अप्रूप

आमचे पहिले घर टेकड्यांमध्ये होते. अनेक घरे टेकड्यांवर होती. काही खोलगट भागात होती. टेकड्या झाडावृक्षांनी नटलेल्या तसेच खोलगट भागही वृक्षराजींने भरलेला असायचा. त्यामुळे घरांची संख्या कमी होती असे नाही. किंवा घरे लहान किंवा आलिशान महाल होते असेही नव्हते. सर्व प्रकारची घरे होती. कौलारू होती. उतरत्या साध्या पत्र्यांची होती. सिमेंटची होती. तांबड्या विटाची होती. पांढरी होती. पिवळी होती. निळसर होती. विटकरी होती. काचेच्या खिडक्यांची होती. लाकडी दरवाजांची होती. काही अतिशय देखणी होती. बरीचशी चारचौघींसारखी होती. काही दहा जणांत उठून दिसणारी होती. तर काही दोन-चार असामान्यही होती. पण सगळी झाडां झुडपांचे अभ्रे घातलेली असल्यामुळे हे टेकड्यांवरचे,टेकड्यांमधले गाव दिवसाही पाहात राहावे असे होते. त्यातच निरनिराळ्या ऋतुत फुलणारी विविध फुले अनेक रंग भरून टाकीत! रंगीत फुले गावची शोभा दुप्पट करत!
रात्री तर गाव घराघरांतल्या लहान मोठ्या दिव्यांनी, त्यांच्या सौम्य ,भडक, मंद प्रकाशांच्या मिश्रणाने स्वर्गीय सौदर्याने खुलत जायचे! काही रात्री तर गावाच्या ह्या सौदर्यापुढे आपण फिके पडू ह्या भीतीने चंद्र -चांदण्या,तारे ढगांच्या आड लपून राहत!


गॅलरीत उभे राहिले की ‘आकाशात फुले धरेवरि फुले’ त्याप्रमाणे आकाशात चंद्र तारे नक्षत्रे व समोर, खाली, सभोवतालीही,तारे, नक्षत्रे ह्यांचा खच पडलेला दिसे! आकाशातून दुधासारखे चांदणे खाली येऊन टेकड्यांवरच्या गावातील निळसर दुधाळ प्रकाशात सहज मिसळून पसरत असे. हात नुसते पुढे केले की चंद्राच्या गालावरून हळुवारपणे सहज फिरवता येत असे. तर मूठभर चांदण्यांची फुले गोळा करून ओंजळ भरून जात असे! आपल्या प्रेयसीला ओळी ओळीतून चंद्र आणून देणारे, येता जाता तारे-नक्षत्रे तोडून तिच्या केसांत घालणारे जगातले सर्व कवि इथेच राहात असावेत. किंवा एकदा तरी इथे राहून गेले असावेत! इतके अप्रूप असे आमचे गाव होते.

आज पंधरा वर्षांनी पुन्हा त्याच गावात राहायला आलो.थोडे काही बदल झाले असणारच. पण गाव आजही बरेचसे पूर्वीप्रमाणेच होते. मोठ्या उत्सुकतेने मी रात्री गॅलरीत गेलो. सगळीकडे नजर फिरवत पाहिले. आनंद झाला. पण मन पहिल्यासारखे उचंबळून आले नाही. काही वर्षे रोज पाहिले असल्याने, मधली वर्षे ह्या गावाच्या फार दुर राहात नसल्यामुळेही सवय झालेली असावी. सवय, संवेदना बोथट करते. त्याहीपेक्षा सवय, उत्कटता घालवते ह्याचे जास्त वाईट वाटते!


हे लघुनिबंधाचे गाव राहू द्या. ह्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गावापेक्षा साठ पासष्ठ वर्षांपूर्वीच्या गावात जाऊ या.

नव्या पेठेतल्या दुकानांच्या, व्यवसाय आणि लोकांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर मोकळे मोकळे वाटते. नविन वस्ती सुरु झाली हे सांगणाऱ्या उंबरठ्यावर आपण येतो. थोडा त्रिकोणि थोड्या अर्धवर्तुळाकाराच्या चौकांत आपण येतो. आणि समोरचा बंगला पाहून हे हाॅटेल असेल असे वाटतही नाही. बरीच वर्षे ह्या हाॅटेलच्या नावानेच हा चौक ओळखला जात असे. लकीचा चौक किंवा लकी चौक!

लकी रेस्टाॅरंट अर्धगोलाकार होते. गोलाकार सुंदर खांबांनी जास्तच उठून दिसे. आत गेले की समोर चार पायऱ्या चढल्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या दोन दोन खांबांमध्ये लहानसे चौकोनी टेबल व समोरासमोर दोन खुर्च्या. इथे बसायला मिळाले की आगगाडीत,बसमध्ये खिडकीची जागा मिळाल्याचा आनंद होई.रस्त्यावरची गंमत पाहात बसायला ही फार सोयीची टेबले होती. मघाशी चारपायऱ्या चढून आल्याचा उल्लेख केला. तिथल्या दोन गोलाकार खांबांवर मधुमालती होत्या. आमच्या गावात मधुमालती बरीच प्रिय होती. वेल व तिची फुले!
ह्या व्हरांड्याच्या समोरची गोलाकार जागा,जाई जुईच्या वेलांच्या मांडवांनी बहरलेली असायची. त्यांचेही आपोआप चौकोन होऊन त्याखाली तिथेही गिऱ्हाईके बसत. ती जागा ‘प्रिमियम’च म्हणायची. कारण जवळच्या वेलींनी केलेल्या कुंपणातून रस्त्यावरचे दृश्य दिसायचे; शिवाय खाजगीपणही सांभाळले जायचे.


चार पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मालकांच्या गल्ल्याचे टेबल. मालकांचे नाव भानप. भानप अगदी जाडजूड नव्हते पण बऱ्यापैकी लठ्ठ होते. आखूड बाह्यांचा शर्ट घातलेला. काळ्या पांढऱ्या केसांचे राखाडी मिश्रण. त्यांचा सकाळी भांग पाडलेला असणार. पण दुपारपर्यंत हात फिरवून त्याच्या खुणा राहिलेल्या दिसत. ओठ जाडसर. सिगरेट प्याल्याने काळसर पडलेले. ते कधी कुणाशी गप्पा मारतांना दिसले नाहीत. मालक नेहमीच्या गिऱ्हाईकांशी सुद्धा ‘कसे काय’इतकेच बोलत. कारण बहुतेक सर्व गिऱ्हाईके नेहमीचीच. न कळत त्यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या.व्हऱ्हांड्याच्या दोन्ही बाजूच्या कोपऱ्यात एक एक फॅमिली रूम होती. पासष्ट वर्षांपूर्वी हाॅटेलातली फॅमिली रूम वर्दळीची नव्हती. काॅलेजमधली मुले मुलीही ते धाडस करत नसत. असा माझा समज आहे.


वऱ्हांड्यातील खांबांमधील टेबलांचे आकर्षण असण्याचे कारण म्हणजे रस्त्यावरच्या वर्दळीची गंमत पाहात चहाचे घुटके घ्यावे ह्यासारखे सुखकारी काही नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला बंदी नव्हती. पण जी पोरे लवकर सिगरेट प्यायला लागायची ती टोळक्याने जाईच्या मांडवाखाली बसून पीत. व्हरांड्यातील खांबामधल्या एका टेबलावर ठराविक खुर्चीवर आमच्या मावशीचे सासरे बसलेले असत. चहाचा कप समोर आणि करंगळी व तिसऱ्या बोटामध्ये विडी किंवा कधी सिगरेट धरून ते दमदार झुरके घेत बराच वेळ बसलेले असत. रोज. भानपही इतके नियमितपणे त्यांच्याच लकीत येत नसतील. अण्णा बसलेले असले की आम्हाला लकीत जाता येत नसे. कारण लगेच “हा हाॅटेलात जातो!” ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार व तो शिक्का कायमचा बसणार ही भीती! अर्थात काही दिवसांनी ही भीती मोडली तरी पण मावशीचे सासरे नसताना जाणेच आम्ही पसंत करत असू.

त्या वेळी बटाटे, फ्लाॅवर, मटार ह्या भाज्या मोठ्या विशेष असत. भाज्यांमधल्या ह्या खाशा स्वाऱ्या होत्या! काॅलीफ्लाॅवर व मटार थंडीच्या दिवसांतच मिळायचा. बटाटे त्या मानाने बरेच वेळा मिळत. पण बटाट्याची भाजी ही सणासुदीला व्हायची. विश्वास बसणार नाही पण लकीमध्ये बटाटा-भाजी हा वेगळा, स्वतंत्र पदार्थ होता! स्पेशल डिश म्हणा ना!


लकीने आमच्या दृष्टीने क्रांतीच केली होती. लकीची बटाट्याची भाजी केवळ बटाटा अप्रूप होता म्हणून नव्हे तर चवीनेही अप्रूप होती. मी लकीच्या मधल्या हाॅलमध्ये गोल टेबलाच्या खुर्चीवर बसून ती मागवत असे. किंचित लिंबू पिळलेले, एक दोन कढीलिंबाची पाने सहजरीत्या कुठेतरी तिरपी पडलेली. कोथिंबिरीची पाने त्यांना लाजून आणखीनच आकसून काही फोडींना बिलगून बसलेली, अंगावर एखादा दागिना हवा म्हणून एक दोन मोहरीचे मणि बटाट्यांच्या फोडींना नटवत.केशरी पिवळ्या तेलाचा ओघळ प्लेटचा एखादा कोन, भाजी ‘अधिक ती देखणी’ करायचा. साखरेचे एक दोन कण मधूनच चमकायचे. लकीतली बटाट्याची भाजी शब्दश: चवी चवीने खाण्यासारखी असायची.भाजी संपत येई तसे शेवटचे दोन घास घोळवून घोळवून खायचो! आता पुन्हा कधी खायला मिळेल ह्याची शाश्वती नसल्यासारखी ते दोन घास खात असे. नंतर कळले की मीच नाही तर जे जे लकीची बटाट्याची भाजी मागवत ते ह्याच भरल्या गळ्याने,भावनाविवश होऊन खात असत. प्रत्येक वेळी!


एकमेव ‘लकीचे’ वैशिष्ठ्य नसेल पण तिथे चकल्याही मिळत. कांड्या झालेल्या असत. पण चहा बरोबर ब्रेड बटर खाणाऱ्यांसारखेच चहा आणि लकीची खुसखुशीत चकली खाणारे त्याहून जास्त असत. तशाच शंकरपाळ्याही. घरच्या शंकरपाळ्यांच्या आकारात नसतील पण हल्ली बरेच वेळा घट्ट चौकोन मिळतात तशा नव्हत्या. चौकोन होते पण डालडाने घट्ट झालेले नसत.


घरीही सणासुदीला श्रीखंड,बासुंदी, पाकातल्या पुऱ्यांचा बेत असला की बटाट्याची भाजी व्हायचीच. तीही लकीच्याच नजाकतीची किंवा त्याहून जास्त चविष्ट असेल. मुख्य पक्वान्ना इतक्याच आदबीने व मानाने बटाट्याची भाजी वाढली जायची. तितक्याच आत्मीयतेने पुरी दुमडून ती खाल्लीही जायची. लगेच श्रीखंडाचा घास किंवा बासुंदीत बुडलेल्या पुरीचा घास. बटाट्याच्या भाजीचे अप्रुप इतके की लहान मुलगाही तिला नको म्हणत नसे की पानात टाकत नसे.


लकी चौक, सुभाष चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. बटाट्याची भाजी बारमाही झाली. सणासुदीचा वेगळेपणा तिला राहिला नाही. तिने दुसरी रूपेही घेतली. ती सार्वत्रिक झाली. चवीचेही वेगळेपण विसरून गेली. आजही सणवार होतात. सवयीने बटाट्याची भाजी त्या दिवशीही होते. सुंदर होत असेल पण दिसत नाही. चविष्टही असेल पण तशी ती जाणवत नाही. अप्रूपतेची उतरती भाजणी म्हणायचे!

आजही बटाट्याची भाजी आहे. पण लकी नाही. बटाट्याची भाजी दैनिक झाली. सवयीची झाली. अप्रूपता राहिली नाही.


अर्थशास्त्रातल्या घटत्या उपयोगितेचा किंवा उपभोक्ततेचा नियम आमच्या टेकडीवरच्या दाट वृक्षराजीत लपलेल्या, रात्री आकाशातून तारे चांदण्या ओंजळी भरभरून घ्याव्यात इतके ‘नभ खाली उतरु आले’ अशा स्वप्नवत गावाची अप्रूपता घटली तर बटाट्याच्या भाजीचीही अप्रुपता आळणी व्हावी ह्यात काय नवल!
हाच आयुष्यातील Law of Diminishing Joy असावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *