मला मोठी बिदागी मिळाली!

िलेल्या पत्त्यावर मी बरोबर पोहचलो. गाडी घरासमोर उभी केली आणि हाॅर्न दिला.दोन चार मिनिटे थांबलो. थोडा वेळ गेल्यावर वाटले जावे आता. ना फाटक उघडले कोणी ना दरवाजा. माझी ही अशी बेरात्रीची पाळी.स्मशानवेळेची. फार धंदा होत नाही. कुठे कोणी मिळेल म्हणत,निघावे म्हणून पट्टा आवळू लागलो. पण मलाच काय वाटले कुणास ठाउक. उतरलो आणि दरवाजावर ठक ठक केले. आतून काहीतरी ओढत कुणी येतेय वाटले.पाठोपाठ कापऱ्या क्षीण आवाजात “आले, आले हं” म्हणाल्याचे ऐकू आले. दरवाजा उघडला. नव्वदी पार केलेली असावी अशी एक म्हातारी उभी होती.

वेष नीटनेटका.फुलाफुलांचा झगा, डोक्यावर झग्याला साजेशी हॅट, हॅटच्या कडांवरून खाली आलेला,अर्धा चेहरा झाकेल न झाकेल असा आणि पोषाखाला उठाव देणारा अगदी झिरझिरीत पडदा, त्यातून सुरकुत्यांच्या पुसट लाटा असलेली हसऱ्या चेहऱ्याची बाई म्हणाली ,” माझी बॅग गाडीत ठेवायची आहे.ठेवणार ना?” मी आत बॅग आणायला गेलो.घरातल्या सगळ्या भिंती कोऱ्या होता. फोटो नव्हते. भिंतीवर घड्याळही नव्हते. भिंतीला थोडीफार शोभा आणणारे एखादे wall hanging ही नव्हते.खुर्च्या, मागेपुढे झुलणारी खुर्ची आणि जे काही असेल ते सर्व पांढऱ्या चादरींनी झाकलेले होते. बराच काळ कुणी इथे राहात नसावे असे वाटले. मी बॅग गाडीत ठेवली व बाईंच्या बरोबर असावे म्हणून परत आलो. बाई हळू हळू चालत होत्या. गाडीत बसल्या. कुठे जायचे विचारल्यावर “ हाॅस्पाईसमध्ये,” आजी म्हणाल्या . पत्ताही आजींनी सांगितला . गाडी निघाली. थोड्या वेळाने आजी म्हणाल्या, “गावातून घेणार का?” मी म्हणालो,” तो फार लांबचा रस्ता होईल.” “ हरकत नाही. पण गावातूनच जाऊ या.”

मी गाडी त्या रस्त्याने नेऊ लागलो; आणि खिडकीतून दिसणाऱ्या एकेका इमारतीकडे पाहता पाहता, मागच्या आरशातून मला आजींचा चेहरा उजळत,जास्त प्रसन्न होत चालल्याचे दिसले. “ह्या चर्चमध्ये माझे लग्न झाले. ती गर्दी,गडबड, माझ्या मैत्रिणी,बहिण, भाऊ, फुलांचे गुच्छ, सगळं दिसतय मला.” पुढच्या कोपऱ्यावर एक चौकोनी जुनी इमारत दिसली. तिथे कसले तरी गोडाऊन होते. “ हो,हाच डान्सिंग हाॅल. इथे मी माझ्या मैत्रिणी, आणि… आरशातून माझ्याकडे पाहात डोळे मिचकावत हसत … आणि मित्रही बरं का… डान्सला येत असू! ते गोडाऊन मागे मागे जाऊ लागले तरी चमकत्या डोळ्यांनी आजी वळून पाहात होत्या. मी मीटर कधी बंद केले आणि गाडी का हळु हळू चालवू लागलो ते मलाही सांगता येईना!

एक इमारत दिसली. लगेच आजी, “अरे ह्याच इमारतीत माझीपहिली नोकरी! पहिला पगार हिनेच दिला.मी इथे लिफ्ट चालवत होते. किती लोकांना खालीवर नेले असेन. काहींची हृदयेही तशीच खाली वर होत असलेली, माझ्या न कळत्या कटाक्षाने टिपली आहेत. बाई पुन्हा हसल्या. आजी हाॅस्पाईस मध्ये जाताहेत. डाॅक्टरांनी निदान केलेले अखेरचे दिवस -किती कुणास ठाऊक- कमीत कमी दु:खाचे,वेदनांचे जावेत म्हणून इथे दाखल होताहेत. हाॅस्पाईस लवकर येऊ नये म्हणून मी थोडे लांबचे वळण घेतले.पण मी अशी कितीही वळणे घेतली तरी ज्या वळणावर आजी आहेत ते मी थोडेच टाळू शकतो?

आजींना मी आरशातून बोलते करत होतो. त्याही काही सांगत होत्या. मध्ये उत्साहाने,क्वचित उदासपणे.
हाॅस्पाईस आले. मी जास्तच हळू हळू नेऊ लागलो गाडी. आजी हसून इतकेच म्हणाल्या, अरे! मुक्कामाचे ठिकाण येणारच रे.”

गाडी थांबली. हाॅस्पाईसची माणसे वाटच पहात होती. आजी उतरल्या. चाकाच्या खुर्चीत विराजमान झाल्या. त्या लोकांनी त्यांना सफाईने वरती व्हरांड्यात नेले. मी बॅग घेऊन आजींजवळ ठेवली. आजीबाईंनी पर्स उघडत विचारले,” किती झाले पैसे?” मी म्हणालो,”काही नाही!” त्या म्हणाल्या, “अरे तुझे ह्यावर तर पोट आहे.” मी म्हणालो, “आजी त्यासाठी दुसरे पुष्कळ लोक आहेत की. अजून रात्र बाकी आहेच.” त्या आजी तोंड भरून हासल्या. मला काय वाटले कुणास ठाऊक. खुर्चीत बसलेल्या आजीना मी हलकेच मिठी मारली. माझ्या पाठीवरआपला हाडकुळा हात थोपटत त्या म्हणाल्या,” अरे तू माझ्यासाठी आज खूप फिरलास आणि मलाही फिरवलेस! माझ्यासाठी खूप खूप केलेस!”त्यावर मी म्हणालो, “ह्यात काय विशेष केले मी? माझ्या आईसाठी मी हेच केले असते!” त्या शांतपणे हसल्या.

निरोप घेऊन निघालो. मी किंचित पुढे आलो. हाॅसपाईसचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकू आला. आणि एका आयुष्याचाही. “आता काहीच करू नये;पॅसेंजर नको; लांबचे नको जवळचे नको,”असे वाटले.मनच लागेना. विचार केला, पहिला हाॅर्न दिल्यावर निघालो असतो तर? थांबलो नसतो तर? गावातून गाडी न नेता थेट नेली असती तर? आजींशी बोललोच नसतो तर? ह्या विचारांत काय अर्थ आहे असे मनात म्हणत असतांना मी हाॅस्पाईस जवळ आल्यावर आजी जे सहज म्हणाल्या ते आठवले,” अरे मुक्कामाचे ठिकाण येणारच की!”

माझ्या ऐवजी दुसरा एखादा झोकलेला किंवा चिडका, रागीट ड्रायव्हर असता तर! आजच्या रात्री-अपरात्री मीच इथे असावे हे नियोजित असावे. ध्यानी मनी नसता मला मिळालेली ही मोठीच बढती होती. आयुष्यातील मोठी बिदागी पावली म्हणून मनोमन परमेश्वराची आठवण झाली.

अजूनही मी थोडा अस्वस्थच होतो.गाडी बाजूला नेऊन मी स्टिअरिंगवर डोके ठेवून स्वस्थ पडलो. पण विचार थांबेनात. अरे,नियोजन,नियुक्ति, मोठी बढती आणि बिदागी काय! किती शिड्या चढून गेलास एकदम. अरे !तुझ्याऐवजी दारूड्या का, रागीट का? तुझ्यापेक्षाही चांगला कशावरून मिळाला नसता?. ‘पेक्षा’ राहू दे. तुझ्यासारखे किती तरी अाहेत! गावातून गाडी हळू हळू चालवलीस. त्याने,आजी ज्या ज्या इमारतीकडे डोळे भरून पाहात होत्या तिथे तिथे गाडी थांबवली असती.शक्य असते तर आत घेऊन गेला असता. पहिल्या पगाराच्या इमारतीजवळ दोन मिनिटं जास्त थांबला असता! .आणि तू मारे माझ्या ऐवजी दुसरा कोणी……. नियुक्ति काय बढती काय आणि बक्षिस, काय काय! शक्य आहे, त्यातल्या त्यात तुला मिळालेली बिदागी बक्षिस तुला मिळालेही असेल. पण अशी बक्षिसे कोणी देत नसतो ना घेत असतो.ती केव्हा मिळाली ती समजतही नसतात. ती सुगंधासारखी असतात.

आपणच लावलेल्या हरभऱ्याच्या झाडावरून उतरल्याने मला शांत वाटत होते. गाडी पुन्हा रस्त्यावर घेतली.रात्र सरत आली होती. झुंजुमुंजु व्हायला सुरवात झाली होती. लवकर उठलेले दोन तीन पक्षी शांतपणे पण भरकन जात होते. आकाश गुलाबी तांबूस होऊ लागले. आजींचे हसणे,डान्स हाॅल जवळचे डोळे मिचकावून हसणे पाहू लागलो. त्यांच्याच प्रसन्नतेने सरळ घराकडे निघालो.

( युट्युबवरील एका अतिलघुतम इंग्रजी गोष्टींवरून सुचलेली महत्तम साधारण दीर्घकथा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *