रेडवुड सिटी
चार चौघांसारखीच ही माणसे आहेत. त्यांच्या गोष्टीही तशाच असणार. ह्या गोष्टी वाचल्यावर, माणसाचे विचार, अनुभव, घटना, मते, मुलाबाळांचे हित, समाजाची प्रकृती-विकृती सगळीकडे सारखी आहे असे वाटते. साध्या माणसांच्या या साध्या गोष्टीत ‘आशय मोठा कितीआढळे’ असे वाटते की, ह्या अगदी साध्या सरधोपट आहेत अशा निष्कर्षाकडे आपण येतो हे प्रत्येक वाचकाच्या मतानुसारच असणार हे तर स्पष्ट आहे. अनेक कथा कविता लेख पुस्तके यानांही हा नियम लागू असतो.
ब्रॅंडन स्टॅटनला ही माणसे न्यूयाॅर्कमध्ये भेटली म्हणण्यापेक्षा त्याला ती सहज तिथे दिसली. तो त्यांच्याशी बोलला. त्याने त्यांना कॅमेऱ्यावर टिपूनही ठेवले. त्याचे त्याने त्या फोटोंसह पुस्तक केले. पुस्तकात त्याने विचारलेले एक दोन प्रश्न असतील. काही फोटोंची तळटीप, शीर्षकीय वाक्य त्याचे असेल. बाकी सर्व ह्या माणसांचे.
ही सर्व मते, विचार, अनुभव यांना कथा म्हणता येतील का हीसुद्धा एक शंका आहेच. पण पुस्तक कर्त्याने यांना कथा म्हटल्यामुळे मीही गोष्टी म्हटले. ंछायाचित्रवृत्तकथांमध्ये हा प्रकार येईल असे मला वाटते.
शब्दार्थानेही ह्या खऱ्या लघुकथा आहेत. काही तर अति लघुकथा आहेत.
ब्रॅंडन स्टॅंटन हा जाॅर्जिया विद्यापीठाचा (UGA) पदवीधर आहे. मॅरिएटामध्ये याचा जन्म झाला आहे. त्याचा एक photo journalistic blogआहे. त्याचे १७ लाख ८००००followersआहेत! प्रख्यात Time मासिकाच्या 30 under 30 अशा व्यक्ति ज्यांच्यामुळे जगात बदल होईल त्यांत त्याची निवड झाली आहे. त्याचे Humans of NewYork हे पुस्तक तडाखेबंद विक्रीच्या १० पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. त्याच पुस्तकासंबंधी मी लिहितो आहे.
ब्रॅंडन स्टॅटन हा आपल्या मॅरिएटाचा आहे म्हटल्यावर मला जास्त जवळचा वाटला. लायब्ररीत पुस्तक दिसले. त्यातून हे सर्व लेखन घडले.
ही माझी प्रस्तावना झाली. १३ आॅक्टोबर २०१६ साली मी लिहिलेल्या, साध्या माणसांच्या या काही साध्या गोष्टी आपण आता, वाचू या.