Category Archives: My Life

Memories – 2

मॅरिएटा

पुढे चालू …..

ती. अण्णांविषयी खूप आठवणी आहेत. रविवारी , सणासुदीच्या सुट्टीच्या दिवशी आमची दुपारची जेवणे म्हणजे खऱ्या अर्थांनी “काव्य-शास्त्र- विनोद” ह्यांनी रसभरित व्हायची. अण्णा कधी कधी त्यांच्या फर्ग्युसन कॅालेजच्या गोष्टी सांगत. त्यातल्या दोन तर आम्हा सर्वांच्याच-शैला अमलाच्यासुद्धा- लक्षात राहिलेल्या आहेत. त्या गप्पांमध्ये आम्हा सर्व भावंडाचा सहभाग असे. त्यामुळे जेवण तर लांबत असेच. पण जेवण संपल्यावरही पाटावर बसून गप्पा रंगतच असत. सगळ्यांचे हात कोरडे झाले असत. ओट्यावर आई शांतपणे बसलेली असे. कुणाच्या तरी लक्षात येई.” अरे अजून आईचे जेवण व्हायचेय की!” अण्णा मग लगेच उठत. मागोमाग आम्हीही. जेवणापेक्षा ह्या गप्पांच्या पंगतीच रंगत असत.

अण्णांनी फर्ग्युसन कॅालेजमध्ये असतांना गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी “ वसतिगृहात” ही प्रहसनात्मक एकांकिका लिहिली होती. ती पाहायला प्रमुख पाहुणे “केसरी” चे संपादक व साहित्यसम्राट न.चि. केळकर ह्यांना आमंत्रण देण्यासाठी अण्णा व इतर पदाधिकारी विद्यार्थी गेले त्यांच्याकडे. अगोदर नाही नाही म्हणत होते. पण तरुणांचा हिरमोड होऊ नये म्हणून अखेर ते तयार झाले. पण एका अटीवर- “ मी फक्त दहा मिनिटेच थांबेन”. अण्णा व इतरांनी ते मान्य केले.

त्या विनोदी नाटिकेचा प्रयोग अर्थातच फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये होता. गॅदरिंगचे अध्यक्ष न.चि. केळकर आले. दहा मिनिटासाठीच येईन म्हणणारे साहित्यसम्राट व लो. टिळकांच्या प्रख्यात केसरीचे संपादक, विद्यार्थ्यांच्या गडगडाटी हसण्यात सामील होऊन नाटिका प्रहसन पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत थांबले होते. अण्णांना स्वतःचा अभिमान का वाटणार नाही?

मराठी कवितेला नविन वेगळे वळण देणाऱ्या रविकिरण मंडळाचे अध्यक्ष कविवर्य डॅा. माधवराव पटवर्घन उर्फ माघव ज्युलियन हे होते. ( “प्रेमस्वरूप आई,” “मराठी असे आमुची मायबोली, “ “ … वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हां कां पडे? कवितांचे कर्ते) ते एकदा अण्णांना बरोबर घेऊन रविकिरण मंजळाच्या सभेला गेले. तिथे असलेल्या सर्व प्रसिद्ध कवींशी – कवि यशवंत, कवि गिरीश( नाटककार वसंत कानेटकरांचे वडील) व इतरही – त्यांनी अण्णांची ओळख ,” हे माझे तरुण कविमित्र…” अशी करून दिली. अण्णा पुढे सांगत ही खरी मोठ्या मनाची माणसे ! दुर्मिळ आहेत! “ ह्यामुळे कवि गिरीश व यशवंत ( आई म्हणोनि कोणी ह्या अविस्मरणीय कवितेचे जनक) अणांचे चांगले मित्र झाले. त्यावेळी अण्णा, आबासाहेब ती. बाबा वगैरे रिठ्याच्या वाड्यांत राहत होते . तिथे बरेच वेळा कवि गिरीश त्यांच्या घरी मुक्कामाला असत.त्या वेळी ते आपल्या जुन्या, नवीन कविता म्हणून दाखवीत. ते कविता कशा म्हणत ह्याची नक्कलही अण्णा “गेले तुझ्यावर मन जडून राऽमा गेले…” असे साभिनय करीत!

“प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा —“ हे महाराष्ट्र गीत लिहिणारे, तसेच “ सुदाम्याचे पोहे” ह्यासारखे अप्रतिम विनोदी पुस्तक लिहिणारे, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यावेळच्या साहित्यिकात मोठे प्रस्थ होते. स्वतः प्रतिभाशाली नाटककार व विनोदी लेखक नाटककार आणि कवि राम गणेश गडकरी, श्री.कृ . कोल्हटकारांना गुरू मानीत. तर सांगायचे असे की, आमच्या ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक मुंबई पुणे व इतरत्र गाजत होते. अण्णांची व श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली. कधी कोल्हटकर अण्णांना आपल्याबरोबर निमंत्रित ठिकाणी घेऊन जात. तिथे गेल्यावर कोल्हटकर अर्थातच तक्के लोड असलेल्या गादीवर बसत. अण्णा नम्रपणे त्यांच्या बाजूल पण जरा खाली सतरंजीवर बसत. ते पाहिल्यावर स्वतः कोल्हटकर मोठ्याने आपल्या शेजारी गादीवर थाप मारत म्हणत,” अहो कामतकर इथे या. इथे बसा. अहो तुम्ही आम्ही नाटककार आहोत. असे इकडे या.” म्हणत अण्णांना आपल्या शेजारी बसवून घेत. ती. अण्णा त्यांचा मोठेपणा सांगण्यासाठी नव्हे तर वर माधव ज्युलियन संबंधात ते म्हणाले तसे ,” अशी खऱ्या मोठ्या मनाची उदारवृत्तीची माणसे दुर्मिळ!” हे पटवून देण्यासाठी सांगत. श्री.कृ कोल्हटकरांचे सुपुत्र प्रभाकर कोल्हटकर आमच्या घरी एकदा आले होते.

आमच्या हायस्कूलच्या दिवसात महाराष्ट्रात दोन वक्तृत्व स्पर्धा प्रतिष्ठेच्या होत्या. पुण्याची रानडे वक्तृत्व स्पर्धा आणि बेळगावचीही रानडे स्पर्धा. आम्ही हायस्कूल मध्ये नुकतेच गेलो होतो. आमच्या वर्गात स्पर्धक मुले मुली स्पर्धेच्या तयारी साठी ती भाषणे आम्हापुढे करीत. नंतर कळले की काही वर्षे आमचे ती. अण्णा ही भाषणे लिहीत. त्यांनी तयार करून दिलेल्या भाषणांनी व त्या मुलींच्या वक्क्तृत्व कलेने दोन वर्षे – वनमाला किंवा शरयू चितळे व विदुला लळित ह्या त्या दोन मुली!- ह्यांनी दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. पुढे मग आमच्याच हायस्कूल मध्ये शिक्षक असलेले माझे चुलत भाऊ गो. रा. कामतकर हे भाषणे लिहित. एके वर्षी आमच्या श्यामने दोन्ही स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने बेळगावची रानडे स्पर्धा जिंकून ती गाजवली!

ती अण्णांना अनेक लेखक आपली पुस्तके भेट म्हणून पाठवत असत. मग त्यामध्ये सोलापुरला आमच्याच कॅालेजात प्राध्यापक असलेले कवि डॅा. वि. म. कुळकर्णीचे ‘कमळवेल’ हा काव्यसंग्रह, चरित्रकार व ती. अण्णांचे सहाध्यायी मित्र गं. दे.खानोलकरांचे “ माधव ज्युलियन यांचे चरित्र , य. गो. नित्सुरे यांचे त्या काळी वेगळ्या विषयावरचे “कुमारांचा सोबती, सुप्रसिद्ध कथालेखक वि. स. सुखटणकर ह्यांनी त्यांचे “ टॅालस्टॅायच्या बोधकथा” , तसेच अण्णांचे मित्र प्रख्यात लेखक य. गो. जोशी ( वहिनींच्या बांगड्या फेम) ह्यांची पुस्तकेही ; आणखी स्थानिक लेखकांची पुस्तकेही ! किती तरी!

ती. अण्णांचा ज्योतिषाचाही चांगला अभ्यास होता. विशेषतः कुंडलीचे ज्ञान. त्यानंतर हस्त सामुद्रिक. हा वारसा आमच्या ती वासुनानाने चालवला. पण पुढे त्याने सांगण्याचे थांबवले. ते जेव्हा दिल्लीला कोर्टाच्या केससाठी गेले होते त्या प्रवासात त्यांच्या ज्योतिषाच्या अभ्यासाला चांगलेच यश मिळाले. त्यानंतर, त्यांना प्रवासात भेटलेल्या व ज्यांचे त्यांनी भविष्य सांगितले असेल त्या प्रवाशांची एक दोन वर्षे तरी पत्रे येत होती.

अण्णांना रेल्वेच्या केसेस मुळे हैद्राबाद सिकंदराबाद तसेच दिल्ली येथे प्रवास करण्याची मोठी संधी मिळाली. आम्हाला आठवते ते जेव्हा दिल्लीहून येत तेव्हा आठवणीने आग्र्याचा पेठा घेऊन येत असत.

प्रवासावरून आठवले . सोलापुरच्या श्रीयोगी अरविंद मंडळाच्या मंडळींची कलकत्ता गया काशी वगैरे ठिकाणी जाण्याच्या यात्रेत ती. अण्णा व योगिनी प. पू. मावशी ह्यासुद्धा होत्या. कलकत्याला अर्थातच ते रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वर येथील मंदिरात वगैरे जाऊन आलेच. गयेलाही गेले . बोधीवृक्षही पाहिला असणार. पण प्रवासानंतर एक दोन वर्षांनी ते मला म्हणाले की गयेला मी माझे स्वतःचे श्राद्धही करून घेतले. केले. थोडावेळ मी अवाकच झालो. ते म्हणाले की ही फार पूर्वींपासून चालत आलेली प्रथा आहे. गयेला गेले की अनेकजण असे करतात. मग आपण गेल्यानंतर कुणी श्राद्ध करो न करो. तो प्रश्न राहात नाही.

ती. अण्णा गेल्यानंतर त्यांच्या जुन्या आणि हयात असलेल्या कुणाला कळवायचे त्यासाठी मी, वासुनाना,श्याम, अण्णांना आलेली पत्रे पाहात होतो. त्यामध्ये कोण कोण असावेत? नागपुरचे प्रसिद्ध साहित्यिक व त्यांच्याच तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं माडखोलकर, , श्री. कृ. कोल्हटकर, प्रभाकर कोल्हटकर, कोठीवाले, खांडेकर, दिल्लीला क्युरेटर पदावर असलेले मुंबईचे श्री दिघे , कवि गिरीश, खानोलकर, सुखठणकर, समीक्षक टीकाकार श्री. श्रीकेक्षी ( म्हणजेच श्री. के. क्षीरसागर), चिं.वि. जोशी, संत साहित्याचे अभ्यासक व प्रेमबोध ह्या मासिकाचे संपादक पंढरपुरचे भा. पं. बहिरट, वगैरे. आज ह्या नावांचे कुणाला फारसे महत्व वाटणार नाही. पण ही मंडळी आपापल्या परीने सर्वांना माहितीची व प्रसिद्ध होती.

आणखीही पुष्कळ आठवणी आहेत. लिहायच्या आहेत. आपल्या सगळ्यांनाच ती. अण्णा त्यासाठी प्रेरणा देतील ह्यात शंका नाही. आज फार वाईट वाटते ते एका गोष्टीचे ; ती. सौ. ताई , ती. सौ. माई, ती. वासुनाना , श्याम, नंदू,चंदू,मालू नाहीत आपल्यांत. त्यांनी ती. अण्णांच्या, त्यांच्या ह्याहून जास्त मोलाच्या आठवणी सांगितल्या असत्या!

आमची शैला व अमला ह्यांच्यापाशीही ती. अण्णांच्या आठवणींच्या अत्तराच्या खूप कुप्या भरलेल्या असणार. त्या दोघीही छान भर घालतील.

ती. आई आणि अण्णांनी, आम्हा भावंडांना कुणालाही कधी अरे अभ्यास करा , केला की नाही वगैरे सांगितले नाही. विचारलेही नाही. किंवा वळण लावले वगैरे काही नाही. त्यांचे वागणे बोलणे, रोजचे आचरणच न कळत आम्हाला काही शिकवत गेले असावे. आम्हीच काय आमच्या मुलाबाळांनीही त्यांना पुस्तके वाचतानाच जास्त पाहिले असेल! बहुधा आम्हालाही त्यामुळे न कळत वाचनाची आवड निर्माण झाली असावी.

ती. अण्णांच्या साहित्यिक प्रतिभेचा वारसा चि. चंदूला लाभला. तो त्याने आणखीनच जोमाने यशस्वीरीत्या पुढे नेला. आज मेधाची नेहा व चि. नंदूचा अभिजित ही तोच वारसा पुढे नेत आहेत.

ती. अणांनी स्वतंत्र व्यवसाय, उत्तम, नेकीचे, गरीबाचे वकील अशी ख्याती मिळवून चांगला केला. तोच स्वतंत्र व्यवसायाचा वारसा आपल्या नंदूने डॅाक्टर होऊन पुढे चालवला.मेधानेही वकील होऊन ती तो पुढे नेत आहे.

आपला श्याम ती. अण्णांचे श्राद्ध त्याच्या अखेरीपर्यंत, निष्ठापूर्वक व प्रेमाने, शास्त्रोक्त विधिवत् करीत असे. सुरुवातीची काही वर्षे मीही करीत होतो. पण आता खंड पडला . आज ती. अण्णांचा तिथीप्रमाणे श्राद्धाचा दिवस आहे. मी त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यांची श्रद्धापूर्वक आठवण करीत आहे.

ती. प.पू. अण्णा ( आणि अर्थातच ती. आई तुझेसुद्घा) आम्हा सर्वां सर्वांना तुमचे आशीर्वाद सतत लाभोत ! ती. अण्णा! तुमचे गुणसंकीर्तन करण्याची संधी व पात्रता आम्हाला लाभू दे.

Memories – 1

मॅरिएटा

प्रतिभशाली प्रसिद्ध कवि बा.भ. बोरकरांच्या बहुतेक सर्वच कविता फार चांगल्या व काही सुंदर आहेत . तर कांही सर्वोत्कृष्ट आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘ सरीवर सरी …” आणि “ निळाई”, “तेथे कर माझे जुळती.“

बोरकरांच्या दोन कविता तरी आम्हाला शाळेत होत्या.

“ दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती …. यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर

घडिले मानवतेचे मंदिर

परि जयांच्या दहनभूमीवर

नाहि चिरा नाहि पणती

तेथे कर माझे जुळती”.

तशीच “ एकच माझा साद ऐक प्रभु एकच माझा साद……

पापासरशी देउनि शापा

सन्मार्गी मज लाव लावी बापा

जाणतसे मी तुझ्या घरी प्रभु

शासन हाचि प्रसाद .

ऐक प्रभु एकच माझा साद …..

आणखी एक “ जीवन त्यांना कळले हो

मीपण ज्यांचे सहजपणाने परिपक्व फळापरि गळले हो

जीवन त्यांना कळले हो…

त्यांची प्राथमिक शाळेच्या पुस्तकात असलेली व शोभा आणि सुहासमुळे आम्हाला माहित झालेली अप्रतिम काव्यचित्री कविता “ निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव …”

ही कविता . अशा किती सुंदर कविता सांगायच्या त्यांच्या!

आज बोरकरांची किवा त्यांच्य कवितांची आठवण का आली अचानक.? मी कविता कधी फारशा वाचत नाही तरीपण कवि बोरकरांची आठवण होण्याचे कारण म्हणजे ते सोलापुरला आमच्या घरी आले होते ,! हो. नुसते आले नव्हते तर ते रात्री त्यांचा सोलापुरातील कार्यक्रम संपल्यानंतर जेवायलाही आले होते. जेवतांना, ते रंगून जाऊन गप्पाही मारत होते. आम्ही त्यांच्या पंक्तीला नव्हतो पण हॅालमध्ये आम्हाला त्या बऱ्यापैकी ऐकू येत होत्या.

त्या काळचे नाटककार वि.ना. कोठीवाले हे तर ते जेव्हा जेव्हा सोलापुरला येत त्यावेळी आमच्या घरी यायचे. तेही जेवायला असत कधी कधी. एकदा जेवताना बोलत असता कोणत्या तरी संदर्भात हात समोर लांब करीत , “ अहोऽ धडेऽऽ! “ असे मोठ्यांदा म्हणाले. आम्ही म्हणजे मी श्याम वासुनाना एकदम चमकलो. थोड्या वेळाने कसेतरी आम्ही हसू दाबत कुजबुजायला लागलो.आज श्याम असता तर ह्या आठवणीत त्याचे आणखीही तपशील भरले असते.

ह्या नामवंत लेखकांच्या मालिकेत तितक्याच प्रसिद्ध लेखका विषयी सांगितले पाहिजे. ते म्हणजे सुप्रसिद्ध कादंबरीकार, रुपककथाकार, चित्रपटकथा लेखक व साहित्यातील अत्युच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले लेखक वि. स. खांडेकर! हयांचे आमच्या घरी कधी येणे, आमच्या आठवणी लक्षात राहण्याच्या वयात तरी झाले नव्हते. पण ते सोलापुरला १९४२ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. एक गंमत ती. अण्णा सांगायचे की खांडेकरांनी त्वाटत होते आमच्या अण्णांनाच स्वागताध्यक्षाचा मान मिळेल, मिळावा. पण तसे काही घडले नाही. त्यानंतर कित्येक वर्षांनी वि.स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हा पुरस्कार मिळालेल्यांना आपले काही मित्रांना जवळच्यांना समारंभास हजर राहण्याचे निमंत्रण पाठनता येत असे. आणि वि.स खांडेकरांनी आपल्या ती. अण्णांना ते निमंत्रण पाठवले होते! खरं तर ह्या मध्यंतरीच्या काळात त्यांचा ती. अण्णांशी किती संपर्क होता किंवा नाही हे सांगता येत नाही. पण त्यांच्या व अण्णांच्या त्यावेळी झालेल्या भेटीचा प्रभाव अजूनही असावा इतकेच म्हणता येईल. ह्या संदर्भात अण्णा सांगायचे की त्यांनी सोलापुरात साहित्यिक वर्तुळात चौकशी केली पण एकालाही हे आमंत्रण आले नव्हते!

हे झाले सोलापुरच्या बाहेरच्या मोठ्या शहरातील ख्यातनाम साहित्यिक कवींविषयी. पण सोलापुरचेच, आपल्या एकाच कवितेने संपूर्ण महाराष्ट्रात कायम प्रसिद्ध झालेले कवि कुंजविहारी! कुंजविहारींची “ भेटेन नऊ महिन्यांनी” ही हुतात्मा होणाऱ्या एका देशभक्ताची कविता आहे. कविवर्य , ते सकाळी फिरायला जात तेव्हा, आमच्या घरी रोज सकाळी येत असत. त्यांची फेरी आली की मग चहाबरोबर ती. अण्णांशी त्यांच्या गप्पा होत. त्यामध्ये मग ते त्यांची नुकतीच केलेली ताजी कविता चालीवर म्हणून दाखवत. त्यांनी म्हटलेल्या अशाच कवितेपैकी एक उत्तम कवितेच्या एक दोन ओळी लक्षात आहेत. ‘ उसात रस रसात गोडी …’ अशी ती कविता होती. त्यांनी भेट दिलेल्या त्यांच्या एका काव्यसंग्रहात ती आहे. त्यांचा आवाज खणखणीत व त्यात थोडासा गोडवाही होता. आमच्याकडे कविकुंजविहारींचे नियमित येणे होत असल्यामुळे ते किती चांगले व मोठे कवि आहेत ह्याची मला तेव्हढीशी जाण नव्हती. पण अलिकडे “आठवणीतल्या कविता” ह्या नामांकित संग्रहात अनेकांच्या आठवणीत असलेली त्यांची “भेटेन नऊ महिन्यांनी “ ही कविता पाहिल्यावर त्यांचे कविम्हणून मोठेपण लक्षात आले! आमच्या चंदूने त्यांचे अतिशय समर्पक स्मारकशिल्प तयार करवून घेतले. ते आजही राजवाड्या सारख्या भव्य व देखण्या महापालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात उठून दिसते !

आणखी चिमणराव” “ वायफळांचा मळा”, “ओसाडवाडीचे देव” “ माझे दत्तक वडील” ,चिमणरावांचे चऱ्हाट “. “चिमणराव आणि गुंड्याभाऊ” ही विनोदीच नव्हे तर मराठीच्या सर्व साहित्य प्रकारातील अजरामर जोडी निर्माण करणारे, “चिमणरावांचे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग” हे अप्रतिम विनोदी प्रकरण लिहिणारे, ज्यांच्या विनोदी कथांवर आधारित प्रसिद्ध नट ,दिग्दर्शक निर्माते, मा. विनायक यांनी काढलेल्या ॰सरकारी पाहुणे” ह्या चित्रपटाची मूळ कथा, प्रख्यात साहित्यिक . ज्यांनी आम्हाला शाळकरी वयापासून हसायला शिकवले ते प्रा. चिं. वि. जोशी! हे सुद्धा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या घरी दोन तीन वेळा तरी चहाला येत असत.

आम्हाला अशा बऱ्याच मराठी साहित्यिकांना जवळून पाहण्याचे ‘अहो भाग्यं’ लाभले ते आमचे वडील वै. ती अण्णांच्यामुळे! ते त्यांच्या पिढीतील उत्तम यशस्वी नाटककार, साहित्यिक व व्याख्याते होते, प्रसिद्धही होते!

आमचेअण्णा,साहित्यक्षेत्रातील विशेष महत्वाची संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद, तिच्या सोलापूर शाखेत सक्रिय होते. तिथे पदाधिकारीही होते. त्यांनी आणि प्रभात चित्रपटगृहाचे संचालक शं. ग. पटवर्धन यांनी मिळून जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात मराठी संमेलने भरवली होती. ती. अण्णा जनरल लायब्ररीच्या कार्यकारिणीत बरीच वर्षे प्रमुख सभासद होते व एक किंवा दोन वर्षे ते लायब्ररीचे अध्यक्षही होते. मसापचे कार्यालय प्रभात टॅाकिजच्या एका बऱ्यापैकी मोठ्या सभगृहातच होते. ती. अण्णा बहुतेक तिथे रोज, कोर्टाचे काम झाल्यावर संध्याकाळी जात असत.

आमच्या ती. अण्णांची सोलापुरात किंवा महिन्या दोन महिन्यातून जिल्ह्यातील बार्शी पंढरपूर मंगळवेढा अशा तालुक्याच्या ठिकाणीही व्याख्याने होत असत. त्या काळी सर्व गावच, निदान घरातली मुलंबाळं तरी रात्री आठ वाजता गाढ झोपलेली असत. त्यामुळे ती. अण्णा रात्री केव्हा येत हे आम्हाला सकाळीच समजे. तेही मधल्या खोलीतल्या खुंटीवर चांगला जाडजूड झुलता हार पाहिल्यावर समजत असे. मग समजायचे की अण्णांचे कुठेतरी व्याख्यान होते ! सुट्टीच्या दिवशी तर दोन तीन हार दिसत!

बरं अण्णांची व्याख्याने फक्त साहित्य,वाड•मय ह्या संबंधातच नसत. तर इतरही विषयांवर होत. त्यांना रोटरी क्लब , लायन्स क्लब मध्येही व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले जाई. शिवाय वकीलांच्या बार असोशियनमध्येही वर्षांतून दोन तीन वेळा त्यांची भाषणे होत.त्या दिवशी अण्णा आम्हाला सेशन्स कोर्ट जज्ज, सरकारी वकील कधी कलेक्टरही हजर होते असे सांगत. भाषणानंतर ती मंडळी आवर्जून आपले मत सांगत. ह्यातील बरीच भाषणे अर्थातच इंग्रजीत होत. मला आठवतेय एकदा आमच्या चंदूने सांगितले की तो आणि ती. अण्णा सोलापूरचा नकाशा घेऊन बसले होते. व अण्णांची कुठे कुठे व्याख्याने झाली, त्यावर ते पिना टोचत होते. काही ठिकाणी तर एकापेक्षा जास्त वेळा झालेली असत. नगरेश्वराच्या देवळापासून ते रिमांड होम पर्यंत , लायब्ररी, रिपन हॅाल, मुळे सभागृह, कोर्टाचे बार असोशिअनचा हॅाल, सेवासदन, नव्या रामाचे देऊळ, तेलगु समाजाच्या सभागृहात, मार्कंडेय मंदिर, सेंट्रल कोॲाप बॅंकेचा हॅाल, प्रभात टॅाकीजचा हॅाल( मसाप), अ. वि. गृहाचे सभागृह आणि मला लक्षात नसलेली अनेक स्थळे! किती सांगावीत!. त्यामुळे वर्षभर आमच्या घरांत फुलांचे गेंदेदार- सोलापुरात अशा मोठ्या गुबगुबीत हारांना संगीत हार म्हणत-फुलांचे हारच हार असत!! घरांतही ती.अणांच्या भाषणांचा,विद्वत्तेच्या,साहित्यिक व संत वाड•मयाचा सुगंध सतत दरवळत असे. हा शब्दगंध कायम होता. ती. अण्णा वकीलीतून हळू हळू निवृत्त होत असण्याच्या काळापासून ते त्यांनी शेवटचा श्वास सोडेपर्यंत त्यांची अध्यात्म मंडळात, (कोतकुंडे वकीलांच्या घरी,) नव्या रामाच्या मंदिरात अध्यात्मावर, ज्ञानेश्वरी दासबोध( समर्थांच्या वाड•मयावर) प्रवचने चालूच होती.

ती. अण्णांच्या व्याख्यानांचा म्हणा किंवा साध्या भाषेत सांगायचे तर भाषणांचा वृत्तांत रोज सोलापुर समाचार आणि किंवा संचारमध्ये येत असे. त्यामुळे ती.अण्णा म्हणजेच पं. मा. कामतकर वकील हे नाव अनेकांच्या परिचयाचे होते. आमच्या ती. सौ. माईचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ती. विजयअण्णा म्हणाले ,” अण्णांचे नांव आम्ही वर्तमानपत्रात रोज वाचत असू. तेव्हा हिचे ( आमची सौ. माईचे) स्थळ सांगून आले तेव्हा आम्हालाच जास्त आनंद झाला. इतके प्रसिद्ध स्थळ म्हणजे काय! “ ह्यावरून चंदूनेच सांगितलेली आम्हा सर्वांना दिवाळीत जमलो असतांना सांगितलेली गोष्ट आठवली. तो, ती. अण्णांच्या बरोबर एका रनिवारी बाहेर जात होता. हाजरतखानच्या मशिदीपासून ते लकी चौक , पुढे जुने दत्ताचे देऊळ ते बक्षीब्रदर्स च्या दुकानापर्यंत ती. अण्णांना किती लोक नमस्कार करत होते! शेवटी त्याने मोजायचे थांबवले!

ती. अण्णांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा हा एक पैलू झाला. पण ते तितकेच यशस्वी वकीलही होते. क्रिमिनल खटलेच ते घेत. आमच्या घराच्या पायऱ्यांवर तर कधी त्या लहानशा अंगणातही पक्षकार बसलेले असत. ती. अण्णा त्यांच्या व्वहारज्ञान, कायद्याची सखोल माहिती, प्रतिपक्षाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्या संबंधात , साक्षीदारांची निष्णात वकीली पद्धतीने करण्याची उलट तपासणी, अर्ग्युमेन्टबद्दल कोर्टाच्या वर्तुळात त्यांना फार मानले जाई. शिवाय आपल्या कामाबद्दल व अशीलाबद्दलअसलेली त्यांची निष्ठा ह्यामुळे अण्णांनी केस चांगली लढवूनही कधी आरोपींला शिक्षा व्हायची. पण निकालानंतर तो गुन्हेगार अशिल व त्याच्या घरातील लोक ती. अण्णांना नमस्कारच करीत! ती फासेपारधी मंडळी म्हणत “वकीलसायेब तुम्ही जोरदार लढलात! पण त्या जज्ज्याला पटलं नाही म्हणायचं.! “

स्वातंत्र्य मिळाल्यावरही काही वर्षे वरिष्ठ न्यायाधीश ब्रिटिश असत. त्यांना अण्णांच्या चांगल्या इंग्रजीचे कौतुक वाटत असावे. कारण ती. अण्णा ब्रिटिश न्यायाघिशांच्या भाषेतील phrases आणि idioms ह्यांचा आपल्या कामात चपखल वापर करीत. त्याबद्दलचा एक किस्सा ती. अण्णा आम्हाला सांगत. अण्णा कधी मधी सिव्हिल दिवाणी केसही घेत. पण शक्यतो घटस्फोटाच्या केसेस ते घेत नसत. पण घेतलीच एखादी दुसरी तर ते बरेच वेळा दोन्ही बाजूंना बोलावून समजूत घालून , सामंजस्याने सोडवत. ह्यात वेळ जाई पण ह्यामागे कुटुंब तुटू नये ही त्यांची एकच भावना असे. तरी काही प्रकरणे कोर्टात जात. अशाच एका केसमध्ये मुलाचा ताबा कुणाकडे असावा यावर बरीच वादावादी झाली. न्यायाधीशांनी दोन्ही वकीलांना विचारले. प्रतिपक्षाच्या वकीलाने आपली बाजू चांगली मांडली. जेव्हा अण्णांना न्यायाधीशाने विचारले तेव्हा ती. अण्णा पटकन फक्त येव्हढेच म्हणाले,” Your honour , it’s obvious, calf goes with the cow!”पुढे अण्णा सांगत की ,” ते ऐकून जज्ज वेल्स (Wells) टेबलावर हात आपटून ,” of course! That’s it!” म्हणाले!

पुढे चालू ….

Dnyaaneshwari Writing Complete

“ काय (ज्ञान) देवा सांगू तुझी मात…” आजही सलग सहाव्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसन्न होऊन ओव्यांचे शतक तर पूर्ण करून घेतलेच आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी माझ्याकडून लिहून पूर्ण करून घेतली!गुरुमहाराज की जय ! ज्ञानेश्वर महाराज की जय!


आता ज्ञानेश्वरीतील पसायदान स्वतंत्र पानावर वेगळे लिहायचे; ज्ञानेश्वरांची आरती विठ्ठलाची आरती , सुंदर ते ध्यान हा अभंग आणि संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केल्यानंतर तिच्याविषयी लिहिलेल्या ओव्या/ अभंग हे लिहायचे. आणि योजकांनी सांगितल्याप्रमाणे सविस्तर अनुक्रमणिका व माझे मनोगत/ अनुभव लिहिणे आहे.


पण पायी वारी करीत पंढरपुरला पोचल्याचा आनंद घ्यायचा, तो ज्ञानेश्वरी हाताने लिहून पुर्ण झाल्यावर घेतला. पंढरपुरांतील इतर देवदेवतांचे दर्शन घेणे राहावे तसे झाले आहे मला! चला, तुम्ही सर्वांनी, विशेषतः सतीश सुधीर ह्यांनी गेले पाच दिवस खूप म्हणजे खूपच कौतुक करत उत्तेजन दिले. त्यामुळे मला हे इतके जमले. होय. स्मिताने मला ह्या उपक्रमात भाग घ्यायला लावले. खटपट करून पिंपरी चिंचवडला जाऊन ज्ञानेश्वरी व ती ज्या वहीत लिहायची ती पुरस्कृत वही आणली. मला पाठवली.

तेजश्रीने तिच्या मावसबहिणीला- दीदींनाही- मी ज्ञानेश्वरी अर्थासह लिहतोय असे कळवले होते. त्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. म्हणूनच म्हटले की तुमच्या सर्वांमुळे मला लिहिणे शक्य झाले. त्तसेच सतीशने तो पावसला गेला होता तेव्हा माझ्यासाठी स्वामी स्वरुपानंदांनी लिहिलेली ‘अभंग ज्ञानेश्वरी आणली; तिचाही मला ज्ञानेश्वरीतील काहीं ओव्यांचा अर्थ समजण्यास मदत झाली. सुधीर स्मिता सतीश आणि उषाताईंनी वारंवार दिलेल्या उत्तेजनामुळे माझे हे लिखित पारायण पुरे झाले. दहा बारा दिवसांपूर्वी सतीश म्हणाला होता ,” बाबा, तुम्ही ३१ डिसेंबरच्या आत पूर्ण कराल.” झाले की हो तसेच!

॥जय जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी॥”

Libraries

बाळपणापासून पुस्तके, वाचन ह्याचे बाळकडू आम्हा बहिण भावंडानांच नव्हे तर आमच्या बरोबरीच्या अनेकांना प्यायला मिळाले.त्यामुळे पुस्तके ओळखीची झाली होती.वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके वाचण्याचीआवड अमच्या घरातूनच पोसली गेली. जणू पुस्तकांचे घरच! त्याबरोबरीने ही आवड आमच्या गावच्या जनरल लायब्ररीने जोपासली, वाढवली. हायस्कूल मधील लायब्ररीत, त्या अकरा वर्षांच्या काळात फार थोडा वेळ गेलो असेन. पण जेव्हा एखादे शिक्षक गैरहजर असतील तर त्या वर्गाच्या मॅानिटरने लायब्ररीत जाऊन गोष्टींची निदान चाळीस एक तरी पुस्तके आणावीत. आणि ती आम्ही वाचावीत; अशी मोठी चांगली ‘वाचनीय’ पद्धत आमच्या हायस्कूल मध्ये होती. त्यामुळे स्वाध्याय मालेतील अनेक चांगल्या गोष्टींची पुस्तके, साने गुरुजींची, ना. धों. ताम्हणकरांची, पुस्तके वाचायला मिळत असत. त्यामुळे पुस्तकाविषयीची गोडी वाढत गेली.

त्यानंतर कॅालेजची भव्य लायब्ररी व तिथे बसून अभ्यासाला लागणारी किंवा इतरही चांगली प्रख्यात पुस्तके वाचण्याची सोय होती. कॅालेजच्या लायब्ररीतील ‘अभ्यास लायब्ररी’ चा विभाग रात्रीही उघडी असे! केव्हढी सोय होती ही अनेक विद्यार्थ्यांसाठी! हॅास्टेलच्या मुलांना ह्याचा खरा फायदा होत असे.
त्यानंतर औरंगाबादचे बळवंत वाचनालय, पुण्याचे नगरवाचन मंदिर, दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालय ह्या वाचनालयांनीही चांगली, चांगली पुस्तके वाचायला देऊन वाचनाचे खूप लाड केले. आमचे सर्वच दिवस पुस्तकांचे दिवस झाल्यासारखे सरकत होते.

मनांत कुठेतरी जाऊन पडलेले हे विचार आताच वर येण्याचे कारण काय? तर निमित्त सतीशने WhatsApp वर पाठवलेली ब्रिटिश लायब्ररीचा व्हिडिओ! तो पाहिल्यावर पुन्हा पुस्तकांच्या ‘विश्वात्मके देवा’च्या जगात गेल्याचा अनुभव आला.

मी थक्क झालो ही लायब्ररी व तिथे चालणारे काम पाहून. प्रकाशित होणारे एकूण एक पुस्तके , किंबहुना जे काही प्रसिद्ध होते ते सर्व काही – मासिके, वर्तमानपत्रे, जाहिराती, जतन करीत आहे हे ऐकून व पाहिल्यावर किती मोठे व ऐतिहासिक महत्वाचे कार्य ही लायब्ररी करीत आहे ह्याची थोडी फार कल्पना आली. त्या लायब्ररीची- ब्रिटिश लायब्ररीची अत्याधुनिक उत्तुंग इमारत तिथली सर्व कामे यंत्रमानव – Robots करीत असलेले पाहिल्यावर माझ्यासारखा सामान्य वाचक थक्क ,विस्मयचकित ,अचंबित होणार नाही तर काय! इंग्लंड हा देश तसा टिचभर , त्या लहानशा देशात , लंडनसारख्या गर्दीने गजबजाट झालेल्या महानगरात एव्हढी जागा मिळणे अशक्यच. त्यामुळे त्याच्या आजुबाजुच्या गावातील जमीनीवर ही प्रचंड ज्ञानवास्तु उभी केली आहे.

कोणत्याही गावाचे,राज्याचे, किंवा देशाचे खरे वैभव तिथली ग्रंथसंग्रहालये व शिक्षणसंस्था ह्याच असतात. ह्या व्हिडिओखाली असलेल्या कॅामेन्टसही वाचनीय आहेत. त्याही वाचाव्यात.

ही लायब्ररी पाहिल्यावर व तेथील बहुतेक सर्व काम रोबॅाटस् करतात वगैरे विस्मय चकित करणारी यंत्रणा पाहिल्यावर मला आमच्या वाचनाच्या गावातली जनरल लायब्ररी , बेलमॅान्टची लायब्ररी , मॅरिएटातली माउन्टन व्ह्यू लायब्ररी,दिसेनाशा होऊन , अंधुक पुसट होऊ लागल्या. पण संत ज्ञानेश्वरांनी मला पुन्हा जमीनीवर आणले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “ चालायचे म्हणजे फक्त राजहंसानेच डौलदार चालायचे? त्याचे चालणे पाहिल्यावर इतर किडा मुंगीनी – काई चालू नाई?”ही ओवी लक्षांत आल्यावर, मी पाहिलेल्या , तिथे जाऊन वाचन केलेल्या आमच्या गावचे ज्ञानपीठच अशी जनरल लायब्ररी, कॅालेजची त्यावेळी मोठी भव्य वाटणारी लायब्ररी, बेलमॅान्ट, सॅन कार्लोस, रेडवुडसिटी,रेडवुड शोअर्स, मॅरिएटातील माउन्टन व्ह्यू, ह्या लायब्ररींसकट सर्व लहान मोठ्या लायब्ररी पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या.

ब्रिटिश लायब्ररीशी संबंध, सतीश बंगलोरला असतांना आला. तिथे काढलेल्या कार्डाचा फायदा पुण्याला आल्यावर झाला. कारण त्यावेळी पुण्यातील ब्रिटिश लायब्ररीमध्ये नवीन सभासद घेणे थांबले होते. पण बंगलोरच्या कार्डामुळे मी नवा सभासद मानला गेलो नाही. ह्या लायब्ररीचा फायदा मी घेतलाच पण माझी नात मृण्मयीनेही घेतला!

‘आमच्या वाचनाचे गावात ’ असतांना पुणे विद्यापीठाची लायब्ररी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेची, नगर वाचन मंदिर ही नावे एकत होतो. त्यांत ब्रिटिश लायब्ररीचे नांवही पुढे असे. तिथले सभासदत्व मिळणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. त्या ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झाल्यामुळे मनातल्या मनांत माझी कॅालर ताठ होत असे.

सांगायची गंमत म्हणजे तिचे ग्रंथपाल हे आमच्या नागवंशी चाळीत राहाणाऱ्या डॅा. जोशी ह्यांचे भाऊ किंवा त्यांचे थोरले चिरंजीव असावेत. म्हणजे आमच्या बरोबरीचे विष्णु जोशी ,मन्या जोशी ह्यांचे सगळ्यांत मोठे भाऊ किंवा काका -विठ्ठल जोशी हे होते! पण ते निवृत्त झाल्यावर, त्यांच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर हे कळले !


बघा! एका जागतिक प्रसिद्ध लायब्ररीच्या ‘ लिंक’मुळे पुस्तकांच्या व लहान मोठ्या वाचनालयांच्या ‘आठवणींच्या कड्यांची एक लांबलचक साखळी ‘ होत गेली ! हा लाभही नसे थोडका.

आमचा ‘ पासिंग शो ‘

बेलमाँट

बहुसंख्य लहान मुलांना मुलींना काही तरी गोळा करण्याचा , जमवण्याचा , जमवून ते जपून ठेवण्याची हौस छंद आवड -काही नाव द्या- असते . मला आणि माझ्या बरोबरीच्या काही सवंगड्यांना सुरुवातीला काचेच्या,सिमेन्ट सारख्या टणक, लहान मोठ्या गोट्या जमवण्याची आवड होती. गोट्या खेळत असल्यामुळे ती जोपासणेही सहज होत असे. मोठ्या गोटीला, गोटी कसे म्हणायचे, गोटूलाच म्हणावे लागेल, अशा गोट्या ढंपर म्हणून ओळखल्या जायच्या. काचेच्या गोट्यांतही विविध रंगासोबतच त्यांच्या पोटात नक्षीही असे. पोटात, अंतरात नक्षी खेळत असलेल्या पारदर्शी गोट्यांना तितक्याच सुंदर नावाने म्हणजे ‘बुलबुल’ म्हणून त्याओळखले जायचे .

गोट्यांनंतर काड्याच्या पेटीचे छाप जमवणे सुरू केले. काड्याच्या पेट्या घरोघरी असायच्या. किराणा दुकानदार. पानपट्टीवाले संख्येने किती तरी असत. त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या छापांच्या काड्यापेट्यांची बंडले असत.

छाप जमवण्यास सुरुवात झाल्यावर दोस्तांशी गप्पा मारत जात असलो तरी प्रत्येकाचे लक्ष चारी बाजूना बारकाईने असे. काही जण गप्पांत रमले की, मला नाही तर त्याला रिकामी काड्यापेटी किंवा चिरडली गेलेली काड्यापेटी दिसली की कशाचेही भान न राहता त्या काड्यापेटींवर झडप घालायला झेपावत असू. एकदम दोन्ही मिळणे फार कठिण. एक जरी मिळाली तरी लढाई जिंकल्याचा आनंद असायचा. मग तुला कोणता छाप मिळाला ह्याची चर्चा. “हाऽत्तीच्या! घोडा छापच की” म्हणत तो किंवा मी ती काड्याची पेटी पुन्हा फेकून देत असू. कारण हा घोडा छाप सर्रास सापडत असे. पत्त्याच्या पानाचा छाप, किंवा नुसता एकच किलवर आणि इस्पिक छाप मिळाले की काही तरी मिळाले असे वाटे. अदला बदलीत किंचित वरचढ ठरणारे हे छाप असत. तांबड्या रंगाचा आडवा चौकटच्या एक्क्याचा छाप असलेली काडीपेटी सापडली की तो दिवस सोन्याच व्हायचा आम्हा दोस्त मंडळीचा.

एकेकटे फिरताना, भाजी आणायला संध्याकाळी फाटकावर जाताना, रविवारी गावातल्या मुख्य भाजीबाजारात जातांना किंवा, आई किंवा काकूंबरोबर देवळात जाताना, ह्या छापांची आणि तशीच अगदी वेगळ्या नेहमीच न मिळणाऱ्या छापांची कमाई होत असे!

कधी कधी आमची ही हौस- छंद-आवड अगदी व्यसनाची पातळी गाठायची. कुणी दोघे- तिघे अगर एकटा माणूस सिग्रेट विडी ओढताना दिसले किंवा आता ‘तो/ ते विडी सिग्रेट शिलगावणार ‘ असा अंदाज आला की आशाळभूतपणे तो किंवा त्यांच्यातले एक दोघे तरी रिकामी काडीपेटी केव्हा फेकतील ह्याची वाट पाहात उभे असू. सहज दोस्त उभे आहेत किंवा कोणी एकटा असला तर, कुणाची वाट पाहातोय अशी ॲक्शन करत उभे राहायचो. नशिब जोरावर असेल तर दोन काड्याच्या पेट्या खाली पडलेल्या दिसायच्या. दिसल्या की त्याच सहजतेने ती काड्याची पेटी उचलून पुढे सटकायचे. घोडा छाप निघाली की चिडून ती पायाखाली चिरडून पुढे जायचो; कुणी विडी सिग्रेट ओढतेय का ते पाहात ! हा तपश्चर्येचाच काळ होता आमच्यासारख्या ‘ एका ध्येयाने पछाडलेल्या ‘ ‘ एकच श्वास एकच ध्यास ‘ घेतलेल्या पोरांचा. काड्यापेटींचे वेग वेगळे भारी वाटणारे छाप जमा करणाऱी छंदोमय झालेली मुले आम्हीच ! आमच्यासारखी आणखीही पुष्कळ असतील.

प्रत्येकाकडे दुर्मिळ, सहज न मिळणारे काड्या पेटींचे एक दोन छाप तरी नक्कीच असत. त्यांची अदला बदल देवाण घेवाण सहसा होत नसे. प्रत्येकासाठी ते छाप Trophy च असत. माझ्याकडे आणि धाकट्या भावाकडेही अशी मौल्यवान रत्ने होती. एका काड्यापेटीच्या वर संत तुकारामांचा छाप होता . त्याची छपाई व चित्रही सुंदर! दुसरा एक छाप टारझनचा होता. त्यालाही तोड नव्हती. सुरवातीला दुर्मिळ असणारा पण नंतर काही महिन्यांत तो तितकासा वैशिष्ठ्यपूर्ण न राहिलेला म्हणजे जंगलातून झेप घेतलेला वाघ व झाडावर बंदूक रोखून बसलेला शिकारी. पिवळसर व हिरव्या रंगाचे मिश्रण त्या छापात होते. काडीपेटी ती अशी कितीशी मोठी ? त्यावर हे चित्र छापणे सुद्धा फार अवघड आहे असे त्या वयातही वाटायचे. दुसरा एक छाप होता, समई छाप. किंचित गडद तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पितळेची चकचकीत समई, चारपाच तेवणाऱ्या ज्योती आणि त्यांच्या भोवती पिवळ्या प्रकाशाते वलय. आमच्या भाषेत- येकदम मस्त! असेच उदगार संत तुकाराम महाराजांचा छाप पाहिल्य्वर सगळ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडत. फक्त” येकदम मस्त हाय ब्ये!” ही भर पडायची.

गोट्यांच्या मागोमाग काड्यांच्या पेटीचे छाप जमवण्याचा नाद लागला व तोही संपला. काड्यापेटीची सखीसोबती सिग्रेटच्या पाकिटांच्या मागे लागलो. त्यावेळी बिडी सिग्रेट पिणे म्हणत जरी त्यात ओढण्याची क्रिया असली तरी पिणे हेच क्रियापद प्रचलित होते.

ह्या दोन्ही नादासाठी रस्ते धुंडाळणे हे समान कर्तव्य होते. ते इमान इतबारे पार पाडत असू. त्यासाठी शाळेच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नव्हती. काड्यापेटीचे छाप असोत की सिग्रेटची पाकिटे, शाळा सुद्धा आमच्या संशोधनाचे केंन्द्र होते. मोरे मास्तर, पवार मास्तर, हे ह्या दोन्हींसाठी भरवशाचे .

काड्याच्या पेटीत जशी घोडाछाप सार्वत्रिक होती तशी सिग्रेटीत दोन ब्रॅन्ड लोकप्रिय होते. चहात जसा कडक चाय पिणारे तसे सिग्रेटमध्ये लई कडक चार मिनार होती ! त्यानंतर सर्वाना सहज सहन होणारी म्हणजे पीला हत्ती किंवा पिवळा हत्ती. ही पाकिटे जमवायला कौशल्याची हुन्नरीची आवश्यकता नव्हती. कुठेही गेलो आणि पाहिले तरी सहज ह्या दोन्ही छापांची पाकिटे मुबलक मिळायची. त्यानंतर बर्कले व त्याही नंतर कॅपस्टन हे दोन प्रतिष्ठित छाप होते. सर्वात वरिष्ठ म्हणजे गोल्ड फ्लेक्स सिगरेट. तिला सिग्रेट- शिग्रेट म्हणण्याचे धाडस कुणी करत नसे. ती लोकसंबोधने जनतेच्या जिव्हाळ्याचे जे दोन ब्रॅन्ड चार मिनार आणि पिवळ्या हत्तींसाठी राखीव होती ! कारण ते सर्वसामान्य कामगारांना, कारकुनांना आणि हेडक्लार्कना परवडणारे होते.

छाप कोणताही असो सर्व सिग्रेटींची पाकीटे दहाची असत. नंतर काही काळांनी काही ब्रॅन्डनीं वीसचीही पाकिटे आणली ती दोन्हीही गुण्या गोविंदाने पानपट्टीच्या टपऱ्यांत एकमेकाशेजारी बसत. तसेच बर्कले, कॅपस्टन, आणि गोल्ड फ्लेक्स ह्यांचे पन्नास सिगरेटींचे टिन असत. इस्त्रीच्या कपड्यातील, गॅागल लावलेले तरूण कधीतरी रुबाबात हातात हा टिन तिरपा धरून जाताना जिसत. पण अशी शान मोजके मोटरवाले होते त्यांना जास्त शोभून दिसे. गोल्ड फ्लेकस शिवाय ते दुसऱ्या सिगरेटीचा झुरकाही घेत नसावेत. पण चार मिनारवाले ह्या सर्वांना तुच्छ समजत. बायकी शिग्रेटी पिणारे म्हणत त्यांना.

ही पाकिटे जमा करायचोच पण कधी सटीसहीमाहीला कॅमल किंवा अबदुल्ला नावाचे एखादे पाकीट मिळे ! ही वार्ता सिग्रेटची पाकिटे जमवणाऱ्या आमच्या सारख्या नादिष्ट मुलांच्या गोटांत वाऱ्यासारखी पसरे! दुध पिणाऱ्या गणतीचे दर्शन घ्यायला पुढे येणाऱ्या नंतरच्या काळात धावपळ झली नसेल तितकी पळापळी केली असेल पोरांनी! हे कधी न ऐकलेले ना पाहिलेली छापाची पाकिटे कशी दिसतात इतके पाहायला मिळाले तरी धन्य वाटायचे.

पण दुर्मिळ असल्यामुळे व कसलीही माहिती नसल्यामुळे लहानशा ओढ्याला अचानक आलेल्या पुराचा लोंढा जसा लगेच ओसरतो तशी आमची उत्सुकताही ओसरायची ! ओळखीची माणसेच बरी हाच सनातन नियम पटायचा.

हे चार मिनार, पिवळा हत्ती, कॅपस्टन वगैरे जमा करण्याच्या मोसमातच एक वेगळा ब्रॅन्ड त्याच्या अत्यंत अनोळखी नावा मुळे, पाकिटाच्या रंगसंगतीमुळे व त्यावर असणाऱ्या स्टायलिश माणसाचा फोटो आणि त्याच्या तितक्याच स्टायलिश हॅट मुळे त्या पाकिटाची किंमत ( मूल्य वगैरे शब्द कुणाला माहित?! आणि म्हणता येणार होते!) आमच्या अदलाबदलीच्या मार्केटमध्ये वधारली! ज्यांच्याकडे ही पाकिटे होती ते मोटारीतून गोल्डफ्लेकसचा टिन घेऊन उतरणाऱ्या रुबाबदार श्रीमंताप्रमाणे आव आणीत आमच्यात वावरत !

पण ह्या सिग्रेटचे नावही सुंदर आहे . ‘ पासिंग शो ‘ वा! सिगरेटचे झुरके घेण्याला इतके काव्यमयच नव्हेतर वास्तवही म्हणता येईल नाव आहे. ‘ घटकाभरचा खेळ, घटकाभर करमणुक, क्षणभराचा विरंगुळा!’ ‘फार नाही, दोन घटका मजेत घालवा’ ‘दोन घटका लगेच सरतील,’ त्यावेळी हे अर्थ माहित नव्हते. नाव सोपे आणि निराळे होते. हे समजत होते. ते नाव लक्षात राहण्याचे त्यातील सहजता हेही कारण असेल.

काड्यापेट्यांचे छाप, सिगरेटची पाकिटे जमवणे हा खेळही होता आणि नाद होता. छंद आवड हौस हे शब्दही आम्हाला कधी आमच्या वाटेवर भेटले नाहीत. त्यामुळे नाद होता म्हणणेच योग्य. बरं ह्या वस्तु अखेर शब्दशः टाकाऊच. बरीच माणसे, मुलं छाप पाकिटे गोळा जमवतात हे पाहून ते कौतुकाने आपणहून रिकामी काडेपेटी किंवा रिकामे सिगरेटचे पाकीट देत. काहीजण तर एकच शिल्लक असली तर ती खिशात ठेवून सिगरेटचे पाकिट देत.

गोट्या जमवणे थांबले, मग काड्यापेटींचे छाप जमवण्यामागे लागलो. तेही बंद कधी झाले त्याचा पत्ता नाही आणि सिगरेटची पाकिटे जमवता जमवता तोही नाद कसा आणि कुठे संपला तेही समजले नाही.

हा खेळ अखेर ‘पासिंग शो’ च होता!

पुस्तकांच्या गराड्यांत

बेलमाँट

गेले काही दिवस पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलो आहे. आजपर्यंत पाचसहा लायब्रऱ्यात जाऊन बराच काळ तिथे काढला. सर्व ठिकाणी अनेक चांगल्या पुस्तकांच्या नंदनवनात वाचक म्हणून वावरत होतो.

सध्या बेलमॅान्टच्या लायब्ररीत मात्र मी व्हॅालन्टियर म्हणून जातो. म्हणूनच सुरुवातीला लिहिले की पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलोआहे.

पुस्तके मासिके वाचण्यासाठी माझ्या लायब्ररींच्या भेटी जनरल लायब्ररीपासून सुरुवात झाली. त्यानंतर वल्लभदास वालजी वाचनालय, बळवंत वाचनालय,नवजीवन ग्रंथालय, ते मुंबई मराठी ग्रंथालय – विशेषतः तिथल्या संदर्भ ग्रंथालयापर्यंत पर्यटन झाले. . त्यानंतर माउन्टन व्हयू लायब्ररी, मर्चंटस् वॅाक, रेडवुड शोअर्स, सॅन कार्लोस रेडवुडसिटी ह्या लायब्रऱ्यात सुद्धा जाऊन आलो. सॅन कार्लोस लायब्ररीपासून माझे व्हॅालंन्टियरचे दिवस सुरू झाले.

पण आज जास्त करून लिहिणार आहे ते, विशेषतः बेलमॅान्टच्या वाचनालयाशी संबंधित आहे. कारण सध्या मी बेलमॅान्टच्या लायब्ररीत व्हॅालन्टियर म्हणून जात आहे. तिथे देणगी म्हणून येणाऱ्या पुस्तकांशी माझा सतत संबंध येतो.

निरनिराळी, अनेक विषयांवरची, कादंबऱ्या, आठवणींची, चरित्रे, आत्मचरित्रे, अभिजात (classic), काव्यसंग्रह , इतिहासाची, उत्कृष्ठ छायाचित्रांची, आर्थिक राजकीय विषयांवरची किती किती, अनेक असंख्य पुस्तके समोर येत असतात.

काही पुस्तके अगोदर वाचली असल्यामुळे ओळखीची असतात. त्यातलीही काही पुस्तके तर केव्हा कुठे वाचली कोणी दिली ह्यांच्याही आठवणी जाग्या करतात. ह्यातच काही योगायोगांचीही भर पडते. थोरल्या मुलाने अगोदर केव्हा तरी – केव्हा तरी नाही- दोन तीन दिवसांपूर्वी विचारले असते ,” बाबा सध्या अचानक ज्योतिषावरची पुस्तके दिसायला लागलीत.तुमच्या पाहण्यात आलीत का?” त्यावर मी नाही म्हणालो. इतक्यात तरी काही दिसली नाहीत.” असे म्हणालो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, चिनी ज्योतिष, अंकशास्त्रावर आधारित भविष्याची, तुमची जन्मतारीख आणि भविष्य अशी पुस्तके आली की! योगायोग म्हणायचा की चमत्कार हा प्रश्न पडला.

फेब्रुवारीत धाकटा मुलगा म्हणाला की ते सगळे एप्रिलमध्ये युरोपातील ॲमस्टरडॅम लंडन पॅरीस ला जाणार आहेत. दोन चार दिवस माझ्या ते लक्षात राहिले. नंतर विसरलो. ऐका बरं का आता. मी लायब्ररीतल्या कॅाम्प्युटरवर पाहिले. स्टीव्ह रीकची पुस्तके दिसली नाहीत. एक आढळले. पण ते दुसऱ्या गावातल्या लायब्ररीत होते. माझ्यासाठी राखून ठेवा असे नोंदवून ठेवले. दोन दिवस गेले. तिसरे दिवशी लंडन का पॅरिसवरचे स्टीव्ह रीकचे पुस्तक समोर आले. अगदी समोर. वा! हे जाऊ द्या. मी लायब्ररीतल्या बाईंनाही सांगून ठेवले होते. दोन तीन दिवसांनी त्यांनी मला बोलावलेआणि नेदर्लॅंडचे पुस्तक हातात ठेवले. “ पण तुला पाहिजे त्या ॲाथरचे नाही .” मी काय बोलणार? योगायोग की चमत्कार ? हा नेहमीचा प्र्शन पुन्हा पडला!

पुस्तके देणारे बरेच लोक पुस्तके देतात ती इतक्या चांगल्या स्थितीत असतात की आताच दुकानातून आणली आहेत! अनेक पुस्तके खाऊन पिऊन सुखी अशी असतात. तर काही जिथे जागा सापडली तिथे बसून, जेव्हा मिळाला वेळ तेव्हा वाचलीअशी असतात. कव्हरचा कोपरा फाटलेला , नाहीतर कान पिरगळून ठेवावा तशी आतली बऱ्याच पानांचे कोपरे खुणेसाठी दुमडून ठेवलेली, अशा वेषांतही येतात. काही मात्र बघवत नाहीत अशा रुपाने येतात. पण अशा अवस्थेतील, फारच म्हणजे अगदी फारच थोडी असतात.

पुस्तके ज्या पद्धतीने दिली जातात ती पाहिल्यावर देणगी दार आणि त्यांची घरे कशी असतील ह्याचा ढोबळ अंदाज येतो. काही पुस्तके बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असतात तरी ती नुकतीच दुकानातून आणली आहेत असे वाटते.काहीजण कागदी पिशव्या भरून पुस्तके देतात. पण इतकी व्यवस्थित लावून रचलेली की ती पिशवी रिकामी करू नये; पिशवीकडे पाहातच राहावे असे वाटते. साहजिकच पुस्तके बाहेर काढताना मीही ती काळजीपूर्वक काढून टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळा पुस्तके खोक्यांत भरून येतात. पहिले दोन थर आखीव रेखीव. मग वरच्या थरात जशी बसतील, ठेवली जातील तशी भरलेली ! खोकी आपले दोन्ही हात वर करून उभे ! काही पुस्तके तर धान्याची पोती रिकामी करावी तशी ओतलेली. सुगीच्या धान्याची रासच! हां त्यामुळे मोऽठ्ठ्या, खोल पिपातली पुस्तके उचलून घ्यायला सोपे जाते हे मात्र खरे.

एक दोनदा तर दोन लहान मुले,पुस्तकांनी भरलेले आपले दोन्ही हात छातीशी धरून “कुठे ठेवायची ?” विचारत कामाच्या खोलीत आली ! लहान मुलांची पुस्तके होती. त्या मुलांइतकीच पुस्तके गोड की पुस्तकांपेक्षाही मुले ? ह्याचे उत्तर शोधण्याची गरजच नव्हती. दोन्ही गोड! किती पुस्तके आणि ती देणारेही किती!

आठवणी जाग्या करणारी पुस्तकेही समोर येतात. पूर्वी मुलाने ,” हे वाचा” म्हणून दिलेले Little Prince दिसल्यावर माउन्टन व्ह्यु नावाच्या लायब्ररीची आठवण येते. जिथे बसून वाचत असे ती कोचाची खुर्ची, तिच्या बाजूला खाली ठेवलेली, बरोबर घेतलेली वहीची पिशवी…. असेच आजही बेलमॅान्टच्या लायब्ररीत टाईम, न्युयॅार्क संडे मॅगझिन, रिडर्स डायजेस्ट,न्यूयॅार्कर वाचताना वही बॅालपेन असलेली पिशवी जवळच्या टेबलावर ठेवलेली असते!

मध्यंतरी धाकट्या मुलाने दिलेले बेंजॅमिन फ्रॅन्कलिनचे, आयझॅकसनने लिहिले चरित्र आले तर एकदा त्यानेच दिलेले लॅारा हिल्डनबर्डचे Unbroken भेटीला आले. माझ्या दोन्ही नातवांच्या शेल्फातील चाळलेले The Catcher in the Rye आणि Of the Mice and Man ही पुस्तके हातात आल्यावर त्यांची ती विशेष खोली, तिथली,त्यांच्या पुस्तकांनी भरलेली शेल्फंही दिसली. इकडे अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा मुलाने आणून दिलेले Ian Randची सर्वकालीन श्रेष्ठ कादंबरी Fountain Head काही दिवसांपूर्वी दिसले ! आणि त्याच लेखिकेचे Anthem ही ! धाकट्याने दिलेले Confidence Men सुद्धा मध्यंतरी अचानक भेटून गेले.

मुलीचे आवडते Little Women हे अभिजात वाड•मयाचे पुस्तक आणि तिला आवडलेले व नातीने मला दिलेले Anne of Green Gables ही दोन्ही पुस्तके इतक्या विविध, सुंदर आवृत्यांतून येत असतात की लग्नसमारंभाला नटून थटून जाणाऱ्या सुंदर स्त्रियांचा घोळकाच जमलाय! हाच सन्मान शेक्सपिअर , चार्ल्स डिकन्स,शेरलॅाक होम्स आणि लिटल प्रिन्स , हॅरी पॅाटरला, आणि ॲगाथा ख्रिस्तीलाही मिळत असतो. उदाहरणादाखल म्हणून सन्मानीयांची ही मोजकीच नावे सांगितली.

लहान मुलांच्या पुस्तकांनाही देखण्या, जरतारी आवृत्यांतून असेच गौरवले जाते. त्यापैकी काही ठळक नावे सांगायची तर C.S. Lewis ह्यांचे प्रख्यात Chronicles of Narnia , Signature Classics of C.S. Lewis. तसेच E.B. White ची Charlottes Web , Stuart Little ही पुस्तके, Alice in Wonderland, Sleeping Beauty , The Beauty and The Beast, ह्या पुस्तकांनाही असाच मान मिळतो.

अगदी अलिकडच्या योगायोगाची कहाणी; मी पूर्वी वाचलेले Dr. Andrew Weil चे पुस्तक अचानक प्रकट झाले. अरे वा म्हणालो. पुन्हा परवा त्याच डॅाक्टरांचे Natural Health Natural Medicine हे पुस्तक दिसले. म्हटलं आता मात्र हे मुलांना कळवायलाच पाहिजे.

मघाशी मी वेगवेगळ्या रुपातील आवृत्यांतून येणाऱ्या पुस्तकांच्या यादीतील आणखी एका मानकऱ्याचे नाव सांगायचे राहिले. ते म्हणजे Hermann Hess चे Siddhartha ! हे सुद्धा सार्वकालीन लोकप्रिय पुस्तक आहे. मागच्याच वर्षी मला हे मुलाने दिले होते. मी वाचले. छान लिहिलेय. आपल्या तत्वज्ञानासंबंधी व तत्वज्ञाविषयी लिहिलेले, तेही परदेशी लेखकाने ह्याचे एक विशेष अप्रूप असते. ह्याने बरेच समजून उमजून लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी, मुलांनी वाचलेले व मला,” बाबा हे वाचा तुम्हालाही समजेल,आवडेल असे पुस्तक आहे “ म्हणत दिलेले Homosepiens हे गाजलेले पुस्तक परवाच दोन तीन वेळा शेकहॅन्ड करून गेले. माझ्याकडे असलेली लायब्ररीविषयी, लायब्ररी हेच मुख्य पात्र असलेली The Library Book किंवा Troublewater Creeks Book-woman अशी पुस्तके पाहिली की लायब्ररीत लायब्रऱ्या आल्या असे वाटू लागते !

काही वेळा मी ह्या ना त्या पुस्तकांचा “ परवा हे आले होते आणि ते सुद्धा, बरं का!” असे मुलांना सांगतो. पण माझ्या आवडीच्या जेम्स हेरियटचे एकही पुस्तक आतापर्यंत तरी ह्या गराड्यात आलेले, थांबलेले पाहिले नाही! येईल, योग असेल तेव्हा ती चारीही पुस्तके येतील. !

पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गराड्यांत , किंवा प्रसिद्धीच्या सतत झोतांत असलेल्या लोकप्रिय नामवंतांना आपल्या चहात्यांची गर्दी,गराडा हवा हवासा वाटतो. पुस्तकप्रिय वाचकांनाही पुस्तकांच्या गर्दीगडबडीचा गराडाही हवा हवासा वाटत असतो ! नाहीतर आजही लायब्ररीत इतके वाचक-लोक आले असते का?

इच्छाकांक्षाची बदलती क्षितिजे

मॅरिएटा

Laughter is timeless Imagination is ageless Dreams are forever. -Walt Disney


माझ्या इच्छांची सुरुवात केव्हा व कशापासून झाली ते सांगता येणार नाही. पण…..


आमच्या शाळेत इतर सर्व शाळेप्रमाणे काही चांगले व काही मारकुटे मास्तर होते. दोन्ही प्रकारचे मास्तर पाहून – खरं सांगायचं तर मारकुटे मास्तर पाहून– ‘मी मास्तर होणार असे ठरवले. सडपातळ असूनही मास्तर म्हटले की मुलांना बदडता येते. छडी नसली तर फुटपट्टीने मारताही येते हे लक्षात आल्यामुळे मास्तर होण्य्याच्या इच्छेला महत्वाकांक्षेचे रूप येऊ लागले. बहुधा इथपासूनच माझ्या इच्छाकांक्षेची थैली भरायला सुरुवात झाली असावी.


पण हे काही महिने टिकले असेल. कारण ….


आमच्या घराससमोरच पोलिस लाईन होती. त्यामुळे दिवसातून बरेच वेळा पोलिसांची ये जा चालूच असे. त्यांचा खळीचा खाकी ड्रेस, बिल्ल्याचे बकल पासून , पॅालिशने कमरेचा पट्टा, डोक्यावरची निळी व तिच्या बाजूने गेलेली पिवळ्या पट्टीची लकेर , साखळीला अडकवलेली पितळी शिट्टी आणि पायातल्या जाड जूड चपल किंवा बुटापर्यंत सर्व काही चकाचक इतमाम पाहून मलाच काय आमच्या वर्गातल्या सर्वच मुलांची पोलिस व्हावे ती इच्छाकांक्षा होती. ह्यातली मोठी गंमत अशी की चोर-शिपायाचा खेळ खेळताना मात्र मी आणि सर्व मुलं चोर होण्यासाठी धडपडत असू !


घरी कोणी बाहेरचे आले व मुलांशी काय बोलायचे असा नेहमीच प्रश्न पडलेल्या पाहुण्यांनी, “ बाळ ! – बहुतेक सर्व पाहुणे लहान मुलांना ह्या एकाच नावाने ओळखत – तू मोठा झाल्यावर कोण होणार “ असे विचारल्यावर, मी अटेंन्शन पवित्र्यात छाती पुढे काढून उभा राहात असे. पाहुण्यांकडे न पाहता सरळ भिंतीकडे पाहात “ मी पोलिस होणार” असे मोठ्या आवाजात उत्तर देत असे.


मागे एकदा आलेल्या ह्याच पाहुण्यांना “ मी मास्तर होणार” असे सांगितले असणार. पाहुण्यांची स्मरणशक्ती चांगली असावी . “ मी पोलिस होणार “ हे ऐकून त्यांनी हसत विचारले,” बाळ तू तर मागच्या खेपेला मास्तर होणार म्हणाला होतास. त्याचे काय झाले? ” मी म्हणालो, “आता उन्हाळ्याची भरपूर सुट्टी आहे. .” हे ऐकून पाहुणे मोठ्याने हसले. पण गोष्टींतील पाहुण्यांप्रमाणे त्यांनी बक्षिस दिले नाही.


पोलिस व्हायचे तर सराव म्हणून, येणाऱ्या जाणाऱ्या पोलिसांना मी पवित्र्यात उभा राहून ,” पोलिस सलाम” म्हणत सलाम ठोकत असे. गंमत बघा, ‘मोठेपणी पोलिस होणार’ म्हणणारा मी आणि माझ्याबरोबरीची मुले, चोर-शिपाई खेळताना मात्रअगदी खटपट करून चोर होत असू!


पोलिसही काही महिनेच इच्छाकांक्षेच्या “चौकीच्या खजिन्यात” होते. कारणही तसेच घडले. सुट्टीत आलेल्या मावशीला व भावाबहिणीला पोचवायला स्टेशनवर गेलो होतो. गाडी यायला अजून थोडा अवकाश होता. फलाटावरची निरनिराळ्या लोकांची गडबड पाहात मी व भाऊ फिरत होतो. किती प्रवासी! त्यांना सोडायला आलेले, चहाच्या स्टॅाल पाशी असलेले. प्रत्येक खांबा वरची जाहिरात वाचून पाहात फिरत होतो. हे पाहणे संपेपर्यंत गाडी येण्याची घंटा झाली. धडधड करत येणारी गाडी इंजिनाच्या दिव्यामुळे दिसत नसे. पण वेग कमी करत फलाटात शिरु लागली; इंजिनाच्या दरवाजात दांडीला धरून पिकॅप घातलेला ड्रायव्हर दिसला की त्याची ऐट अधिकार पाहून ठरवले की आपण इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. त्याने इंजिनाची शिट्टी वाजवली की फलाटावर रेंगाळणारे सगळे प्रवासी डब्यात जाऊन बसतात हे पाहिल्यावर त्याच्या अधिकाराची व मोठेपणाची खात्रीच पटायची. आगगाडीचा इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. नक्की झाले.


इच्छाआकांक्षेचे इंजिन चालूच होते. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीच्या वर्षादोन वर्षांचे असतील. आमच्या पाच नंबर शाळे समोरच्या.रस्त्यावरून मिलिटरीचे रणगाडे मोटारी जात. ते पाहात बराच वेळ ऊभे राहात असू. मोटारीच्या मागच्या बाजूला उभे असलेले किंवा रणगाड्याच्या टपातून बाहेर पाहणारा लालबुंद टॅामी आणि आपले सैनिक दिसले की ओळीत उभे असलेले सगळी पोरं त्यांना कडक सलाम ठोकत असू. लालगोरा टॅामी आमच्याकडे हसत पाहून हात हलवत. ते पाहून आम्हा सर्वांची मान ताठ होत असे. मास्तर, पोलिस, इंजिन ड्रायव्हर मागे पडले. ठरले ! मी सैनिक होणार. युद्धात लढणार. रणगाड्याच्या टपातून शत्रूवर पाळत ठेवून, धडाऽऽडधूम्मऽ तोफा उडवणार. बंदुक घेऊन पुढे सरकतो आहे हीच स्वप्ने पडू लागली. चला ! चला, थैलीत नवी भर पडली. ……


गावात सर्कस आली. शाळकरी मुलांत उत्साह आला. सर्कसचा अवाढव्य तंबू बांधायला सुरुवात झाली. त्या दिवसापासून सर्कशीच्या मैदानावर आम्ही दोस्त मंडळी रोज मैदानात जात असू. (अवाढव्य तंबू, त्याचे तितकेच जाड दोर. ते ताणत चारी दिशेने कामगार मोठ्याने होईऽऽ य्या खैचो हुईंऽऽय्या खैंचो ओरडून जोश भरत मागे मागे जाऊ लागले. त्याच बरोबर मधले दोन मोठे खांब बरेच कामगार एकाच वेळी वरती नेत उभे करू लागले. जसे जसे दोर ओढले जात आणि ते दोन खांब सरळ ताठ होत गेले तेव्हा तंबूचे जाड जूड कापड फुगत फुगत आकाशभर पसरले) सर्कशीचा शिकारखाना पाहायला फार थोडे पैसे पडत. त्यामुळे सकाळी बरीच मुले वाघ सिंह, उत्तम घोडे, प्रचंड हत्ती पाहायला जात. सर्कशीतील खेळाडूंच्या वेगवेळ्या कसरती पाहताना , जोकरच्या गंमती पाहून हसताना,सर्कसचा खेळ संपू नये असे वाटायचे. सर्कसच्या बॅन्डमुळे तर ह्या आनंदाला आणखी बहर येई!


सर्कसचा बॅन्ड सुरु झाला. दोरीच्या शिडीवरून सरसर चढत कसरतपटू सर्कसच्या छता पासून लोंबते झोके पाच सहा वेळा हलवत. मग एका क्षणी ते पकडून त्यावरून झोके घेत घेत दोन्ही बाजूचे कसरतपटू मध्यभागी जवळ येत. त्याच क्षणी ‘हाय हुपला’म्हणत टाळी वाजवून आपला झोका सोडून दुसऱ्याचा पकडत. आणि नेमक्या त्याच क्षणी बॅन्डची मोठी झांज दणक्यात वादायची. ह्यावेळी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके थांबत. आमची छाती धडधडत असे. तरीही बॅन्डच्या ठोक्या क्षणी तंबूत टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. कसरतपटू आपला खेळ झाल्यावर खालच्या जाळ्यांत उलट्या सुलट्या कोलांट्या घेत रडत. क्षणार्धात मांजराीसारखे पायावर उभे राहत. पन्हा टाळ्या!


जोकरही हसवून सोडत. त्यांना कसे विसरू? आम्ही किती वेळ श्वास रोखून सर्कस पाहात होतो. तुमच्या लक्षात आले असेलच की मोठा झाल्यावर मी कोण होणार ते!


सिनेमाच्या पडद्यावरची गंमत पाहात असतानाच पाठीमागून येणाऱ्या प्रकाश झोताकडेही लक्ष जायचेच. प्रकाशाचे झोत पडद्यावरील माणसांना हातवारे करायला लावतात.पळायला लावते , गाणे म्हणायला लावतात.नाचायला, हसायला लावतात. प्रकाश झोत खाली वर एका बाजूला, दोन्ही बाजूला हलत उडत असताना सिनेमा दिसत असे. कोण हे करत असेल? हा प्रश्न पडायचा. मध्यंतरात उभा राहून पाठीमागे असलेल्या त्या चार सहा अगदी लहान जादुई चौकोन खिडक्यांकडे पाहात असे. ह्यातील रहस्य शोधलेच पाहिजे.


एके दिवशी तो रहस्यभेद झाला. त्या दिवसांत सिनेमा चालू असताना थिएटरची फाटके बंद करत नसत. एकदा सहज पुढच्या सिनेमाची पोस्टर्स फोटो पहायला चित्रा टॅाकीजमध्ये गेलो होतो. आणि ती रहस्यमय खोली दिसली !
दोन मोठी मशिन्स होती. मशीनच्या पाठीच्या उंचवट्यांवर फिल्म गुंडाळलेले मोठे रीळ होते. एक माणूस कधी दुसऱ्या खिडकीतून पडद्याकडे पाही. मशिनच्या काही खटक्यांची, बटनांची हालचाल करे. दोन पायऱ्या खाली उतरून एका टेबलावर एक रिकामे मोठे रीळ व दुसरे भरलेले रीळ होते. तो एक बटण दाबून ती रिळे चालू करी. भरलेले रिळ दुसरे रिकामे रीळ भरून टाके. पटकन ते रिळ घेऊन एका मऱ्शिनच्या रिकाम्या उंचवट्यावर खटकन बसवे. मग दुसऱ्या मशिनच्या लहान खिडकीतून सिनेमा पाहात आरामात बसे.


अरे! पडद्यावरील माणसांना खेळवणारा हा जादुगार ! इतका मोठा महत्वाचा माणूस किती साधा! त्याला ॲापरेटर म्हणतात हे वरच्या वर्गातील मुलांनी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली. केव्हढी मोठी जबाबदारी तो पेलत होता ! उगीच नाही त्याला रोज सिनेमा पाहायला मिळत! तेही फुकटात. मला त्याचा का हेवा वाटू नये? त्या क्षणी माझ्या आकांक्षेतील मागील पानावरच्या सर्व इच्छा पुसल्या गेल्या. दुसरे काही ठरवण्यासारखे, होण्यासारखे नव्हतेच. माझ्या आकांक्षे पुढे गगनही ठेंगणे झाले होते. मोठा झाल्यावर सिनेमाचा ॲापरेटर मी होणार ! मी नसलो तर लोकांना सिनेमा कसा दिसणार?


माझ्या माझ्या इच्छकांक्षेच्या थैलीत सिनेमाचा ॲापरेटर जाऊन बसला!


जादू कोणत्या लहान मुलाला आवडत नाही? शाळेत जादूचे प्रयोग झाले. प्रत्येक जादू आश्चर्याने तोंडात बोट घालूनच पाहात होतो. मग काय जादूशिवाय दुसरे काही सुचेना. नंतर कुणी वडीलधाऱ्या माणसाने सांगितले की जादू म्हणजे ‘हात की सफाई’ , हातचलाखी असते. कोणत्याही चलाखीशी माझा कधी संबंध आला नव्हता त्यामुळे आणि त्यासाठी रोज सराव करावा लागतो हे समजल्यावर, जादुगाराचे स्वप्न माझ्या थैलीतून कधी खाली पडले ते समजलेही नाही.

सर्वजण लहानपणापासून क्रिकेट खेळतात. मी व माझ्या बरोबरीची मुले जे काही हाताला बॅट सारखे मिळेल आणि चेंडूसारखे दिसेल त्यानिशी क्रिकेट खेळत असू. आमचे क्रिकेट गल्ली बोळात, किंवा कुणाच्या घराच्या अंणात चाले. जेव्हा पार्कवर मोठ्या संघांचे सामने पाहायला जात असे तेव्हा पांढरे शुभ्र सदरे आणि विजारी , कुणाच्या टीमची तांबडी,निळी,किंवा हिरव्या रंगाची काऊंटी कॅप पाहिल्यावर आणि फलंदाज जेव्हा पायाला पॅडस् बांधून,हातातले ग्लोव्हज् घालत, चहूबाजूला पाहात रुबाबात येई तेव्हा; आणि जर पहिल्याच बॅालला बॅाऊन्ड्री मारली किंवा त्याची दांडी उडाली तर दोन्ही वेळा टाळ्या वाजवतानाच मोठेपणी काय व्हायचे ते निश्चित झाले.


उत्तम क्रिकेटपटूच व्हायचे. मग आपण पार्क मैदानावरील मध्यवर्ती पिचच्या मॅटवर बॅटिंग करू, किंवा गोलंदाजीही करत हॅटट्रिकही करू अशी स्वप्ने पाहायला लागलो. तशी [शेखमहंमदी] स्वप्नेही पडू लागली.प्रत्येक मॅचमध्ये माझे शतक झळकू लागले. विकेटसही घेऊ लागलो. आकांक्षा रंगीत होण्यासाठी स्वप्नाइतकी दुसरी अदभूत दुनिया नाही !
इच्छाकांक्षेच्या थैलीत मी पहिल्या दर्जाचा क्रिकेटर होऊनही गेलो.


हायस्कूलच्या टीममध्ये मला घेतले नाही. निवड करणारे सर चांगले होते. त्यांनी तीन चार वेळा संधी दिली. एकाही संधीचे मी सोने करू शकलो नाही. सोन्याचे लोखंड करणारा परिस ठरलो मी.


कॅालेजमध्ये मात्र तिसऱ्या चौथ्या वर्षी क्रिकेट टीममध्ये मी होतो. आंतरमहाविद्यालयीन सामन्यातील पहिले तीन चार सामने संघातून रीतसर खेळाडू ह्या दर्जाने खेळलो. पण हे सोडल्यास नंतरच्या सामन्यात नेहमी राखीव खेळाडूची सन्माननीय लोकलमधली चौथी सीटच मिळायची !


काही असो, कॅालेजच्या टीममध्ये होतो, त्यामुळे पार्क मैदानातील मुख्य खेळपट्टीवर खेळायला मिळाले.लहानपणी पार्कवर होणारे सामने पाहूनच क्रिकेटर होण्याची तीव्र इच्छा कॅालेजमध्ये पुरी झाली.


हायस्कूलच्या अखेरच्या दोन वर्षांपासून आणि त्यानंतर पुढेही किती तरी वर्षे सिनेमातला हिरो होण्याचे मनांत होते. हिरो होण्याचे स्वप्न, किंचित का होईना,नंतर काही वर्षांनी पुरे झाले असे म्हणता येईल.


प्रथा-परंपरेतील ‘कॅालेज संपल्यावर नोकरी ‘ हे सरळ साधे वाक्य नियम – सायन्समध्ये ज्याला लॅा म्हणतात- आहे. तो नियम माझ्याकडून पाळला गेला.

नोकरीच्या गावातील जिमखान्याच्या दोन तीन नाटकात नायकाची भूमिका मिळाली. पण गंमत अशी की नाटके नायिका प्रधान होती. त्यामुळे खमंग,तिखट, चिमटे काढणारे उपहासात्मक, टाळ्या घेणारे संवाद तिच्या वाट्याला. आणि मी सतत बचावात्मक बोलणारा ! नायक!


संवाद किंवा रंगमंचावर नाट्यपूर्ण प्रवेश -(एन्ट्री)- नसली तरी आता हिरो म्हटल्यावर नायिकेच्या जवळ जाणे, तितक्याच जवळकीने तिच्याशी बोलणे ह्याला वाव नाटककाराने दिला होता. पण त्या वेळी सरकारी वटहुकुम नसतानाही दिग्दर्शकाने आम्हा दोघांना ‘सोशल डिस्टन्स’ पाळायला लावले होते! हिरोसाठी किंवा नायिकेसाठी असलेले कोणतेही सवलतीचे हक्क नव्हते ! त्यामुळे माझ्यासाठी ती नाटके म्हणजे पोथीचे पारायण झाले!
काही का असेना नंतर दोन एकांकिका केल्या. त्यातही नायक होतो. एकांकिका विनोदी होत्या. त्यात बऱ्यापैकी चमकलो. पण त्यामध्ये नायिका नव्हती!


रंगमंचावर आलो. वावरलो. पडदा पडल्यावर का होईना टाळ्या मिळाल्या. तोही प्रथेचा भाग होता हे उशीरा लक्षात येत असे. . इतके असूनही नाटकात काम करण्याचा, प्रेक्षक आपल्याकडे पाहताहेत, बाहेर ओळख देतात ह्याचा आनंद लुटला.
लहानपणी, शाळा कॅालेजात असताना, नंतर नोकरी, व्यवसायाच्या काळातही अशा इच्छा आकांक्षा सर्वांच्या असतात. त्यातील अनेकांच्या काही इच्छा आकांक्षा पूर्णही होत असतील.


वयानुसार बदलत जाणारी ही स्वप्ने गोष्टीतील शेखमहंमदच्या हवेतील मनोऱ्यांप्रमाणे असतात. वयाचा तो तो काळ सोनेरी करत असतात. अलिबाबा सारखे, त्या प्रचंड गुहेपाशी जाऊन ‘तिळा दार उघड’ म्हटल्यावर प्रचंड आवाज करीत उघडणारी ती शिळा, गुहा, त्यातला खजिना वगैरे रोमांचक, रंजक गोष्ट ऐकल्यावर किंवा कथेवरचे सिनेमे पाहिल्यावर कोणाला अलिबाबा व्हावेसे वाटणार नाही?


मला आणि दोस्तांना मारुती व्हावेसे वाटे. राम किंवा लव-कुशा सारखी बाणांतून अग्नी अस्त्र, त्याला उत्तर म्हणून पाण्याचा वर्षाव करणारे वरुणास्त्र तर त्यालाही प्रत्युत्तर वायु अस्त्र सोडावे अशी इच्छा आकांक्षाच नव्हे तर ती झाडाच्या फांदीचे किंवा बांबूच्या कांडीचे धनुष्य व खराट्याच्या काडीचे बाण करून खेळत प्रत्यक्षात आणत असू. फरक इतकाच की फक्त अस्त्रांची नावे मोठ्याने म्हणत आवेशाने बाण सोडत असू. आजही मुलांना सुपरमॅन स्पायडरमॅन व्हावे असे वाटत असणारच.


स्टंटपट पाहताना त्यातील धडाकेबाज ‘ काम करनार’ जॅान कॅावस व्हावे असे वाटायचे. त्यानंतर राजकपूर देव आनंद दिलीप कुमार आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सौदर्यवतींना पाहून हिरो व्हावे असे वाटणे ओघानेच आले. ‘गन्स ॲाफ नव्हरोन’, ग्रेट इस्केप, ‘पॅटन’ असे इंग्रजी सिनेमा पाहून वैमानिक, शूर योद्धा व्हावे असे का वाटणार नाही. प्रत्येकात अशा प्रकट म्हणा, सुप्त म्हणा इच्छाकांक्षेची स्वप्ने असतातच….. …. एका उत्तम कवींची इच्छाकांक्षा म्हणते ‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे ‘ ! तर कविश्रेष्ठांच्या प्रतिभेतील, रामाला पाहण्यासाठी आतुर झालेली सीताही आपली इच्छाकांक्षा, “ मनोरथा चल त्या नगरीला। भूलोकीच्या अमरावतीला“ ह्या ओळीतून व्यक्त करते! मग लहानपणी सर्वांनाच मोठेपणी आपण कोणी ना कोणी व्हावे असे वाटते ह्यात काहीच आश्चर्य नाही ….. …… त्याशिवाय का जेम्स थर्बर ह्या प्रख्यात लेखकाचा ‘वॅाल्टर मिट्टी’ वाचला किंवा त्याच कथेचा झालेला सिनेमा (प्र.भूमिकेत डॅनी के) पाहिल्यावर; त्याचा ‘ सब कुछ पु. ल. देशपांडे’ अशी सार्थ जाहिरात केलेला, पुलंनी केलेल्या अस्सल मराठी रुपांतरातील ‘गुळाचा गणपती’ (त्यातील मुख्य भूमिका नारबा-पुल.) पाहिल्यावर, स्वप्नाळू डॅा.वॅाल्टर मिटी किंवा पुलंचा नारबा ही सर्व थोर माणसेही आपल्याच कुळातली आहेत हे समजले तेव्हा किती आनंद होतो! आपणही त्यांच्या इतके मोठे होतो !


पन्नाशी आणि त्यापुढील वाटचालीत, बदलत्या काळामुळे, करीत असलेल्या व्यवसायात, लहान मोठ्या व्यापारात टिकून राहणे, नोकरीत बढती मिळवणे, किंवा आतापर्यंत करीत असलेले काम सोडून निराळेच काही करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठी करावा लागणारा खटाटोप महत्वाकांक्षेचे रूप घेतो. नवे ज्ञान, नवे तंत्र, नवे मंत्र, नवा कॅम्प्युटर आत्मसात करण्यासाठी ‘हा सर्टिफिकेटचा’, ‘त्या डिप्लोमाचा’ अभ्यास करणे; त्यासाठी क्लासेस लावणे; पास झालेच पाहिजे ही सुद्धा हळू हळू महत्वाकांक्षा होत जाते. आजचा कॅाम्प्युटर शिक्षित होण्याची महत्वाकांक्षा धरून आपली योग्यता आणि आवश्यकता वाढवू लागतो. दृढनिश्चयाला तीव्र इच्छेची जोड देऊन त्याला ध्येय गाठल्याचे समाधान मिळते. काळानुरुप बदलले पाहिजे हे समजल्यावर स्पर्धेत टिकून राहण्यापासून ते अव्वल नंबर गाठण्या पर्यंत महत्वकांक्षेची दालने विस्तारत जातात.


मोठे झाल्यावर आपल्याला “ मी हा होणार,तो होणार, ते करणार” ह्या लहानपणाच्या इच्छा फुलपाखरी स्वप्ने वाटू लागतात. जगाच्या व्यावहारिक स्पर्धेत टिकून राहणे किंवा असलेल्या स्थानावर पाय रोवून उभे राहणेहीच एक महत्वाकांक्षा बनते. येव्हढ्यासाठीच लुई कॅरोल म्हणतो : Remember we have to run fast to stay where we are. असे जरी असले तरीही बालपणीची, तारुण्यातली स्वप्ने ही महत्वाकांक्षेची बाळरुपेच असतात. इच्छाकांक्षा बदलत गेल्या तरी कित्येकांची स्वप्ने, त्यांनी त्यात रस घेऊन ‘आवडीचे काम’ ह्या भावनेने केलेल्या सतत प्रयत्नांमुळे ती प्रत्यक्षांत येतात !


केवळ बहिणीचे बूट आपल्या हातून हरवले ह्याची फक्त खंत न बाळगता निरनिराळे मार्ग शोधत, काही झाले तरी बहिणीला मी बूट देणारच ह्या तीव्र इच्छेपोटी, तो शाळकरी भाऊ किती धडपतो ह्याचे उत्तम चित्रण Children of Heaven ह्या अप्रतिम इराणी चित्रपटात रंगवले आहे. ते पाहण्यासारखेआहे.


आंतर शालेय स्पर्धेत भाऊ धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. कारण? तिसऱ्या नंबर येणाऱ्याला बुटाचा जोड बक्षिस मिळणार असतो. भाऊ तिसरा नंबरच मिळवायचा ह्या जिद्दीने शर्यतीत पळतो. विजयी क्रमांकाची नावे जाहीर होतात. तिसऱ्या क्रमांकावर दुसराच आलेला असतो. निकाल जाहीर झाल्यावर त्याची शाळा मैदान डोक्यावर घेते. भाऊ पहिल्या क्रमांकाने विजयी झाला असतो. पण भाऊ खिन्न, निराश होऊन घरी येतो. बहिण वाट पाहात असते. पण ऱ्भावाचा चेहरा पाहिल्यावर तीही काही बोलत नाही.


पहिला क्रमांक पटकावूनही बहिणीला बूट देऊ शकलो नाही हीच खंत. भावाने उच्च यश मिळवूनही त्याला इच्छा पूर्तीचा आनंद नाही! पण नंतर दोघानांही बूट मिळतात हे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होतो. इच्छाकांक्षेची झालेली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते भाऊ बहिण किती कष्ट सोसतात ते पाहिल्यावर आपणही मनात त्यांना यश मिळो हीच प्रार्थना करत राहतो.


इच्छाकांक्षा माणसाला काय असावे, काय व्हावे,हे सांगत असतात. आणि तो त्यात स्वत:ला पाहू लागतो. त्याला आपण जो व्हावे असे वाटत असते तसे आपण झालोच आहोत ह्या कल्पनेत तो वावरत असतो. महत्वाकांक्षा, ती पूर्ण होण्यासाठी माणसाला सर्व ते प्रयत्न करण्याची उर्मी उर्जा व प्रेरणा देत असते. एक प्रकारे ते त्याचे ध्येय होते. ते गाठण्यासाठी ध्यास घेऊन ते गाठतोच. सुरुवातीला स्वप्न असले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो.

आतापर्यंतच्या वाटचालीत, रोज बदलणाऱ्या आणि न गवसणाऱ्या इच्छा आकाक्षांची क्षितीजे लांबून का असेना पण मी सुद्धा पाहिली. ह्यापेक्षा दुसरे मोठे समाधान ते काय?


नाही क्षितिज गवसले पण वाटचाल कशी सोनेरी स्वप्नांची झाली.


मुक्कामाला पोचण्याच्या आनंदापेक्षा, झालेला प्रवास हा नेहमीच रोमांचक असतो !

आमच्या गावचे पाणी – १

वि
ही
री
ती

पा णी

बेलमॅान्ट

विहीर दिसली की तिच्यात डोकावून पाहण्याचा मोह कुणाला होत नाही? लहानपणी तर प्रत्येक जण विहीरीच्या भिंतीवर ओणवे होऊन, पाय उचलून, वाकून वाकून खोल पाण्याकडे पाहात असतो.

विहीर ! खोल, आणि दिवसाही आतून थोडेसे उन झेलणारी; किंचित अंधारी, काळोखी अशी वाटणारी! त्यामुळे विहीरीत पाहिले की, “ रात्र काळी बिलवर काळी । गळामुखी माझी काळी हो माय” असा विहिरीत सर्व काही थोडा प्रकाश मिसळलेला काळोख दाटलाय असे वाटायचे.

विहीर म्हटले की मी माझ्या डोळ्यासमोर येते ती मी पाहिलेली पहिली विहीर- खारी विहीर! सात की नऊ बुरुजी गढीसारख्या ( मी लहान असल्यामुळे तितके बुरुज होते की नव्हते हे पाहिल्याचेही आठवत नाही. दोन तीन पाहिल्याचे आठवते. तेही ढासळत आलेले) आमच्या आजीच्या मोठ्या वाड्यातील विहीर लहान कशी असेल ? खारी विहीरही प्रचंड वाड्याला शोभेल अशीच होती.

तिची प्रत्येक पायरी उतरताना कमरेला भरजरी शेला, त्यात जांभळ्या मखमलीच्या म्यानात तेजतरार तलवार लटकावलेली, दोन्ही बाजूला उभे असलेल्या मानकऱ्यांचा मुजरा घेत उतरतो आहे, असे त्या अर्ध्या चड्डीसदऱ्याच्या, मनगटाने नाक पुसण्याच्या वयातही वाटत असे. पायऱ्या उतरून कमानी खालच्या पाण्याजवळच्या पायरीवर उभे राहिले की मात्र त्या मोठ्या चौकोनी विहीरीतले ते शांत,पसरलेले पाणी पाहून जीव घाबरा घुबरा होत असे. पोहायचे नसतानाही छातीवर दडपण येई! पण हे सुरवातीचे पाच दहा क्षणच! तोपर्यंत वरच्या उंच कठड्यावरून धाडकन मुटका मारून चारी बाजूला उंच उडवलेले जोरदार पाणी तितक्याच वेगाने स्वत:भोवती फिरत गोल पसरत गेलेले असे. पाण्यावर पांढऱ्या काळसर फेसांची गोल गोल वर्तुळे फिरू लागली असत.बराच वेळ बुडबुडे दिसत. हळूच एक डोके वर येत असे. पाण्यातच उभे राहून हाताने केस मागे सरकवत,मान हलवून पाण्याचे थेंब उडवत,आवाज न करता हात मारत आईचे कुणी चुलत मामा, काका,भाऊ पोहत पलीकडे गेलेलेही असे.

लहान असल्यामुळे डोळेही लहान. डोळ्यांना सगळे काही मोठेच दिसायचे. त्यात भर म्हणजे बालपणातले कुतुहल, आश्चर्य व थक्क होण्याची सवय. सर्व काही विस्फारलेल्या डोळ्यांनीच पाहावे लागे. त्यामुळे खाऱ्या विहीरी सारखी मोठी विहीर जास्तच मोठी दिसायची. प्रत्येक वस्तु मोठी वाटायची. त्यानंतर आजीच्या गावी पुन्हा जाणे झाले नाही. आज तो बुरुजी वाडाही आहे का नाही माहित नाही.. विहीरही असेल नसेल. असली तरी कशा अवस्थेत असेल कुणास ठाऊक. झाडा ढगांच्या सावल्यांनी ‘झांकळोनि जळ काळिमा पसरलेला’ असेल. पण आजही कधीऽ तरी स्वप्नात ती ‘खारी विहीर’ येते. कारण नसता उत्सुकतेने क्षणभर छातीचे ठोके वाढतात. पण लगेच समोर पसरलेल्या पाण्याच्या गारव्याने स्वप्नातही धीर येतो.

विहीरीचा विषय निघाला आहे तर आजही आमच्या गावात पूर्वीपासून असलेल्या दोन विहीरी लक्षात येतात. एक डाळिंबाचे आड. म्हणताना तिचे डाळिंब्याचे आड व्हायचे. दुसरी म्हणजे नव्या पेठेतली गंगा विहीर. ही तेव्हाही बंदच असायची. डाळिंबाचे आड लहान विहीरच म्हणायची. ती काही वर्षे तरी रोजच्या वरकामासाठी वापरात होती. आज तीही नाही. बऱ्याच गावातील विहीरींप्रमाणे, आमच्या ह्या दोन विहीरींचाही पत्ता सांगण्यासाठी तरी मोठा उपयोग होत असे!

पण अंगावर काटा आणणाऱ्या एका विहीरीचा उल्लेख केला नाही तर गावाचेही वर्णन पूर्ण होणार नाही. ती म्हणजे ऐतिहासिक किल्यातली ‘बाळंतीणीची विहीर’ ! नावापासूनच रहस्यमय भयपटातील “ कॅुंईऽकर्रऽऽ किर्रऽऽकॅ किं ऽऽईऽ करत किंचितच उघडणाऱ्या दरवाजाची व त्यातून फिकट पिवळसर किंवा निळसर प्रकाशाच्या रेघेची व पडद्यामागील थरकाप वाढवणाऱ्या संगीताची” आठवण येऊन आपण खुर्चीच्या अगदी काठावर येऊन बसतो! आणि त्या विहीरीच्या एकाच गोष्टीच्या झालेल्या अनेक चित्तथरारक रूपांच्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता वाढते! ह्याला म्हणायचे ‘नावात काय नाही’?

खाऱ्या विहीरीच्या अगदी उलट अशी एक विहीर आमच्या गावात होती. दीनवाणी! जणू दुर्दैवाच्या दशावतारात सापडलेली. वारदाच्या कोर्टासारख्या राजेशाही इमारतीच्या मागे पसरलेल्या आवारातील एका भागात ती होती. त्यावेळीही ती ‘होती’ म्हणावी अशीच होती. भोवताली काटेरी झुडपे; त्यावर चढलेल्या रानवेलीं मधून ती जेमतेम दिसायची. मोठ्या ओबड धोबड झालेल्या गोलाकार खड्ड्याला विहीर का म्हणायचे तर आजूबाजूचे अनुभवी लोक विहीर म्हणायचे म्हणून. विहीरी भोवती दगड विटांचे तुकडे पडलेले. कधी काळी असलेल्या तिच्या भिंतीच्या तुकड्यांचे एक दोन अवशेष कलंडून उभे होते. पाला पाचोळा केर कचरा आणि शेवाळ्यांमधून हिरव्या पाण्याचे चार दोन पसरट दिसत. निर्जन भागातली, जणू वाळीत टाकलेली ती विहीर होती. आमच्या सारखी लहान पोरे, दुसरे काही उद्योग नसले तर कधी तरी एकदा त्या काट्याकुट्यांतून उड्या मारत,दगड विटावर पाय ठेवून आत डोकावल्यासारखे पाहून परत येत असू. स्वत:ला थोडे भेदरवून घेत,गप्प होऊन परत मागे फिरत असू.

काही वर्षांनी तिथले कोर्ट गेले. महापालिका आली. मागच्या मोकळ्या जागेत बांधकाम झाले. त्यात नावापुरती राहिलेली ही ‘विहीर’ नाहीशी झाली.

पण विहीरींचा खरा उपभोग व उपयोग आम्ही भावंडे, मित्र, लहान मुले-मुली व तरुण उन्हाळ्याच्या सुटीत पोहण्यासाठी करून घेत असू. गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील विहीर ही त्यासाठीच होती. गोपाळरावही दिलदार माणूस. दरवर्षी त्यांनी आमच्यासारख्या लहानांना आणि मोठ्या मुलांनाही पोहायला शिकवले. अशी बरीच वर्षे! कुणाकडूनही एक पैसा न घेता! ॲकडमी, स्पोर्ट जिम, हेल्थ क्लब, रेक्रिएशन स्किल्स अशापैकी एकही नाव किंवा जलतरण विद्या मंडळ, केंद्र, तरंगिणी, तरणतारण, असलीही नावे न ठेवता ते फक्त जो येईल त्याला पोहायला शिकवीत असत. बरं विहीर म्हणायची खरी पण तशी लहान वाटायची.

गोपाळरावांच्या विहीरीत उतरायला पायऱ्या होत्या. पायऱ्या नेहमीच्या नाहीत. विहीरीच्या एका गोलाईच्या भिंतीतून एकेक हैदर आडवा बाहेर आलेला. एका खाली एक हैदर होता. त्यांमधील अंतर लहानांसाठी जास्त होते. कारण दोन हैदरमध्ये काही नव्हते. दोन दातामधला एक एक दात पडल्यावर राहिलेले दात दिसावेत सल्या पायऱ्या! पण कुणाच्या तरी मदतीने लहान मुले विहीरीत येत. तरीही त्या दगडी पायऱ्या उतरत येताना सिनेमातील आलिशान बंगल्याच्या आतील वळणदार जिन्यावरून गाऊन घातलेला व तोंडात सिगरेट धरून उतरणाऱ्या अशोककुमारची आठवण यायची. गोलाकारावरून खाली उतरताना पहिल्या तीन चार पायऱ्या काही वाटत नसे. पण जसे खाली खाली यावे तेव्हा काळ्या विवरात शिरत आहोत किंवा अंधाऱ्या गाभाऱ्यात चाललो आहोत असे वाटायचे. पाण्याच्या भीतीत ही भीती मिसळा मग लक्षात येईल की पोहायची भीती का वाटते. पण काही तरूण मुले एकापाठोपाठ धाडकन उड्या तरी किंवा मुटका मारून एन्ट्री घेत. पण नंतर अशा नाट्यमय पण पाण्यात असणाऱ्या व उडी घेणाऱ्या दोघांनाही धोकादायक एन्ट्रीला गोपाळरावांनी बंदी घातली.

पहिले काही दिवस प्रत्येकाच्या कुवतीनुसार स्वत: आणलेले डालडाचे पाच-दहा पौडी डबे पाठीला बांधून पाण्यातल्या पायऱ्यांपाशीच डुबक डुबुक करावे लागे. माझ्यासारख्या, दंड दालचिनी एव्हढे आणि गोळा मिरीएव्हढा,पाय ज्येष्ठमधाच्या काड्या, अशा ‘गब्रु सॅंन्डोला’ डबा बांधण्या ऐवजी मलाच डब्याला बांधावे लागे. म्हणून गोपाळराव म्हणत,” अरे ह्याचा डबा सोडा. हा कसला बुडतोय! “ मग माझ्याकडे पाहात म्हणायचे,” पाण्यांत राहा. वर हवेत तरंगायचं नाऽही!”

पण हे डबा प्रकरण फार तर एक दोन दिवस चाले. त्यानंतर लगेच गोपाळरावांचे पोहण्याच्या बिगरीतील पोरांसाठी पायरीला धरून “ हात मार पाय मार”चे लेफ्ट राईट् सुरू होई. त्या नंतर मुलांच्या पोटाखाली ते हात ठेवल्यासारखा करत पाण्यांतून “हात मार पाय मार” करत फिरवायचे. त्यांनी मध्येच हात कधी काढला हे पोराला एक दोन गटांगळ्या खाल्यावरच समजे.त्यांची पुढची पायरी म्हणजे ते मुलांच्या हनुवटीला बोटांनी वर उचलून ते पाण्यातून त्याच्याकडे पाहात मागे मागे जात. पोराला आपण पाण्यात असूनही हात पाय मारत अर्धी फेरी मारली हे समजतही नसे. कारण तेव्हढ्यात गोपाळराव दुसऱ्या पोराकडे “ए हात मार पाय हलव” करत गेलेले असायचे! आम्हा सगळ्यांना, न शिकताच आम्ही पोहू लागलो असा भ्रम व्हायचा. ह्यामुळेच गोपाळराव व त्यांची विहीर तिथे पोहायला शिकलेल्या सर्वांच्या आठवणीत असते!

गोपाळराव केळकरांच्या वाड्यात दुपारचे तीन तास तर सहज निघून जात. ज्यांचे नंबर लागायचे असतील ते पत्त्याचा डाव मांडून बसायचे; ज्यांचे पोहणे झाले असे तेही दुसरीकडे खेळत बसत. वसंता आणि भालू , दत्ता,बंडू सारखी किंवा आमचे थोरले भाऊ नाना, मुकुंद, अरूणआणि मधू हे मात्र पाण्यात आवाज न करता निरनिराळे हात मारत चकरा घेत असत. मध्येच कासवासारखे पाण्याच्या आतून पोहत.त्यांना त्यांच्या कौशल्याचे हे पारितोषिक असे. मग तीन सव्वा तीन वाजता तिथल्याच अंगणात वाळलेले, किंवा आंबट ओले कपडे खांद्यावर टाकून मजेत घरी यायचो!

एकदा पोहायला आल्यावर मग काय! आज वारदाच्या बागेतल्या विहिरीत तर परवा गुलाबचंदशेठच्या पंख्याच्या विहीरीत, तर कधी गणेशराम मुरलीधर यांच्या बागेतील विहीरीत पोहण्याच्या मोहिमेवर निघायचो. मोहिमेवर का म्हणायचे तर ह्या तीन विहीरी शहराच्या तीन दिशेला होत्या. ह्या मोठ्या धनवान माणसांचे मोठेपण की ते आमच्या सारख्या मुलांना त्यांच्या खाजगी विहीरीत पोहायला उदार मनाने परवानगी देत. पण आम्हीही तिथे कधी गडबड धिंगाणा केला नाही. पंख्याची विहीर म्हणजे दुरुनही दिसणारी तिची पवनचक्की असलेली विहीर! तिथली नारळाची उंच झाडे व आंबा चिक्कू पेरूंची व तऱ्हतऱ्हेंच्या फुलांचीही झाडे असलेली सुंदर बाग ह्यामुळे पंख्याची विहीर शोभिवंत होती! तिच्या पाण्यावर ही फळाफुलांची बाग बहरलेली असे.

थोडा भाजीपालाहू पंख्याची विहीर काढत असे. वारदाच्या बागेतील विहीर ही त्यांची उपवनासारखी बाग ताजी तवानी ठेवायची व जवळच असलेल्या शेतालाही पाणी पुरवत असावी. तशीच गणेशरामचीही विहीर. ह्या तिन्ही विहीरी खऱ्या विहीरी वाटायच्या. ह्या तीन विहीरी शहराच्या तीन टोकाला असल्यामुळे चालत जाणे किंवा सायकलवरून जाणेही रोज कधीच जमत नसे.त्यामुळे संपूर्ण सुट्टीत फार तर एक दोन वेळा प्रत्येक विहीरीत पोहणे होत असेल. पण जितके होई ते उत्साहाला भरतीच आणत असे.

गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील बेतशीर विहीर म्हणजे अनेकांची पोहण्याची Alma Mater च होती! त्यांच्या वाड्यातील लोकांच्या धुण्या भांड्यांसाठी ती वापरली जाई. पिण्याच्या पाण्यासाठी शहरात नळाने पाणी पुरवठा होतच असे. ह्या सर्व विहीरींनी आम्हाला पाण्याचे वेगळे, गंभीर तितकेच खेळकर रूप दाखवले. भव्य, देखण्या,खाऱ्या विहीरीकडे,मी दोन तीन दिवस जवळून फक्त एकटक नजरेने समोर पसरलेले पाणी पाहत असेन.किती वर्षे उलटून गेली.पण ती माझ्या डोळ्यांच्याही लक्षात राहिली आहे.

पुढे बरेच जणांनी आधुनिक स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचे सुख उपभोगले. पण ह्या चार विहीरींच्या पाण्यातील गंभीरतेची, भयोत्सुकतेची, मध्येच घाबरलेल्या नवशिक्यांच्या चित्कारांची, त्यांची गंमत करणाऱ्यांच्या हसण्या खिदळण्याची, उड्या आणि मुटक्यांनी सपकन चौफेर उडवलेल्या उंच फवाऱ्यांची, ‘गावच्या पाण्यात’ पोहण्याच्या आठवणी ते विसरले नसतील. कसे विसरतील? त्या आठवणी म्हणजे भाग्यानेच लाभावी अशी आमच्या गावच्या पाण्याची चव होती!

छटाकभर लेख!

बेलमॅान्ट

जुनी वजन मापे आठवताना अडीशेर किवा अडीसेर,अडीसरी हे चटकन आठवते. त्यातही लब्बा म्हणत असे ती हाक “छलो अडकी कुडरी अडीसरी वेंकटीऽ!” ही आजही ऐकू येते. त्यातला कानडी हेलातून म्हणलेला अडीसरी शब्द फार गोड वाटे! पासरी व धडा. किती अडीसरी म्हणजे पासरी? दोन? का ….? तसेच किती पासरी म्हणजे धडा?

मला बरोबर माहिती असलेली वजन मापे रुक्ष वाटली तरी वाचनीय आहेत.

धान्ये, मटकी चवळी सारखी कडधान्ये,डाळी, पीठे मोजण्याची मापे
सर्वात लहान माप चिमूट व नंतर मूठ . पण ही फक्त सोयीची व अंदाजाची. त्यामध्येच माशीच्या पंखाइतकी, नखभर, किंवा ‘ किंचित’ ह्यांचा समावेश करता येईल.

पण प्रमाणित मापे म्हणजे सर्वात लहान निळवे/ निळवं. २ निळवी = १ कोळवं. २ कोळवी = १ चिपटं . २ चिपटी= १ आठवा किवा आठवं. २ आठवी = १ शेर ही मापी वजने. चिपटे व शेर प्रत्येक घरात असे. लोखंडी पत्र्याचा किंवा काही ठिकाणी लाकडी. साधारणत: वाळूच्या घड्याळाच्या किंवा डमरुच्या आकाराचे. मान अवटाळली तर हा शेर डोक्याखाली घेऊन झोपले तर मान मोकळी होऊन दुखणे हमखास थांबायचे. दुखण्याच्या शेरावर हा शेर सव्वाशेर असायचा!

४ शेर = १ पायली. १६ पायल्या = १ मण. २० मण= १ खंडी.

दुधा तेलाची मापे.

दूध मापून देत व तेलही.
१ पावशेर ; २ पावशेर = १ अच्छेर (बहुधा अर्धा शेर ह्या अर्थी) २ अच्छेर = १ शेर.

तेल मोजून देताना १ १/२,(दीड पाव) पाव = १ अडीशेर (अडीच शेर) किंवा अडीसरी , २ अडीशेर किंवा अडीसरी = १ पासरी. २ पासरी = १ धडा. नमनाला धडाभर तेल तो हाच धडा!

मिठाई तोलताना (तराजूत वजने ठेवून) छटाक (हे लहान माप तेल मापतानाही असायचे.) हे सगळ्यात लहान माप होते; ४ छटाक = १ पावशेर. २ पावशेर = अर्धा शेर. २ अर्धा शेर किंवा ४ पावशेर = १ शेर , मिठाई नंतर शेराच्या पटीतच मागत. पण तेही फार थोडेजण.

वर सांगितलेली दीड पाव = १ अडीशेर किंवा पासरी ही मापे वांगी भेंड्या गवारी घेवडा ह्या सारख्या भाज्या तोलून देतानाही वापरत. तसेच सुपारी तीळ खोबरे साखर वगैरे वजन करून देतानाही वापरत.

सरपणाची लाकडे, कोळसा मोठ्या तराजूत तोलून देताना धडा, मण ही वजने असत. सोने तोलताना गुंज हे सर्वांत लहान माप. गुंजा दिसायलाही सुंदर असत. केशरी लाल व त्यावर देठाच्या जागी काळा ठिपका. गुंज चमकदार असे. सशाच्या डोळ्यांनाही गुंजेचीच उपमा आहे. ‘गुंजेसारखे लाल ( व लहान)डोळे लुकलुकत होते’.

तर अशा ८ गुंजा= १ मासा. १२ मासे= १ तोळा.

एखादी वस्तु अगदी थोडी घ्या किंवा द्या म्हणायचे असेल तर आधी म्हटल्याप्रमाणे, दोन बोटांच्या चिमटीत मावेल, चिमूटभर, माशीच्या पंखाएव्हढी, गहूभर, गव्हा एव्हढी म्हणले जात असे. कमी लांबीची सांगताना “ उगीच बोटाचे अर्धे किवा एका पेरा एव्हढे घ्या /द्या म्हटले जाई. नाहीतर “ एक टिचभर म्हणजेच अंगठा ते तर्जनी एव्हढे अंतर, जर त्या पेक्षा जास्त असेल तेव्हा एक वितभर म्हणत. विटी दांडू किंवा गोट्या खेळताना ही दोन मापे वारंवार उपयोगात यायची. पण कुणाची हेटाळणी करण्यासाठीही ह्याचा सढळ ‘हाताने’ वापर होत असे.

कापडाच्या दुकानात गज (तीन फुटाची धातूची,इंचाच्या व फुटांच्या खुणा असलेली जाड पट्टी ;आठवा रामसे बंधूंचा भयानक सिनेमा ‘ दो गज नीचे’ !!) सापडला नाही तर दुकानदार ‘हातभरा’चे माप काढून कापड मोजून द्यायचा. हातापासून खांद्यापर्यंत कापड ताणून घडी घालत एक, दोन अगदी अडीच ‘वार’ सुद्धा मोजून द्यायचा! दुकानदार किंवा नोकर लहान चणीचा असला तर त्यांचा फायदा! उंचापुरा मालक किंवा नोकर कधी ‘हातभर’ कापड मोजून देत नसे. पक्के गिऱ्हाईक त्याच उंचापुऱ्या नोकराकडून मोजा म्हणायचे. “ मोजून देताना हा दीड ऱ्फूट बांबू मोजणार; आम्ही परत आणले तर हा ताडमाड मोजणार. आणि तुम्ही निम्मेच पैसे देणार ! अरे वा!” असे सिनेमा छाप संवाद म्हणत लगेच दुसरे दुकान गाठले जायचे तिरिमिरीत ! आठवडे बाजारात बरीच वर्षे ही मापाची ‘हस्तकला’ मान्यता प्राप्त प्रथा होती. पण लवकरच हे हातघाईचे मोजमाप बंद झाले.

तराजूंचीही गोष्ट सुरस आणि चमत्कारिक आहे. तराजूची मधली दांडी गोल सळईसारखी असे. त्यावर मध्ये काटा.काटाही स्वयंभू असे. तो मखरात नसे. गिऱ्हाईकाच्या अंगावर हाच काटा येत असे. म्हणजे काय स्थिती असेल बघा तराजूची! वाळलेल्या तांबड्या मिरच्या मोजणाऱ्या तराजूंच्या करामती विचारू नका. तराजू टांगलेले नसत. फक्त किराणा दुकानात दर्शनी एक तराजू टांगलेला असे. त्यात एका तागडीत कायमचे वजन ठेवलेले असे. तुम्हाला पाहिजे असलेल्या भाराचे वजन ठेवल्यानंतरच ते अढळपद लाभलेले वजन काढले जाई. केव्हाही दोन्ही तागड्या रिकाम्या दिसणार नाहीत.”बाजारपेठेत भोसकाऽऽ भोसकी” ही बातमी दुसऱ्या दिवशी आली तर समजायचे की त्याने रिकामी तागडीचा तराजू पाहिला होता !

बहुतेक व्यापारी, भाजीवाले हातात तागडी धरूनच वस्तू मोजून देत.ती त्यांची खरी हात चलाखी. दोन चार वांगी टाकली नाहीत तोवर ते तागडं खाली आलंच. अरे थांब पुन्हा बघू म्हटल्याव एक दोन वांगी टाकायला परवानगी मिळे गिऱ्हाईकाला. काय तो झटका किंवा पुन्हा बघू म्हणल्यावर मधल्या काट्यामागे तळहाताचा जोर लावून तो काटा वस्तुच्या तागडीकडे ढकलला की काटा साष्टांग नमस्कार घालतोय की काय वाटायचे. वा! किती ढळढळीत माप करून घेतले ह्या समाधानात अडीसरीत अदपाव वांगी घेऊन घरी आलो की फुगा फुटायचा.

तिखटाच्या मिरच्या मागितल्या तेव्हढ्या कुणाला मिळाल्या असतील ह्यावर श्रद्धाळू आस्तिकही विश्वास ठेवणार नाही. कुणी स्वस्त देऊ लागला तर “ माप बरोबर देणार ना? “ असे विचारून व्यवहारात किती मुरब्बी आहोत हे दाखवणारेही धडाभर मिरच्याचे पैसे देऊन पासरीभरच घेत आले आहेत! तिथे त्या तिखटाच्या खाटांत, नाक पुसत, शिंकत कुणाचे लक्ष तागडीकडे जातेय! गिऱ्हाईक आल्याबरोबरच विकणाऱ्याची बायको सुपात मिर्च्यांचे तुकडे बिया गिऱ्हाईकाच्या तोंडावर पाखडायला सुरुवात करायची. कधी पोरगं मिरच्याचा डोंगर खालून वर सारखा करायला लागे! साट् साट् शिंकत, रुमाल काढतांना पैशे खाली पडत नाहीत ना ह्या धसक्यात पुन्हा डोळे मिटून शिंकताना धडाभर मिरच्यांनी अर्धी(च)पिशवी भरलेली असे. मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत ना म्हणून पिशवी हलकी लागते असं म्हटल्यावर लहान भाऊ म्हणायचा , “मग तर जास्तच भरल्या पाहिजेत ना?” विषय बदलत, फसलेले वडील आपण पेरू घेऊ या म्हणत तिकडे वळायचे.

हे सगळे फार लहान व्यापारी असत. गुळाच्या दोन चार ढेपी घेऊन बसलेले किंवा भाजी बाजारात गवारीच्या शेंगा,मटार विकणारे तर नैतिक सफाई दाखवत. गुळवाला सुरुवातीला एकदम मोठेच ढेकूळ टाकायचा. आम्हाला आनंद व्हायचा. हा सढळ दिसतो बरं का. मग ते मोठ्ठे ढेकूळ काढून त्याहून बरेच लहान, ते काढून मध्यम आणि वर तुकडा तुकडा, चुरा टाकत निमिषार्धात ती तागडी खाली वज्रासन घालून तिचे कपाळ जमीनीला कधी टेकली समजायचे नाही. कारण तोपर्यंत डबल कागदात तुकड्यां- चुऱ्यासह तो खडा दोऱ्ऱ्याने गुंडाळलाही असे.

हीच तऱ्हा सोन्याच्या भावाचे मटार किंवा जवारी गवारीची. तागडी भसकन् त्या ढिगाऱ्यात खुपसली जायची. शिगोशिग भरलेली तागडी एकदाच दिसे त्यामुळे ती डोळे भरून पाहताना हा इकडे हाताने त्यातली तितक्याच वेगाने भसा भसा खाली टाकत असे. राहिले ते गंगाजळ म्हणत पिशवीत घ्यायची. तोपर्यंत तराजूच्या दोन्ही बाजूला असलेल्या कड्यांच्या भिकबाळ्यांचा आवाज करत तागडी घडी घालून निमूट बसलेली असे. वजनांकडे पाहिले तर अडीसेराची बरोबर असत. “पुन्हा मोज;”थांब थांब; “घाई नको करू “ ह्या विनवण्या प्रत्येक ओट्याकडून ऐकू येत.पण हे असे होणारच. ते भाजीवालेही हे आपले रोज फसवून घेणारे गिऱ्हाईक म्हणून अधून मधून मूठभर घेवड्याच्या शेंगा, तीन चार वांगी “राहू द्या, घ्या, आज बक्कळ हैत” म्हणत पिशवीत टाकत.

मोठ्या व्पापाऱ्यांपुढे किंवा कधी जायची पाळी आलीच तर सराफा- सोनाराकडे, तिथे शब्द काढायची हिंमत नसलेले आम्ही गिऱ्हाईक मंडळी आपला धीटपणा भाजीबाजारात दाखवण्याचा प्रयत्न करीत असू. इतकाच सारांश.

असाच काहीसा प्रकार लाकडाच्या वखारीत व्हायचा. मालकाचा विश्वासू नोकर सरपणाची लाकडे, किंवा साली, बंबफोड तागडीत टाकायचा. खंडी भराची वजने बाहेर ठेवायचा. की लाकडांनी भरलेली तागडी खाली यायची. मग आमच्या सारख्या गिऱ्हाईकाला पाहिजे तितक्या भाराची वजने टाकायचा. काटा पूर्ण मागे जाण्या पूर्वीच लाकडाची चौकोनी तागडी सराईत पणे ओतायचाही!
पावसाची वाट शेतकऱ्यांपेक्षा लाकडाची वखारवाले आतुरतेने पाहात. सुक्याबरोबर चार ओलीही वजनात भर टाकता यायची नां!

लेखकाने शक्यतो तोलून मापून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण टीकाकार ‘दीड दांडीचा तराजू वापरून’ लिहिले अशी टीकाही करतील. सध्या न्यायालयांचा तराजूही झुकलेला आहे तिथे माझ्यासारख्या छटाकभर लेखणीच्या लेखकाची काय कथा! वजन मापाच्या तपशीलातील चु. भू. द्यावी घ्यावी!

भाज्यांमधील अनवट राग!

भाजीऽ!भाजी घ्याऽऽ! आली लई ताजी ताजी.” “ हिरवीग्गार! ताजी फ्फाऽर! कितीत्त्ताजी !” “ सस्ती झाली हो! लई सस्ती लावली वांगी! मेथी घ्या! चुका घ्या!चाकवत घ्घ्या करडीची भाजी घ्घ्याऽऽ ! अशा निरनिराळ्या शब्दांत गुंफलेल्या आरोळ्यांच्या निरनिराळ्या आवाजांनी सकाळ सुरु व्हायची. भाज्यांच्या हातगाड्या, टोपल्या,मोठ्या पाट्या भरभरून भाज्यांची वर्दळ सुरु व्हायची. पाले भाज्या खूप तजेलदार दिसत. वांगी,टमाटे, दुधी भोपळेही चमकत असत! हे दारावर येणाऱ्या भाज्यांचे झाले. भाजी बाजारात(मार्केट) मध्ये गेलो तर मग पहायलाच नको. निरनिराळ्या रंगांच्या भाज्यांची रंगपंचमीच असे. आणि त्यात रविवार असावा. तोही दसरा दिवाळीच्या थंडीतला.मग काय! तिथे असंख्य भाज्यांचे डोंगर रचले जात. सगळे ओटे, फरशा , खाली जमीनीवर भाज्या लिंबं, भाज्या हिरव्या मिरच्या काय काय आणि किती नाना तऱ्हेच्या रंगांच्या भाज्या ओसंडत असत.

त्या मोसमांत आणि एरव्ही सुद्धा भाजी बाजारात जाणे हा सहलीला जाण्याइतकाच मोठा आनंद होता. हा भाजीपाल्याचा तजेलदार रंगीत बाजार पाहून एकच पिशवी आणल्याचा पश्चात्ताप होई.

भाजीतील नेहमीचे यशस्वी कलाकार मेथी, आळु चुका , राजगिरा, करडी/ करडई, शेपू, तांदुळसा, अंबाडी, असतच. पालकाची एन्ट्री अजून व्हायची होती. चुका, चाकवत आणि चंदनबटवा ही च च्या ‘च’मत्काराची त्रिमूर्तीही विराजमान झालेली असे.

संगीतात जसे काही नेहमी न गायले जाणारे अनवट राग असतात तशाही भाज्या असायच्या.
त्यामधील पालेभाज्यातील दोन ठळक नावे म्हणजे माठ आणि घोळ! ही नावेही ज्यांनी ठेवली असतील ते खरेच मिष्किल बेरकी असले पाहिजेत! वाक्प्रचारातला ‘ घोळात घोळ’ ह्या भाजीवरून आला की भाजीचे रूप पसाऱ्यावरून भाजीला हे नाव दिले! ह्या दोन्ही भाज्या एका अर्थाने खऱ्या अपौरुषेय, स्वयंभू म्हणाव्या लागतील. घराच्या अंगणात काही पेरावे लागत नाही की वाफे आळे अशी विशेष सरबराई सुद्धा ह्यांना लागत नाही. आपोआप उगवतात,त्यांची ती वाढतात,पसरतात! माठ व तांदुळसा एकाच जाति प्रकारातला. पण माठाची पाने लहान असतात. घोळाची पाने लहान,गोलसर जाड आणि गुलाबी देठांची. गवतासारखी पसरलेली.

आणखी दोन अनवट भाज्या म्हणजे मायाळू व शुक्रवारच्या कहाणीमुळे प्रसिद्ध झालेली कनीकुरडु किंवा कनी कुरडईची. मायाळूचे वेल असतात. दोन प्रकारचे. एक नेहमीसारखा हिरव्या वेलीचा तर दुसरा गुलाबी देठांचा. पानांची पाठही फिकट, कळत न कळत अशा गुलाबी रंगाची. भाजीही करत असतील पण भज्यांसाठी प्रसिद्ध होती. तशीच कनी कुरडुचीही. आणखी असाच एक भाजीपाला होता. तो म्हणजे पाथरीचा! खरा गावरान! भाजी करतही असतील पण जास्त करून तो थेट मीठ लावून शेंगदाण्यासह खायचा. त्यामुळे भाकरीचा घास आणखीनच चविष्ट लागायचा.

आणखी दोन भाज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या अनवट रागांतील भाज्यांची मालिका पूर्ण होणार नाही. पठाडीच्या शेंगा आणि चौधारी ! पठाडीच्या शेंगा ह्या साधारणत: आठ-दहा इंच लांब,हिरव्या आणि मऊ असतात. चौधारी ही भाजी की सॅलाडचा प्रकार माहित नाही. कधी खाल्ली नाही. पण आकारामुळे लक्षात राहिलेली आहे. ह्याचीही सहा ते आठ इंच लांबीचे चौकोनी तुकडे/कांड असत. चारी कडांना, फिरत्या दरवाजाला असतात तसे पांढरट हिरवे, उभे काचेचे पाखे किंवा पडदे म्हणा असत. पडदे म्हटल्यावर लगेच फार काही मोठे डोळ्यासमोर आणू नका. कल्पना यावी म्हणून तसे म्हटले. अगदी अरुंद. त्यांच्या कडा अगदी फिकट कोवळ्या हिरव्या असत. त्या पालवीसारख्या वाटत. चौधारी नाव अतिशय समर्पक वाटते. पण म्हणताना मात्र आम्ही ‘चौधरीच्या’ म्हणत असू!
कडवंच्यांच्या विषयी सांगितले नाही तर काहीच सांगितले नाही !

कडवंच्या नावही वेगळे रुपही आगळे! बहुतेक सर्व भाज्याप्रमाणे ह्यासुद्धा हिरव्या रंगाच्याच. लहान; बोटाच्या एका पेराएव्हढ्या. दुधी भोपळ्याला आपण लिलिपुटच्या राजधानीत आल्यासारखे वाटेल. आकार मध्ये फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला. दोन लहान शंकू एकमेकाना चिकटवल्यावर जसा निमुळत्या होत जाणाऱ्या इटुकल्या मृदुंगासारखा. पृष्ठभागही रेघांचा. आत मध्ये थोड्या अगदी लहान बिया असतील नसतील इतपत. पण त्यामुळे चावताना कडवंच्या किंचित कुरकुरीत लागायच्या. तेलाच्या फोडणीत परतून तिखट मीठ आणि तळलेले किंवा भाजलेले ऱ्शेंगदाणे घालायचे. भाकरी बरोबर खायला एकदम झकास. थोडीशी कडसर चव असलेल्या ह्या कडवंच्या आपल्या वेगळेपणाने ही भाजी की चटणी असे वाटायची.तरी स्पेशल तोंडी लावणे म्हणून जेवताना मधून मधून खाण्यात गंमत यायची.

रानमेव्यातल्या बोरं पेरू आवळा ह्यातील चिंचा कुठेही सहज मिळणाऱ्या! चिंचा होण्याआधी त्याच्या कळ्या व लहान लहान फुलांचे गुच्छ आल्यावर, त्यांच्या गुलाबी पांढऱ्या बहराने झाड सुंदर दिसायचे. ती कळ्या फुले म्हणजे चिगुर. त्यांच्या बरोबरीने चिंचेची कोवळ्यांपेक्षाही कोवळी पालवी तर खायला किती मजा येते ते सांगता येत नाही. कोवळा चिगुर पालवी खाणे हा सुट्टीतला खरा उद्योग असे. रस्त्याच्या कडेला दिसला आणि हाताशी असला तर सोपेच. नसला तर फांद्या खाली ओढून तो ओरबडून मूठी भरून घ्यायचा. नुसता खाल्ला तरी झकास आणि किंचित मीठ व चवीला गुळ घालून खाल्ला तर खातच राहावा असा चिगुर असे. तर ह्या चिगुराचीही बाजारात आवक होत असे. (काही ठिकाणी चिघोळ,चिगोळही म्हणूनही ओळखत असतील) ह्या चिगुराची, तो व तीळ भाजून केलेली चटणीही खमंग लागते. आणि ती त्या मोसमात अनेक घरात होत असे.

समाजातील विषमता वेगवेगळ्या प्रकारे असते. पण ठळकपणे उच्च, मध्यम व,कनिष्ठ वर्ग ह्यातून दिसतेच. भाज्यांतही हे वर्ग आहेत. कारण आमच्या ह्या माठ,घोळ, पाथरीची पाने, तांदुळसा, आणि चिगुर ह्यांना बाजारात मोक्याच्या जागी प्रतिष्ठित भाज्यांच्या बरोबरीने जागा मिळत नसे. बाजारातील रुळलेल्या मळवाटा सोडून वाकडी वाट करून गेलो तर एखाद्या कोपऱ्यात,जमिनीवर हे विक्रेते साधी पोती, कापड पसरून त्यावर घोळाचे,पाथरीच्या पानांचे,कडवंच्या आणि चिगुराचे लहान लहान ढिगारे ठेवून बसलेले दिसत. विकणारेही ह्या भाज्यांसारखेच साधे व गरीब वाटत. आमच्यासारखे सामान्य माहितगार तिकडे वळले की त्यांचे चेहरे खुलत. ते सावरून बसत. तांदुळसा किंवा माठाची पेंडी, कडवंच्याचे, चिगुराचे एक दोन ढिगारे घेतले की ती गावाकडची मंडळी खूष होत. मग वर एक चिमुटभर चिगुर व चार कडवंच्या आपणहून पिशवीत टाकत! पठाडीच्या शेंगाही ह्यांच्या पथारीवर दिसत. पण क्वचित. पठाडीला ती नेहमी मिळणारी नसल्यामुळे जेव्हा येत तेव्हा त्यांना ओट्यांवर स्थान मिळे. तीच गोष्ट सुंदर हादग्याच्या फुलांची.

आणखी एका भाजीची ओळख करून द्यायची राहिली. ती शेंगाच्या प्रकारातली आहे. ती आजही मिळते पण आमच्याकडे पूर्वी तिचे स्वरूप निराळे व नावही निराळे होते. आज मुळ्याच्या शेंगा ह्या नावाने मिळणाऱ्या लांब शेंगा पूर्वी डिंगऱ्या ह्या नावाने ओळखल्या जात. त्यावेळी त्या अशा लांब नव्हत्या.दीड दोन पेराएव्हढ्याच पण फुगीर. भाजीत रस (पाणी) ठेवायचा. जेवायला बसेपर्यंत त्यांतील हे खमंग रसपाणी थोडेसे ह्या डिंगऱ्याच पिऊन टाकीत. भाजी खाताना रसपाण्याने जास्त टपोऱ्या झालेल्या ह्या डिंगऱ्या खाताना त्यांतील रसाची एखादे वेळी लहानशी चिळकांडी तोंडात उडाली की कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. आमच्या बहिणीने ह्या डिंगऱ्यांचे रसमधुर बारसे केले होते. ती त्यांना तिखट मिठाच्या जिलब्या म्हणायची!

आज ह्या भाज्या आमच्या गावात मिळतात की नाही माहित नाही. मिळत असतील तर लोक अजूनही भाग्यवान आहेत म्हणायचे. लहान गावात मिळतही असतील. पण शहरातील मंडईत दिसत नाहीत.

मंडईत गेलात आणि ह्या अनवट भाज्यांपैकी काही मिळाल्या तर नमुन्याला का होईना जरूर घ्या. तोंडाला चव येईल !