डेव्हिड ब्रॉडी

डेव्हिड ब्रॉडी महिन्यातून एकदा तरी मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला आपल्या मोटारीतून जात असे . विमानाने जाणे त्याला परवडणारे नव्हते असे नाही. त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. विमान प्रवास त्याला सहज शक्य होता. पण त्याच्या एका मित्राचा विमान अपघातात मृत्यु झाल्यापासून तो विमान प्रवास टाळत होता.

गेली दहा वर्षे तो मॉन्ट्रियलपासून न्यूयॉर्कला आपल्या मोटारीनेच जात होता. त्यामुळे तो रस्ता त्याच्या ‘चाकाखाल’चा झाला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी तो चार तास झोप काढत असे; त्यामुळे सात तासांचा प्रवास तो वाटेत कुठेही न थांबता, थेट करत असे.

१९९६च्या मे महिन्यात डेव्हिड ब्रॉडी रात्री मॉन्ट्रियलमधून निघाला. एक तास झाला नाही तोच डेव्हिडला कसे तरीच वाटू लागले. एकदम थकवा आला. अंग दुखायला लागले आणि त्याचे डोळे मिटायला लागले. आतापर्यंत एकदाही असे झाले नाही आणि आजच एकदम असे का व्हावे असे त्याला वाटू लागले. बरं, निघण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे चार पाच तास चांगली ताणूनही दिली होती. तरी असे का व्हावे? डेव्हिड विचार करू लागला. वाऱ्याने बरे वाटेल म्हणून त्याने खिडकीच्या काचा खाली घेतल्या. थरमॉस मधून गरम कॉफी प्याला. कशाचाही उपयोग झाला नाही. डोळ्यांवर झोप येतच होती.
हे काही ठीक नाही असे म्हणत त्याने बाहेर पडण्याच्या पहिल्याच वळणाने गाडी काढून एका पेट्रोल पंपाकडे नेली. पंपावरच्या माणसाला, त्याने “जवळपास एखादे हॉटेल, मोटेल आहे का?” विचारले. “हो आहेत की; माझ्याकडे फोन नंबरही आहेत. थांबा देतो” म्हणत ते त्याने दिले. एकाही ठिकाणी जागा नव्हती. सगळी भरलेली.

“आश्चर्य आहे,” पंपावरचा माणूस म्हणाला, “अजून प्रवाशांची वर्दळ सुरुही झाली नाही तरीही सगळी भरलेली!”
पंपवाल्या माणसाने पन्नास साठ मैलावर असलेल्या हॉटेलकडेही चौकशी केली. तिथेही नन्नाचाच पाढा. “हे पहा, मला खूप झोप येतेय. थकवाही आलाय. जवळ कुठे शाळा,कॉलेजचे वसतीगृह खोल्यांची सोय असललेले काही आहे का?” डेव्हिड ब्रॉडी अगतिकपणे विचारत होता. “नाही. इथे तसे काही नाही.”पंपवाला माणूस म्हणाला. “बरं वृद्धाश्रमासारखे काही आहे का?कशीबशी एक रात्र कढायची आहे. बघ बाबा.”डेव्हिड विनवणीच्या सुरात म्हणाला.

अरे हो! रस्ता ओलांडून पुढे गेलात की वृद्धाश्रमासारखी एक लहानशी जागा आहे. पॅट्रिक राइली मालक आहे. चांगला माणूस आहे. करेल तुमची काहीतरी सोय.” पंपवाला गप्पिष्ट होता. माणूस कसाही का असेना मला काय, झोपायला खाट मिळाली की झाले. असे पुटपुटत डेव्हिड त्याचे आभार मानत, मोटार हळू हळू चालवत, डोळ्यांवर झापड येत होतीच तरी निघाला. वृद्धाश्रमात आला. एका खोलीत डेव्हिडची झोपायची सोय झाली.

सकाळ झाली. रात्री झोप चांगली लागली होती. थकवाही गेला होता. डेव्हिड ताजातवाना झाला. त्याने पॅट्रिक राईलचे मनापासून आभार मानले. तो जायला निघाला. थोडे पुढे गेला असेल तर लगेच माघारी आला. राईलला म्ह्णाला,”तुम्ही माझी काल रात्री मोठी सोय केली. वृद्धाश्रमातल्या कुणासाठी माझ्या हातून थोडे काही झाले तर मला बरे वाटेल. माझा व्यापारधंदा असला तरी मी ज्यू रबायही आहे. इथे कुणी ज्यू राह्तात का?”

नवल वाटून पॅट्रिक म्हणाला,’काय सांगायच्ं! इथे एक ज्यू म्हातारा रहात होता. तुम्ही काल रात्री आलात साधारणत: त्याच वेळेस तो वारला बघा.” “मग त्याच्या अंत्यसंस्काराची काही व्यवस्था केली असेलच तुम्ही,”डेव्हिडने विचारले. “सॅम्युअल विंस्टाईन शंभरीचा होता.त्याचे सर्व नातेवाईक त्याच्या आधी वारले. त्याचा कोणीही वारस आता नाही. त्याच्याजवळ किंवा त्याच्या नावे एक फुटकी कवडीही नाही. इथे जवळपास ज्यू लोकांची दफनभूमीही नाही. आणि असेल तर ती शंभर मैल दूर असलेल्या अल्बानी येथे असावी. म्हणून आम्ही ठरवलेय की इथल्या आमच्या ख्रिस्ती दफनभूमीतच त्याचे दफन करावे. निराधार गरीबांसाठी आम्ही जागाही राखून ठेवल्या आहेत.”पॅट्रिक सगळे सविस्तर सांगत होता.
“तुमचा हा खरंच चांगुलपणा आहे. पण निराधार असो, तो ज्यू होता. त्याला आपल्या दफनभूमीतच अखेरचा विसावा घ्यावा असे वाटत असणार .मी आज माझी स्टेशन वॅगन घेऊन आलोय. नाहीतर नेहमी मी माझ्या लहान गाडीतून जात असतो. माझ्या गाडीत शवपेटी सहज मावेल. तुमची हरकत नसेल तर त्याचा देह मी अल्बानीला घेऊन जाईन. बघा.”

कागदपत्रे तयार झाल्यावर डेव्हिड शवपेटीसह बृकलीनच्या ज्यू लोकांच्या दफनविधी करणाऱ्या संस्थेत आला. पण,”अहो, काय करणार आम्ही? त्याचा दफनविधी धर्मादाय केला असता आम्ही. पण आमच्या भूमीत जागाच नाही. तुम्ही क्वीन्सला जाऊन पाहता का?” असे त्याला ऐकायला मिळाले. पण क्वीन्समध्येही अशाच अर्थाचे सांगण्यात आले. “अशी वेळ कुणा ज्यूवर येईल हे आमच्या ध्यानीही आले नाही. त्यामुळे तशी राखीव जागाही नाही. पण मी ऐकलंय की मॅनहॅटनच्या वॉशिंग्टन हाईटस येथे सोय आहे. तुम्ही तिथे प्रयत्न करा.”

डेव्हिड ब्रॉडी सॅम्युअल विंस्टाईनच्या शवपेटीसह वॉशिंग्टन हाईट्स येथे आला. फर्निच्यरवर,खिडक्यांवर धूळ साचलेल्या त्या ऑफिसमधल्या एका जरव्ख म्हाताऱ्या डायरेक्टरने,”हो, आमच्याकडे धर्मादाय निधी आहे. त्यातूनच आम्ही गरीबांचे अंत्यविधी करतो.” तो म्हातारा डेव्हिडला सांगू लागला,”पनास वर्षांपूर्वी एका उदार धनिक ज्यू गृहस्थाने निष्कांचन, निराधार निराश्रित ज्यू माणसावर अशी पाळी आली तर भली मोठी देणगी दिली. त्यातूनच आम्ही अनेक जागा अशा लोकांसाठी राखून ठेवल्या आहेत. तुम्ही आणलेल्या म्हाताऱ्यासाठी आम्ही सर्व ते करू ते त्या दनशूर माणसाच्या देणगीमुळेच.काही काळजी करू नका.” म्हातारा बोलायचे थांबवत नव्हता. डेव्हिड नुसते हं हं करत होता.किंचित थांबून म्हातारा म्ह्णाला “कागदोपत्री नोंदी करायच्या की झाले..” तो स्वत:लाच सांगत असल्यासारखे बोलत होता.

जरव्ख म्हातारा जाडजूड रजिस्टर काढून लिहू लागला.”मृत व्यक्तीचे नाव सांगा.” “सॅम्युअल विंस्टाईन ,”डेव्हिडने सांगितले.
“हं सॅम्यु…विंस्टा……कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.” नाव लिहिता लिहिता म्हातारा स्वत:शीच पुटपुटला.नंतर दुसऱ्या कुणाला तरी हाक मारत डेव्हिडला म्हणाला,”रीतिनियमांप्रमाणे मला एकदा शव पाहिले पाहिजे.” इतके म्हणत तो डायरेक्टर पद सांभाळणारा म्हातारा डेव्हिडच्या स्टेशनवॅगनकडे गेला.

इतका वेळ न थांबता बोलणारा तो म्हातारा गृह्स्थ थोड्या वेळाने ऑफिसमध्ये आला, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या. गळा दाटून आलेल्या आवाजात म्हणाला,” मित्रा डेव्हिड, सॅम्युअल विंस्टाईनला आम्ही आमच्या दफनभूमीत विश्रांतीसाठी केवळ जागा देणार नाही तर मोठी सन्मानाची जागा देणार आहोत. सर्व मान मराताबासह त्याचा अंत्यसंस्कार मोठ्या गौरवाने करणार, रबाय डेव्हिड, तुम्ही ज्याला बरोबर आणलेत तो सॅम्युअल विंस्टाईन म्हणजेच आमचा तो उदार धनिक देणगीदार सॲम्युअल विंस्टाईनच आहे. पूर्वी त्याने स्वत:साठी खरेदी केलेल्या जागेतच त्याचे अंत्यसंस्कार होतील. मित्रा तू फार त्रास सोसून सॅम्युअलला इथे आणलेस.पण तुझ्या धडपडीचे सार्थक झाले. त्यामुळेच सॅम्युअल विंस्टाईन त्याच्या निजधामी, स्वगृही आला.” म्हातारा डोळे पुसत मधूनच थांबत बोलत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *