‘पेढे’ गावच्या आठवणी

WhatsApp वर जलदीने दूध नासवून केलेल्या धारवाडी पेढ्यांचे फोटो टाकले होते. पेढ्यांसाठी इतके चांगले आणि भरपूर दूध नासवणे आणि त्याचे पनीर किंवा पेढे करणे हे मला खटकते.

नासवून ते इतके देशस्थी रंगाचे पेढे करण्यापेक्षा दूध आटवून आटवून आटवून घट्ट करून खरपूस बदामी रंगावर आणले तरी ते धारवाडी इतकेच किंवा फार तर दावणगिरे मुंगळहट्टी सारखेच खमंग व चविष्ट होतील! बडोद्याचे दुलीचंदचे पेढे चवीला हुबेहुब धारवाडी मिश्राच्या पेढ्यासारखेच असतात. पण थोड्या उजळ रंगामुळे उजळमाथ्याने परातीत विराजमान असतात. दूध नासले तर मी कलाकंद करत असतो.शतावधानी असल्याने आठवड्यातून चार दिवस मला उत्तम कलाकंद खायला मिळायचा. उरलेले तीन दिवस दूध उतू जायचे; त्यामुळे मला रोज दिवसातून तीन चार वेळा दूध आणायला तीस पायऱ्या चढ-उतार करून जावे लागे. कुणी माझ्याकडे केव्हाही आले तरी दूध असेच. फक्त नासलेले किंवा उतू गेलेले! हा अगदी परवा परवा २३ जुलै१९१८ पर्यंतच्या भूतकाळातीलच इतिहास आहे. अखेर आपल्याकडे कुठल्याही इतिहासाची परंपरा गौरवशालीच असते तशी माझ्या कलाकंदाचीही आहे !

कालच भंडाऱ्याच्या शंभर वर्षाची परंपरा असलेला “राणी” पेढ्याचा व्हिडिओ पाहिला.त्यात पाककृती अशी नाही. इतकेच काय शब्दही एखादाच आहे.पण ते राणी पेढे कसे करतात तेव्हढे दिसले.

पेढ्यांचेही किती प्रकार ! औरंगाबादचे अप्पा हलवाईचे पेढे. हे गोळ्यांसारखे आता करत असतील पण पूर्वी ते द्रोणात मोठ्या चमच्याने लावून देत असत. चवीला बरेचसे सोलापूरच्या स्वस्तिकच्या कुंद्यासारखे खमंग. छानच. त्याच पद्धतीचे पण पेढ्याच्या रुपातले कुंथलगिरीचे पेढे. तेही तितकेच स्वादिष्ट,मस्त. अगदी five starबसेसही तिथे थांबतील मग आमच्या सर्वांसाठी असलेल्या सर्वमान्य तांबड्या येष्टी का नाही थांबणार ? कुंथलगिरी खवा व पेढ्यांचेच गाव आहे असे वाटण्या इतकी तिथे खव्या पेढ्यांची दुकाने व विक्रेते आहेत!

पूर्वी सोलापूरला बदामी पेढा मिळत असे. तो चांगला साधारण तळहाता एव्हढा मोठा असे. आकार बदामाचा, त्यात असली तर बदामाची एखादी पातळशी पाकळी. वयाचीच चव त्यात भरपूर असली तरी तो पिवळ्या रंगाचा पेढा चवीला उत्तम असे. पण तो लवकरच लुप्त झाला. बालपणासारख्या सर्व चांगल्या गोष्टी अल्पकाळच असतात. सध्या राजकोटी पेढा पुण्याला मिळतो. त्यालाच काका हलवाई जम्बो पेढा म्हणतात. मलई पेढा आहेच. सर्वांना मथुरा कंस किंवा कृष्णामुळे माहित नसते पण तिच्या पेढ्यांमुळेच जास्त ती जास्त माहित आहे. कुठे मथुरा आणि कुठे सोलापूर! पण सोलापुरचे सगळे पेरूवाले आपले पेरू “लै गोड! आल्ल्ये मथुरेचे प्येढ्ये” ऐेSय मथुर्रेच्चे पेढ्ये ” म्हणतच पिवळे जर्द पेरू विकत. लोकही ते मथुरेचे पेढे म्हणूनच खात!

मलई पेढ्यांची देशी आवृत्ती म्हणजे सध्या ज्याला दुधाचे पेढे म्हणतात ते.पण दुधाचे पेढे आमच्या जळगावचे भावे करीत. ते उत्तम असत. भावे,मी जिथे राहात असे त्याच्या तळमजल्यावर होते. दुधाचा व्यवसाय होता त्यांचा. सोलापूरला घरी जाताना मी बरेच वेळा ते नेत असे. त्यांचे नाव बाळ असले तरी आडनाव भावे असल्यामुळे आधी आॅर्डर नोंदवल्याशिवाय (तोंडी सांगितले तरी चालेल ही मोठी सवलत होती) मिळत नसत. सर्व काही आटोपशीर असल्यामुळे जास्तीत जास्त अर्धा किलोचीच आॅर्डर ते घेत. तीही फक्त एकाच गिऱ्हाईकाची! पण पेढे मात्र भरपूर खावेसे वाटण्या इतके उत्तम असत.

काही चांगल्या पेढ्यांत सोलापूरच्या दूध पंढरीचे आणि कऱ्हाडच्या सहकारी डेअरीच्या पेढ्यांचाही समावेश करावा लागेल.
कऱ्हाडवरून साताऱ्याच्या कंदी पेढ्यांची आठवण झाली. कंदी ही पेढे बनविण्याची पद्धत आहे की ते बनवणाऱ्या साताऱ्याच्या मूळ हलवायांचे नाव आहे हे सांगता येत नाही इतके कंदी नाव साताऱ्ऱ्याच्या पेढ्याशी निगडित आहे. त्याचा पोत स्वााद वेगळाच व अप्रतिम असतो. किंचित कडक वा टणक पण आतून मऊ, कळत न कळत लागणारी जर्राशी आंबूस चव. इंग्रजीत जसे hint of… म्हणतात तशी.कंदी साताऱ्याचे पण आमची आणि त्यांची ओळख आबासाहेबांनीलहानपणी करून दिली; ते एम. दिगंबरच्या (नव्यापेठेतील) स्टोअर्स मधून हे कंदी पेढे आणत. नेहमी मिळत नसत. बहुधा एम दिगंबर साताऱ्याला त्यांच्या नातेवाईकांकडे जात असतील तेव्हा परतताना, त्यांच्यासाठी दिलेलेच हे विकत असतील!!

कुंथलगिरी गावासारख्याच दोन लहान गावांचाही नावे त्यांच्या प्रसिद्ध पेढ्यांसाठी घेतली जात त्यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ती दोन्ही गावे लहान रेल्वे स्टेशनची आहेत. दोन्ही विरुद्ध दिशेला. एक म्हणजे जवळचे मोहोळ आणि दुसरे तडवळ. मोहोळ माहितच आहे. तडवळ हे पूर्वीच्या एमएसएमवरील म्हणजे सध्याच्या दक्षिण रेल्वेवरील लहानसे स्टेशन.सोलापूर विजापूर मार्गावर आहे. पण आम्हाला ते आमच्या आईच्या रामूमामांच्या मंगरूळ गावामुळे तडवळ स्टेशन माहित आहे. दोन्ही स्टेशनवर गाड्या थांबल्या,अर्थात पॅसेंजर गाड्याच, की बहुतेक प्रवासी,डब्याला आग लागलीय की काय वाटावे अशा तातडीने पटापट उतरून (बहुतेक अग्रवालचेच हे स्टाॅल असावेत) चहाच्या स्टाॅलकडे पेढ्यांसाठी पळत सुटत! अशी घाई नंतर पुढे कर्जत स्टेशन आले की लोक दिवाडकरांच्या बटाटे वड्यासाठी पळत सुटत तेव्हा पाहिली. दोन्ही स्टेशनचे पेढे चांगलेच असत. काही स्टेशनावर गाड्या इंजिनमध्ये पाणी घेण्यासाठी थांबायच्या तशा मोहोळ आणि तडवळला पेढ्यांसाठी थांबत. गाडी किती वेळ थांबते इथे असे कुणी विचारले तर सर्वांचे पेढे घेऊन होईपर्यंत हेच उत्तर गार्डकडूनही मिळे!

कंदी पेढ्यांशिवाय पेढे प्रकरण पूर्ण होत नाही तसेच नाशिकचे प्रख्यात हलवाई पांडे यांचे पेढे खाल्याशिवाय लेख पूर्ण होणे शक्य नाही.

खरे सांगायचे तर प्रत्येक गावात चांगले पेढे मिळत असतातच. व तिथे ते प्रसिद्धही असतात. येव्हढेच कशाला जत्रेतल्या कापडाच्या छपराखालचे किंवा आठवडी बाजारातले अॅल्युमिनियमच्या परातीत रचून ठेवलेले आणि धुळीची किंचित पावडर लागलेले पेढेही ,”बाबा पेढा घ्ये की” म्हणणाऱ्या लेकराकडे दुर्लक्ष करून तेलकट दोरी गळ्यात बांधलेल्याबाटलीत ‘अदपाव त्येल’ , लाल मिर्च्या आणि मोठ्या फडक्यात किलो दोन किलो ज्वारी बांधून झाल्यावर परतताना त्या कापडी टपरीपाशी थांबून पोरासाठी दोन प्येढ्ये आणि पै-पैशाची गुडीशेव बांधून घरी नेणाऱ्या वाडी वस्तीतल्या रोजगार हमीच्या कामगारांसाठी,तो धुळीचा हलकासा मेक अप केलेला पेढाही तितकाच प्रसिद्ध आणि गोड असतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *