पाण्यावरच्या रेघा

रेडवुड सिटी

आपल्याकडे लग्नाचे काही प्रकार मानलेले आहेत किंवा होते म्हणा. वैदिक किंवा पारंपारिक, गांधर्व विवाह,   राक्षस विवाह इत्यादि. त्याची ढोबळपणे अलीकडची रुपे सांगायची तर आई-वडिलांनी पसंत केलेली, प्रेम विवाह, यातहीकाही उपप्रकार म्हणजे पळून जाऊन केलेले, तर राक्षस विवाह सांगायचे तर सिनेमाकडे गेले पाहिजे. प्राण, प्रेम चोप्रा, जीवन, अजित हे नायिकेला पळवून आणून भटजीला किंवा देवळातल्या पुजाऱ्याला पिस्तुल दाखवून लग्न भरभर लावायला सांगत. सप्तपदी पळत पळत पूर्ण करून लग्ने लावत. त्या लग्नाला राक्षस विवाह म्हणता येतील. लग्ने पैशासाठी होतात, ‘खानदान की इज्जत के लिये’ होतात तर काही चक्क फसवूनही केली जातात.

पण चीनने या सर्वांवर ताण केली आहे! कडी केली आहे!

बेजिंग आणि शांघाय मध्ये इतक्या असंख्य मोटारी झाल्या की रहदारी तुंबायला लागली, भांडणे वाढू लागली.  रहदारी वारंवार ठप्प होऊ लागली. प्रदुषण तर वाढलेच. सरकारने फतवा काढला; मोटर लायसन्स म्हणजे नंबर प्लेट लाॅटरीतूनच मिळतील. वर्षातून तीन चार वेळा लाॅटरी निघते.यंदा जूनच्या लाॅटरीत २८लाख चिन्यांनी नावे नोंदवली होती! त्यापैकी दर ८४३ लोकांमधून  एकाला नंबर प्लेट मिळाली. सरकार चिनी आणि लोकही चिनीच! एक नियम असाही आहे की नवरा बायको आपल्या प्लेटस एकमेकांना देऊ शकतात.  लोकांनी डोके लढवले. सुरुझाली लग्ने! त्यात chat boxes आणि इतर सोशल मिडियांची भर. कोण्या एखाद्या पुरुषाला/बाईला नंबर प्लेट हवी असेल तर दुसऱे नवरे / बायका तयार असतात आपल्या प्लेटस विकायला.

प्लेटींच्या किंमती वाढतावाढता वाढू लागल्या. सध्याचा बाजार भाव १३५०० डाॅलर्स आहे. मोटारींच्या किमतीपेक्षाही जास्त!  त्यातही एकच आकडा तीन वेळा असलेली नंबर प्लेट पाहिजे असेल तर आणखी पैसे मोजायला लागतात. चीनमध्ये ८८८ / 888 ला फार मागणी असते. कारण चिनी भाषेतील “भाग्य” या शब्दाचा उच्चार ८/8 च्या उच्चारासारखा आहे म्हणून! अशा प्लेटची किंमत ९३००० डाॅलर्स आहे.इतके पैसे मोजणारेही आहेत. कारण नविन उदयाला आलेल्या मध्यमवर्गीयांकडे ती ऐपत आहे.

नंबर प्लेटसाठी गरजू तरुण/तरूणी बरोबर लग्न लावायचे. नंबर प्लेट रीतसर नावावर झाली कीपुन्हा घटस्फोट घ्यायचे. आणि पुन्हा पहिल्या नवऱ्याबरोबर किंवा बायकोशी लग्न लावायचे! ह्यासाठी मध्स्थांच्याही जाहिराती असतात.

असाच आणखीही एक सामाजिक प्रकार होत असतो. गेली बरीच दशके लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीनच्या सरकारने ‘एकच मुल’ धोरण सक्तीने अंमलातआणले. कोणत्याही सक्तीचा काहीतरी दुष्परिणाम होतोच. स्त्रीगर्भाची भ्रुणहत्या सुरु झाली. मुलांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली. ह्यातून काही गुंतागुंती वाढल्या.

चीनमध्ये असाही नियम आहे की बेजिंग शांधायमध्ये रहिवासी असलेल्यानाच तिथे घर विकत घेता येते.तसेच विवाहिताला घराच्या रोख हप्त्यात मोठी सवलत असते. मुलींची संख्या कमी. मुले जास्त. त्यमुळे घर असलेल्या तरुणाला लग्नाच्या बाजारात मानाने प्रवेशही  मिळतो. अगोदर घर मग बायको मिळण्याची शक्यता जास्त. बघा कसा पेच आहे!  खऱ्या बायकोसाठी घर हवे आणि घरासाठी अाधी खोटी बायको लागणार!

अरे संसार संसार। घर मोटार नंबर। लगीन झालं आता पान्यावरची रेघ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *