कुबेर आणि मदन

रेडवूड सिटी

अँथनी रॉकवॉल अति धनाढ्य होता. पण ह्या गर्भश्रीमंत आणि प्रतिष्ठित वस्तीतील लोक अँथनी रॉकवॉलला आपल्यापासून दूर ठेवत. कारण एकच. तो त्यांच्यासारखा उच्चभ्रू नव्हता. तो तिथल्या खास लोकांसारखा पूर्वापार श्रीमंत नव्हता.
अँथनी आपल्या लायब्ररीत होता. घंटा वाजवून बोलावण्याच्या फंदात तो कधी पडत नसे. या उच्चभ्रूंच्या वसाहतीत राहत असे तरीही !
दरवाजापाशी जाऊन आपल्या गगनभेदी आवाजात, “माSइSSक ” असे गरजला. माईक धावत आला. आदबीने उभा राहिला. त्याच्याकडे न पाहता म्हणाला,” धाकट्या साहेबांना मी बोलावलंय म्हणावं. मला भेटल्याशिवाय कुठे जाऊ नका म्हणावं .”
तरणाबांड रॉकवॉल आल्यावर अँथनीने वर्तमानपत्र बाजूला करत आपल्या मुलाकडे मायेने पाहिले.
“रिचर्ड, महिन्याला तू साबणावर किती खर्च करतोस ?” रिचर्डला या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती ! गोंधळलेल्या नजरेने पाहत तो म्हणाला, ” बाबा, का?” मी आपलाच साबण वापरतो.” “आणि कपड्यांवर किती पैसे खर्च होतो ?” बाबांनी माझ्या कॉलेजच्या वर्षांत एकदाही असे विचारले नव्हते . आणि आजच असा हिशेब काय मागताहेत? रिचर्डच्या मनात आले. “साधारणतः ५०-६०डॉलर्स करत असेन महिन्याला. त्याच्यापेक्षा जास्त कधीही
नाही.” रिचर्ड,अरे, तुझा खर्च फारच बेताचा आहे की ! मी तर ऐकलेय,तुझ्या बरोबरची तरुण पोरं २४ डॉलर्स डझनाचा साबण काय वापरतात, आणि कपड्यांवर बिनदिक्कत शंभर डॉलर तरी उडवतात. तुला पैशाची काही कमतरता नाही. तू कितीही खर्च केलास तरी चालण्यासारखा आहे.” अँथनी पुढे बोलतच होता.” तरी तू जे खरे चांगले आणि अस्सल आहे तेच वापरतोस. ” मी केवळ, युरेका आपला साबण आहे म्हणून वापरतो असे नाही. अरे, आपला युरेका खरोखर शुद्ध साबण आहे. लोकांना फक्त सुगंध आणि कंपनीचे मोठे नाव इतकेच माहीत असते. उगीच विनाकरण महागड्या वस्तू वापरल्या म्हणजे काही माणूस श्रीमंत ठरत नाही. माझ्या दृष्टीने तू खरा विचारी आणि खरा श्रीमंत आहेस. शेजारच्या दोन बंगलेवाल्यांना रात्री झोप येत नाही. का? त्यांच्या घरांमध्ये मी घर घेतले म्हणून. कारण मी साबण बनवणारा ना !”
“बाबा, सर्व काही पैशामुळे मिळत नाही. सामाजिक स्थान त्यापैकीच एक आहे.” रिचर्ड खिन्न होत म्हणाला. “हे:! असलं काही मला सांगू नकोस. अरे मी ‘क्ष’ पर्यंत ज्ञानकोश पहिला. आतापर्यंत पैशामुळे मिळत नाही अशी एकही गोष्ट,वस्तू मला त्यात आढळली नाही ! अरे, तू मला एक तरी उदाहरण दाखव जे पैशांनी विकत घेता येत नाही!”
” बाबा !” रिचर्ड काही सांगणार होता पण थांबला. पुन्हा बोलू लागला,” समाजातील विशिष्ट वर्तुळात प्रवेश मिळत नाही तिथे स्थान कुठून मिळणार? इथे तुमच्या संपत्तीचा काहीही उपयोग नाही !” हे सांगताना तरुण रुबाबदार रिचर्ड्सचा चेहरा आणखीनच पडलेला झाला .
“अरे, विशिष्ट लोक, वर्तुळ हे काय जे तू म्हणतोस ते सुध्दा आपला युरेकाच वापरतात!” ” हो बाबा, वापरतही असतील. युरेका त्यांची शरीरे स्वच्छ करीत असेल. पण मन स्वच्छ करत नाही नां !” “रिचर्ड, तू माझ्यापेक्षा जास्त शिकला आहेस. तू तत्वज्ञान सांगतोस. तुझे मोठमोठे शब्द मला समजत नाहीत. मला व्यवहार समजतो. पण मी आज तुला मुद्दाम बोलावले त्याचं कारण निराळं आहे.”
“कशासाठी? ” रिचर्डने विचारले. ” गेले दोन आठवडे मी पाहतोय, तू मला आमचा नेहमीचा उत्साही खळखळून हसणारा रिचर्ड दिसत नाहीस. उदास असतोस. तब्येत ठीक आहे ना? लिव्हर बिवर बिघडली नाही ना? पण तू तसा नाहीस म्हणा. तुला काही हवं असेल तर मला सांग. अरे तू तोंडातून शब्द काढताच तुझा बाप चोवीस तासात दहा मिलियन डॉलर देईल तुला!”
“बाबा, तुमचा तर्क अगदीच चुकला नाही. लिव्हरच्या जवळपासच दुखणे आहे.”
” हां ! असं आहे तर. काय नाव आहे तिचे?” अँथनी रिचर्डकडे पाहात हसत म्हणाला .
रिचर्ड लायब्ररीतच इकडे तिकडे फिरू लागला. आपल्या वडलांचा, विश्वासाने कुणाच्या पाठीशी उभा राहण्याचा स्वभाव त्याला आवडायचा. “अरे मग तिला विचारत का नाहीस सरळ? विचारल्याबरोबर तुझ्या गळ्यातच पडून हो म्हणेल! तुझ्याकडे काय नाही? मोठी पदवी आहे. देखणा,रुबाबदार आणि पैसेवाला आहेस.आणखी काय पाहिजे? विचार तरी तिला. लवकर .”
” बाबा, वेळ निघून गेलीय. काही संधीच राहिली नाही आता. ”
“नाही कशी? तूच पुन्हा आण. आलेली वाया घालवू नकोस.”
” तिला फिरायला घेऊन जा एखाद्या बागेत. ह्यासाठी बाग फार चांगली. काही नाही तर चर्चपासून घरापर्यंत तिच्याबरोबर जा. संधी जाते कशी? ”
” बाबा, या वर्गाची ठेवण समाजाने कठीण आहे. समाजाचे यंत्र कसे चालते त्याची कल्पना नाही तुम्हाला. त्यांची चाके एकात एक फिरत असतात. बिनबोभाट.सगळे आधीच ठरलेले. बाबा, लेंट्री चे(Lentry) वेळापत्रक अगदी मिनिटावारी, कितीतरी अगोदर ठरलेलं असतं ! तिच्या क्षणा क्षणाचे वेळापत्रक मी लिहीत नसतो!”
“रिचर्ड, तू काय बोलतोयस ! माझ्यापाशी असलेल्या सगळ्या संपत्तीने तासाभराचा वेळही ती तुला देणार नाही?”
“माझ्याकडूनच उशीर झाला,” उसासा टाकत रिचर्ड म्हणत होता. “परवा ती युरोपला जाणार आहे. दोन वर्षं येणार नाही. उद्या मला ती फक्त काही मिनिटसाठीच भेटणार आहे. टॅक्सी घेऊन तिने मला ग्रॅन्ड सेंट्रल स्टेशनवर बोलावले आहे. ती आणि मी तिथून ब्रॉडवेवर वॉलेक (walllack )थिएटरवर जाणार आहोत. तिथे तिची आई आणि दुसरे लोक वाट बघत असतील आमची. टॅक्सीतून ब्रॉडवेवर जायला असा किती वेळ लागतो! फार तर सात आठ मिनिटं . तेव्हढ्यात मी तिच्याशी बोलणार आणि मागणी घालणार ! कसं शक्य आहे? ” “बाबा, हा गुंता तुमचा पैसा,अफाट संपत्ती सोडवू शकत नाही . बाबा, पैशाने एक मिनिट जरी विकत घेता आले असते तर सर्व श्रीमंत शतायुषी झाले असते!” असे म्हणून रिचर्ड उपरोधाने विषण्णपणे हसला.
” मिस लेन्ट्रीशी मला निवांत मिळणार नाही. काही सांगायलाही वेळ नसणार. तिथे पैसे काय करणार ! ”
रिचर्डने आपल्या मनातले सगळे सांगून टाकले. त्याच्या वडिलांनी ऐकून घेतले. तरीही दोन्ही हाताचे पंजे, इलाज नाही काय करणार अशा अर्थाने हलवले. ते इतकेच म्हणाले, ” अरे तू खूप शिकलेला , मी साधा, साबणाचा कारखानदार. मी काय बोलणार ? बघ तुला जितका वेळा मिळेल त्यात बाजी मार !”
त्या रात्री रिचर्डची आत्या एलेन आली. एलेन शांत,आणि प्रेमळ होती. तिचे बोलणेही गोड होते. रिचर्डचे तिला फार कौतुक ! आली ती थेट आपल्या भावाकडेच गेली. अँथनी संध्याकाळी आलेले वर्तमानपत्र वाचत होता. आल्याबरोबर ती, प्रेमविव्हळ रिचर्डच्या प्रेमाविषयी बोलू लागली. मोठी जांभई देत अँथनी म्हणाला, एलेन, मला सगळं सांगितलंय त्याने. पैसा काही करू शकणार नाही असेही वर त्याने मला सांगितले. तो, पूर्वापार गर्भश्रीमंत असलेल्या प्रतिष्ठितांच्या जगाविषयीही बरेच काही बोलला. आणखीही काही बरेच बोलला. सामाजिक यंत्रे, त्यांचे संकेत वगैरे काहीतरी सांगत होता. आता मला झोप आलीय,” असे म्हणत त्याने पुन्हा एका मोठी जांभई दिली. तरीही एलेन थांबलीच. ती म्हणाली, “अरे सारखा पैसा पैसा करू नकोस. खऱ्या प्रेमापुढे पैसा म्हणजे किस झाडकी पत्ती! प्रेमाच्या सामर्थ्याची तुला कल्पना नाही! पण रिचर्डने फार उशीर लावला हे खरे. तिने आपल्या रिचर्डला होकारच दिला असता. आता वेळ फार थोडा आहे. पण अँथनी, तुझा पैसा तुझ्या रिचर्ड्सला त्याचे प्रेमसुख मिळवून द्यायला काही उपयोगी पडणार नाही.” येव्हढे म्हणाली आणि एलेन आपल्या खोलीकडे गेली.
दुसरे दिवशी रात्री रिचर्ड लेन्ट्रीला घ्यायला निघाला. तेव्हढ्यात एलेन आत्याने त्याला बोलावले. तो खोलीत गेल्यावर एका जुन्या डबीतून तिने हिरा असलेली सोन्याची अंगठी काढली. रिचर्डला म्हणाली, ” काही झालं तरी ही अंगठी आज तू घाल. तुझ्या आईने ती मला दिली. तिच्या प्रेमात ह्याच अंगठीने यश मिळवून दिले असे ती मला सांगत होती. भाग्याची आहे ही. तुझ्या आईची आहे. लक्षात ठेव.”
आईची आहे हे ऐकल्यावर रिचर्ड त्या आंगठीकडे बराच वेळ पाहत राहिला. करंगळीत घालण्याचा प्रयत्न केला, पण अंगठी काही बोटात गेली नाही. मग सगळ्या पुरुषाप्रमाणे त्याने ती कोटाच्या खिशात ठेवली.
रिचर्ड स्टेशनवर आला. मिस लेन्ट्रीला, गर्दीतून भराभर काढत पण सांभाळून, बाहेर घेऊन आला. टॅक्सीत बसल्याबरोबर,”आईला ताटकळत ठेवायचं नाही बरं का.” लेन्ट्री रिचर्डला म्हणाली. “वॉलेक थिएटरकडे. लवकर. जितक्या वेगाने जात येईल तितक्या वेगाने ने.” रिचर्डने टॅक्सीवाल्याला सांगितले. टॅक्सी निघाली. चौतिसाव्या रस्त्याशी टॅक्सी आली आणि रिचर्डने टॅक्सी थांबवायला सांगितली. लेन्ट्रीकडे पाहत म्हणलं,” माझ्या आईने दिलेली अंगठी खाली पडली. कुठे पडलीय ती मला माहित आहे. आलोच मी…”
रिचर्ड पटकन खाली उतरला. अंगठी घेऊन परतही आला ! जेमेतेम एक मिनिटही लागले नसेल त्याला.पण तेव्हढ्यात समोरून येणारी एक मोठी व्हॅन टॅक्सीसमोरच येऊन थांबली. ड्रायव्हरने तिच्या डाव्या बाजूने आपली गाडी काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हढ्यात दुसरी एक मोठी वॅगन मध्ये आली. आता टॅक्सीवाला उजव्याबाजूने निघण्याचा प्रयत्न करू लागला. त्यासाठी मागे जायला हवे होते. मागे फर्निचरने भरलेला ट्र्कयेऊन धडकला ! टॅक्सीवाला चरफडत पुन्हा थोडे मागे पुढे करू लागला. काही उपयोग होत नव्हता. एक अस्सल शिवी हासडून थंड बसला .
चारी बाजूने वाहने येतच होती. पण तीही पुढे जाऊ शकत नव्हती. तेव्हढ्यात एक दोन घोड्यांचे कोचही गर्दीत घुसले. घोडे गोंधळून एक दोनदा खिंकाळले. पण त्याचं कोण ऐकणार! जिकडे पाहावे तिकडे वाहनेच वाहने. सर्व वाहतूक ठप्प! रिचर्डने डोके बाहेर काढून पाहिले. त्याचा डोळ्यांवर विश्वास बसेना, इतकी वाहने अडकून पडली होती. ब्रॉडवे, सिक्स्थ अव्हेन्यू आणि चौतिसावा रस्ता जिथे एकमेकांना छेदतात तिथे सर्व रहदारी बंदच झाली होती! आणखीही वाहने येताना दिसत होती.
सगळे पाहिल्यावर रिचर्ड, जशी त्याचीच ही चूक असा चेहरा करून लेन्ट्रीला म्हणाला,” सॉरी मिस लेन्ट्री! आपण चांगलेच अडकून पडलोय. तास दोन तास तरी लागतील ही कोंडी फुटायला. वेढाच पडलाय आपल्याभोवती जसा! माझ्या हातून अंगठी पडली नसती तर..” त्याला पुढे बोलू न देता लेन्ट्री म्हणाली ,” तुझ्या आईची अंगठी मला बघू दे ना ! आता आपण काहीच करू शकत नाही. आणि मला ते ऑपेरा वगैरे फारसे आवडतही नाहीत.”
त्या रात्री अकरा वाजता अँथनी रॉकवेलच्या दारावर कुणीतरी हलकीशी थाप मारल्याचा आवाज आला. दिवसाचे अकरा वाजले असोत की रात्रीचे, अँथनी त्याच आवाजात गडगडायचा ! “आत या !” तांबडा गाऊन घातलेला अँथनी सागरी चाच्यांच्या पराक्रमाचे पुस्तक वाचत होता. ते कुणीतरी म्हणजे रिचर्डची प्रेमळ आत्या एलेन होती. पांढऱ्या केसांची, सुंदर देवदूत परमेश्वर पृथ्वीवर विसरून गेला की काय, अशी भासणारी एलेन आत आली .
“त्या दोघांचं जमलं अँथनी !” एलेन हळुवार गोड आवाजात ते मधुर शब्द अँथनीला ऐकवत होती. “तिने रिचर्डला लग्नाचं वचन दिलं. ते दोघे ब्रॉडवेला जाताना मध्ये वाहनांची इतकी कोंडी झाली म्हणे. न भूतो ना भविष्यति! दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अरे रिचर्डला किती सांगू आणि नको असे झाले होते. हो, आणि अँथनी, पैशाच्या सामर्थ्याविषयी इतके गर्वाने बोलत जाऊ नकोस. अरे, जिव्हाळ्याच्या, खऱ्या प्रेमाचे प्रतीक असललेल्या रिचर्डच्या आईच्या अंगठीची ही किमया ! मीच त्याला ती शकुनाची म्हणून दिली होती. ”
रिचर्डच्या आईचा, म्हणजे आपल्या पत्नीचा उल्लेख ऐकल्यावर अँथनीने पुस्तकातून डोके बाहेर काढून आपल्या बहिणीकडे भावविवशतेने पाहिले. पण क्षणभर.लगेच पुन्हा वाचायला लागला.
” पण वाटेत ती अंगठी खाली पडली.ती आणेपर्यंत रहदारीच्या नाकेबंदीचे हे रामायण घडले! टॅक्सीतच रिचर्डने लेन्ट्रीला मागणी घातली. तिने होकार दिला.पुढचे सांगताना रिचर्ड पुन्हा त्या स्वप्नात गेला होता.अँथनी ऐकतोयस ना? मला म्हणाला, “आत्या, काय सांगू ? ती हो म्हणाली! पण पुढे जे म्हणाली ते ऐकून मी स्वर्गात आहे असे वाटले! ती माझ्या जवळ येऊन, कानात सांगावे तसे गुणगुणत होती, ” रिचर्ड तू मला विचारलेस आणि ‘हर तरफसे बजनें लगी सेंकडो शहेनाईयां ” असे झाले मला! मला ते पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत होते. “अरे, प्रेम ते प्रेमच ! प्रेमापुढे पैसा पाचोळा आहे !”
“खरेच? फार छान झालं ! फार छान बातमी सांगितलीस एलेन, मला ! रिचर्डच्या मनासारखे घडलं ! मी त्याला पैशाविषयी ….”
” अरे आला का पुनः तुझा पैसा! तुझा पैसा काय करणार होता? अँथनीला मध्येच तोडत एलेन म्हणाली.किंचित चिडून म्हणाली असावी. आपल्याला पुन्हा तिचे सोन्या नाण्यावरचे प्रवचन ऐकायला लागणार हे ओळखून अँथनी घाईघाईने म्हणाला,”एलेन ! तू खरंच चांगली बातमी दिलीस मला. पण माझे पुस्तकही रंगात आले आहे. त्या चाचाची बोट समुद्रात कलंडायला आली आहे. बोटीत खजिना आहे.माझ्यासारखीच, त्या धाडसी चाचाला खजिन्याची किंमत,महत्व याची जाणीव आहे. मला वाचू दे थोडे आता एलेन ” असे म्हणत अँथनी पुन्हा पुस्तकाकडे वळला.
दुसरे दिवशी सकाळी केली नावाचा कोणी माणूस आला आहे असे माईक आपल्या धन्याला म्हणाला. “आत पाठव.” अँथनी म्हणाला. केली आत आल्यावर चेकबुक पुढे ओढत अँथनी रॉकवॉल म्हणाला,” काम एकदम झकास झाले. आमच्या युरेका साबणासारखे शुद्ध आणि सफाईदार ! मी तुला पाच हजार डॉलर्स खर्चाला दिले होते.”
“आणखी माझे तीनशे डॉलर खर्च झाले.” केली सांगू लागला. “अंदाजापेक्षा जास्त खर्च आला. सगळ्या वॅगन्स आणि कॅब प्रत्येकी पाच डॉलरमध्ये आल्या. पण ट्रक आणि घोड्याचे कोच मात्र दहा डॉलरच्या खाली येईनात. आणि मालांनी भरलेल्या ट्र्कसनी तर वीस घेतले. शिवाय पोलीस ! त्यांनी तर मला कैचींतच पकडले. पन्नास डॉलरशिवाय ते बोलतच नव्हते. दिले काय करणार? दुसऱ्या दोन पोलिसांना पंचवीस पंचवीस दिले. साहेब सगळी वाहने इतकी नेमक्या वेळीआली. एक सेकंद आधी नाही की उशिराही नाही ! चारी दिशेने वाहने येतच होती. मी माझ्यावर काय खूष झालो! पण सगळे काम फत्ते!” केली बोलतच राहिला. “तुमचे काम म्हटल्यावर काय ! तुम्ही पैशाला मागे पुढे पाहत नाही. म्हणून मी ते अंगावर घेतले.पण सगळे कसं जमून आले की नाही? ”
“तुझ्या मेहनतीचे हजार आणि तुझे खर्च झालेले तीनशे मिळून तेराशे डॉलरचा हा चेक !” “बरं, केली ! तू पैशाला तुच्छ वगैरे काही मानत नाहीस ना?”
“मी ! आणि पैशाला कमी लेखणार ?” केलीने उलट विचारले. साहेब, एक सांगू? जगात पैशाची किंमत आणि शक्ती फक्त दोघांनाच माहित असते. एक, श्रीमंताला आणि दुसरी म्हणजे गरिबाला !” केलीने गंभीरपणे सांगितले.
ते ऐकून अँथनी रॉकवॉल निराळ्या समाधानाने मोठ्याने हसला !

3 thoughts on “कुबेर आणि मदन

  1. Shrikant

    Ggrand
    अभूतपूर्व कथानक
    सुदंर भाषांतर
    श्रीकांत कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *