बेलमाॅन्ट
माझ्या आठवणीतील शाळेत शिकलेली व व्यवहारात असलेली वजने मापे, अंतर, मोजण्याची कोष्टके बरीच विसरलो आहे.काही चुकीचीही लक्षात असतील. पूर्वी छटाक, तोळा मासा,अदपाव, अशी बरीच मापे होती. आठवायचीच तर सोन्यापासूनच सुरुवात का नको?
सोने तोलायचे असेल तर गुंजा, मासा,व तोळा ही वजने वापरली जात.८ गुंजा= १ मासा ; १२ मासे = १ तोळा
तोळ्याच्या पुढचेही मोठे वजन असेल. पण ५-६ माशांच्या पुढे सोन्याची कल्पनाच नसल्यामुळे तोळा हेच शेवटचे वजन आमच्यासाठी होते. कित्येक कुटुंबांचा सोन्याचा संबंधही घरातल्या बहिणींच्या लग्नावेळीच येई.
प्रत्येकाला लग्ने काही काव्यात्मक गोष्टींनी लक्षात राहतात. पण काही गद्य भागही लक्षात राहण्यासारखा असतो. त्यातील सगळ्यांत मोठा गद्य पण नाट्यमय भाग म्हणजे लग्नाच्या ‘याद्या’! याद्या करताना दोन्ही बाजूंचे -मुला-मुलीचे- वडील काका मामा किंवा अगोदर झालेले व्याही व असलाच तर घरोब्यातील मित्र. पण मित्र किंवा शेजारी फार क्वचितच असत. शेजारी येतच नसत. कारण नंतर त्यांना उखाळ्या पाखाळ्या काढायला वाव राहात नाही !
राजकीय, परराष्ट्रांच्या किंवा मालक आणि कामगार नेते किंवा उद्योगातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या वाटाघाटीत जशी मुरब्बी बेरकी लोक असतात तशी लग्नाच्या याद्यांच्या वेळीही दोन्ही बाजूंकडे असे एक दोघे असत.
सुरुवात कोणी करायची व तोंड कुणी, केव्हा,कोणाला कोणत्या बाबतीत, द्यायचे ह्याची रंगीत तालीम, दोन्ही कडचे नानुकाका, आबामामा, गुंडोअप्पा, धोंडोपंत अशी वाकबगार उस्ताद मंडळी, करून आली असत. सगळ्यात खणाखणी सुरु व्हायची जेव्हा मानापानाच्या बाबतीत व हुंडा (रोख) व दागिने किती तोळ्यांचे ह्या मागण्यांचा तिढा सोडवायच्या वेळी होत असे. आवाज चढलेले असत, सभात्यागाच्या नाटकांतील प्रवेश दोन्ही बाजूंकडून होत. मध्येच दोन्ही कडचे प्रमुख वाटाघाटीवाले आणि मुलाचे व मुलीचे वडील आपापल्या विंगेत जाऊन कितपत ताणायचे,कशात किती ढील द्यायची हे ठरवून पुन्हा रंगभूमीवर प्रकट व्हायचे.
त्यातही नाट्य वाढवण्यासाठी कुठल्या तरी एका बाजूच्या मागच्या खोलीतून खाणाखुणांतून बोलावले जायचे! त्यावेळी दोन्ही बाजूच्या आया, लेकाच्या किंवा लेकीच्या सुखासाठी, “आता हे स्थळ तरी हातचे जाऊ देऊ नका!” अशी भरल्या गळ्याने सुचवले जात असायचे. पण दोन्ही कडची पुरुष मंडळी रस्सीखेच, कुस्तीचे डावपेच, रबर किती ताणायचे त्याची लांबी व वेळ हे सगळे कोळून प्यालेले असत. मग कुठल्या तरी सामान्य बाबीत देवाण घेवाण व्हायची. मध्ये पुन्हा चहा यायचा. त्यामुळे पुन्हा तरतरीत होऊन आवाज वाढू लागत.
अखेर किती तोळ्यांचे दागिने, मुला-मुलीचा पोशाख कुणी व काय काय आणि किती म्हणजे शालू कोण घेणार व वरमाईला किती भारी किंमतीचे किंवा पद्धतीचे लुगडे,शाल ह्याची चर्चा. कुणा कुणाचे मानपान कसे करायचे ह्याचीही तपशीलवार बोलणी व्हायची. मग मुलाकडची किती माणसे आदल्या दिवशी व लग्नाच्या दिवशी किती ह्यावर चकमकी झडून एकदा ‘याद्या ‘ नावांचे प्रकरण संपायचे.
याद्या म्हणजे एकप्रकारचा करारनामा किंवा तपशीलवार मान्य कलमे किंवा मिनिटस् म्हणायची. तोंडीपेक्षा लेखी बरे हेच खरे!
याद्यांच्या हातखंडा खेळात नवऱ्या मुलीच्या बापाची स्थिती केविलवाणी व्हायची.; किंवा तशी दाखवलीही जात असावी. परंपरेने चेहरा कीव करावी असा व अंग चोरून बसल्यासारखे बसायचे असल्यामुळे असे होत असेलही. पण वरपक्षाकडील किती माणसे, किती पंगती कोणत्या दिवसापासून आणि मानापानाचे कापड चोपड, सोने किती, हुंड्याची रक्कम ही कलमे आली की मग मुलीचा बाप कितीही तालेवार, ऐपतदार असला तरी याद्यांच्या दिवशी त्याला हाच गरीब कोकराचा अभिनय करत बसावे लागे!
सीमांत पूजन व लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडील किती माणसे येणार, यावीत ही चर्चा चालली असतांना आणि किती तोळे सोने द्यायचे ही निर्णायक खणाखणी चालू असताना, प्रत्येक वेळी मुलीच्या बापाचे प्राण कंठाशी येत. आवंढे गिळून नंतर नंतर तर गिळण्यासाठी आवंढाही शिल्लक नसे.
काही अनुभवी सांगतात की रुखवताची कोणती भांडी किती, आणि त्यातली चांदीची किती, ह्यावरही रंगात आलेल्या याद्यांचे प्रयोग मध्येच पडदा पाडून थांबवावे लागत! बरे, त्यावेळी रुखवत ही सजावटीची गोष्ट नसे. नाहीतर ठेवला तांबड्या लाईफबाॅय साबणाचा गॅस सिलिंडर किंवा पेनिसिलिन इंजेक्शनच्या व्हायल्सचा ‘असावा सुंदर’ बंगला की झाले रुखवत ! ह्यांचा काळ अजून पाच सहा वर्षानंतर उदयाला येणार होता! पण ह्यावरही काही लग्नाच्या रुखवतात पितळेच्या भांड्यांना चांदीचा मुलामा देऊन चांदीची म्हणून वरपक्षालाही चकवणारे वधूपक्ष होतेच!
लग्नाच्या ‘याद्यां’पासून सुरु असलेले हे युद्ध संपले असे समजू नका. सीमंत पुजनाच्या रात्रीच,लग्नाच्या दिवशीच्या कावेबाज लढाईची सुरुवात होत असे. दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांची ओळख करून देण्याचा एक कौटुंबिक सोहळा असे. मुलाच्या मामाशी मुलीच्या मामाची, काका-काकांची अशा भेटी सुरू होत. त्यात वधूकडची मंडळी खवचट असली तर तांत्रिक दृष्ट्या अगदी बरोबर असलेला नेमका पोरसवदा मामा मुलाकडच्या मामूमियाॅं शोभेल अशा मामाला भेटवत. वरमंडळी आतून जळफळत पण उद्याचा दिवस आपलाच आहे अशी स्वत:ची समजूत घालत त्या पोरवयाच्या मामाच्या पाठीवर मामूमियाॅं ‘कौतुकाने’जोरदार थाप मारत! तो मामा डोळे पुसत मागे यायचा!
सीमंत पूजनाच्या दिवशी मुलीच्या बापाला घरच्या गनिमांशीही लढावे लागे. ‘ज्येष्ठ जावयांची पुजा’ हा सत्काराचा प्रसंग असे. पण गनिम, लग्नाची तारीख ठरल्यापासूनच आपल्या घरांत,” आम्हाला हजार बाराशेत गुंडाळले आणि आज? कुठून आले एकदम इतके? सोन्याच्या दागिन्यात दोन ‘गिलिटाचे खोटेही घुसडले तुम्ही!” असे म्हणत ज्वालामुखी धुमसत!
यानंतर मग नव्या जावयाची पूजा. त्याला याद्यांबरहुकुम द्यायचा पोशाख,ठरली असो नसो पण मुलीची आई जावयाचे कौतुक करते हे सिद्ध करणारी अंगठी देणे व्हायचे. ठिणगी पडली! ज्येष्ठ जावयांच्या बायका म्हणजेच मुलीच्या थोरल्या बहिणी आत आपल्याच आईशी ,” ह्याला भारी पोशाख आणि वर अंगठी! आमच्या नवऱ्यांना काय दिले होते? आठव! कसला तो सूट आणि काय ती टोपी! विदुषकही घालणार नाही! सगळी गरीबी काटकसर नेमकी आमच्याच वेळी!” इथे स्फुंदणे सुरू… आम्ही साध्या मॅट्रिक ना? पण आमचे नवरे तरी ग्रॅज्युएट आहेत ना? आणि हिचे काय कौतुक चाललेय बघा. साधी इंटर झाली. तेही दुसऱ्या खेपेला. काॅलेजात गेली ना? तिचे राहू दे. पण आई आम्हीही तुझ्याच मुली ना?” इथून मुसमुसून ते ओरडण्यापर्यंतचे आवाज बाहेर मंडपात येऊ लागतात.
लगेच मानभावीपणे ज्येष्ठ जावईही येतात. बायकोची समजुत काढण्याच्या निमित्ताने ते सासरेबुवांची उणीदुणी काढायला लागतात. मुलीच्या बापाला अजुन एक दोन दिवस ‘अल्लाकी गाय’ म्हणूनच वावरायचे असते.तो त्यांची दादाबाबा करीत समजूत काढतो. पण मुली बदल्यात काही मागण्या पुऱ्या करून घेतातच!
दुसरा मंगल दिवस उजाडतो. “ काय तो फराळ?” अहो चहा की रंगीत पाणी? चिवड्यांत तेल,मसाला, शेंगादाणे घालायचे माहित नाही का ह्यांना?” “ माहित आहे हो चांगले. त्यांच्याकडच्या पाव्हण्या रावळ्यांना दिलेला चिवडा संगीत होता! मी पाहून आलो.चकल्याही खुसखुशीत होत्या!” वगैरे संवाद पसरत होते.
मुहुर्त जवळ येतो;तरीही बरेच वेळा नवरा मुलगा आलेला नसे! मुलीचा मामा विंगेत तिला घेऊन एन्ट्री कधी करायची ह्याची वाट पाहात उभा असतो. मुलगी तरी किती वेळ मान खाली घालून अंगठ्याने जमीन उकरत बसणार! बऱ्याच लग्नांत नवरीच्या अंगठ्याची नखं तुटायची!
शेवटी मुलीकडचे जबाबदार नातेवाईक शत्रूच्या गोटात जावे तसे जात आणि कुणाशी बोलून परत येत असे. दोन तोळ्यांची सोन्याची साखळी मिळाल्यावर नवरामुलगा लगेच येईल हा निरोप घेऊन मुलीच्या वडिलांच्या कानाशी लागतो. मुलीचा बाप लठ्ठ असला तरी ताडकन उडण्याचा प्रयत्न करतो. अखेर एक तोळ्याच्या साखळीवर तडजोड होऊन समर प्रसंग टळतो.
मंगलाष्टकांची ती ‘काळरात्र’ येऊ लागते! सर्व उपस्थितांचे कान आपोआप किटावे अशा आवाजातील ‘मंगल संकष्टी’सुरु होते. दक्षिणा घेतली तरी भटजीही माणूसच की. दोन्ही बाजूंची ती चित्रविचित्र आवाजांची चॅम्पियन स्पर्धा केवळ भटजी म्हणून किती वेळ ऐकणार? तो मध्येच ‘ताराबलं चंद्रबलं च…’ सुरू करतो. लोकही मंगलाष्टकांच्या आरिष्टातून सुटल्याचा आनंद टाळ्या वाजवून साजरा करतात. वाजंत्री वाजू लागते.पण बॅन्ड नसल्यामुळे लहान पोरेही तिकडे फिरकत नाहीत. मुलांकडच्यांना मुलीच्या वडिलांना नावं ठेवण्यासाठी हे एक कोलित मिळते.
जेवणाच्या पंगती सुरु होतात. वरपक्षांकडील स्त्रियांना बोलावण्यासाठी मुलीच्या बहिणी-काकू- मावशा-वहिनी ये जा करू लागतात. व पुरुषांना आमंत्रित करायला मुलीचे काका, मामा (आता पोरसवदा नाही; चांगला बाप्या), मुलीचा थोरला भाऊ जात येत असतात. प्रत्येक लग्नात हा भाव खाण्याचा प्रकार म्हणून नाही पण पूर्वीच्या काही वधूपक्षांच्या बेफिकीर व आता काय लग्न ठरले, लागले,कशाला करायची ह्यांची वरवर अशा वागण्यामुळेही नंतरचा वरपक्ष सावध झालेला असतो.
वरपक्षाकडील ‘वगैरे’मंडळी पंगतीत बसलेले असतात. पण वरमाई, वधूची नणंद, आतेसासु असे कोणी व्हीआयपी, वराचे वडील यायचे असतात. त्यांच्या साठी मुलीकडचे तितक्याच तोलाची मंडळी बोलवायला जातात.पुन्हा पैठणी,शालू , इरकली लुगड्याची किंवा काही वस्तुंची मागणी. वधूचे आईवडील,नक्की पूर्ण करू पण जेवून घ्या अशी विनवणी करतात. काही वेळेस हे मान्य होते. काही वेळा वधू कडील पैशांची बाजू माहिती असते. ती ताबडतोबीने मागणी पुर्ण झाल्यावरच मानाची मंडळी पंगतीत बसतात. तरीही पंगत सुरू होत नाही. कारण आता शेवटचे हत्यार उपसले असते. नवरा मुलगा स्वत:च किंवा त्याचे नातेवाईक भरीस घालून त्याला रुसायला लावतात.
पुन्हा विनवण्या. पुन्हा मागणी. जशी दोन्ही कडची कुटुंबाची परिस्थिती दर्जा, तशी मागणी. कुठे व्यवसायासाठी रक्कम, तर कधी मोटरसायकल, तर कुठे सहा व्हाॅल्वचा रेडिओ पर्यंत हा रुसवा खाली येतो. वराचे हे रुसणे म्हणजे निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच सरकारी नोकरांनी संप जाहीर करण्यासारखेच म्हणायचे. अखेर नवरामुलगा येतो.इतका वेळ रुसलेला मुलगा आता नव्या नवरीला घासही भरवतो. सगळे कसे आनंदी आनंद गडेच होते.
संध्याकाळी मुलगी सासरी जाणार. तर त्याआधी पासूनच मुलगी चांगल्या घरी पडली, एक ओझे उतरले अजून एक धाकटी आहे पण अजून दोन चार वर्षे तरी आहेत ह्यावर समाधान मानत लग्नघरातली आवरा आवरी चालू असते. संध्याकाळ जवळ येते तशी त्यावेळी लग्नाचे राष्ट्रगीत झालेले “जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा” मधील ‘कढ मायेचे तुला सांगती जा’ ह्या ओळीच्या वातावरण निर्मितीस प्रारंभ झालेला असतो. मुलगी धाकट्या बहिणीशी विशेष मायेने बोलत असते. आपल्या आवडत्या वस्तू धाकटीला उदारपणे देत असते. हे करतांना डोळे भरलेले असतात. मग निघण्याचा क्षण आला की घरांतल्या सगळ्यांशी गळाभेटीचा निरोप समारंभ हुंदक्या हुंदक्याच्या तालावर चालू होतो. सगळेच थोडेफार भावुक झाले असतात.
वडील कार्यालयाचे, मंडपवाले, इतर काॅंट्रॅक्टरांचे पैसे चुकते करण्यात मुद्दाम गुंतलेले असतात. मुलगी सासरी मोटारने, सजवलेल्या बग्गीत किंवा साध्या टांग्यातून सासरी जाते. घरातले सगळे पुन्हा पुन्हा मागे पाहात मुलीच्या सासरी लक्ष्मी पूजनासाठी जाण्याची तयारी करू लागतात. —-
—-सर्वसाधारणपणे हे दृश्य सर्व लग्नसमारंभाचे असते.पण काही वेळा ‘कढ मायेचे तुला सांगती, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हया ओळी बॅन्डवाले वातावरण निर्मितीसाठी वाजवायला लागले की इकडे त्या गाण्याचा अतिशय मोठा परिणाम होत असे. आईच्या डोळ्यातील पाणी संपत नसते, सख्ख्याच नाही तर लग्नाला आलेल्या चुलत मावस मामे आत्ये वगैरे सर्व प्रकारच्या बहिणींना ही मुलगी तरी किंवा ह्या तरी तिच्या गळ्यात पडून रडायच्या थांबत नाहीत.ह्या बहिणींपैकी अनेकजणी हिला वर्षातून एकदोनदाच भेटल्या असतील. पण ‘‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ‘ बॅन्डवर वाजायला सुरुवात झाली की जवळच्या,शेजारच्या, वर्गातल्या मुली एकसाथ स्फुंदू लागतात. हुंदक्यांची लाट पसरू लागते. हे कसेतरी संपवून मुलगी निघावे म्हणते तर काकू मावशी मामी शेजारच्या काकू, दूरच्या नात्यातली एकदा पाहिलेल्या अंबूअक्का,” निघाली का गं माझी सुमीऽ ऽ…! मला न भेटताच चाललीस?” असे म्हणत,मध्ये मध्ये खोकत, येतात. नवऱ्या मुलीला जवळ घेतात. जवळचा शकुनाचा एक रुपया काढून मुलीला देतात. तिच्या तोंडावरून हात फिरवून मुलीने लावलेला ‘स्नो’ ‘आशा’किंवा ‘उटी’ची फेस पावडर पुसून टाकतात!
नवरी मुलगी चिडल्याचे न दाखवता रागावून आत जाते पुन्हा ‘रेमी’ किंवा ‘एकलॅट’च्या स्नोची दोन बोटे फासून बाहेर येते! इकडे बॅन्डवाले ‘ जा मुली जा …’ हीच ओळ वारंवार गाल फुगवून फुंकून फुंकून दमले तरी मुलीला ह्या भेटीगाठींतून कुणी सोडत नसते.नवरी मुलगीच अखेर पुढाकार घेऊन ‘दिल्या घरी सुखी’राहण्यासाठी निघते. सासरी पोचल्यावर तिथले बॅन्डवाले ‘उंबरठ्यावरी माप ठेविले मी पायाने उलटूनी आले’ हे गाणे वाजवायला सुरुवातही करतात! अशा रीतीने एका शुभकार्याच्या मंगल नाट्याचा नेहमीच सुखांत शेवट होतो! इतकेच नव्हे तर अशा नाट्यमय ताणतणावात झालेल्या लग्नाचे संसार सुखाचे झालेले आहेत. टिकले आहेत.
इतकी ओढाताण, मानापमानाचे काहीही तणाव नसताही झालेल्या अलीकडच्या काळातल्या सर्वच लग्नाविषयी असे म्हणता येत नाही.
काय म्हणावे ह्या स्थितीला? “झपुर्झा गडे झपूर्झा” !