माझी होशील का?

रेडवूड सिटी

नऊच्या ठोक्याला मॅक्सवेल कंपनीचा मालक हार्वे ऑफिसमध्ये आला. घाईघाईतच. हे रोजच्याप्रमाणेच. आपला विश्वासू सचिव पिचरकडे पाहत “Good Morning Pitchar’ म्हणत गडबडीतच थेट आपल्या टेबलाकडे गेला. हेही रोजच्याप्रमाणेच. हार्वे बरोबर त्याची स्टेनो लिलीही आली. हेसुद्धा नेहमीप्रमाणेच.
पण लिली आपल्या केबिनकडे न जाता मागे रेंगाळली. हे मात्र नेहमीप्रमाणे नव्हते. त्याचे थोडेसे आश्चर्य पिचरलाही वाटले.
आजचा लिलीचा पोशाख साधा पण अंगाबेताचा असल्यामुळे लिली आणि तिचा पोशाख एकमेकांना शोभून दिसत होते. आज लिलीची हॅटही वेगळी होती. काळ्या रंगाचा मधला टोप आणि भोवतालची कडा सुरेख पोपटी रंगाची. काळ्या रंगाच्या मधल्या टोपाला जाळीदार पांढऱ्या लेसचे मोठे फुल ! हेही रोजच्याप्रमाणे नव्हते.
हार्वे ऑफिसमध्ये आला म्हणजे वॉल स्ट्रीटवरील शेअर बाजार सुरु झाला हे ऑफिसमधल्या सर्वांना माहित होते. मग ऑफिसमध्ये कामाची गडबड सुरु व्हायची. हार्वेचे वॉलस्ट्रीटवरील ऑफिस म्हणजे शेअर्स आणि इतर आर्थिक व्यवहाराच्या सल्लागाराचे ऑफिस. वॉलस्ट्रीटवरची सर्व गडबड त्या प्रमाणात तिथेही असणारच. तेथील ताणतणाव येथेही होतेच.
लिली हार्वेच्या टेबलाजवळ गेली. तो स्वतःचा राहिला नव्हता. तो यंत्र झाला होता. समोरच्या मशिनमधून छापलेल्या पट्ट्या येत होत्या. त्या वाचत हार्वे कानाला फोन लावून बोलत असे. कधी तर एकाच वेळेस दोन दोन फोन कानाला लागलेले असत. त्यातच हातात कागदाचे कपटे. ते वाचत बोलणे चालूच.कधी फोन कान आणि खांद्यामध्ये दाबून टेबलावरचे कागद उचलून कारकुनांना सूचना देणे चालायचे. अशा रगाड्यात लिली समोर येऊन उभी राहिली. त्याने तिला पाहिले असले तरी ती त्याला दिसली असेल का नाही याची शंकाच आहे. थोडा वेळ ती तिथेच उभी राहिली होती.
“हं, काय आहे? काही काम?” दुसऱ्या हाताने कागद उचलून वाचणे चालूच. “नाही, काही नाही.” म्हणत ती पुन्हा मागे आली. पिचरला आश्चर्य वाटले. ही अजून इथेच? लिलीने पिचरला विचारले, “मि.पिचर, ह्या एक दोन दिवसात मि.मॅक्सवेल दुसरी स्टेनो घेणार आहे असे काही म्हणाला का?” “हो! स्टेनो बघायला मला त्याने सांगितले होते. आता थोड्या वेळात ब्युरोकडून कोणी तरी येईल. ९:४५ वाजून गेले तरी अजून कसे कोणी आले नाही?” पिचरने पुष्कळच माहिती लिलीला दिली.
लिली गप्प झाली. मग हळू आवाजात म्हणाली,” असू दे. आजचा दिवस तरी मी कामावर आहे म्हणायचे!” इतके म्हणत ती आपली केबिनकडे गेली.
तासाभराने हार्वेला आपल्या टेबलासमोर सोनेरी केसांच्या बटा रुळताहेत, लांब साखळीतले एक बदामाचे लॉकेटहि झुलते आहे असे दिसले. कामात असल्यामुळे तिकडे त्याने लक्ष दिले नाही. पण जेव्हा पिचरने घसा खाकरल्यासारखे केले तेव्हा हार्वेने मान वर करून पाहिले. “आपल्याला स्टेनोची जागा भरायची आहे. त्यासाठी ब्युरोकडून मुलाखतीसाठी ही आली आहे .”
“कुणी सांगितले तुला,आपल्याला स्टेनो पाहिजे म्हणून?”
“काल दुपारी तुम्हीच मला स्वत: सांगितले. म्हणून मी आपल्या ब्युरोला कळवले.”
मी काहीच बोललो नाही ह्या संबंधात तुझ्याशी.” “त्या मुलीला जाऊ दे.” ती मुलगी बिचारी निराशेने आणि रागात निघून गेली.
पिचर बिचारा आपण तोंडघशी पडलो असे वाटून जागेवर जाता जाता अकौंटंटला म्हणाला., “अलीकडे हार्वेला काय झालय कुणास ठाऊक ! काल मला म्हणाला दुसरी स्टेनो पाहू या म्हणून. आणि आज म्हणतोय की मी कधी असे म्हणालो? काय करायचं आपण!”
“आपण काय करणार? तो मालक आहे.जाऊ द्या,” अकाउंटंट पिचरला म्हणाला
हार्वेला आणि ऑफिसातल्या कुणालाही क्षणाची फुरसत मिळत नव्हती.ऑफिसमधल्या सगळ्या टेबलावरचे फोन खणखणत होते. शिपाई या टेबलावरचे कागद, पट्ट्या, निरोप दुसऱ्या टेबलाकडे धावत पळत घेऊन जात होते.कामाची घाई गडबड चालली होती. त्यामध्ये हार्वेला श्वास घेणेही मुश्किल होत असे. सगळी जबाबदारी अखेर त्याच्यावरच असणार ! शेअर, बॉंडस, सरकारी रोखे, नाणे बाजार, गहाणखत या सर्वांचे व्यवहार मॅक्सवेल कंपनीत होत असत. शेअर बाजारात होणारे भूकंप, वादळे, दरडी कोसळणे, एकदम महापूर येणे, या सर्वांचे धक्के दिवसभरात हार्वे मॅक्सवेल सारख्या कंपन्यांनाही बसतच असत. चोवीस तास त्यातच बुडून गेलेल्या,अनुभवी हुशार हार्वेचे आडाखे अचूक ठरत. त्यामुळेच त्याची कंपनी लहान असली तरी त्याच्याकडे काही मोठी आणि प्रतिष्ठेची अशीले होती. हार्वेचा अभ्यास बारकाईने सतत चालू असे. त्यातच तो पूर्णपणे बुडून गेलेला असायचा.पटापट निर्णय घ्यायचा. कित्येक वेळा त्याला दुपारच्या जेवणाचेही भान राहत नसे. अशावेळी लिली त्याची काळजी घ्यायची.
दुपार होत आली. बाजारातील उलाढालीचा वेगही मंदावला. हार्वेला श्वास घ्यायला थोडी फुरसत मिळाली.
इतका वेळ तो उभा राहूनच काम करत होता. खुर्चीवर बसला. शेजारच्या खिडकीतून वाऱ्याची हलकेच एक झुळूक आली. पण ती एकटी आली नव्हती. बरोबर सुगंध दरवळत आला होता. हार्वेला त्या सुगंधातून लिलीची मूर्ती डोळ्यासमोर आली . तिच्याच खोलीतून हा सुगंध येत असे. त्याबरोबर तो लिलीकडे ओढला जात असे. “आज तिला विचारायचेच” असे ठरवून तो तिच्या खोलीत गेला. लिली कामात होती.
हार्वे लिलीच्या टेबलावर आपले दोन्ही हात ठेवून थोडेसे झुकून तिच्याकडे हरवलेल्या नजरेने पाहत होता. लिलीला कळेना. तीही त्याच्याकडं पाहात राहिली क्षणभर. हार्वे म्हणाला, लिली! तू माझी होशील का? तू आल्यापासूनच माझ्या मनात भरली होतीस. पण मला ते सांगता येत नव्हते. प्रियाराधन का काय म्हणतात ते मला जमत नाही.आणि मला तेव्हढा वेळही नसतो.आता थोडी उसंत मिळाली म्हणून तुझ्याकडे मोठ्या आशेने धावत आलोय. ते बघ फोन वाजू लागले. “पिचर, त्याला दोन मिनिटे थांबायला सांग”हार्वे मध्येचओरडून पिचरला म्हणाला. पण आज मी तुला मनापासून विचारतोय, लिली तू माझ्याशी लग्न करशील का?”
हार्वे हे जस जसे बोलत होता तशी लिली त्याच्याकडे डोळे मोठे करून हा काय विचारतोय मला असे ! आणि आज? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.आनंदाच्या तरंगात अश्रू तरळू लागले ! लिली तशीच उठली, हार्वेच्या गळ्यात हात घालून आता रडता रडता हसतअनिता हसता हसता रडत ती म्हणाली,” हार्वे! माझ्या लक्षात आले. अरे कामात किती बुडून जातोस रे? अरे ! आपले कालच संध्याकाळी लहानशा चर्चमध्ये लग्न झाले हे विसरलास तू?” असे म्हणत लिलीने हार्वेला आणि हार्वेनेही लिलीला एकदमच मिठीत घेतले!

O’Henri च्या Share Broker’s Romance ह्या कथेचे स्वैर भाषांतर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *