खलीफ,मजनू , आणि घड्याळ

रेडवूड सिटी

संध्याकाळ ओसरली होती. आणि पार्कमधली गर्दीही. थंडी सुरू झाल्यामुळेही असे असेल. निघण्याच्या तयारीत असलेली दोन चार मुले जाता जाता रेंगाळत कारंजापाशी खेळत होती. मधल्या झाडांवरून एका इमारतीच्या टॉवरचे मोठे घड्याळ स्पष्ट दिसत होते.
व्हॅल्युनाचा राजा मायकेल राजाच्या रूबाबात पार्कमधल्या आपल्या नेहमीच्या बाकावर बसला होता. त्याच्या बुटांची दशा झाली होती. चांभारानेही त्यांना हात लावला नसता.त्याच्या कपड्यांचीअवस्थाही बुटांपेक्षा फारशी वेगळीनव्हती.सामान्य माणसाची हॅटही खुद्द राजेसाहेबांच्या हॅटपेक्षा बरी असेल. दोन तीन दिवसांची वाढलेली दाढी राजाच्या चेहऱ्याची शोभा वाढवत होती.
आपल्या आवडत्या बाकावर बसून राजा समोरच्या मोठ्या इमारतींकडे पाहत किंचित हसत स्वतःशी म्हणत होता….. “मनात आणले तर ह्या सर्व इमारती विकत घेऊ शकतो मी. ग्रीक पुराणातल्या क्राईसस राजा इतक्या श्रीमंत असलेल्या कुणाही श्रीमंतांशी मी बरोबरी करू शकतो. दाग-दागिने, हिरेमोती, जमीनजुमला, नुसते नाव घ्या,सर्व काही ह्या वॅल्युनाच्या राजा जवळ आहे ! माझे राज्य लहान असेल पण त्याचा राजा मी मायकेल श्रीमंतांपेक्षा श्रीमंत आहे. मनावर घेतले तर, जगातील देशांचे सर्वोच्च किताब, विद्वानांचे स्तुतीचे उद्गार आणि आदर मानमरातब माझ्या एका होकाराची वाट पाहत आहेत !”
पण मायकेलने भिकाऱ्याच्या वेषात राहण्याचे ठरवले.संध्याकाळ झाली की तो त्याच्या बाकावर येऊन बसायचा. वैभवशाली जीवनवृक्षाची फळे त्याने चाखली होती. पण त्याची कडवट चव तोंडात घोळत असताना तो एडन जवळील आपले राज्य सोडून इकडचे जग जवळून पाहण्यासाठी इथे आला.
आपल्या विचारांच्या स्वप्नात असलेला राजा मायकेल, बैराग्यासारखा बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे निरीक्षण करत होता. आपली संपत्ती स्थान यापेक्षा समोरच्या वास्तवात नि:स्वार्थीपणे रमणे हा त्याचा खरा विरंगुळा होता. त्याच्या या अनुभवातून कुणाचे काही चांगले होई त्यावेळेचा त्याचा आनंद त्याला श्रेष्ठ होता. कुणाच्या अडचणी आपल्या राजेशाही दिलदारीने दूर झाल्या की तो मोठ्या समाधानात असे.
विचारात गुरफटून गेलेल्या मायकेलचे लक्ष घड्याळाकडे गेले. घड्याळाकडे पाहून तो हसला खरा पण त्या हसण्यात खिन्नता चीड आणि विषाद होता. लोकांचे येणे जाणे, त्यांची घाई गडबड, त्यांचे ताण- तणाव, खालीवर होणारे आशा-निराशेचे झोके सगळे ह्या घड्याळामुळे आहे असे त्याचे ठाम मत होते.
थोड्याच वेळात मायकेल पासून दोन बाक सोडून एका तरुण येऊन बसला. सिगारेट ओढू लागला. झुरके घेण्याच्या पद्धतीवरून तो अस्वस्थ आहे हे समजत होते. मधूनच तो समोरच्या मोठ्या घड्याळाकडे पाहायचा. लगेच एक झुरका घ्यायचा. मायकेल हे पाहात होता.
राजे मायकेल उठले आणि त्या तरुणाजवळ जाऊन राजाला शोभेल अशा पद्धतीने ते त्या तरुणाशी बोलू लागले. ” तरुण माणसा, तू कोणत्या तरी काळजीत दिसतोस. मी व्हॅल्यूनाचा राजा. माझ्या कपड्यांवरून जाऊ नकोस. मी वेषांतरात वावरतोय. अडचणीत असलेल्यांना शक्य ती मदत करत असतो. त्यात मला आनंद वाटतो. तुझी चिंता जर मी दूर करू शकलो तर त्याचा मला आनंदच होईल. कसली काळजी करतोस?” तरुण माणसाने मोठ्या उत्सुकतेने वर पहिले. पण मायकेलचा अवतार पाहिल्यावर कपाळाला आठी पडली. तो हसला तरी ती आठी तशीच होती. पण “चला कोण माणसे भेटतील ! थोडा वेळ गमतीत जाईल “ह्या विचाराने तो म्हणाला, ” महाराज, तुमच्या भेटीने मला आनंद झाला. तुम्ही वेषांतर करून आला आहात हे मला पटतेय. मदतीबद्दल आभारी आहे.पण तुमच्या मदतीचा मला काही उपयोग होईल असे वाटत नाही. माझी अगदी खाजगी बाब आहे ही. तुम्ही मला मदत करायला तयार झाला ह्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे !” तो तरुण खोट्या नम्रतेने म्हणाला. आणि मनातही त्या राजाला तो हसत होता.
राजा मायकेल त्या तरुणा जवळ पण राजाला शोभेल असे अंतर ठेवून बसला. सुरवातीला लोकांकडून अशी टिंगल टवाळी होते. मदत नको म्हणतात याचा त्याला अनुभव होता. आणि आपल्या वेशावरून लोकांना असे वाटणार हेही आता माहीत झाले होते. पण एक होते, महाराज मायकेलशी कुणीही उद्धट आणि अपमानास्पद बोलण्याचे धाडस करू शकत नव्हता. याला कारण राजा मायकेलचे चालणे बोलणे बसणे यातून त्याचा दरबारीपणा आणि सुसंस्कृतपणा पटकन जाणवत असे.
“घड्याळं ! ही घड्याळं म्हणजे माणसाच्या पायातील बेड्या आहेत.” राजा बोलू लागला,” वारंवार घड्याळाकडे पाहताना तुला मी बघत होतो. अरे घड्याळाचा चेहरा निर्दय आणि जुलमी! त्याच्यावरचे आकडे लॉटरीतिकिटासारखेच फसवे! घड्याळाचे काटे म्हणजे हातचलाखीचा खेळ! तरुणा, घड्याळाच्या नादात पडू नकोस.मनस्ताप वाढवून घेऊ नकोस.घड्याळावर तुझे आयुष्य बेतू नकोस.”
“मी घड्याळ वापरत नाही “,तो तरुण म्हणाला, ” ज्या दिवशी कपडे उत्तम घालतो त्या दिवशी घड्याळ वापरतो.” तो तरुण आता थोडे मोकळेपणाने बोलू लागला. त्यात मायकेलची थट्टा नव्हती.
“माझा मनुष्य स्वभावाचा अभ्यास आहे. मी सांगतो ती प्रौढी समजू नकोस. मी तत्वज्ञानाचा उच्च पदवीधर आहे. साहित्यातील पदवीधर आहे. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे माझी थैली भाग्याने भरलेली असते. तुझ्या चेहऱ्यावरून तू मोठ्या चिंतेत आहेस हे मी ओळखले. तू प्रामाणिक आहेस हेही माझ्या लक्षात आले. आता मी जे सांगेन ते एक. सल्ला म्हण की उपदेश पण मी जे सांगेन ते एक. ”
“माझ्या ध्यानाकडे पाहून, माझी काळजी हा काय सोडवणार हे मनात आणू नकोस.” मायकेल हे सांगत होता खरा पण तो तरुण अधिकच अस्वस्थ होऊन समोरच्या चार मजली इमारतीकडे पाहात राहिला होता. खिडक्यांचे पडदे ओढलेले होते. त्यामधून खोल्यांतील मंद प्रकाश बाहेरून दिसत होता.
“नऊला दहा मिनिटं कमी !” आता काय करायचे ? आता काय होणार? अशा विचाराने तो तरुण हात हलवत त्या घराकडे पाठ फिरवून काही पावले गेला असेल तोच “थांब” अशी राजा मायकेलने आज्ञाच केली. मायकेलच्या आवाजात बादशाही जरब होती. तरुण तिथेच थबकला. निराशेने म्हणाला,” तिच्यासाठी अजून दहा मिनिटे थांबेन. नंतर मी क्षणभरही थांबणार नाही.” नंतर मोठ्याने मायकेलला म्हणाला,” माझ्या हितचिंतक मित्रा! त्यानंतर मात्र आपण दोघे जगातील सर्व घड्याळांना आणि स्त्रियांना समुद्रात बुडवू !”
“खाली बस”, मायकेल शांतपणे म्हणाला, “घड्याळे बुडवण्याला माझी हरकत नाही. पण पुढे जी तू भर घातलीस ती अजिबात योग्य नाही. आणि चांगलेही नाही ते. आपल्या दोघांपेक्षा,बायका घड्याळाच्या जास्त विरुद्ध आहेत.त्या घड्याळाला जुमानत नाहीत. आपले दोष, चुका,अपराध यांची सतत मोजणी करणाऱ्या आणि सुखांना मर्यादा घालणाऱ्या या काळ – वेळेच्या तावडीतून मुक्तता करण्यास स्त्रियाच मदतीला येतील. बरं, तुझी इच्छा असेल तर तुझ्या व्यथेची कथा मला सांगशील का? ”
तो तरुण बाकावर बसला. त्याला राजा मायकेलची थट्टा करण्याची पुन्हा लहर आली, म्हणून नाटकी अदबीने झुकल्यासारखे करून,” महाराज, समोरच्या तीन खिडक्यांतून प्रकाश दिसतोय ते घर दिसते ना? संध्याकाळी सहा वाजता मी त्या घरी गेलो होतो. मला जी आवडली तिच्या घरी. जिच्यासाठी मी वेडा झालो तिच्या घरी. मध्यंतरी मी उडाणटप्पुसारखा वागत होतो.तिला माहीत झाले होते ते. माझे ते वागणे चुकलेच. मी पुन्हा तसे वागणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि मला क्षमा कर हे सांगण्यासाठी मी तिच्याकडे मोठ्या आशेने गेलो होतो. माझ्यावर विश्वास ठेव, मला क्षमा कर अशी मी तिला विनवणी केली. केविलवाणा होऊन तो तरुण मायकेलला सांगत होता.
“मला विचार करू दे. पण एक गोष्ट नक्की. एक तर मी तुला मनापासून माफ करेन. किंवा मी तुझे पुन्हा कधीही तोंड पाहणार नाही.ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे लक्षत ठेव. मी जर तुला क्षमा केली तर साडे आठ वाजता माझा सिल्कचा पांढरा स्कार्फ ह्या खिडकीतून तुला दिसेल. झाले गेले मी विसरले असे समज. लगेच मला भेटायला ये. आणि माझा स्कार्फ दिसला नाही तर… तर सर्व काही कायमचे संपले असे समज.” असे ती निश्चयाने मला म्हणाली. इतके सांगून तो तरुण निराशेने म्हणाला,”मी त्या घड्याळाकडे सारखा पाहतोय. तिने सांगितलेली वेळ टळून गेली त्याला तेवीस मिनिटे होऊन गेली होती. मी इतका अस्वस्थ निराशा का झालो याचे आता, भिकाऱ्याच्या वेषातील महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटते का?”अगदी कडवटपणे शेवटची दोन वाक्ये तो तरुण म्हणाला.
“मी तुला पुन्हा तेच सांगतोय,ऐक.” राजा मायकेल अगदी शान्तपणे सांगत होता. “स्त्रिया वेळेच्या आधीन नसतात. वेळेच्या विरुद्ध जाणाऱ्या त्या, त्याच्या कट्टर शत्रू आहेत.घड्याळे शाप आहेत तर स्त्री ही वरदान आहे. आता एव्हढ्यात केव्हाही तिचा स्कार्फ तुला दिसेल.” !
“तुमच्या राजाज्ञेने तसे काही होणार नाही.”तो तरुण उपहासाने हसत पुढे म्हणाला, “कारण तुम्हाला माझी मेरियन माहीत नाही. घड्याळाचा ठोका चुकेल पण मेरियन एका क्षणाचीही चूक करणार नाही.८वाजून ३१ मिनिटे झाल्यावरच मला समजायला हवे होते. मी निघतो. दोस्ताकडे जाऊन बसतो. गुड नाईट अं .. अं .. महाराज!” मध्येच राजाची थट्टा शिवाय त्यात हेटाळणीही मिसळून,असे दरबारात बोलला असता तर काय झाले असते …गर्दन केव्हाच उडालीअसती!
तरीही शांतपणे राजा मायकेल समोरच्याला कोड्यात पाडणारे आपले हास्य करीत त्या तरुणाच्या कोटाची बाही पकडीत म्हणाला, ” “नवाचे ठोके पडेपर्यंत थांब. जाऊ नकोस. माझ्या जवळ संपत्ती, सत्ता, व ज्ञान सर्व आहे. पण झोपेपुढे मात्र मी असहाय्य होतो.आतापर्यंत त्याचे पाणीदार डोळे सौम्य होऊन स्वप्नाळू दिसू लागले. “तू थोडा वेळा माझ्यापाशी बसून राहा. तुझी लाडकी प्रेयसी तुझीच होणार ! शाही घराण्यातील पुरुषाचा हा शब्द आहे. लक्षात ठेव. मुला, तुझ्या लग्नात मी तुला एका लाख डॉलर देईन. तुमची ही नदी कोणती? हां! हडसनच्या काठी राजेशाही घरही तुला मिळेल. पण त्या घरात एकही घड्याळ लावायचे नाही ! समजले? लावलेस तर एक कवडीही मिळणार नाही. अट मान्य आहे ?” ” का नाही?” त्या भल्या मोठ्या घड्याळाकडे पाहत तो तरुण पुढे म्हणाला,” नऊ वाजायला तीन मिनिटे बाकी आहेत.”
राजा मायकेलला झोप येऊ लागली. तो म्हणाला “मी झोपतो. पण तू इथेच थांब. जाऊ नकोस.”
हरून-अल-रशीद या इतिहासातल्या खलिफासारखा वेषांतर केलेल्या राजा मायकेलने बाकावरच ताणून दिली. पेंगाळलेल्या डोळ्यांनीच राजा त्या तरुणाला सांगत होता,”इथे मी रोज संध्याकाळी येत असतो. लग्न ठरले की इथे ये. तुला चेक देतो. पण जोडप्याने यायचे हां !”
“थँक यु, युअर हायनेस !” आता मात्र तो तरुण गंभीरपणे मनापासून म्हणाला. पण मला हडसन नदीवरच्या घराची जरुरी नाही. तरीही तुमचे किती आभार मानावे ते समजत नाही.”
राजा झोपी गेला. त्याची वेडी वाकडी झालेली हॅट खाली पडली. त्या तरुणाने खऱ्या अदबीने ती उचलली. राजाच्या चेहऱ्याला वारा लागू नये म्हणून चेहऱ्यावर अलगद ठेवली.त्याचे पाय नीट करत सरळ झोपवले.”बिचारा राजा!” असे कौतुकमिश्रित आदराने म्हणत त्याचे फाटके कपडेही व्यवस्थित केले.
मोठ्या पण गोड आवाजात नऊचे ठोके पडू लागले. तरुण मुलाने मोठा निराशेचा सुस्कारा सोडला. प्राणाहून प्रिय असलेल्या आपल्या मेरियनच्या घराकडे अखेरचे पाहून घेतले; मोठ्याने रडायचेच बाकी होते. तो स्फुंदु लागला. हुंदके आवरत नव्हते त्याला. तेव्हढ्यात समोरच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावरच्या खिडकीतून मेरियनचा पांढरा स्कार्फ पूर्ण उमलला ! क्षमा आणि स्वर्गसुखाचे अदभूत दैवी प्रतीक असा तो स्कार्फ समोर डोलत होता.
तेव्हढ्यात घाईघाईने घरी जायला निघालेला एक गृहस्थ, प्रेमाच्या लहरींवर फडकणाऱ्या स्कार्फच्या पांढऱ्या झेंड्याकडे “हे काय?” या संभ्रमाने पाहत चालला होता. ढगात विहार करणाऱ्या त्या तरुणाने त्या गृहस्थाला किती वाजलेत असे विचारले. त्या गृहस्थाने ८ वाजून साडे एकोणतीस मिनिटे काटेकोरपणे सांगितले. आणि सवयीप्रमाणे तो मोठ्या घड्याळाकडे पाहू लागला. “अरे ! ते घड्याळ आज अर्धा तास पुढे !?” दहा वर्षात असे मी पहिल्यांदाच पाहतो आहे हे.” तो गृहस्थ गोंधळून गेला होता. आपले घड्याळ खिशातून काढत तो पुढे म्हणाला,” माझं हे घड्याळ कधीही वेळ चुकत नाही. नेहमी बरोबरच ! ”
पण तो बिचारा कुणाशी बोलत होता ? किती वाजले विचारणारा तो तरुण वेळ ऐकून लांब लांब ढांगा टाकत कधीच आपल्या मैत्रिणीकडे गेलाही होता !
सकाळ झाली. दोन पोलीस पार्कमध्ये आपली रोजची फेरी टाकत आले. पार्कमध्ये कोणीही नव्हते. दाढीचे खुंट वाढलेला, वेडी वाकडी झालेली हॅट बाजूला पडलेली आणि अंगावर फटाके कपडे असलेला माणूस बाकावर झोपला होता.
“गांजेकस माईक !” चरस गांजा पिऊन रोज इथे येऊन पडतो. वीस वर्ष असं चाललेय. “त्यांच्यापैकी एक ज्येष्ठ पोलीस त्या तरुण पोलिसाला सांगत होता. तो दुसरा पोलीस माईकच्या हातात कोंबलेल्या चुरगळलेल्या पन्नास डॉलरच्या नोटेकडे अचंब्याने पाहत होता.
दोघे पोलीस ‘महाराजाधिराज मायकेलच्या’ बुटाच्या तळव्यावर मधून मधून दंडुके रप रप मारत, “चलो माईक उठो, उठ उठ” म्हणत उठवत होते !

[ प्रख्यात लघुकथाकार व’हेनरीच्या The Calip h, Cupid and The Clock याकथेचे स्वैर भाषांतर. ]

1 thought on “खलीफ,मजनू , आणि घड्याळ

  1. Mrunmayee Kulkarni

    a very pleasantly gripping story! A classic O’Henry and a perfect Marathi story telling by you Ajoba! Wonderful.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *