चार दिवस गॅदरिंगचे – २

रेडवुड सिटी

आमच्या शाळेच्य गॅदरिंगच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे वर्णन करताना गॅदरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य ध्यानीं आले. गॅदरिंगला शाळा आम्हाला सिनेमा दाखवत असे. कुठे मैदानात किंवा शाळेच्या सभागृहात, त्या १६मिमि पडद्यावर नाही. चांगल्या सिनेमा-थेटरात दाखवत असे! भागवतमध्ये असला तर चित्र मंदिर,कलाआणि छाया ह्या त्यांच्या तिन्ही टाॅकीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी तो पहायला मिळे. (त्यांचे उमा चित्र मंदिर बांधून झाले नव्हते.) प्रभात मध्ये असला तर मात्र दोन खेळ करावे लागत. ही झाली रुक्ष आकडेवारीसारखी माहिती. खरी गंमत होती ती आमची गर्दी पाहण्याची आणि वाहत्या वाऱ्यासारख्या एकामागून एक ऐकू येणाऱ्या गप्पांच्या त्याबरोबरच्या हसण्याच्या अनेक तऱ्हांच्या,आरोळ्या,व एकमेकांना पाहिल्यावर मारलेल्या असली हाकांच्या लहरी कानांवर झेलण्याची ! पाखरांच्या शाळेतही एव्हढा उल्हास असणारी व आनंद देणारी कलकल निनादत नसेल.

भागवत थिएटरचे आवार त्यामानाने मोठे. ते तर फुलून जायचेच पण कला व चित्रमंदिराच्या मधल्या बागेजवळची बेताची मोकळी जागाही रिकामी राहात नसे. तीच गोष्ट प्रभातची. प्रभातची लाॅबी आणि समोरची आयताकार प्रशस्त मोकळी जागा मुलांनी तुडुंब भरून जाई. दाटीवाटी-खेटाखेटी,रेटारेटीचे कुणाला काही वाटत नसे. तरी गप्पात रंगलेल्याला धक्का लागला तर एखादाच कुणी,”अब्ये लई ताकद आली का बे?” ए सुकड्या,दिसत नाही का तुला?”त्यावर हा सुक्कड लगेच,” दिसायचं काय त्यात बे? तू कुणाला नाही दिसणार बे ढब्ब्या !” हा संवादऐकल्यावर भोवतालची सात आठ पोरं मोठ्यांदा हसली की इतरही काही कारण नसता मोठ्यांदा हसायची की लगेच सगळी गर्दी हसत सुटायची ! पण तोपर्यंत “सुक्कड हाॅकीस्टिक ”आणि “तो फुटबाॅल”हसत खेळायलाही लागलेले असत!

आत गेल्यावर मग जागा धरून ठेवलेली पोरे दोस्तांच्या नावाने हाकारा सुरू करत.सिनेमा सुरू झाला तरच शांतता होईल ह्या भरवशावर मास्तर सिनेमा सुरु कारायला सांगत. ही शांतता काही वेळ प्रस्थापित होत असे. पण गाजलेले गाणे सुरु झाले की कुठून तरी ,” अरे जाधव मस्त म्हणतो हे गाणं.” असा आवाज आला की जाधव आणखी आग्रहाची वाट न पाहता लगेच सुरु करायचा म्हणायला. लगेच दुसऱ्या वर्गांचा अभिमान उसळून यायचा की एकदम चार पाच जाधव ते गाणं म्हणू लागायचे . बाकीची आम्ही ‘वगैरे” पोरं ठेका धरायला होतोच की! तीन मिनटाचे गाणे सहा मिनिटांची LPव्हायची! गंभीर किंवा करूण ‘सीन’ आला की वरच्या मजल्यावरील एखादा प्रोजेक्टरच्या झोतात, हातांनी बोटांनी’पक्षी उडतोय, हरिण,किंवा मासासळसळसतोय’ ‘ हा खेळ सावल्यांचा’ करत असे.शिक्षकांनी पाठीत रट्टा घातला की हा खेळ बंद व्हायचा.

सिनेमा काही जणांनी अगोदर पाहिला असला तर पुढचे डायलाॅग अगोदरच ऐकायला लागायचे! गाणे आले की कुणी जाधव-देशपांडे-इनामदार असे बरेच सवाई रफी,फर्माईशीची वाट न पाहता गाणे म्हणायलाही लागत. तर “चूल आणि मूल” असला तर अगोदरच सर्वतोमुखी झालेले दामुअण्णा मालवणकरांचे “अगं माया आवर,आवर” आले की प्रोजेक्टरच्या प्रकाश-झोतात तेच वाक्य ‘माया’च्या जागी निरनिराळे पाठभेद घालून भिरभिरत विहरत असत!

एरव्ही चार मुलांसमोर, घाबरून धड नीट न बोलणारेही सिनेमाच्या अंधारात मात्र आपापले विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम साजरे करीत ! सिनेमा संपल्या नंतरही मजा पुढे चालूच असे.सिनेमातले संवाद म्हणताहेत, तर कुणी गाण्यांच्या ओळी गुणगुणताहेत;,बरेच जण हसत खिदळत गप्पाटप्पा करत घोळक्या टोळक्यांनी,कुणाच्या खांद्यावर हात टाकून, काही एकमेकांना ढकलत चालले आहेत; काही जवळच्या घरी ठेवलेल्या सायकली आणून टांग मारत “जातो बे” म्हणत निघालेही असतात! अशा तऱ्हेने रमत गमत सगळे घरी परतायचो आम्ही.

गॅदरिंगचा सिनेमा ही सर्वांनाच एका शुद्ध,निर्भेळआनंदाची आणि करमणुकीची मेजवानी असे.

गॅदरिंगच्या अल्पोपहारासारखा सिनेमाही अल्पकालीनच ठरला. फार तर दोन तीन वर्षेच टिकला. पण कधीच flop झाला नाही; तो hit च ठरला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *