आमचा सिनेमाचा गाव

रेडवुड सिटी

डबड्यातले काम करनार, कपटी आणि चक्रम!

“ हंटरवाली’ डबड्यात आलाय बे! येतो का,चल” “तुफान मेल” ही येनार हाहे डबड्यात” डबड्यात
म्हणजे त्या थिएटरचे नेमके वर्णन करणारा शब्द. लोक एखाद्या गोष्टीचे बारसे बरोबर करतात. पूर्वाश्रमीचे मेकाॅनकी थिएटर. इथे नाटके होत असत. मराठी रंगभूमीवरील अनेक नामांकित कंपन्या आपली नाटके इथे करत असत. पण नाटकांचे दिवस संपले. एके काळचे वैभवशालीयुग संपले.


तिथे सिनेमा दाखवू लागले. मला माहित आहे तेव्हापासून त्याला डबडा थेटरच म्हणत असत. मेक्यॅनिकि, मेक्यान्कि, मेक्यॅनिक, इंग्रजी बोलतोय असे वाटावे म्हणून मेकाॅन्कि असे निरनिराळे पाठभेद होते. त्या चौकालाही हेच नाव होते. चौकाचा पत्ता सांगतानाही असेच वेगवेगळे नामभेदाचे पाठ वापरले जात. नंतर त्या टाॅकीजचे नाव छानसे दिलखुष झाले. पण सगळ्यांची पहिली पसंती ‘डबडा थेटर’ ‘डबड्यात’ ह्या नावालाच होती. बरं नावं काही लोक उगीच देत नाहीत. ह्या थेटरात पडद्यापासून ते सिनेमा दाखवण्याच्या मशिनीपर्यंत एकही खुर्ची राहू द्या पण बाकडे, स्टूल काहीही नव्हते. मोठ्या बंदिस्त मैदानातील जाहीर सभेला किंवा मैदानात फिरायला आल्यासारखे वाटायचे थेटरात आल्यावर.
वरच्या मजल्यासारखा वाटणारा उतार असो की खालची सपाट जागा, बहुतांश भाग पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला असे.त्यातून कोरडी जागा शोधणे हे सिनेमा पाहण्यापेक्षा महत्वाचे काम असे. बरे बाजूच्या भिंतीही काही उंचीपर्यंत अशाच रंगलेल्या!


बसण्याची जमीन सिमेंटच्या कोब्याची. कधी काळी ती तांबड्या रंगाची असावी. कुठे कुठे रंगाच्या खुणा दिसत. जागो जागी नसली तरी बऱ्याच ठिकाणी कोबा उखडलेला. सिमेंट वाळूचे खळगे पडलेले. ह्या खळग्यांमुळेच कोणीही सिनेमाला उशीरा येत नसे. जे नवखे चुकुन माकून उशीरा येत व तिथे बसले की आजूबाजूचे प्रेक्षक “बरबटला की बे बाब्या” म्हणत हसून पिंक टाकायचे. ते खळगे ह्या पिकदाण्या झालेल्या असत!


सिनेमाचे तिकीट सर्वांना परवडण्यासारखे. सर्वांसाठी एकच दर. प्रथम एक आणा दर होता असे बारोमास येणारे प्रेक्षक सांगत. नंतर तो दोन आणे झाला. प्रेक्षक शाळकरी वयाची हाॅटेलात फडके मारणारी, ‘अलिमिन’ च्या ग्लासात बोटे बुचकळून पाणी देणारी; ‘बारक्या’ ह्या एकाच नावाने ओळखली जाणारी मुले; कामगार, रोजंदारीचे मजूर असेच हातावर पोट भरणारे सगळे.


थिएटरमध्ये एकच मशीन त्यामुळे मध्यंतर दोन चार वेळा व्हायची. ही झाली अधिकृत मध्यंतरांची संख्या. पण फिल्म तुटणे,मध्येच ‘लाइटी’जाणे ह्यामुळे सोसावी लागणारी मध्यंतरे निराळी. ह्यांची संख्या रोज बदलायची. कारण आज फिल्म किती वेळा तुटेल कोण सांगू शकणार?आवाज गेला किंवा फिल्म तुटली की पहिल्यांदा “अबे आवाऽऽऽऽज” “अब्ये तोडला की बे साल्यानं पुना तिच्या … पुढे आ किवा मा आपापल्या आवडीप्रमाणे घालून… वाक्य फुलवायचे. “ कुठ्यं ग्येला तो बे… “ इथे दोन फुल्यांपासून पाच फुल्यांच्या शिव्यांची टाकसाळ सुरु व्हायची.फिल्म तुटल्यावर भऽक्कन एक दिवा पेटायचा. त्यामुळे कुठे थुंकायचे कुणीकडे पिचकारी मारायची ह्याचे लोकांना मार्गदर्शन होत असे. पण रंगकर्म्यांचे हे कलादर्शन चालू असता शिव्यांची वीणा दुसरे घेत. ही वीणा कधी खाली ठेवली जात नसे.आॅपरेटरला व डोअर कीपरनांही ह्याची सवय झाली होती. ते उलट जबऱ्या आवाजात वाक्याच्या सुरवातीला दोन ते तीन अक्षरी ‘फुलवाती’लावून किंवा अखेरीला चार किंवा पंचाक्षरी ‘फुलवाती’ हासडून , “काय तिकीटाला बंदा रुपया मोजला का रे ….? “ त्यांच्यातला सुसंस्कृत ओरडायचा,” काय झाले बे बोंबलायला? फिलमच तुटली ना? का तुझी विजारीची नाडी तुटली?का धोतर फिटलं? आं? उगं गप बसाकी बे!” पण ह्या शिवराळ आवाजी युद्धात बहुसंख्येमुळे आमच्या गावचे नंबरी सिनेरसिकच जिंकायचे. तेव्हढ्यात झाली इतकी करमणूक पुरे म्हणत ‘आपरेटर’ अंधार करून फिल्म पुन्हा चालू करायचा.

रोज नेमाने डबड्यात येणाऱ्यांना हे नाट्यमय प्रवेश माहित असायचे. त्यामुळे ते आजूबाजूची मोकळी जागा, भिंत एकाग्रतेने पिचकाऱ्या मारत किंवा झकास खाकरून थुंकत रंगवत असायचे. आमच्यासारखे नवशे काही म्हणू लागले तर,” शिनेमा पाह्यला आलताना मग पाहा ना बे! गिन्नी चवलीत काय साबूने धुतलेले, चार मिशिनीचे थेटर मिळनार का तुला, आं?” असे तत्वज्ञान ऐकवत.

आम्ही एकदाच गेलो असू. पण संपूर्ण सिनेमा कधीच पाहिला नाही. सतत आपले कपडे कुणी रंगवत नाही ना ह्याच काळजीत असायचो! त्या चिंतेतच हिराॅईन नादिया दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून ‘कपटी’ किंवा ‘डाकू’च्या अंगावर झेप घेऊन त्याला ठोसा मारून उडवायची! तर कधी आमचा ‘ काम करनार’ जाॅन कावस असाच टेकडी उतरून त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून टकडक् टकड्क करत नादियाला ‘कपटीच्या’ तावडीतून सोडवायला यायला लागला की सगळे ‘ डबडा’ टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमायचे! किंवा ‘चक्रमने किंवा जोकरने’ कपटीला किंवा त्याच्या टोळीतल्या लोकांना काम करनारने पळवून लावले किंवा ठोसा ठोशी सुरु झाली की हा फक्त हवेत ठोसे मारल्याच्या अॅक्शन करत एखाद्या ‘कपटीला’ पाय घालून किंवा त्याच्या मागे ओणवे होऊन पाडले की प्रेक्षक हसायचे.त्यावेळचे म्युझिकही निरनिराळे आवाज काढत त्यात सामील व्हायचे.

हे ‘कपटी, डाकू’ आणि ‘काम करणार’, चक्रम किंवा जोकर काय प्रकरण आहे? तर डबड्याच्या अनुभवी समीक्षक-प्रेक्षकांच्या शब्दकोषांत व्हिलन व हिरो आणि विनोदी नट! कुणाला माहित खलनायक व नायक! काम करणार किंवा करनार हेच त्या कर्तबगार हिरोचे खरे वर्णन. कपटी आणि डाकू हे व्हिलनपेक्षाही त्याची वृत्ती व पेशा दाखवणारे सोपे यथार्थ शब्द होते. जुन्या गिरणीच्या चाळीतील किंवा हजरतखानच्या किंवा बाजूच्या मरीस्वामी चाळीतील आमच्या बरोबरीची,अगोदर सिनेमा पाहून आलेली,पोरे त्याची ष्टोरी मनापासून सांगताना कपटीच्या, काम करनारच्या सगळ्या अॅक्शन्स करीत “मग तिकडून काम करनार जाॅन कावस कसा दबकत दबत हळूच पाठीमागून येतंय आणि एकदम कपटीच्या टोळीतील एकाचे तोंड दाबून त्याला एका फाईटीत झोपवतो बे” ; कधी हंटरवाली नादियाची धाडसी कामेही करून दाखवत! पन कपटी सुद्धा बेरकी आहे त्यात.” हे सर्व प्रत्यक्ष अॅक्शनसह करून ष्टोरी सांगायचे. सर्व प्रेक्षक पोरे मोठ्या उत्सुकतेने भुवया उंच करत, कोणी तोंडाचा चंबू करत किती एकाग्रतेने ती गोष्ट ऐकत! त्या काळात आम्हा सर्वांसाठी ह्या बोध कथा संस्कारकथा व स्फूर्तीदायक गोष्टी होत्या. आम्ही डबड्यांत एकदाच जायची हिंमत दाखवली. ती सुद्धा तिथे अंग चोरून बसण्यातच जास्त दाखवली!


पुढे हेच दिलखुष डबडा टाॅकीज मीना टाॅकीज झाले!


अनेक वर्षे आपल्या स्टंटपटांनी व स्वत: केलेल्या धाडसी स्टंटसनी लोकांची करमणूक करणारी नादिया आणि जाॅन कावस ही लोकप्रिय जोडी मागे पडली. नंतरच्या काळात मा. भगवान व बाबुराव यांचे स्टंटपट आले. ह्यांचा बाज निराळाच होता.डबडा राहिले नव्हते तरी तिथले प्रेक्षक ह्यांच्यासाठीही होतेच. बरीच वर्षे ह्या ‘काम करनार’ जोडीने व चक्रमनेही त्यांची करमणूक केली.

सदाशिव पं. कामतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *