पैशाचा पाऊस

फार वर्षांपूर्वी मी माझ्या नातवांना घेऊन लॉस एंजल्सच्या क्विटशायर बुलेव्हावर एका साध्या हॉटेलात गेलो होतो. त्यांना त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ खाऊ घातले. नातवंडं खूष! मीही खूष!

त्याच हॉटेल शेजारी एक सिनेमा टॉकीज होते. आता ते नाही. तिथे डिस्नेचा चित्रपट लागला होता. नातवांनी ते अगोदरच पाहून ठेवले होते. मला वाटते अगोदरच त्या सिनेमाला जायचे त्यांनी ठरवले असावे. हॉटेलचे बिल देऊन आम्ही बाहेर आलो. आणि पोरं मला त्या थेटराकडे नेऊ लागली.

खाण्याचे पैसे दिले तेव्हाच माझ्याजवळचे पैसे संपून गेले होते. दोन्ही नातवंडे सिनेमाच्या गप्पांत दंग होती. मी मात्र आता काय करायचे असा चेहरा करून होतो. नातवांचा किती हिरमोड होईल. ते किती हिरमुसले होतील ह्याचे मला जास्त वाईट वाटत होते. मी तरी कसा? इतकेच पैसे कसे आणले? पण जास्त नव्हतेच माझ्याजवळ तर आणणार कुठून ? मी आतून अगदी रडवेला झालो होतो. असा प्रसंग कोणत्याही आजोबांवर येऊ नये असे म्हणत होतो.
मी स्वत:शीच सारखा “आता फक्त दहा डॉलर पाहिजे होते. ह्या क्षणाला दहा डॉलर पाहिजेत. आता ह्या क्षणी मिळाले तर केव्हढा आनंद देईन माझ्या नातवांना. दहा डॉलरसाठी मी काहीही करायला तयार होईन.” असे अगदी कळवळून म्हणत होतो.

पण मला धकाच बसला ते पाहून! आश्चर्यचकित झालो ते पाहून! सर्व काही विस्मयकारकच घडत होते. डॉलरच्या नोटा माझ्यासमोर जणू आकाशातून पडत होत्या. पैशाचा पाऊस म्ह्णतात तो हाच का असे वाटायला लागले. तरी पण शंका येऊन मी समोरच्या दोन मजली इमारतीच्या खिडक्यांकडे पाहू लागलो. वाटले, कुणी नोटा मोजत असताना त्याच्या हातून खाली पडल्या असाव्यात. पण सर्व मजल्यांवरच्या खिडक्या बंद होत्या. बरे एकाही खिडकीतून कोणीही आपले पैसे कुठे पडले ते पाहत नव्हता.

त्या धक्क्यातून मी पूर्णपणे सावरलो नव्हतो. काही वेळाने इकडे तिकडे पडलेल्या नोटा जमा केल्या. मोजल्या. बरोब्बर नेमके दहा डॉलर भरले, इतक्याच नोटा! इतकेच पाहिजे होते सिनेमाच्या तिकिटांसाठी. एक फुल्ल आणि दोन हाफ! एक फुल्ल आणि दोन हाफ!

पंधरा वीस मिनिटे थांबलो, कोणी येतेय का आपल्या नोटा शोधायला. कोणीही आले नाही. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारले.पण कोणीही त्या नोटांवर हक्क सांगितला नाही. अखेर मी मला शक्य होते ते कर्तव्य पार पाडल्याच्या समाधानात त्या दयाळू अज्ञात हितकर्त्याचे कृतज्ञतेने आभार मानून, प्रार्थना करून दोन्ही नातवांना घेऊन तिकिटाच्या खिडकीपाशी गेलो. ‘एक प्रौढ आणि दोन लहान ‘ अशी तिकिटे काढून आम्ही सिनेमा पाहिला.

दोन्ही नातवंडे सिनेमा पाहाण्यात गुंग होती. मी मात्र बराच वेळ हे कसे घडले, ह्याला काय म्हणायचे? चमत्कार, योगायोग, अनपेक्षित, अकल्पित धनलाभ, भाग्य अशा वलयांकित शब्दचक्रातच फिरत होतो! पण मनात सारखे येत होते,तो अज्ञात दयाळूही आजोबाच असला पाहिजे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *