रेडवुड सिटी
१९८४ साली तिच्या पुस्तकाचा विक्रमी खप झाला. तिने आपली स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु केली. त्यातूनच तिने पुढे आपले साम्राज्यच उभे केले!
प्रेरक विचारांतून प्रेरणा देणारी; माणसाला पुन्हा उभी करणारी,काहींच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी पुस्तके तिने लिहिली.
तिचे मुख्यआणि आवडते प्रमेय असे की तुमच्या रोग-व्याधींचा संबंध तुमच्या विचारांशी आहे. आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना प्रसंगांमागेही तुमचे विचारचमुख्यत्वे कारणीभूत असतात. वाचकांना तिचे आवर्जून सांगणे असे की सकारात्मक भावाने तुमचे विचार, वाईट किंवा प्रतिकूल घटनाही परतवून लावू शकतात. तिच्या लिखाणात अध्यात्माचा स्पर्श होता. तिचा विशेष हा की आपण जे सांगतो ते तिने केलेले असे. आचरणात आणलेले असे. “बोले तैसा चाले” अशी उंचीतिने गाठली होती.
“You Can Heal Your Life” , “The Power Is Within You ” , “Meditations to Heal Your Life ”
ही तिची काही गाजलेली पुस्तके. तिने इतर चांगल्या लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध केली. चांगल्या लेखक वक्त्यांचा ताफा तिच्या संस्थेच्या पटावर होता. केवळप्रकाशन करूनच ती थांबली नाही तर आयुष्य घडवणाऱ्या निरनिराळ्या बाबींसाठी ती शिबिरे कार्यशाळा. व्याख्याने आयोजित करत असे. त्याकामी तिला तिच्यासंस्थेशी निगडीत असणारे व इतरही लेखक वक्ते उपयोगी पडत. ह्या विषयांचे online अभ्यासवर्गही चालू केले. मग त्याबरोबर CDs, DVDs सगळेच आले!
एकच एक, एकट्या स्त्रीचे हे कर्तृत्व आहे. त्या कर्तबगार बाईचे नाव ल्युझी हे आणि कोट्यावधी डाॅलर्सची उलाढाल असणाऱी तिची कंपनी, ” हे हाऊस “. मगNew York Times Magazine ने २००८ साली तिच्यावर ” नव्या युगाची राणी” हा गौरवपर लेख लिहिला यात नवल ते काय ! तिचे कर्तृत्व आजचे नाही. पाचसहा दशकांचे कष्ट त्यापाठीमागे आहेत. १९८०साली आपल्या घरातील एका खोलीत सुरु केलेल्या Hay House चा वेलु गगनावरी गेलाय!
ल्युझी हेच्या आयुष्याचे वर्णन कसे करायचे? बाळपण तिला नव्हतेच असे म्हणावे लागेल. पाच वर्षाची असतानाच ल्युझीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केले. त्यानंतर पुढे शेजाऱ्याने. वयात आली नाही तोच शाळा सोडावी लागली, कारण ती गरोदर झाली. एक मुलगी झाली. हेच तिचे एकटे अपत्य. पण तिने आपलीमुलगी एका दत्तक देणाऱ्या संस्थेला दिली.
अशा स्थितीत शिकागोलाच काही काळ काढल्यावर ती न्युयाॅर्कला आली . तिथे ती fashion model म्हणून काम करू लागली. एकोणीसशे पन्न्शीच्या मध्यासब्रिटिश व्यावसायिक ॲंड्र्यू हेशी तिचे लग्न झाले. चौदा वर्षाचा संसार झाल्यावर घटस्फोट झाला.
पुन्हा हलाखीचे दिवसआले. निराश अवस्थेत असताना एके दिवशी ती मॅनहॅटन मधील एका चर्चमध्ये गेली. तिथल्या प्रवचनातले एक वाक्य काही तिला पटेना; प्रवचनकार सांगत होता, ” तुम्ही तुमचे विचार बदललेत तर तुमचे आयुष्यही बदलेल.” ” खरं?” ती स्वत:लाच विचारत राहिली. काही काळानंतर ती कॅलिफोर्नियातआली.
तिने त्या तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु केला. प्रमेयांवरची गणिते स्वत: सोडवली म्हणजे त्याप्रमाणे वागू लागली. तिचे आचरण तसेच होऊ लागले. पण तिच्याकसोटीचा खरा काळ १९७७ साली आला. तिला कॅन्सर झाला ! ती विचार करू लागली. हळू हळू तिच्या लक्षात आले की आपल्याला जो कॅन्सर झाला त्याचेमूळ पूर्वी झालेल्या अत्याचाराची चीड,घृणा जी अजूनही आपल्या मनात आहे. त्यात आहे. खोलवर दडलेला असेल पण तो नकळत वर येत असतो.
तिने पहिल्या प्रथम निश्चय केला. कॅन्सरवर उपचार करायचे नाहीत. चांगला आहार घ्यायला सुरवात केली. उदार क्षमाशील वृत्तीने ती वागू लागली. हे मनापासूनकरू लागली. आयुष्यात ज्यांच्यामुळे जे काही भोगावे लागले असेल-नसेल त्यांना ती पूर्णपणे विसरून गेली. सर्व काही मनातून काढून टाकले. चांगला परिणाम, बदलहेी होऊ लागला. हे चालू असताना तिने एक छोटेखानी पुस्तक लिहिले- “Heal Your Body “. ह्याचाच पुढे विस्तार करत आपल्या स्वानुभवातूनजाणवलेल्या विचारांवर आधारित “You Can Heal Your Life” हे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या ५० लाख प्रति खपल्या आहेत!
त्यानंतर एडसची लागण झाली. त्या लोकांसाठीही तिने काम केले. त्या बैठकांची सुरवातही पहिल्यांदा तिच्या घरातच झाली. पण नंतर मोठी सभागृहे घ्यावीलागली. ती म्हणते तिथे जास्त करून धीटपणे आयाच पुढे येत. एकही एडसग्रस्त बाप उभा राहात नसे, मग मंचावर येणे दूरच!
तिची एक दोन उत्कृष्ट वचने पाहूयात. “Every thought we think is creating our future. My happy thoughts create my healthy body.”
” Only good can come to me .”
I always work with and for wonderful people. I love my job.”
वरील वाक्य वाचल्यावर मी पूर्वी वाचलेले, एका काळ्या गृहस्थाने-बहुधा तो गायक असावा- म्हटलेले वाक्य आठवले. तो म्हणतो,” मला आजपर्यंत एकही वाईटमाणूस भेटला नाही.”
तिचे टीकाकार म्हणतात की तिच्या सांगण्यातला अतिशय सोपेपणा आणि साधेपणा हा चांगला भाग असेल पण लोकांच्या हातात नसलेल्या अनेक गोष्टीआहेत. त्यावर त्यांचे नियंत्रण नसते. अशा वेळी ते स्वत:लाच जबाबदार धरतील. आपल्या विचारांमुळेच असे झाले मानू लागतील. रोगांवर औषधोपचारही घेणारनाहीत. त्यांच्या म्हणण्यात व्यावहारिक सत्य आहे. अशाच तऱ्हेचा प्रश्न ल्युझी हे ला Time मासिकाने मुलाखतीत विचारला होता.
” तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकांचे विचारच त्यांच्या स्थितीला कारणीभूत असतात; तर दुसऱ्या महायुद्धात जो वांशिक संहार झाला त्यात ते लोकच त्यांच्यामृत्युला जबाबदार होते असे म्हणायचे का?”
त्यावर ती म्हणाली,” मी त्यांना तसे म्हणणार नाही. लोकांना तुम्ही वाईट आहात असे मी सांगत नाही. त्यावर माझा कधीच भर नसतो. तो माझा कधी उद्देशहीनसतो.”
हे हाऊस संस्थेचा एक लेखक आणि ल्युझी हेच्या काही पुस्तकांचा सह लेखक डेव्हिड केसलरने ” You can Heal Your Heart ” च्या प्रस्तावनेत, आठ वर्षांपूर्वील्युझीशी झालेला संवाद लिहिला आहे. ल्युझी हे म्हणते, ” मी विचार करत होते. आणि ठरवलंय की माझ्या अखेरच्या क्षणी तू तिथे असावेस.”
” काही होतंय का? बरं आहे ना? ” केसलरने विचारले. ” नाही, तसं काही नाही. मी ८० वर्षाची आहे. चांगली ठणठणीत आहे. समाधानात, आनंदाने जगते आहे. माझं मरणही तितक्याच आनंदाने जगत व्हावे असं वाटतं . जगणे जसे परिपूर्ण तसं मरणही जगावं असं वाटतं.” ल्युझी हे ने सांगितले.
ही कर्तबगार, जे आपण केले तेच दुसऱ्यांना सांगणारी आणि जे इतरांना सांगितले तेच करणारी ल्युझी हे, सॅन डियॅगो येथे वयाच्या ९०व्या वर्षी नुकतीच परवासमाधानाने सर्वांचा निरोप घेऊन गेली.