किल्ली – 1

“जर्नी टू माय फादर ” ह्या पुस्तकाचा लेखक इझ्रायल झमीर आपले वडील आइझॅक बशेव्हस सिंगर ह्यांची एक आठवण सांगतो.

आइझॅक सिंगर हे नोबेल पारितोषिक विजेते. त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नातेवाइकांनी,मित्रांनी, शेजारीपाजाऱ्यांनी त्यांना आलेले विलक्षण, अशक्यप्राय वाटणारे, सांगितलेले अनुभव, ते त्यांचा आपल्या साहित्यात उपयोग करीत. गूढरम्य, अविश्वसनीय वाटाव्या अशा, चमत्कृतीपूर्ण गोष्टींची विपुलता त्यांच्या वांग्मयात असे. अदभुत साहित्य प्रकार हाताळणारे लेखक अशी त्यांची ख्याती होती. पण त्यांचा मुलगा सांगतो त्याप्रमाणे अशा घटना ज्यांच्या अनुभवात आल्या त्याचेच ते साहित्यरुपातील दर्शन आपल्या पुस्तकांत घडवित. आइझॅक सिंगर आणि झमीर एकदा बोलत असता त्यांच्या ओळखीच्या एकाकडून फोन आला. सिंगर मधून मधून ,”खरं?”, नक्की असेच होते?”, तुझी खात्री आहे?” असे विचारत आश्चर्याने आपली मान हलवत होते.

फोन त्यांच्या एका परिचित बाईचा होता.ती लाँग आयलंडला रहात होती. ती बाजारात गेली आणि खरेदीच्या गडबडीत तिच्या घराची किल्ली हरवली. घराची तेव्हढी एकच किल्ली होती. त्यामुळे दुसरी इतर कुणाकडे असण्याची शक्यता नव्हतीच.

किल्ली हरवल्याचे लक्षात येताच आपण जे करतो तेच तिनेही करायला सुरुवात केली. ज्या ज्या दुकानात ती गेली होती त्या ठिकाणी पुन्हा गेली. ज्या रस्त्यांवरून, गल्ली बोळांतून ती आली तिथेही पुन्हा जाऊन शोधाशोध केली. पण किल्ली काही सापडली नाही.

संध्याकाळ झाली. तिने ठरवले आजची रात्र बहिणीकडे ब्रकलीनला काढायची. ती लॉन्ग आयलँडच्या रेल्वे स्टेशनवर आली. तिकिटांच्या रांगेत उभी राहिली. रांग सरकत थोडी पुढे आली तर तिकिटाच्या केंद्रापाशी जमिनीवर काही तरी चकाकते आहे असे दिसले. पुन्हा पुन्हा तिचे लक्ष काय चकाकत होते तिकडेच जात होते. अखेर राहवेना म्हणून रांग सोडून तिथे गेली. चकाकते ते सारे सोने नसे हे माहित असूनही ती पुढे गेली…… तिच्या घराची किल्ली चमकत होती!

हिच घटना आइझॅक सिंगर यांनी आपल्या ‘की’ ह्या कथेत वापरली आहे.

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *