एका लग्नाची अदभुत इव्हेन्ट!

शीव/ चुनाभट्टी

नरसी मेहता नेहमी आपल्याच नादात असायचा भजन कीर्तन लेखन ह्यात तो हरवलेला असे. ध्यानातच कष्णाचे गुण आवडीने गात असे. हिसाबकिताबात त्याचे मन लागत नसे. नरसी मेहत्याच्या घरी कोण मुलगी देणार! पण मुलगा लग्नावाचून राहात नाही आणि मुलीचे लग्न झाल्याशिवाय राहात नाही ह्या सत्याप्रमाणे नरसी मेहत्याच्या मुलाचे स्थळही कुणाच्या तरी नजरेस आले.

हा असा तसा कुणी सोमाजी गोमाजी कापसे नव्हता. जुनागडजवळच श्यामापुर नावाच्या गावात त्रिपुरांतक -देवाचेच विशेषण शोभावे – अशा भारदस्त नावाचा धनाढ्य सावकार होता. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. मुलीचा बाप कितीही मोठा, सावकार असला तरी अखेर मुलीचाच बाप. त्यानेही आपल्या पुरोहिताला म्हणजे कुळाच्या उपाध्यायाला स्थळ शोधायला सांगितले.

कृष्णंभट आपल्या यजमनाच्या मुलीसाठी स्थळं पाहू लागले. ते जुनागडला आले असता गावात चौकशी करू लागले. एक दोघांनी बिचकत अडखळत नरसी मेहत्याचा मुलगा लग्नाचा असल्याचे सांगितले. पण नरसी मेहत्याच्या घरची दामाजीचीही अवस्था सांगितली.

कृष्णंभट स्वत:शी म्हणाला,”मी नरसी मेहत्याला कसा काय विसरलो?“ तो नरसी मेहत्याच्या घरी आला. नरसी त्याच्या जीवीचा विश्राम अशा कृष्णाचे गुणगान करत होता.”तूच माझा विसावा। तूच माझा सखा। कष्णा, तूच मजला एक एकला। तुझ्यासारिखा अन्य कोण मज।। असे भजन करीत होता.

नरसीला घरी येणारा प्रत्येकजण साधु सज्जन वाटायचा. कष्णंभटाला गूळपाणी झाले. सुपारीही कातरून दिली. कृष्णंभटही काही काळ नरसी भगतच्या सहवासात स्वत:ला व सभोवताल विसरून गेला होता. सावध झाल्यासरसा त्याने नरसी भगतचा मुलगा सावकाराच्या मुलीसाठी निश्चित केला.खरा वैष्णव पाहिल्यावर नरसी मेहत्याच्या घरी धनसंपदा किती, शेती आहे का नाही हा विचार न आणता नरसी खरा वैष्णव आहे हीच त्याची थोरवी आहे, हे जाणून तुमचा मुलगा पसंत आहे हे नरसी मेहत्याला सांगितले. पण ही मुलगी कुणाची हे त्याने विचारल्यावर कृष्णंभटाने उत्तरा दाखल, “मुलगी त्रिपुरांतक सावकाराची आहे” सांगितल्यावर,दीनआणि राव, राजा आणि भिकारी,शत्रु आणि मित्र समान मानणाऱा नरसी भगत हरखून गेला नाही की चिंतेतही पडला नाही. त्याने हसतमुखाने कृष्णंभटाला निरोपाचा विडा दिला.

कृष्णंभट समाधानाने श्यामापुराला आला. आपण मुलगा निश्चित केल्याचे वर्तमान त्याने त्रिपुरांतक सावकराला सांगितले. सावकाराला आनंद झाला. सोयरे कोण चौकशी केली. नरसी मेहत्याचा मुलगा हे ऐकल्यावर मात्र सावकराचा चेहरा खर्रकन उतरला. आपल्या तोलामोलाचे घर, नातेवाईक नाहीत समजल्यावर आतून संतापला पण आता काही करणे अशक्य आहे हे तो जाणून होता. कारण त्या काळी पुरोहिताने निश्चित केलेले लग्न मोडता येत नसे.

पण सावकार धूर्त होता. त्याने कृष्णंभटाला सांगितले,” उपाध्याय ! लगोलग जा आणि व्याह्यांना सांगा मुहुर्त उद्याचा दिवस सोडून परवाचा आहे. वऱ्हाड हत्ती घोडे छत्र चामरे उंची वस्त्रे, वाजंत्र्यांसह या म्हणावे.” हे ऐकून नरसी मेहता लग्न मोडेल अशी त्याची धारणा होती

कृष्णंभट लगेच निघाला. त्याने नरसी मेहताला, लग्न परवाच करायचे ठरले आहे तर सर्व तयारीनिशी, शोभेशा इतमामाने या.” येव्हढाच मोघम निरोप दिला. हे ऐकून नरसी भगतच्या घरांत गोंधळ सुरु झाला. एका दिवसात कुठे लग्नाची तयारी होते का? वऱ्हाडाची मंडळी तरी कशी जमणार? वगैरे कलकलाट सुरु झाला. पण नरसी मेहता मात्र शांतपणे “हरिके गुन गाऊ मैं” म्हणत “हे नाथ वासुदेव हरे मुरारे; गोविंद नारायण मधु कैटभहारे ” म्हणत आपल्या भजनात पुन्हा गुंग झाला.नंतर कृष्णंभटाला जेवायला घालून सावकराला होकार कळवायला सांगितले.

कृष्णंभटाने धोरणीपणाने नरसीच्या प्रेमापोटी आपल्या मालकाच्या अटी मात्र नरसीला सांगितल्या नव्हत्या. काय होत्या त्या अटी?

“लग्न लगेच परवाच करायचे. वऱ्हाडाने हत्ती घोडे मेणे छत्र चामरे, वाजंत्र्या चौघड्यासहित थाटामाटात यावे. आमचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे की नाही?“ कृष्णंभटाने यजमानाला नरसी मेहत्याचा होकार कळवला. सावकार खट्टू झाला. पण करणार काय!

नरसी मेहत्याला परिस्थितीचे आचके लागत नव्हते. पण तिकडे द्वारकेत कृष्णाला मात्र उचकी लागली. त्याच्या लक्षात आले. त्याने रुक्मिणी सत्यभामेला बोलावून नरसीच्या मुलाच्या लग्नाच्या तयारी करण्यास सांगितले. तसेच त्याने आपल्या नामांकित भक्तांना पाचारण करण्यास सुरुवात केली. उद्धव अक्रूर तुंबर। शुक वाल्मिकी प्रल्हाद थोर।भीष्म बिभीषण आणि विदुर ।मारुति सत्वर पाचारिला।। इतकेच काय आपला मित्र सुदामा आणि लहानपणीचा सवंगडी पेंद्यालाही बोलावले. स्वत: पुन्हा आत जाऊन सत्यभामा रुक्मिणीला वऱ्डाड मंडळी जमली आहेत. नरसी मेहता श्यामापुराच्या सीमेत पोचण्यापूर्वीच आपण सर्वांनी पोचले पाहिजे असे बजावले.

नरसी मेहत्याच्या मुलाचे वऱ्हाड द्वारकेतून, स्वर्गलोकींच्या पाहुण्यासह निघाले. त्वरित श्यामापुराच्या सीमेपाशी आले. सर्वांनी अर्थातच आपली रूपे बदलली होती. पण तेज आणि सौदर्याची, ज्ञानाची आणि सौहार्दाची झळाळी कशी लपवता येणार.

विश्वकर्म्याने मंडप बांधण्यास घेतला. त्याची सजावटही वैभवशाली केली. ऋतुपर्ण राजाने सुगंधी वनस्पती, हिरवी पाने व सुगंधी फुलांची आरास झटक्यात केली. सजवलेले हत्ती घोडे मेणे पालख्यांची गणना नव्हती! सर्व वऱ्हाड्यांची वस्त्रे अलंकार भूषणे डोळे दिपवणारी होती. सीमंत पूजनाचा हा थाट पाहून गावकरी सावकाराला हे अदभुत सांगू लागले. इकडे नरसी मेहता आपल्या वैष्णव भक्तांसह हरिगुण संकीर्तन करत आला.नरसी मेहत्याची बायको मेण्यातून आली.ती दागिन्यांनी मढली होती.

त्रिपुरांतक सावकार आपला थाट दाखवत येऊ लागला. आपले दोन वाजंत्र्याचे जोड, आपल्यापरीने उंची वस्त्रे ल्यालेली दागदागिने घातलेली मुलीकडच्या मंडळीसह तो आला. पण नरसीचे वैभव पाहून लाजल्याहून लाजल्यासारखे झाला. स्वत: कृष्णाने सर्वांचे स्वागत केले. त्याची सारखी धावपळ चालू होती. समारंभ आटोपल्यावर रंभा उर्वशी तिलोत्तमा ह्यांचे नृत्य गायन झाले.

दुसरा दिवस तर प्रत्यक्ष लग्नाचा! कवि वाल्मिकीने केलेली मंगलाष्टके यक्ष गंधर्व गाऊ लागले. त्यांना संगीताची साथ स्वत: नारद आणि तुंबर करत होते. लग्नातील स्वैपाकासाठी स्वत: अन्नपूर्णा हजर होती.द्रव्याच्या, वस्त्रांच्या आहेरावर देखरेख कुबेर करत होता. तर सवाष्णींना खणा नारळाच्या ओट्या रुक्मिणी जांबवती सत्यभामा, मित्रविंदा,याज्ञजिती, लक्ष्मणा,भद्रावती ह्या कृष्णाच्या अंत:पुरांतील स्त्रिया भरत होत्या! आणि ह्या सगळ्यांत सुसुत्रता, कुणाला काय हवे नको ते स्वत: ‘नारायण’ करत होता. अखेर झाल धरण्याच्या वेळी त्रिपुरांतक सावकाराने त्याची ओळख विचारली तेव्हा “ मी नरसी मेहत्याच्या पेढीचा, द्वारकेचा गुमास्ता, सावळाराम .” असे तो जगज्जेठी म्हणाला.

नरसीच्या मुलाचा लग्नसोहळा पाहायलाच नव्हे तर वऱ्हाडी म्हणून आलेली स्वर्गलोकीची सर्व मंडळी जुनागडला आली. आणि नरसीच्या गुमास्त्याचा निरोप घेऊन अंतर्धान पावली. कृष्ण परत निघताना नरसीला येव्हढेच म्हणाला,” नरसी काहीही अडचण आली तर माझी आठवण कर. मी तुला विसरत नाहीस. आणि तुही मला! “
नरसी ह्यावर काय बोलणार? हे अदभुत अघटित पाहून डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहात असता तो इतकेच म्हणाला असेल,” हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।

सदाशिव पं. कामतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *