आई : तुमची आमची आई

रेडवूड सिटी

आई हा शब्द नाही, हाक आहे.
स्वरव्यंजनांनी शब्द होतात
आई मात्र होत नाही
शब्दांत ती मावत नाही.
कोणीतीही भाषा,असो लिपी
आई कधी लिहिता येत नाही.

आई कधी काही सांगत नाही
सदैव मात्र पाहात असते.
डोळ्यांनी तुम्ही आम्ही पाहात असतो
आई हृदयाने पाहात असते.
डोक्यांत जळमटे आमच्या विचारांची
आईच्या डोक्यात एकच असतो
मुलाबाळांचाच तो सतत असतो.

मागितलेले द्यावेसे असेल तर हो म्हणते
नसेल तसले तर नाही म्हणते
फार तर बघू म्हणते.
लाड जमेल तेव्हढेच करते
शाळेत मात्र ओढत नेते.
झालो पास,डोक्यावर हात फिरवते
प्रगति पुस्तक मागत नसते
पुढे केले सही साठी की
लिहिताी वाचती असूनही
‘त्यांच्याकडे’ बोट करते.

ती रागावली तरी ते आठवत नाही
रागावली ते समजतही नाही.
आई शब्दही नाही, हाक ती एक असते
दिली नाही तरी तिला ती ऐकू येते.

माया-ममता लाड-कौतुक वत्सल-प्रेम
आणखीही अनेक चिकटवले तिला
पण सहन सोशिकता हे सोबती कायमचे.
घरातील असो चाळीतली, फ्लॅटमधली वा टपरीतली
असो झोपडीतली शिवारातली, पुलाखालची
कि नाक्यावरची,परीक्षा रोज तिला द्यावी लागते.
तोंडी परीक्षा देतच नाही, माहिती उत्तरही देत नाही
तसेही रोजचे बोलणे मोजकेच असते.
लेखी परीक्षा रोजच असते, वेळेपूर्वी पेपर देते,
पोळपाटावरती लिहित असते
तव्यावरती टाकत असते
ताटांमध्ये वाढत असते
गेल्यावर सगळे, एकटी ती जेवत असते.

दुपारची डुलकी झाली; येतील आता सगळे म्हणत
चिवडा चुरमुऱ्यांचा करावयाला घेते.
नाही राग, लोभ नाही, इतकी ती संतही नसते
सोसणे अति होता नशीबालाच ती दोष देते.
पदराने तोंड पुसत किंचित ताठ होत
कामात पुन्हा गुंतुन घेते.

शिका चांगले, व्हा मोठे, आनंदात राहा
इतकेच ती म्हणत असते,मागणे तिचे लई नसते.
विचार मुलांचेच असतात तिच्या मनात
श्वासनिश्वासही त्यांच्यासाठीच तिचे असतात.
आई शब्दही नाही, ती एक हाक असते
दिली नाही तरी ती ऐकत असते !

सदाशिव पं. कामतकर
२६एप्रिल २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *