झाले मेरु -मंदार धाकुटे!

तारखा, वार , दिवस रोजच येतात आणि जातात . पण एखादीच तारीख , तो वार , तो दिवस कायमचा लक्षात राह्तो. दुपारचे दोनही रोजच वाजतात . पण २३ जुलै २०१३ आणि त्या दिवशीचे दुपारचे दोन ह्यांना अनन्य महत्व आहे . हा दिवस आपल्या सर्वांच्याच लक्षात राहणार आहे . कौतुक आपल्या डोळ्यांतून ओसंडेल आणि ऊर अभिमानाने भरून येईल . आपल्या कल्याणीचे किती कौतूक करावे असे होईल . कारण याच दिवशी–२३ जुलै २०१३ दुपारी २. ०० वाजता कल्याणीने हिमालयाचे २२०००फूट उंचीवरचे छामसेर(समशेर) कांगडा शिखर सर केले , जिंकले!

हिमालय, २२००० फूट, छामसेर शिखर, प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्यक्ष पराक्रमालाच आव्हान आहे. कल्याणीने ते शांतपणे स्वीकारले. चिकाटी, दृढ निश्चय, मनाचा शांतपणा आणि अंगभूत उत्साहाच्या जोरावर तिने हिमालय चढून ती छामसेर (समशेर) कांगडा शिखरावर गेली. कल्याणी ”समशेर’ बहाद्दर झाली .

कल्याणीच्या या धाडसी, साहसी मोहिमेचे थोडक्यात वर्णन आपण तिच्याच शब्दांत . ऐकू या…।

“पुण्याहून आम्ही अकराजण दिल्ली-मनाली-लेहला जाण्यासाठी निघालो. दिल्लीला पोचलो . दिल्लीहून मनालीला आम्ही बसने आलो . मनालीहून लेहला जाण्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. कारण वाटेत एक रात्र मुक्काम केला होता ”

“लेहला आल्यापासून श्वासोश्वास घेणे अवघड होऊ लागले . कारण तिथली उंची! तिथून २४०किमीचा प्रवास करून कारझोकला आलो . इथे आमच्यापैकी एकाला श्वासोश्वास घेणे फारच अवघड, जड होऊ लागले. त्याला आम्ही लगेच लेहला माघारी पाठवले . तिथे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . तो बरा झाला . पण मोहिमेत काही परत येऊ शकला नाही ”

“कारझोकला तिथल्या वातावरणाची, विरळ हवेशी जुळवून घेण्याची सवय होण्यासाठी आम्ही रोज दोन-तीन तास चढ-उतर करत असू . हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या बाजूने हिमालय चढून जाणार होतो त्या वाटेकडे निघालो. ते १५ किमीचे अंतर चालून जायला आम्हाला ७ तास लागले !”

” तिथेच त्या क्युरूच या ठिकाणी आमचा दुसरा तळ आम्ही ठोकला . इथेही आम्ही तिथल्या हवेची सवय होण्यासाठी तीन-चार तास चढ-उतार केली .”

“पर्वतावर इतरत्र बर्फ होता पण आम्ही ज्या बाजूने चढून जाणार होतो तिकडे बर्फ नव्हता . ठिसूळ, खडकाळ घसरडी अशी ती बाजू होती .बर्फ असता तर बरे झाले असते . कारण बर्फातून चढून जाण्यासाठी बूट असतात त्यांच्या spikesमुळे पायाची पकड तरी घट्ट होते. आमच्या बाजूच्या पर्वताचा भाग ठिसूळ,खडकाळ आणि घसरडा . त्यामुळे घसरतच पुन्हा चढायचे . दोन फुट वर गेले की एक फुट खाली . गणितातल्या त्या पालीसारखे!”

“चढण वाढत जाऊ लागली तसे श्वास घेणेही अवघड होऊ लागले . तो घेणेही एक ‘चढण’च वाटायचे . तरीही २१ जुलैला आम्ही दहाजण १८,००० फूटावर जाऊन पोहचलो . इथे आम्ही आमचा Base-Camp तळ ठोकला . त्या दिवशी हवा फार ढगाळ झाली होती . सगळीकडे अगदी ढगाळ झाले होते .. उद्या शेवटची चढाई करायची असे ठरले होते. पण हवा अशीच राहिली तर काय करायचे अशी सगळ्याना काळजी लागली . कारण मग पाऊस पडणार . पुन्हा जास्तच निसरडे होणार . बर्फही पडण्याची शक्यता . अशा विचारात आम्ही सगळे होतो . पण सुदैवाने हवा निवळली . आम्ही२३ जुलैला पहाटे ३.३० वाजता शिखरावर चढायला सुरुवात केली . पंधरा पावले चढून गेल्यावर थांबावे लागत असे . इतका दम लागत होता . त्यामुळे आमच्यातील पाचजण पहिल्या काही १५-२० पावलातच परत मागे तळावर गेले.”

“आता आम्ही पाचजणच चढत होतो . दम लागायचाच . थांबल्यावर थोडे बरे वाटायचे . पुन्हा चढायला सुरुवात करायची . चढ होताच . अगदी काटकोनी नव्हता पण ७०-७५ अंशाचा तरी होताच. अखेर चढत-थांबत आम्ही पाचजण दुपारी दोन वाजता छामसेर शिखरावर पोहचलो . शिखर गाठले! उभे राहिलो . फोटो काढले . तिथे आम्ही फार तर अर्धा तास होतो . Base-Campसोडल्यापासून १०तासांनी आम्ही शिखरावर पोहचलो होतो.”

“आता उतरायचे वेध लगले. उतरताना घसरायची भिती तशी जास्तच . आम्ही आमच्या Base-campला रात्री ८. ३० वाजता पोह्चलो. . Summitवरून Base-Campपर्यंत यायला आम्हाला ७ तास लागले . म्हणजे एकूण १७ तास झाले . मी फक्त कॅडबरी खाल्ली असेल तेव्हढीच . पण Base-Campला येईपर्यंत खाण्याची जेवण्याची आठवणही झाली नाही . पाणीही जास्त जात नव्हते .”

“शेवटपर्यंत, शिखरावर आम्ही फक्त पाचजणच होतो. त्यापैकी मी एकटीच मुलगी . आणि आमच्या अकराजणात सर्वात लहान मीच . एकोणीस वर्षांची . आमचे ग्रुप-लीडर माझ्या बाबांच्या वयाचे, पन्नाशीचे .दुसरी एक मुलगी ती चोवीस वर्षांची; एक आजोबा ते ६०-६५ वर्षांचे . बाकीचे तिशीतले . वर आम्ही जे पाचजण शिखरावर पोचलो त्यात आमचे Group-leader, मी , आणि बाकीचे तिशीतले असावेत .”

आपल्यापैकी हिमालयात एखाद्या शिखरावर चढून जाणारी , अशा साहसी मोहिमेत भाग घेणारी कल्याणी हि पहिलीच . माझे भाग्य असे की , आकाशात स्वत: विमन-उड्डाण करून आकाशी झेप घेणारी कल्याणीची थोरली बहिण मृण्मयी आणि हिमालयातील २२,००० फूट उंचीवरचे शिखर जिंकणारी ही कल्याणी या दोघींचेही पराक्रम मला प्रत्यक्ष पहायला, ऐकायला मिळाले . मलाही बरोबर घेऊन मृण्मयीने आकाशात झेप घेतली आणि विमानातून सृष्टी दाखवली . कुणी सांगावे! कल्याणीही तिच्याबरोबर मलाही एव्हरेस्टवर घेऊन जाईल! ह्या परते माझे दुसरे भाग्य ते काय?

कल्याणीच्या यशात तिच्या आई – बाबांचा, त्यानी तिला दिलेल्या उत्तेजनाचा, पाठिंब्याचा फार फार मोठा वाटा आहे हे विसरता येणार नाही .

कवितेचे दिवस!

ड्ब्लू. आय. मर्विन हे दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालेले आणि पोएट लॉरिएट असे गौरविलेले कवि आहेत. त्यांचे आज ऍटलॅंटा येथे काव्य वाचन आहे. मेर्विन यांचे सांगणे असते की कविता ही नुसती वाचायची नसते तर ती मोठ्याने म्हणायची, वाचायची असते. रॉबर्ट एबर्ट ह्या चित्रपट समीक्षकाचे एक म्हणणे प्रसिद्ध आहे. तो म्हणतो,”चित्रपट चांगला की वाईट, अप्रतिम की सामान्य हे ठरविताना आपली बुद्धी गोंधळून जाईल, विचार करूनही ते जमणार नाही पण आपल्या मनाला जे एकदम भिडते, वाटते ते आपल्याला खोटे पाडणार नाही.”
मर्व्हिन याना ते तंतोतंत पटते आणि ते म्हणतात,” कवितेच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. कविता ऐकताना मनाला जे वाटते, भिडते ती कवितेला दाद असते. मग तुम्हाला ती किती समजली कवितेत काय आशय आहे, कविला काय म्हणायचे आहे ह्या सर्व नंतरच्या गोष्टी. विचार करता करता हळू हळू कविता समजते.

“माझ्यासारख्याच्या बाबतीत कवितेचेच्या दिवसांचे सरासरी आयुष्य साधारणत: माध्यमिक शाळेपर्यंत. फार झाले तर महाविद्यालयाच्या एक दोन वर्षापर्यंत.पुढे कविता बाजूला पडते. म्हणजे आता मला कविता केव्हा समजणार!

… आता आता पर्यंत आपण सगळे कविता ’म्हणत’ असू. चालीवर म्हणत असू. त्या तशा म्हटल्यामुळे आवडत असत. बा.भ.बोरकरांची तेथे कर माझे जुळती, किंवा यशवंतांची संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी तसेच नारायण सुर्व्यांच्या कविता, सुरेश भटांच्या, विंदा करंदिकरांच्या मुक्तछंदातील कविता मोठ्याने म्हटल्यावर जास्त आवडतात.

कविता समजणे, तिचे आकलन ह्यासंबंधी मला काही सांगता येणे फार कठीण आहे. कविता मोठ्याने म्हणताना ती जास्त आवडते हे निर्विवाद. किंवा आवडलेली कविता म्हणताना जास्त आवडते असे म्हणू या.. त्यासाठी जास्त मागे जायला नको. परत आपल्या शाळेच्या दिवसात गेले की हे न सांगता पटेल. बघा ते दिवस. प्रत्येक इयत्तेतल्या आपण घरी म्हटलेल्या, शाळेत ४०-४५ पोरांबरोबर म्हटलेल्या, पोरांच्या आवाजात बुडून गेलेला तो मास्तरांचा आवाज… इंग्रजी कवितांपाशी थोडे अडखळतोय, पण तीही मोठ्याने म्हणायला लागल्यावर जास्त आवडायची…

मराठी शाळेत, शाळा सुटण्याच्या अगोदर पाढे, कविता म्हणायला वर्गात सुरवात व्हायची. आमच्या वर्गात पाढे म्हणताना सगळ्यांचे आवाज इतके हळू व्हायचे,बराच वेळ आवंढे गिळल्याचाच काय ते आवाज ऐकू येत. पाढे येणाऱ्या पाच-सहा पोरांचा काय तो आवाज. अशांना सगळेजण “लै आखडू हाय बे” असे म्हणत. पण ’पाखरांची शाळा भरे पिंपळावरती’ किंवा’धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे’ ह्या कविता सुरू झाल्या की पोरांना चेव येत असे. आवाज चढत चढत पुढे फक्त कवितेचा आरडा ओरडा व्हायचा! फुलपाखरे कधीच उडून गेलेली असत, पाखरेही आमच्या गोंगाटाला घाबरून घरट्यात लपून बसलेली असत!

घरातही कवितेची आवर्तने चालूच असत. सुरवातीला ’देवा तुझे किती.., ’चंद्र पहा उगवे मनोहर’ अशा कविता. पुढे मग ’रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा..”, त्याही नंतर, ह्या मागे पडून ’तेथे कर माझे जुळती’ माधव ज्युलियन यांची वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे’ म्हणण्यात असत. यशवंतांची ’आई’ तर घरोघरी म्हटली जायची. शाळेतल्या धड्यांबाहेरच्या कविताही आम्ही म्हणत असू. पूर्ण जरी नाही तरी एखादे दुसरे कडवे म्हटले जात असे. यशवंतांचीच ’संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी’ वंदन तुज मायभूमी हे अखेरचे’ माधव ज्युलियनांची ’ऐकव तव मधुबोल कोकिळे’ इत्यादी आम्हा सगळ्या भावंडांना येत असत.शाळेच्या पुस्तकातील इंग्रजी कविताही ठेक्यात लयीत म्हटल्या जात. ’मिलर ऑफ द डी’ ’वुई आर सेव्हन’ होम दे ब्रॉट द वॉरियर डेड’ ’चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड’ ह्या वर्ड्स्वर्थ. टेनिसन यांच्या कविता किंवा त्यातील दोन चार ओळी ठेक्यात म्हणत असू. पुन्हा एकदा सांगायचे की कविता मोठायाने म्हटल्य़ा तरी समजत असत की नाही हे सांगता येणार नाही. पण त्या सगळ्या कविता आवडायच्या हे मात्र खरे. आजही त्या आवडतात.आम्हाला कविता हीच गाणी होती!

कवितेच्या दिवसांत ’आई म्हणोनी कोणी’ ’राजहंस माझा निजला’किंवा ’ने मजसी ने..’ अशा कविता घरोघरी म्हणल्या जात. तसेच तेव्हाच्या म्हणजे कुंकू. गोपाळकॄष्ण,रामराज्य, रामशास्त्री आणि त्या नंतरच्या काळातीलही ८० सालापर्यंत च्या काळातील– आणि आजच्याही काळातील काही सिनेमातील– ग. दि. माडगूळकर, शांताबाइ शेळके. ना.धों. महानोर यांची सिनेमातील गाणीही खरे तर सुंदर कविताच होत्या. मघाशी वर लिहिलेल्या सिनेमातील गाणीही कवितेसारखीच म्हटली जात. ’रामराज्य’ सिनेमातली गाणी कविवर्य राजा बढे(गर्जा महाराष्ट्र माझा’-यांचेच आहे) यांची होतीअसे आठवते. त्यातील गाणी-कविता-पहा. संस्कॄत प्रचुर जोडाक्षरांनी युक्त पण किती गेय!

“सुजन हो परिसा रामकथा। जानकीजीवन विरहव्यथा। किंवा  “सुवर्णरथ दिव्य तो रविचा सप्त-अश्व गतिमान। युगे युगे गातील राघवा तुझेच मंगल नाम। त्यानंतर चाल बदलून म्हणजे आवाज चढवून- हे पोरांना आवाज चढवायचे फार आवडायचे–सीते सीते विमलचरिते कोमले चारुशीले!

पहा, बरेचसे संस्कॄत आणि जोडाक्षरेही आहेत. पण मराठी दुसरी तिसरीतील माझा धाकटा भाऊ आणि माझ्या सारखी मुले ती म्हणत असत. बरीचशी चालीला धरून! आमची आजी आणि मावश्या तर उत्तम अभिनेत्री होत्या. रामराज्यातली ही गाणी आम्ही दोघे म्हणत असताना त्या मन लावून ऐकत असल्याचा शिवाय चेहऱ्यावर कौतुकाचा भाव एकवटल्याचा उत्तम अभिनय करीत! सहनशीलतेचे दुसरे नाव अभिनय!

या नंतर कुसुमाग्रजांची “गर्जा जय जयकार क्रांतीचा” ही कविता तर घराघरातून गर्जत, दुमदुमत असे. बरं एकेकाचे आवाज म्हणजे एकदम ’अर्जंट! जंक्शन, खडार्डम स्टाप’! इंग्रजांनी ही कविता आमच्या आवाजात ऐकल्यामुळेच ते हिंदुस्थान सोडून गेले!

कवितेचा वावर आमच्या घरी बराच असे.आमची एक बहिण तर इंग्रजी कविताही मराठी कवितांच्या चालीवर म्हणत असे. तिला कविता आवडत असत. एकदा वळवाच्या पावसाची सर येऊन गेल्यावर तिने आईला हाक मारली. आई,”काय गं” म्हणत आली तर ही आईला,”पाऊस खुळा किती पाऊस खुळा’ ओळी म्हणून दाखवायला लागली. आई,’पाऊस खुळा का तू वेडी ’ अशा नजरेने पहात निघून गेली!

बालकवि तर सगळ्यांचेच होते! त्यांची आनंदी आनंद गडे आणि त्याही पेक्षा श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेमुळे सगळीकडेच आनंदाची हिरवळ दाटत असे.”येई भाई येथ पाही” या कविते बरोबरच “भिंत खचली कलथून खांब गेला” ही कविता थोरला भाऊ म्हणत असे. रागात असला किंवा त्याला कुणी काही बोलले असेल तर तो “भिं-त ख-च-ली म्हणताना खचली हा शब्द रेटा देत देत रेटत म्हणत असे. मग समजायचे की काहीतरी बिनसले आहे. बहिण, लक्ष्मीबाई टिळकांची’मी तुझी मावशी तुला न्यावया आले ही सुंदर कविता म्हणायची. कवितेच्या अखेरीस मावशी आपल्याला माहेरी घेऊन जायला आली आहे. नेणार आहे हे कळल्यावर त्या बाळीला जेव्हढा आनंद व्हायचा तेव्हढाच ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्यालाही होई.

बालकवींच्या श्रावण मासी कवितेनंतर पुढे गेलो तेव्हा ’पाय टाकूनि जळात बसला..’ ही कविताही आवडू लागली. तो पाण्याचा खोल डोह, डोहाच्या काठावरचे उंबराचे मोठे झाड, पुढे सरकत सरकत पाण्यात कधी शिरल्या ते न कळणाऱ्या त्याच्या मोठ्या जाड मुळ्या आणि त्या डोहावर पडलेली औदुंबराची गडद सावली. अशा त्या जळात पाय सोडून बसलेल्या कवितेचे चित्र डोळ्यांसमोर येई. आणि का कसे ते माहित नाही पण किंचित उदास, गंभीर वाटायचे. कविता आवडायचीच पण मर्विनने म्हटल्याप्रमाणे हळू हळू समजेल केव्हातरी. म्हणजे केव्हा ते अजून कळले नाही.

रायगडाला जाग येते मध्ये सगळ्यांना आवडेल असे एक दॄश्य आहे. संभाजी आपला धाकटा भाऊ बाळराजे राजाराम याला पाठीवर घेऊन खेळवत येतो. मराठी स्वराज्याचे दोन राजपुत्र, एखाद्या चार चौघांसारख्या भावंडासारखेच खेळतात ह्यापेक्षा प्रेक्षकांना आनंद देणारे ह्रुद्य द्रुश्य कोणते असेल? असेच एक दॄश्य रामराज्य सिनेमात आहे. दोन लहान , आश्रमवासी बहिण-भाऊ चाललेली, भाऊ बहिणीला थोडे भरभर चाल असे म्हणतोय, म्हणत असतानाच,”उचल पाऊले आश्रम हरिणी जायचे गं दुरी।हरिणी जायचे । ती उंच ऊंच गोपुरे ती भव्य राजमंदिरे । पुरे! पुरे! पुरे जाहल्या आठवणी त्या, जायचे..” हे गाणेही म्हणतोय. सुंदर! काव्य साधे, सुंदर. अशी गाणीही आम्हाला कविताच होत्या.

मघाशी मी शाळेच्या पुस्तकातील इंग्रजी कविताही म्हणत असूअसे म्हणालो. त्यातील “इन्टू द व्हॅली ऑफ डेथ रोड सिक्स हंड्रेड” ही तर आम्हीही जणू घोड्यावर बसून तलवारी परजत समोर दिसेल त्या शत्रुला कापत चाललोय अशा टक डक, टक डक थाटात म्हणत असू.ह्या पेक्षा एकदम निराळीच “होम दे ब्रॉट द वॉर्यर डेड” ही कविता. वाचताना समजली असे वाटायचे. पण नुसता शब्दार्थ. वर्गात म्हणताना मध्येच सरही म्हणायला लागायचे. युद्धात पडलेल्या नवऱ्याचे शव घरात आणल्यावर बराच वेळ ती बाई रडत नसते, बोलत नसते. सुन्न होऊन भकास चेहऱ्याने कुठेतरी पहात बसलेली. हे चिन्ह बरे नाही हे एका अनुभवी पुरुषाच्या की बाइच्या लक्षात येते. मग तिच्या लहान मुलाला तिच्या जवळ आणून देते. त्याला पाहिल्यावर ती बाई क्षणात पुन्हा आई होते. आणि रडायला लागते. कविता म्हणता म्हणता समजली असे वाटायला लागले.

वरील कवितेतल्या अनुभवी माणसाच्या समयसूचकतेतूनच मला भासाच्या ’प्रतिमा नाटकातील एक प्रवेश आठवतो. तोही अशाच समयसूचकतेचे उदाहरण आहे.

राम वनवासात गेल्याच्या दु:खाने हाय खाऊन दशरथ राजा मरण पावला. भरताला बोलावून घेतले. पण राजा दशरथ गेल्याची दु:खदायक बातमी भरताला एकदम सांगायची कशी? मंत्री सुमंत, भरताला राजवाड्यात नेण्यापूर्वी एका स्थळी नेतो. तिथे असलेल्या सुर्यकुळातील इष्वाकू राजाच्या प्रतिमेपासून, राजा दिलीप वगैरे राजांच्या प्रतिमा दाखवत, प्रत्येकाची थोरवी सांगत सांगत सहजगत्या दशराथाचा पराक्रम, वचन पाळण्याची नीति सांगत दशरथाच्या प्रतिमेशी येतो तोच भरत,”काय? माझे तात? माझे वडीलही…?महाराज दशरथही गेले? असे मोठ्या दु:खाने , नंतर व्याकुळतेने, शांत होत होत आपल्या आईला भेटायला त्वरेने जातो असा प्रसंग रंगवला आहे.

आमच्या घरातील कवितेने बहरलेले आमचे दिवस संपत आले होते.एकदा माझी कर्जत दहिवलीची भाच्चे मंडळी लहानपणी सुटीत आली असतात्यांनी, बालकवींप्रमाणेच रंगीत शब्दांनी काढलेले चित्रच अशी बा.भ. बोरकरांची, ” निळ्या खाडीच्या काठाला..” ही कविता म्हणून दाखवली; तेव्हा मोठा आनंद झाला.मला एकदम माझे वडील मोठ्याने वाचून दाखवत असलेली ’डोंगराच्या आड माझ्या जन्मदेचे गाव आहे। तेथ या वेड्या मनाची ही कधीची धाव आहे’ ही प्रा.वर्‍हाड्पांडे यांची कविता आठवली.त्यामुळे आमचे कवितेचे दिवस अजून चालूच आहेत की काय असा भास झाला.

पुढे थोद्याच काळात आम्हा भावंडांच्या मुलांचे कवितेचे सुगीचे दिवस आले. घरात’गवत फुला रे गवत फुला’, उठ मुला, उठ मुला बघ हा..’ ’टप टप पडती अंगावरती..’ ’उठा उठा चिऊताई’, सदैव सैनिका पुढेच जायचे’ आणि ’निळ्या खाडीच्या काठाला’ अशा कविता ऐकू येऊ लागल्या. तेव्हा पुनर्प्रत्ययाचा, कवितांचा पुन्हा आनंदी आनंद दरवळला! मुलांनाही कविता गाणीच होती.

काळ पुढे सरकतच असतो. आता मुलांच्या घरातही त्यांची मुलं, मुली ’वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला’ चंद्र हा सुंदर चांदण्या सुंदर’ अशा कविता म्हणु लागले. दोन्ही नातवांनी ’उठ मुला उठ मुला..’ पासून “फुलपाथरु” ’चांदोबा चांदोबा इथपर्यंत कविता म्हणत, मध्ये थोडे भाष्य करत “कवितेचा दिवस” गाजवला. ’चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या’ होऊन, कवितेच्या पाखरांची शाळा रेड्वूडच्या झाडांवर भरू लागली. आमच्याप्रमाणेच मुलांनाही त्यांची मुले कवितेच्या सुवर्णकाळाची आठवण करून देऊ लागली.

कविवर्य मर्विन यांच्यामुळे आमचा कवितेच्या सुगीचा काळ आठवला. कवितेचे कवडसे पकडण्याच्या खेळात रमलो; आणि ’कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?’ असे मनाशी गुणगुणत बसलो!

मुक्काम पोस्ट शर्यतीचे बॉस्टन

  • हाता तोंडाशी आलेला घास कोणीतरी काढून घ्यावा
  • पंगुं लंघयते गिरीम….
  • गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेलव्ज
  • अ स्टॉर्म बिटवीन कप ऍन्ड लिप्स
  • प्रत्येकाचे दु:ख निराळे…

म्हणी, वाकप्रचार, सुभाषितांची ही जंत्री पाहून एखादा संग्रहच आता वाचायला लागणार की काय अशी भिती वाटण्याची शक्यता आहे. पण ह्या अशा आणि आणखी काही वचनांची प्रचिती, ज्युली विन्डसरचा पराक्रम, तिची गोष्ट ऐकल्यावर यॆईल.

ज्युलीने ८-९ वीत असताना क्रॉस-कंट्री शर्यतीत भाग घेतल्यापासून तिला पळण्याची आवड निर्माण झाली. तेव्हापासून तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सुरवात केली. कॉलेजच्या पहिल्या वर्षापर्यंत ती भाग घेऊन धावत असे. हायस्कूलमध्ये असतानाच तिने निश्चय केला होता.”मी बॉस्टनच्या मॅरथॉनमध्ये भाग घेणार.”
पण हे सोपे नव्हते. बॉस्टनच्या शर्यतीत कुणालाही असा थेट भाग घेता येत नाही. विशिष्ठ वेळेत तेव्हढे अंतर पार करण्याची पात्रता गाठावी लागते.

ज्युलीने त्यासाठी अशा तऱ्हेच्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावायला सुरुवात केली. २०१० मध्ये तिने एक मॅरथॉन चार तासात पूर्ण केली. त्या नंतर २०१२ मध्येही न्युमोनिया सारख्या आजारातून नुकतीच उठली असतानाही तिने एक मॅरथॉन पूर्ण केली. आणि आपल्या गटात ती बॉस्टनच्या शर्यतीसाठी ती पात्र ठरली!

यंदा तिला खात्री होती कि आपल्या गटात ती पहिली येणारच. तसे तिने आधीच ठरवले होते. त्यासाठी तिने जानेवारीपासूनच १६ आठवड्यांच्या खडतर सरावाची सुरवात केली. आठवड्यातले दोन दिवस ती मोठ्या वेगाने पळत असे. नंतरचे दोन दिवस ती १०, १३ मैल पळायची. शनिवारी ती मग कधी सतरा तर कधी अठरा मैल धावायची. हे सर्व करत असताना ती रोज एका मोठ्या रुग्णालयात आणि महाविद्यालयात जाऊन वैद्यकीय सहाय्यक या शिक्षणक्रमाचा अभ्यासही करत असे.

बॉस्टनच्या मॅरथॉनच्या दिवशी ज्युली विन्डसर मोठ्या उसाहात होती. ती म्हणाली,” प्रत्यक्ष शर्यतीच्या दिवशी मनावर कसलेच दडपण नसते. ताण तणाव नसतो. शर्यतीच्या पूर्वीचे ते सरावाचे दिवसच फार कष्टाचे असतात. आज काय नुसते धावायचे-पळत रहायचे.”

तिला उत्तेजन देण्यासाठी, तिचा उत्साह कायम ठेवण्यासाठी ज्युलीबरोबर तिचा नवरा, सासूबाई आणि तिची आई आली होती. त्यांच्यापेक्षाही शर्यतीच्या मार्गावर दुतर्फा जमलेले लोकच ज्युलीचे प्रत्येक टप्प्यावर टाळ्या वाजवून, हात उंचावून “गो ज्युली गो”, रन ज्युली,हाय ज्युली” असे ओरडत होते. वर्तमानपत्रांनी आदल्या दिवसापासून ज्युलीला मोठी प्रसिध्दी दिली होती. त्यामुळे अनेकांना ती माहित झाली होती.

शर्यतीला सुरुवात झाली. आठव्या मैलावर ज्युलीची पाठ अतिशय दुखायला लागली. असह्य कळा वेदना सुरु झाल्या. असे तिला बरेच वेळा बाराव्या मैलावर व्हायचे. पण नेमके आज तिला इतक्या लवकर त्रास व्हायला लागला. जवळच्या लोकांनी तिला मलम लावले. तिने आपल्या गोळ्या घेतल्या. आणि ज्युली पुन्हा धावायला लागली. ज्युली पळतच राहिली. ९-१० मिनिटात एक मैल या वेगाने ती धावत होती. इतर स्पर्धकांच्या बरोबरीने धावत मैला मागे मैल मागे टाकत होती. २५ व्या मैलापाशी आले की वेग वाढवायचा. पायात गोळे आले होते. ठणकत होते. वेदना फार होत होत्या. मागे फिरावे, इथेच थांबावे असे वाटत होते. तरीही ज्युली निश्चयाने पळत राहिली. २५.७ मैलाच्या टप्प्यापाशी आली. आणि आता तर फक्त अर्धा मैलच राहिलाय की! आता जोरात मुसंडी मारून पुढे जायचे. बरे झाले! आपण नवऱ्याला आईला सांगून ठेवले, ” तुम्हाला माहित आहे ना? शर्यतीत मी नेहमी मार्गाच्या उजव्या बाजूनेच धावते. तुम्ही उजव्या बाजूलाच, शेवटच्या रेषेजवळपास थांबा.” आता ज्युली आणि इतर स्पर्धकही जोरात पुढे जाणार तोच, ” थांबा! थांबा! मागे व्हा! पळा ! मागे फिरा! शर्यत थांबवलीय! पुढे बॉम्बस्फोट
झालाय!” असे म्हणत पोलिसांनी संपूर्ण रस्ता आडवून धरला होता.

एका क्षणापूर्वी “आपण आता शर्यत जिंकलीच!” “आपल्या गटात मी पहिली!” “बॉस्टन मॅरथॉनमध्ये मी पहिली!” असे छाती धडधडत असतानाही आनंदाने म्हणणारी ज्युली आता घाबरून, धसक्याने छाती धडधडत इतरांबरोबर मागे पळत, धडपडत फिरली!

पुढे बॉम्बस्फोट झालाय म्हणजे .. म्हणजे नवरा, सासूबाई आपली आई सर्व कुठे असतील? कसे असतील? कुठे भेटतील? भेटतील का? अशा विचारांच्या गर्दीत ज्युली मागे मागे जात होती.
बरे झाले! ज्युलीचा नवरा, आई, आणि सासू अगोदर बरेच पुढे थांबले होते. पण ज्युली नीट दिसावी, लवकर दिसावी म्हणून थोड्या वेळापूर्वीच ते तिघेजण बरेच जवळ येऊन थांबले होते.. पहिल्या ठिकाणीच थांबले असते तर? त्याच ठिकाणी समोरच बॉम्बस्फोट झाला होता! बघा, देव तारी त्यांना कोण मारी!
ज्युलीला आपले पदक हुकले याचे वाईट वाटले असणारच.

कालपासून ज्युलीला प्रसिध्दी मिळाली होती. वाटेवरचे लोक टाळ्या वाजवून तिचे स्वागत, कौतुक करीत होते. तिचा उत्साह वाढवत होते. ह्या सर्वाच्या पाठीमागे कारण होते. कारण २६ वर्षाची ज्युली विन्डसर फक्त, फक्त तीन फूट नऊ इंच उंच होती! (बॉस्टनच्या मोबिलिटी-इंपेअर्ड डिविजन या गटात तिची गणना आहे. तसेच ती मेडिकली डायग्नोज्ड फॉर्म ऑफ ड्वार्फिझमनुसार ती ड्वार्फ आहे.)

शाळेपासून ही बुटकी ठेंगणी गिड्डी ज्युली इतर धडधाकट सर्वसाधारण (नॉर्मल) स्पर्धकांबरोबर धावते. आजही १५ एप्रिल २०१३ च्या प्रख्यात बॉस्टन मॅरथॉन शर्यतीत लहान, सुंदर ठेंगणी ठुसकी ज्युली इतर सर्वसाधारण धडधाकट स्पर्धकांबरोबर धावत होती. यथावकाश ज्युलीची आणि तिच्या कुटुंबाची भेट झाली.

बॉस्टनच्या शर्यतीमुळे ठेंगणी ज्युली विन्डसर एका दिवसात फार, फार, खूप उंच झाली! आता आपल्याला तिच्याकडे खाली वाकून नाही तर तिच्यापुढे आपली मान झुकवून पहावे लागते!

बॉस्टन-मॅरथॉनच्या आयोजकांचेही कौतुक करायला हवे. ज्यांनी २५.७ मैलाचा टप्पा गाठला त्या सर्वांना त्यांनी पदक दिले. अर्थातच ज्युली विन्डसरलाही पदक मिळालेच!

रद्दी वाचन… पुढे चालू!

“यांचं रद्दी वाचन अजून चालूच आहे वाटतं!” असे वरील शीर्षक वाचल्यावर बरेच जणांना असा प्रश्न पडल्यास नवल नाही.

“हे कुठल्या दुकानातून किराणा आणतात कुणास ठाऊक?” “आता कुठे वर्तमानपत्राच्या कागदातून किराणावाला पुडे बांधून देतॊ?” ह्या शंका मात्र बरोबर आहेत. आमच्या गावात ह्या रद्दीच्या कागदातूनच सुंदर पुडे बांधून देत. आता ते पुडे गेले. प्लास्टिकच्या पिशव्या आल्या. त्याही सोयीस्कर. सर्वांनाच सोयीस्कर असल्यामुळे अजून टिकून आहेत. तराजूही गेले.वजन-मापांबरोबर तराजूही बदलले. याचा अणि रद्दी वाचनाचा काय संबंध? असा सुज्ञ वाचकांना प्रश्न पडला असेल तर चूक नाही.

मराठीमित्राच्या एका वाचकाने टॉक्सिसिटी, टॉक्सिन यांना मराठी शब्द काय असे विचारले होते. मला महित असलेले शब्द सांगितले पण त्याचे समधान झाले नाही. मग श्याम, नंदू यांच्याशी चर्चा करून– हा शब्द फार मोठा झाला-त्यांना विचारले . दोघांनी ’विषारीपणा’ हा शब्द सांगितला. आणि तोच बरोबरही आहे. मधे बरेच दिवस गेले. माझ्या डोक्यातून तो प्रश्न आणि त्या वाचकाचे मी सांगितलेल्या शब्दांना “हे आम्हाला माहित आहेत,अणि विष म्हटले की साप, विंचू यांचे विष असे समोर येते. पण टॉक्सिसिटी/ टॉक्सिन यांना मराठीत एका शब्दात/किंवा दोन शब्दात तसा अर्थ होईल असे शब्द सांगा” हे काही माझ्या डोक्यातून जात नव्हते.

दोन तीन दिवसांनी, सर्पदंश, विंचू चावल्यावर कोणते आयुर्वेदिक उपचार करावेत यासंबंधी एक लेख वचण्यात आला. लेख नामंकित वैद्यांचा होता. त्यात ओघात ’शरीरातील सप्तधातूंमध्ये असलेली विषाक्तता…’ आणि पुढे ’शरीराने स्वत:च तयार केलेले विष…. याला आयुर्वेदात “आम” असे म्हणतात’ असे उल्लेख आले. ते वाचल्यावर आर्किमिडिजला जेव्हढा आनंद झाला असेल तेव्ह्ढाच आनंद मलाही झाला!

टॉक्सिसिटी आणि टॉक्सिनला मराठीत प्रतिशब्द सापडले! हे शब्द आम्ही त्या वाचकाला ताबडतोब कळविले. माझ्या इतकाच त्यालाही आनंद होईल असे मला वाटत होते. प्रश्न विचारताना आणि नंतर पुन्हा लिहिताना चार चार पाच पाच ओळींची पत्रे लिहिणाऱ्या त्या वाचकाने हे दोन नेमके योग्य शब्द मिळाल्यावर फक्त एका शब्दाचे उत्तर पाठवले. हरकत नाही. उत्तर आले हेही नसे थोडके! मला सांगायला आनंद वाटतो की हे मला माझ्या रद्दी-वाचनातूनच मिळाले! इथे अमेरिकेत कुठले मराठी वर्तमानपत्र? पुण्याहून आणलेल्या इस्त्रीच्या कपड्यात असलेल्या एका वर्तमानपत्राच्या चतकोरात हा मजकूर होता! बोला आता.
रद्दी वाचनीय असते का नाही हा प्रश्न निराळा पण मी आणि माझ्यासारखे बरेचजण ती वाचतात हे मात्र खरे.

रद्दी वाचन

रेडवूड सिटी

गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राच्या लोकराज्य मासिकाचे स्वरूप खूपच बदलले आहे. मध्यंतरी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावर चांगले आणि वाचनीय अंक काढले होते. आताही जून-जुलै२०११ मध्ये फारच सुंदर आणि संग्रही ठेवावा असा वाचनावर, ’वाचन: एक अमृतानुभव’ या नावाचा अंक प्रसिध्द केला.

नामांकित लेखक, समीक्षक, संपादक, कादंबरीकार, कवी यांचे लेख तर आहेतच आणि प्रख्यात प्रकाशक यांचे त्यांच्या काही गाजलेल्या पुस्त्कांविषयीचे लेखही आहेत.त्याशिवाय अनेक नामवंतांनी त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादीही दिली आहे. १९८६ साली महाराष्ट्र टाईम्सने  मराठी साहित्यातील लेणी म्हणून सुमारे १५० उत्कृष्ट पुस्तकांची यादी केली होती तीही यात आहे. मराठीच्या अभ्यासकांना, संशोधकांन उपयोगी पडतील अशा शंभर एक  अशा महत्वाच्या ग्रंथांची नावेही आहेत. एकूणच अंक मोलाचा आहे. हा अंकच पुढे संदर्भासाठी वापरला जाईल!

हे सर्व लेख,अनेक मोठ्या लोकांच्या आवडीच्या आणि महाराष्ट्र टाईम्सची ती १५० पुस्तकांची यादी वगैरे वाचताना, आनंद तर वाटत होताच पण यातील बरीच पुस्तके आपण पूर्वीच वाचली आहेत, माहितीची आहेत याचा माझा मलाच आनंद झाला.

बरेच वेळा अनेक मोठी माणसे “मला ह्यांच्यामुळे, “त्यांनी एक पुस्तक वाचायला दिले, “एक पुस्तकाचे दुकान होते”  वगैरे वगैरे आपल्या वाचन संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा, स्फूर्तिस्थाने सांगतात. अनेक शिक्षणतज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ म्हणतात घरात मुलांना दिसतील अशा जागी पुस्तके मासिके वगैरे ठेवावीत म्हणजे लहानपणापासून अक्षर ओळख होते. वाचनाची गोडी लागते.हे सगळे अनुभवसिध्द बोल. यांचे मोल मोठेच आहे.

मला(म्हणजे आम्हा भावंडांना) वाचनाची केव्हा आणि कशी गोडी लागली हे सांगता येणार नाही. वाचनातून काय मिळाले, मिळते हे सुध्दा नेमक्या आणि योग्य शब्दांत सांगता येणार नाही. निदान मला तरी. महिन्याचा किराणा, बाजार आणला की पुडे, पुड्या सोडताना, सोडून झाल्यावर, इकडे आई वस्तू डब्यात भरते आहे आणि अण्णा ते वर्तमानपत्राचे एकेक कागद घेऊन वाचत बसलेले.. त्यात टाईम्स सारख्या इंग्रजी वर्तमानपत्राचे कागद असायचे. मराठी वर्तमानपत्रांचेही असत. बातम्या तर शिळ्या झालेल्या मग वाचत काय असत? नंतर पुढे समजले की त्यात लेख काही अग्रलेख, वगैरे फार शिळा न होणारा मजकुरही असतो. आबासाहेबांकडेही हिच तऱ्हा! तेही असेच ती पाने वाचण्यात तल्लीन! घरी रोज एखादे वर्तमानपत्र येत असेच. पण महिन्यातून एकदा होणाऱ्या या वाचन सोह्ळ्याची न्यारीच मजा. पुढे मीही, जोपर्यंत दुकानदार कागदाच्या  पुड्यातून वस्तू देत असत तो पर्यंत, असेच ती रद्दीची पाने, तुकडे घेऊन वाचत असे! शाळा कॉलेजात असताना सिनेमाच्या जाहिराती, परीक्षणे, चुकुन माकून रविवारचे एखादे पान मिळाले तर मग पुस्तक परिक्षण, एखादा लेख असे वाचायला मिळे. पण हे सर्व अर्धवटच असायचे. पुडे बांधणारा टरकन पाहिजे तेवढा कागद फाडणार! तो जर वाचणारा असता तर त्याची नोकरी कधीच गेली असती.

दहावी-अकरावी पर्यंत शाळेची मराठीची पुस्तके वाचणे हासुध्दा एक मोठा आनंद असे. त्या आनंदात आणखी भर म्हणजे माईच्या शाळेत निराळे पुस्तक असायचे.(आचार्य) अत्रे-कानेटकर(कवि गिरीश) यांचे अरूण-वाचन असे त्यांना.आणि आमच्या शाळेत काही वर्षे उदय वाचन आणि मंगल वाचन असायचे. आमचीही पुस्तके चांगली असायची पण अरूण-वाचनला तोड नाही. तीच गोष्ट इंग्रजीच्या पुस्तकांची. सेवासदनला ग्लिनींग्ज फ़्रॉम इंग्लिश लिटरेचरचे भाग बरेच आधीपासून होते. आम्हाला ते नववी का दहावीपासून आले.

घरात कोणत्याही कपाटात पुस्तके असायचीच. त्यांत गुळगुळीत कागदावर छापलेली अगदी जुनी पाठ्यपुस्तके असायची.(बहुतेक नवयुग-वाचनमालेची असावीत) पण सुंदर धडे, कविता त्यात असायच्या. गोष्टीच वाटायच्या इतके मनोरंजक धडे. जुन्या प्रख्यात मासिकांचे सुटे अंक, एकेका वर्षाचे  बांधलेले काही गठ्ठेही पडलेले असत. यशवंत, मासिक मनोरंजन सारखी मासिके म्हणजे उत्तम दर्जाची मासिके कशी असवीत यांचा आदर्श. त्यात वि.स. खांडेकरांच्या गोष्टी, य.गो जोशींच्या कथा, यशवंत, माधव ज्युलियन, यांच्या कविता, आपल्या अणांच्या कथा, कविताही होत्या.मासिक मनोरंजन madhye पहिल्या पानावर कविता चापून येणे हा मोठा सन्मान समाजाला जात असे. आपल्या अण्णांच्या कविता बरेच  वेळा  पहिल्या पानावर छापून आल्या होत्या.  आबासाहेबांकडे रत्नाकर, अभिरुचि यासारख्या दर्जेदार मासिकांचे काही वर्षांचे अंक, त्यातच वाचलेले वसंत शांताराम देसाई यांचे बालगंधर्वांवरचे अप्रतिम लेख वाचल्याचे आठवते.याचेच पुढे पुस्तक झाले. आबासाहेब, किर्लोस्कर, स्त्री हे अंकही नियमित घेत असत काही काळ. तेही वाचत असू आम्ही.

अण्णांच्या कपाटात तर आम्हा सर्वांना आवडणारा रुपेरी खजिनाच होता. पण तो बराच काळ आम्हाला सापडत नव्हता. पण योग्य वेळीच मिळाला असे वाटते आता. त्याकाळी मराठी सिनेमे उत्कृष्ट असत. कथाकारांची कवींची नावं ऐकलीत तरी छाती दडपून जाईल! आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, विश्राम बेडेकर,चिं.वि.जोशी, ना.ह. आपटे, राजा बढे, स.अ. शुक्ल,वि.वि. बोकील असे लोक चित्रपट कथा-गाणी लिहित.यापैकी शिवराम वाशिकर हे साहित्यिक लेखक म्हणून फारसे माहित नव्हते पण चित्रपटांमुळे ते लोकांना माहित असावेत. त्यांचे संवाद फार प्रभावी असत.. या बऱ्याच सिनेमांची पुस्तके आमच्याकडे होती. ती वाचणे ही एक मोठी मेजवानीच असे. ब्रम्हचारी, ब्रँडीची बाटली, सिनेमे वाचताना हसून हसून पोट दुखे. पोट दुखायचे नाही तरी चिं.वि. जोशींचा “सरकारी पाहुणे”मधील दामुअण्णा मालवणकरांचे  आणि विष्णुपंत जोग या जोडगोळीचे संवाद वाचताना भरपूर हसायचो.इतरही अनेक उत्तम सिनेमांची पुस्तके होती. यादी फार लांबेल म्हणून थांबतो. दु:खाची गोष्ट म्हणजे नंतर पुढे कधीही ह्यातील एकही पुस्तक सापडले नाही! फार वाईट वाटते. आजही त्या सिनेमांची ती पुस्तके वाचताना तितकाच आनंद आजच्या पिढीलाही झाला असता. दुर्मिळ,अगदी दुर्मिळ पुस्तके आम्ही गमावली.

हॉलमधल्या कपाटात एक अद्भुत पुस्तक होते. हिरव्या कापडी बांधणीचे चांगले जाडजूड होते. त्यात प्रकरणे नव्हती, अध्याय नव्हते, धडे नव्हते,खंड नव्हते तर स्तबक होते! प्रकरणासाठी म्हणा किंवा भागासठी असे नाव पूर्वी कधी वाचले नव्हते. हे नव्हते ते नव्हते असे मी म्हटले खरे, पण ह्या पुस्तकात काय नव्हते असा प्रश्न पडावा असे ते अपूर्व पुस्तक होते. यात सिंदबादच्या सातच काय सातशे सफरी होत्या, अरेबियन नाईट्स हजारो असतील, हॅरी पॉटर ची जादू म्हणजे नुसते पुळक पाणी वाटावे, तर ट्रॅन्स्फॉर्मर्स, अवतार(इंग्रजी), आणि असले इतर सिनेमे म्हणजे या पुस्तकातील गोष्टींची नक्कल वाटावी इतके गुंग करणरे ते पुस्तक होते. त्याचे नाव “कथा-कल्पतरु!” पुराणातील कथाच होत्या. देव-दानवातील भांडणे, वगैरे नेहमीच्या अशा गोष्टी होत्याच पण देवा देवातील भांडणे, ऋषी-मुनीतील स्पर्धा, इतके अवतार, मल्टि-स्टार सिनेमात नसतील इतकी हजारो पात्रे, लढाया, अस्त्र-मंत्र-तंत्र,शाप-उ:शाप, व्रते-उपासना त्यांची फळे-परिणाम,त्याग-भोग सर्व सर्व होते. मी आणि शामने तर देव वाटून घेतले होते. या पुस्तकाने आमच्या सारख्या साध्या मध्यम वर्गाच्या मुलांचे बाळपण दैवी केले! समुद्रमंथनातून चौदाच रत्ने निघाली पण कथा कल्पतरु मध्ये अशी असंख्य रत्ने होती! आता ते पुस्तक कुठे मिळत नाही. पुस्तकाचे बाईंडिंग खिळखिळे झाले होतेच तरीही पुस्तक बरीच वर्षे होते. पण नंतर ते कधी सापडले नाही!

घरीच असणाऱ्या आणखी पुस्तकापैकी दत्तो अप्पाजी तुळजापुरकरांचे माझे रामायण, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृती-चित्रे,  कोल्हट्करांचे सुदाम्याचे पोहे, राम गणेश गडकरी यांचे  बाळकराम आणि त्यांची इतर सर्व नाटके. सुदाम्याचे पोहे, बाळकराम  आणि चि. वि. जोशी आणि आचार्य अत्रे यांनी आम्हाला नेहमी हसत ठेवले! गडकऱ्यांच्या नाटकांतील धारदार, पल्लेदर वाक्ये थक्क करून सोडत, मोठ्याने म्हणून पाठ करण्याचा प्रयत्न करत असू.(नंदूने शाळेच्या गदारिंग मध्ये राजसंन्यास मधील संभाजीचे  स्वगत “मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना ” म्हणून दाखवले होते) तर त्यांचे विनोदी संवाद हसवून हसवून मुरकंडी वळवत. देवलांच्या शारदेचे संवाद हृदयाला पीळ पाडीत तर त्यांचा फाल्गुनराव आणि भादव्या हसवून सोडीत. तीच गोष्ट आचार्य अत्रे यांच्या नाटकांची. आजही आपल्याला पु.लंची, सखाराम गटणे, अंतू बर्वा, रावसाहेब जसे आठवतात तसेच गडकऱ्यांची सिन्धू, तळीराम, गोकूळ, आचार्य अत्रे यांचा औदुंबर, बगाराम,चि.वि. जोशींचे चिमणराव, गुंड्याभाऊ वगैरे आठवतात. अशी अजरामर नाटके आम्हाला घरी वाचायला केव्हाही मिळत!श्रेष्ठ नट चिंतामणराव कोल्हटकरांचे बहुरूपी हे आत्मचरित्र आणि गोविंदराव टेंबे-प्रख्यात हार्मोनियम   वादक आणि संगीत दिग्दर्शक यांचीही  आत्मचरित्रे  सुंदर, वाचनीय होती.

आबासाहेब शाळेतून आमच्यासाठी ना.धों. तामण्ह्करांचे गोट्या, मुलींसाठी चिंगी अशी पुस्तके आणत. आमच्याकडे वि. वि. बोकीलांच्या दोन उत्तम कादंबऱ्या होत्या. द्वंद्व आणि बेबी. या लेखकाचे नावही आजच्या पिढीला माहित असणे शक्य नाही. गोट्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी बोकीलांचा वसंत होता. हा सुध्दा अनेकांचा दोस्त होता. त्यातच खानोलकरांच्या चंदूची भर पडली. हे सगळे मस्त खेळगडी होते.  शालापत्रक, खेळगडी, देवगिरिकरांचे चित्रमय-जगत ही मासिकेही चांगली असत. आबासाहेबांकडे लोकमान्या टिळकांच्या आठवणी हे अतिशय वाचनीय, आणि मोठे पुस्तक होते. लेखक-संकलक बापट(आद्याक्षरे आठवत नाहीत) असावेत. टिळकांचे निराळे चरित्र वाचण्याची त्यामुळे गरज भासली नाही.

या सगळ्या यादीत ना.सी. फडके, वि.स. खांडेकर कसे नाहीत? हे ही होते. पण आम्हाला हे दोघे लेखक फारसे आवडत नसत. वि.स. खांडेकर तर अण्णांचे मित्र. त्यांची बरीच पुस्तके भेट म्हणून अण्णांना येत.खांडेकरांचे खलिल जिब्रानच्या शैलीने लिहिलेल्या लघुनिबंधासारखे लेखांचे पुस्तक मात्र छान होते. त्यांच्या आणि फडक्यांच्या दोन तीन कादंबऱ्या चांगल्या होत्या. पण खांडेकरांनी लिहिलेल्या काही सिनेमांच्या कथा आणि संवाद गाणी वगैरे  फार सुंदर होती.

कवितांचे काय? त्याही होत्या पुष्कळ. केशवसुत, माधव ज्युलियन-“मराठी असे आमुची मायबोली” यांचीच कविता-, यशवंत, गिरीश, तर होतेच पण त्या वेळचे बरेच आधुनिक कविही होते.कुसुमाग्रज, वि.म. कुलकर्णी, संत, कवि अनिल, बा.भ. बोरकर, आणखीहि काही होते. शाळेच्या पुस्तकातील कविता आणि इतर दुसऱ्या कविताही, अगदी इंग्रजी सुध्दा,-माई तर त्या मराठी कवितेच्या चालीवर म्हणत असे -, आम्ही म्हणतही असू.

इंग्रजी पुस्तकांचीही गर्दी  होतीच. आमच्या घरी आणि आबासाहेबांकडेही. आणि त्या पुस्तकंमुळे आम्हाला ऑक्स्फर्ड प्रेस, हार्पर-कोलिन्स, पेन्ग्विन,मॅक्मिलन अशा प्रकाशकांची नावेही माहित झाली. विल ड्युरांट,स्पेन्सर वगैरे तत्वज्ञांशी ओळख नव्हती, पण सॉमरसेट मोघॅम-चुकलो, मॉम, थोडा शेक्स्पिअर-म्हणजे त्याच्या नाट्कांच्या गॊष्टींची पुस्तके-,sheridan ची i नाटके, शॉ, पी.जी. वूडहाऊस. बॉस्वेल(डॉ. जॉन्सनचे चरित्र), ग्राहम ग्रीन, रॅटिगनचे विन्स्लो बॉय नाटक-अण्णांनी हे वाचा म्हणून सांगितलेल्या काही पुस्तकांपैकी एक-, मॉडर्न इंग्लिश प्रोज, एसेज, अशी आणखी बरीच पुस्तके आमच्या वाचनात असत. येशू खिस्तासंबंधी  असलेले एक पुस्तक अण्णा नेहमी उल्लेख करीत, ते म्हणजे इमिटेशन ऑफ ख्राइस्ट! पण ते वाचले नाही. पण आता ते वाचायचे ठरवले आहे. पण एका पुस्तकाविषयी मात्र सांगितलेच पाहिजे. ते म्हणजे “हिडन इयर्स ऑफ ख्राइस्ट”! इंग्रजी नाही, त्याचे मराठीतले भाषांतर, “प्रभूचे अपरिचित चरित्र!” फार छान पुस्तक आहे. जुन्या ख्रिस्ती मराठी पुस्तकासारखी कृत्रिम, बोजड मराठी भाषा यात अजिबात दिसणार नाही. सगळ्यांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.  स्थानिक अमेरिकन मराठी मिशनने हे काम केले.त्यांच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी लेखकाचे नाव छापले नाही. हे पुस्तकही आमच्याकडे आज नाही!

कॉलेजमधे गेल्यावर तर पु.ल., गो.नी. दांडेकर, ग.दि. आणि व्यंकटेश माडगुळकर, चि.त्र्यं.खानोलकर, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा.भावे,वगैरे मान्यवर वाचनात आले होते. आचार्य अत्रे अजुनही जोरात होतेच….हे कधी संपणार असे तुम्हाला वाटण्या अगोदर थांबले पाहिजे. किती पुस्तके, त्यांच्या किती गोष्टी! त्या संपणार नाहीत.आम्ही सर्वजण केव्हा वाचू लागलो, काय काय वाचले,त्यावर किती गप्पा झाल्या, काय काय आणि किती सांगणार! तरी हे सर्व माझ्या कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसापर्यंतचेच आहे! आणि काही याद्या, गोष्टी थोडक्यात आटोपल्या आहेत. ( अरे बाप रे! हे थोडक्यात? सविस्तर काय असेल!)

अण्णांनी पुस्तके वाचा असे कधीही सांगितले नाही. पुढे नंतर नंतर,”हे वाचा” असे सांगत पण त्याही पेक्षा त्यांनी किंवा आमच्यापैकी कोणी काही नवीन वाचले त्यावर कधी गप्पा व्हायच्या, त्यातूनच पुन्हा नवी नवी पुस्तके वाचली जायची. पुस्तके पुस्तकेच होती. त्यांचे ग्रंथ झाले नव्हते. वाचन म्हणजे वाचणेच होते. त्याची संस्कृती झाली नव्हती. वाचण्याचा आनंद होता.अमृतानुभव झाला नव्हता, असे ते दिवस होते. आम्हा सगळ्यांचे ते पुस्तकांचे दिवस होते. आमचे घरच पुस्तकांचे होते!

आज ते दिवसही नाहीत, ती पुस्तकेही नाहीत आणि आमचे ते घरही नाही!

रेशनकार्ड ते ग्रीन कार्ड

सध्या कार्ड-संस्क्रुतीचे युग आहे. ओळख-पत्रापासून ते क्रेडिटकार्डपर्यंत नुसती कार्डेच कार्डे! मला माहित आहेत ती फक्त रेशन कार्ड आणि पोस्टकार्ड. ह्या दोन्हीशीच जास्त संबंध आला माझा.

रेशन कार्डानेही आपले रंगरूप बदलले. पूर्वी फक्त पोटापाण्याच्या वस्तूंसाठीच ते होते. आता तो एक महत्वाचा दस्त ऐवज झालाय. इतर अनेक अर्जांसोबत रहिवाशी असल्याचा पुरावा, घराच्या पत्त्याचा पुरावा,बॅंकेत खाते उघडताना अशा अनेक कारणासाठी ते आता वापरले जाते. त्यामुळे ते मिळवण्यासाठीही कचेरीत लांब रांगा लागलेल्या असतात. बरं ते आता निरनिराळ्या रंगातही मिळू लागलय. केशरी, तांबडे, पांढरे वगैरे वगैरे!

मध्यम वर्गात अलिकडे अमेरिकेचा उदय झाला. अमेरिकेत जाणाऱ्यांची जशी वर्दळ वाढू लागली तसे व्हिसा, जेट लॅग हे शब्द ऐकू येऊ लागले.मी ओळखत असलेल्या कार्डांबरोबर ग्रीन कार्डाचाही बोलबाला कानावर येऊ लागला.कुणाला व्हिसा मिळाला की त्या घरात जल्लोष होई, सत्यनारायणाची जंगी पूजा व्हायची. अमेरिकेचा विसा मिळायला पूर्वजन्मीचे पुण्य लागते,कुंडलीत तसे योग असावे लागतात, एखाद्याच्या(च) ते भाग्यात असते अशा दैवी गोष्टींना उत आला.एखाद्याला व्हिसा नाही मिळाला तर त्याला दुखवट्याची पत्रे येत!

व्हिसाबरोबर ओघाने ग्रीन कार्डाचेही महात्म्य वाढले. पण अनेकांना ह्या ग्रीन कार्डासाठी काय करावे लागते, आपल्या देशातूनच प्रयत्न करावा लागतो की अमेरिकेत जाऊनच केलेले बरे, कोण कोणती कागदपत्रे लागतात याची नेमकी माहिती नसते. बरं ज्यांना ग्रीन कार्ड मिळाले आहे त्यांना विचारले तर ’ते माझ्या मुलाला/मुलीला माहित आहे’, ’रोज नियम बदलतात’, ’काही खरं नाही हो’ अशी गूढ, रहस्यमय माहिती देतात. त्यामुळे ग्रीन कार्डाभोवतीचे वलय आणखीच गडद होते. पण ते मिळालेल्या माणसाभोवती मात्र एक तेजोवलय निर्माण होते!

नुकताच मीही ग्रीन कार्डाच्या भोवऱ्यातून बाहेर आलो. मी पुण्याला असतानाच सतीशने कोण कोणती कागदपत्रे आणायला लागतील त्याची यादी सांगितली होती. त्यापैकी जी मिळणार नाहीत, दप्तरात नोंदच नाही असे काही असेल तर तशा अर्थाचे प्रमाणपत्र त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आणायचे. नातेवाईकांचे त्याकरता प्रतिद्न्यापत्र नोटरीकडून प्रमाणित करून घ्यायचे ते सांगितलेच, शिवाय ही सर्टिफिकिटे, प्रतिद्न्यापत्रे यांचा मजकूरही सांगितला. अमेरिकेतील त्या खात्यांना ज्या पद्धतीचा आणि स्पष्ट अर्थबोध होईल अशा साध्या भाषेतील होता तो मजकूर. वास्तव काय आहे हे नेहमीच्या सोप्या आणि खरे काय आहे ते सांगणारा मजकूर असतो. मी तयारीला लागलो. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून माझा जन्म दाखला, माझ्या लग्नाचे प्रमाणपत्र, ते नसल्यास संबधित अधिकाऱ्याकडून तशा अर्थाचे पत्र, माझ्या ज्येष्ठ नातेवाईकांचे माझे लग्न अमुक तारखेला झाले ते आम्ही त्याचे काका, मामा, मावशी…भाऊ, बहीण ..आहोत म्हणून आम्हाला माहित आहे आणि हे आम्ही शपथेवर सांगतो… असे प्रतिद्न्यापत्र, सतीशचा जन्मदाखला, बस्स, इतकीच कागदपत्रे लागणार होती.

सतीशचा जन्म दाखला मिळवण्यासाठी, माझे शेजारी अकोल्याचेच म्हणुन त्यांना भेटलो. त्यांनी माझ्याकडून सर्व नावे, तारीख मागितली. मी ती ठळक इंग्रजी अक्षरात, पासपोर्टमध्ये जशी स्पेलिंग आहेत तशीच लिहून दिली. सर्व काळजी घेऊन. “होईल काका हे काम दोन तीन दिवसात”, असे त्यांनी सांगितल्यावर,इतक्या लवकर काम होईल हे ऐकल्यावर माझा कंठ दाटून आला यात नवल ते काय!.

आता मी माझ्या कागदपत्रांसाठी सोलापूरला गेलो. माझंच गाव, सर्व कार्यालये कुठे आहेत त्याची सगळी माहिती मला होती. एक दोन दिवसात होतील कामे असा माझा अंदाज. गेलो सोलापूरला. जन्म दाखल्यासाठी फी भरून अर्ज दिला. “आठ दिवस लागतील, नंतर या” असा पहिलाच झटका मिळाला. मी कामाची तातडी सांगितली. पण फारसा उपयोग झाला नाही.मग ओळखी-पाळखीने कामं लवकर होतील या अनुभवाने त्याच्या शोधात लागलो. सुनीलच्या ओळखी भरपूर. आपल्यापैकी एकाचा एक मामा आहे त्याला भेटू असे म्हणून आम्ही त्या दुय्यम अधिकाऱ्याकडे गेलो. त्याने मला एक अर्ज द्यायला सांगितला. मी लिहून दिला. “अहो असा नाही, असे म्हणत एक मोठा ताव घेतला आणि लिहा असे म्हणाला. त्यांना पाहिजे तसे लिहून दिले. “नावं, त्याची स्पेलिंग बरोबर लिहून द्या. नंतर काही बदल करता येणार नाही. मी सर्व काही माझ्या पासपोर्टमध्ये लिहिली होती तशी लिहून दिली. “बरं झालं, आजच आलात. मी पुण्याला वरच्या ऑफिसात चाललोय. तिथून उद्या परवा मंजूर करून तसा जन्म दाखला तुम्हाला देतो”. इतके ठामपणे सांगितल्यावर कुणाला धन्य धन्य वाटणार नाही?

मी आता माझ्या लग्नाच्या प्रमाणपत्राच्या पाठीमागे लागलो. “त्याची त्या ऑफिसात झाडून सगळ्यांशी घसट आहे. त्याला सांगा तुमचं काम.झालच म्हणून समजा.” “त्याला गाठले. “उद्या ११.४५ वाजता डाक बंगल्यापाशी या. मग आपण त्या निबंधकांच्या ऑफिसात जाऊ.” मी ११.३० वाजता डाक बंगल्यापाशी पोहोचलो. साडे बारा वाजले, १.३० वाजला, २.४५ वाजले आणि फटफटीवरून ते ग्रहस्थ एका माण्साला घेऊन आले. इतका उशीर झाला वगैरे त्याचे काही वाटत असल्याचे एकही चिन्ह त्या ग्रहस्थाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.. “यांचं छोटसं काम आहे मिनिस्टरांकडे. ते करून आलोच पंधरा वीस मिनिटात असे सांगून डाक बंगल्यात गेले ते दोघे जण. मी पुन्हा डाक बंगल्याचा पहारा करत उभा राहिलो. चार वाजता ग्रहस्थ आला आणि म्हणाला,” मिनिस्टरने जेवायलाच थांबवून घेतले. चला निघू या आता” असे म्हणत आम्ही निघालो. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात आलो. ह्यांच्या सर्वांशी गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने कुणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले. काय काम आहे असे म्हटल्यावर मी माझा अर्ज दिला. आमचे ग्रहस्थ साहेबाला सांगू लागले. साहेबांनी माझा अर्ज टेबलावर कागदाच्या ढिगाऱ्यात कुठे तरी ठेवून दिला. थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. ते ऑफिसात “वटट” असणारे ग्रहस्थ म्हणाले दोन दिवसात काम होईल.

चला. दोन्ही कामे दोन दिवसात होणार या आनंदात मी बुडून गेलो. म्हटलं आता विजय अण्णांचे ऍफिडेविट करून घेऊ या.

प्रतिद्न्यापत्राचा मजकूर एका कागदावर छापून घेतला. तो सुनीलकडे दिला. त्याच्या ओळखीचा एकजण ह्या कामात अनुभवी होता.

वाचकहो आता माझ्या जन्म दाखल्याच्या कामाचे काय झाले तिकडे वळू. (ह.ना.आपटे, नाथ माधव यांच्या कादंबऱ्यांची आठवण आली ना?) चला आता आपण त्या “आपल्यापैकी एकाच्या ओळखीच्या माणसाच्या मामांनी” पुण्याला जाऊन जन्मदाखला आणलाही असेल. त्यांना फोन करू. “अहो, हे काय मी पुण्याच्या साहेबांच्या ऑफिसातच आहे. काम होणार. उद्या मी येतोच आहे”. उद्याचे आठ दिवस झाले. इकडे त्या सगळीकडे वट असणाऱ्या ग्रहस्थांनी काय केले ते पाहू. कारण त्यालाही आता आठ दिवस होऊन गेले होते. “मी उद्या जातोय त्यांच्याकडे. उद्या फोन करा.” चला आपली दोन्ही कामे उद्या होणार. दहा बारा दिवस राहिल्याचे सार्थक होणार. उद्या दोन्हीकडे फोन केले. पुन्हा चार दिवसांचे वायदे मिळाले. सुनीलला सांगितले मी आता जातो. तू पाठपुरावा कर. तो बिचारा आपला नोकरी व्यवसाय सांभाळून माझ्या कामाचाही पाठपुरावा करत होता.

मी पुण्याला आलो.जवळपास एक महिना उलतून गेला होता. दोन तीन दिवसात मिळणारा सतीशचा जन्म दाखला पुण्याला येऊन जुना झाला असेल अशा विचाराने माझ्या अकोल्याच्या शेजाऱ्यांकडे गेलो. त्यांच्या कडून सतीशचा जन्म दाखला आणावा म्हणून गेलो. काय कसं काय झाल्यावर त्यांना दाखला मागितला. त्यावर ते म्हणाले.” हा घ्या फोन, विजूभाऊंशी तुम्हीच बोला.” ही आणखी काय नवी भानगड असे पुटपुटत फोन घेतला. त्या विजूभाउंशी बोललो. त्यानी पुन्हा सगळी माहिती विचारून घेतली. स्पेलिंग, प्रत्येक नावाचे एकेक अक्षर उच्चारून लिहून घेतले.त्यांनी सांगितलेली फी शेजाऱ्यांकडे दिली. चार दिवसांनी फोन करा म्हणाले.

हे सगळे होईपर्यंत मे संपला, जून कधी उलटून गेला ते समजले नाही. जूलैही निघून गेला. फक्त अकोल्याहून विजूभाऊनी मात्र आठ दिवसात सतीशचा जन्म दाखला पाठवला. पण त्यात संजीवनीचे स्पेलिंग चुकले होते. पुन्हा फोन. पण त्यावर विजूभाऊंचे उत्तर,”स्पेलिंग चुकले तरी उच्चार तोच होतोय ना?” काय म्हणणार यावर आपण? चार महिन्यात एक कागद हाती आला. दरम्यान माझ्या जन्म दाखल्याचे. लग्नाच्या सर्टिफिकेटचे आणि विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्राचे काय झाले त्याची वाचकांना उत्कंठा लागली असणार. पण आता मला अमेरिकेला निघणे भागच होते. त्यामूळे वाचकहो माझ्याबरोबर तुम्हीही अमेरिकेला चला!

मिळाली तेव्हढी कागदपत्रे घेऊन अमेरिकेत पोचलो.

अमेरिकेत येऊन तीन महिने मुक्काम झाल्यावर ग्रीन कार्डासाठी अर्ज दाखल करता येतो. पण त्या अगोदर तिथल्या पोलिस खात्याकडून माझ्यावर कोणतीही पोलिसी कारवाई झाली नाही, मी कोणताही गुन्हा केला नाही, अशा अर्थाचे एक प्रमाणपत्र लागते. डिसेंबर महिन्यात सतीशने माझ्यासाठी तसा अर्ज दिला. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही रेडवूड सिटी पोलिस मुख्यालयात गेलो. आवश्यक ती फी भरलीच होती. अर्ज होताच. मला पाहिले, पासपोर्ट पाहिला. लगेच माझ्या नावावर कसलाही गुन्हा, बेकायदेशीर गोष्ट केल्याची कसलीही नोंद नाही, मी गुन्हेगार नाही असे सर्टिफिकेट त्यांनी एकही प्रश्न न विचारता ताबडतोब दिलेही!

सतीशने कागदपत्रांची यादी पाहिली. माझा जन्म दाखला मिळेल तसाच दाखल करायचा ठरले. कारण त्याबाबतीत जनामावशीचे तसे प्रतिद्न्यापत्र होते. सतीशचा जन्मदाखलाही मिळाला तसाच दाखल करायचा असे ठरले. सतीश माझा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याला जी कागदपत्रे दाखल करायची होती ती त्याने जमवली. एका दिवसात. आता राहता राहिले माझ्या लग्नासंबंधीची कागदपत्रे. ती अजूनही सोलापूरहून आली नव्हती. त्या निबंधकाच्या ऑफिसात “वट्ट्ट्ट” असणाऱ्या माणसाचे कोणी ऐकले नाही. “असे प्रमाणपत्र आजपर्यंत कुणी मागितले नाही आणि आम्ही तसे ते देतही नाही” हे ठाम उत्तर निबंधकांनी दिल्याचे कळले.(कायद्याच्या कोणत्या कलमाखाली असे सर्टिफिकेट देता येते हे नमूद केले असूनही!) मग जगदिशने सुचविलेल्या एका वकीलाला हे काम दिले. त्या वकिलालाही तेच उत्तर निबंधकाने दिले.(वकीलानेही अशा अशा कलमाखाली,साहेब, तुम्ही असे सर्टिफिकेट देऊ शकता असे सांगितले नसणार). उलट वकीलालाच त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्याकडे एक शॊध अर्ज करा, शॊध घ्या आणि प्रतिद्न्यापत्र करून द्या. वकीलाने तसे केले. पण त्यानेही एक चूक केलीच. काहीही आवश्यकता, गरज नसताना, आम्ही सांगितले नसतानाही, संजीवनीच्या पाठीमागे “लेट” असे लिहिले. विनाकारण नसते फाटे फोडायचे सगळ्यांनी ठरवले की काय वाटायला लागले. पुन्हा मुंबई, सोलापूरला फोनाफोनी. दुरुस्ती झाली. आता माझे लग्न झाले याचे प्रतिद्न्यापत्र विजय अण्णांकडून यायचे होतेच. श्याम आणि शैलाकडून घ्यायचे ठरले. सोलापूराहून एकही कागदपत्र आले नव्हते. दरम्यान फोनाफोनी चालूच होती.

माझ्या जन्मदाखल्यात अनेक चुका होत्या. त्यातील दोन चुका फक्त दुरुस्त होतील, आईचे नाव माझ्या पासपोर्टात आहे तसे(तेच बरोबर नाव होते तरीही) करून मिळणार नाही असे बरेच वेळा संगितले होते. पुन्हा खटपट, आपली बाजू मांडून सुनीलने पहिली. पण काही उपयोग झाला नाही. विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्रात जणू काही दर वेळी नवी चूक करण्याचा निश्चयच केला होता की काय त्या तज्न्य माणसाने असे वाटायला लागले. आतापर्यंतच्या चुकांवर सर्वात मोठी कडी त्याने केली म्हणजे नवीन प्रतिद्न्यापत्रात वर्तमानपत्रात हेड्लाईन शोभावी एव्हढ्या ठळक अक्षरात “देअर इज टॉयलेट इन माय हाऊस” असे शीर्षक छापून मग पुढचा (तोही स्पेलिंगच्या चुका करून ) मजकूर लिहिला होता. निर्मळ ग्राम योजनेच्या नियमाप्रमाणे ते कुठल्याही प्रतिद्न्यापत्रावर आवश्यक केले होते म्हणे! तेही फक्त सोलापुरातच की काय! कारण पुण्या मुंबईत जी दुसरी दोन तीन ऍफिडेव्हिट करून घेतली होती तिथे कुणी असा “विधी” केला नव्हता. मग सोलापूरचा नाद सोडून दिला. मिळाला तसा माझा जन्म दाखला मागवून घेतला. तो आहे तसाच दाखल करायचे ठरवले होतेच. माझ्या ल्ग्नासंबंधीची दोन प्रतिद्न्यापत्रे श्याम आणि शैलाकडून करून घ्यायचे नक्की केले. यासाठी श्रीकांतने आणि स्मिताने खटपट केली. अखेर पाहिजे होती ती कागदपत्रे आली. आली पण केव्हा? मार्च महिन्यात! तीन चार दिवसात माझी वैद्यकीय तपासणी(म्हणजे रक्ताच्या चाचण्या, तीन चार लशी टोचून घेणे इ.) होऊन त्याचे रिपोर्टही हातात आले. आता सगळी कागदपत्रे, यादी करून सोबत माझी आणि सतीशची पूर्ण माहिती भरलेले अर्ज जोडून आणि आवश्यक त्या रकमेचा चेक लावून ते बाड सतीशने पाठवून दिले. तीन दिवसांनी ते मिळाल्याचे पोच-पत्र त्यांच्याक्डून आले. आठ दहा दिवसात ३ मे रोजी बोटाचे ठसे देण्यासाठी १२.१५ वाजता या असे पत्रही आले. बोटाचे ठसे दिले. लागलीच, तिथल्या तिथेच, तुमचे बोटाचे ठसे घेतले, पुढच्या कार्यालयात पाठवले अशा अर्थाचे पत्रही दिलेही! त्यानंतर आठ दहा दिवसांनी ग्रीन कार्ड मिळण्यासंबंधात तुम्ही मुलाखतीसाठी ३ जून रोजी सकाळी ८.२५ वाजता या ऑफिसात यावे असे पत्रही आले.त्यामूळे आता अजून पंधरा दिवस आहेत, यशचे बरेच फोनही आले,”तू केव्हा येणार? माझ्या कॉन्सर्टला यायला पाहिजेस “असे त्याचे फोन येत होते. सतीशकडे येऊनही बरेच महिने झाले होते. यदाकदाचित ग्रीन कार्ड मिळालेच(!) तर मग लगेच निघावे लागेल. असा सर्व विचार करून मी सुधीरकडे पंधरा दिवसांसाठी आलो. तिथला मुक्काम आटोपून सतीशकडे पुन्हा एक जूनला आलो. त्या दिवसापासूनच नव्हे मुलाखतीचे पत्र आल्यापासून काळजी, चिंता, धाकधुक वाढली होतीच. इंटरव्ह्यू कसा होईल याची काळजी, ताण आला होता, वाढतही होता.

सुधीर सतीश सारखे सांगत होते. साधा असतो हा इंटरव्ह्यू. जुजबी माहिती विचारतात, काळजी करू नका; असे सारखे सांगत होते. पण माझे मन ते माझे मन. “चिंतनात” मग्न! असो. आदल्या रात्री सतीशने सकाळी सात वाजता निघायचे असे सांगितले. सॅनफ्रॅन्सिस्कोला जायचे होते. सकाळी रहदारी फार. गर्दी असते. तेजश्रीने सांगितले, “विरळ म्हणत होता इंटरव्ह्यू अर्धा तास तरी चालतो”. पुन्हा माझ्या पोटात गोळा आला. इतका वेळ तोंड कसे काय द्यायचे! मी म्हटले, अरे, बराच वेळ असतो की हा प्रकार! सतीश शांतपणे म्हणाला, ” बाबा, तुमचा इंटरव्ह्यू एक तास चालेल,दहा मिनिटे चालेल.प्रत्येकाचे प्रकरण निराळे असते.” तीन जून उजाडला. मी पाच वाजताचा गजर लावला होता. उठलो. सगळे आटोपले. सतीश आणि मी निघालो. आणि त्या कचेरीत आठला पाच मिनिटे कमी असताना पोचलो. बाहेरच्या प्रवेशद्वारापासूनच सुरक्षिततेची तपासणी, ओळखपत्रांची तपासणी, सुरू झाली. आत गेलो तिथे तर याहूनही थोडी जास्तच तपासणी. पण हे सर्व साध्या नेहमीच्या आवाजात सौम्यपणे सांगत चालले होते. मग दुसऱ्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याला भेटलो. त्याने माझ्या अर्जावर काहीतरी लिहिल्यासारखे केले आणि तिसऱ्या मजल्यावर जाऊन थांबायला सांगितले. गेलो आणि वाट पहात बसलो. बरोबर ८.२०-२२ मिनिटांनी एक हसतमुख अधिकारी आला. “सडॅ, सडा..शिव्ह कॅमॅ..ट म्हणत आला. इतके नागमोडी उच्चार करायला लावणाऱ्या नावाचा दुसरा तिथे कुणीही(तामिळ, तेलगू) नव्हता. त्यामुळे आम्ही दोघे लगेच उठलो. त्याने आम्हाला त्याच्या पाठोपाठ यायला सांगितले. एक दोनदा डावीकडे, उजवीकडे करत त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्याने पुन्हा आमचे हसतमुखाने स्वागत केले. आणि वरदहस्त करत मी खरे सांगेन, खोटे सांगणार नाही खरे तेच सांगेन अशी शपथ घ्यायला लावली.(सांगू तेच खरे-मी). मग त्याने आमची ओळख पत्रे(माझा पासपोर्ट) पाहून आम्ही तेच आहोत याची खात्री करून घेतली. मी अर्जात माझी जी माहिती– जन्म तारीख, सतीशचा पत्ता, वय, वगैरे दिली होती तीच पुन्हा विचारून घेतली.लगेच किती मुले(सन्स) विचारले.

मी दोन मुलं(मुलगे) म्हणून सांगितले. नंतर एखादा प्रश्न विचारला. आणि पुन्हा विचारले किती मुले? मी दोन म्हणालो. चूक लक्षात आली. तो अर्जात पाहू लागल्यावर मी लगेच म्हणालो ऍन्ड वन डॉटर”. तो हसला आणि यस यस म्हणत अर्जावर बरोबर अशी खूण केली. सतीशलाही त्याने एखादाच प्रश्न विचारला असेल. लगेच त्याने तुम्हाला ग्रीन कार्ड मंजूर झाल्याचे सांगितले आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का असे विचारले. मी तर इतका मोकळा मोकळा, हलकाफुल्ल झालो होतो, ताण तणाव कुठे पळून गेले होते ते लक्षातही आले नाही. मला कसले प्रश्न असणार? सतीशने अखेर विचारायचे म्हणून विचारले की मग आता माझे बाबा परत जाऊ शकतील का? तो अधिकारी म्हणाला,” नाही. कार्ड प्रत्यक्ष हातात पडल्याशिवाय जाता येणार नाही.”आणि ते कार्ड दोन-तीन आठवड्यात येईल तुमच्या पत्त्यावर हेही सांगितले. लगेच त्याने एक छापील पत्रही दिले. माझे अभिनंदन आणि ग्रीन कार्ड तुम्हाला मिळाले असे सांगणारे ते पत्र दिले. ते घेतले आणि आम्ही थॅन्क्यू थॅन्क्यू म्हणत बाहेर आलो. सहज घड्याळाकडे पाहिले -फक्त दहा मिनिटे झाली होती!

चला, ग्रीन कार्डाच्या या प्रवासाला ंमी पुण्याहून निघण्या अगोदर फार पूर्वीपासूनच सुधीरने बाबा आता ग्रीन कार्डाच्या तयारीनेच या, मी आणि सतीश तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील आणि काय करावे लागेल ते सांगू, अशी सुरवात करून कामाला लावले. सतीशने मग सगळे तपशीलवार क्ळवले त्यापासून सुरवात झाली होती.. सतीशच्या धडपडीला,सुधीरच्या सुचनांना जगदीशच्या,सुनीलच्या, श्रीकांत आणि स्मिताच्या मेहनतीला, तसेच जनामावशी, श्याम आणि शैला यांनी केलेल्या सहाय्याला, मदतीला यश आले. माझ्यासारख्या ” सदंभटाचे तट्ट्टूटू अमेरिकेच्या गंगेत न्हाले”.

ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. त्यामुळे कागदपत्रांची जमवा जमव करताना आलेले अनुभव आता मोठे विनोदी वाटतात! हसू येते.

पण सतीश म्हणतो त्याप्रमाणे, बाबा आपले सगळे रेकॉर्ड इतके सरळ, आणि कसल्याही गुंतागुंतीचे, बेकायदेशीर, वेडेवाकडे काही नसते. आपल्याला काय विचारायचे हा त्यानांच प्रश्न असतो!”त्यांनी आपल्यालाच ग्रीन कार्ड तुम्ही छापून घ्या असे सांगितले असते.” हेच खरे.

डोरोथीचे फिरते वाचनालय

शनिवारी रविवारी किंवा सुटीच्या दिवशी दुपारी आमच्या घरी, आबासाहेबांच्या घरी एक ’दूत’ येत असत. सायकल वरून यायचे. धोतर पिंडऱ्यांपर्यंत वर ओढलेले आणि सायकल्च्या क्लिपा लावून घटट पकडीत ठेवलेले. सायकलच्या त्रिकोणात तेवढ्यीच मोठी, पाकिटासारखी बक्कल वगैरे लावलेली पिशवी. त्या पिशवीत साप्ताहिके, मासिके, पुस्तके भरलेली. मागच्या कॅरिअरवरही पुस्तकांनी भरलेली एखादी पिशवी. डोक्यावर काळी टोपी. डोळ्यांवरचा काडीचा चष्मा कधी कपाळावर नेलेला.रंग उगीच सावळा म्हणायचा, पण खरा काळाच.सायकल ठेवून, घाम पुसत, पुस्तकांची पिशवी, काही मासिके हातात घेऊन ते आत आले की गप्पा आणि चहा-पाणी व्हायचे. दूतांची जीभ तशी तिखटच. त्यामुळे ते बोलत असताना बराच खाटही उडायचा. ऐकणाऱ्याला ठसका लागायचा.अधून मधून हसतानाही ठसका लागायचा.’दूत’ म्हणजे “दूताचे फिरते वाचनालयाअ”चे मालक, सर्व काही तेच. हे आपल्या वर्गणीदारांच्या घरी जाऊन मासिके, पुस्तके द्यायचे. हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता.मला वाटते की ते लिहितही असावेत कधी काळी, किंवा त्यांचे दूत नावाचे अगदी लहानसे स्थानिक वर्तमानपत्र तरी असेल.पण दूत हे नाव छान होते.लोक मात्र गमतीने त्याला ’भूताचे फिरते वाचनालय’ म्हणत!

घरोघरी,व्यवसाय म्हणून का होईना, पुस्तके नेऊन लोकांना वाचनानंद देण्याचा व्यवसाय त्याकाळी तरी नाविन्यपूर्ण होता. एका द्रुष्टीने न्यानार्जनाचाही. दूतांची म्हणजेच टिकेकरांची,त्यांच्या पुस्तकफेरीची, फिरत्या वाचनालयाची आठवण होण्याचे कारण नुकतेच लहान मुलांसाठी लिहिलेले एक पुस्तक मी वाचले. ते डोरोथी थॉमस ह्या एका अगदी मनापासून पुस्तकप्रेमीअसलेल्या बाईविषयी होते.

डोरोथीला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांचे वेडच होते म्हणा ना तिला. तिला पुस्तकांइतकीच माणसेही आवडत. लोकांविषयी खरे प्रेम अस्ल्यामुळे सगळ्यांशी तिची पटकन मैत्री व्हायची. लोकप्रेमी असल्यामुळे ती लोकप्रियही झाली. वाचनाच्या आवडीमुळे आपल्या मोठ्या गावातल्या मोठ्या, सुंदर इमारत असलेल्या लायब्ररीत-वाचनालयात- ती नेहमी जाऊन पुस्तके आणत असे. लहानपणी प्रत्येकाला आपण कोणी तरी– इन्जिन ड्रायव्हर, पोलिस, मास्तर, जादूगार व्हावे, सर्कशीत जावे, डॉक्टर व्हावे असे वाटते. डोरोथीला गावातल्या त्या भल्या मोठ्या सुंदर ग्रंथालयात जाता येता आपण अशा एखाद्या मोठ्या वाचनालयात मुख्य, ग्रंथपाल व्हावे असे वाटे. तिचे हे स्वप्न होते.

डोरोथी रॅडक्लिफ कॉलेजात गेली. कॉलेजमध्ये असताना तिथल्या वाचनालयातली सगळी पुस्तके तिने वाचून काढली! त्यानंतर तिने ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याची पदवीधरही झाली. ग्रंथपाल म्हणून काम करण्यास ती आता पूर्ण सिद्ध झाली. पण डोरोथी प्रेमात पडली. तिचे लग्न झाले. तिच्या नवऱ्याला शेतीची आवड होती. मॅसॅच्युसेट्समधील आपले मोठे गाव सोडून नवऱ्याबरोबर ती एका लहानशा गावात आली. आतापर्यंत पुस्तकातच वाचलेल्या, पाहिलेल्या अशा लहानशा गावात डोरोथीचा संसार सुरू झाला.

नॉर्थ कॅरोलिनामधले ते गाव निसर्गरम्य होते. निळ्या जांभळ्या डोंगरांच्या रांगा, हिरव्या झाडांनी भरलेल्या लहान मोठ्या दऱ्या-खोरे, डोंगरांच्या कड्यांवरून ओसंडत येणारे लहान लहान धबधबे, तांबड्या पिवळ्या, निळ्या फुलांनी बहरलेल्या वेली, फुलझाडे अशा माऊंट मिशेलच्या पायथ्याशी वसलेल्या गावात डोरोथी आली. गावकरी भले होते. थोड्या दिवसातच तिने बरोबर आणलेली सगळी पुस्तके वाचून झाली.मग शेजाऱ्या-पाजाऱ्याशी पुस्तकांची देवाण घेवाण सुरू झाली. त्यातून अनेक जणांशी ओळखी वाढल्या. डोरोथीला आपल्या गावातल्या त्या भल्या मोठ्या सुंदर वाचनालयाची वरंवार आठवण येत असे. या खेडेगावात ग्रंथालयच नव्हते तर ती आता ग्रंथपाल कुठून होणार. तिचे लायब्ररियन होण्याचे स्वप्न तसेच राहिले.

तिने आपल्या शेजाऱ्यांची, गावातल्या लोकांची आपल्या घरी एक सभा घेतली. आपल्या गावासाठी एक चांगले वाचनालय पाहिजे असे डोरोथीने सांगितले. तिथल्या तिथे थोडे फार पैसे जमले. गावकऱ्यांनी ठरविले की आपली “लायब्ररियन” डोरोथीच! काही दिवसांनी मोटारीची फिरती लायब्ररी सुरू झाली. दोन्ही बाजूंचे द्रवाजे झडपांसारखे वर उघडले. आत नीटनेटकी रचून ठेवलेली पुस्तके पाहिल्यावर गावाला आनंद झाला. डोरोथीच्या घरी लोक पुस्तके आणून देत. त्यांची भली मोठी चवड घेऊन ती रोज आपल्या तळघरात-बेसमेंट्मध्ये- नेऊन ठेवायची पुन्हा तिथून रोज लागतील तशी वर आणून आपल्या फिरत्या वाचनालयात ठेवायची. असे दिवसातून दोन तीन वेळा तरी करावे लागत असे. ग्रंथालय शास्त्राची पदवीधर असल्यामुळे ती सर्व काही अगदी ’शास्त्रोक्त’ करत असे. विशिष्ट पद्धतीने विषयवार. लेखकानुसार वगैरे ठेवायची. मोटारीत-चुकलो- वाचनालयात पुस्तके रचून झाली की डोरोथीबाईंची भ्रमणगाथा सुरू!

टेकड्या चढून, डोंगर उतारावरून, कच्च्या रस्त्यावरूब,’फिरते वाचनालय फिरत निघाले की वाटेत ठिकठिकाणी थांबायचे. शाळेच्या मैदानात, प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ, गावा गावातल्या– हो, ती तीन काऊन्टीमधल्या गावात पुस्तके द्यायला जात असे- एखाद्या विविध वस्तू भांडारासमोर, पोष्टा जवळ लोक डोरोथीची, ’फिरत्या वाचनालयाची वाट पहात उभी असत.

लोक उत्साहाने पुस्तके आणतात, नेतात आणि वाचतात हे रोज पहात असली तरी डोरोथीला कालच्यापेक्षा आज आनंद जास्त व्हायचा. तिची फिरती अविरत चालू असे. उन असो की पाऊस, थंडी असो की बर्फ पडत असो डोरोथीचे वाचनालय फिरत असे. एकदा जोराचा पाऊस झाला. नॉर्थ टो नदीला पाणी आले. आजूबाजूला काठावर आणि पात्रातही चिखलच च्खल झाला होता. डोरोथीबाई आपली लायब्ररी चालवत एक वळण घेत होत्या. वाचनालय घसरले आणि डोरोथीबाईसह नदीत पडले.डोरोथी वाचनालयाच्या खिडकीतून कशीबशी बाहेर आली आणि मोटारीच्या कडांना धरून मोटारीबरोबर हळू हळू वाहात चालली. सुदैवाने फिरती लायब्ररी/ते फिरते वाचनालय एका लहानशा बेटासारख्या ऊंचवट्यावर येऊन थांबले. “मला वाटलं होतं मोठ्या गावातल्या एखाद्य सुंदर इमारत असलेल्या मोठ्या वाचनालयाची मी ग्रंथपाल होईन, आणि आता पहा माझा हा अवतार!”चिखलाने बरबटलेले आपले कपडे झटकत पुसत डोरोथी स्वत:शीच बोलत होती. इतक्यात वरच्या रस्त्याने ट्रॅक्टर चालवत जाणाऱ्या शेतकऱ्याने डोरोथीचे फिरते वाचनालय पाहिले. त्याने लगेच, “मिझ डोरोथी, कवितेचे एखादे छान पुस्तक मला पाहिजे आहे, देता का?” डोरोथीनेही तितक्याच तत्परतेने उत्तर दिले,” तू मला इथून वर बाहेर काढलेस की लगेच!” ट्रॅक्टरने ते फिरते वाचनालय रस्त्यावर आणले. डोरोथीने दोन्ही दारे वर उचलली आणि म्हणाली,”आता लायब्ररी उघडली.” तिने लगेच त्या शेतकरी वाचकाला आवडेल असे पुस्तक काढून दिले.

रिव्हरसाईडचे विद्यार्थी तर डोरोथीबाईची आणि फिरत्या वाचनालयाची आतुरतेने वाट पहात उभे असत. त्यांना ही एक मोठी पर्वणीच असे. सग्तळ्यात जास्त आनंद व्हायचा तो बेनला. डोरोथीच्या फिरत्या वाचनालयातूनाच त्याने विमानावरची सर्व पुस्तके आणि पराक्र्मी साहसीवीरांची बहुतेक सगळी पुस्तके त्याने वाचली होती. ग्लोरिया ह्युस्टन तर स्वत:ला दुप्पट भाग्यवान समजत असे. कारण शाळेत आणि तिच्या वडिलांच्या दुकानापाशीही डोरोथीचे वाचनालय यायचे त्यामुळे तिला दर आठवड्याला नवनवीन पुस्तके वाचायला मिळायची. बेन डोरोथीला म्हणायचा,”मोठा झाल्यावर ह्या पुस्तकांतील सगळे जग मी पाहाणार आहे.” आणि बेन पुढे अमेरिकन विमानदळात वैमानिक झाला!

डोरोथीचे फिरते वाचनालय शेजारच्या दोन तीन तालुक्यातल्या गावातही जात असे. जिथे जाईल तिथल्या लोकांशी तिची मैत्री व्हायची. ज्यांना मोटारीपाशी येता येत नसे त्यांच्यासाठी ती स्वत: पुस्तकांचे गठ्ठे घेऊन त्यांच्या घरी जायची. मिसेस मॉम थकल्या होत्या. त्यांचे घर उंच टेकडीवर होते. पुस्तकं वाचून झाली की बाहेर कपडे वाळत घालायच्या दोरीवर आपल्या नवऱ्याचा मोठा लाल डगला अडकवून ठेवायच्या. तो लाल डगला फडफडताना दिसला की डोरोथी पुस्तकांचा भारा घेऊन टेकडी चढून जायची. मॉमना पुस्तके द्यायची. थंडी वाऱ्यात, बर्फातही सुद्धा यात कधी खंड पडला नाही.

डोरोथीची आणखी एक दुसरी लहान मैत्रीण होती. बार्बरा डेव्हनपोर्ट. तिला शाळेत, बाहेर कुठे जाता येत नसे. कारण तिचा सर्व काळ चाकाच्या खुर्चीतच जायचा. तिच्या वाचनाची भूक डोरोथी स्वत: हवी ती पुस्तके नेऊन देऊन भागवत असे. भरपूर पुस्तके देताना डोरोथी बार्बराला नेहमी म्हणायची,” किती भराभर वाचून संपवतेस गं तू पुस्तकं! मी जितकी लवकर लवकर येते पुस्तकं घेऊन त्याच्या आत वाचूनही झाली असतात की तुझी पुस्तकं!” पण असे म्हणताना लोकप्रेमी ’ग्रंथपाल डोरोथी”च्या डोळ्यांतील आनंद लपत नसे.आपली पुस्तके कोणी तितक्याच आवडीने वाचताहेत याचा आनंद फार मोठा असतो.डोरोथी नेहमी ह्या आनंदात बुडालेली असे.

दिवस चालले होते. गावातल्या एका पुस्तकवेड्या वाचकाने आपले घर वाचनालयासाठी गावाला दिले.मग काय विचारता! गावतील प्रत्येकजण ही ना ती लागेल ती मदत करू लागला. घर स्वच्छ होऊ लागले. काही बदल केले. रंगरंगोटी झाली. शाळेतील मुला मुलींनी शेल्फमध्ये पुस्तके लावून ठेवली. मिसेस मॉमनी एक सुंदर टेबलक्लॉथ दिला. गावातल्या आयांनी उदघाटनाच्या दिवशी केक, कुकीज वगैरे नाना पदार्थ करून आणले. उदघाटनाचा सोहळा-पार्टी जोरदार झाली. गंमत म्हणजे लायब्ररीचा झेंडा म्हणून मिसेस मॉमनी तो लाल डगला दिला! आणि तो उंच खांबावर डौलात फडकत होता.

दिवस थांबत नाहीत. डोरोथीच्या वाचनालयाच्या भिंती तिला मिळालेल्या मान-सन्मानांनी, मानपत्रांनी आणि गौरव चिन्हांनी सजल्या. ठिकठिकाणचे, दूर दूरचे लोक डोरोथीची लायब्ररी पाहण्यासाठी, मुलाखती घेण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी, निळ्या जांभळ्या डोंगरांच्या रांगा, हिरव्यागार झाडा-व्रुक्षांनी नटलेल्या दऱ्या-खोऱ्या, डोंगरकड्यांवरून ओसंडत येणारे लहान लहान धबदबे, तांबड्या,पिवळ्या निळ्या फुलांनी बहरलेल्या वेली फुलझाडे अशा माऊंट मिशेल्च्या पायथ्याशी वसलेल्या त्या लहान गावात येऊ लागले!
दोरोथीबाईना आपल्या मोठ्या गावातील सुंदर लाल विटांची मोठ्या लायब्ररीची आठवण येत असे; फारशी नाही, क्वचित एखाद्या वेळी यायची. आपल्या लहान गावातील वाचनालयातच ती इतकी बुडून गेली होती. कारण गाव आता पुस्तकप्रेमी,वाचनवेड्या लोकांचे झाले होते. गावाला पुस्तकांविषयी आणि डोरोथी विषयी प्रेम होते.

डोरोथीला रोज पत्रे येत, जवळपास्च्या गावातून आणि दुर्वरच्या गावातूनही. त्यात बेन हार्डिंग्जचे, जेम्स बायर्डचे आणि बार्बरा डेव्हनपोर्टचीही पत्रे असत. बेन ,बार्बरा, जेम्स यांच्या यशात डोरोथीचा फार मोठा वाटा आहे. डोरोथीमुळेच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. पुस्तकांमुळेच त्यांना फार मोठे जग अनुभवता आले. प्रत्येक पुस्तक त्यांच्यासाठी एक नवीन जगच असे. लेखिका ग्लोरिया ह्युस्टन प्रख्यात शिक्षिका, जागतिक कीर्तीची शिक्षण्तज्न.तिलाही शाळेपासून डोरोथी,तिचे फिरते वाचनालय आणि पुस्तके ह्यांचा सहवास लाभला आणि ह्याचा तिच्यावर फार मोठा प्रभाव पडला.

आज डोरोथी थॉमस नाही. तिला ओळखणारेही त्या पिढीतील गावात आज कोणी नाही. गावातल्या लोकांना डोरोथीचे दफन नेमके कुठे झाले ती दफनभूमीही माहित नाही. त्यामुळे तिचे तसे स्मारक, शिळा वगैरे त्या गावात काही नाही.पण अनेकांच्या मनात वाचनाचे बीज रुजवले, वाचनाची आवड जोपासली, वाढवली, पुस्तकांविषयी प्रेम आणि वाचन-संस्क्रुती निर्माण केली हेच तिचे खरे स्मारक.

परि जयांच्या दफनभूमिवर । नाही चिरा, नाही पणती॥…..अशा डोरोथी थॉमस पुढे…तेथे कर माझेजुळती॥

दोन घडीचा डाव

गेली दोन तीन वर्षे व्टेंटी-२० क्रिकेटचा जल्लोष चालू आहे. क्रिकेट शौकीनांना रोज मेजवानी. थोड्या वेळात भरपूर मजा आणि करमणूकही! सिनेमा नाटकाला जाऊन यावे तसे लोक जातात. पूर्वी जसे सिनेमाच्या थेटरात हिरो घोड्यावरून/फटफटी/मोटारीतून भरधाव वेगाने हिरॉइनला सोडवायला निघाला की प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवून थेटर डोक्यावर घेत; तसे आता सेहवाग, ख्रिस गेल, वॉर्नर, रायडू चौकारामागून चौकार,सिक्सर वर सिक्सर ठोकू लागले की सगळे स्टेडियम डोक्यावर घेतात.आणि त्यांचे एखादे दैवत पटकन बाद झाले की एकदम सगळीकडे सुतकी कळा पसरते.

क्रिकेटच्या ह्या नवीन प्रकारने एक टाईमपास मजा आणली आहे. तीन तासाच्या ह्या झटपट क्रिकेटची मोठ्या बेभरवशाची, क्षणभराच्या धुंदीची आणि बेहोष जल्लोषाची जादू संपली की खरे क्रिकेटभक्त सोडले तर तो सामना कुणाच्या फारसा लक्षात राहात असेल का याची शंकाच आहे. ह्या प्रकारात होत्याचे नव्हते कधी होईल याचा नेम नाही. ठोकाठोकी करून धावा काढणारा दुस्रऱ्याच चेंडूवर बाद! ज्याचे कधी नावही ऐकले नव्हते तो चांगल्या चांगल्या गोलंदाजाना पिटून काढतो तर तसाच एखादा नवखा, नाव नसलेला गोलंदाज क्रिकेटच्या महारथीची दांडी उडवतो. एखादा चिपळी मध्येच केव्हा तरी आपली बॅट वाजवतो, तर कोण श्रीवास्तव भराभर बळी घेतो! भरवशाचा म्हणून फलंदाजीला पाठवलेला युसुफ़ फुस्स होतो, तर क्रिकेटमधले देव-दैवते निष्प्रभ होऊन तंबूत परततात.आणि आता हा काय खेळणार असे लोक म्हणत असताना तोच संघाला वाचवतो. राजाचा रंक आणि रंकाचा राव कोण कधी होईल याचा नेम नाही.

नेम नाही वरून लक्षात आले. कुठला टोला कुठे जाईल ह्याचाही नेम क्रिकेटच्या ह्या प्रकारात नाही. आम्ही लहानपणी ज्याला अंधापत्ता म्हणून हिणवत असू तोच टोला आता सामना जिंकूनही देतो! लगेच लोक त्याला आणि स्टेडियमला डोक्यावर घेतात. बरेच वेळा बॅट इकडे फिरते तर चेंडू तिकडे जातो आणी क्षेत्ररक्षक थोडावेळ गोंधळून गोल फिरतो. पण संघाला धाव मिळते. प्रत्येक धाव आणि क्षण मोलाचा आहे. एका रात्रीत श्रीमंत व्हावे आणि सकाळी दिवाळे निघावे तसे सुरवातीची चार-पाच षटके भरभराटीची तर पुढच्या दोन-चार षटकात संघाचा खुर्दा उडालेला! म्हणूनच हा खेळ रोमांचक आणि रोमहर्षक झाला असावा.

पण व्टेंटी-व्टेंटीने बऱ्याच नव्या गोष्टी घडवून आणल्या हे मात्र खरे.ज्या खेळाडूना रणजी ट्रॉफीनंतर मोठ्या सामन्यात खेळायला मिळाले नसते त्यांना जगातील आणि आपल्या देशातील नामांकित खेळाडूंबरोबर खेळायला मिळते आणि आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.पण खेळाबरोबर आणखीही गोष्टी आल्यामुळे पैशाची उलाढाल वाढली.आमच्या गावात सामन्यांच्या वेळी हौशी प्रेक्षक आपणच एखाद-दुसरे वाद्य वाजवत.काहीजण फटाके उडवत. आता फटाके, शोभेची दारू यांची आतषबाजी होते. आणि आयोजकच बॅंडवाले आणतात, गाणी लावणारे आण्तात. एकंदरीत मौज-मजा वाढलीय.क्रिकेटचा आणि पैशाचाही खेळ झालाय.

अलिकडे हा वीस-वीस षटकांचा खेळ सुरू झाल्यापासून आणि त्याही थोडे अगोदर उलटा शॉट-रिव्हर्स स्वीप- मारणे सुरू झाले. जावेद मियांदादने हा प्रकार सुरू केला असे हल्लीचे क्रिकेटप्रेमी,जाणकारही म्हणतात.पण आमच्या संभा पवारने हा शॉट सुरू केला. आम्ही सगळेजण त्यावेळी,”अबे संभा पवार डोक्यावरून, कधी तर विकेटकीपरच्या डोक्यावरून बॉंड्री मारतय रे. “फावड्यासारखी बॅट फिरवुन बॅटीच्या तळहातावरून शॉट. येकदम बॉंड्री बे!”

आता प्रत्येक संघात परदेशाचे दोन-तीन खेळाडू तरी असतात. ही प्रथा अलिकडचीच असे सगळ्यांना वाटते. तसे वाटणे साहजिक आहे. पण आमच्या गावात क्रिकेटचे मोठे जोरदार सामने होत. एके वर्षी क्रिकेटप्रेमी हाजी हाजरतखान यांनी एसवायसी साठी लाहोर, पंजाबचे नामांकित खेळाडू आणले होते. त्यापैकी अमीर इलाही तर हिंदुस्थानकडून टेस्ट खेळत असत. ते तसेच महम्मद गझाली हा प्रख्यात गोलंदाज त्यांनी आणला होता. तर नरसिंगगिरजी संघाने हिंदुस्थानकडून काही टॆस्ट खेळलेल्या चंदू गडकरी हा उत्तम फलंदाज आणि क्रिकेट महर्षी देवधरांचा मुलगा शरद देवधर यांना आणले होते. हे सगळे खेळाडू मोठे रुबाबदार होते. गझाली तर लाल गोरा, उंचापुरा. शरद देवधर तितका उंच नव्हता पण लालबुंद होता इतके आठवतेय. पण तो काही क्रिकेटर म्हणून कधीच फारसा माहित नव्हता.देवधरांचा मुलगा म्हणून आणले असावे. प्रेक्षकांची गर्दीही भरपूर. ढोल, बिगुल जोरात वाजायचे. टाळ्य़ा, आरडा ओरडा असायचाच. पण चीअर-लीडर्स नव्हत्या! तरीही गर्दी असायची!

काही वाहिन्यांनी आयपीएलच्या ह्या सामन्यांना महासंग्राम म्हटलय. संग्रामच नाही तर महासंग्राम कुठला.फार तर छोटीशी चकमक म्हणता येईल.

दोन घडीचा डाव हेच खरं. पहा आणि विसरा!

साबणाचा लाडू

शीर्षक बरोबर आहे. मुद्राराक्षसाचा प्रताप नाही किंवा उपसंपादकाच्या डुलक्यांचाही परिणाम नाही. ’साबुदाण्याचा लाडू’ऐवजी मी साबणाचा लाडू असे तर लिहिले नाही ना, असेही वाटण्याची शक्यता आहे. पण तसे काही नाही. लाडू साबणाचाच आहे.

साबणाचा लाडू म्हटल्यावर काहीजण म्हणतील, “लोक काय खातील, कशाचे काय करतील, काही सांगता येत नाही हल्ली”!

खरं सांगायचे तर काही शब्द नुसते ऐकले तरी लागलीच पुढचा शब्द, नावे, व्यक्ती लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतात. नुसते छ्त्रपती म्हटल्यावर लगेच शिवाजी महाराज, लोकमान्य शब्दाच्या पुढे लगेच टिळकच येणार. किंवा महात्मा म्हटल्यावर गांधींच्या किंवा जोतिबा फुले यांचाशिवाय कोण समोर यॆईल? तसेच ’खादी’च्या पुढे भांडारच येणार.

पाडवा म्हटल्यावर घराघरांवर लावलेल्या भरजरी गुढ्या दिसू लागतात, तर दसरा शब्द ऐकला तर आपट्यांच्या पानांचे-शिलंगणाच्या सोन्यचे- ढिगारे आणि टपोऱ्या झेंडुच्या फुलांचे डोंगर आणि माळा-तोरणे डोळ्यांसमोर येतात यात नवल नाही. दिवाळी म्हणल्यावर सर्वांना लहानपणी तरी भरपूर सुटी, फटाके, आकाशदिवा, लाडू करंज्या, शंकरपाळी आणि चकल्या-कडबोळ्यांनी भरलेले स्वैंपाकघर दिसत असणार. त्याचबरोबर दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून दरवळणारा सुगंधही येत असतो. मग तो फटाक्यांच्या प्रकाशाने अंगण उजळून गेल्यावर पसरलेल्या धुराचा असो, घराघरांतून येणारा तेला-तुपाचा खमंग वास असेल,किंवा आंघोळीच्या आधी लावलेल्या तेलाचा आणि त्याबरोबरच खास दिवाळीसाठी आणलेल्या साबणाचा सुगंधही येत असतो!

दिवाळीच्या आधी तीन चार दिवस कुणा मोठ्या माणसांबरोबर गावात, बाजारपेठेतून जाताना दुतर्फा दिसणाऱ्या फटाक्यांची, आकाशदिव्यांच्या रंगीत रांगाच रांगा असलेली, तेल-उटणी आणि साबणांची आरास असलेली लहान मोठी दुकाने पहात पहात जात असू. आणि हे फटाके घ्यायचेच, हा आकाशदिवा आणू, ह्या बाटल्या घॆउ असे मनाशी ठरवत पुढे पुढे जात असू.

कधी तर अंधार पडेपर्यंत अशी भटकंती व्हायची.  आकाशदिव्यातून येणाऱ्या निळ्या-तांबड्या प्रकाशाचे कवडसे अंगावर झेलत, त्यांच्या डुलणाऱ्या झिरमिळ्यांबरोबर आम्हीही तल्लीन होऊन पहात बसयचो.फटाक्यांच्या दुकानांपुढून तर पाय निघत नसे. तितक्याच कुतुहलाने, पायऱ्या पायऱ्यांच्या फळ्यांवर मांडून ठेवलेल्या सुवासिक तेलाच्या निरनिराळ्या आकारांच्या बाटल्या, आणि त्या खालीच समोर साबणांच्या वड्यांचे पिरॅमिडस, तर कुठे सुगंधी सबणांच्या वड्यांची तटबंदीच उभी केलेली पहात उभे रहात असू.

एरव्ही डोक्याला अंगाला खोबरेल तेलाशिवाय दुसरे तेल क्वचितच लागत असे. पण दिवाळीची गोष्ट काही औरच! टाटा, स्वस्तिकच्या डाळिंबी रंगाच्या कॅस्टर ऑइलच्या डौलदार बाटल्या, त्यांच्या शेजारीच राजकोटचे पोपटी व्हेजितेबल ऑइलच्या त्रिकोणी बाटल्या ऐटीत उभ्या असत. तर झुल्फे बेंगॉल असे आम्हाला अफलातून वाटणारे म्हणजेच न समजणाऱ्या नावाच्या  बाटल्याही पुढे पुढे करीत असायच्या. ह्या सर्व सुगंधी तेलाच्या प्रदेशात मालेगावी आवळेल तेलाच्या बाटल्याही अंग चेपुन पण नेटाने उभ्या असत.

ह्या तेलांच्या बाटल्यांच्या झगमगाटात समोर नेहमीचे लक्स, रेक्सोना, स्वस्तिकचा कांति, कधी झिजेल ह्याची वाट बघायला लावणारा दीर्घायुषी हिरवा हमाम आणि ’आरोग्य तेथे वास करी’चा लाल लाइफबॉय ही रोजच्या ’सोप ऑपेरा’तील यशस्वी “साबणे मंडळी” हजर असतच. त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर गोदरेज नं १, पाटणवाला यांचे सुगंधी साबण, पेअर्सची पारदर्शक वडी, म्हैसूर सॅंन्डल सोप आपल्याच तोऱ्यात ऐटीत बसलेले असत. पण पिरॅमिडस, तटबंदी, मैदानी प्रदेश आणि वरच्या पायरीवरील या सर्व साबणांपेक्षाही उच्चासनावर विराजमान असलेले टाटाचे मोती साबणाचे लाडू हे खरे लक्ष वेधून घेत. राजाचा शाही रुबाब, दिमाख या बरोबरच त्याचा “मोठेपणा” हे सर्व निरनिराळ्या रंगातील आणि सुगंधातील ’मोती’ साबणाच्या लाडूत असे. मोती साबणाचा आमच्या हातात न मावणारा लाडू घ्यायचाच हे ठरवायला फार वेळ लागत नसे.

दिवाळीच्या सुटीतले पहिले दोन तीन दिवस अशा आराशीने सजलेल्या बाजारपेठेतून हिंडण्यात जायचे आणि रोज अचंबित होऊन उत्साहाने एक-दोनच दिवसावर आलेल्या दिवाळीच्या पहाटेची वाट बघता बघता कधी झोपी जायचो ते समजतही नसे.

दिवाळीच्या चारी दिवसात रोज आमच्या हातात न मावणाऱ्या साबणाच्या लाडूने आंघोळ करताना, आपण कुणीतरी मोठे झालो असे वाटायचे!

पण दिवाळी संपल्यावर मात्र त्या साबणाच्या लाडुतली अप्रूपता, कौतूक आणि सुगंधही कमी व्हायचा!

आता लक्षात येते की ती सर्व चार दिवसाच्या दिवाळीची जादू असायची!

तरीही छत्रपती म्हटले की शिवाजी महाराज, महात्मा म्हटल्यावर गांधी, तसे लाडू म्हटले की बेसनाचा, बुंदीचा, मोतीचूर या लाडोबांबरोबरच ’मोती’ साबणाचा लाडूही डोळ्यांसमोर येतो.

साबणाचे आता आपले रूपही बदलले आहे. साबणाच्या वड्या कमी झाल्या आणि लाडूही फारसे दिसत नाहीत. साबणाने नवीन अवतार घेतला आहे. साबणाचा आता बॉडी वॉश झाला आहे. कुणाचा ओल्ड स्पाइस तर कुणाचा जिलेट,एक्स! त्यांचीही नव्या दिवाळीत परंपरा होईल.

दिवाळी येतच राहणार आणि साबणाच्या लाडूचीही आठवण यॆणार.

आजही आम्ही तो साबणाचा लाडू आठवणीने आणतो.

दलाई लामा

काल (८ नोव्हेंबर रोजी) शनिवारी तिबेटचे धर्मगुरु आणि प्रमुख दलाई लामा यांचे भाषण ऐकायला मिळाले.सभाग्रहात मी बऱ्याच मागच्या रांगेत होतो. त्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण ते प्रत्यक्ष तिहे आहेत, त्यांच्या हालचाली, त्यांचे हसणे वगैरे दिसत होते. थोडे वाकून आणि हळू चालत होते. पण आवाज भक्कम, हसणेही मोकळे आणि तसे आवाजी.

दलाई लामांनी आपल्या भाषणात सकारात्मक विचार आपल्या मनात असावेत आणि ही सकारात्मता आपल्या आचराणातही असावी असे सांगितले. ही सकारात्मकता कशाने येते आपल्या जीवनात? तर ती आपल्या सह्रूदयतेमुळे, प्रेमामुळे येते. आजपर्यंतच्या कित्य्क हजारो वर्षांपासून, अनेक तत्वज्ञानातून संस्कृतीतून हेच सगळ्यांनी सांगितले आहे. दुसऱ्यांविषयी, सर्वांविषयी प्रेम, करुणा, आणि सहृदयता असू द्या. ह्यातूनच अहिंसा भाव निर्माण होतो. प्रेम, आपुलकी, सहृदयता करुणा म्हणजेच सकारात्मकता. क्रोध, द्वेष मत्सर हीच नकारात्मकता. ही मूल्ये, हे गूण जोपासावेत हेच सर्व तत्वज्ञानात, संस्कृतीत सांगितले आहे. ह्यात कुठे धर्माचा, कुठल्या धर्माचा अडथळा येतो? हे सदभाव अंगी बाअणले, दुसऱ्यांविषयी सतत सहृदयता, प्रेम बाळगले तर आपले आयुष्यही आनंदाचे होत. खऱ्या मानसिक शांततेच होते. आपली प्रतिकार्शक्तीही वाढते. शारिसिक आणि मानसिक दोन्हीही.

दलाई लामांने आपल्या अर्ध्या पाऊण तासाच्या भाषणात हे सांगितले. ह्यात त्यांनी नवीन असे विशेष काय सांगितले? अनेकजण हेच सांगतात. रोज. प्रवचनातून आणि भाषणातून. पुस्तकातून आणि चित्रवाणीच्या वाहिन्यांवरून. शिबिरातून आणि कार्यशाळांतून. पण दलाई लामांनी हे सांगितल्यावर, भाषण ऐकताना ते इतके खरे– सत्य, मोलाचे विचार असे सर्वांना का वाटत होते? लोकांना इतका निर्भेळ आनंद समाधान का वाटत होते?कारण सांगता येत नाही. भाषणातील मधूनच होणाऱ्या नर्म विनोदाचा शिडकावा; त्यांचे मनमोकळे हसणे; स्वत:च्याच विचाराला, विधानाला त्यांनी हसत हसत मारलेली कोपरखळी; बोलण्यातून जाणवणारा त्यांचा साधेपणा, सरळ्पणा; तिबेटी जनतेचे ध्र्म प्रमुख; तिबेटचे अनभिषिक्त राजे; बौद्ध धर्माचे विद्वान आचरणशील उपासक म्हणून? ही कारणे नसावीत. ते सांगत होते आणि हजार दोन हजार श्रोते ऐकत होते. न कंटाळता. न जांभया देता ऐकत होते. मधून मधून प्रतिसाद देत होते. मला वाटते, ते सांगत होते ते सगळ्यांना पटत होते. कारण ते जे काही सांगत होते ते त्यांच्या स्वानुभवातून आले होते.ते जे काही सांगत होते ते स्वत: आचरत होते. त्यामुळे सहृदयता, प्रेम, करुणा, आपुलकी आणि अहिंसा हे केव्ळ शब्द वाटत नव्हते. हे सर्व शब्द त्यांच्या अर्थासह दलाई लामांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट झाली होत्ते. स्वानुभवातून आचराणातून आलेल्या स्ब्दांना-ते नेहमीचे असले तरी-एक वेगळीच झळाळी येते, धार येते.आपल्या अंत:करणाला भिडतात. तसेच झाले काल. निदान मला तरी. प्रत्यक्ष आचरलेल्या, केलेल्या गोष्टीच खऱ्या खुऱ्या वाटतात.

थोडक्यात सांगायचे तर क्षणभरही त्यांचे भाषण “उपदेश” वाटले नाही.

चीनशी, तिबेटच्या स्वातंत्र्याविषयी; मग पुढे नमते घेऊन स्वायत्ततेविषयी; आणि आता मर्यादित स्वायत्ततेसंबंधी , आपल्या देशातून परांगदा हॊऊन, गेली अनेक वर्षे दलाई लामा अहिंसक मार्गाने म्हणजेच चर्चा, वाटाघाटी इतर राष्ट्रांच्या तोंडदेखल्या पाठिंब्याने करत होते. परवा अखेर त्यांनी जाहीरपणे सांगितले, ” मी हरलो; तिबेटला मुक करू शकलो नाही आणि इतरही काहीही हक्क तिबेटी लोकांना मिळवून देऊ शकलो नाही.” पण कुठेही चीनविषयी अगर इतर कुणाविषयीही कोणताही कटु शब्दांचा उच्चार केला नाही! अहिंसे संबंधी बोलण्याच्या ओघात त्यांनी अहिंसेचा प्रसार हिंदुस्थानने कसा जोरात करायला हवा, कारण जगात सर्वत्रा अहिंसेची मागणी वाढली आहे असे सांगितले. समोरच्या बहुसंख्य म्हाताऱ्या श्रोत्यांकडे पहात आता तरुणांनीही ह्यात पुढाकार घेऊन अहिंसेचे पालन आणि प्रसार करावा असे सांगताना त्यांनी हल्ली प्रचलित असलेले शब्द वापरून ,दृष्टांत देऊन गंमत केली. “इन्डिया शुद प्रोड्युस मोअर, मोअर अन्द मोअर अहिंसा अँड एक्स्पोर्ट इट. अहिंसा इज वेल ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड.प्रोड्युस मोअर अहिंसा, एक्स्पोर्ट इट मोअर अंड मोअर. यंग पीपल शूड जॉईन इन धिस प्रॉडक्शन.” हे सांगत असताना उत्साहाने त्यांच्या हाताच्या जोरदार हालचाली आणि मोकळे हसणे चालू होते.

अलिकडच्या वैद्यकीय संशोधनाचा दाखला देत सहृदयता, प्रेम,अहिंसा करुणा ह्या विचारांमुळे आपले आरोग्यही चांगले राहते, शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते वगैरे सांगितले. त्यासंदर्भात त्यांनी “आपली नुकतीच गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया झाली. एरव्ही इतरांच्या बाबतीत हे ऑपरेशन २०-३० मिनिटात होते. पण त्यांच्या वयामुळे त्यांच्यावरची ही शस्त्रक्रिया तीन तास चालली वगैरे सांगितले. पण आठ दिवसातच मी पूर्ण बरा झालो.डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.माझ्या रोजच्या वागण्या-चालण्यामुळे हे असे झाले.” असे ते म्हणाले.इतके सांगून झाल्यावर हळूच त्याच ओघात “ह्या गुणामुळे जर असा फायदा झाला तर मग मुळात ही व्याधी झालीच का , कशी?” अशी स्वत:लाच कोपरखळी मारून ते हसले. सकाळी १०:२० ला बाहेर पडलो होतो.पेट्रोल भरणे, रहदारीतून वाट काढणे; इतर अनेक वाहनांना मार्ग देणे असे करत चाळीस एक मिनिटांनी मी संमेलन्स्थळे पोहचलो.इतकी धडपड करत उत्साहाने जाण्याचे आणि तेही माझ्यासारख्या राग, संताप, द्वेष , क्रोध या सर्व सदगुणांनी काटोकाठ नसला तरी पूर्ण भरलेल्या माणसाने सात्विक शुद्ध साजूक तुपासारख्या[तेही गाईच्या दुधाच्या]सर्वोदय संमेलनाला जाण्याचे कारण काय? हे म्हणजे रोज दारुचा रतीब लावून पिणाऱ्या माणसाने देवळात जाऊन तीर्थ पिण्यासारखे , एम टीव्ही, व्ही टीवी वर नाचण्या-गाणाऱ्याने देवळात भजन म्हणण्यासारखेच झाले की! सुताच्या गिरण्यात चरख्यांवर ऊत काढण्यासारखेच किंवा अभिषेक बच्चनने अभिनय करण्यासारखे झाले की~ पण ह्याला कारणही तसेच घडले.

मी सर्वोदयी कार्यकर्ते श्री. विजय दिवाण यांना भेटायला गेलो होतो. आता त्यांना कशासाठी भेटायला गेलो? तर श्री.सुहास बहुळकर यांनी,” पुण्यात ६-७ नोव्हेंबरला सर्वोदय संमेलन आहे. तिथे नक्की दिवाण असतील.तुम्हाला उत्सुकता असेल तर त्यांना भेता.”असे त्यांनी मला फोनवरून सांगितले. आता हे सुहास बहुळकर कोण आणि त्यांनी तुम्हाला हे का सांगावे? असे सर्व प्रश्न तुम्हाला पडतील. पूर्वीच्या ह.ना. आपटे, नाथ माधव अगर गेला बाजार वि.वा. हडप यांच्या कादंबऱ्या वाचणाऱ्या वाचकांना असेच चक्रावून सोडणारे प्रश्न पडत. ” ह्या सूर्याजीचे काय झाले, भवानराव कमळजेला घेऊन कुठे गेले, शिलेदारने अंधारत उडी मारली तो कुठे गेला भुयारातून वगैरे प्रश्नांना हे कादंबरीकार, “आता थोडे आपण मागे जाऊन आपल्या चरित्र नायकाचे काय झाले ते पाहू(इकडे वाचकांचे काय झाले ते पहा ना!), पण त्या पूर्वी आपण…रावांच्या वाड्याकडे जाऊ या(काय कुणाच्या लग्नाचे आमंत्रण आहे का?) …पण तिथे पोचण्या अगोदर इकडे भैरोबाच्या देवळाकडे वळू…” असे म्हणत वाचकाला १०-१५ पाने तरी फिरवून आणत! तसं झालं आहे इथे. तर आता हरदासाची कथा मूळ पदावर आणू या.पण त्या अगोदर (आलं का पुन्हा ते त्या जुन्या कादंबरीतले दळण आणि वळण!)श्री सुहास बहुळकर हे कोण, त्यांचे माझे फोनवर का बोलणे झाले हे पाहू या.( पाहू या! चला!)

सुहास बहुळकर हे नामांकित चित्रकार. काही काळ ते जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्राध्यापक होते. व्यक्तिचित्रण हा त्यांचा विशेष अधिकाराचा भाग.त्यांनी काढलेले लोक्मान्य टिळकांचे तैलचित्र–पोर्ट्रेट- आपल्या लोकसभेत आहे. तसेच त्यांची गांधी आणि नेहरू यांची चित्रे मुंबईच्या राजभवनात–गव्हर्नर्स हाऊस- मध्ये आहेत.

त्यांचा यंदाच्या दीपावली या दिवाळी अंकात “कथा चित्रांच्या आणि चित्रकारांच्या” असा एक लेख आला आहे.तो लेख मला आवडला, म्हणून मी त्यांना तसे सांगण्यासाठी फोन केला. बोलताना मी विनोबाजींचे चित्र काढण्याच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभवाविषयी बोलताना सहज त्यांनीच दोन तीन वेळा उल्लेख केलेल्या, विजय दिवाणांचे पालुपद”आम्हाला काहीही घाई नाही” हे सांगितले. लेखातील इतर काही गोष्टींविषयी जुजबी बोलल्यावर शेवटी मी त्यांना सांगितले की, “तुमच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदात तुम्ही ठरवलेले {त्यांच्या आता मोठ्या झालेल्या २०-२२ वर्षांच्या-दोन्ही मुलींचे आणि त्यांच्या बायकोची अशी पोर्ट्रेट करायचे ह्या दिवाळीत; बावीस वर्षे झाली इतकी चित्रे काढली पण ह्यांची पोर्ट्रेट्स केली नाहीत ह्याची रुखरुख वगैरे त्यांनी त्या परिच्छेदात व्य्क्त्त केली आहे} काम मात्र लवकर पूर्ण करा. त्याचा आनंद फार मोठा असेल. इतर कुठल्याही मान-मरातबापेक्षा ही चित्रे काढण्याचा आनंद, समाधान फार मोठे, निराळे असेल असे मी त्यांना म्हणालो. “बरंय, पुरे करतो ते काम.” असे ते म्हणाले. त्या अगोदर त्यांनी मला श्री. दिवाण ह्यांच्या विषयी सांगितले की सध्या ते ५०-५५चे असतील. तरुणपणीच त्यांनी विनोबांच्या सर्वोदयी, ग्राम विकास कार्यक्रमाला वाहून घेतलेय. विनोबांच्या जन्मगावी आणि आजूबाजूच्या खेड्यात ते काम करतात.ते तिथे गेले असताना –
खेड्यात बरेच वेळा गाय, म्हैस मरून पडल्याचे, भोवती कावळे कुत्री त्यांना तोचताहेत, लचके तोडताहेत माश्या घोंगावताहेत असे दिसले. डॉ.आंबेडकरांच्या सुधारणावादी क्रांतीकारी चळवळीमुळे पूर्वीची महार मंडळी मेलेली जनावरे ओढून नेण्याची, त्यांची कातडी सोलण्याची कामे करत नहीत.आणि इतर कोणी सवर्ण्ही अर्थातच अशी कामी करत नाहीत.ह्यावर ह्या ’दिवाण्याने’ उपाय काढला. ब्राम्हण दिवाण स्वत:च मेलेली जनावरे ओढून नेऊन त्यांची कातडी काढून ती सगळी स्वच्छ करू लागला. ह्या अशा इतक्या कातड्यांचे करायचे काय? हा प्रश्न पडला. तोही त्याने सोडवला. स्वत: चपला बूत जोडे शिवायला शिकला आणि तयार करू लागला! आज गोगोद्याला (विनोबांच्या जन्मगावी) त्यांनी ह्याची एक मोठी संस्था उभी केली आहे.

तर ह्या दिवाणांना मी भेटायला गेलो.६-७ नोव्हेंबरला मला जाणे जमले नाही. कालचा शेवटचा दिवस होता.वर्तमानपत्रात फारशी प्रसिद्धि नव्हती. त्यामुळे तिथे खादीचे, ग्रामोद्योगातील वस्तूंचे, सर्वोदयी पुस्तकांचे मोठे प्रदर्शन होते.माहिती नव्हतीयाची. फारसे पैसे नेले नव्हते. म्हणून ६०-१०० रुउपये मीटर्ची उत्तम तलम खादी सदऱ्यासाथी घेता आली नाही.किंवा सर्दी पडशासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा,किंवा मूळव्याध,मधुमेह वरील चूर्ण, अगदी पारदर्शक, गाईच्या तुपापासून केलेला साबण वगैरे काही घेता आले नाही. असो हे महत्वाचे नाही.

मी सगळीकडे फिरलो. दोघा तिघा कार्यकर्त्यांना, डॉ. कुमार सप्तर्षींनाही विचारले. सगळ्यांनी आता/इथे/इकडे/तिकडे होते दिवाण; भेटले,दिसले तर सांगतो म्हणाले.मीही त्यांना शोधत फिरलो. पण ते भेटले नाहीत.मी हिरमुसलो.मी घरी जाणार, पण असे फिरत असतानाच थोड्या वेळात दलाई लामा येणार आहेत. समारोपाचे भाषण तेच करणार आहेत असे समजले. थांबलो.
थांबलो त्याचे सार्थक झाले. आलो त्याचे फळ मिळाले. एका मोट्या माणसाला दुरून का होईना पहायला मिळाले. त्यांना बोलताना, हसताना ऐका पहायला मिळाले. हा भाग्य योगच म्हणायचा.नाहीतर इतकी वर्षे जगलो.इतकी थोर माणसे डोळ्यासमोर आता आता होती. त्यांचे फोटो, बातम्या, किस्से मोठेपण ऐकले असेल. एखाद्याचे पुस्तक वाचले असेल.पण प्रत्यक्ष त्यांना पहाण्याची संधी आली नाही किंवा मी तसे प्रयत्नही केले नसतील. नोबेल पारितिषिक विजेता, लहानशा का होईना पण एका देशाच्या राजा,अनभिषिक्त राजापेक्षाही मोठा माणूस; मोठ्या , जबर हुकमतीखाली असलेल्या देशाशी शांततेतेने लढा देणारा; स्वत:साठी नव्हे तर आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी, संस्कृती, भाषा जपण्यासाठी, अहिंसेचे पालन करणाऱ्या माणसाला दुरून का होईना पहायला मिळाले हे भाग्य नव्हे का? दुधाच्या अपेक्षेने गेलो तर बासुंदी मिळाली!

मी बहुळकरांना त्यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदातील कामाविषयी बोललो. तेही हो, बरं, लवकरच पुरे करतो म्हणाले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि मीही. क्षनभरातच फोनची घंटा वाजली. फोन उचलून कानाला लावला तर काय! “मी बहुळकर बोलतोय” असे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले,” तुम्ही जे शेवटी बोललात ते मला लिहून पाठवा. त्या चार ओळी मी जपून ठेवेन! तुम्ही सांगितलेत त्यात भावनिक ओलावा होता.” मी अवाक झालो. म्हटलं हा तर माझा मोठा सन्मानच केलात तुम्ही. वगैरे, वगैरे.
त्यांना मी पत्र पाठवलय.

श्री. विजय दिवाणही भेटले असते तर आणखी बरे वाटले असते.आता केव्हा योग यॆईल कुणास ठाऊक.