माणसांच्या गोष्टी – ३

रेडवुड सिटी

“मी गियानाचा. माझे वडील मोटर सायकलवरून भरधाव चालले असताना ते फेकले गेले. त्या अपघातात ते वारले.”

” तुझ्या वडिलांची न विसरता येणारी एखादी आठवण सांगशील का “

“माझे वडिल सुतारकाम करायचे. आमचं गाव लहान. काम मिळवण्यासाठी ते रोज शेजारच्या गावी जायचे. त्यासाठी ते बोटीतून जायचे. पण आमच्या गावची Essequibo नदी मोठी लहरी आणि तितकीच बेभरवशाची होती. जेव्हा माझे बाबा परतायचे त्यावेळी मी संध्याकाळी नदीवर जायचो. नदी ठीक असेल तेव्हा बोट काठाला लागायची. पण बरेच वेळा बोट किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नसे. त्यावेळी बोट पात्रात थांबायची. सर्व  लोक बोटीत थांबायचे. मी काठावर वाट पाहात बसलेला असे. दुरून बाबांना मी दिसलो की ते कसलाही विचार न करता सरळ नदीत उडी घ्यायचे. लाटांशी दोन हात करत, पोहत पोहत ते माझ्यासाठी यायचे! पाण्याने निथळत असलेले बाबा मला घेऊन घरी येत. माझ्या लहानपणी बाबा असे बरेच वेळा मी काठावर त्यांची वाट पाहताना दिसलो की  जीव धोक्यात घालून पोहत पोहत यायचे!  कसा विसरेन मी बाबांना?”

  • मोठ्या इमारती समोरील, उत्तम गणवेशातला रखवालदार किंवा द्वारपाल

——————————–                                                  

अमेरिकेत दोन पुस्तके आहेत. एक गरीबांचे आणि दुसरे श्रीमंतांचे. गरीबाच्या हातून गुन्हा झाला की त्याला २०वर्षांची सजा. आणि तोच गुन्हा श्रीमंताने केला की त्याला फक्त ताकीद द्यायची. तो मोकळा.”

“ते म्हणतात की कसले गरीब हो! ‘कामं करायला नकोत ह्यांना. वर पुन्हा सगळं ‘ चकट फु पाहिजे’ हे बघा मी लहानपणी शेतात कापूस वेचायचो. तेरा वर्षाचा होईपर्यंत वेचला. मग अॅलाबामा सोडले. न्युयाॅर्कच्या रस्त्यावर शिक्षण सुरु झाले. आजतागायत लांब लांब पल्याच्या ट्रक चालवल्या. त्त्यावर पोट भरत होतो. एकदाही कुठलीही सवलत मागितली नाही आणि घेतलीही नाही. माझी चारी मुले काॅलेजमध्ये शिकताहेत.”

” ते म्हणतात,” की हे गरीब कोपऱ्यावर, कुठे जरा आडोसा दिसला, बंद मार्केटच्या पायऱ्यांवर हातात बियरची बाटली आणि तोंडात सिग्रेटचं थोटुक घेऊन बसले असतात. ही माझी पिशवी. बघा, तुम्हीच बघा काय आहे तिच्यात ते. दोन तीन चिजा दिसतील. हे पहा, पेप्सीची बाटली आणि  हे ड्रेनेक्सचं पाकिट. घरातली मोरी तुंबलीय नां! त्यासाठी.”

“पण मी कितीही सरळमार्गी असलो, कोणताही कायदा न मोडता राहिलो तरीही मला गरीबाच्या पुस्तकाचाच न्याय लागू होणार.”

  • दोन कृष्णवर्णीय म्हातारे आपल्या घराच्या पायऱ्यांवर बसलेले.

——————————

” तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव कुणाचा आहे? ”

माझ्या आईचा. मी जन्मलो तेव्हा ती अठरा वर्षाची होती. मी एक वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडलानी, आईला आणि मला टाकून दिले! वडिल नसलेल्या मुलांना अनेक आया स्व:च्या बळावर एकट्याच सांभाळतात तसेच माझ्या आईनेही मला वाढवले. तिला फार कष्ट करावे लागले. पण त्यातच तिने शाळा काॅलेज पूर्ण केले. किती धडपड किती धावपळ व्हायची तिची. पण तिची ही धावपळ मेहनत पाहून माझाही आत्मविश्वास वाढला. मीही काही करू शकेन याची माझी मलाच खात्री पटू लागली.”

” होता होता तिने Ph.D ही मिळवली! दहा वर्षे लागली त्यासाठी पण तिच्या मेहनतीचे सार्थक झाले. त्यावेळी त्यात  ती कशी भरडली जात होती तेही मी पाहिले आहे.”

” मी जसा मोठा झालो तसे मला जाणवू लागले माझी आई माझ्यापेक्षा वेगळी नाही. तिलाही माझ्यासारखीच प्रथम धाकधूक होती. मला जसे दडपण आल्यासारखे वाटायचे तसेच तिलाही सुरवातीला यायचे. आपण करतोय ते आपल्या हातून बरोबर होईल ना, होतेय ना ही काळजी तिलाही वाटायची. तसेच तिने सर्व प्रतिकूलतेवर मात केली हे पाहताना मला केव्हढा आनंद व्हायचा! एकदम ऊभारी येते आजही त्यामुळे. ह्या सगळ्याचा अर्थ हाच की मी सुद्धा कोणत्याही परिस्थितीवर तिच्यासारखाच मात करेन ह्याची मला खात्री वाटते आता.”

  • बराक ओबामा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *