पोस्टमन

परवा बाळासाहेबांचे पत्र आले.आजही हाताने पत्र लिहून पोष्टाने
पाठवणारी थोडी माणसे असतील त्यापैकी बाळासाहेब आहेत.पाकिटावरील
सुंदर हस्ताक्षरावरूनच समजलो की बाळासाहेबांचे पत्र! सुंदर
अक्षराबरोबरच ते, पाकिटही वेलबुट्टीनी तर कधी फुलांच्या नक्षीने
सजवतात. आजच्या पाकिटावर पत्रं घेऊन लगबगीने निघालेल्या पोस्टमनचे
लहानसे चित्र चिकटवले होते.पत्रावर आपले चित्र पाहून पोष्टमनही खूष
झाला होता. पाकिट माझ्या हातात देताना तो हसत होता त्यावरूनच ते दिसत
होते.इतके समर्पक चित्र पाहून मलाही त्यांचे कौतूक वाटले.पत्रासाठी
कोणीतरी घराघरात, कार्यालयात, वाट पहात असेल हे जाणून असलेला तो
पोस्टमन किती लगबगीने निघाला आहे!

आपल्या प्रियकराचे पत्र आज यॆईल म्हणून अधिरतेने सारखे आत बाहेर करत,
शिवाय ते दुसऱ्या कोणाच्या हातात पडू नये ह्यासाठीही,मधेच खिडकीतून
दूर टक लावून पोस्टमन दिसतोय का याची उत्सुकतेने वाट पहात असलेली तरूणी
असेल; किंवा”इतके दिवस झाले अजून तिचे पत्र कसे नाही”म्हणून थोडा चिडलेला,
थोड्या चिंतेत असलेला पण तितक्याच आतुरतेने आपल्या प्रियतमेच्या पत्राची
येरझाऱ्या घालत वाट पहाणारा “घायाळ” प्रियकर असेल; तर “माहेरी गेली की
विसरली मला”असे गेले चार दिवस घोकणारा,नुकतेच लग्न झालेला तरूण
नवरा विरह कष्टाने सहन करत, सर्वच बाबतीत सध्या उताविळ असलेला तो
नवरा पोस्टमनची तितक्याच उताविळपणे वाट पहात असेल; तर एखादी
पहिल्यांदाच माहेरी आलेली तरूण माहेरवाशीण”ह्यांचे पत्र कसले येते!

बसले असतील हॉटेलात मित्रांच्या बरोबर चहा ढोसत,हसत खिदळत.कशाला
आठवण येतेय त्यांना!” असे मनातल्या मनात म्हणत पण चेहऱ्यावर मात्र आज
नक्की यॆईल पत्र असा हर्षभाव असलेली, आपल्या धाकट्या भावा-बहिणींना
पोस्टमनकडे लक्ष ठेवा रे असे सांगत स्वत:च दाराबाहेर दोन चार वेळ येऊन त्या
मेघदूताची वाट पहात असेल.

एखादी माऊली, घर सोडून पहिल्यांदाच लांबच्या गावाला शिकायला/
नोकरीला गेलेल्या मुलाच्या साध्या खुशालीच्या पत्राची प्राण डोळ्यात
साठवून वाट पहात असेल तर दूर गावी शिकायला, नोकरीच्या
खटपटीसाठी गेलेला मुलगा आपल्या वडिलांच्या “गोष्टी घराकडील”
पत्राची वाट पहात गहिवरून उभा असेल.किंवा एखादा तरूण इंटरव्ह्यू अथवा
नेमणूकीच्या पत्राची, मान मोडून दुखायला लागली तरी आशेने पोस्टमनची
वाट पहात असेल; कुणी नवखा लेखक संपादकाच्या”तुमची कथा दिवाळी
अंकासाठी स्वीकारली आहे” अशा भाग्योदयी पत्राची डोळ्यांत दिवाळीच्या
चंद्रज्योतीचा प्रकाश घेऊन धडधडत्या अंत:करणानी वाट पहात असेल.उपवर
मुलीचे आईबाप “मुलगी पसंत आहे, मुहूर्त नक्की करण्यासाठी या”अशा
पसंतीची मोहर असलेल्या पत्राची, उत्सुकता आणि काळजीने दाटलेल्या
डोळ्यांनी पोस्टमनची रोज वाट पहात असतील!

पोस्टमन ना नात्याचा ना गोत्याचा. पत्र आणल्या दिवशी मात्र प्रत्येकाचा!
असा इतका बाहेरचा असूनही सगळ्यांच्या ह्रुदयातला झालेला त्याच्या
सारखा समरस सेवक दुसरा नाही!

खऱ्याखुऱ्या अर्थाने सर्वांचा ’पत्रमित्रच’ तो. सगळ्यांचे ज्याच्या
वाटेकडे डोळे लागलेले असतात तो पोस्टमन!

पण हे सगळे पत्रपुराण ४५-४६ वर्षापूर्वीच्या काळाला लागू पडणारे आहे.

आज दूरध्वनी,संगणक, ई-मेल, व्हॉइस-मेल,एसएमएस,टेक्स्ट मेसेज,सर्वसंचारी
दूरध्वनी इत्यादी आधुनिक सोयींची रेलचेल झाली आहे की हस्ताक्षरातील
पत्रेच गेली.ती आता “एन्डेंजर्ड स्पेसीज” झाली आहेत.पत्रेच नाहीत तर
पोस्टमनची वाट कोण पाहिल?

छापील कचरा वाटप करण्याचे काम फक्त त्याला आता राहिले आहे.तोही
बिचारा आता कोरडेपणाने काम करतोय ह्यात त्याचा काय दोष?

पूर्वीचा पोस्टमन “कुणा’रावसाहेब!’बोले बघून। कुणा’भाऊ!’नाना!’म्हणे तो
हसून॥ अशी नावे पुकारून पत्र टाकताना किंवा हातात देताना पत्राच्या
अक्षरा रूपावरून त्यातील भावना हसून, डोळ्यांनी, भुवयांनी आनंद,
आश्चर्य व्यक्त करत जात असे.

कोण कोणत्या पत्राची वाट पहातात हे अनुभवी पोस्टमनला सरावाने माहित असे.
“वकीलसाहेब, मुलासाठी बऱ्याच पत्रिका-फोटो आलेले दिसताहेत!”असे अदबीने
म्हणत त्यांना पत्रे दॆईल तर भोसले मधुला,”चहा-चिवडा तरी पाहिजे नोकरी
लागल्याचा”असे म्हणून सरकारी पत्त्याच्या पाकिटाकडे पहात लांब पाकिट
दॆईल. “श्री”आणि कसलाही मायना नसलेले दोन-तीन ओळीचे कार्ड खाली मान
घालून न बोलता शेजारच्या लाटकरांच्या घरात हळूच सरकवून झटकन
पुढे जाईल.

काळाच्या झपाट्यात हे सर्व संपले.आणि त्यात काही नवल नाही. असे होणारच.

पोट खपाटी गेलेला शेतकरी जसा पावसाच्या ढगाची, आकाशाकडे खोल
गेलेल्या डोळ्यांनी काकुळतीने वाट पाहात असतो त्याप्रमाणे एखाद्या खेड्यातील
कुणी गरीब आई-बाप पोराच्या मनीऑर्डरसाठी आजही पोस्टमनची काकुळतीने
वाट पहात असतील म्हणा.

आणि आपला पोस्टमनही, ती मनी-ऑर्डर देण्यासाठी लगबगीने निघालाही
असेल!

परिस मिळाल्यावर……!

रेडवूड सिटी ४ जून, २००८

नेहमीप्रमाणे बाळासाहेबांचे पत्र आले. नेहमीप्रमाणे पत्र वाचून आनंदही झाला. पण त्यांच्या अलिकडील काही पत्रातून,”कुणाशी बोलावे,चार गोष्टी कराव्यात तर तसे कोणी आसपास दिसत नाहीत. कोणी फारसे भेटत नाहीत. आवडीने बोलावे, थट्टामस्करी, प्रसंगी थोडासा वात्रटपणा करावा असे शेजारी जवळपास भेटत नाहीत.कुणाकडे जावे तर असे तडक जाताही येत नाही.” अश्या थोडाश्या निराश तक्रारीचा सूर जाणवत होता.मला वाटले ते परदेशात असल्यामुळे त्यांची अशी मन:स्थिती झाली असावी.

सध्या परदेशातच नव्हे तर आपल्या येथेही वारंवार एकमेकांकडे जाणे येणे कुठे होते? आले मनात की गेलो मित्रांकडे,नातेवाईकांकडे,असे घडत नाही. इतकेच काय शेजाऱ्यांकडे जाऊन गप्पा-टप्पा,थट्टा-मस्करी, पत्ते कुटणे होत नाही. कारणे अनेक असतील पण थोडक्यात सांगायचे तर बदललेली, रोज बदलत असलेली परिस्थिती हेच मुख्य कारण होय.

माणसे भेटावीत,आपण जाऊन त्यांना भेटावेत असे सर्वांनाच वाटते.काही काळापूर्वी म्हणजे घरांचे दरवाजे उघडे असण्याच्या काळात हे शक्य होते. बोलावून, न बोलावता, शेजारी, जवळपासचे असे भेटत असत.भेटीगाठी सहज होत.

हुंकाराला शब्दांचा अंकुर फुटण्यापूर्वी, आवाजाला शब्दांची पालवी बहरण्यापूर्वी; दळणवळणाची साधने येण्यापूर्वी माणूस एकमेकांना कसा भेटत असेल,कसाबोलत असेल! आपला प्रतिध्वनी ऐकू आला तरी त्याला कोणी भेटल्याचा, कोणाशी बोलल्याचा आनंद झाला असेल!

माणूस बोलयला लिहायला लागल्यावर तो पक्ष्यांमार्फत चिठ्यांतून संदेश पाठवू लागला. भेटता येत नाही,गपा मारता येत नाहीत यावर माणसाने शोधून काढलेला उपाय म्हणजे पत्र.असे म्हणतात की, परमेश्वराला एकाच वेळी सगळीकडे,सगळ्यांकडे जाता/पाहता यॆईना म्हणून त्याने ’आई’ निर्माण केली.माणसाने ’पत्र’ शोधून काढले! पत्रं लिहायला सुरूवात केली.पत्रातून भेटी गाठी हॊऊ लागल्या,होत आहेत आणि पुढेही होतील.काळाप्रमाणे पत्र आपले रूप बदलेल.

नळ-दमयंतीचे पत्र हंस होते.कालिदासाने तर कमाल केली. त्याच्या यक्षाने मेघालाच आपले पत्र केले.’न देखे रवि,ते देखे कवि’अशा प्रतिभावान कवींनी चंद्रालाही पत्र केले– साजण आपल्याला विसरला अशी त्याच्या भेटीसाठी तळमळत असलेली प्रेयसी ’चंदा देस पियाके जा’आणि त्याला समजावून परत घेऊन ये अशी चंद्राला विनवणी करते.तर माहेरच्या आठवणीने मन भरून आलेली सासुरवाशीण, अंगणात आलेल्या पाखराला ’माझिया माहेरा जा’, तुझ्या सोबतीला माझे आतुरलेले मन देते आणि माहेरची वाट दाखवायला भोळी आठवणही देते,असे म्हणत पाखराला आपले पत्र करते. तुरुंगात बंदीवान झालेला क्रांतिकारक तर आपल्या श्वासांना पत्र करून आपल्या ह्रुदयातील खंत मातृभूमीला कळवतो!

पत्रांतून माणूस आपले विचार, मतं कळवतो.मनातल्या गोष्टी, ह्रुदयातील गोड गुपित सांगतो, मन मोकळे करतो. पत्रातून माणसे एकमेकांना भेटतात ही कवि-कल्पना वाटेल किंवा भाषालंकार. पण भेटत असली पाहिजेत. काहींना तर ती दिसतातही! असावीत; कुणी सांगावे? तसे नसते तर उगीच का कुणी एखादे पत्र ओठांना लावून ह्रुदयाशी घट्ट धरतो? का कुणी हातात पत्र फडफडवत हसत हसत सगळ्यांना दाखवत घरभर फिरतो? का कोणी आराम खुर्चीतून उठून,नाकावर घसरलेला चष्मा सावरत,”पाहिलस का…आपला…काय म्हणतोय” म्हणत कौतूकभरल्या डोळ्यांनी ते पत्र दुसऱ्या चष्म्याला देतो! पत्र वाचल्यावर आपल्याला आनंद होतो,आपण तरंगतो,बुडून जातो,थोडेसे चकित होतो, सुखावतो, काळजीतही पडतो. सगळे कसे कोणी भेटल्यावर बोलल्यावर वाटते तसेच पत्र वाचून होते यात शंका नाही.कवींचे मेघ, चंद्र, हंस, पाखरू, श्वास हे वरवर पहाता पत्र-दूत वाटतील, पण ती त्यांची पत्रेच आहेत.

सध्याच्या अतिशय वेगवान काळात एकमेकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे पत्रं लिहिणे शक्य होत नाही.पण शब्दसृष्टीच्या परतिभावंतांने लिहिलेल्या शब्दांतूनही मणसे भेटवण्याची दिसताहेत अशी भावना निर्माण केली त्याचप्रमाणे प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी त्याहीपेक्षा सोयीचे,उपाय शोधून आपल्या हातात दिले. दूरध्वनी, बिनतारी संदेश,आणि ह्यांचीच आजची बदलली विविध रूपे पाहिली की आपण थक्क होतो.परिसाचा एक लहानसा तुकडा सर्व लोखंडाचे सोने करतो. तसे आजच्या विज्ञानयुगातील लहानशा परिसाने-मायक्रोप्रोसेसर चिपने[लघुतम क्रियाप्रक्रियाकारी ?]सर्व विश्व आपल्या घरात आणून ठेवले! संगणकावरून आपल्या अनेक मित्रांशी एकाच वेळी बोलता येते.संगणकातून पत्र लिहिले तर ते पोचायला एक क्षणही लागत नाही. दूरध्वनी वरून बोलताना समोरचा आपल्याला समोर दिसतो! व्हिडिओ कॉन्फ़रन्सिंगने[चित्रफितिमुळे]चार मित्रांची झकास गप्पाष्टकेही रंगू शकतात.आणि हे सर्व, मनात आले की क्षणार्धात घडून येते! चाळी-वाड्यांतील घरांची दारे उघडी असण्याच्या काळात जसे सहज होत असे तशाच आता ह्या मायक्रोप्रोसेसरच्या ’परिसा”मुळे हे सर्व साधते.भाषाप्रभू शब्द आणि कल्पना सृष्टीचे निर्माते तर विज्ञानप्रभू सत्याभास सृष्टीचे जनक.ह्या किमयागारांनी आणि त्यांच्या “परिसाने” प्रत्यक्ष आणि कल्पित, सत्य आणि मिथ्य, वास्तव आणि भास यामधील सीमारेषा इतकी पुसट,अंधुक केली आहे की भासाची चाहूलही लागत नाही! ही खरी किमया! पुन्हा कवींच्या शब्दातच म्हणावेसे वाटते ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’!

हा नव्या मनुचा नवा परिस हाताशी असल्यावर पूर्वीची ती पत्रे, त्या भेटीगाठी,त्या गप्पा नाहीत, ’गेले ते दिन गेले’ ही खंत कशाला? परिस हातात असल्यावर जुन्या सोन्याच्या खाणी उजाड झाल्या ह्याची चिंता कोण करेल? आणि का करावी?

गरीब बिचारा मारुती – एक उपेक्षित दैवत

आज हनुमान जयंती. मारुतीचा जन्म झाला तो साजरा करण्याचा दिवस. त्यामुळेच वर उजव्या कोपऱ्यात शब्दांचे भु:भुत्कार उमटले असावेत.

खरं तर मारुतीचा म्हणून वर्णिलेला एकही गुण अंगात नाही. त्याच्यासारखे दणकट शरीर नाही की ताकद नाही. त्याची चपळाई नाही की त्याच्या उंच उड्डाणाची, शारीरिक सोडा मानसिक ’झेप’ही नाही. फार तर ’झोपावे उत्तरेकडे’ इतकेच बिनघोर जमते मला! मारुतीशी कसलेही साम्य नाही, तुळणा नाही. पण इतके सणवार, जयंत्या उत्सव येतात. अगदी वाजत गाजत येतात, गर्जत जातात. मग आजच मारुती जन्माची–हनुमान जयंतीचे मला इतके अप्रूप का वाटावे? आठवण का व्हावी?

तशी काही कारणे सांगता येणार नाहीत.सांगता येतीलही. (ही अशी कायमची द्विधा अवस्था; जन्मभराची!) हो आणि नाही दोन्ही एकदमच. असो.

लहानपणी दोन तीन वर्षं मी, मी आणि श्याम; तर कधी श्याम आणि देगावकर चाळीतली कुणीतरे मुलं असे मिळून- आणि हो शशीही असेच- फरशा, विटांचे लहान लहान तुकडे लावून ’देऊळ’ करायचो. आमच्या किंवा कधी आबासाहेबांच्या बोळात, मागच्या अंगणात हे देऊळ असायचे. देवळाचा इतर जामानिमा देवळाच्या फरशा विटाच्या तुकड्यांना साजेसाच!मारुतीचे कुठून तरी आणलेले लहानसे चित्र तरी किंवा त्यतल्या त्यात चांगला गुळगुळीत उभा दगड हाच आमचा मारुती असायचा. कोरांटीची, गुलबक्षीची किंवा पारिजातकांची एक दोन फुले त्यावर कशाचीही हिरवी पाने! मारुती खूष!पण हा’उत्सव’आमच्या उत्साहा इतकाच दोन तीन वर्षेच झाला असावा.

पण ह्या ’उत्सवा’ पेक्षाही आमच्या मारुती भक्तीला, प्रेमाला खरे उधाण भागवत टॉकीज मध्ये ’रामभक्त हनुमान’ हा अद्भुत चित्तथरारक सिनेमा पहाताना यायचे. मारुतीचा सिनेमा पहाण्याचा आनंद मोठा असायचा. माझ्यासारख्या लहान मुलांचाच नाही तर साध्या अशिक्षित कामगारांचा पोरांचाही तसाच असायचा. हा सिनेमा काही हनुमान जयंतीलाच लागत नसे. तो केव्हाही यायचा.संक्रांतीच्या जत्रेच्या वेळी कुठल्यातरी एखाद्या थेटरात हमखास असायचाच. ह्या मारुतीवर बरेच सिनेमा निघाले. आणि रामावरच्या सिनेमातही मारुती असायचाच!

मारुतीच्या सिनेमातील ट्रिक सीन्स, मारुतीने आपली छाती फाडून,(गंजिफ्राक फाडतय बे त्ये!असं पुढं मोठेपणी म्हणायचे) त्याच्या हृदयात राम लक्ष्मण सीता बसलेली दाखवणे, त्याची आकाशातील उड्डाणे वगैरे भाग म्हणजे खरा सिनेमा. तुफान गर्दीत चालायचा. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.’पवनपुत्र हनुमान’, ’जय हनुमान’ ’रामभक्त हनुमान’. शिवाय रामायणावरचे सिनेमे मारुतीशिवाय कसे पूर्ण होतील?रामापेक्षाही सर्वजण मारुती कधी येतो… मोठ मोठी झाडे उपटून उचलून; प्रचंड दगड फेकून राक्षसांच्या टाळक्यात कधी हाणतो त्यांना हैराण करतो; गदेने त्यांची टाळकी कधी शेकणार; राक्षसांच्या छातीत गदा हाणून त्यांना कधी लोळवणार; ह्याचेच मोठे कौतूक आणि उत्सुकता सगळ्या थेटरला असे!

अलिकडे सिनेमाचे तंत्र, छायाचित्रण कितीही सुधारले असो पण त्या आमच्या सिनेमातील मारुती हात पाय पसरून ते हलवत आकाशातून पोहत, झेप घेत निघाला की सगळे थेटर त्याच्याबरोबर पराक्रमाला निघत असे.मग तो टेबलावरच त्या पोझमध्ये आडवा पसरला आहे; टेबलाची अंधुकशी रेघ दिसतेय; वरच्या दोऱ्या अस्पष्ट दिसताहेत; आकाशातले ढग फक्त मागे जाताहेत; मारुती आहे तिथेच आहे; अशा कर्मदरिद्री शंका कुशंका घेण्याचे करंटेपण थेटरातला एकही प्रेक्षक करत नसे. मारुती आपल्या जळत्या शेपटीने लंकेला आग लावतोय , रावणाची दाढी जाळतोय (रावणाला दाढी कशी? विचारू नको बे!), ह्या गच्चीवरून त्या वाड्यावर उड्या मारतोय ह्याची अपूर्वाई; तो अद्बुत पराक्रम सगळेजण आपापल्या बाकावरची, खुर्ची वरची जागा सोडून अर्धवट उभे, ओणवे हॊऊन, पुढच्या माणसाच्या खांद्यावर हात टेकून तोंडाचा आ करून पहात. मारुतीला शाबासकी देत. “तिकडे राहिले”, “अरे तो वाडा”, “तो महाल” “आता त्या गच्चीवर हां” “अरे तिकडून राक्षस येतोय”, हय़्य रे पठ्ठे!” अशा शंभर सुचना देत, प्रोत्साहन देत मारुतीला सावध करत ते सीन जिवंत करत. दिग्दर्शकाचे पुष्कळसे काम प्रत्येक थेटरात आम्ही प्रेक्षकच करत असू! पडद्यावर एक मारुती, थेटरात ३००-४००!

आणि अशा वेळी जर का फिल्म तुटली मध्येच तर काही विचारू नका.पहिल्यांदा”अबे लाईट” चा आरडा ओरडा. लाईट आल्यावर जस जसा उशीर हॊऊ लागला की त्या ऑपरेटरच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार सुरू. प्रथम त्याच्या आई-बापा पासून कौटुंबिक सुरवात करत एक एक ठेवणीतल्या गावरान शिव्यांचा वर्षाव सुरू होई. जितके प्रेक्षक तितक्या शिव्या. बरं एक शिवी पुन्हा वापरायची नाही.उष्टं कोण खातंय? तिळा दार उघड म्हणल्यावर अलिबाबाला तो प्रचंड खजिना दिसला तसा फिल्म तुटल्यावर हा शिव्यांचा खजिना उघडला जायचा! क्षणभर मारुती मागे पडायचा आणि अशा इतक्या प्रकारच्या शिव्या ऐकून आमच्यासारखी मुलं नुसती थक्क होत!पण फिल्म जोडून सिनेमा चालू झाला की पुन्हा सगळे मारुतीमय हॊऊन जात.

आश्चर्य म्हणजे आज एकही लाऊडस्पीकर चौकात, कोपऱ्या कोपऱ्यावर ओरडत नाही! गाणी नाहीत. झेंडे नाचवणे नाही. शोभायात्रा नाहीत. मिरवणुका नाहीत. झांजांचे आवाज आदळत नाहीत की ढोल, ताशे बडवले जात नाहीत. गुलाल उधळला जात नाही की शेंदूर फासला जात नाही.
मारुती दैवत राहिले नाही की काय? मारुतीला देवांच्या यादीतून वगळले तर नाही ना?
मारुती देवापेक्षा आज मारुती मोटारच लोकांना प्रिय आहे. शिवाय मारुती हा”बुद्धिमतां वरिष्ठं” असा असल्यामुळेही तो ह्या लोकांच्या समजुतीपलीकडे असावा.तो “वानर युथ मुख्यम” मधील ’युथ’ हा शब्द इंग्रजी आहे अशा समजुतीमुळेही मारुती परधर्मीय देव आहे असाही शोध त्यांनी लावला असावा.

मारुतीचे देऊळ जास्त करून खेडेगावात असते.म्हणून त्याला ग्रामीण वर्गात टाकून पांढरपेशा शहरांनी त्याला उपेक्षित ठेवले असावे.

उत्सव, शोभायात्रा, यासाठी असले आडदांड शक्तिवान दैवत धार्मिक “मार्केटिंग”साठी व्हायेबल/फिझिबल प्रॉडक्ट/इमेज नाही असा सल्ला सर्व पक्षातील कॅंपेन मॅनेजमेंट गुरूंनी दिला
असावा. मारुती भले ’मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं’ वगैरे असेल पण तो श्रीरामदूतंही असल्यामुळे अशा दूताचा-दासाचा-नोकराचा कसला उत्सव? हा विचारही झाला असावा. त्यामुळेही सर्वत्र शांतता आहे.

प्रत्येक गावातील मारुतीच्या देवळातील मारुती आजही मिणमिणत्या दिव्याच्या अंधारात विनारुपाच्या चेहऱ्याने आकृती म्हणूनच उभा आहे. हातात गदा असून ती हाणता येत नाही. दुसऱ्या हातावर द्रोणागिरी झेललेला आहे पण तो कुठे ठेवताही येत नाही. झेप घेण्याचा पवित्रा आहे पण पाय उचलत नाही. धडकी भरवणारा बुभ:त्कार करून सर्व भूमंडळ सिंधुजळ डळमळून टाकावे आणि ब्रम्हांडही गडगडावे अशी शक्ती आहे पण गुरव पुजाऱ्यांनी शेंदूर नुसता फासलाच नाही तर तोंडावर फासून आत तोंडातही घातल्यामुळे घसा निकामी झालाय. सर्वांगी शेंदूर थापून थापून मारुती दिसेनासा झालाय.मिणमिणत्या अंधारात सगळ्या गावातले मारुती उदास उभे आहेत. बिनवासाची उदबत्ती देवळातली कोंदट हवा कुबट करत धुराचे झुरके सोडत कलली आहे.

गरीब बिचारा मारुती. सगळ्यांनी उपेक्षिलेला. एके काळी आमच्या लहानपणचा महाबळी प्राणदाता असलेला मारुती आज उदास मारुती झालाय!

धर्म आणि अध्यात्म

पुणे.

जगातील सगळे भेदभाव काढून टाकणारा धर्मच टिकेल. खरा धर्म अजून बनलेला(च) नाही. तो यापुढे बनायचा आहे. सर्व मानवांचा तो एकच धर्म होईल.

वेदकाळापासून आजपर्यंत ’धर्म’ हा शब्द सतत चालत आला आहे. तो संस्कृत शब्द आहे. दुसऱ्या कोणत्याही भाषेत त्याला नेमका प्रतिशब्द नाही.

धर्म हा व्यापक शब्द आहे. आपले जीवन ज्या नीतिविचारांवर आधारलेले असते त्याला आपण धर्म म्हणतो. गणिताप्रमाणेच धर्माच्या तत्वातही बदल होत नाहीत. तिन्ही काळात आणि सगळ्या देशात ती सारखीच अविचल असतात. उदा. सत्य-प्रेम-करूणा हे सदगुण देशकालानुसार बदलत नाहीत. आज जगात जे वेगवेगळे (धर्म) दिसतात ते धर्मपंथ अथवा संप्रदाय आहेत. या संप्रदायांनी लोकांना एकत्र ठेवले होते. पण आज मात्र हे सगळे संप्रदाय तोडणारे सिद्ध होत आहेत. या संप्रदायांनाच आज धर्म म्हटले जाते. त्यांच्या जागी अध्यात्माला आणायचे आहे.

अध्यात्म धर्मपंथाहून वेगळी वस्तू आहे. प्रेम करणे, खरे बोलणे, करूणा ठेवणे हे अध्यात्म आहे.

ईश्वरभक्ती करणे हेही अध्यात्म आहे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी गुडघे टेकणे, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करणे, उपवास करणे हे आजच्या प्रचलित धर्माचा भाग आहे. पण स्वत:वर नियंत्रण ठेवण्याकरता उपवास करणे हे आहे अध्यात्म.

धर्म बाह्य गोष्टींसाठी आदेश देतो. अध्यात्म आतली शक्ती वाढवतो. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तुकडे जातात. आजचा धर्म मनुष्याला आंधळा समजून हात धरून मुल्ला,मौलवी, गुरूंच्या मागे जायला शिकवतो. अध्यात्म म्हणजे तुम्ही आणि ईश्वर यांच्यामधे आणखी कोणी नाही.

—— आचार्य विनोबा भावे ( यांचे धर्म आणि अध्यात्म यावर स्फुट विचार)

ता. ७ फेब्रु. २००५ च्या ’आजची वार्ता’ह्या जाहिरातींच्या वर्तमानपत्रात आलेला हा मजकूर. सप्रेस(मराठी); सर्वधर्म प्रभूचे पाय या पुस्तकातून.

भय इथले वाटत नाही!

कोलंबस डे.
मॅरिएटा.

कितीही मोठ्याने आक्रोश केला, जीवाच्या आकांताने किंकाळे फोडली, जोर जोराने हात पाय हलविले तरी कोणालाही ऐकू जाणार नाही. कुणाला दिसणारही नाही.चिटपाखरू मदतीला येणार नाही. अशा भयानक परिस्थितीत ६७ वर्षाचा रे क्लेमबॅक सापडला होता.

हवाई बेटावरून सकाळी आपल्या लहानशा सेसना–१८२ या एक-इंजिनी विमानातून ऑस्ट्रेलियाकडे आपल्या घरी जाण्यासाठी रे क्लेमबॅकने उड्डाण केले.हा पंधरा तासांचा हवाई प्रवास. तोही पॅसिफिक महासागरावरून. विमानात एकटा. ६०० मैल पार केले. आणि विमान गिरक्या घेऊ लागले. रे क्लेमबॅकने कसे बसे जीव रक्षक जाकिट घातले. गिरक्या घेत विमान खाली अथांग पसरलेल्या महासागरात कोसळले. विमानाचे तुकडे झाले!

सभोवार अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर. कोठेही पाहिले तरी फक्त पाणी, पाणी आणि पाणी. आणि पाण्याला टेकलेले आकाश. आकाशात सूर्य आणि पाण्यावर त्याचा चमचमणारा प्रकाश. वर आभाळ आणि सभोवताली समुद्र. दुसरे कुणीही नाही. नाही म्हणायला आजूबाजूनी धडकी भरवणारे शार्क मासे मात्र सळसळत्त जात होते. जीवाचा थरकाप उडवणारा त्यांचा पहारा जीव मुठीत धरून पहायचा. पण तेही पुतळ्यासारखे स्तब्ध राहून.

आरडा ओरडा करून फायदा नाही. उलट शार्क मासे कुणी लहान प्राणी समजून लचके तोडतील. आणि केला आरडा ओरडा; हालवले हात पाय जोरजोरात, तरी कुणाला दिसणार! समुद्रात पडलेला माणूस म्हणजे केवळ एक लहान ठिपका. क्षुद्र, क्षुल्लक ठिपका.

वरती आकाश. भोवती पाणी. बाकी काही नाही. क्षितिजाकडे पहायचे. लाट आली की नम्र व्हायचे किंवा तिच्यावर स्वार व्हायचे. शांत रहायचे. अगदी शांत. कसलाही आकांत नको की हळवेपणा नको.मदत यॆईल. मदत येणारच. इतक्यात कोणीतरी यॆईलच. शांत. शांत. सारे काही शांत.

ओरडायचे? आरोळी मारायची का किंकाळी फोडायचे? कोण ऐकणार? फक्त शार्क. ते येतील. गट्टम करतील चहा बरोबरच्या बिस्किटासारखे.

हे सर्व अनुभवी रे क्लेमबॅकला माहित होते. त्याने एकट्याने गेली तीस बत्तीस वर्षे ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटे हा हवाई प्रवास २२० वेळा केलाय! विमानातून खालचा पॅसिफिक महासागर १५-१५ तास पाहिला आहे. शांत. सारे कसे शांत. पाणी आणि आकाश. अथांग पसरलेले पाणी. अगदी एकटे. आपणही तसेच एकटे. एकटेपणा. निर्जन एकांत. हे सर्व त्याने अनुभवले आहे. क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्याची शांतता प्रचंड दडपण आणते. १९९९ साली असेच एकदा विमान कोसळून पाण्यात पडण्याचा अनुभवही गाठीशी होता. पण त्यावेळेस बरोबर एक सोबती तरी होता. आज ४-५ ऑक्टोबर २००४ रोजी मात्र रे क्लेमबॅक एकटा होता.

विमान कोसळून रे खाली पडला तेव्हा एका लाटेवर आदळून आपण खाली गेलो इतकेच त्याला आता आठवत होते. चार चार फुटांच्या लाटांमधून तर कधी लाटांवर तरंगत तो खंबीरपणे पाण्यात होता. लाटांशी खेळत झुंजत डोके शांत ठेवून तो वाट पहात होता. हवाईहून निघताना त्याच्या जोडीनेच दुसरे एक सेसना-१८२ विमान निघाले होते.त्या विमानाने क्लेमबॅकचे विमान कोसळल्याचे पाहिले होते. तीन साडे तीन तास त्या विमानाने घिरट्या घालत ह्या अपघाताचा ठाव ठिकाणा सांगत संदेश पाठवले होते.

मदत यॆईलच असे स्वत:ला बजावत पॅसिफिक महासागरातला रे क्लेमबॅक नावाचा तो लहानसा ठिपका तग धरत होता. मदत यॆईपर्यंत जिवंत राहणे भाग होते….. लाटा येतच होत्या…जातही होत्या.

नावाने प्रशांत असला तरी पाण्याची जीवघेणी भेदकता, आपल्या पाण्याचे पाश आवळण्याची प्रचंड शक्ती ह्या महासागरात आहे. त्याची घन गंभीरता, एकाकी शांतताच जीवघेणी आहे. ही भयाण शांतताच पसरत पसरत लाटांत मिसळून पाश आवळत होती. पाण्यात पडून किती वेळ झाला त्याचे ह्या मानवी ठिपक्याला भानही नव्हते. मदत येणार, यॆईलच, कोणीतरी वाचवेल ह्याचा जप मनात चाला होता.

क्लेमबॅकचा तांबूस चेहरा, निळसर हॊऊ लागला. उन्हाच्या तडाख्याने कातडी भाजून अलवार झाली.जाकीट मानेशी घासून घासून मान चांगलीच खरवडून निघाली होती. साडेसात तास झाले होते.अमेरिकेच्या सागरी रक्षक दलाला बातमी मिळाली. त्यांनी लगेच एक विमान पाठवले. पहिल्या प्रथम त्या विमानाला पाण्यात काहीच दिसेना. काही वेळाने पाण्याशी झगडत असलेला रे क्लेमबॅक हा लहान ठिपका दिसला. विमानातून एक लहा तराफा टाकला. लॉस एंजल्सहून निघालेल्या पी ऍंड ओ कंपनीच्या बोटीला त्यांनी संदेश पाठवला. आणि ते विमान निघून गेले. रे आता त्या लहानशा तराफ्याला धरून वाट पहात बसला.

साडे दहा तासानी ते जीवदायिनी जहाज आले. दमल्या भागल्या रे ला त्यांनी, “कसा आहेस? फार जखमी झालायस का” असे विचारले. “जखमा नाहीत. खूप थकलोय.” रे नी सांगितले. जहाजावरच्या लोकांनी त्याला अलगद बोटीवर उचलून घेतले.

साडे सतरा तास निर्जन समुद्रात एकाकी धडपडणारा रे क्लेमबॅक बोटीवर आल्या आल्या खाली कोसळला

साडे सतरा तासांच्या जलदिव्यातून सुखरूप सुटका झाल्याचा आनंद त्याला झालाच पण ३०-३२ वर्षे सेसना सारख्या लहान विमानातून २२० वेळा एकट्याने प्रवास करणाऱ्या धाडसी रे क्लेमबॅक्ने “हा एकट्याने पॅसिफिक महासागरावरचा प्रवास अखेरचाच” असे जाहीर केले.

आपल्या मनाविरुद्ध, नाईलाजानेच त्याने हा निर्णय घेतला असणार. गेल्या तीस बत्तीस वर्षांच्या ह्या हवाई उड्डाणाचा प्रत्येक वेळेचा अनुभव अद्भुत, आणि अपूर्व आनंदाचाच होता.

पॅसिफिक महासागराची अद्भुत गूढरम्यता, तिथली अफाट पसरलेली एकाकी शांतता, गूढरम्य वातावरण, त्या सगळ्यांचे मानसिक दडपण हे सर्व धाडसी आणि साहसी मनाला खेचून घेणारे मोहमयी आकर्षण आहे. परवाच्या प्रचंड मानसिक थकवा आणणाऱ्या अनुभवानेच रे क्लेमबॅकने हा निर्णय घेतला असावा.

खंबीर मन, शांत, स्थिरबुद्धी आणि बळकट शरीराचा रे क्लेमबॅक खरा पराक्रमी पवनपुत्र!

*******************************************

गेबी केनार्ड ह्या ६० वर्षाच्या धाडसी ऑस्ट्रेलियन महिलेनेही अशाच विमानातून एकटीने जगाला प्रदक्षणा घालण्याचा पराक्रम केला आहे. असा विक्रमी प्रवास करणारी गेबी ही पहिली ऑस्ट्रेलियन स्त्री आहे.

बेन फ्लिन ह्या ऑस्ट्रेलियन वैमानिकानेही २००२ साली असा विक्रम केला आहे.

पॅसिफिक महासागराच्या विलक्षण गूढरम्य वातावरणाचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला आहे.त्याचा प्रभावही तितकाच अद्भुत आहे. तिथल्या इतका एकाकीपणा कुठेच वाटत नाही असे त्या सर्वांचे म्हणणे आहे. पण त्या हवाई प्रवासाचे आव्हान आणि आकर्षणही तितकेच आहे ह्या विषयी कुणाचेही दुमत नाही.

परवाच्या ४-५ ऑक्टोबरला रे क्लेमबॅकच्या सुदैवाने त्याला दोन गोष्टी अनुकूल होत्या. एक म्हणजे शार्क माशांचे त्याच्याकडे अजिबात ल्क्ष गेले नाही. त्या दिवशी वारा पडलेला होता. ताशी ११ मैल वेगाने वारा वाहात होता. असे जरी असले तरी रिचर्ड हच ह्या तज्ञ अभ्यासकाच्या मते रे क्लेमबॅकचे निश्चयी मन, दृढ विश्वास , बळकट शरीर आणि त्याची स्थितप्रज्ञता ह्याचेच सर्वाधिक महत्व आहे.

काही असो, ६७ वर्षांच्या साहसी रे क्लेमबॅकचा परवाचा अनुभव, त्याने दाखवलेले अश्क्यप्राय धैर्य, त्याने सतत ३०-३२ वर्षे एकट्याने लहान विमानातून पॅसिफिक महासागरावरून २२० वेळा केलेल्या हवाई भ्रमणगाथे इतकेच अभूतपूर्व आहे!

{[एक गोष्ट जाणवली का? मलाही पहिल्यांदा ती लक्षात आली नव्हती. धाडसी दर्यावर्दी कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला त्याच तारखेला-त्याच कोलंबस दिनाच्या दिवशी-११ ऑक्टोबरला- साहसी पराक्रमी रे क्लेमबॅकची ही धैर्यगाथा माझ्या हातून लिहून पूर्ण झाली! सहजासहजी हे घडून आले.]}
__________________________________________________________________________________________________________

नवा देव…..नवी स्तोत्रे!

बेलमॉंट

गेल्या काही वर्षात विज्ञानाने किती प्रचंड प्रगती केली. तीही अशा झपाट्याने. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग अफाटच.

सर्व व्यवहार व्यापून टाकणारा कंम्प्युटर-संगणक-तर महानच.आपल्याकडे तर कंम्प्युटरला फारच महत्व आले आहे. लहान सहान गोष्टीतही, किरकोळ व्यवहारातही त्याचा सुळसुळाट झाला आहे.

अडचणीच्या, ऐन फजितीच्या वेळी उपयोगी पडणारा कोपऱ्यावरचा चांभार आता दिसेनासा झाला आहे. कोणीतरी मला सांगितले की तो आता ’एन्डेंजर्ड स्पेसिझ’ मध्ये समाविष्ट झाला आहे. काल माझ्या चपलेचा अंगठा तुटला. पाय ओढत फरफटत गेलो. सुदैवाने कोपऱ्यावर चांभार होता. पण पाहिले तर काय! पॉलिशच्या डब्या, बाटली, ब्रश खोक्यावरून गायब. त्या ऐवजी एक कंम्प्युटर विराजमान झालेला!

माझी चप्पल दाखवली त्याला. नेहमीप्रमाणे चेहरा पाडून,”अरारा,नवीन घ्या साहेब आता.” “३५ रुपयं पडत्याल दोन टाक्याचं.” आं? रुपया आठ आण्याचे आता एकदम ३५ रुपये! “कंप्म्युटर्र -टाके शिलाई होनार आता.” “अवो, ड्येक्कन्वरचा माझा चुलता आन क्यांपातला म्येव्हना येका टाक्याला पस्तीस घ्येत्यात.मी तर दोन टाक्याचं सांगितलं. तुमी आपलं न्येमीचं गिऱ्हाइक म्हनून” पुन्हा चौकशी करता त्याने आणखी माहिती पुरवली. “मागच्या महिन्यातच हा [कंम्प्युटर्कडे बोट करू] जुना घेतला.दोन हजाराला. चप्पल-बुटाचं डीझाइनचं साफ्ट वेयर तीन हजाराला. त्येबी येकदम पायरेटेड. हां, असलं तसलं नाही.”आता तीन वेळा त्याची रिपेरी झाली. त्याचच तीन हजार मोजले! माझ्या कमरंचं टाकं तुटली कीहो! पर काय करनार, साह्येब? नवं नवं ट्येक्निक शिकलं पायजे.कसं?”
“गिऱ्हाइक नसताना काय करतोस?”
“अवं समदी मजा बघत बसतो. ह्यात व्हीडीओ का शीडी बी हाये. टीव्ही बी हाये. रेमिक्स्ची गानी बघतो. लई मजा हाय बघा त्यात. मन कसं मोरावानी पिसारा फुलवून नाचतं बघ.”

हे सगळं कॉंप्युटर डिझाइनचे दोन टाके घालण्यासाठी तो सांगत होता. “दोन घंट्यानं या साह्येब.” मी उडालोच. कॉंप्युटरने काम लवकर व्हायच्या ऐवजी वेळच लागतो. असे कसे? “लई बारिक काम असतंय” दोन घंटे! चला घरी परतलो. दोन आसांनी दुरुस्त चप्पल घेतली. टाके दिसत नव्हते. मी तसे विचारले. “लेझ्यर शिलाई केली साहेब.” मघाशी त्याने दिलेल्या रिमिक्स्च्या नविन माहितीवर खूष हॊऊन मी त्याला वर पाच रुपयांची बक्षिसी दिली! ’टाक्याचे घाव” सोसल्याशिवाय माझ्यातले देवपण जागे होत नाही. संध्याकाळ झाली होती. त्याने कॉंप्युटर मिटल्यावर मी चमकलो. त्याने लगेच खुलासा केला. “ल्याप टाप हाये हा माझा. घरी पीसी हाये दुसरा. पोरांसाठी.”

मी चक्कर येऊन पडणार होतो. पण चक्कर, भोवळ, अंधारी वगैरे येण्याचा प्रसंग पुढे येणार होता. तो तसा आलाच. दुसरे दिवशी दुपारी,”कोपबश्या बरनीब्बाई” करत बोहारीण आली शेजारी. नेहमीप्रमाणे शेजारच्या आजीबाई , सूनबाईनी ढीगभर भरजरी कपड्यांचा ढीग ओतल्यावरही” येकादा कंम्प्युटर काढा की बाई; मंग हा ल्यप टाप द्येते बघा” “लई फास्ट काम करत्यो” मी गरागरा फिरतोय असं वाटतं न वाटतं तोच सूनबाईनी घरातून एक कॉंप्युटर लगबगीने आणूनही दिला!

हल्ली रोज सकाळी दुपारी ,” एंय.. रद्दींय्यें, जुनी डिब्बा बाटल्येंय.. या जुन्या पुराण्या आरोळी ऐवजी “य्यें, काय हाय कायीं जुनी पुरानी कांपीटर्ल्याप्टाप, प्रिंटेर….” असे ऐकून ऐकून सवयीचे झाले आहे.

इतके सगळे बदल घडत असताना आपल्याकडील धार्मिक व्रत वैकल्यांचा, सणावारांचा सुळसुळाट असलेल्या समाजातही बदल होणे अपरिहार्य आहे. शिवाय काळाबरोबर राहायचे म्हणजे त्यानुरूप बेमालूम बदल करायला हवेतच. तसे ते केले जात आहेतही.

आपल्य येथील पुणे, नाशिक, बंगलोर, हैदराबाद, मुंबई, तसेच दिल्ली अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका येथील पांढरपेशा वर्गातही तंत्रज्ञानाच्या प्रसरामुळे म्हणजे त्यातील रिमिक्स मुळे वैचारिक बदल झाले.

आमचे बाबुराव परवा उत्साहाने म्हणत होते, ” अहो आपल्याकडेही पूर्वी संगणक, संगणकाधिपती होते.गणपती तर विद्यादेवता. ज्ञानदेवता. तो गणांचा गणपती म्हणजेच हल्लीचा ’संगणकपती’” बाबुरावांचे हे तात्काळ संशोधन ऐकून मी त्याच्याकडे आदराने पहायला लागलो. ते पुढे सांगू लागले,”संगणकावर क्षणार्धात अनेक दृश्ये, माहिती दिसते म्हणजेच प्रकट होते. फार प्राचीन काळी आपल्याकडे हे तंत्रज्ञान होतेच. ऋषी मुनी देवता ह्यात तज्ञ होते. दिव्य दृष्टी, दिव्यचक्षू, शंकराचा तिसरा डोळा हे सर्व संगणक आणि टीव्हीचीच रूपे!” मी कौतुकाने पाहतो ऐकतो हे दिसल्यावर बाबुरावांना जास्तच उसाह का चेवच आला.पुढे होत हातवारे करत ते मला समजावून सांगायला लागले,” अरे, सध्या लोटस, जावा वर्डस वगैरे तुम्ही म्हणता[मी तर काहीच म्हणत नव्हतो. मला ह्या शब्दांचे अर्थ कमळ ,शब्द एव्हढे माहित होते!] त्याही आपल्याकडे होत्याच. कमांड्स, सॉफ्टवेअर वगैरेना पूर्वी मंत्र, प्रणाली म्हणत. ऱ्हां ऱ्हीं ऱ्हूंम ..वगैरे ध्वनिप्रणाली होत्या. सगळे होते आपल्याकडे. खरं तर हे सगळं आपणच जगाला दिलं.” बाबुराव दमले इतकं बोलून. अभिमान अस्मिता दमवतेच माणसाला. ह्या बाबुरावने शाळेत इतिहासाच्या तासाला चांदबिबीला दाढी, नाना फडणिसाला तानाजीच्या मिशा आणि औरंगजेबाच्या नाकात आनंदीबाईची नथ घालण्याऐवजी अभ्यास केला असता तर आज इतका दमला नसता. असो. पण तो बाबुरावच. दमला होत तरी पुन्हा,” अरे आपल्या संस्कृतातील विसर्गाचे अशुद्ध रुपांतर म्हणजेच ’याहू:’ !” असे त्याने एका दमात सांगितले. मी काय बोलणार? फक्त नतमस्तक हॊऊन संस्कृतातच खो: खो: हसलो!

पण बाबुरावाचे खरे असावे. कारण गावा गावात”संगणकोत्सव” साजरा हॊऊ लागला.भाविक “संगणी चतुर्थी”चा उपवास करताहेत आता.गुढी गेली. पाडवा “गुगली” पाडवा झाला, दक्षिणेत “ओरॅक्लोनम” साजरा होतोय.”जावा एकादशीला जावा-बाली-बॅंकॉक-पट्टाया वाऱ्या सुरू झाल्या! दैवते बदलली. देवही नवे आले. कन्याकुमारीला समुद्रात “संगणकपथी”चे भव्य देऊळ उभे राहिले. बिल गेटच्या कॉंप्युटरमधील प्रभावामुळे हरिद्वारचे नाव बदलून “बिल्वद्वार” झाले!

ह्या धार्मिक सांस्कृतिक बदलांमुळे शाळा कॉलेजातील तरुण तरुणी एकदम नवीन अथर्वशीर्षाची आवर्तने करताहेत. कोणत्याही नवीन गोष्टींना विरोध होतोच. काही अतिबुद्धिवादी पाखंडी लोकांनी ह्या सर्व बदलांना विरोध केला. पण हे पाखंडी बुद्धिवादी नेहमीच अल्पसंख्याक असतात. त्यामुळे संगणकमहात्म्य, नवोदयी अथर्वशीर्ष फोफावतच आहे. आवर्तने चालूच आहेत. संगणकपतीवाद्यांचे म्हणणे, ह्या विरोधकांना शायनिंग इंडिया पाहवत नाही, फील गुड वाटत नाही. म्हणून ह्या नव्या अथर्वशीर्षाला ते “निरर्थकशीर्ष” किंवा”अनर्थशीर्ष” म्हणतात.

पण आता समग्र क्रांती होत आहे. नुसते अथर्वशीर्षच नाही तर आता नवी स्तोत्रे प्रार्थना म्हणतात. त्यातील काही नमुने ऐकू या.
सकाळी :
१. कराग्रे असते किबोर्डम, करमध्ये माऊसम
करमुले तु प्रोग्रॅमम, प्रभाते संगणकदर्शनम.

ही भूपाळी ऐका

२. पळा पळा हो वेगेंसी, चला जाऊ परदेशी;
भेटू ह्युलेट पॅकॉर्डेसी, सर्व चिंता मिटतील;
मिसिसिपीत करू स्नान, घेऊ बिल गेटचे दर्शन;
तेथे भेटती फिलो, पेज यॅंग ब्रिन, तेणे मन निवेल.
३. सिऍटल टोकियो बेजिंग, बंगळूर हैद्राबादस्तथा;
पुणे मुंबापुरी चैव सप्तैता धनदायका:

संध्याकाळी:
४. शुभं करोति संगणकम चंगळं धनसंपदा;
शत्रुव्हायरसं विनाशायं कंप्युज्योती नमोस्तुते!

अशा तऱ्हेने कॉंप्युटर महात्म्य वाढत चालले आहे. नवीन संगणकाधिपत्यथर्वशीर्ष आपल्याकडे कॉप्युटरने सर्व जीवन कसे व्यापून टाकले आहे ह्याचे दर्शन घडवते. ते आपण स्वतंत्रच म्हणू या नंतर.

पूर्वी मराठी मूळाक्षरांची ओळख ’ग’ गणपतीचा अशी करून देत. आता ’स’ संगणकपतीचा अशी करतात म्हणे.

अथ श्रीसंगणक अथर्वशीर्ष प्रारंभ:

ॐ नमस्ते संगणकाय ॥
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ॥
त्वमेव केबलं कर्तासी ॥
त्वमेवं केबलं धर्तासी ॥
त्वमेव व्हायरसं हर्तासी ॥
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ॥
त्वं साक्षादात्मासि नेट्म ॥

मायक्रोसॉफ्टं वच्मि ॥
विप्रो वच्मि ॥
’सत्यम’ वच्मि ॥

अव त्वं मां / अव वक्तारं ॥
अव श्रोतारं / अव डिजिटालम ॥
अव दूरचित्रवाण्यं / अव नेटानुचावन शिष्यं ॥
अव दूरध्व्न्यात / अव कॅमेऱ्यात ॥
अव पश्चात्तात / अव पुरस्तात ॥
अवोत्तरात्तात /अव दक्षिणात्त ॥
अव युरोपात / अव आफ्रिकात ॥
अव आशियात / अव अमेरिकात ॥
सर्वत्रो त्वां आसमंतात चराचरात ॥

त्वं वाङ्मय्स्त्वं ’शब्द’मय: ॥
त्वं आनंदमयस्त्वं वेबमय: ॥
त्वं चिरंजीवी अद्वितीयोs सि ॥
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ॥
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोs सि ॥

सर्वं जगदिदं त्वत्तो ’जावा’ते ॥
सर्वं जगदिदं त्वत्तो ’सन सिस्ट’ती ॥
सर्वं जगदिदं लिन्क्स्मेष्यती ॥
सर्वं जगदिदं त्वयी प्रत्येती ॥
त्वं मायक्रोसॉफ्टं ओरॅकलो आयबीऎमो नभ:॥
त्वं ’गुगला’दि वाक्पदानि ॥

त्वं नेटत्रयातित: / त्वं ’नॉव्हेल’स्थात्रयतित:॥
त्वं ’एचपी’त्रयातित: / त्वं ’कॉम्पेक’त्रयातित: ॥
त्वं युनिक्साधार स्थितोsसि नित्यं ॥
त्वं विप्रो एक्साईट सत्यात्मक: ॥

त्वं जावा त्वं विन्डोस्त्वं
एक्समेलस्त्वं पर्लस्त्वं कॅडकॅमस्त्वं
सॅपस्त्वं पर्लस्त्वं ऍनिमेशनस्त्वं
गुगलस्त्वं याहू: भुर्भव: स्वरोम ॥

संगणादिं पूर्वमुच्चार्यं कणादिं तदनंतरं ॥
डॉट: परतर: ॥ कॉमेन्दुलसितं ॥
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू बबलं ॥ एन्टरम मनुस्वरुपं ॥
कोबॉल: पूर्वरूपं ॥ सी सी मध्यमरुपं ॥
प्रोग्रॅमश्चान्त्यरुपं ॥ डिझायनिंग उत्तररुपं ॥
कोडिंग: संधानं ॥ पोर्टल हितासंधी:॥
सैषा संगणविद्या॥ बिल गेट ऋषी: ॥
सर्च इंजिनच्छंद: ॥ सॉफ्टवेअर देवत: ॥
ॐ डॉट कॉमं संगणकये नम: ॥
एकसमुच्चाय विद्महे ॥
आज्ञाप्रणाली धीमही ॥
त्वन्नो विश्वव्यापकजालं प्रचोदयात ॥

अनेक अस्त्रं अनेककार्यं आय्कॉन्धारिणम ॥
रदं नीलं वॉलपेपरं हस्तै प्रिंटरं आऊसध्वजं ॥
पोर्टेबलं स्पर्शसंवेद्यं स्पीकरकर्णक वाससं ॥
कीबोर्डानुलिप्तांगं कॅमेराही विराजितम ॥
अभ्यासकानुकंपिनं देव संगणत्कारणं ॥

आविर्भूतंच सर्वसृष्ट्यादौ
प्रकटते पुरुषात्परम
एवं वापरतो यो नित्यं
स योगी योगिनां वर: ॥

नमो विद्यापतये/ नमो संगणकये॥
नम: अत्याधुनिक विष्वपते ]
नमस्तेतु सत्याभास निर्मिक: ॥
निमिषार्धे विश्वदर्शके ]
मानवमेंदू पर्यायी संगणके ॥

एतद अथर्वशीर्षं योsधिते ॥
स सर्व ज्ञानाय कल्पते ॥
स सर्वत: सुखमेधते ॥
स सर्व आलस्यैर्न बाध्यते ॥
स सर्व निरुद्योगपापात्प्रमुच्यते ॥

सायं अध्ययन दिवसकृतं कार्यं साधयति ॥
प्रातर अध्ययन रात्रिकृत कार्यं साधयति ॥
सायंप्रात: प्रयुंजानो उच्चपदे लभते ॥
सर्वात्राधीयानो उच्चपदे स्थिरते ॥
व्यवसायधंदे निरंतरं उत्कर्षं भवति ॥

इदम अथर्वशीर्षं परकीयाय न देयम
यो यदि मोहाद्दास्यति स स्व उपजिविका वंचिती ॥
सहस्त्रावर्तनात यं यं पदं उपजिविकामधीते ॥
तं तमनेन साधयते ॥

अनेन संगणकं अभिषिंचति
स निपुण भवति ॥

चथुर्त्यामनश्नन अभ्यासिती
स संगणकतज्ञ भवति ॥
इति अथर्वण वाक्यं ॥
विश्वव्यापक जालं विद्यात ॥
न क्षुधार्थ कदाचनेति ॥

यो दुर्वांकुरैर्यजति
स संगणक्चालक भवति ॥
यो लाजैइर्यजति स प्रोग्रॅमर/डेव्हलपर भवति ॥
यो मोदकसहस्त्रेण यजति स टीमलीडरमवाप्नोती ॥
य: साज्यसमिद्भिर्यजति स प्रोजेक्टमॅनेजर भवति ॥

अष्टौ सहकारीयोनां सम्यग्राहित्वा आर्किटेक्ट भवति ॥

सूर्यग्रहे हडसन नद्यां प्रतिमासंन्निधौवाजप्त्वा
संगणकसिद्ध भवति ॥
सर्व देशस्य व्हिसाम प्राप्यते ॥
सप्तसागर उल्लंघयते ॥
अमेरिका जार्मन्यं जापान्यं गमनं करोति ॥
स सर्व यांग फिलो भवति] स सर्व पेज ब्रिन भवति॥
स सर्व बिल गेट भवति] य एवं आधुनिक पंचम वेदोपनिषद ॥

॥ ॐ डॉट्कॉम शांति हू: शांति हू: शांति याहू: हू: ॥

॥ इति नवदेव संगणकपती अथर्वशीर्षम समाप्तम ॥