चिन्नू मुठीत एक रुपयाचे नाणे धट्ट धरून जात होता. एक दुकान दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील चिंतेची छटा कमी झाली. मोठ्या अधीरतेने त्याने दुकानदाराला विचारले, “ काका, तुमच्याकडे देव मिळतो का हो? मी विकत घेईन. मला एक देव पाहिजे.असला तर लवकर द्या हो.” दुकानदाराने चिन्नूकडे कोण चक्रम आहे हा अशा मुद्रेने पाहात हातानेच नाहीय्ये जा म्हणून धुडकावले. चिन्नू निराश होऊन दुसऱ्या दुकानात जाऊन,” दादा, मला एक देव पाहिजे. आहे का तुमच्या दुकानात? मी पैसे देईन त्याचे.” असे तळमळून विचारले. “ ए पोरा काय येडबीड लागलंय का तुला? जा देव बिव काही नाही मिळत इथं, पळ!” चिन्नू हिरमुसला झाला. एव्हढेसे तोंड करून पुढच्या चौकातल्या दुकानात गेला. तिथेही हाच प्रकार! तीच चौकशी, तेच उत्तर, व हडत हुडत करून घालवून देणे हेच घडले. होता होता एकूण चाळीस दुकाने फिरून झाली पण चिन्नूला देव तर मिळाला नाहीच पण टिंगल, हेटाळणी व उडवा उडवीची उत्तरेच ऐकायला मिळाली. चिन्नू रडकुंडीला येऊन एका खांबाखाली तोंड झाकून हुंदके देत बसला.
थोड्या वेळाने उठून तो पुन्हा कुठे देव मिळतो का पाहात एका दुकानात शिरला. इतका वेळ रुपया मुठीत धरल्यामुळे तळहात घामाने ओला झाला होता. तळवाही तांबडा झाला होता.ओला रुपया खिशात ठेवला. हातही खिशाच्या आतच पुसला.
दुकानात गेला. तिथे कोणी दिसले नाही. “ कुणी आहे का?” चिन्नूने दबकतच विचारले. एका शोकेस मागून एक हसतमुख म्हातारा आला.”काय पाहिजे बाळ तुला?” असे नेहमीच्याच आवाजात त्याने चिन्नूकडे पाहात विचारले. “बाबा! मला देव विकत घ्यायचाय हो.” चिन्नू मोठ्या आशेने दुकानदाराकडे पाहात म्हणाला. “ अरे वा! देव मिळेल पण पैसे आणले आहेस का ?” चिन्नूला आश्चर्य वाटले. इतकी पायपीट करीत किती दुकाने हिंडलो असेन. ह्या बाबाने निदान थोडी चौकशी तरी केली. “ आणले आहेत ! आणले आहेत! एक रूपया आहे माझ्या जवळ!” हे सांगताना चिन्नूने छाती फुगवायची तेव्हढी राहिली होती. “छान! नेमकी इतकीच किंमत आहे देवाची. पण तुला देव कशासाठी हवा?” चिन्नूचा चेहरा उतरला. तो खिन्न होऊन म्हणाला,” माझे काका हाॅस्पिटलमध्ये आहेत. मला ते एकटेच जवळचे आहेत.” “ आई बाबा कुठे आहेत?” “ माझे आई बाबा मी अगदी लहान असतानाच वारले. ह्या काकांनीच माझा सांभाळ केला. काका बांधकामावर जातात. काल ते उंच फरांच्यावरून खाली पडले. दवाखान्यातले डाॅक्टर म्हणाले. आता फक्त देवच काय करील ते खरं!” म्हणून मी एक रुपया घेऊन देव आणायला आलो.” चिन्नूने सांगितले ते ऐकल्यावर दुकानदार बाबा म्हणाले,” अरे देवाची किंमतही नेमकी एकच रुपया आहे.” असे म्हणत त्यांनी एक टाॅनिकची बाटली काढून चिन्नूला दिली.
देव मिळाल्याच्या आनंदात चिन्नू धावत पळत दवाखान्याकडे निघाला. काकाला,डाॅक्टरांना देव केव्हा दाखवेन असे त्याला झाले होते. रात्र झाली होती. चिन्नू धापा टाकत काकाजवळ आला. बाटली काकाजवळ ठेवत म्हणाला, “काका काका,मी देव आणलाय. आता तुला भीती नाही. देव मिळाला मला.!” सांगता सांगता दमल्या भागल्या चिन्नूला केव्हा झोप लागली ते समजले नाही.
दुसरे दिवशी सकाळी चिन्नू उठला. पण पलंगावर काका दिसला नाही. तेव्हा तो घाबरून काका कुठे आहे असे नर्सला विचारू लागला. “मोठ्या शहरातले पाच सहा डाक्टर्स आले आहेत. ते तुझ्या काकाला तपासताहेत.” नर्सने सांगितल्यावर चिन्नू मुकाटपणे काकाच्या पलंगापाशी येऊन बसला.
मोठ मोठ्या तज्ञ डाॅक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. एक आॅपरेशन केले. यथावकाश चिन्नूचा काका बरा झाला.बिल आले. ते पाहून काकाला आपण हार्टफेलने मरणार असे वाटू लागले. तो बिलाकडे पाहात मनात म्हणत होता,” चिन्नू एक रुपयात देव मिळत नसतो रे!” काकाचे डोळे पांढरे होण्याच्या आत नर्स आली. ती म्हणाली,”ते बिल आहे ; बिलाचे सर्व पैसे मिळाले आहेत.त्याची ही पावती!”
काकाने सुटकेचा निश्वास टाकला.काका आणि चिन्नू बाहेर पडतांना बिलाच्या खिडकीपाशी आले. “साहेब, माझ्या बिलाचे एव्हढे पैसे कुणी भरले ते सांगता का? त्याच्या पाया तरी पडतो.” बिलाचे काम पाहणाऱ्याने कागदपत्रे वर खाली करीत तपासून पाहिली. तो म्हणाला,” एका श्रीमंत माणसाने तुमचे पैसे भरले आहेत. औषधाचे मोठे दुकान आहे त्यांचे. येव्हढे मला माहित आहे.” इतके सांगून त्याने दुसरा कागद पाहून, चिन्नूच्या काकाला त्या मालकाचे नावही सांगितले.
चिन्नूने “औषधाचे मोठे दुकान आहे” हे ऐकले होते. चिन्नू आपल्या हातातला देव दाखवत काकाला म्हणाला,” काका ज्यांनी मला हा देव दिला त्या बाबांचेच दुकान असेल.मला माहित आहे,चला.”
काका आणि चिन्नू त्या देवमाणसाला भेटायला निघाले. चिन्नूच्या हातातला एक रुपयाचा देव काकाने घेतला. त्या देवाकडे पाहात ते दुकानदार बाबाला शोधत त्या दुकानात आले.तिथे दुकानदार बाबा नव्हते. नोकर म्हणाला, “मालक सुट्टी घेऊन प्रवासाला गेले आहेत. पंधरा वीस दिवसांनी येतील. पण त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी दिले आहे.”
काका पत्र वाचू लागला. जसे वाचू लागला तसे त्याचे डोळे भरून येऊ लागले. “ मला माहित आहे तुम्ही माझे आभार मानायला आला आहात. पायही धरू लागाल माझे. पण तसे काही करण्याची गरज नाही. तुमच्या, एक रुपयाच्या देवाचे,चिन्नूचे आभार माना.”
( युट्युबवर सहज समोर आलेल्या लहानशा गोष्टीच्या आधारे.)