वैद्य

एक बिगारी कामगार होता. परिस्थितीमुळे रोज काम मिळणे मुष्किल झाले. सरकारच्या रोजगार हमी योजनेचीही कामे हल्ली निघत नव्हती.काय करावे ह्या विचारात पडला.
गावातल्या वैद्याचे काम मात्र कमी होत नाही. त्याची रोजची कमाई जोरात आहे हे लक्षात आल्यावर त्याने वैद्यकी करायचे ठरवले.

घरातल्या बाहेरची खोली चुन्याने रंगवली. बऱ्यापैकी सतरंजी पसरली. स्वत:साठी घरातली उशीच टेकायला घेतली. पाच सहा लहान मोठ्या बाटल्या भोवती ठेवल्या. स्वत: डोक्याला पांढरा पटका बांधून कपाळाला गंध लावून व खांद्यावर उपरणे गुंडाळून बसू लागला. बाहेर पाटी लिहिली. “तब्येत दाखवा. शंभर रुपयात उपाय! गुण नाही आला तर दोनशे रुपये घेऊन जा!” हळू हळू एक दोघे येऊ लागले.

दोन चार दिवसांनी गावातल्या वैद्याने आपली प्रॅक्टिस खलास होऊ नये म्हणून वेळीच ह्याचे पितळ उघडे करायचे ठरवले. वेष बदलून रुग्ण म्हणून वैद्यराज बिगाऱी वैद्याकडे गेले.

खरा वैद्य बिगारी वैद्याला म्हणाला, ”वैद्यबुवा माझ्या तोंडाची जिभेची चवच गेली बघा..” बिगारी बुवा आपल्या जवळच्या बाटल्यांची उगीच जागा बदलत, घरात पाहात म्हणाला, “हरी ४१ नंबरची बाटली आण बाळ.” बाळ्या हऱ्याने बाटली बिगारी बुवाच्या हातात दिली. बुवांनी खऱ्या वैद्याला ‘आऽऽ’ करायला सांगितले. त्याच्या जिभेवर तीन थेंब टाकले. खरे वैद्यराज लगेच थूथू: करत ओरडून म्हणाले,” अरे हा तर कार्ल्याचा रस आहे!” बिगारी वैद्यबुवा म्हणाले,” बघा अचूक उपाय झाला की नाही? चव आली की नाही तुमच्या तोंडाला! शंभर रुपये द्या. खऱ्या वैद्यबुवाने तोंड वेडेवाकडे करत शंभर रुपये दिले.

दोन दिवसांनी पुन्हा वैद्यराज रुग्णाच्या वेषात आले आणि म्हणाले,” वैद्यबुवा माझी स्मरणशक्तीच गेली हो!” बुवानी घरात डोकावत हाक दिली,” हरीबाळा, ती एकेचाळीस नंबरची बाटली घेऊन ये बाबा.” हऱ्याने ती बाटली बुवांना दिली. ती बाटली पाहिल्यावर वैद्यराज जवळ जवळ किंचाळलेच, ४१ नंबरची बाटली? “बुवा ही बाटली तर कडू कारल्याच्या रसाची आहे!” ते ऐकून बुवा म्हणाले,” बघा तुमची स्मरणशक्ती तात्काळ जागी झाली. काढा शंभर रुपये.” वैद्यराजांनी नाईलाजाने शंभर रुपये काढून दिले.

आठ दहा दिवस होऊन गेले. बिगारी वैद्यबुवाकडची गर्दी वाढू लागली.

वैद्यराज आज त्या बोगस बिगाऱी वैद्याची चांगलीच फजिती करायची ह्या निश्चयाने गेले. हातात पंढरी काठी घेऊन निघाले. बिगारी वैद्यबुवाच्या घराशी आले. पायऱ्या चढतांना एकदोनदा त्यांचा तोल गेला. हातातली पांढरी काठी सावरत असताना पायरी चुकली.पडता पडता वाचले. बिगाऱ्याने हे पाहिल्यावर त्यांचा हात धरून त्यांना आत आणले. वैद्यराज बुवांला म्हणाले,” बुवा, गेल्या महिन्यापासून माझी दृष्टी फार कमी झालीय. दिसतच नाही म्हणालात तरी चालेल. उपाय करा काही तरी.”

वैद्यराजांची ही अवस्था ऐकून बिगारी बुवा हात जोडून म्हणाले,” ह्याच्यावर माझ्याकडे उपाय नाही. हे घ्या तुमचे दोनशे रुपये.” हे ऐकल्यावर वैद्यराजाला आत आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. त्याने पैसे घेतले आणि म्हणाले, “बुवा पण हे दीडशे रुपयेच आहेत की!“ बिगारी वैद्यबुवा, वैद्यराजांच्या हातातील नोटा पटकन काढून घेत म्हणाले,” बघा तुमची दृष्टी आली की नाही परत? माझ्या फीचे शंभर रुपये द्या!”

वैद्यराज पांढरी काठी टाकून ताड ताड पावले टाकीत गेले.

[‘भांडी व्याली भांडी मेली’ ह्यासारखी ही पण एक जुनी ‘पिढीजात’ गोष्ट;माझ्या शब्दांत.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *