Church 20

गेली बारा वर्षे त्या चर्चमध्ये वीस गायकभक्त स्तोत्रे भक्तीगीते म्हणत असत. सराव करण्यासाठी दर रविवारी सकाळी गानवृंदातील ते वीसजण बरोबर ९च्या ठोक्याला हजर असत. आजपर्यंत ते सर्वच्या सर्व, वीसही गायक एकाही रविवारी एक क्षणही उशीरा आलेले नाहीत. नऊची वेळ ते इतकी काटेकोरपणे पाळत असत की सगळ्या गावाला त्यांच्यामुळे रविवारी सकाळचे नऊ वाजल्याचे समजत असे. विशेष म्हणजे त्यांच्यापैकी एकही जण कधी उशीरा आला नाही.

एका रविवारी सकाळी ते लहान गाव भयंकर मोठ्या स्फोटाने हादरून गेले. एव्हढा मोठा आवाज कशाचा, कुठून आला हे पाहण्यासाठी लोक भराभर बाहेर पडले. चर्चच्या खिडक्यांतून आगीचे,धुराचे ळोळ येत होते. लोकांनी घरातील आपापल्या सगळ्या घड्याळांत पाहिले. नऊ वाजून दहा मिनिटे झाली होती!

काही लोक रडू लागले. काहीजण डोके गच्च धरून मटकन खाली बसले. म्हाताऱ्यांच्या हातातील काठ्यांबरोबरच तेही खाली पडले. हुंदके, आक्रोश, रडक्या आवाजातील बोलणी एकू येत होती. आगीचा बंब येण्यापूर्वीच संपूर्ण चर्च आगीत जळत होते.

“गॅसचा स्फोट झाला असावा.””फार वेगाने तडकाफडकी घडलेय सर्व.””आम्हाला नाही वाटत ते वीसजण बचावले असतील.”आगविझवे पाण्याचा मारा करीत आग शमविण्याच्या खटपटीत त्यांच्यातील काहीजण लोकांना सांगत होते.

काही माना खाली घालून पुटपुटत उभे राहिले. काही जण दूर जाऊन हताशपणे आगीकडे बघत उभे होते. सर्व लोक शोकात बुडाले होते. आपल्याच गावातले आपले शेजारी, रोज भेटणारे, थोडे थोडके नाही एकदम वीसजण गेले ह्या दु:खात खोल बुडून गेले होते. त्यामुळे चर्चच्या समोरच्या मोकळ्या जागेत वीस मोटारी कधी आल्या आणि त्यातील ते वीस गायकभक्त “अरे देवा! ओह माय गॉड! हे काय झाले म्हणत चर्चच्या दिशेने धावत निघाले हे गावकऱ्यांच्या लवकर लक्षातच आले नाही!

देवाची गाणी म्हणणारे वीसजण सुखरूप असल्याचे लोकांनी पाहिले तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. बारा वर्षांतील हा पहिलाच रविवार की त्या वीसजणांतील प्रत्येकाला त्याच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने उशीर झाला होता!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *