रेडवूड सिटी
उन्हाळ्याची सुरवात म्हणजे प्रसन्नतेला आलेली पालवी ! सगळा परिसर उत्साहाने भारलेला असतो. कळ्या उमलत असतात. फुले बहरु लागतात. पानोपानी मोहर फुलत असतो. बागेत, फुलांवर लहान भुंग्यांची वर्दळ वाढत असते. हलकासा सुगंध दरवळत असतो. गवतही अजून लुसलुशीत असते.
“मिनर्व्हा मासिका”चा संपादक वेस्टब्रुक ब्रॉडवेवरच्या आपल्या नेहमीच्या हॉटेलातील ठराविक कोपऱ्यात बसून नुकताच जेवून बाहेर पडला होता. या सृष्टी सौंदर्याला भाळूनच संपादक वेस्टब्रुक आपला नेहमीच रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागला. सव्वीसाव्या रस्त्यावर पूर्वेकडे वळला. पाचव्या अवेन्यू वरील रहदारी ओलांडून आणि वळणे घेत मॅडिसन स्क्वेअरकडे आला. समोरच्या पार्कमधले हिरवळीचे दृश्य मोठे मनोहारी होते. तशात बाकांचा रंगही हिरवा. वेस्टब्रुकच्या संपादकीय दृष्टीला मात्र तो उदास हिरवा होता. तरीही त्या शहरी संपादकाला तो देखावा एक सर्वोत्कृष्ट चित्र भासत होते.
नेमक्या शब्दांचा तसेच शब्द कसे टोकदार असले पाहिजेत याचा आग्रह धरणारा, कथेला धार असली पाहिजे म्हणणारा, भावनांचा वेग त्या किती खोलातून उमटल्या त्यावर पाहिजे असे मानणारा, जशी घटना तसे शब्द आणि त्यांचा आवाजही शब्दातून आला पाहिजे असे सांगणारा, प्रत्येक शब्द तोलणारा आणि शब्दांच्या जगातच वावरणारा संपादक वेस्टब्रुक आज चाकोरी सोडून हवेतील सुगंध, फुलांचा वास घ्यायला कसा काय वळला ह्याचे त्याला ओळखणाऱ्या सर्वाना आश्चर्य वाटले असते.
वेस्टब्रुक आज खुशीत होता. तो संपादक असलेल्या मिनर्व्हा मासिकाच्या ह्या महिन्याच्या खपाने उच्चांक गाठला होता. अवघ्या दहा दिवसात मासिकाच्या सर्व प्रति विकल्या गेल्या होत्या. अनेक विक्रेत्यांची “अजून पन्नास तरी प्रति पाठवून द्या ” अशी मागणीहोती. मालकांनी वेस्टब्रुकचा पगारही एकदम वाढवून दिला होता ! प्रकाशकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या समारंभात त्याचे भाषणही झाले. सर्व वृत्तपत्रांत ते आज छापून आले होते. मग संपादक वेस्टब्रुक खूष का असणार नाही? सकाळी ऑफिसला जाताना त्याच्या बायकोने गाणे म्हटले होते. सध्या त्याची बायको गाण्याच्या क्लासला जात होती. त्यामुळे मुळात बऱ्यापैकी म्हणणारी आता ती गाणे सुरेख म्हणू लागली. किती दिवसांनी वेस्टब्रुकने तिचे आज कौतुकही केले होते! त्याही पेक्षा त्याला सुखावणारी गोष्ट म्हणजे त्याने कौतुक केले ह्या आनंदात तिने त्याला मिठीतही घेतले ! त्याचा हा खरा आनंद होता. भले पुष्कळ दिवसांनी का असेना !
पार्कमध्ये बाकावर बसलेल्या भटक्या, निरुद्योगीआणि रिकाम टेकड्या, कामधंदा नसलेले, काही बेवडे आडवे झालेले, या सर्वांकडे कोरड्या नजरेने संपादक वेस्टब्रुक पाहत चालला असताना अचानक कोणीतरी त्याच्या कोटाची बाही ओढू लागला. भिकारी असला पाहिजे या विचाराने त्याने मागे पहिले तर … ! तो डेव्ह शकलफिल्ड होता ! डेव्हचा चेहरा उदास खिन्न वाटत होता. जुन्या फाटक्या कपड्यातला डेव्ह ! आश्चर्य ओसरत असता वेस्टब्रुकला डेव्ह ची कथा आठवू लागली. डेव्ह लेखक. कथा कादंबऱ्या लिहिणारा लेखक. वेस्टब्रुकचा चांगल्या ओळखीचा. शकलफील्डजवळ त्या दिवसात बऱ्यापैकी पैसा होता. डेव्ह आणि वेस्टब्रुक दोघे चांगल्या वस्तीत शेजारी राहत होते. दोघांचे मित्र म्हणयाइतके चांगले संबंध होते. एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. दोघांच्या बायकांचीही चांगली गट्टी जमली होती. दोन्ही कुटुंबं हॉटेलात जेवायला किंवा नाटक,ऑपेराला एकत्र जात.
आणि एक दिवस असा आला की डेव्हजवळच्या पैशाला ग्रहण लागले ! त्याचे कुटुंब ग्रॅमर्सी पार्कच्या जवळ राहायला गेले. ती वस्ती अशी तशीच होती. घरात उंदीरही राहात असत. डेव्हने आपण कथा कादंबऱ्या लिहून त्यावर गुजराण करायचे ठरवले. त्या अगोदरही तो लिहित होताच. कधी मधी त्याची एखादी कथा छापूनही येत असे. वेस्टब्रुककडेही त्याने पुष्कळ कथा पाठवल्या. पण त्याने एक किंवा दोनच प्रसिद्ध केल्या असतील. बाकीच्या साभार परत पाठवत असे. बहुधा डेव्ह जुना ओळखीचा म्हणून असेल,किंवा संपादकीय दृष्टिकोनाचे प्रदर्शन करण्यासाठीही असेल, परत केलेल्या कथेबरोबर, आपण ती का प्रसिद्ध करू शकत नाही, याबद्दल तो कथेतल्या अनेक मुद्यांवर सविस्तर स्पष्टीकरण लिहून पाठवत असे.
संपादक वेस्टब्रुकची ललित साहित्याबद्दल काही ठाशीव मते होती. अर्थात डेव्ह सारख्या लेखकांचाही साहित्त्यआणि कला या संबंधात आग्रही दृष्टिकोन होता. पण सौ. डेव्हला मात्र ताटात रोज काय वाढायचे हा प्रश्न होता ! एकदा असाच डेव्ह काही फ्रेंच लेखकांच्या प्रतिभेबद्दल आणि लेखन शैलीसंबंधी रंगात येऊन सांगत होता. मध्येच त्याचे लक्ष ताटाकडे गेले. त्यात दिसेल ना दिसेल असे घासभर काहीतरी होते. त्याने लहान मुलाचेही भागले नसते! डेव्ह फक्त दोन्ही हात उघडून “हे काय”? अशा नजरेने पाहत राहिला. त्याने न विचारता, “हे तुमच्या मोपॉसोंचे रायते!” असे त्याची बायको रागाने म्हणत असता एकीकडे डोळेही पुसत होती. ” ती, चोखंदळ अभिरुचीला पटणारी साहित्य कला नसेल पण पाच पदार्थ ताटात पडण्यासाठी मॅरियन क्रॉफर्डसारखी मालिका आणि त्याबरोबर
जेवणानंतरच्या मिष्टान्नासाठी इला व्हीलर सारखे सॉनेट का लिहीत नाही? मला भूक लागली आहे!” रडव्या चेहऱ्याने त्याची बायको म्हणाली. पण हे एकदाच कधी झाले असेल.
डेव्ह शकलफिल्डने मॅडिसन स्क्वेअरच्या पार्कमध्ये वेस्टब्रूकची बाही ओढली त्यापाठीमागची पार्श्वभूमी अशी होती. कित्येक महिन्यानंतर वेस्टब्रुक डेव्हला पाहत होता.
” शॅक, तू ?” असे म्हटल्यावर संपादकलाच कसेतरी वाटले. आपण शॅकचा अवतार पाहूनच विचारतोय याची त्याला जाणीव झाली.
“जरा बस थोडा वेळ,” त्याची बाही ओढतच शकलफिल्ड म्हणाला. “हे माझे ऑफिस ! अशा अवतारात मी काही तुझ्या ऑफिसात येऊ शकत नाही. अरे खाली बस, माझ्याजवळ बसल्यामुळे तुझी प्रतिष्ठा कमी होणार नाही ! पार्कातली ही माणसे तुला फार मोठा माणूस समजत आहेत.पण तू एक संपादक आहेस हे त्यांना माहीत नाही !”
“सिगारेट घेणार?” संपादक वेस्टब्रुकने इकडे तिकडे पाहत बाकावर हळूच बसत विचारले.
डेव्हने जवळ जवळ झडप घालतच सिगारेट घेतली.
“मला अगदी— ” संपादक म्हणू लागला तेवढ्यात “मला माहीत आहे रे! मला काड्याची पेटी दे. माझ्यासाठी तुझ्याकडे फक्त दहा मिनिटेच आहेत, माहित आहे मला.” शकलफिल्ड हसायचे म्हणून हसल्यासारखे करीत म्हणाला.
” लिखाण कसे काय चालले आहे तुझे ?” संपादकाने विचारले.
“माझ्याकडे पाहिल्यावर समजतेच की,” डेव्ह म्हणाला. हां हां , माझे कसे भागत असेल, कसे होणार ह्या काळजीने तू मला, अरे मग तू एखादी नोकरी, टॅक्सी ड्रायव्हवरची सुद्धा का बघत नाहीस ? असले काही बोलत बसू नकोस. मी शेवटपर्यंत लढणारा लेखक आहे. मला माहीत आहे, मी उत्तम कथा लिहू शकतो. माझ्या कथा उत्तम असतात. एक दिवस असा उगवेल, तुम्हा संपादकांना हे कबूल करावेच लागेल. “सा-भा-र प-र-त “च्या पत्राऐवजी तुम्हाला “चे-क” पाठवावे लागतील !” शकलफिल्ड मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होता. संपादक थंडपणे ऐकत होता.
ज्या लेखकाचे लिखाण कोणीही छापत नाही अशा लेखकाकडे, कीव येऊन थोडीशी कणव अधिक थोडी सहानभूती,त्याशिवाय आपण साहित्यातले सर्वज्ञ आहोत अशा खास संपादकांच्याच चष्म्यातून वेस्टब्रुक शकलफिल्डकडे बघत, त्याचे बोलणे थंडपणे ऐकत होता.!
“मी पाठवलेली ” आत्म्याचा आक्रोश ” कथा तू वाचलीस का?” डेव्ह विचारत होता.
” हो. अगदी सावकाश आणि बारकाईने वाचली ती मी . त्या कथेविषयी मी द्विधा स्थितीत होतो. शक, कथेत काही भाग चांगला आहे. आणि ती परत पाठवण्यापूर्वी मी तसा उल्लेखही करणार आहे. पण दिलगीर आहे मी ती कथा … ”
“हे बघ, दिलगिरी वगैरे म्हणू नकोस. आता त्या शब्दांची इतकी सवय झाली आहे की त्यातला विखार आता जाणवतही नाही. मला एवढेच सांग त्या कथेत वाईट काय आहे?” पण अगोदर त्यात काय चांगले वाटले तिथून सुरवात कर.” शकलफिल्डने स्प्ष्टपणेच विचारले आता.
” कथा. कथेचा गाभा,त्यातील घटना. नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत. आवडल्या. पात्रांचे रेखाटन. सुरेख झाले आहे. मांडणी, बऱ्यापैकी चांगली म्हणता येईल. पण काही बदल करून थोडा विस्कळीतपणा काढता येईल. एकूणात कथा चांगली वाटते. पण ते… ”
” मी इंग्रजी लिहू शकतो, हो ना ? का नाही ?” डेव्हने विचारले.
“मी तुला नेहमी म्हणतो तुला लिहिण्याची शैली आहे. ”
“मग अडते कुठे प्रसिद्ध करायला ?”
” तुझा नेहमीचा मोठा दोष,” संपादक म्हणाला. ” कथा शिखरापर्यंत फार कौशल्याने नेतोस. सुंदर ! पण लगेच नंतर तुला काय होते कळत नाही ! हा कसला ताठरपणा ? तू फोटोग्राफर होतोस, नाही फोटोग्राफरही केव्हातरी एखादा क्षण असा पकडतो कि त्या वास्तवाचे एक कलाकृतीत रूपांतर होते. पणअटीतटीच्या उत्कट क्षणी तुझ्या लेखणीच्या फटकाऱ्यातून इतके रंगहीन, रटाळ कोरडे शब्द येतात की सगळा रसभंग होतो. अरे, तो रसपरिपोष करणारी भाषा वापरून, भावनांचा आलेख चढता ठेवत गेलास तर हवे असलेले नाट्य उत्कर्षाला जाईल. आवश्यक असलेल्या संघर्षाला धार चढते, खटकेबाज आणि मनावर प्रभाव पडणारे शब्द लिहिशील तर तुझ्या कथा कुठल्या कुठे उंचीला पोहचतील ! तुला मी बरेचवेळा हे सांगितलेही आहे. मग पोस्टमन तुझ्याकडे जाडजूड पाकिटे घेऊन येणार नाही.”
” ओहो ! वा! रंगमंचावर पडणारे प्रकाशाचे झोत ! व्हायोलिनचे आवाज ! ड्रमची धडधड ! पात्रांचे दणदणीत आवाज, गाण्याचे मंजुळ स्वर ! हे सर्व तुम्हाला पाहिजे तर ! डेव्ह मोठ्याने उपहासाने हसत पुढे म्हणाला. ” लहान मुलीला पळवून नेल्यावर तिच्या आईने हंबरडा फोडून आकाशाकडे हात नेत म्हटले पाहिजे, अरे माझ्या देवा! माझ्यावर आकाशातून कुऱ्हाडच कोसळली रे! देवा तू दयाळू म्हणतोस आणि ह्या मातेवर केव्हढा अन्याय करतोस !. कुठे शोधू माझ्या लाडक्या फुलाला ! देवा तूच सांग ! तू धावला नाहीस तर मी आकाशपाताळ एक करून माझ्या लाडक्या लेकीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवून आणेन ! ही एका मातेची प्रतिज्ञा आहे, लक्षात ठेव. ही भाषा, असा रसपरिपोष पाहिजे तुम्हाला. म्हणजे कथेची उंची वाढते! होय ना ?” शकलफिल्ड तिरस्काराने बोलत होता.
संपादक वेस्टब्रुकवर ह्याचा काही परिणाम झाला नाही. तो काहीशा समाधानानेच स्वतःशी हसला. “प्रत्यक्ष जीवनात, ती बाई ह्याच नव्हे पण अशाच तऱ्हेच्या शब्दात आपली भावना व्यक्त करेल.”
” फक्त दिव्यांच्या झोतात आलेली नाटकातली आईच असे म्हणेल. रोजच्या आयष्यात ती म्हणेल,” अगं आपली बेसी कुठाय ? घरात नाही बाहेर बघा बरं. तू शेजाऱ्यांकडे जाऊन पहा रे. शोधायला लागा. मी पोलिसांकडे जाते. माझी पर्स कुठे आहे? द्या द्या लवकर. माझ्या मध्ये मध्ये येऊ नको रे! यांना फोन करून ताबडतोब घरी यायला सांगा. लवकर. मी चालले पोलिसांकडे. अरे, मला तिचा फोटो दे ना!बरं. ये माझ्याबरोबर. तेवढेच बरे. घरात इतकेजण आहेत; काय करतात कुणास ठाऊक! लक्ष कसे दिले नाही तिच्याकडे?” असे काहीतरी म्हणेल. ” प्रत्यक्षात लोक अलंकारिक भाषेत बोलत नाहीत. खरे राजे महाराज तुमच्या भाषेच्या किंवा हालचालींच्या, शब्दातील त्याच्या आवाजातील च -उताराच्या कसोटीला उतरणार नाहीत. तुमच्या साहित्यातील राजे, रसनिर्मितीसाठी चालतात तसे ते खरे राजे सतत कंबरेला तलवार बांधून, तिच्या मुठीवर हात ठेवून राजवाड्यात किंवा महालात चालत नाहीत. वेस्टब्रुक, तुझ्या मताप्रमाणे त्या राजांनी जेवतानाही सिंहासनावर बसूनच जेवायला हवे ! आणि तेही वीरासन घालूनच ! हो हो ! शकलफिल्ड खोचकपणे हसत म्हणाला. अरे,लोक नेहमीच्या वापरातल्या शब्दातच बोलतात.”
“शक,” वेस्टब्रुक प्रत्येक शब्दावर जोर देत डाऊला विचारू लागला,” तू कधी बस खाली सापडलेल्या मुलाला हातावर घेऊन त्याच्या आईसमोर त्याला ठेवलेस का ?” कधी केले आहेस? तिने उस्फूर्तपणे केलेला शोक ऐकला आहेस? तिच्या तोंडून उस्फूर्तपणे पडणारे शब्द ऐकले आहेस?”
” मी कधी तसे केले नाही.” स्वत: तू तरी केले आहेस ? ते शब्द ऐकले आहेस?” शकलफिल्डने उलट प्रश्न केला. वेस्टब्रुक गांगरला . “ना–नाही” म्हणताना त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. “पण ती काय म्हणेल त्याची कल्पना करू शकतो.” वेस्टब्रुक म्हणाला.
“आणि मी सुद्धा.” शकलफिल्डने प्रत्युत्तर दिले.
प्रेषिताची भूमिका घेऊन पूर्वमतावर ठाम असलेल्या लेखकाला सुनावण्याचीआपल्याला संधी आली असे विचक्षण वेस्टब्रूकला वाटले. ज्या लेखकाच्या कथा साभार परत येतात त्या लेखकाने ‘मिनर्व्हा मासिकाच्या साक्षेपी, अभ्यासू तज्ञ संपादकाला नायक नायिका कसे बोलतात ते शिकवावे म्हणजे काय! संपादकाच्या श्रेष्ठ स्थानाला धक्काच आहे हा अशा सात्विक संतापाने आतून संपादक वेस्टब्रूक खवळला होता. पण बाहेरून अत्यंत थंडपणे तो बोलू लागला. माझ्या प्रिय शक, मला जीवनाविषयी जेव्हढे ज्ञान आहे त्यावरून मी खात्रीपूर्वक सांगतो, अकस्मात, अत्यंत खोलवर झालेल्या, जिव्हारी घाव बसलेल्या माणसाच्या भावनांचा उद्रेक तितक्याच समर्पक, त्याच तोडीच्या, तीव्रतेच्या, अनुरूप शब्दातून आणि उचंबळलेल्या भावनेतून होतो. भावना आणि शब्दांच्या ह्या अभिव्यक्तीतील साम्याला, कुणाला आणि किती श्रेय द्यायचे? नैसर्गिक स्वाभाविकतेला की कलेच्या सामर्थ्याला हे ठरवणे अवघड आहे . जंगलातल्या सिंहिणीचे बछडे जवळपास दिसत नाही म्हटल्यावर, तिच्या भयंकर डरकाळीतली आर्तता हृदयाचे पाणी करणारी असते.त्यावेळी ती आई असते. कोणी शत्रूप्राण्याची चाहूल लागल्यावरही तिची डरकाळी तेव्हढीच भयानक असते. पण आपल्याला ती ऐकून वाईट न वाटता भीती मात्र वाटते. हा अभिव्यक्ती मधला फरक लेखकानेही लक्षात घ्यायला हवा.” वेस्टब्रूक पुढे बोलू लागला,” पण हे तितकेच खरे आहे की प्रत्येक स्त्री पुरुषात नाट्यगुण सुप्तपणे असतात.कोणत्याही अतिशय तीव्र आघातामुळे चेतवल्या जाणाऱ्या तितक्याच तीव्र भावना रौद्र स्वरूपात प्रकट होतात. आणि अशा संवेदना नकळत वाङ्मय आणि रंगभूमीमुळे प्राप्त होत असतात. याची जाणीव आपल्याला नसते. पण त्याचमुळे साहित्यिक भासणाऱ्या त्याच तोलामोलाच्या शब्दांतून तो भावनावेग प्रकट होत असतो.” त्याचे बोलणे संपत असता वेस्टब्रूक स्वतःवरच खुश झालेला दिसत होता.
” आणि मला सांग, रंगभूमी आणि वाङ्मय हे सगळे कुणाकडून घेत असते रे ?” शकलफिल्डने बिनतोड सवाल केला !
“अर्थात आपल्या जीवनातूनच!” विजयी मुद्रेने वेस्टब्रूक ‘ जितं मया ‘ थाटात म्हणाला !
कथाकार काही ना बोलता हळू हळू उठला. हातवारे करत चेहऱ्यावरचे भाव बदलत तो काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत होता. पण काय म्हणायचे ते ठरत नसावे अजून. संपादक वेस्टब्रूक आपले घड्याळ काढून पाहत होता.
” वेस्टब्रूक, कोणत्या दोषांमुळे तू माझी ‘ आत्म्याचा आक्रोश ‘ कथा केराच्या टोपलीत टाकलीस?”
” त्याच्या प्रेयसीला घरफोड्या चोराने गोळी घालून ठार मारले हे जेव्हा गॅब्रिएल मरे फोनवर ऐकतो तेव्हा तो म्हणतो—मला नेमके शब्द आठवत नाहीत– पण–”
” मला माहित आहेत ते.” डेव्ह म्हणाला.” तो म्हणतो: ‘ हे काय झाले! ही नेहमी असेच मला तोडून टाकते. (मित्राला कडे ) ‘ बत्तीस बोअरची गोळी इतके मोठे भोक पडू शकते का रे? मला काहीतरी प्यायला दे रे !”
” आणि दुसऱ्या ठिकाणी जेव्हा बर्नी आपल्या नवऱ्याचे पत्र उघडून वाचायला लागते, तिला समजते की तो दुसऱ्या मुलीबरॊबर पळून गेलाय! आपल्याला सोडले आहे त्यांनी! तेव्हा ती काय म्हणते … काय म्हणते…”
” ह्याला काय म्हणायचे! ” असे म्हणते ती लेखक म्हणाला .
” अरे नवऱ्याने जिला सोडून दिले ती असे कधी तरी म्हणेल का अशा वेळी?” किती निर्जीव, अर्थहीन आणि रसहानिकारक शब्द ते ! ‘
‘ ह्यालाच मी कथा शिखरावरून दरीत कोसळते म्हणतो ! गडगडत गेली की तुझी कथा ! ” त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे अशा अतिसामान्य शब्दांमुळे कथा, जीवनाचे पूर्णपणे विसंगत चित्र उभे करते. अति दुःखाच्या प्रसंगी किंवा कोणत्याही भावनांचा कल्लोळ होतो तेव्हा इतके नि:सत्व आणि निर्जीव शब्द कोणीही उच्चारत नाही.” ती तुझी बर्नी काय म्हणते तर “ह्याला काय म्हणायचे!” वेस्टब्रूक तिडिकेने म्हणत होता.
” चूक ! एकदम चूक !” शकलफिल्ड त्याच्यावर कसलाही परिणाम न होऊ देता म्हणत होता. कोणताही पुरुष किंवा स्त्री आयुष्यातल्या अडचणीच्या किंवा संकटाच्या वेळी भाषेचा फुलोरा मिरवणारे शब्द वापरत नाही. ते त्यांच्या स्वभावाला धरून बोलत असतात. किंवा नेहमीपेक्षाही सपक शब्द वापरतात.”
संपादक, अडाणी माणसाचे बोलणे काय ऐकायचे असा चेहरा करीत, ऐकल्यासारखे दाखवत उठला.
शाकालफिल्ड जणू काही सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहायचे नाही या निश्चयानेच तो वेस्टब्रूकला शेवटचे विचारायचे ठरवून म्हणाला ,” हे बघ, वेस्टब्रुक, माझ्या कथेतील व्यक्ती त्या त्या वेळी जसे बोलतात आणि करतात ते जर तुला मान्य असते तर तू कथा छापली असतीस?”
” मी ती छापली असती. शक्यता नाकारत नाही. माझे कथा आणि साहित्याबद्दल तुझ्या सारखेच विचार आणि मत असते तर ती मी छापलीही असती. पण माझी मते तशी नाहीत हे तुला चांगले माहित आहे.”
” आणि समजा माझे म्हणजे बरोबर ते हे मी सिद्ध करून दाखवले तर?” डाऊने त्याला आव्हान दिले.
” मला माफ कर शकलफिल्ड , तुझ्याशी वाद घालायला मला वेळा नाही.” त्याला झटकुन टाकत वेस्टब्रूक म्हणाला.
” मलाही वाद घालायचा नाही. आज मी तुला रोजच्या आयुष्यातूनच माझे म्हणजे सिद्ध करून दाखवणार आहे. तुझी खात्री पटेल की माझेच बरोबर आहे.”
“आणि हे तू कसे सिद्ध करणार ?” या वेस्टब्रूकला आश्चर्य वाटले. ” ऐक. मला मार्ग सापडला आहे. वास्तव जीवनाशी साहित्य–वाङ्मयाने प्रामाणिक असावे हा माझा सिद्धांत माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि तो मासिकांना आणि संपादकांना बिनशर्त मान्य व्हावा अशी माझी इच्छा आहे. साहित्य हे रोजच्या जीवनाशी संबंधित असावे यासाठी तीन वर्षे मी माझ्या कथेतून झगडतो आहे. आज माझ्याकडं शेवट्चा एकच डॉलर शिल्लक आहे. घराचे दोन महिन्याचे भाडे देणे थकले आहे ! ”
” तुझ्या सिद्धांतापेक्षा माझा वाङ्मयीन सिद्धांत वेगळा आहे. तुला माहीतच आहे. त्याच मताच्या आधारे मी मासिक चालवतो. कथा कविता निवडतो. माझ्या मासिकाचा खप आज नव्वद हजारावरुन —”
” चार लाखाच्यावर गेला आहे, ” शकलफिल्ड त्याचे वाक्य पुरे करीत म्हणाला.” खरे म्हणजे तो दहा लाखापर्यंतही गेला असता !”
” तू आता मला तुझे मत सिद्ध करण्यासाठी प्रात्यक्षिक दाखवणार म्हणत होतास … ”
” हो. दाखवणार आहे. मला फक्त अर्धा तास दे तुझा. मी तुला माझे म्हणणेच खरे आहे हे पटवून देईन. आणि माझ्या ल्युसी कडूनच ते सिद्ध करून देतो.” डेव्ह खात्रीपूर्वक म्हणाला. ”
” काय ल्युसीमार्फत ?!” ते कसे ?” वेस्टब्रूक आश्चर्यात पडला !
” ल्युसीच्या मदतीने म्हणायचे होते मला. तुला माहीत आहे की ल्युसीचे माझ्यावर किती प्रेम आहे ते. तिला अलीकडे मी जास्तच प्रिय आणि आवडायला लागलो आहे. माझी फार काळजी घेते आणि माझी काळजीही करते. सध्याच्या बाजारू साहित्य जगात मीच एक अस्सल नाणे आहे हा तिचा माझ्यावरचा विश्वास आहे. ती माझी सखी-सहचारिणी-आणि सचिव आहे. बायको किती आदर्श असावी त्याचाच ती एक आदर्श आहे !”
” खरे आहे तुझे म्हणणे शक ! बायको कशी असावी तर तुझ्या ल्युसी सारखी असेच मी म्हणेन. मला आठवतेय, माझी बायको आणि तुझी ल्युसी पूर्वी किती जीवश्च मैत्रिणी होत्या. आपण दोघेही या बाबतीत भाग्यवान आहोत,डेव्ह . तू तुझ्या ल्युसीला घेऊन एकदा आमच्याकडे ये. पूर्वीसारखे आपण पुन्हा एकत्र बसून गप्पा मारत जेवण करू या.”
” नंतर, मला नवीन शर्ट घेता आला तर !” शकलफिल्ड म्हणाला. “आता तुला माझी योजना सांगतो. मी ब्रेकफास्ट घेऊन- चहा आणि ओटमिलला ब्रेकफास्ट मानायचे तर- इकडे येताना ल्युसी म्हणाली ती एकूणनव्वदाव्या रस्त्यावर असलेल्या तिच्या काकूंकडे जाणार आहे. आणि तीन वाजता परत येईल. वेळेच्या बाबतीत ती फार काटेकोर आहे. बरोबर तीन वाजता म्हणजे तीन वाजता येईल. आता वाजलेत—” डेव्ह संपादकाच्या घड्याळाकडे नजर टाकत म्हणाला.
” तीन वाजून सत्तावीस मिनिटे झाली आहेत.” वेस्टब्रूक म्हणाला.
“आपल्याला पुरेसा वेळ आहे. आपण माझ्या घरी जाऊ या. तिथे मी एक चिठ्ठी ल्युसीसाठी लिहून तिला नेमकी दिसेल अशा बेताने टेबलावर ठेवतो. तू आणि मी डायनिंग रूमच्या पडद्याआड राहू. ‘ मी आज, माझ्या कलेची खरी जाणीव आणि कदर असलेल्या एकीबरोबर निघून जात आहे . तुला माझी योग्यता कधीच कळली नाही; ह्याचे मला दुःख आहे.’ अशी चिठ्ठी असेल..जेव्हा ती चिठ्ठी वाचेल तेव्हा ती काय करेल, म्हणेल ते समजेल. तुझं मत बरोबर की माझा सिद्धांत खरा, हे लगेच सिद्ध होईल ! हातच्या
काकणाला आरसा कशाला? असेच तुमचे पात्र म्हणेल नाही का ?” हसत हसत शकलफिल्ड म्हणाला .
” नाही नाही ! असे काही नाही करायचे! ” आपली मन हलवत वेस्टब्रूक म्हणाला. असला निर्दयपणा मी तरी करणार नाही. तुझ्या पत्नीच्या भावनांशी असला क्रूर खेळ खेळणे मला अजिबात पसंत नाही.” वेस्टब्रूक किंचित थरथरत्या कापऱ्या आवाजात बोलत होता.
” शांत हो. तुला तिच्याविषयी वाटते त्यापेक्षा मला जास्त वाटते. हे तिच्या आणि माझ्या दोघांच्याही फायद्याचे आहे. माझ्या कथांना मागणी येईल.अरे! मग तुही छापू लागशील. ल्युसी ह्याने दुखावली जाणार नाही. ती तशी मनाने माझ्यापेक्षाही खंबीर आहे. काळजी करू नकोस. मी लगेच बाहेर येऊन खुलासा करेनच की. वेस्टब्रूक, इतकी तरी संधी तू मला देणे भाग आहे.” डेव्ह वेस्टब्रूकला पटवून देऊ लागला.
हो ना करता वेस्टब्रूक अखेर तयार झाला. पण बऱ्याचशा अनिच्छेनेच. संपादक असल्यामुळे ह्याचे व्यवच्छेदक लक्षण काय, परिणाम काय, सर्व सहित्य विश्वावर कसा परिणाम होईल, आपल्या मासिकाच्या धोरणावर किती परिणाम होऊ द्यायचा. खप वाढेल की कमी होईल?असे सतराशे साठ प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ लागले. ह्या विचारातच वेस्टब्रूक असतानाच ते दोघे डेव्हच्या घराकडे निघाले.वस्तीसारखाच रस्ताही अस्वच्छ ! शकलफिल्डच्या घरी आले. घरची अवस्था इमारतीच्या अवताराला शोभण्यासारखी होती. तिकडे लक्ष न देता जिने चढत पाचव्या मजल्यावर असलेल्या घरात दोघेही धापा टाकत शिरले.
“खुर्ची घे, तुला कुठे सापडली तर ,” डेव्ह वेस्टब्रूकला म्हणाला. मी पेन आणि कागद आणतो. अरे हे काय ? ल्युसीची चिठ्ठी आहे. तिच्या परत येण्याची वेळ बदलली काय? बाहेर जाताना निरोप लिहून गेलीय वाटतं,असे म्हणत शकलफिल्ड पाकीट फोडून चिट्ठी मोठ्याने वाचू लागला. शेवटपर्यंत तो ती मोठ्या आवाजातच वाचत होता ! वाक्या वाक्याला त्याचा आवाज चढतच होता ! वेस्टब्रूकला शॅकलफिल्डच्या मोठ्या आवाजातले शब्द ऐकू येत होते.:
” प्रिय शॅकलफिल्ड ;
” हे पत्र तुला मिळे पर्यंत मी शंभर मैल दूर गेलेली असेन आणि आणखीही पुढेच जात राहाणार आहे. मला ऑक्सीडेंटल कंपनीच्या कोरसमध्ये घेतले आहे.
” मला अर्धपोटी राहून जगायचे नव्हते, म्हणजेच मरायचे नव्हते. मी माझ्या बळावरच उभे राहायचे ठरवले. मी आता काही झाले तरी परत येणार नाही. माझ्या बरोबर मिसेस वेस्टब्रूकही आहे. ती म्हणत होती,” फोनो, बर्फाची थंडगार लादी आणि डिक्शनरी यांच्या मिश्रणा बरोबर मला दिवस काढायचे नाहीत.” आणि तीही आता परत माघारी येणार नाही. आम्ही दोघी गेले दोन महिने गाण्याची प्रॅक्टिस करत होतो. कुणालाही कळू न देता. तुला यश मिळेल अशी आशा करते. तुझे चांगले चालावे, ही सदिच्छा. गुड बाय !
” ल्युसी ”
डेव्हच्या हातातून पत्र गळून पडले. त्याने दोन्ही हातानी आपला चेहरा झाकून घेतला आणि मोठ्याने गळा काढून हमसून हमसून रडत तो आक्रोश करू लागला. आकाशाकडे दोन्ही हात नेत म्हणू लागला,
” हे देवा, अरे माझ्या परमेश्वरा ! मी असे कोणते पाप केले म्हणून हा विषाचा कडू जहरी प्याला मला प्यायला दिलास? ती अशी विश्वासघातकी, नाटकी निघाली, तर हे आकाशातील परमदेवा ! तुझ्या स्वर्गातील दैवी देणग्या, श्रद्धा,आणि प्रेम ह्या पवित्र समजल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे फितूराची, द्रोह्याची आणि सैतानाचीच प्रतीके म्हटली पाहिजेत ! माझ्यासाठी तरी ती तशीच झाली आहेत रे ! सैतानाचीच प्रतीके झाली आहेत रे देवा !”
संपादक वेस्टब्रूकचा चष्मा खाली पडला. बोटाने कोटाच्या बटनाशी काहीतरी चाळा करतअसता, अचानक त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठातून शब्द बाहेर पडत होते :-
” अरे, ती चिठ्ठी भयंकरच नाही का?” तिने तुला बाजूला ढकलूनच दिले. हो ना ? शक, आता काय म्हणायचे या स्थितीला ?”
O’Henri च्या Proof of The Pudding या कथेचे स्वैर भाषांतर !