ह्याच वेळी ह्याच ठिकाणी … वीस वर्षानंतर !

रेडवूड सिटी
रात्रीची गस्त घालत पोलीस चालला होता. रस्त्यावर तुरळकही रहदारी नव्हती. एखादा माणूस आपल्या लांब कोटाची कॉलर वर करून टोपी सावरत भरभर जात होता. पण त्याचेही लक्ष त्या पोलिसांकडे हमखास जात असे. कारण त्याची चालण्याची ढब. कुणावर छाप पाडण्यासाठी तो तसे मुद्दाम चालत नसे. त्याची ती शैली होती. हो भाषेसारखीच चालण्याचीही शैली असते. कुणीही दोन वेळा वळून पाहील असेच तो पोलीस चालत असे.

तो भाग मुळात शांत. तिथली दुकानेही लवकर बंद होत. वस्तीही ‘लवकर निजे… ‘ अशीच होती. दुकानाच्या कुलपाकडे बारकाईने पहात, एखादे ओढून पाहत,आपला दंडुका हलवत तो जात होता. सगळे काही आलबेल वाटले तरी केव्हा काय होईल ते सांगता येत नसते हे पोलिसांना माहित असते.

अजून रात्रीचे दहासुद्धा वाजले नव्हते. पण थंडी आणि गार बोचरे वारे. त्या वाऱ्यात पाऊस मिसळलेला ! कोण बाहेर पडणार अशा वातावरणात? ऑफिसांचे, दुकानाचे दरवाजे पाहत, आपला दंडुका निरनिराळ्या तऱ्हेने फिरवत, आजूबाजूला आपली पोलिसी नजर टाकत तो गावाच्या शांततेचा रक्षक गस्त घालत होता. पुढच्या चौकात थोडे आत गेल्यावर पोलिस एकदम हळू हळू जाऊ लागला. एका दुकानापाशी कुणीतरी हातात सिगारेट घेऊन उभा असल्याचे दिसले.

पोलीस येतो आहे हे पाहून आपणहून तो माणूस म्हणाला,” हवालदार, काही नाही. सगळे ठीक आहे. मी माझ्या मित्राची वाट पाहत थांबलोय.” आमची ही भेट वीस वर्षांपूर्वीच ठरलेली आहे. विश्वास बसत नाही ना? तुम्हाला वेळ असला आणि कंटाळवाणे होणार नसेल तर सांगतो हां ! ” तो माणूस उत्साहाने आपणहून पोलिसाला सांगत होता. पोलिसाने मान हलवलेली पाहून तो सांगू लागला,” मुद्याशीच येतो. वीस वर्षांपूर्वी या जागेत एक रेस्टॉरंट होते. ‘ बिग जो ‘ ब्रॅडीचे म्हणून ओळखले जायचे.”

“आता अलीकडे पाच वर्षापर्यंत होते ते !” पोलिसाने माहितीत भर घातली. इतका वेळ हातात तशीच धरलेली सिगारेट त्या माणसाने काडीने पेटवली. त्या प्रकाशात त्याचा चौकोनी वाटावा असा चेहरा दिसला. उजव्या भुवईवर जखमेची खूणही दिसत होती. पण टायच्या पिनवर हिरा चमकत होता. ” आजच्या रात्री बरॊबर वीस वर्षांपूर्वी मी आणि जिम्मी या इथेच ‘ बिग जो ‘ ब्रॅडीच्या हॉटेलात जेवत होतो. जिम्मी माझा खास दोस्त. माझा एकमेव मित्र म्हणा ना! आम्ही दोघे इथे न्यूयॉर्कमध्येच लहानाचे मोठे झालो. लोक आम्हा दोघांना भाऊच समजत. इतके आम्ही नेहमी एकत्र, बरोबर असू. मी वीस आणि जिम्मी अठरा वर्षाचा असेल. दुसरे दिवशी सकाळी मी पश्चिमेला माझे भाग्य काढण्यासाठी जाणार होतो. जिम्मीलाहि माझ्याबरोबर चल; आपण दोघे मिळून जाऊ असे किती वेळा म्हणत होतो. पण तो काही न्यूयॉर्क सोडायला तयार नव्हता. “मी इथेच ठीक आहे. मला इथेच बरे वाटते. मी काही न्यूयॉर्क सोडून तिकडे कॅलिफोर्निया,टेक्सासला काही येणार नाही.तो ठामपणे म्हणायचा.” “शेवटी मी एकट्याने जायचे ठरवले.

” जिम्मीला सोडून जाताना फार वाईट वाटले. आम्ही त्याच वेळी ठरवले, बरोबर वीस वर्षांनी ह्याच ठिकाणी ह्याच दिवशी रात्री दहाला इथेच भेटायचे. मग आम्ही कुठेही असलो, तरी नक्की भेटायचे. वीस वर्षांत आमच्या दोघांचेही थोडे तरी भाग्य उजळले असणार. भाग्याचे जाऊ दे पण भेटायचे हे मात्र नक्की झाले.”

” मी काहीतरी फार निराळे, वेगळे ऐकतोय असे वाटतेय हो. पण वीस वर्षे हा खूपच मोठा काळ झाला, नाही का? मध्यंतरीच्या काळात तुमचा दोघांचा काही संबंध नाही आला? ” पोलिसाने विचारले. पोलिसही यात रंगलाय हे दिसत होते. ” पहिली दोन तीन वर्षे आमचा पत्रव्यवहार असायचा. पण हळू हळू कमी होत बंद झाला. अहो,अमेरिकेचा पश्चिमेचा भाग म्हणजे मोठं प्रकरण आहे. आणि माझी इकडे तिकडे धावपळ चालली होती. माझे बऱ्यापैकी चालले होते. तो हातवारे करून बोलत असता त्याच्या बोटातली हिऱ्याची अंगठीही चमकत होती. मला माहित होते कि काही झाले तरी माझी आणि जिम्मीची भेट होणारच. कारण तो दिल्या शब्दाचा पक्का आहे. तो मला विसरणार नाही. मला खात्री आहे त्याची. तेव्हढ्यासाठीच माझ्या जिवलग दोस्तांला भेटायला दोन हजार मैलांवरून मी आलोय.” बोलता बोलता त्या गृहस्थाने किती वाजले पाहायला खिशातून घड्याळ काढले. त्याची साखळीही सोन्याची होती. “दहाला तीन मिनिटं आहेत., आम्ही इथून त्यावेळी दहाच्या ठोक्याला निरोप घेतला होता.” तो माणूस सांगतच होता.

” तुमचे चांगले चाललेले दिसतेय, हो ना ?” पोलिसाने अंगठी घड्याळ हिरा पाहून अंदाज बांधला होता. “हो खरंय !. जिम्मीचेही चांगले चालले असणार. तो फार धडपड करणारा नाही. धीराने, बेताबेताने तो पुढे जातो हे मला माहित आहे. मला हुशार लोकांशी चढाओढ करावी लागते तिकडे.” तो माणूस म्हणाला.

पोलिसा आपला दंडुका त्याच्या स्टाईलमध्ये फिरवत म्हणाला, मी निघतो माझ्या गस्तीवर. तुमचा मित्र तुम्हाला लवकरच भेटो. पण तुम्ही दहा म्हणजे दहापर्यंतच त्याची वाट पाहणार का? “पोलिसाने जात जात विचारले. छे: छे: ! अहो इतक्या लांबून आलोय. जिम्मीसाठी मी आणखी अर्धा तास तरी वाट पाहेनच.” बराय हवालदारसाहेब ! तुमच्याशी बोलून मन मोकळ झालं माझं.” तो माणूस मनापासून पोलिसाला म्हणाला.

आता पाऊस वाढला होता. त्याबरोबर वाराही जोराचा वाहू लागला. पायी जाणारे दोघे तिघे तोंडावरचे पाणी पुसत, लांब कोटाची कॉलर गळ्याशी घट्ट धरत झपाझप जात होते. तो लांबून आलेला माणूस जिम्मी येतो का नाही याचा विचार करत सिगारेट पीत उभा होता. वीस एक मिनिटे होऊन गेली असतील. समोरून एक उंच माणूस थंडीच्या लांब कोटाची कॉलर कानापर्यंत ओढत घाईघाईने रस्ता ओलांडून थेट वाट पाहत असलेल्या माणसाकडे गेला.
“तू बॉबीचा ना? त्या माणसाने अंदाज घेत विचारले. “अरे , जिम्मी तू आलास का?” तो माणूस आनंदाने ओरडतच विचारू लागला !
“बरे झाले बाबा !” आलेला माणूसहि आनंदाने म्हणाला. तो पर्यंत दोघांनीही एकमेकांचे हात हातात घट्ट धरले होते!

“अरे तू बॉबच ! अरे वीस वर्षे म्हणजे केव्हढा मोठा काळ. ते जुने हॉटेल गेले. बॉब मला येताना सारखे वाटत होते,’ बिग जो ‘ चे हॉटेल आज असते तर आपण इथेच जेवलो असतो ! गेले ते हॉटेल! बॉब तुझे कसे काय चालले आहे तिकडे ?” “जिम्मी, अरे मला पाहिजे होते सर्व मला तिकडे मिळाले ! तू वीस वर्षात उंच झालास रे.” “हो, माझी उंची वीस वर्षाचा झालो तेव्हा वाढायला लागली.”
“काय म्हणतेय तुझे न्यूयॉर्क, जिम्मी ? ” त्या माणसाने विचारले.
” बरे चाललेय माझे. सरकारी खात्यात नोकरी मिळाली. मी खुश आहे. चल बॉब, पुढे माझ्या माहितीचे एक हॉटेल आहे तिकडे जेवू या .. झकास गप्पा मारू या, चल.” दोघेजण हातात हात घालून निघाले. टेक्सास कॅलिफोर्नियाचा माणूस आपली यशोगाथा दोस्ताला ऐकवत होता. दुसरा साधा, आपल्या मोठ्या कोटाच्या खिशात हात घालून ऐकत होता. कोपऱ्यावर एक मोठे दुकान लागले. त्या दुकानाच्या झगझगाटात ते दोघे आले. तेव्हा दोघे एकमेकाकडे पाहू लागले. हजारो मैलावरून आलेला माणूस एकदम थांबला आणि झटक्यात आपला हात काढून घेत म्हणाला,” तू जिम्मी नाहीस ! वीष वर्षे म्हणजे खूप झाली हे खरे पण सरळ, टोकदार नाकाचे अचानक नकटे नाक कधीही होत नाही.” तो माणूस जवळ जवळ ओरडतच म्हणाला. “खरंय, पण एक चांगला माणूस गुन्हेगार होऊ शकतो वीस वर्षात.” नुकताच आलेला दुसरा माणूस त्याला म्हणाला.

” तू आमच्या अटकेत आहेस, “सिल्कि” बॉब ! शिकागो पोलिसांकडून संदेश आलाय कि तू इथेच आहेस. शांतपणे येणार का बेड्या घालूनच नेऊ?” पण तुला पोलीस स्टेशनवर नेण्याआधी तुला ही चिट्ठी द्यायला मला सांगितले आहे. तू इथेच वाच. पोलीसमन वेल्सने ती लिहिली आहे .”

‘सिल्की’बॉबने चिठ्ठी उघडून वाचायला घेतली. सुरवातीला तो स्थिर होता. पण तो पुढे वाचू लागला तसा त्याचा हात कापू लागला. चिठ्ठी लहान होती. तिच्यात लिहिले होते :
“बॉब,आपण वीस वर्षांपूर्वी ठरवलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणीच मी होतो. तू जेव्हा सिगारेट पेटवण्यासाठी काडी पेटवलीस त्यावेळी मला तुझा चेहरा दिसला ! शिकागो पोलिसांना तूच हवा होतास. पण तुला अटक करण्याचे धैर्य मला होईना. म्हणून मी निघून गेलो. साध्या वेषातल्या पोलिसावर हे काम सोपवले.”

— जिम्मी

 

O’Henri च्या After Twenty Years या कथेचे स्वैर भाषांतर.

4 thoughts on “ह्याच वेळी ह्याच ठिकाणी … वीस वर्षानंतर !

  1. Mrunmayee Kulkarni

    Wow! one of the best twist in tale so far of the O’Henry after “The gift of Magi”!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *