माझी पहिली कमाई

दोस्त प्रभाकर जोशीने मला सांगितले, “ चल, माझ्या बरोबर.” दोस्ताने चल म्हटल्यावर कोणता मित्र निघणार नाही? मी आणि जोशी निघालो. जोशीला त्याच्या न्यू हायस्कूल मधले सगळे मित्र लाल्या म्हणत.मी हरिभाईचा. माझी आणि जोशीची मैत्री काॅलेज मध्ये झाली. मी कसा त्याला लाल्या म्हणणार? मी त्याला जोशीच म्हणत असे.

मी आणि हा जोशी नाॅर्थकोट हायस्कूल मध्ये आलो. तिथे त्यावेळच्या व्ह.फा. ची म्हणजे प्राथमिक शाळेचे शेवटचे वर्ष सातवीचे याची वार्षिक परीक्षा होती. त्या काळी प्राथमिक शाळेत व्ह.फालाही मॅट्रिक सारखेच महत्व होते. तो एका साहेबांशी बोलला. माझी ओळख करून दिली. साहेब म्हणाले,” या तुम्ही उद्या सकाळी १०:०० वाजता.” मी आणि जोशी बाहेर आलो. मी त्याला विचारले,”काम कसले आहे? काय करायचे असते?” “ अरे,व्ह.फा.ची परीक्षा आहे.आपण पेपर लिहित असतो त्यावेळेस सुपरव्हायझर करतो तेच आपणही करायचे!”

दुसरे दिवशी सकाळी मी ९:३० लाच नाॅर्थकोटशाळेच्या ॲाफिसमध्ये गेलो. बरीच गडबड दिसत होती. आज साहेबांच्या जागी बाई होत्या. त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी नमस्कार करून माझे नाव पत्ता सांगितला. त्यांनी तो तपासून पाहिला. मग म्हणाल्या,” कामतकर तुम्ही ह्या वर्गावर जायचे. बाहेर व्हरांड्यात पाण्याचा डेरा भरलेला आहे का ते पाहायचे. मला त्यांनी एक उत्तरपत्रिका दिली.ती कशी भरायची व मुलांनी कशी भरायची त्या सूचना सांगितल्या. ह्या सूचना विद्यार्थ्यांना द्यायच्या हेही सांगितले. पेपर संपताना दिल्या जाणाऱ्या घंटा, त्यांचा अर्थ काय व काय करायचे तेही सांगितले. मी वर्गाकडे निघणार तेव्हढ्यात जोशीही आला. त्याचेही त्यांच्याशी बोलणे झाले. मधून ते दोघेही माझ्याकडे पाहात. जोशी मला त्याच्या वर्गावर जातो,पेपर संपल्यावर भेटू असे सांगून गेला. मीही निघालो. बाईं तेव्हढ्यात मला म्हणाल्या,” आणि एक मात्र अजिबात विसरू नका. मुलांना उत्तरे सांगणे, हे चुकले तसे लिही, अशी कसलीही मदत करू नका. मुलांना पास व्हायचे आहे हे विसरू नका!” म्हणजे माझा शैक्षणिक आलेख जोशांनी बाईंना सांगितला वाटते!त्याला मनातल्या मनात प्रभ्या,जोश्या,लाल्या सा… आणि फुल्या फुल्या म्हणत वर्गाकडे निघालो.त्यानेच मला हे काम मिळवून दिले हे इतक्यातच विसरलो. हे लक्षात आले आणि माझा मलाच राग आला. चूक लक्षात आली.

वर्गात आलो. सगळीकडे पाहिले. “व्ह.फा”ची मुलं मुली होत्या.हिरव्या पानांच्या गर्दीत काही कळ्या दिसाव्यात तशा डेस्कांच्या प्रत्येक रांगेत एक दोन मुली बसल्या होत्या. त्या सर्वांबरोबरच मलाही परिक्षेचे tension आले होते. कोण काॅपी करेल कशी करेल त्या सर्व कृल्प्त्या आठवत होतो. सगळ्यांचे हात बाह्या वर करून पाहिले. कुणाजवळ वही पुस्तक वगैरे नाही ह्याची डेस्काच्या खालच्या कप्प्यात डोकावून हात फिरवून खात्री करून घेतली. इतक्यात कुणा शिक्षकाने माझ्याजवळ उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिला. घंटा झाली. मी त्या प्रत्येकाला दिल्या. मुलांना मी वरचा भाग कसा भरायचा ते सांगू लागलो. कुणीही लक्ष देत नव्हते. त्यांचे ते भरत होते. त्यांना माहित झाले होते कसे भरायची ती उत्तरपत्रिका. तेव्हढ्यात दुसरे शिक्षक आले. त्यांनी मला प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा दिला. घंटा झाल्याशिवाय वाटू नका असे बजावून गेले. प्रश्नपत्रिका म्हटल्यावर मला माझ्या परिक्षा आठवल्या व घाम फुटला. पोरं ढिम्म होती. त्यांना,परीक्षा कुणाची आणि मला का घाम फुटला ते समजेना. एका धीट पोराने विचारलेच, “ सर, तुम्ही काॅपी केली होती का?” इतर पोरंपोरी हसू लागल्या. घंटा झाली! मी प्रश्नपत्रिका वाटल्या. पोरे ती वाचू लागली. काहीजण लगेच तर काही थोड्या वेळाने पेपर लिहू लागले.

मी रांगे रांगेतून हिंडू लागलो. टेबलाजवळ येऊन वर्गाकडे बारकाईने पाहू लागलो. पंधरा वीस मिनिटात कोण काॅपी करायला सुरवात करतोय ह्या विचाराने निश्चिंत होऊन पुन्हा फेऱ्या मारू लागलो. थोड्या वेळाने त्या वरिष्ठ बाई चष्म्यावरून पाहात माझ्या वर्गात आल्या. पोरं मान खाली घालून लिहित होती. काही विचारात पडली होती. तोंडात बोट घालून शून्यात पाहात होती. बाई आलेल्या पाहून ‘आता आणखीन काय’ह्या विचाराने मीच घाबरून गेलो. बाईंनी जमतेय ना विचारले. मनात म्हणालो ह्यात काय जमायचे? मी हो म्हणालो. बाई “कुणालाही उत्तरासाठी मदत करायची नाही” हे पुन्हा बजावून गेल्या. नोकरी एक दिवसाची असली तरी तिच्यातही अपमान होतोच हे लक्षात आले. पण माझी शैक्षणिक प्रगति आठवून बाईंना मुलांच्या निकालाची काळजी वाटणारच हे मी समजून घेतले!

अर्धा पाऊण तास झाला . मीही सरावलो होतो. रांगांतून फिरता फिरता मुलांच्या पेपरात डोकावू लागलो. प्रश्न ‘संधी आणि समास ह्यातील फरक स्पष्ट करा” असावा. एकाने लिहिले होते, “ संधी ची सुरवात अनुस्वाराने होते. समासाची होत नाही.” दुसऱ्याचा पेपर पाहिला त्यात त्याने जास्त खुलासेवार लिहिले होते,”आधी संधी आणि जोडाक्षरांतील फरक पाहिला पाहिजे. मी मनात विचारले,”का रे बाबा?” त्याने पुढे स्पष्ट केले होते,” जोडाक्षरात दोन अक्षरे एकत्र येतात. उदा. ‘आणि’ तर संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिवसरात्र. समासातही दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिनरात.” हे अफाट ज्ञान वाचून माझा चेहरा उदगार चिन्हासारखा झाला. पुढे गेलो. मुलगी हुषार असावी. तिने लिहिले होते,” संधी म्हणजे सोडणे व साधणे ह्यांचे नाम आहे.”तिने पुढे लिहिले होते की ‘ संधी सोडायची नसते आणि समास हा सोडवायचा असतो. दोघात हा स्पष्ट फरक आहे.” मी टाळ्या वाजवणार होतो पण आवरले स्वत:ला. दुसऱ्या रांगेतील एका मुलाने प्रश्न फार सहज व सोपा करून टाकला होता. त्याने लिहिले होते,”सं+धी ही दोन अक्षरे मिळून संधी होतो तर समास ह्या शब्दात दोन स मध्ये मा हे अक्षर येते. त्यात कुठेही धी नाही. हा स्पष्ट फरक आहे.” मला माझ्या उत्तरांची आठवण झाली! खिडकी जवळच्या रांगेतील एका मुलीने अत्यंत व्यावहारिक उत्तर लिहिले होते. तिने लिहिले होते की,” संधी चा संबंध वेळेशी जोडला आहे. आणि लिहिताना समास हा सोडावाच लागतो. दोन्हीतील हा फरक स्पष्ट आहें” एकाने लिहिले होते,” संधी व साधु हे दोन वेगळे शब्द आहेत पण संधीसाधु हा एकच शब्द आहे. संधी आणि समास मध्येही असाच स्पष्ट फरक आहे.”

माझा पहिला दिवस पार पडला. उद्याचा शेवटचा दिवस होता. मला बाईंनी उद्याही बोलावले. पेपर सुरू झाला. आज इतिहासाचा पेपर होता. लिहिणे खूप असते. थोरवी व योग्यता हा प्रश्न तर हमखास असतोच. तसा आजही होता. वर्गात फेऱ्या घालताना उद्याचा इतिहास आजच निर्माण करणारे हे आधारस्तंभ काय लिहितात हे पाहावे म्हणून डोकावू लागलो. एकीने झाशीच्या राणीविषयी लिहिताना, पहिलेच वाक्य ,”झाशीची राणी ही एक थोर पुरूष होऊन गेली.” लिहिलेले पाहून थक्क झालो. पण बऱ्याच मुलांमुलींनी तसेच लिहिले बोते.सवयीचा परिणाम. अहिल्याबाई होळकरांसंबंधी लिहितानाही “त्या एक थोर पुरुष होऊन गेल्या” असेच लिहिलं होते. झाशीची राणी असो की अहिल्यादेवी होळकर असो, दुसरे वाक्य “त्यांची योग्यता मोठी होती.” असेच बहुतेकांनी लिहिले होते. झाले उत्तर! सम्राट अशोकांनी कारकीर्दीत काय केले व शेरशहांनी काय सुधारणा केल्या ह्यांच्या दोन्ही उत्तरात रस्ते बांधले, दुतर्फा झाडे लावलीआणि विहिरी खोदल्या हेच साचेबंद उत्तर सगळ्यांनी लिहिले होते! माझ्या मदतीची कुणालाही गरज नव्हती !

व्ह.फा.च्या परीक्षेतील शेवटचे दोनच दिवस मला सुपरव्हायझिंगचे काम मिळाले. माझ्या आयुष्यातील ही पहिली नोकरी किंवा मोबदला मिळालेले पहिलेच काम होते. मित्र प्रभाकर जोशींनी “चल रे” म्हणून नेले हा त्याचा मोठेपणा! बारा चौदाच रुपये मिळाले असतील.पण मला ती फार मोठी रक्कम वाटली ह्यात आश्चर्य नाही. त्याबरोबरच मुलांची उत्तरे वाचताना ज्ञानात आणि करमणुकीत जी भर पडली त्याचे मोल कसे करणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *