दसरा

शिलंगणाचे सोने लुटूनी…

आपल्याकडे बहुतेक सर्व सणावारांच्या प्रथा परंपरा वेगवेळ्या असतात. दसऱ्याचेच बघा ना. आपल्याकडे रामाचा दसऱ्याशी संबंध नाही.

महाराष्ट्रात बहुतेक गावांत गावाबाहेर असलेल्या शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालतात.त्यावेळी बरेच जणांच्या हातात उजळलेले पोत असतात. लोक आsईराजाs उदे उदेचा गजर करत असतात. हे मर्यादित अर्थाने सीमोल्लंघन आहे. आमच्या दसऱ्याला सीमोल्लंघनाची परंपरा आहे.

आपल्या मराठी साम्राज्याच्या वाढीत ह्या सीमोल्लंघनाच्या प्रथेचाही मोठा भाग आहे. मराठे शत्रूला आपल्या मुलखात येऊ न देण्यासाठी त्याच्याच मुलखात जाऊन लढण्यासाठी मोहिमेवर निघत. बऱ्याच मोहिमा दसऱ्याचा मुहुर्त गाठून होत असत किंवा मोहिम फत्ते करून विजयाचे सोने आणून दसऱ्याच्या सुमारास परत येत. शिलंगणाचे सोने लुटण्याला लाक्षणिक अर्थाबरोबरच अशी प्रत्यक्षातील पराक्रमाची ऐतिहासिक परंपराही आहे. आपल्या राज्याचा दरारा वाढवून व शत्रूला जरब बसवून राज्याच्या सीमा वाढवणारे व संपत्तीत वाढ करणारे हे सीमोल्लंघन होते. शिलंगणाचे सोने लुटून दसरा साजरा होई. शिलंगण हे सीमोल्लंघनाचे मराठमोळी बोली रूप आहे.

गावात शमीचे झाड असेल तिथे दसरा “आई राजा उदे उदे”च्या गजरात होतो. शमीचे झाड का तर महाभारतात पांडवांनी, एक वर्ष अज्ञातवासात काढायचे होते म्हणून,आपली शस्त्रे शमीच्या झाडावर दडवून ठेवली होती. (बहुतेक) विराटाच्या बाजूने लढायचे होते. त्यासाठी त्यांनी ह्या दिवशी आपली शस्त्रे बाहेर काढली. त्याच दिवशी अज्ञातवासही संपला होता. त्याची आठवण म्हणून आपल्याकडे दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करून दसरा साजरा होतो.त्यात शस्त्रपूजा आहे. आपले मराठी संस्थानिक आजही दसऱ्याला शस्त्रपूजा करतात.आपला दसरा रामायणाशी संबंधित नसून महाभारतील समरप्रसंगाशी आहे.

म्हैसुरचा दसरा मोठ्या थाटाचा! थाटामाटाने,दागदागिने, रेशमी भरजरी झुली,सोनेरी अंबाऱ्यांनी सजवलेले हत्ती व राजवैभवसंपन्न असतो हे ऐकत होतो. पण आमच्या गावचा दसरा लोकसंपन्न होता. आजही असेल. उन्हं उतरू लागली की हलगी ताशांच्या, जोश वाढवणाऱ्या,कडकडाटात,घामेघुम झालेल्या तगड्या,जाड,कांबीसारखे कडक लोकांनी आळीपाळीने पेललेली, अफाट गर्दीतून वाट काढत, झळ्ळम झळ्ळम करत उंचच्या उंच म्हणजे फारच उंच हब्बूची काठी येत असे. त्यावेळी मधून मधून मोठमोठ्या आवाजात आईराजा उदे उदेच्या गजराचे वाढत्या गर्दीत “आssई राssजा उधेssउधेssय” कधी झाले हे लक्षातही येत नसे. पण शुद्ध उदय उदय किंवा उदे उदे पेक्षा हा उssधेssउधेssय चा गजर जोरदार आणि जास्त परिणामकारक होत असे, हे खरे. आमच्या मध्यमवर्गीय मंद आवाजातले आई राजा उदे उदे चे मोठ्या आवाजातले उधेssउधेssय कधी झाले ते आम्हालाही समजत नसे. मग आबासाहेबांचे, अण्णांचे व बाबांचे( आजोबा) पुटपुटणेही थोडे मोठ्याने होई!

नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी पोत उजळला जात असे. म्हणजे काय तर पत्रावळीवर तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर पेला ठेवलेला असायचा. पत्रावळी भोवती आईने किंवा बहिणींनी साधी म्हणजे अगदी साधी रांगोळी काढलेली असे. मग आम्ही भाऊ कापसाच्या झाडाच्या बारिक फांद्या किंवा काटक्यांना कापड गुंडाळून व तेलात भिजवून आम्हीच लगोलग केलेले ते पोत घेऊन त्या पत्रावळी भोवती आई राजा उदे उदे म्हणत प्रदक्षणा घालत असू. प्रदक्षणा तरी किती लहान, स्वत:भोवती फेरी मारल्यासारखी! कारण मधल्या घरात तिथेच मोठा पलंग,एक गोदरेजचे कपाट आणि दुसरे लहान कपाट असायचे. पृथ्वी प्रदक्षणा करण्याइतकी जागा नसे. प्रदक्षणा झाली की ते लहान पोत बाजूलाच असलेल्या दुधाच्यी वाटीत विझवायचे. सगळ्यांनी मिळून ती पत्रावळ उंचावून ती कपाळाला लावून नमस्कार व्हायचा. ह्याला तळी उचलणे म्हणत. एखाद्याची तळी उचलणे ह्या वाक्प्रचाराचा हा प्रत्यक्ष कार्यानुभवच की! दसऱ्याला संध्याकाळी शिलंगणाला निघताना नवरात्रात मंडपीच्या बाजूलाच मोठ्या पेल्यात वाढवलेल्या धान्याचे पाते, लहानसे झाड टोपीत खोवून निघत असू.

निम्म्यापेक्षा जास्त गाव नविन कपडेघालून ,फेटे-रुमाल-टोप्यात आपल्या घरातील धान्याची तृणपाती खोवून पार्कच्या दिशेने निघालेच असे. सामान्यांच्या मुकुटांतील ते शिरपेच असत! हब्बूच्या काठीने केलेली शमीची पूजा आणि पार्कमधील,भोवती पार असलेल्या शमीच्या झाडाभोवतीची फेरी चालूच असे. त्याच वेळी लोकांचेही एकामागून एक येणारे लोंढे शमीच्या झाडाला प्रदक्षणा घालू लागत. काही जणांच्या हातातील पोत तो परिसर आपल्यापरीने उजळून टाकत.

आता इतकी प्रचंड गर्दी म्हटली तरी आसपास भेळेच्या , शेंगादाणे फुटाण्यांच्या रेवड्यांच्या गाड्या दिसत नसत. असतीलही कुठे पार्कच्या लोकांनी फुलून गेलेल्या मैदानात.पण त्या असल्या काय आणि नसल्या काय तिकडे लक्षही नसे.कारण दुपारीच दसऱ्याचे पक्वान्नाचे रेsट जेवण झालेलेआणि शेजारी पाजारी नातेवाईंकांकडे सोने द्यायला गेल्यावर प्रत्येक ठिकाणी तोंड पुन्हा पुन्हा गोड होणारच असते.आणि होतच असे. लोक एकमेकांना सोने देऊन काहीजण उराभेटी घेत मैदानात पसरलेल्या व बाहेर पडत असलेल्या लोकांबरोबर बाहेर चाललेले असत. ती पांढरी, पिवळसर,रंगीत सतत हलणारी गर्दीही पाहण्यासारखी असे.

मग रात्री घरीआमचे चुलत भाऊ मुकुंद आणि शशी आतेभाऊ अरूण मधू दुसरे अगदी जवळचे नातेवाईक दत्ता काकडे वगैरे आले की झकास गप्पाटप्पा होत; हसण्या खिदळण्यात वेळ जाई. पण उद्या शाळा ही आठवण झाली की दसरा- सणाचा मोठा आनंद लहान लहान होत जाई!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *