेत!

आता पसायदान वाचायला, म्हणायला सुरवात करु या.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे।।१।।

(विश्वात्मक= विश्वात सर्वत्र भरून राहिलेला, परमात्मा; तोष= समाधान, संतोष, तृप्ती ह्यामुळे आनंदित प्रसन्न होणे. पसायदान= प्रसादाचे दान; वाग्यज्ञे= वाणीरूप यज्ञाने; प्रवचन-सत्र, व्याख्यानमाला यामधून केलेला वाचिक यज्ञ, ज्ञानयज्ञ. )

ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर तिच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी ही प्रार्थना केली आहे. त्यांनी त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानेश्वरी पद्यातून म्हणजेच ओव्यांतून अखंड ओघाने सांगितली. तीही थोड्या थोडक्या नव्हे तर सुमारे नऊ ते दहाहजार ओव्यांतून सांगितली. त्यांचा तो वाग्यज्ञच होता.यज्ञ फार मोठ्या समुदायाच्या हितासाठी केला जात असे. ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांनाही संस्कृतात अडकून पडलेले ज्ञान मिळावे म्हणून ते ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहून मराठीत आणले. हे लोकोपयोगी यज्ञकार्य होते. वाणीरुपाने व्याख्यानातून केलेला ज्ञानेश्वरांचा हा यज्ञ होता. म्हणून त्यांनी इथे वाग्यज्ञ असा उल्लेख केलाआहे.

आपल्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देवाला संतोष व्हावा आणि त्याने प्रसन्न होऊन आपल्याला वर द्यावा अशी प्रारंभी विनंती करतात. ज्ञानेश्वर, राम किंवा त्यांचा आवडता विठोबा किंवा ते स्वत: योगी असल्यामुळे शंकराचीही प्रार्थना करु शकले असते. पण ज्या अनंत, अमर्याद, अव्यक्त परमात्म्याचे त्यांना आपले गुरु निवृत्तिनाथांच्या आशिर्वादाने प्रत्यक्ष ज्ञान-दर्शन झाले होते त्या ब्रम्हांडस्वरूप विश्वात्मक देवाचीच प्रार्थना करून, आपल्या वाग्यज्ञाने संतोष पावलेल्या विश्वात्मकाकडे त्यांनी प्रसादाचे दान मागितले आहे. अशा तऱ्हेने पहिल्या चरणापासूनच पसायदानाच्या भव्यतेचे वैशिष्ठ्य जाणवते.

आपण पसायदानातील पुढच्या ओव्या वाचत जाऊ तसे त्यांनी मागितलेले दान किती महान, जगावेगळे आणि थोर मनाचे निदर्शक आहे ह्याची खात्री पटत जाते. विश्वातील सर्वांच्या सर्वांगिण कल्याणासाठी त्यांनी हे दान मागितले. केवळ कुणाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी अथवा धनसंपदेसाठी ह्या दानाची मागणी नाही. सामान्य सुखांचा त्यात अंतर्भाव आहेच पण सगळ्या लोकांच्या मनात सदविचार, सदभावना निर्माण होऊन सर्व सदाचारी होवोत, सर्वजण एकमेकांचे मित्रच होऊन राहोत, ही उदात्त मागणी त्यात आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे हे निराळेपण आहे.

यावरून ध्यानात येऊ लागते की आत्मज्ञानी ज्ञानेश्वरांनी थेट तिन्ही लोकांत सर्वत्र भरून राहिलेल्या विश्वव्यापी परमात्म्याचीच प्रार्थना का केली. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी किंवा भावंडांसाठी काहीही न मागता एकूण सर्व मानवांचे सर्व काही चांगले व्हावे; त्यांच्या शाश्वत कल्याणासाठी प्रार्थना केली. बरे इतक्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याजवळ काय केशर कस्तुरी मागायची? देव मोठा, प्रसाद मागणाराही तितकाच मोठा. मग मागितलेले दानही तेव्हढेच भव्य दिव्य असणार! देणाऱ्याचा मोठेपणा सिद्ध करणारेच, सर्व प्राणीमात्रांच्यासाठी मागितलेले हे दान आहे! हे वेगळेपणही अभूतपूर्वच ह्यात शंका नाही.

माऊली पुढे म्हणतात, असे दान दे गा देवा की ज्या योगे

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।२।।

(खळ=दुष्ट,दुर्जन; व्यंकटी= वाकडेपणा, मनाचा वाईटपणा, दुष्टता; रती = गोडी,सुख,प्रेम; भूतां= भूत म्हणजे माणसे, लोक, प्राणिमात्र; म्हणून भूतां म्हणजे लोकांत, लोकांमध्ये एकमेकांविषयी)

ज्यांच्या मनात, स्वभावात वाकडेपणा आहे, जे दुष्ट असतील, त्यामुळे त्यांच्या आचरणातही दुराचार आहे, अशांचा त्यांच्यातील ह्या वाईट प्रवृत्तींचा, कुविचारांचा नाश होऊन त्यांना सदबुद्धी देऊन त्यांना सत्कर्मे करण्याची गोडी लागो. ती गोडी सतत वाढत राहो. सर्वांमध्ये सामंजस्य वाढीला लागून सकलजन एकमेकांचे मित्र होवोत. परस्परांविषयीची प्रेमाची भावना केवळ माणसां माणसांतच नव्हे तर ते आणि सर्व प्राणीमात्रही एकमेकांशी सामंजस्याने राहोत असा त्यात मोठा आशय आहे.

आपले हित अहित कशात आहे हे न कळणाऱ्यांच्या बाबतीत ते काय प्रार्थना करतात पहा,

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात ।।३।।

(दुरित= पाप,पातक; इथे अज्ञान, अज्ञानामुळे किंवा अज्ञानाचा अंध:कार असाही अर्थ अभिप्रेत आहे. तिमिर = अंधार. पाहो=प्रकाश, सूर्याचा प्रकाश लाभो; स्वधर्माचा सूर्योदय होवो.)

आपल्या हिताचे काय आणि आपले नुकसान कशात आहे हे कळत नसल्याने ज्यांच्याकडून कुकर्मे होत असतात, किंवा पापाचरण झाले त्यांच्या मनातील हा पातकांचा अंधार, अज्ञानाचा अंधार दूर कर, त्यानांच नव्हे तर सर्वांना, आपापल्या वाट्याला आलेले स्वाभाविक कर्म, कर्तव्य करण्याची म्हणजेच प्रत्येकाचा जो सहजधर्मआहे ते कर्म नेकीने करण्याची work is worship ह्या निष्ठेने करण्याची बुद्धी दे. म्हणजेच त्यांच्यामध्ये स्वधर्मकर्म (कर्तव्यकर्म) करण्याचा सूर्य उगवू दे. विद्यार्थ्यांना अभ्यास करून विद्याधन मिळवण्याची; तरुणांना आपल्या उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या धंदा, व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे करून स्वकष्टावर पोट भरण्याची प्रवृत्ति जागृत राहू दे; गृहस्थाश्रमीला कुटुंबाचे योग्य मार्गाने पालन पोषण करण्याची; सत्ताधीशांना, अधिकाऱ्यांना आपले पद ही लोकसेवा करण्याची तसेच जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले करण्याची संधी आहे, अशी बुद्धि झाली म्हणजेच सर्वांमध्ये स्वधर्माचा सूर्योदय झाला. ह्या स्वधर्मकर्माच्या सूर्यप्रकाशामुळे इतर वाईट गुणांचा, वाईटाचा अंधार आपोआपच नाहीसा होईल. असे झाले की जो ज्या इष्ट वस्तुची इच्छा करेल त्याही पूर्ण होतील.असे व्हावे आणि ज्याला जे जे हवे ते प्राप्त होवो हा सर्वांच्या आवडीचा कृपाप्रसाद ज्ञानेश्वर माऊली आपल्यासाठी परमेश्वराकडे मागतात.

आतापर्यंतच्या ओव्यातून ज्ञानेश्वरांनी जी प्रार्थना केली ती सफळ आणि सुकर होण्यासाठी ते कोणती इच्छा व्यक्त करतात, आणि काय घडावे असे त्यांना वाटते ते पुढील दोन तीन ओव्यात सुंदर शब्दात विश्वात्मके देवाजवळ मागतात. आणि त्या वाचल्या की ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या प्रार्थनेची उंची, उदात्तता वाढतच आहे ह्याचा अनुभव येतो.

वर्षत सकळ मंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी। भेटतू भूतां ।।४।।

(वर्षणे= वर्षाव करणे/ होणे; पाण्याचा वर्षाव होणे; जशा पावसाच्या धारा पडतात; मांदियाळी= मोठा समुदाय,गर्दी,किंवा थवा,समाज. अनवरत= सतत,अखंड,निरंतर, सातत्याने. )

ते म्हणतात, हे विश्वात्मका, सर्व मंगल करणारे,सर्व चराचरातील सर्व प्राणीमात्रांवर मांगल्याचा वर्षाव करणारे, सर्वांचे चांगले करणाऱ्या ईश्वरनिष्ठ सज्जन सत्पुरुषांचा मोठा समुदाय या भूमंडळावर सातत्याने अखंड, निरंतर येत राहावा आणि आम्हा सर्वांना त्यांचा कायम सहवास लाभावा. अशा ईश्वरनिष्ठांची आमच्या पृथ्वीवर सतत गर्दी होऊ दे.
ह्या ईश्वरनिष्ठ सज्जनांचे इतके काय महत्व आहे म्हणून माऊली ते सतत अखंडितपणे येत राहोत असे मागणे मागतात? कारण जे जे काही सत् आहे त्यांचे ते दूत आहेत म्हणून त्यांनी ह्या आमच्या पृथ्वीतळी यावे अशी माऊलींची इच्छा आहे. ईश्वरनिष्ठांचे बहारदार वर्णन ज्ञानेश्वर महाराज पुढील दोन ओव्यात करतात.

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव।
बोलते जे आर्णव । पीयूषाचे।।५।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु।।६।।

(चला किंवा काही प्रतीत चलां असेही येते= चालत्या, चालणाऱ्या. आरव= अरण्य, वृक्षराजी. चिंतामणि= चिंतिलेले- जे इष्ट,योग्य असेल- ते प्राप्त करून देणारे स्वर्गीय रत्न; आर्णव= समुद्र, सागर; पीयुष=अमृत, लांछन= दोष, डाग, कलंक).

ज्ञानदेव म्हणतात, हे सत्पुरुष चालत्या-बोलत्या, जिवंत कल्पतरुंची उपवने, उद्यानेच आहेत. त्यांच्या सावलीत बसले की सर्वांच्या मनातील इच्छा अनायासे पूर्ण होतात. ते जिथे वसती करतात ते चिंतामणीचे म्हणजे ते ते गाव चिंतामुक्तांचे गाव होऊन जाते. तेथील लोक जे काही इष्ट,चांगले चिंततील ते त्याना प्राप्त होऊन भूतळावरील सर्व लोकांच्या सर्व चिंता ह्या ईश्वरनिष्ठांच्या मुक्कामी दूर होतात. अशा ईश्वरनिष्ठांच्या सहवासाने, ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागितलेले, जो जे वांछिल ते त्याला का मिळणार नाही?

त्यांच्या बोलण्याचे काय वर्णन करावे? त्यांचा प्रत्येक बोल अमृताचाच असतो. ते जे सांगतात, बोलतात ते अमृतच हे खरे, ते अमृताइतके मधुर हेही खरे पण हे जास्त खरे की त्यांचे बोलणे हे सर्वांना संजीवक होते! सर्वांचे जीवन पुन्हा उजळून टाकणारे असे त्यांचे बोल असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचे शब्द अमृताचा सागरच आहे! ज्ञानेश्वरांच्या ईश्वरनिष्ठांचे सर्व व्यवहार,आचरण सत् आणि शुद्ध असते. हे सत्पुरूष म्हणजे कोणताही डाग, ठिपका किंवा दोष नसलेले चंद्र आहेत. एव्हढा धवल शीतल चंद्र पण त्या चंद्रावरही डाग असतो. पण हे सज्जन पूर्णपणे निष्कलंक आहेत. सूर्य प्रकाश देतो त्याचबरोबर त्याचा दाहक तापही सर्व चराचराला होतो. पण हे ईश्वरनिष्ठ सर्वांना फक्त प्रकाश देणारेअसे तापहीन सूर्य आहेत. हे संत-सत्पुरुष, सज्जन,सदासर्वदा, सर्वकाळी आमचे आप्तच होवोत.

पुन्हा सांगायचे तर, हे ईश्वरनिष्ठ सत्पुरुष आमच्या भूमंडळी सतत येत राहोत, ते आमचे जवळच्या आप्तासारखेच होऊन त्यांनी आमच्या समवेत राहावे. आम्हाला त्यांचा सत्संग सदैव लाभो, हा प्रसाद ज्ञानेश्वर महाराज मागतात. असा निरंतर सत्संग लाभल्यावर, ज्ञानेशेवर माऊली आपल्या सदिच्छापूर्ण मागणीची उंची आणखी वाढवताना म्हणतात,

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिन्ही लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।। ७।।

(किंबहुना = फार काय, इतकेच नव्हे या पेक्षा; आदिपुरुखी=आदिअनादि असा पुरुष; परमात्मा.)

ईश्वर निष्ठांचा निरंतर सत्संग लाभल्यावर, इतकेच नव्हे तर, सर्वव्यापी आदिपुरुषाचे अखंड भजन,उपासना करून तिन्ही लोकांतील सर्व लोक पूर्ण सुखी होवोत; असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते पुढे म्हणतात,

आणिग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्टविजये । होआवे जी।।८।।

(दृष्टादृष्ट= दिसणारे आणि न दिसणारे, इह व परलोक.)

ह्या ग्रंथात उपदेश केलेल्या शिकवणुकीचे पालन करून त्याप्रमाणे सदविचार, सदभावाने आणि सदाचरणाने जे वागतील ते ह्या दृश्य जगात आणि अव्यक्त लोकातही विजयी होवोत. त्यांचे इहलोकी आणि परलोकीचे जीवनही कृतकृत्यतेचे होवो. ही अपूर्व प्रार्थना ऐकल्यावर,

तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।९।।

[विश्वेशरावो= ह्या ओवीत हे पद ज्ञानेश्वरांनी आपले थोरले भाऊ आणि गुरू निवृत्तिनाथांना उद्देशून वापरले आहे. अव्यक्त विश्वात्मकाचे निवृत्तिनाथ हे व्यक्त,सगुण, साकार स्वरूप आहे हा ज्ञानेश्वरांचा दृढ विश्वास होता. (दान) पसावो=दानाचा प्रसाद प्राप्त होईल; पसायदान होईल) ]

ही प्रार्थना ऐकल्यावर विश्वेशरावो निवृत्तिनाथांनी अत्यंत संतोषाने, ज्ञानदेवाला तथास्तु, तसेच होईल, तुझी पसायदानाची प्रार्थना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला. तो ऐकून, सर्व त्रैलोक्य सुखी होणार ह्या विचाराने ज्ञानदेव धन्य झाले. सुखी झाले.

दिसणारा देव

रेडवुड सिटी

आमच्या आजोबांना आम्ही बाबा म्हणत असू. बाबा महिन्यातून एकदा आत्याकडे जात असत. त्यावेळी त्यांचा पोशाख पाहण्यासारखा असे. धोतर जाडसर असायचे. पण स्वच्छ धुतलेले, पांढरे शुभ्र. तसाच सदरा आणि डोक्याला पांढरा रुमाल, म्हणजे फेटा.उपरणे असायचे की नाही आठवत नाही. बाराबंदी असायची तर सदऱ्यावर कधी जाकीट. आणि ते टांग्यातून जात असत. टांग्यातून जायला मिळते म्हणून मीही जात असे. बाबांनी एरव्ही चालताना काठी वापरल्याचे आठवत नाही. पण बाहेर जाताना ती बरोबर घेत. एक म्हणजे रुबाब वाढे. शिवाय टांग्याच्या मागे कधी कुत्री पळत येत. त्यांना हटवायला काठी उपयोगी पडे!

भाद्रपदात पक्षपंधरवडा असतो. त्यावेळी आणि त्यांच्या आई वडिलांच्या श्राद्धाच्या तिथी अगोदरही ते बाजारात जात. बहुधा  कुणाची तरी तिथी उन्हाळ्यात असे. त्यामुळे बेत आंब्याच्या रसाचा असे. टांगा करूनच जात. मग काय आमचीही मजा असे. ते बाजार -किराणा भाजी- मोठ्या झोळ्यातून आणत.आंबेही झोळी भरून आणत. तिथे बाजारात नमुना म्हणून रस पुष्कळ पोटात जाई. ती एक निराळीच मजा ! कधी बाजारातूनच आत्याकडे जात. तिथे काफी होई. काफी असेच म्हणत बहुतेक सगळेजण. काफी अगदी गोड पाहिजे असे त्यांना. तशी झाली की समाधानाने ते,”छान केली होतीस. गुळचाट झाली होती.”अशी करणाऱ्याला शाबासकी देत.

बाबांचा असाच पोशाख दसऱ्याला शिलंगणाला पार्कवर जाताना असे.सगळा पोशाख नविन असे.आम्हा सगळ्यांना प्रश्न पडे हे कधी सटीसहामासी दिसणारे कपडे इतर वेळी कुठे गायब ह्वायचे ? कारण घरात त्यांचा पोशाख एकदम वेगळा म्हणजे हेच का ते बाबा? असा प्रश्न पडावा असा असायचा. पंचासारखे धोतर, ते गुडघ्याच्या किंचित खाली इतक्याच लांबीचे! त्यावर कुठला तरी सदरा. कधी त्यावर तसलेच जाकीट.पण सगळे धुतलेले तरी धुवट मळकट वाटत. पण आमचे तिकडे कधी फारसे लक्षही नसे म्हणा.

बाबा आम्हाला,लहर आली,की भीती दाखवत.बहुतेक वेळा ते पुढच्या दाराच्या मधल्या पायरीवर बसलेले असत. ते आपले डोळे वर नेत, तोंड उघडे ठेवून डोके किंचित मागे नेत. भुवया वर गेलेल्या. बुबुळे वयामुळे धुरकट पांढरट झालेली. उघड्या तोंडात वरच्या बाजूच्या दोन्ही कडेला एखाद दुसरा लांबट पिवळसर दात, खालच्या बाजूचेही एक दोनच दात,तेही अंतरावर.त्यांचे असे रूप पाहिले की आम्ही घाबरत तर असूच पण हसत हसत ,” बाबा पुन्हा एकदा! पुन्हा एकदा भीती दाखवा” म्हणत त्यांच्या पाठीमागे लागत असू! त्या घाबरण्यातही केव्हढा आनंद असे.

बाबा श्रावणी करत. त्यावेळी आमचे नातेवाईक तर येतच पण एक दोन शेजारी येत. दोन चार भटजीही असत.श्रावणीत जानवी बदलतआणि  किंचित शेणही खायला लागे. श्रावणी विषयी इतकीच माहिती होती आम्हाला. तो भाग आला की ते काडीच्या टोकाला लागलेले इतकेसे असले तरी ते कसे टाळायचे हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात असे! तरी बरे हा प्रसंग माझ्यावर एकदा दोनदा आला असावा. कारण मुंज झाली नव्हती तोपर्यंत फक्त प्रेक्षकाचेच काम असे!प्रेक्षक म्हणूनही माझ्या आठवणीत श्रावणी हा प्रकार एक दोनदाच झाल्याचे आठवते. कारण बाबाही थकलेहोते. त्यांनी श्रावणी बंद करून टाकली. ती कायमची बंद झाली.

बाबा सगळ्यांसाठी जानवी स्वत: करत. त्यासाठी कापसाची टकळी घेऊन तिचे सूत भिंगरी फिरवत ते काढायचे. भिंगरी फिरवताना घसरु नये म्हणून थोडी रांगोळी असलेल्या वाटीत ती धरून ते एका हातातली कापसाची टकळी वर नेत नेत दुसऱ्या हाताने भिंगरी फिरवत तिला सूत गुंडाळत पुन्हा तो हात हळू खाली आणीत. हे असे खाली-वर किती वेळ चालत असे! आणि किती दिवस! त्यानंतर ते सूत एका बाजूने बाबा धरत; दुसऱ्या बाजूने अक्का धरायची.(अक्का म्हणजे आजी.) आणि त्या सुताला पाण्याचा हात लावून पिळा देत. मग त्याची जानवी बाबा करीत! त्यातही बरेच दिवस जात असावेत. पण जानव्याचे सूत म्हणजे दोरी वाटावी इतके जाडअसे! दणकट आणि टिकाऊ! पण जानवी तयार होई पर्यंतचे दृश्य पाहण्यासारखे असायचे.ह्या दरवाजाला बाबा ऊभे; तिकडे त्या दरवाजापाशी अक्का. कधी दमली तर भिंतीपाशी असलेल्या काॅटवर बसायची. बाबा फार कमी बोलत. पण अक्का बोलत असायची. पण बाबा ते कधी ऐकत असतील असे वाटत नव्हते. ते आपल्या जानव्याच्या कारागिरीत दंग असल्याचे दाखवत.

अचानक बाबांची आठवण का झाली ? गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे हे माहित होते. परवा त्यातील काही शब्दांचा अर्थ व त्यातून होणारे सुर्याच्या गुणकार्याविषयीचे वर्णनात्मक शब्द पाहात होतो. आणि  मागे माईने बोलता बोलता,  बाबा संध्याकाळी सूर्याला नमस्कार करताना आपल्याला काय सांगत, ते सांगितलेले आठवले!

बाबा नेहमी प्रमाणे पायरीवर बसलेले असत. रोज संध्याकाळी सूर्य मावळताना ते नमस्कार करीत. ते आम्हाला म्हणत, अरे ह्याला नमस्कार करा! हा दिसणारा देव आहे! नमस्कार करा”

दिसणारा देव ! सूर्याचे फक्त दोन शब्दांत इतके नेमके  सुंदर आणि यथार्थ वर्णन मी कुठे वाचले नाही की ऐकलेही नाही.

सूर्य, दिसणारा देव, म्हणून बाबांची आठवण झाली!

ती. अण्णांच्या काही आठवणी

रेडवुड सिटी ता.१५ डिसेंबर २०१७

काल  १४ डिसेंबर रोजी गदिमांच्या सुनेने त्यांच्या अखेरच्या दिवसाची साद्यंत हकीकत लिहिलेला हृदयस्पर्शी लेख वाचल्यावर ‘फार मोठा माणूस’ हेच मी मनात म्हणालो.त्याच वेळी चंदूने त्याची गदिमांशी झालेल्या भेटीची हकीकत, किती उत्साहाने सांगितली होती, तिचीही आठवण झाली.

गदिमा विधानपरिषेदेत सभासद होते. तिथे चंदूची आणि त्यांची भेट झाली. चंदूने त्यांना आपली ‘पावसांच्या थेंबांची वाजंत्री पानापानांवर वाजते’ही कविता वाचून दाखवली. ती ऐकल्यावर ते प्रसिद्ध कवियत्री शांताबाई शेळकेंना हाक मारून म्हणाले, “अहो इकडे बघा, काय सुंदर कविता लिहिलिय ह्याने” , असे म्हणून कवितेतील दोन तीन ओळीही त्यांनीस्वत: वाचून दाखवल्या त्यांना!

गदिमांची रसिकता आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उमदेपणाची जाणीव होते!

ह्यावरून मला आमच्या ती. अण्णांची आठवण झाली. तेही त्यावेळचे प्रख्यात साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककारआणि महाराष्ट्र-गीताचे कवि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि मराठी कवितेला रोमॅंटिसिझमचे वळण देणारे रविकिरण मंडळाचे अध्वर्यु, संस्थापक कविवर्य माघव ज्युलियन( प्रेमस्वरुप आई, वाघ बच्छे फाकडे भ्रांत तुम्हा का पडे असे विचारुन मराठी माणसाला पुन्हा जागवणारे, मराठी असे आमुची मायबोली… तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू असे मायमराठील वचन देणारे कविश्रेष्ठ) यांच्या आठवणी अण्णा सांगत.

अण्णा काॅलेजात असताना-फर्ग्युसन,लाॅ काॅलेज-त्यांच्या कविता मासिक मनोरंजन यशवंत मध्ये येत असाव्यात. प्रा. डाॅ माधवराव पटवर्धन म्हणजेच कवि माधव ज्युलियन,रविकिरण मंडळात इतरांना अण्णांची ओळख करून देताना “आमचे तरुण कविमित्र” असाच उल्लेख करीत असे अण्णा सांगत. रविकिरण मंडळातील कवि गिरीश, यशवंत आणि ग. त्र्यं माडखोलकर यांची आणि अण्णांची चांगली ओळख होती.

ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक व “तीन शहाणे”हे चांगले प्रसिद्धीला आले होते.त्यामुळे त्यांची आणि श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली असावी. नाटक मंडळींत किंवा इतर मोठ्या लोकांकडे जातांना काही वेळेला ते अण्णांनाही बरोबर घेऊन जात. तिथे ते स्वत: गादीवर तक्क्याला टेकून आरामात बसत.अण्णा त्यांचा मान राखून सतरंजीवर बसत. लगेच कोल्हटकर गादीवर हात थापटत अण्णांना म्हणायचे,” अहो कामतकर, इकडे या, अहो आपण नाटककार आहोत, इथे बसा ,”असेम्हणत ते त्याच्या शेजारी अण्णांना बसवून घेत,

ह्या आठवणी सांगताना अण्णा म्हणायचे, ह्या लोकांचा केवळ माझ्यावरचा लोभच नाही तर तितकाच त्यांच्या मनाचा मोठेपणाही होता!”

अण्णा फर्ग्युसनमध्ये असताना त्यांनी ‘वसतीगृहात’ नावाचे विनोदी प्रहसन लिहिले होते. त्याचे आमंत्रण स्वीकारताना  साहित्यसम्राट न.चि. केळकरांनी स्पष्ट केले होते की मी फार तर दहा मिनिटासाठी येईन. प्रयोगाला ते आले. फर्ग्युसनचे ॲम्फी थिएटर गच्च भरले होते. न. चि. केळकरआले. प्रयोगाच्या सुरवातीपासूनच हशा टाळ्या सुरु झाल्या. पुढे पुढ तर मुलांनी थिएटर डोक्यावर घेतले. साहित्यसम्राट प्रयोग संपेपर्यंत थांबले होते हे सांगायला नको. प्रयोगाच्या अखेरीस केलेल्या भाषणात त्यांनी,”मी निमंत्रण स्वीकारताना फक्त दहा मिनिटेच थांबेन हे स्पष्ट केले होते पण प्रयोग पाहायला लागलो आणिवगैरे ….” ह्याचा आवर्जून उल्लेख केला व प्रहसानाच्या लेखकाची प्रशंसाही केली! केसरीचे संपादक, नाटककार, इतिहासकार, व महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या व्यक्तींकडून कौतुक होणे ही काॅलेजमधील तरुणाला किती अभिमानास्पद असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.

अण्णा ही आठवणसांगत ती माझ्या जन्मापूर्वीची आहे.मला वाटते त्यावेळेस वासुनानाचाही जन्म झाला नसेल. अण्णा आबासाहेब ती.बाबा वगैरे रिठ्याच्या वाडायात राहात होते. हा वाडा शुभराय महाराजांच्या मठाच्याही पुढे शनीचे देऊळ, गद्रेंच्या वाड्याच्या जवळपास आहे. आता तिथे रिठ्याची झाडे आहेत की नाहीत कुणास ठाऊक.

रविकिरण मंडळाच्या सप्तर्षींपैकी व महाराष्ट्रातही लोकप्रिय असलेले कवि गिरीश यांचे अापल्याकडे येणे होत असे. कवि गिरीश म्हणजे ‘ रायगडाला जाग येते, वेड्याचे घर उन्हात, सूर्याची पिलेअशा नाटकांचे लेखक वसंत कानेटकरांचे वडील. कवि गिरीश सांगलीच्या विलिंग्डन काॅलेजात प्राध्यापक होते. ते आले की काव्यशास्त्रविनोदाला साहजिकच बहर येई.गिरीश त्यांच्या कविता म्हणत असत. ते खऱ्या अर्थाने काव्यगायन असे. ते कविता चालीवर छान म्हणत, असे अण्णा सांगत. कधी तरी अण्णा गिरीशांची नक्कल करत ” गेले तुझ्यावर जडून, रामा मन गेले तुझ्यावर जडून” ‘ ही शूर्पणखा रामाला आपले प्रेम उघड करून सांगतेय ती कविता म्हणत. गिरीशांची ही कविता सर्व रसिक गुणगुणत असत! पुढे ह्या कवितेच्याच चालीवर अनेक कविता झाल्या. त्या कवितांची चाल/वृत्त दर्शवताना कवि ‘चाल- गेले तुझ्यावर मन जडून’ असाच उल्लेख करत!

आचार्य अत्रे आमच्या घरी आले तेव्हा बरेच लोक जमले होते. आचार्य अत्रे घरात येण्याआधी लोकांनी नारळ ओवाळून तो फोडला! त्यांचा मोठा आदर केला. ही आठवण आई-अण्णा दोघेही सांगत. ही हकीकत मी नुकताच जन्मलो त्यावेळची, म्हणूनही त्या संदर्भात आई सांगत असावी.

गडकरी किंवा आचार्य अत्रे यांच्या इतके चिं. वि जोशी गडगडाटी हसवत नसतील. पण ते वाचकांना हसवत ठेवीत हे नि:संशय! आमच्याउन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्यामुळे सतत हसण्यात गेल्या. सुट्टी कधी उन्हाळ्याची वाटतच  नसे! चिमणराव, गुंड्याभाऊ आणि त्यांचा आवडता सोटा, चिमणरावांची मुलं मोरु राघू आणि मैना, बाजाची पेटी आणि आपल्या पोपटाच्या पिंजऱ्यासहितआलेली व पेटी वाजवत वाजवत नाट्यगीते म्हणणाऱ्या स्वैपाकीण काकू , तसेच चि.विं चे ओसाडवाडीचे देव; भली मोठी लोखंडी ट्रंक भरून चिमणरावांसाठी ‘ इस्टेट  ‘ ठेवणारे त्यांचे दत्तक वडील कोण विसरेल? तर हे प्रख्यात विनोदी लेखक चिं. वि. जोशीही आमच्या घरी अण्णांना भेटायला  येत असत.उन्हाळ्याच्या सुट्टीत ते येत.एक दोन रविवारी त्यांचे येणे होत असेल. आम्हाला विनोदी लेखक म्हणजे सारखे हसणारे, हसवणारेअसतात असे वाटायचे. पण चिं.वि.जोशी शांत आणि गंभीर मुद्रेचे होते. अण्णांचे आणि त्यांचे बोलणे चालू असे. आम्ही मध्येच मधल्या खोलीतून डोकावून पाहून जात असू.

सोलापूरला १९४१/४२ साली मराठी साहित्य संमेलन झाले त्याचे वि. स. खांडेकर हे अध्यक्ष होते. त्या आघीपासून नाटककार कवि लेखक म्हणून साहित्यवर्तुळात अण्णांची ओळख होती.त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णा असतील अशी बऱ्याच जणांची अपेक्षा होती. त्यामध्ये खांडेकरही असावेत. पण ते पद अण्णांना मिळाले नाही. तेअसो. पुढे जेव्हा वि. स. खांडेकरांना  ज्ञानपीठ पारितोषिकचा सर्वोच्च सन्मान लाभला तेव्हा होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण पत्र अण्णांना आले होते. सोलापुरात फक्त एकट्या अण्णांनाच हे आमंत्रण होते ! ह्याचा मात्र अणांना अभिमान वाटला, आणि खांडेकरांनी आठवण ठेवली याचा आनंदही ते व्यक्त करीत.

तर अण्णांमुळे आमच्या घरचे वातावरण असे साहित्यिक असायचे !

उंदराचा पिंजरा

रेडवुड सिटी

आता उंदराचे पिंजरे दिसत नाहीत.कारण आता बहुतेक गावातले उंदीर कमी झाले आहेत. निदानपक्षी घरांतील उंदीर तरी कमी झाले आहेत. अणि जिथे असतील तिथे हल्ली उंदराचे औषधच जास्त वापरले जाते. हे लक्षात येण्याचे कारण नुकतेच मी ॲगाथा ख्रिस्टीचे The Mouse trap नाटक वाचायला घेतले आहे. आणखी एक कारण, तिचा The Murder on Orient Express हा सिनेमा नुकताच लागला आहे.

ॲगाथा ख्रिस्टी  कोण हे सांगावे लागत नाही. शेरलाॅक होम्स चा जनक सर काॅनन डायल इतकीच किंवा काकणभर जास्तच ती प्रसिद्धच नव्हे तर लोकप्रियही आहे. तिच्यावर एडगर ॲलन पो (हाही रहस्य कथा लिहित असे.) काॅनन डायल, जीके चेस्टरटन यांचा प्रभाव होता. रहस्य वांड.मयाची ती अनभिषिक्त राणीच मानली जाते. सर काॅनन डायलचा  जसा शेरलाॅक होम्स तसे  ॲगाथा ख्रिस्टीचे हरक्युल पायराॅं आणि मिस मार्पल हे दोन डिटेक्टिव्ह जगप्रसिद्ध आहेत.

लेखकाने लिहावे म्हणजे किती? तिने ६६रहस्यमय कादंबऱ्या, रहस्यकथा संग्रह १४, नेहमीच्या कादंबऱ्या ६, १२ नाटके आणि इतरप्रकारची म्हणजे आपले आत्मचरित्र आणि आपल्या पुराणवस्तु संशोधक (पुरातत्वशास्त्रज्ञ)असलेल्या नवऱ्याच्या संशोधनाच्या दौऱ्यात तीही जायची,त्या दौऱ्यासंबंधीत प्रवासवर्णनाची तीन पुस्तके लिहिली आहेत. तिच्या रहस्यकथा, कादंबऱ्यांवर बरेच चित्रपट निघाले आहेत. शिवाय TV साठीही अनेक कथा कादंबऱ्याच्या मालिका झाल्या आहेत!

तिच्या नवऱा पुराणवस्तु शास्त्रज्ञअसून तोही त्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध होता. त्याच्या कामामुळे त्याला Sir हा किताब मिळालेला आहे.

अॅगाथा ख्रिस्टीने तिचे The Mouse Trap नाटक ती रहस्य कथा,कादंबऱ्यातून विरंगुळा म्हणून  सुट्टी घ्यायची त्या विरंगुळ्याच्या दिवसात तिने लिहिले आहे! अॅगाथा ख्रिस्टीचा  जन्म १८९० साली झाला. ती वयाच्या ८५व्या वर्षी १९७६ साली वारली.

तिच्या पुस्तकांची विक्रीही तितकीच प्रचंड आहे.फक्त बायबलआणि शेक्सपिअरच तिच्या पुढे आहेत. तिच्या मूळ इंग्रजी पुस्तकांच्या एक अब्जाहून जास्त प्रति विकल्या गेल्या आहेत. तिची पुस्तके जगातील ४४ भाषांतून प्रसिद्ध झाली. त्यांची विक्रीही एक अब्ज आहे!

म्हणजे एकूण दोन अब्ज प्रति विकल्या आहेत! हा सार्वकालीन(all time great) विक्रम आहे!

पण हे सर्व विक्रम, इतके ग्रंथ, इतक्या भाषांतून झालेली भाषांतरे ह्यापेक्षा हया रहस्य-राणीच्या मुकुटातील चमकणारा हिरा म्हणजे तिचे The Mouse Trap हे नाटक!

माऊस ट्रॅप नाटक १९५२ साली रंगभूमीवर आले. पहिल्या प्रयोगापासून ते गाजू लागले.पुढे तर गर्जू लागले. नाटकातील नट-नट्या किती वेळा बदलले असतील, दर पिढीतले नवे नवे नट काम करताहेत ! थेटरमधले फर्निचरही  किती वेळा बदलले असेल इतकेच काय प्रेक्षकांच्याही किती पिढ्या हे नाटक पाहात असतील आणि आतापर्यंत किती लोकांनी, तेही देशोदेशीच्या, याची गणती कोणी केली असेल तर ते आकडे पाहूनच  लोक तोंडात बोटे घालतील! इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातले असंख्य  प्रवासी लंडन पहायला येतात तेव्हा त्यांच्यातील नाट्यरसिक माऊस ट्रॅप नाटक पहायला आवर्जून येतात! मॅदाम तुसाॅंचे,जगप्रख्यात सजीव वाटणाऱ्या मेणाच्या पुतळ्यांचे म्युझियम किंवा लंडनचा टाॅवर ब्रिज पहायला जगातील लोक धडपडून जातात तसेच ते ॲगाथा ख्रिस्टीचे माऊस ट्रॅप नाटक पाहायला जातात! हे नाटक आजही चालू आहे! सतत ६५ वर्षे झाली ह्या नाटकाचे प्रयोग होतच आहेत. अक्षय-नाटक,अजरामर, चिरंजीव ही विशेषणे शोभून दिसणारे एकच एक असे हे एकमेव नाटक आहे.

काही लोक सुरवातीची एकदोन वर्षे म्हणायचे की,”अहो थिएटर लहान म्हणून चालत असणार.”  The Ambassadors Theatre मध्ये पहिला प्रयोग झाला १९५२ साली. त्यात २००प्रेक्षकांची सोय आहे.पण त्याचा प्रतिवाद करणाऱ्यांचे म्हणणे बरोबर आहे. ते म्हणतात, १९५२पूर्वीपासून हे थिएटर आहे. दुसरी नाटके होतच होती. मग ती का नाही चालली इतका काळ? ती का प्रवाशांचे आकर्षण झाली नाहीत? अलीकडच्या काळात ते सेंट मार्टिन या थिएटर मध्ये होते.

ह्या पहिल्या प्रयोगात आपल्याला माहित असलेला प्रख्यात सर रिचर्ड अॅटनबराह् ह्याने डिटेक्टिव्ह सार्जंट ट्राॅटरचे काम केले होते. हा पुढे प्रख्यात झाला. पण आपल्याला तो’गांधी’ सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून जास्त माहितीचा आहे.

नाट्यप्रयोगाचे एक वैशिष्ट्य आहे; नाटक संपले की एक नट बाहेर येऊन प्रेक्षकांना विनंती करतो की आम्हाला एक वचन द्या की तुम्ही ह्या नाटकाचा शेवट कुणालाही सांगणार नाही. असे म्हटले जाते की आजपर्यंत तरी प्रेक्षकानी दिलेले वचन पाळले आहे. जेव्हा ह्या नाट्यप्रयोगाची ६० वर्षे-सुवर्ण जयंती-झाली त्या प्रयोगाच्या अखेर पहिल्या प्रयोगात काम केलेल्या आणि त्यावेळी अखेरीस हेच भाषण करणारा नट सर रिचर्ड अॅटनबराह् आला आणि त्याने तेच भाषण दिले!

गंमत अशी की जेव्हा पहिल्या प्रयोगाचा दिग्दर्शक आणि ती बोलत असता तो म्हणाला,” हे नाटक चौदा महिने चालेल.” त्यावर ॲगाथा म्हणाली,” छे:! मला नाही वाटत. फार तर आठ महिने, हां, आठ महिने चालेल!”

पाहा, आजचे त्या नाटकाचे पासष्ठावे वर्ष चालू आहे. आणिन२०१९ सालच्या तिकिटांची विक्री चालू आहे!

तिच्या पुस्तकांतून अनेकांनी निवडलेली बरीच म्हणजे दोनहजार तरी वचने/वाक्ये असावीत. त्यातली एक दोन पहा, ” One doesn’t recognizes the really important moments in one’s life until it’s too late.”

” Very few of us are what we seem.”

आणि तिच्या आत्मचरित्रातल्या वाक्याने या नाटकाच्या लेखावर पडदा पाडू या.

हे वाक्य तुम्हाला तिचा नवरा आर्किआॅलाॅजिस्ट आहे हे आठवत असेल तर निश्चित हसवेल – ” Archaeologist is the best husband a woman can have. The older she gets the more interested he is in.”

बीजाक्षरांचा व्यावहारिक मंत्रकोश

रेडवुड सिटी

नुकतीच माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्या पुस्तकांत काही मुळाक्षरे अनुस्वार दिल्यावर मंत्राक्षरे होऊन ती बऱ्याच व्याधी दूर करतात असे आत्मविश्वासाने सांगितले आहे. त्यासाठी शरीरात सहा चक्रे असतात. ती पाकळ्यांची असतात. त्यावर आणि पर्यायाने संबंधित अवयव किंवा संस्थांवर ही मुळाक्षरे परिणाम करतात ते स्पष्ट केले आहे. प्रत्येक चक्रांची वेगवेगळी बीजाक्षरेही दिली आहेत. कोणत्या व्याधीसाठी कोणती मुळाक्षरे म्हणायची तीही यादी दिली अाहे. अक्षरावर अनुस्वार दिला की मंत्र होतो ही साधी युक्ति त्यासाठी वापरली आहे. काहीजण म्हणतात की कुठेही अनुस्वार दिला की ती अक्षरे, शब्द संस्कृत होतात! संस्कृत इतके सोपे आहे हे मला कळले असते तर मी म्यॅट्रिकला अर्धमागधी घेतले नसते!
काही म्हणा, सोपा उपाय असे म्हटले असले तरी ते पुस्तक मला अवघड वाटले म्हणून दुसरे पुस्तक वाचायला घेतले.

त्या दुसऱ्या पुस्तकात बद्धकोष्ठ, गॅसेस, गुबारा, तंबाखू, त्याहीपेक्षा गांजा खाण्या ओढण्याने परसाकडला त्रास होतो. तो त्रास केवळ त्या माणसालाच होत नाही तर त्याच्या संडासातील दीर्घकालीन स्थानापन्न अवस्थेमुळे बाहेर टमरेलघेऊन रांगेत उभे राहिलेल्यांनाही होतो. हा त्रास टाळण्यासाठी लेखकाने, “कुं थु न कुं थु न कुं थ शी ल कि ती ,” हा बीजाक्षरी मंत्र सुटका होईपर्यंत मोठ्याने जपायला सांगितले आहे. पुन्हा त्यानेच दिलासाही दिला की संवयीने हा अक्षरमंत्र आपोआप तोंडातून आवाजरुपानेही बाहेर येत राहतो. शिवाय आपल्या पूर्वजांपासून हा मंत्र म्हणला जात आहे ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही त्याने दिली आहे. मुळव्याध झालेल्यांसाठी प्रथम हाच “कुं थुं… ..”
मंत्र लागू आहे पण त्यांच्यासाठी त्याने अॅडव्हान्स कोर्समधील ” आ आ आs आss ग ग ग आ आ आआ
Sssss ई आई ग गsss! हा मंत्रही सांगितला आहे. तो म्हणताना त्यातील “दीर्घ उच्च स्वरांच्या खुणांकडे ” विशेष लक्ष देऊन म्हणावा अशी सूचना केली आहे. त्यापुढचे लेखकाचे निरिक्षण जास्त व्यवहारी वाटते. तो म्हणतो, या सूचनेकडे लक्ष न देताही खुणांपेक्षाही मोठ्या आवाजात तो म्हणू लागतो.काही वेळा हा मंत्र म्हणून झाल्यावर जुनाट रोगी अनेकदा ‘निपचित पडणे’ हे आसनही त्यांच्या इच्छेविरुद्ध करतात.

आपल्याला जेवताना काही वेळा उचकी लागते. पाणी प्याल्यावर ती थांबते. हा अनेकांचा अनुभव आहे.इतर वेळीही उचकी लागते.हाही अनेकांचा अनुभव आहे. उचकी देताना हनवटी वर जाते, चेहरा वर आणि डोके किंचित मागे जाते, हा सुद्धा अनेकांचा अनुभव आहे. उचकी लागते त्यावेळी “उ् उ उ्उ, अ्ह् ह् ह् उ्ह्उ्क् उक् ” हा बीजाक्षरी मंत्र जपावा. शेवटचा उ्क् दोन वेळा आपोआप म्हटला जातो. ह्या मंत्रात अनुस्वार ऐच्छिक आहे असे त्यानी विशेष सूचनेत म्हटले आहे.

जेवताना स्वत:हून बरंच हादडले असेल किंवा तुमच्या सर्वांच्या आग्रहाला बळी पडून जोरदार खाल्ले असेल तर जेवण झाल्यावर उचक्या येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ह्यामध्ये पोक्त वयाच्या लोकांचे आणि म्हाताऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊनलगेच उचकी-मंत्राच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्ही न सांगताही त्याने तो चालू केलेलाच असतो. पहिल्या प्रथम रोग्याला पाणी पाजावे. त्यात खायचा सोडा आणि लिंबाचा रस पिळल्यास जास्त चांगले असे म्हटले आहे. त्यानंतर वरील बीजाक्षरी मंत्र म्हणावा असे लेखक सुचवतात.लेखक पुढे म्हणतो, त्या उचकीग्रस्त व्यक्तीकडे लक्ष देऊन पाहा. कारण काही वेळा उचकी देताना व मंत्र म्हणताना तो डोळ्यांची बुबुळे वर नेतो, आणि तिथेच स्थिर ठेवतो. तो भ्रुकुटीमध्यात खेचरदृष्टी लावून निर्गुणाचे ध्यान करतोय या अध्यात्मिक समजुतीत राहू नका. मंत्र चालू असेल, तो जोरजोरात होत असेल व तुमच्या प्रोत्साहनाने तो तसा म्हणतच राहीला तर तुमच्या लवकरच ध्यानात येईल, निदान यावे,की त्या उचक्यांचे रुपांतर आता आचके देण्यात होऊ लागले आहे. अशावेळी त्याला बीजाक्षरी मंत्र म्हणण्याचा आग्रह न करता, कारण तो आपण जेवताना केलाच होता, ताबडतोब अॅंब्युलन्स बोलावलेली बरी!

रोजच्या आयुष्यात आपण काही गोष्टी न कळत करतो किंवा आपल्याकडून होतात. त्यापैकी ढेकर,आणि इतरही काही विशेष आवाजांचा समावेश होतो.

ढेकर ही सामान्यपणे जेवणाचे समाधान,पोट भरल्याची खूण आहे. त्यावेळेस ती तृप्ती एकदाच उमटते.पण व्यक्तीनुरूप संख्येत फरकही पडतो. किंवा ती एखाद्या अंतस्थ व्याधीचा उघड उदगारही असते. त्यावेळी माणूस सतत ढेकराच देत असतो. त्यावर उपाय म्हणून लेखक
” अssब्बा! अ्ह्sब ब्बा! हsब्! ह्हा्ब् ” हा बीजाक्षरी मंत्र म्हणायला सांगतो. ह्या अक्षरांबरोबर दिलेले उदगार चिन्ह म्हणायचे नाही. म्हणण्यासाठी ते दिले नाही. त्याचा आवाज काढून ते म्हणता येत असेल तर ते चिन्हही म्हणायला लेखकाची हरकत नाही! लेखकाने, ढेकर मंत्र म्हणताना प्रत्येकाचा चेहरा, भुवया, कपाळावर पडणाऱ्या आठ्यांची संख्या हे निरनिराळे असतात हे लक्षात घेतले आहे. उदगार चिन्ह त्यांचे निदर्शक आहे,इतकेच.

तसेच बरेच इतर आवाजही आपल्याकडून बाहेर पडतात. त्यामुळे माणूस अवघडून जातो. चेहरा ओशाळलेला होतो. दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्यांकडे ‘तो मी नव्हेच’ ही खात्री करून देण्यासाठी बघायला लागतो. अशा आवाजासाठी लेखकाने प्रत्येकाला ज्याचे त्याचे बीजाक्षरी मंत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ! तरीही एक सर्वसाधारण नमुना यासाठी दिला आहेच. तो असा, “ढों म ढां ढिंम् ढंम्म्.” मंत्राच्या सुरवातीला ओम् म्हणण्याचा विकल्प देऊन वातावरण सांस्कृतिक करण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे.
लेखक पुढे म्हणतो त्याने मर्यादा पाळून, बाहेर पडणाऱ्या अशा आवाजाच्या खालच्या पट्टीतील ‘सुर निरागस हो’ स्वरांसाठी मंत्र देण्याचे टाळले आहे.

माणूस हा जात्याच आनंदी खुशालचेंडू असला तरी काही वेळा तो आनंदी नसतो.स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी त्याने ” टां ग टिं ग टिं गा की टां ग टिं ग टिं गा ” हा किंवा लहानांनी,तरुणांनी ” ढां ग चि क ढां क चि क ढां क चि क” हे बीजाक्षरी मंत्र प्रथम सावकाश व नंतर भराभर म्हणण्यास सांगितले तर आहेच पण त्याबरोबर जसे येईल तसे नाचायलाही उदार मनाने परवानगी दिली आहे. ह्यामुळे परंपरेला आधुनिकतेचीजोड मिळून अनायासे एरोबिक्स साधते असे त्याला सुचवायचे असावे.

लेखकाने प्रसंगा प्रसंगानुरूप केलेल्या सूचना लक्षात घेतल्या तर त्याचे अचूक निरीक्षण व अनुभव ह्यांची प्रकर्षाने (हा एक आणि दुसरा अभिव्यक्ति हे शब्द समीक्षणात्मक परिक्षण करताना कटाक्षाने वापरावेतअसे सांगतात.) जाणीव होते. तसेच लेखकाची भाषाशैली आणि विशेषत: मंत्रांसाठी रोजच्या वापरातल्या बीजाक्षरांची योजना पाहिली की पुस्तकाचे ‘बीजाक्षरांचा व्यावहारिक मंत्रकोश’ हे नाव तर खूपच समर्पक वाटते.
इति बीजाक्षर व्यवहार मंत्रकोशस्य परिक्षण समाप्ता ! ओSम् टण् !

पंगतीची रंगत-संगत

साग्र-संगीत चारी ठाव स्वैपाक भुकेला चेतवत होता
डावी उजवी बाजू सजलेले ताट भरगच्च भरले होते रांगोळीच्या मखरात ते विराजमानही झाले होते

खमंग पदार्थ पक्वान्नांचा मधुर सुवास दरवळत होता
उदबत्तीचा सुगंधही त्या घाईगर्दीत मिसळत होता
चटण्या रायती कोशिंबिरी कुरड्या पापड भजी वडे सांडगे लोणची कोरसमुळे सारे संगीत साग्र होते

आमटी पंचामृत एकूण लिज्जत वाढवत होत्या
खीर शेवया गव्हल्या माधुरी सर्वांना वाटत होत्या
सुवर्णरस वरणाचा आंबेमोहरावर ओघळत होता
सुगंध लोणकढ तुपाचा पंगतभर पसरला होता
वाफेसह मसाले भात भरभर वाढला जात होता
नारळाचा चव तुपाधारेने सुखावला होता
आमटी कटाची आपली सलगी पुरणपोळीशी वाढवत होती

चवड केशरी जिलब्यांची रचली कधी समजत नव्हती मठ्ठ्याची वाटी काठोकाठ लगबगीने भरत होती
ताटात गुलाबी गोल पुऱ्या परीसारख्या उतरत होत्या
वाटी भरल्या श्रीखंडाला गुदगुल्या करत हसवत होत्या लच्छीदार बासुंदीत चारोळ्या आरामात तरंगत होत्या
तुपात झिरपल्या पुरणपोळीपुढे सारी दुनिया फिकी होती मऊसूत गोडी त्या घासाला स्वर्गातही तोड नव्हती

गेल्या घटका आस्वादात मग आग्रहाच्या फैरी झडू लागल्या
“घ्या! घ्या! वाढा वाढा! आणखी वाढा” मैत्रीच्या लढती सुरु झाल्या
हसण्या ओरड्यात “पुरे!पुरे! नको आता फार झाले”
सगळे आवाज घासांमध्येच विरघळून गेले
सुग्रास रंग पंगतीचा चढत वाढत चढतच राहिला
मारा तो आग्रहाचा होता तसाच चालू राहिला

जेवण झाले… सगळेजण तृप्त झाले
पाने विड्यांची रंगू लागली … तक्क्यावरचे डोळेही हळू हळू मिटू लागले…
….तृप्त होऊन कधी झोपले
त्यांनाही ते नाही समजले…!

चौफेर, चतुरस्त्र … सगळे सगळे फिक्के

रेडवुड सिटी

एखादा ‘ राॅक स्टार’ गायक आपल्या आयुष्याविषयी काही लिहेल किंवा लिहू शकेल अशी त्याच्या चाहत्यांचीही फारशी अपेक्षा नसते. बरे त्याने लिहिले तरी त्यात काय असणार असे विशेष? त्याच्याविषयी किंवा ‘बॅंड ‘मधील सहकाऱ्यांविषयी किस्से, एकमेकांची, प्रतिस्पर्ध्यांची उणीदुणी, त्याच्याविषयी प्रसारात असलेल्या गप्पा, अफवा यांचे खुलासे किंवा समर्थन; त्यातच मालमसाला घालून फोडणी दिलेल्या एखाद-    दुसऱ्या गाण्यांची किंवा गाजलेल्या कार्यक्रमाच्या आठवणी. असेच काही असणार. हे सरासरी गृहित असते.

ब्रुस डिकिन्सनने लिहिले तरी ते असेच काही असणार असे समजण्याची चूक करु नका.

Iron Maiden ह्या ८०-९०च्या दशकातील जागतिक कीर्तिच्या गान-वाद्यवृंदाचा ब्रुस हा मुख्य गायक. रंगभूमीच्या ह्या कडेपासून ते त्या टोकापर्यंत सतत एखाद्या खेळाडूसारखा हा वावरतो. मध्येच ढांगा टाकीत, लांब उड्या, उंच उड्या मारतो. त्याच्या आवाजाची जात आॅपेरा गायकासारखी आहे. वर पर्यंत आवाज चढवतो. प्रेक्षकानांही तो मधून मधून, “माझ्यासाठी तुम्हीही आवाज चढवा; आणखी,आणखी वर!” असे आवाहन करत असतो. चाहतेच ते! दाद देणारच. आपल्या गाण्यांनी, आवाजाने श्रोत्या-प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या ब्रिटिश ‘राॅक स्टार ‘ने नुकतेच What Does This Button Do ? हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे.

ब्रुस हा प्रख्यात ब्रिटिश जगप्रसिद्ध गायक आहे इतकी ओळखही पुरेशी आहे. माणसाला काही मर्यादा असतात हे सर्वांनाच माहित आहे.तशीच चतुरस्त्रतेलाही मर्यादा असतात असा आपला सार्थ समज आहे. पण संगीताच्या क्षेत्रात ‘ ब्रुस ब्रुस ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वत: डिकिन्सनला अशा मर्यादा असतील ते माहितही नसावे!

ब्रुस हा गायक आहे. जोडीने गिटार वादनही आलेच. तो गीतकारही आहे. संगीतही तोच देतो. १९८०मध्ये सॅमसन्स बॅंड मधून त्याची कारकीर्द सुरू झाली. पण एका वर्षातच तो तिथून बाहेर पडला. Iron Maiden मध्ये आला. इथून त्याची चढती कमान सुरू झाली. किर्ती होऊ लागली,नावही झाले. हे एक झाले. पण त्याने बीबीसीसारख्या नामवंत संस्थेसाठी २००२ ते २०१० पर्यंत स्वत: चे संगीताचे कार्यक्रमबीबीसी म्युझिक६ वर केले. दूरदर्शनवर Documentaries पेश केल्या. त्यापैकी काहींचे लेखन-निवेदन त्यानेच केले आहे. डिस्कव्हरी चॅनलने हवाई-शास्त्राचा (विमाने व तत्सम वाहने) यांचा इतिहास या विषयावर एक मालिका केली. त्यात ब्रुस डिकिन्सनचा महत्वाचा सहभाग होता. त्यामध्ये त्याची Flying Heavy Metal ही film ही दाखवली होती. ही मालिका इंग्लंडमध्ये डिस्कव्हरी टर्बो या वाहिनीवरही प्रसारित झाली होती. म्हणजे तो दूरदर्शनवरचा स्टार आणि कार्यक्रमांचा प्रसारकही( broadcaster)आहे.

ब्रुस डिकिन्सनने टीव्हीसाठी काही लेखन केले आहेच. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही की त्याने पुस्तकेही लिहिली आहेत! त्याचे पहिले पुस्तकThe Adventures of Lord Iffy Boctrace हे पुस्तक चांगले गाजले. त्याच्या पहिल्याच धडाक्यात ४०,०००प्रति खपल्यावर त्याच्या प्रकाशकाने – Sidgwic &Jackson- ह्या कादंबरीचा पुढचा भाग लगेच लिहायला सांगितला. ब्रुसनेही लगेच The Missionary Position लिहून दिली! ब्रुसने,ज्युलियन डाॅयल (हा दिग्दर्शकही आहे) बरोबर Chemical Wedding ही कादंबरी लिहिली. त्यावर सिनेमाही काढला. त्याची पटकथाही ह्या दोघांची आहे. आणखी एक पुस्तक  त्याच्या ‘बॅंड’ संबंधित असावे, Iron Maiden – A Matter of Life and Death हे पुस्तकही त्याने व त्याच्या सहकाऱ्याने मिळून लिहिले आहे.या काळातील दुर्मिळ वैशिष्ठ्य हे की तो आपले सर्व लिखाण आजही हातानेच लिहितो! अे-४च्या वह्याच्या वह्या भरून टाकतो.

ब्रुस डिकिन्सन हा बिअरचा चाहता आहे. त्यातूनच त्याने आपल्या चोखंदळ आवडीनिवडीतून एका बिअरची निर्मिती केली. प्रख्यात बिअर उत्पादक Robinson ह्यांच्या मद्यार्कशालेतील Marlyn Weeks  हा तज्ञ व ब्रुस यांनी मिळून Trooper नावाची बिअर निर्माण केली. तशीच बेल्जियमची अशी खास व प्रसिद्ध चवीची बिअर त्याने Hallowed नावाने  इंग्लंडमध्य् तयार केली. ट्रूपरची ४० देशात पहिल्याच वर्षी २५ लाख पिंटसची विक्री झाली होती!

डिस्कव्हरी चॅनलने हवाईप्रगतीचा इतिहास या मालिकेत ब्रुसचा जो लघुपट दाखवला त्यामागेही इतिहास आहे. ब्रुस डिकिन्सन हा वैमानिक आहे. तो काही काळ Astraeus Airlinesमध्ये वैमानिक होता. त्याच कंपनीत तो नंतर marketing Director ही होता. त्या कंपनीच्या एका ७४७-बोईंग विमानातून आपल्या बॅंडच्या सहकाऱ्यांना व कंपनीचे सर्व सामान,वाद्यांसकट, नेण्यासाठी त्याने आवश्यक बदल करून घेतले.त्या विमानातून त्यांच्या Iron Maiden चे जागतिक दौरे सुरुझाले. ह्या सर्व दौऱ्यात मुख्य गायक ब्रुस हाच मुख्य वैमानिकही होता! आपल्या विमानाचे नाव त्याने Ed Force Oneअसे ठेवले होते. त्या दौऱ्यापैकी बोस्नियातील सॅराजोव्ह ते इजिप्तच्या प्रवासाची ती फिल्म आहे. त्यावेळी त्या भागात युद्धाचेच वातावरण होते.
Astraeus बंद पडल्यावर त्याने स्वत:ची, Cardiff Aviation नावाची विमानांची देखभाल करण्याची कंपनी काढली. त्या कंपनीत ४०ते ६० लोक काम करत. ब्रुस डिकिन्सनने वैमानिक म्हणून फार महत्वाच्या कामगिऱ्या पाडल्या आहेत. इंग्लंडच्या सैनिकांना आणि ब्रिटिश हवाई दलाचा  वैमानिकांना अफगाणिस्तानातून सरक्षित आणण्याची कामगिरीही त्याने२००८ साली वैमानिक म्हणून पार पाडली आहे. २००६ मध्ये लिबिया आणि हेझबुलाह व इझ्रायलच्या लढाईमुळे लेबनाॅनमध्ये अडकून पडलेल्या २०० ब्रिटीश नागरिकांनाही त्याने विमानातून सुरक्षित परत आणले आहे. तसेच इंग्लंडचे  XL Airways चे विमान इजिप्तमध्ये पडले! त्यातील १८० प्रवाशांनाही ब्रुस डिकिन्सननेच परत आणले. इंग्लंडचे लिव्हरपूल व रेंजर्स या दोन फुटबाॅल संघाना त्याने २०१०मध्ये इटलीतील सामन्यासाठी व २००७ मध्ये रेंजर्सच्या संघाला इझ्रायलमध्ये नेले होते. दोन्ही वेळेस ब्रुसच वैमानिक होता. त्याहीपेक्षा महत्वाची कामगिरी म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील हवाई लढाईच्या प्रात्यक्षिकांत एक लढाऊ विमान ब्रुसच चालवत होता. ते महायुद्धातील हवाई लढायांची पुनर्नाट्यनिर्मिती होती. त्यामध्ये राॅयल एअर फोर्सची लढाऊ विमाने सहभागी होती. त्यांच्यात ब्रुस डिकिन्सनला भाग घेण्याचा सन्मान मिळाला होता!

ब्रुस डिकिन्सन उत्तम तलवारबाजी -fencing-करतो. ब्रिटनमध्ये त्याने सातवा क्रमांक पटकावला होता.ह्या आवडीपोटीच त्याने तलवारबजीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याच्या निर्मितीचा उद्योग सुरु केला त्याची उत्पादने Duellistनावाने ओळखली जातात. तलवारबाजीकडे वळण्याचे महत्वाचे कारण सांगताना तो म्हणाला,”हा खेळ तुमची बुद्धी तलवारी सारखीच टोकदार आणि धारदार ठेवते. मन व शरीर त्या पात्यासारखेच लवलवते ठेवते. आणि मला हा खेळ आवडतो! ”

ब्रुस डिकिन्सनची अर्थातच उद्योजक अशीही ओळख आहे. त्या मुळे त्याला ठिकठिकाणी भाषणे देण्यासाठीही आमंत्रणे असतात. ठळक उदाहरणे द्यायची तर २०१२ मध्ये क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, लंडन येथे तर २०१३ Connect2Buisness स्टाॅकहोम येथे, तर २०१५ मध्ये युरोपच्या Aviation Week’s च्या काॅन्फरन्समध्ये आणि मुंबईत २०१५साली त्याला Blog Now and Live Foreverमध्ये Key Speakerम्हणुन बोलावले होते. वर सांगितलेल्या ठिकाणीही तो बीज-वक्ता म्हणूनच आमंत्रित होता.

एकाच माणसाची किती रूपे किती व्यक्तिमत्वे! सप्तरंगी की शतरंगी म्हणावे ; अष्टपैलू,की शतपैलू; चौफेरी, चतुरस्त्र, चौपदरी का अष्टपदरी अशा कोणत्या शब्दांत ह्या माणसाला वर्णावे हा प्रश्न पडतो की नाही? कोणत्याही विशेषणांच्या आवाक्यात न येणारे हे व्यक्तिमत्व आहे.

परवा, दोन नोव्हेंबरला हा सॅनफ्रान्सिस्कोला आला आहे.गाण्याच्या कार्यक्रमासाठी पण त्याचबरोबर त्याच्या आत्मचरित्राच्या विक्रीवाढीसाठीही. जवळच असलेल्या मेन्लो पार्क या गावातील केपलर या दुकानात तो २तारखेलाच सही करून पुस्तके देणार होता. पण त्या अगोदर त्याचे भाषणही होणार होते. या कार्यक्रमाला १५डाॅलर ते ५० डाॅरची तिकीटे होती! हा कार्यक्रम कमी उत्पन्नाच्या गटातील मुलांची वांड.मयीन, वाचनाची, लिहिण्याची आवड वाढावी, प्रत्यक्ष उत्तेजन देण्यासाठी आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी होता.

चतुरस्त्र,अष्टपैलू,हरहुन्नरी याशिवाय आणखीही कोणत्या विशेषणांनी–या नामवंत गायक,गीतकार, संगीतकार, टीव्ही कलाकार, निवेदक, टीव्हीवर प्रश्नमंजुषा,संगीताचे असे विविध कार्यक्रम करणारा, निवेदक, कथा पटकथा लेखक, लेखक, वैमानिक, उद्योजक, वक्ता, बिअर उत्पादक, तलवारबाजीत निपुण, इंग्लंडतर्फे तलवारबाजीत आॅलिंपिक संघात निवड झालेला अशा,–ब्रुस डिकिन्सनचे वर्णन कुणाला करता येईल का याची शंकाच आहे!

त्याच्या पुस्तकाचा कार्यक्रम सिलिकाॅन व्हॅलीच्या मेन्लो पार्क गावात असूनही सर्व तिकीटे अगोदरच संपली कशी या प्रश्नावर ब्रुस म्हणाला,” रॅप आणि कंट्री संगीताच्या ललाटेच्या जमान्यातही Iron Maiden सारख्या hard metal bandच्या कार्यक्रमाला आजही सगळीकडे गर्दी लोटते. माहिती तंत्रज्ञांचे गाव असले तरी संगीत कुणाला आवडत नाही? १५ वयाच्या मुलांपासून ते पन्नाशीतल्या CEOपर्यंत माझे चाहते आहेत.”

काही दिवसांपूर्वी इथल्या मोठ्या वर्तमानपत्राने त्याची टेलिफोन वरून मुलाखत घेतली होती. त्याला विचारले की ” अजून ५९ वर्षेही झाली नाहीत तरी एकदम आत्मचरित्र का लिहायला घेतले. तो म्हणाला,” हीच योग्य वेळ आहे. पहिल्यापासून मला प्रत्येक काम, गोष्ट भराभर, कमीतकमी वेळेत आणि वेळच्या वेळी झाली पाहिजे असे वाटत असते. तसे मी करतोही.नुकताच माझा घशा,मानेचा कॅन्सर बरा झाल्याचा निर्वाळा डाॅक्टरांनी दिला. पहा बरे, गंभीर गोष्टीचा शेवटही आनंदाचा झाला. मग लिहिता लिहिता माझे आत्मचरित्रही याच आनंदाच्या टप्याशी आले हे किती छान झाले!”

माझे शिनिमाचे गाव ३: पिक्चर चालू होणार!

माझ्या शिनिमाच्या गावाकडील ह्या गोष्टी साधारणत:१९४५ते १९५७ ह्या काळातील आहेत.
‘शांतता पाळा’ किंवा ‘ शांत रहा’ ही पाटी पडद्यावर स्थिरावली की थिएटरमध्ये शांतता पसरे. न्यूज रिव्ह्यू सुद्धा शांतपणे बघत. पं नेहरु किंवा सरदार पटेल बातमीत दिसले की लोक टाळ्या वाजवत. मुले, तरूण पोरे,अखेरीस क्रिकेटच्या मॅचची मग ती रणजी असो की टेस्ट असो मोठ्या उत्सुकतेने व “वारे पठ्ठे! बाॅन्ड्री हाणली!” किंवा कुणाची ताडकन् दांडी उडाली की हेच ‘हंपायर’ होत बोटे वर नाचवत ‘आउट; आउट’ अशी जिवंत दाद देत! पण खेळाची बातमी फार थोडा वेळ असणार ही चुटपुट असतानाच आता ‘पिच्चर’ सुरु होणार ह्याचाही आनंद होई!

पिक्चर सुरु झाला! प्रभात असेल तर बहुतेक वेळा प्रभातची तुतारी वाजायला सुरुवात झाली की टाळ्यांचा कडकडाट! चित्रा टाॅकीज असेल तर राजकमलची, कमळात उभी असलेली,जलतरंगाच्या मधुर संगीतावर एक कमनीय स्त्री ओंजळीतून फुले टाकताना दिसली की जोरात टाळ्या पडत. चित्रमंदिर, छाया अथवा कलामंदिर असेल तर महेबुब प्राॅडक्शन्स चा कणीस असलेले विळाकोयता दिसला आणि त्याच बरोबर ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता, वही होता है जो मंझुरे खुदा होता है ‘ हे आमच्या गावचे प्रेक्षक केवळ ऐकतच नसत तर त्याच्याबरोबर म्हणतही असत! तसेच भागवत मध्ये राजकपूरचा सिनेमा सुरु होण्या अगोदर भरदार व्यक्तिमत्वाचे पृथ्वीराज कपूर शंकराच्या पिंडीवर फुले वाहताना गंभीर आवाजात ‘ॐनम:शंभवाय, शंकराय … नम: शिवाय , नमो नम:नमो म्हणायला लागले की आमचे प्रेक्षकही एक एक मंत्र म्हणत शेवटी त्याच्यासारखाच आवाज काढत नम:नमो मंत्र म्हणत थेटरचा ‘गाभारा’ भरून टाकत! मीना टाॅकीज असेल तर जेमीनीची दोन बाळे गोल फिरत बिगुल वाजवताना दिसली की आता भव्य दिव्य पाहायला मिळणार ह्या खात्रीने टाळ्या वाजवत.

इथेच सहभाग थांबत नसे तर शांताराम बापूंचा सिनेमा असेल तर त्यांच्या कल्पक टायटल्सलाही टाळी पडे. संत सावता माळ्याच्या कथेवरील ‘भक्तीचा मळा’ च्या सुरवातीलाच विहिरीतून तुडुंब भरलेल्या मोटेतले पाणी रतनबाव मध्ये लोटू लागले की लोट पुढे येताच त्यावर भक्तीचा मळा ही अक्षरे नाचू लागत की पुन्हा टाळ्या पडत.

शिनेमाच्या गावचा अभिमानही बरेच वेळा स्पष्ट प्रकट होई. चित्रा टाॅकीजमध्ये ‘डाॅ. कोटणीस की अमर कहानी’ सुरवातीच्या दृश्यातच जेव्हा त्यांच्या घरचा टांगेवाला विचारतो,” क्या आप शोलापूर में डाक्तरी नही करोगे?” डाॅ. कोटणीस उत्तर देताना “ नही मै शोलापूरमें डाॅक्टरी नही करूंगा!”” ह्या संवादात शोलापूर नाव आले की लोक टाळ्यांचा कडकडाट करून चित्रा टाॅकीज दुमदुमून टाकीत. तीच गोष्ट ‘लोकशाहीर रामजोशी’च्या नामावलीनंतर ‘सोलापूर शके १७०७’ हा फलक झळकला की सगळे प्रेक्षक तो मोठ्याने वाचत व टाळ्या कडाडू लागत!

प्रत्यक्ष सिनेमा सुरु झाल्यावर थेटर शांत असे. अेक दोन दृश्ये शांततेत जात. पण ‘पतंगा’सिनेमात निगार आणि याकूबचे ‘ओ दिलवाले दिलको लगाना अच्छा है पर कभी कभी’हे गाणे सुरु झाल्यावर निगारची ओळ संपल्यावर याकूबला “पर कभी कभी” म्हणावे लागायचे नाही. प्रेक्षकच”पर कभी कभी” कोरसने म्हणत. आरपार मधील ‘कभीआर कभी पार पार लागा तीर-ए-नजर’ म्हणत डोक्यावर पाटी घेतलेली कुमकुम (त्यावेळी ती एक्स्ट्रा होती!)दिसली किंवा ‘ये लो मैं हारी पिया’ हे श्यामाच्या अदाकारीतले गाणे, किंवा ‘मैं आवारा हूॅं’ हे गाणे सुरु झाले की राजकपूरला एकदोन ओळीच म्हणाव्या लागत. नंतरचे गाणे राजकपूरचे किंवा मुकेशचे राहिलेलेच नसे! प्रेक्षकांनी त्यातील ‘ट्यूॅंऽ डिरुरु’ ह्या म्युझिकसह कधीच म्हणायला सुरवात केलेली असे! ‘नागीन’मधले जादूगर सैया छोड मेरी…’ ह्या गाण्यातले ‘हो गयी आधी रात अब घर जाने दो’ ह्या विनवणीवजा ओळीला लगेच “मग आता कुठे जाते? राहून जा इथेच” असे ‘जादूगर सैया प्रदिपकुमार’ ऐवजी आमचे प्रेक्षकच वैजयंतीमालेला रोज आग्रह करीत!

आमच्या शिनिमाच्या गावचे दर्दी प्रेक्षक कोरसही गात असत. मग ते राजकपूरच्या बरसात मधील ‘तक नी ना धिन्न’ असो अगर आनंदमठ मधील ‘वंदे मातरम वंदेमातरम’ असो (सक्ती नव्हती तरी!) मनापासून साथ देत. कोरस नुसता ‘हमिंग’ असले तरी प्रेक्षक तोंड मिटून ‘हुॅं हाहाआआ’ असे त्या कोरस बरोबर आवाज काढत.’एक थी लडकी’ मधील ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रख्खा दा’ गाण्याला तर संपूर्ण थेटराची ठेक्यात साथ मिळेच पण काही प्रेक्षक उभे राहून ‘आज कल की नारीयाॅं ‘ ओळ सुरु झाली की त्याप्रमाणे हातवारे करत कडवे म्हणायचे! सिनेमा तर करमणूक करत असेच पण लोक स्वत: त्यात सामील होऊन आपली आणखी करमणूक करून घेत!

महंमद रफीच्या गाण्यांना तर प्रत्येक टाॅकीजमध्ये सामुहिक साथ मिळे. बऱ्याच गाण्यांत रफीचा आवाज खूप उंच चढतो.आवाज चढवण्यात रफीचा हात कोण धरू शकेल? प्रत्येक कडव्याच्या अखेरीस तार सप्तकात जायचा आणि शेवटच्या कडव्यात तर तीव्र तार सप्तकातच चढायचा. ‘ओ दुनियाके रखवाले’ ह्या गाण्याच्या पहिल्या कडव्याच्या ‘अब तो नीऽर बहाऽऽलेऽऽऽ पाशी चढायचा तेव्हा ते शेवटच्या ‘महल उदास गलीयाॅं सुऽनी’ सुरु झाले की जणू वाट पाहात असलेले आमच्या सिनेमाचे गाववाले ‘मंदिर बनता फिर गिर जाता’ पासून सरसावून खुर्चीच्या कडेपाशी येत येत ‘ओ दुनियाकेऽऽरखवालेऽऽऽ रखवाऽऽलेऽऽऽ रखवालेऽऽऽऽऽह्या अखेरच्या ओळीला तर महंमद रफीला,आपले आवाज एकवटून,तार सप्तकाचा हिमालय सर करण्यास मदत करीत! इतक्या चढलेल्या त्या आवाजाला जागा मिळावी म्हणून थिएटरचे छप्परही त्यावेळी वर जात असे!

महंमद रफीची तर अशी अनेक गाणी आहेत. त्या प्रत्येक गाण्यांत आमचे दर्दी रसिक त्याला आपल्या आवाजांची साथ देऊन तीव्र तार सप्तक गाठण्यासाठी त्याच्या मदतीला धावून गेले आहेत! आमच्यातल्या साध्या सिनेभोळ्या रसिकांना महमद रफीला दुसऱ्या गावातील थेटरात आवाजाची इतकी उंची गाठता येईल का ह्याची काळजी पडलेली असे!!

सिनेमातली हिराॅईन पडद्यावर असली की सर्व रसिक तिच्या प्रत्येक डौलदार हालचालीत गुंतून जात. त्यामुळे आपापसातल्या बडबडीला आळा बसे.हिरोबरच्या तिच्या दृश्यात थेटरातला प्रत्येकजण हिरो होऊन तिच्याबरोबर काम करू लागे. त्यात गाणे आले की मग विचारू नका. हिरोला बाजूला सारून तेच संवाद म्हणत. हिराॅईन बिचारी एक. तिच्यावर जान कुर्बान करणारे तिला व्हिलनपासून सोडवणारे, तिच्याशी झाडामागून लपंडाव खेळणारे, तिच्याबरोबर नावेत बसणारे, थेटरातला प्रत्येक हिरो पुढे असायचा. गाणे म्हणायचे. थिएटर पुन्हा मुकेश, रफी,तलत महंमद,मन्ना डेने भरून जायचे! किती सिनेमांची नावे घ्यायची! ‘प्यार की जीत’ मधली सगळीच गाणी हिट होती. किंबहुना त्यावेळच्या बहुसंख्य सिनेमातील गाणी हिटच असत. मग तो ‘दिल्लगी, दर्द, दीदीर असो की अंदाज, बावरे नैन, नागीन, अनारकली, अलबेला, नास्तिक,पतंगा,बरसात,आवारा, जाल,बाजी, आरपार, बैजूबावरा, कवि, बडी बहेन, शहनाई सरगम ‘ असो सर्वच सिनेमा गाण्यांमुळेही गाजलेले असत.

प्यार की जीत मध्ये महंमद रफी ‘एक दिलके टुकडे हजार हुए कोई यहा गिरा कोई वहा गिरा’ हे गाणे आमच्या गावचे लोक पहिले पाच सात आठवडे मनापासून ऐकत. नंतर मग हे गाणे सुरु झाले की आमच्या प्रेक्षकांच्या वाणीची रसवंती सुरु व्हायची! “ अबे तुझ्या बाजूला पडला बघ एक तुकडा उचल!” अबे तिकडे तीन चार पडलेत की रे ! गोळा करा बे सगळे तुकडे!” वगैरे सुरु व्हायचे! तर बडी बहेन मधले ‘छुप छुप खडे हो जरूर कोई बात है.. ….’ ही ओळ सुरु होण्यापूर्वी एक दोन सेकंद जी पेटी वाजवली आहे त्यावर प्रेक्षक शिट्या मारून आपल्या पसंतीची पावती लगेच द्यायचे. तर ‘भोली सुरत दिल छोटे नाम बडे…’ हे गाणे सुरू झाले की मा. भगवान बरोबर बरेचसे थेटरही ती सोपी पावले टाकत नाचायचे!!
आमच्या ‘शिनिमाच्या’गावातील थेटरांइतकी ‘सामाजिक रसिकतेची समरसता’ दुसरीकडे पाहायला मिळाली नाही.

काही वर्षांनंतर दुसऱ्या गावांत ‘देख कबीरा रोया’ प्यासा’ बरसात की रात’ ‘किंवा दिल ही तो है’ ‘ जिस देशमें गंगा बहती है’ असे सिनेमा पाहताना ‘माझ्या शिनेमाच्या गावा’ची आठवण यायची!

प्यासा पाहाताना जाॅनी वाॅकरच्या ‘चंपीऽऽतेऽल मालिऽऽश’ गाण्यात कोरस नसला तरी माझ्या शिनिमाच्या गावातील प्रेक्षकांनी नक्कीच कोरस म्हटला असणार हे दिसायचे! तसेच शेवटचे गाणे ‘ये महेलों ये ताजों ये तख्तों की दुनिया’ हे गंभीर गाणे सुरू झाल्यावर पडद्यावरील सिनेमाच्या सभागृहामधील प्रेक्षक प्रथम चमकून नंतर कुतुहलाने माना वळवून हळूच उठून उभे राहतात त्या सीनला, तसे आमच्या शिनिमाच्या गावचे प्रेक्षकही मागे मशिनच्या प्रकाशाकडे बघून नंतर पडद्याकडे पाहात उठून उभे राहिलेले डोळ्यासमोर यायचे! शेवटी महंमद रफी जेव्हा जीव ओतून आवाज चढवत चढवत ‘जला दो जला दो ये दुनिया” म्हणायला लागला की आमच्या गावातले प्रेक्षकच त्याच्या मदतीला आपला आवाज मिसळवून गेले असणार ह्याची मला तिथेही खात्री होती!
‘देख कबीरा रोया’ मध्ये ‘ कौन आया मेरे मनके द्वारे’ ह्या गाण्यात अनुपकुमार जरूरीपेक्षा जास्त हावभाव करतोय हे लक्षात येते. त्यावेळेस ‘अबे माहित है बे तू अशोक कुमार किशोर कुमारचा भाऊ आहे त्ये; जरा सबुरीने घे” असे ‘माझ्या शिनेमाच्या गावचे’ लोक नक्कीच म्हणाले असतील असे राहून राहून वाटायचे!

तसेच ‘ जिस देश में गंगा बहती है’मध्ये ‘होठोपे सच्चाई होती है जहा दिलमें सफाई होती है’ ह्या ओळीला राजकपूर त्या लाजऱ्या लहान मुलीला कडेवर घेतो तेव्हा आणि पुढे ‘महेमाॅं हमारा होता है वो जानसे प्यारा होता है’ आणि ‘जादाकी लालच नही थोऽडेमें गुजारा होता है’ ह्या ओळ्यांना नक्कीच कडाडून टाळ्या पडल्या असणार हेही नक्की! त्याबरोबरच त्या ओळीही सर्वांनी राजकपूर बरोबर म्हणलेल्या ऐकू येत होत्या!

पण माझ्या शिनेमाच्या गावातील प्रेक्षक फक्त सिनेमातील गाण्या संगीताला ठेका धरून टाळ्या देण्या इतपतच रसिक नव्हते तर सिनेमातील इतर चांगल्या गोष्टींनाही ………..

मी काय वाचतो?

Redwood City

 

मी काय वाचतो असे विचारल्यावर मला पटकन सांगता येणार नाही. तसे म्हणाल तर मला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकदम देता येत नाही. रेल्वेच्या आरक्षणाचा अर्जही भरता येत नाही. परीक्षेत तर हे बरेच वेळा प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रश्नाला झाले आहे. त्यामुळे माझे शिक्षण बरेच वर्षे चालू होते. “अरे तू केव्हा ज्या त्या वर्षी पास होणार?” असे कुणी विचारले तर त्या प्रश्नालाही मी लगेच उत्तर देऊ शकत नव्हतो.

सांगायचे असे की अवघड आहे तसे सांगणे.कालच बघा ना वर्तमानपत्र थोडे फार वाचून झाले की लगेच भगवदगीता वाचायला घेतली. दोन मिनिटांनी Whatsapp चे forwarded अक्षर वाड.मय पुढे पाठवत बसलो. कुणाच्या खांद्यावर कुणा कुणाssचे ओझे!

विमानात सुद्धा मी वाचतो. माझ्या खुर्ची समोरच्या पाकिटात सुरक्षिततेच्या सूचना देणारे शिकवणीचे पुस्तक. विमानात काय विकत मिळते त्याची रंगीत पुस्तिका, विमान कं.ने स्वत:चे कौतुक करून ओवाळून घेतलेल्या दिव्यांचे जाड रंगीत पुस्तक, आणखी काही वाचतो. सर्व exit कुठे आहेत ते एकदा चक्कर मारून हात लावून खात्री करून घेतो.खाली मान घालून संकटकाळात दिसणारी जमिनीवरची दिव्यांची रांग कुठे ते शोधत जातो. मग, पट्टा आवळूनच खुर्चीच्या खाली ठेवले आहे म्हणे ते ‘जीव वाचवा’ जाकीट पहाण्यासाठी हात माझ्या पृष्ठभागाखाली-म्हणजे खुर्चीच्या- फिरवून पहाण्याचा प्रयत्न करतो. पण पट्टा आवळून हे चालल्यामुळे पाच सेकंदात गुदमरून मान टाकून पडतो.! वरून आॅक्सिजनचा मुखवटा खाली आला नाही तर? या कल्पनेनेच पुन्हा गुदमरतो! आणि प्रवास संपेपर्यंत आपण संकटात कसे वाचणार ह्या काळजीने हैराण होतो. तोंडाला सारखी कोरड पडते. भीतीने ओरडता येत नाही आणि ओरडलो असतो तरी भीतीने आवाजही बाहेर पडला नसता! मी विमानात सारखे पाणी पितो, ज्युस पितो असे मुलांना सांगतो त्या मागील गुपित हे आहे. बरेच वेळा मी मागितले नसताही सेविका माझा भेदरलेला चेहरा बघूनच ज्युस पाणी देत असतात. उगीच तासा तासानी ढकल गाड्या फिरवित इतरांनाही दिल्याचे नाटक करतात.केवळ मला अवघडल्यासारखे  वाटू नये म्हणून त्यांची ही धडपड असते हे मला समजते! मग पुन्हा पुन्हा आपल्या-आपणच विमानात सुखरुप कसे राहावे ती पुस्तिका मी बारकाईने वाचत राहतो. हे येव्हढे एक दहशतीपोटी वाचतो म्हणून मला फार तर सांगता येईल.

माझ्याकडे टेलिफोन आला. तोही कंपनीने खास माझ्या पदाचा विचार करून दिलाय ह्याचे मला केव्हढे अप्रूप होतेसुरवातीला! त्याच्या शेजारीच मग टेलिफोनचा सदग्रंथ असायचा. त्याला डिरेक्टरी म्हणतात, हे सुद्धा मला माझ्या वाचनाच्या आवडीमुळेच लक्षात आले. त्या गलेलठ्ठ ग्रंथाचे मग मी रोज पाच पाने वाचण्याचा नेम ठेवला. बराच काळ निष्ठेने केला. परिणाम इतकाच झाला की कुणाचा कोणता नंबर आणि तक्रारीचा नंबर पाहायलाही ती डिरेक्टरी पाहिल्याशिवाय चालत नसे!

कालचेच वाचन पहा ना. वर्तमानपत्र झाले की लगेच भ.गीता झाली. नंतर Travelerमधील फोटो, जाहिराती वाचून झाल्या. लगेच मग इथल्या हाऊसिंग सोसायटीचे मुखपत्र वाचायला घेतले. आज आता TradersJoe या दुकानात काय मिळते आणि त्यांच्याकडे जे मिळते ते त्यांनी त्यांच्या गिऱ्हाईकांना पसंत पडेल असेच खास फ त्यांनी तयार करून घेतलेले असते त्यामुळे ते जगात एकमेव असते हे अत्यंत बहुमूल्य ज्ञान प्राप्त करून घेतले. लोकशाहीच्या, “लोकांची लोकांसाठी आणि लोकांनी’ या व्याख्येनंतर  TradersJoe ची ही नम्र फुशारकीच गाजलेली असावी! कोण  भारावून जाणार नाही हे दुर्मिळ ज्ञान वाचून? मी भारावून गेलो. ताबडतोब पिशवी घेऊन त्या सगळ्या वस्तु, दुसऱ्या कोणी घ्यायच्या आत घ्यायला निघालो. पण मोटार चालवता येत नाही हे लक्षात आले; आणि बसही तिकडे जाते न जाते हे ज्ञानही मिळवले नसल्यामुळे लगेच आरामात पडलो.

ताजे वर्तमानपत्र वाचू लागलो. इथल्या वर्तमानपत्रातील नुसत्या वरच्या ठळक ओळी वाचायच्या म्हटले तरी दोन अडीच तास सहज जातात. मग शब्द उलट पालट केलेले कोडे सोडवायचा प्रयत्न करतो. फक्त प्रयत्न. तरी त्या प्रयत्नातच तास सहज जातो. सोडवता येतच नाही. आले असते तर माझे शिक्षण इतकी वर्षे चालले असते का? मग रोजचे भविष्य वाचायचे. स्वत:च्या राशीचे नाही.तिन्ही मुलांचे वाचतो. आनंदी होतो, काळजी करतो,अरे वा म्हणतो. सावध राहतो, कधी तर उड्याही मारतो. पण हे सगळे स्वत:शीच ठेवतो. कारण नंतर माझ्या लक्षात तरी कुठे राहते ते?

आजच्याच भविष्यात एका राशीला सांगितले ते वाचण्यासारखे आहे. तो म्हणतो,” Forgiveness is the original miracle cure!वा! म्हणालो. कोण केव्हा सुभाषित लिहून जाईल सांगता येत नाही! कुणी सांगावे? मीही लिहून जाईन केव्हा ना केव्हा.. . माझीही ती महत्वाकांक्षा आहे . रोजचे भविष्यलिहिणाऱ्याचे नाव  Christopher Renstrom नाव आहे. हे सुभाषितासारखे वचन त्याचे स्वत:चे आहे का कुणा प्रख्यात्याचे आहे माहित नाही. पण यावरून Oscar Wildeची आठवण झाली. त्याने म्हटलेय की,” Forgive your enemies; it is most annoying to them.” बोला, का आवडणार नाही Oscar Wilde? दोन्ही वचनांतील भावार्थात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण एकदम लक्षात आला तो Oscar Wildeच!

वर्तमानपत्र वाचणे हे ज्याचा दमश्वास चांगला आहे त्याचे काम आहे. मला तीन महिन्यात सुमारे ३२३७१९ पेक्षा जास्त पाने वाचावी लागली! चुकभूल द्यावी घ्यावी. गेली काही वर्षे दर वर्षातील सहा महिने मी वाचतोय. हिशोब करा. हा एक का दहा बारा विक्रमाच्या तोडीचा विक्रम असेल. पण माझा स्वभाव भिडस्त व नम्र आणि मी प्रसिद्धी पराड.मुख असल्यामुळे कुणालाही माझा हा पराक्रम विक्रम माहित नाही.सांगत नाही. पण लोक, मी तसा काहीही नसून भित्रट,भेदरट, घाबरट आहे अशी माझी टकारात्मक संभावना करतात. हल्ली स्पष्ट बोलणाऱ्या लोकांची संख्या अफाट झाली आहे; दुसरं काय! पूर्वी ह्याला उद्धटपणा म्हणायचे. आता परखड स्पष्टपणा म्हणतात. माझ्या लहानपणी फार थोडे लोक असे बोलत. मध्यंतरी बरेच लोक पोलिटिकली करेक्ट बोलू लागले. थोडेच असे काही तरी उद्धट बोलत. पण क्वचित. पण सध्या बहुतेक सर्वच politically Arrogant बोलू लागले आहेत. त्यामुळेही मी माझे वर्तमानपत्री विक्रमी वाचन आपणहून सांगत नाही!

आता The Totally Unscientific Study of the Search for Human Happiness हे पुस्तक वाचायला घेतोय. परवा Words Are My Matter हे अर्धवट वाचूनच परत केले. बऱ्यापैकी म्हणता येईल. मागे सोनियाने सांगितलेली दोन पुस्तके वाचली होती. .चांगली होती. सध्याच्या बाल-युवा पिढीचे वाचन चांगले आहे. माझ्या सर्वच नातवांनी शिफारस केलेली पुस्तके चांगली असत्तात.

मागे जाफर अबिद ह्यांनी प्रसिद्ध केलेले हिंदी चित्रपटांचा छायाचित्रांतून प्रवास दाखवणारे सुंदर पुस्तक पाहण्यात  आले. प्रस्तावनेत त्याने लिहिताना म्हटले होते की माझ्याविषयी काय सांगावे ते मला समतत नाही.माझी काही वैशिष्ठ्येही नाहीत. मी लेखक आहे की नाही तेही मला नक्की सांगता येणार नाही. मलाही मी काय वाचतो हे मला एकदम सांगता येत नाही…

एक वेळ त्तत्वज्ञानातील “मीकोण”ह्याचे उत्तर देणे शक्य होईल. मीही ते देऊ शकेन ! पण मी काय वाचतो ह्याचे उत्तर मात्र मला पटकन कधी सांगता येणार नाही.तसे म्हणाल तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मला एकदम देता येत नाही….तसे देता आले असते तर माझे शिक्षण …..

……आताच पहा ना मार्ग क्रमांक २६०आणि ३९५ बसचे वेळापत्रक वाचायला घेतले आहे…..उद्या-परवा रेडवुड सिटीला जावे असे म्हणतोय, म्हणून हे “required reading …..!”

युटोपिया, राजा राम आणि रामराज्य

रेडवुड सिटी 

 युटोपिया, राजा राम आणि रामराज्य

त्यावेळी

ग्रीक भाषेतील युटोपिया शब्द आणि प्लेटोने सांगितलेले “राजा हा तत्वज्ञानी असावा” ह्यावर अनेक विद्वानांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. ते लेखनही राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय झाला अाहे. 

युटोपियात, केवळ राजाच नव्हे तर प्रजाही सर्व बाबतीत सर्व आदर्शांचे पालन, आचरण करणारी असते.असे शंभर टक्के परिपूर्ण आदर्श राजाआणि राज्य असणे अशक्य आहे. म्हणून युटोपिया ही केवळ कल्पना आणि तसे आदर्श राज्यही फक्त कल्पनेतच असणार! आणि ते सध्या तरी खरे आहे. 

युटोपिया किंवा त्याचे  विशेषण युटोपियन या शब्दांमागे नकारात्मक भावना आली. ” हे कसे शक्य आहे? केवळ क्ल्पनाच ती!” “अशा गोष्टी कुठे असतात तरी का?” “मग स्वर्गच म्हटला पाहिजे!” अशा भावनेनेच तो वापरला जातो. मग पटते की युटोपियाचा अर्थच मुळी “no place” असा का आहे! अस्तित्वात नसलेले! 

पण इथे युटोपिया सारखी Philosopher King ही आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्लेटोचे म्हणे “राज्यकर्ता हा तत्वज्ञ असावा” असे होते.ही सुद्धा क्लपनेच जमा होणारे तत्व वाटते. पण आपल्या देशातील राजा जनक प्लेटोची ती अपेक्षा पूर्ण करतो. त्याला राजर्षी असेच म्हणत. अत्यंत स्थिर मनाचा, स्थिरवृत्ती समबुद्धी, स्थितप्रज्ञ असा जनक राजा होता.पण राजाच्या कर्तव्यातही त्याने कसुर केली नाही. म.गांधी म्हणत तसा तो trustee सारखा किंवा परिरक्षक custodianच्या  भूमिकेतून राज्य करीत असे. 

एक योगायोग पहा. जनकाच्या वेळी म्हणजेच योग्य शब्दात म्हणायचे तर रामायण काळातच अयोध्येचा राजा आणि त्याचे राज्य प्रत्यक्ष utopiaच होते! 

ज्ञानेश्वर, नामदेव तुकाराम यांचा जसा विठोबा हे सावळे परब्रम्ह होते तसा श्रीराम हा रामदासांचा ‘देवांचा देव, ‘देवराणा ‘ होता. मनाच्या श्लोकात त्यांनी सगुण भक्तीचे माहात्म्य सांगतांना (श्लोक १३७ पर्यंत) आणि नंतरच्या निर्गुण भक्तीचे महत्व पटवून देतानाही ते आपल्या रामरायाचे गुणवर्णन करतात. 

रामदासस्वामी, भक्ती मनापासून करावी व ती फलद्रुप कशी व्हावी ह्यासाठी “प्रभाते मनी राम चिंतित जावा”, ” मना राघवी वस्ती कीजे”, आणि मनात सतत ईश्वराचेच चिंतन असावे आणि त्याबरोबर ते साधण्यासाठी आपल्याला “मना सज्जना सज्जनीं वस्ती कीजे” असे विविध उपाय सांगतात. त्याचीच परिणिती ते आपल्याला एका रामाचे भजन करायला सांगतात. हा बोध करताना ते पुरुषोत्तम रामाचे गुणगान कसे करतात ते पाहण्यासारखे आहे. 

ते म्हणतात, 

” भजाया जनी पाहता राम एकू।

करी बाण एकू मुखी शब्द एकू। 

क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू। 

धरा जानकीनायकाचा विवेकू।। १३१।।

ह्यातील क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । हा चरण महत्वाचा आहे. इथे क्रिया याचा अर्थ आचरण, चरित्र चारित्र्य असा आहे. 

रामाच्या एकेक गुणाचे आणि त्या गुणांप्रमाणेच तो प्रत्यक्ष आचरणही करीत होता हे आपल्याला रामचरित्राचे वाचन करताना समजून येते. वाचता येत नसलेल्यांना रामकथा केवळ ऐकल्यानेही ते लक्षात राहते. 

रामापाशी सर्वांविषयी दया होती. रामाला सर्वांची काळजी होती. आईबापाविषयी अत्यंत पूज्य बुद्धी होती. वडिलधाऱ्यांविषयी आदर होता. भावांविषयी अपार माया होती. भक्तांविषयी तर त्याला विशेष प्रेम, कौतुक, आणि अभिमान होता. रामापाशी न्यायबुद्धी होती.तो न्यायी होता. याशिवाय रामदासस्वामींनी वरील श्लोकात वर्णन केलेले गुणही होतेच. 

रामाच्या आचरणाचा आदर्श समोर ठेवून जे लोक तसे वागण्याचा प्रयत्न करतात ते हळू हळू वरच्या पायरीवर जाऊ लागतात. रामचरित्र माहिती होण्यापूर्वी आपण ज्या पायरीवर होतोतेव्हा त्या पातळीवरचेच आपले वागणे होते. पण जसे आपण रामकथा मनापासून गोडीने ऐकल्या वाचल्यावर रामाच्या आचरणासारखे अंशत: जरी अनुकरण करून वागू लागलो तर आहे त्यापेक्षा वरच्या श्रेणीत जाऊ शकतो. आपल्या आचारविचारात चांगला फरक होऊ लागतो. आपले आयुष्य उन्नत होऊ शकते. ह्यालाच रामदासस्वामी ” क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।” असे म्हणतात. 

राजा रामाच्या चारित्र्यातील महत्वाचा भाग हा की अयोध्येतील सर्व प्रजा सुखी होती. समाधानात होती. त्याहीपेक्षा महत्वाची बाब अशी की रामाचा राजा म्हणून वागण्याचा, त्याच्या आचरणाचा अयोध्येतील प्रजेवर फार प्रभाव होता. 

वै. ह.भ.प.ल.रा.पांगारकरांनी उदघृत केलेल्या  समर्थ रामदसांच्या अफाट वांड.मयातील ‘मानपंचक’ मधील श्लोकांतून रामदासांनी वर्णन केलेले रामाच्या कार्याचे, अयोध्येतील लोकस्थितीचे, वातावरणाचे, ‘लोक वर्तती कैसे’ हे वाचण्यासारखे आहे. पण त्यातील जे काही निवडक श्लोक बहारदार आहेत, ते वाचू या:-

कीर्ती या रघुनाथाची। पाहता तुळणा नसे।

येकबाणी येकवचनी। येकपत्नीच धार्मिकु।।६।।

लोक कसे होते? तर

उद्वेग पाहतां नाही। चिंता मात्र नसे जनीं।

व्याधी नाही रोग नाही। लोक आरोग्य नांदती।।

लोकांची वृत्ती वागणे, आचरण किती नैतिक होते, स्वभाव कसे होते ते वाचल्यावर आपण स्तिमित होऊन जातो.

युद्ध नाहीच अयोध्या। रोग ना मत्सरू नसे।

बंदनिर्बंदही नाही। दंडदोष कदा नसे।।९।।

बोलणे सत्य न्यायाचे। अन्याय सहसा नसे। 

अनेक वर्तती काया। येकजीव परस्परें।।११।।

दरिद्री धुंडता नाहीं। मूर्ख हा तो असेचिना।

परोपकार तो मोठा। सर्वत्र लोकसंग्रहो।।१२।।

राजापेक्षाही  तिथले लोक श्रेष्ठ दर्जाचे वाटावेत अशी अयोध्येची प्रजा होती.मग सुबत्ताही का असणार नाही? 

अद्भुत पिकती भूमी। वृक्ष देती सदा फळे।

अखंड दुभती धेनु । आरोग्यें वाहती जळे।।१३।।

वा! वा! रामदासांच्या शब्दयोजनेची, प्रतिभेची चुणुक या दोन शब्दांत स्पष्ट होते! “आरोग्यें वाहती जळे!”

पाण्याचे, निर्मळ शुद्ध असे सगळेच वर्णन करतात. काही त्यापुढे जाऊन स्फटिकासारखे स्वच्छ म्हणतील; पण केवळ रामदासच “आरोग्ये” हा त्याचे ‘सर्व गुण, उपयोग, परिणाम, स्वरुप,आवाज, उत्साह,त्याचा प्रवाह,’ इतके आणि असेच काही सूचित करणारा परिपूर्ण यथार्थ शब्द वापरु शकतात!  पुढे वाचा, 

चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे। 

संतोष समस्तै लोकां । रामराज्य भूमंडळी।। १८।।

आतापर्यंत रामराज्य म्हणजे सुबत्ता-समृद्धी, धार्मिकता,  त्यामुळे शांतता ह्याच गोष्टींवर भर देऊन वर्णन केले जात असे. केले जाते. पण राजा राम आणि रामराज्य ह्यांचे खरे मर्म कशात असेल तर” क्रिया पाहता उद्धरे सर्व  लोकू” ह्यामध्ये आहे. 

‘ यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण आपण वापरतो.ती बरेच वेळा नकारात्मक रुपाने वापरतो. कारणे आणि करणीही  तशीच असते म्हणूनही असेल.विशेषत: राज्यकर्ते,नोकरशहा किंवा आॅफिसातील वरिष्ठ किंवा व्यसनी माणसांच्या बाबतीत  ती वापरली जात असते. ‘हेच असे तर तेही तसेच असणार!” “अहो जसा वरिष्ठ तसा कनिष्ठ” ” मग दुसरं काय होणार? असंच!” हीच भावना त्यामागे असते. 

पण राम आणि अयोध्येतील लोक यांच्या बाबतीत मात्र ती म्हण जशी आहे, त्यातील शब्दांचे जे अर्थ आहेत त्याच सरळ अर्थाने नि:शंकपणे वापरता येते! हा रामाच्या आचरणाचा खरा महिमा आहे. रामराज्याचा खरा अर्थ तिथले लोकही राजा रामासारखेच नितीमान चारित्र्यसंपन्न होते. अथवा मोठा शब्दच वापरायचा तर सत्वगुणी होते त्यामध्ये आहे. राजा आपल्या आचरणाने सगळ्या प्रजेचे आयुष्य उन्नत करु शकतो त्याचे हे उदाहरण आहे. म्हणून रामदासस्वामी रामाचा ‘ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।’ या शब्दांत गौरव करतात. 

सुबत्ता, शांतता, कायद्याचे पालन आर्थिक भरभराट इतकेच काय धार्मिक वातावरणही  इतर राजांच्या राज्यात असणे शक्य आहे. पण वर दिलेल्या श्लोकांतील लोकाचार आणि लोकस्थितीआणि त्याचा परिणाम, तसे वातावरण कुठे आढळेल का? हो, युटोपियात !  रामराज्य हे युटोपिया होते . त्यावर हा नियमाचा अपवाद आहे असे कोणी म्हणतील. पण हा अपवाद इतका महान आहे की त्यामुळे तो नियमाचा गौरवच करतो.