नीरा—-लोणंदकडे कूच…..

औषधे घेतली म्हणून किंवा मनाची उभारी म्हणा, पण नेहमीप्रमाणे सर्व
आटोपून मी माझ्या सोबत्यांसह सकाळी सहा-सव्वा सहा वाजता लोणंदच्या
दिशेने उसळलेल्या वारकऱ्यांच्या लाटेत सामील झालो.

टाळ मृदुंगाच्या नादावर, अधून मधून उड्या मारत, भजने म्हणत, हरिनामाचा
घोष करत चाललेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांची असंख्य पावले सोबतीला होतीच.
त्यांच्या बरोबरीने आमची पावलेही वाट चालू लागली.

आज खुद्द डॉक्टरांचीच तब्येत बिघडली होती. त्यामुळे ते वाल्ह्याहून
गाडीतूनच पुढे गेले होते.

वाटेत नीरा नदी लागली. मोठे रूंद पात्र. पाणीही भरपूर. दोन्ही काठांवर
हिरवे हिरवे शेतमळे. सर्व प्रदेश मोठा रमणीय होता.

नीरा नदीचा पूल ओलांडून आम्ही दोघे तिघे लोणंदला इतरांपेक्षा लवकर
पोहोचलो. मुक्कामाचे ठिकाण नेहमीप्रमाणे गावाबाहेर दोन-तीन कि.मी. दूर.

लोणंदच्या विशाल मार्केट यार्डमधील कांद्याच्या अनेक वखारींपैकी एका
वखारीत आमचा मुक्काम होता. इतक्या वखारींतून आमची वखार सापडायला
बराच वेळ लागला.वारीत कितीही चालले तरी ती पायपीट वाटत नाही.पण
अनोळखी गावातील अशी ठिकाणे शोधण्यासाठी हिंडणे त्रासदायक वाटायचे. हा
अनुभव तरडगाव, नातेपुते येथेही आला.

कांद्याची वखार प्रथमच पहात होतो. भली मोठी, उंच, पत्र्याचे छ्प्पर असलेली
व चारी बाजूंना लोखंडी जाळ्याच्या भिंती.थोडक्यात वर उंचावर छप्पर;आणि
जाळ्यांना थोड्या उंची पर्यंतच प्लास्टिक्स्चे कापड लावलेले.इतकेच खाजगीपण.
जमीन इथेही गारगोट्या,मुरुमाची खडी, खडे यांनी खचाखच भरलेली.आम्ही
तीन चार मोठ्या पाट्या भरतील इतके दगड खडी बाजूला केली!

थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या दिंडीच्या ट्रकमधून ताडपत्र्या आणल्या.
आमच्या जागेवर त्या पसरून इतर सोबत्यांची वाट पहात बसलो.

हळू हळू सर्वजण आले.इतर दिंडीकरही आले.सर्वांनी सामान आपापल्या हद्दीत
लावले. गडबड, बडबड सुरू झाली. डॉक्टर आले ते अंगात ताप घेऊनच. शिवाय
भरीस भर म्हणून खोकलाही होता.

कांद्याच्या मार्केट यार्डपासून गाव लांबच. मी ताडपत्र्या वगैरे टाकल्यावर
फोनची बॅटरी भारीत करण्यासाठी आणि नंतर संध्याकाळी डॉक्टरांसाठी
औषधे आणण्यासाठी गावात गेलो.

गावातील मुख्य रस्ता वारकऱ्यांनी आणि वाहनांनी दुथडी भरून वहात होता.
अखेर हवी होती ती औषधे आतल्या रस्त्यावरच्या एका दुकानात मिळाली.
डॉक्टरांना दिली. ते अंथरुणात पडून होते.

रात्रभर एकटे डॉक्टरच नाही तर आमच्या कांद्याच्या वखारीतील आम्ही
सर्वजणच खोकत होतो.कंदर्प संपर्क!

लोणंदचा मुक्काम दोन रात्र्रींचा होता. त्यामुळे दुसरे दिवशी आम्ही
नेहमीचे पाच-सहाजण आंघोळीसाठी नीरा नदीवर गेलो. त्यासाठी आम्ही
लोणंदपासून चार पाच किलोमीटर मागे गेलो. झकास आंघोळी झाल्या. आजचा
दिवस निवांत. पायांना विश्रांती.

डॉक्टरांची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनी चंद्रपूरला परत जायचे
ठरवले. प्रथम पुण्याला आमच्या गाडीतून जायचे आणि तेथून रात्री
चंद्रपूरला.त्यांच्याबरोबर त्यांचे निकटचे स्नेही श्री. कमलाकरही
जाणार. कारण त्यांनाही ताप वगैरे होताच शिवाय त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे
दुखणे त्यांना असह्य झाले होते. त्यांनी आपल्या गुडघेदुखी पुढे गुडघेच टेकले.
त्या दोन आजारी माणसांबरोबर एक तरी धडधाकट माणूस हवा म्हणून
डॉक्टरांनी आपल्या भावाला बरोबर घेतले. तेही जाण्यासाठी तयारच होते.

मी पुण्याला फोनाफोनी करून माझे जावई श्री.श्रीकांतकडून चंद्रपूरची
तिकीटे काढून ठेवली.

डॉक्टर परत निघाले. आपली वारी पूर्ण झाली नाही. अर्धवट सोडून
परत जावे लागते ह्याचे दु:खही होते. आळंदीला भेटल्यावर वाटेत,” ह्या
वारीनंतर मी पुन्हा वारी करणार नाही. ही बहुधा शेवटची वारी.ती
तुमच्याबरोबर होतेय, आपली इतक्या वर्षानंतरची भेट या वारीमुळे होतेय”.
वगैरे सांगत होते. त्यांचे निकटचे मित्र कमलाकर यांच्याजवळही ते असेच
काहीसे म्हणाले होते असे मला कमलाकर वारीत सांगत होते.

मलाही मनातून फार वाईट वाटत होते.डॉक्टरांच्यामुळेच माझ्या आयुष्यातील ही
पहिलीवहिली पंढरपूरची वारी घडत होती. इतक्या वर्षांनी भेटलो, थोड्या
फार गप्पा झाल्या. आतापर्यंत त्यांच्या अनुभवी सोबतीने वाट सोपी झाली होती.

डॉक्टरांनी आणि मी उराभेट घेऊन निरोप घेतला. आमच्या दोघांचेही डोळे
पाणावले. ते पाहून महिला मंडळही गलबलले.

मी आणि श्री. आवताडे डॉक्टरांना व इतरांना निरोप दॆऊन परतलो. थोडा वेळ
सुनं सुनं वाटत होते.काही वेळाने एका वखारीत भारूड, गौळण वगैरे चालले
होते.तिथून लोकांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता.मी व श्री. आवताडे तिकडे
गेलो.

नाथांची भारूडे चालली होती. ती झाल्यावर संत सेना महाराजांचा”आम्ही
वारिक वारिक । करू हजामत बारिक बारिक॥” ह्या अभंगाचा दोघा वारकऱ्यांनी
नाट्याविष्कार केला.अभंगाचे नाट्यीकरण सादर करण्याचा प्रकार मी प्रथमच
पहात होतो.

प्रहसनातील-फार्स मध्ये जलद हालचाली असतात तसे अभंगातल्या ओळीत जी
कृती वर्णन केली ती विनोदी पद्धतीने ती कृती प्रत्यक्ष करत होते. वस्तऱ्याने
गळा कापल्याचा(पाप काढून टाकण्याचा) अभिनय, एका मोठ्या केरसुणीने बगला
झाडण्याची कृती; हे पाहून सर्वांना मजा वाटत होती. मध्येच टाळ
मृदंगाच्या बरोबर अभंगातील पुढची ओळ म्हटली जायची की त्यावर विनोदी
सादरीकरण.

गंमत आली. प्रहसनाच्या-वळणाने अतिशयोक्‍तीने सादर केलेले हे अभंगांचे नाट्यीकरण
वारकऱ्यांना हसवून सोडत होते. संत सेना महाराजांनी ह्या रुपकातून
सांगितलेला भावार्थ मात्र हरवून जाऊ नये. मात्र वारकरी मंडळीची
घटकाभर झकास करमणूक झाली हे निर्विवाद.

रात्री श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम गावात जिथे होता तिथे
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असावा. भक्तीपर चिजा, पदे गायक गात होता.

दूरवरून येणारे ते सूर आनंद देत होते. काही दिंड्यांतून भजने, तर एखाद्या
दिंडीत ह.भ.प.बुवांचे कीर्तन चालू होते. सर्व वातावरण सुस्वर झाले होते.
कीर्तन भजन लवकर संपले.गायन मात्र पहाटे २.३०/३.००पर्यंत चालू असावे.
ऐकता ऐकता कधी झोपलो ते समजले नाही.

… वाल्हे…….. वाल्या कोळ्याची भूमि

जेजुरीहून आज वाल्ह्याला जायचे. अंतर १०-१२.कि.मी.च असेल. फारच थोडे
अंतर. आम्ही चार पाच जण एकत्र निघालो. ३-४ कि.मी. चालून झाल्यावर
माझी तब्येत पाहून डॉक्टरांनी मला “डॉक्टरी सल्ला” म्हणजे जवळ जवळ हुकुमच करून
गाडीत बसायला लावले. पायी वारीला हे ६-७ कि.मी.चे गालबोट लागणार
ह्याचे वाईट वाटले. पण मोठे उद्दिष्ट लक्षात घॆऊन निमूटपणे गाडीत बसलो.
वाल्ह्याला आलो.

आज संपूर्ण वारीच आपल्या मुक्कामी वाल्ह्याला दुपारच्या जेवण्याच्या वेळी
आली असावी. अगदी थोडे अंतर हेच कारण.

वाल्हे लक्षात रहाण्याचे कारण इथली भूमि. गावच्या लोकांना ही
वाल्या कोळ्याची भूमि वाटते, तसे मानतातही गावचे लोक.टेकडी, डोंगरावर
वाल्या कोळ्याच्या खुणा म्हणून लहान दगडांनी भरलेला रांजण वगैरे आहे
असे म्हणतात.आमच्यातील काहीजण तिकडे जाऊन आले पण तसे काही विशेष त्यांना
आढळले नाही.

पण मला वाल्हे लक्षात राहण्याचे कारणही ही भूमीच! आमच्या दिंडीचा तळ
जिथे पडला होता ती जमीन खाच खळगे आणि खड्या-खुड्ड्यांची. दगड खडे
गोटे तर होतेच. आमचा तंबू जेथे ठोकला होता ती भूमीही तशीच.त्यात
आणखी भर म्हणून आम्ही पुरुष मंडळी ज्या बाजूला झोपणार तिथून एक
उथळसा पण बऱ्यापैकी खोलगट चर लांबवर गेला होता. मी जिथे झोपलो तिथे
माझी पाठ आणि खांदा यामध्ये एक उंचवट्याचा दगड! पक्का रोवलेला. कोण
आणि कसा काढणार? झोपलो तसाच. कंबर त्या चराच्या गटारीत आणि पाठी
खांद्याशी हे धोंडोपंत! चांगलेच रुतायचे आणि टोचायचे.कसेही झोपा, ह्या
कुशीवर किंवा त्या कुशीवर झोपा, की कसेही पडा, सरका-सरकायला जागाच
नव्हती. गटारवजा तो चर आणि हे दगडूशेठ काही चुकवता यॆईनात.तसाच
पडलो बराच वेळ.

वरती फक्‍त आकाश आणि खाली खडकाळ, उंचसखल जमीन. शेजारी वाहती
गटारे, पाण्याची डबकी, जवळपास कुत्री मांजरं पहुडलेली. अशा संगतीत
आयुष्यभर झोपणाऱ्या असंख्य कष्टकऱ्यांची,सर्व संसार रस्त्यावरच
असणाऱ्या खेडेगाव, वस्त्यातील, गावा-शहरातील अनेक गरीबांची आठवण आली
आणि तंबूतील ह्या अडचणी विसरून,तसाच रेटून झोपलो.

पण मध्यरात्र उलटल्यावर रात्री२.३० वा. जागा झालो. डोळे उघडे
ठेवून पहाटेपर्यंत पडून राहिलो.

मूलभूत सोयी

जेजुरीला निघाल्यापासूनच सर्दी पडसे, ताप होताच. तशात आणखी
पोट बिघडले. औषधे घेतली. रात्री नीट झोपही लागली नाही.

पहाटे ४.००/४.३० वा. तंबूतील एकाने बातमी आणली. जेजुरीच्या
एस. टी. स्टँडवर सुलभ शौचालयाची सोय आहे. आमच्यासारख्या
शहरी लोकांना हे ऐकून बरे वाटले. मी एस.टी. स्टॅंडवर आलो. अंधार
थोडा कमी कमी होत होता. सर्व एस.टी. स्टँडना जी कळा आली आहे
तीच अवकळा जेजुरीच्या स्टँडलाही आली आहे. इमारत चांगली पण
जुनाट झालेली. सभोवती मात्र खूप मोकळी जागा. तिथे बरेच वारकरी
झोपलेले तर काही जण मोकळ्या मैदानात”बसलेले”!

दोन-चार तरुण मंडळी उभी होती. त्यांच्यापाशी जाऊन मी एस.टीच्या सुलभ
शौचालयाची चौकशी केली.पण त्यांना काही माहिती नव्हती. पण एकाने
समोरच्या भल्या मोठ्या मैदानाकडे हात करून,”अहो, हे काय! हे सगळं सुलभ
शौचालयच आहे की, बघा!”

मी मोठ्याने हसलो; पुढे जाऊन चौकशी केल्यावर ठावठिकाणा मिळाला.

माझी वारी: पुन्हा सासवड……तेथून जेजुरी

पंढरपूरहून सासवडला आम्ही रात्री पोहोचलो. सासवडला आमचा
रात्रीचा मुक्काम छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये होता.शाळेची इमारत
भली मोठी होती. पण त्यापेक्षाही शाळेचे मैदान फार मोठे होते.विद्यार्थी
मोठे भाग्यवान.

शाळाचुकार विद्यार्थी जसा मास्तरांचा डोळा चुकवून हळूच वर्गात
येऊन बसावा त्याप्रमाणे आम्ही दुसरे दिवशी सकाळी पुन्हा वारीत सामील
झालो. सासवडहून निघाल्यावर पुढचा मुक्काम जेजुरीला.पुण्यापासून
वारकऱ्यांसाठी अनेक उदार लोक ठिकठिकणी चहा, फराळ जेवणाची सोय
करतात. वारीतील अनेक गोरगरीबांना त्याचा फायदा होतो. पुणे सासवड सोडले
की अशा सोयी कमी होतात असे ऐकले होते. पण तशी काही फारशी तफावत
दिसली नाही.जेजुरीपर्यंत अनेकांनी उदार हस्ते अशा सोयी केल्या होत्या.
दात्यांची संख्या कमी असेल पण दिंडीशिवाय येणाऱ्या अनेक गरीब
वारकऱ्यांसाठी त्या पुरेशा होत्या. पुढे नातेपुतेपासून ते वाखरीपर्यंत
अनगरकर मंडळींनी(अनगरचे पुढारी आणि समस्त गावकऱ्यांनी) तर
माऊलीच्या वाटेवर रोज सकाळी-दुपारी चहा नाश्ता, दुपारी जेवणाची
चांगली सोय केली होती. अनेक गोरगरीब शेतमजूर,कष्टकऱ्यांचे दुवे ह्या आणि
इतर अनेक दात्यांना मिळाले असतील ह्यात शंका नाही.

सासवड ते जेजुरीची ही वाटचाल,पुणे ते सासवड आणि त्यातील
घाटाची चढण ह्या पेक्षा पुष्कळच सोपी. पण मी अंगात ताप घेऊनच
जेजुरीपर्यंत आलो. आमच्या दिंडीचा मुक्काम जेजुरीच्या एस.टी. स्टॅंड शेजारी
होता.आमच्या दिंडी सकट अनेक दिंड्यांचा तळ तिथे पडला होता. माझे अंग
दुखत होते. ताप भरला होता.

जेजुरीला माऊलीच्या पालखीचा जिथे मुक्काम असतो तिथे सर्व
दिंड्या एकत्र येतात. त्यांच्या काही तक्रारी, अडचणी, सूचना असल्या
तर त्या ऐकल्या जातात व पालखीबरोबरचे प्रमुख त्या ऐकून त्यावर
निर्णय जाहीर करतात, निवारण करतात. मग आरती हॊऊन हा कार्यक्रम
संपतो. ही फक्त रूपरेखा झाली. पण सर्व दिंड्यांचे एकत्र येणे,
त्यानंतर माऊलीची पालखी येण्यापासून तिचे ह्या दिंड्या मोठ्या
चढाओढीने भजने, अभंग,नामघोष करून स्वागत करतात.ह्या सर्व
गोष्टीतील आणि तिथे जमलेल्या अफाट गर्दीतीलही शिस्त, मग निस्तब्ध शांतता,
ज्ञानराज माऊलीची आरती वगैरे पहण्यासारखे असते,असे डॉक्टरांनी
सांगितले. पुढेही वारीत दोन तीन ठिकाणी हा कार्यक्रम असतो. पण आजचे
ठिकाण जवळच आहे म्हणून मी जायचे ठरवले.

मी एकटाच निघालो. मैदान जवळच म्हटले तरी एक दीड कि.मी.
असेल. त्याशिवाय प्रचंड गर्दीचे लोंढे होतेच.

मी त्या मैदानात पोचलो.गर्दी होतीच. वारकरी होते, आजूबाजूच्या
लहान गावातील, खेड्यातील,वाड्या-वस्तीतील लोक, जेजुरीतील लोक असा मोठा
जनसमुदाय जमला होता.

मैदानाच्या एका बाजूला माऊलीच्या मुक्कामासाठी मोठ्या सुबक
चौथऱ्यावर एक मोठा सुंदर तंबू होता. हार फुलांच्या माळा आणि
विजेच्या दिव्यांनी नटला होता.

एक एक दिंडी येऊ लागली. मैदानाच्या चारी बाजूंनी त्या दिंड्या
आपापल्या जागी उभ्या राहू लागल्या. पण हे सर्व संगीतमय वातावरणात
चालले होते. माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी आपण आलो आहोत हे जाणून
दिंड्या,माऊली वगैरे टाळमृदुंगाच्या साथीने, मोकळ्या राना-मैदानात
गाण्याची सवय झालेल्या तापल्या गळ्याने, जोरात म्हणत येत होते.

दिंडीतील वारकऱ्यांच्या गायकीतील जोष आणि तन्मयता
अनुभवण्यासारखी असते.

सर्वांचे कान टाळमृदुंगाच्या आवाजाने भरले होते आणि डोळे
श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीकडे लागले होते.

अधून मधून लोक मध्येच उठून माऊली, माऊली, श्रीज्ञानदेव-
तुकारामाचा गजर करत उभे रहायचे. पण माझ्या जवळ बसलेले गृहस्थ
म्हणायचे, “अहो, अजून वेळ आहे; उठू नका.अजूनही दिंड्या इकडून येताहेत.
माऊली (हात दाखवून) तिकडून येणार आहे.”

माऊलीच्या स्वागतासाठी तंबूच्या दोन्ही बाजूला उभ्या
असलेल्या दिंड्यांतून वारकरी म्हणत असलेल्या अभंगांचे शब्द नीट कळत नव्हते
पण टाळ मृदुंगाच्या नादातून साध्या सुरेख चालीवर तरंगत आलेले सूर
कानावर येत होते. चहूकडून येणाऱ्या सुरांच्या गोपाळकाल्याने
वातावरण भारावून गेले होते. तेव्हढ्यात माऊलीची पालखी आली.

चोपदाराने आपल्या हातातील दंडा उंच उभारल्या बरोबर
सर्वदूर क्षणात शांतता झाली. सर्व काही स्तब्ध. फक्‍त शांतता.
दिंड्यातील टाळ मृदुंगही गप्प झाले. पण एका कोपऱ्यात मात्र टाळांचा
आवाज ऐकू येतच होता. म्हणजे त्यांची काही तरी तक्रार असणार.
पालखीबरोबरची मोठी माणसे तिकडे जाऊन तक्रार ऐकून आली असावीत.
तक्रार मोठ्यांदा सांगण्यात आली व त्यावरील निकालही दिला. मग
काही निवेदने व इतर सोपस्कार झाले. पालखी मुक्कामासाठी माऊलीच्या
तंबूकडे निघाली. दर्शनासाठी गर्दीही पुढे सरकू लागली.

मी तापाने फणफणलो आहे, थकलेला आहे हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी
बसलेल्या त्या माहितगार माणसाने माझा हात धरून,तशा त्या गर्दीतून मला
सुरळीतपणे मुख्य रस्त्यावर आणले आणि माझ्या दिंडीचा तळ जेथे होता त्या
रस्त्याला मला लावून दिले.

शेतकीखात्यातून निवृत्त झालेल्या त्या सज्जनाचे नाव विचारायचे मी विसरलो.
त्यानेही सांगितले नव्हते.

पंढरीच्या वारीत अशीच असंख्य अनामिक, साधी माणसं मदत करत असतात.
त्यामुळेच वारीत प्रत्येकजण दुसऱ्याला “माऊली” म्हणत असावा!

माझी वारी: थेट पंढरपूर……………!

खरी गोष्ट अशी की……. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा सासवडला
दोन दिवसांचा मुक्काम असतो. आषाढी एकादशीला पंढरपूरात माऊलीबरोबर गेलो
तरी विठ्ठलाचे दर्शन दोन दोन दिवस थांबूनही नीट मिळत नाही ही वस्तुस्थिती
आहे; आणि अनेक वारकऱ्यांचा तसाच अनुभवही आहे. पांडुरंगाचे थोडे
निवांतपणे दर्शन घ्यावे आणि पुन्हा सासवडला मुक्कामाला यायचे. दुसरे दिवशी
पुन्हा माऊलीबरोबर पंढरीच्या वारीला निघायचे असा आमचा बेत होता.

आम्ही सासवडहून संध्याकाळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो.
आमच्या महिला मंडळाने चांगली भजने, भक्‍तीगीते म्हटली. आवाजात एखादी
उणीव काढता आली असती पण म्हणण्यातला भाव फार चांगला होता. आमचा
प्रवास ह्या हरिनामाच्या संकीर्तनात फार लवकर झाल्यासारखा वाटला.

पंढरपुरात पोहचल्यावर नामदेवाच्या पायरीवर डोके ठेवले आणि आम्ही
विठोबाच्या दर्शनासाठी बारीत उभे राहिलो.वर्षभर विठोबाच्या दर्शनासाठी
रांगा लागलेल्या असतात. पण आम्ही त्या दिवशी मोठ्या भाग्याचे! आम्हाला
अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले नाही.

गर्दी नव्हती. दर्शनासाठी मोठ्या रांगाही नव्हत्या. तरीही बडवे
मंडळी सवयीनुसार दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला पांडुरंगापुढून क्षणात
पुढे ढकलतच होते!

आम्ही आता गाभाऱ्यात आलो होतो. त्यामुळे, नामदेवाचे हट्ट पुरवणारा,
भक्‍तांच्या काजा त्यांच्या संकटकाळात धावून जाणारा, सर्व संतांचे
परब्रम्ह अशा त्या सावळ्या पांडुरंगाचे आम्हाला दर्शन होत होते. गाभाऱ्यात
असलेले रांगेतील आम्ही, ते सावळ्या तेजाचे, कटेवरी हात ठेवून भक्‍तांसाठी
तिष्ठत उभ्या असलेल्या, महाराष्ट्राचे साक्षात लोकदैवत असलेल्या विठोबाचे
रूप तिथूनही डोळ्यात साठवत होतो.

आज माझे दैव विशेष बलवत्तर असावे. मी विठोबाच्या समोर उभा होतो.
कपाळावर चंदनाच्या उटीत बुक्क्याचा ठसठशीत ठिपका असलेला टिळा,
डोक्यावर चमचमणारा मुकुट, गळ्यात भरगच्च ताजा वैजयंती हार,
मोरपंखी असा सुंदर निळा पोषाख घातलेला, कमरेला लाल पट्टा,
खांद्यावरून गेलेल्या तांबूस पिवळ्या शेल्याचा भरजरी पट्टा, झळाळणारा
पितांबर नेसलेला तो पांडुरंग पुन्हा जवळून पाहिला. त्याच्या समचरणावर
दोन तीनदा डोके ठेवले! इतके मनसोक्‍त दर्शन मी घेतले तरी बडव्यांनी मला
पुढे ढकलले नाही! पंढरीनाथ महाराज की जय म्हणत मी पुढे सरकलो. हे मी
इतरांना सांगितल्यावर माझ्या या अप्रूप भाग्याचे कौतूक, हेवा न करता
“तुम्ही पैसे पेटीत न टाकता विठ्ठलाच्या पायाशी ठेवले होते” असे व्यावहारिक
सत्य सांगितल्यावर माझे ते भाग्याचे, दैवाचे विचार जमिनीवर आले!

मतितार्थ इतकच की ज्यासाठी हट्टाहास केला होता तो पांडुरंगाने
पुरवला. अगदी आषाढी एकादशीला नाही तर आगाऊ वर्दी न देता आम्ही
एकदम त्याच्या देवळात धडकलो होतो. हजार वर्षे सारा मराठी मुलुख, मराठी
संतांची मांदियाळी ज्याची उत्कटतेने भक्ती करते, त्या विठोबाचे आम्हाला इतके
निवांत दर्शन झाले, ह्याचा आनंद फार मोठा होता.

ह्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊली, संतश्रेष्ठ
तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर तसेच इतर अनेक संतांच्या
पालख्यांबरोबर ह्या सर्व संतांचे असंख्य वारकरी भक्‍त निघाले आहेत,त्या
लक्षावधी वारकऱ्यांबरोबर आपणही जात आहोत ह्याचे समाधान किती होते ते
शब्दात कसे सांगता यॆईल?

आम्ही पारंपारिक पद्धतीत थोडी सोयीची तडजोड केली इतकेच.

माझी वारी: मजल दरमजल

रात्री मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेटलो. चंद्रपूरची मंडळी आली होती.डॉ. अंदनकर भेटले.  किती वर्षांनी भेटलो ह्याचा हिशोब विसरून आम्ही भेटल्याचा आनंद घेतला.

सर्वजण भल्या पहाटे उठलो. ज्ञानेश्वरमाऊलीची पालखी सकाळी  सहा-साडेसहाला पंढरपूरला जाण्यासाठी निघणार होती. आम्ही पहाटे ५.४५ वाजता निघालो. लहान मोठ्या गल्ली बोळातून, रस्त्यांवरून, चहूकडून वारकऱ्यांचे लोंढे येत होते. पताका, निशाणे उंचावत दिंड्याही येत होत्या आणि मुख्य रस्त्याला लागणाऱ्या चौकात धडकत होत्या.

नादब्रम्ह काय असते; भजना अभंगांचा टिपेचा सूर, जय जयरामकृष्ण हरी, ज्ञानोब्बामाऊली तुकाराम हे सर्व कसे मनातून उमटत
येते; उत्साह, उल्हास, उत्कंठा किती अपरंपार असते याचा अनुभव येत होता.

कालच डोळे भरून पाहिलेला माऊलीच्या पालखीचा रथ केव्हा आपल्यात येतो याची आजही हजारो वारकऱ्यांत तितकीच उत्कंठा
होती. १८-२० दिवस आपल्या सोबत माऊली आहे की माऊली सोबत आपण आहोत हे द्वैत नकळत विरघळून जाते याचे प्रत्यंतर आजपासूनच येत होते.

आळंदी ते पुणे हा माझ्या पायांना ओळखीचा रस्ता.काही विसाव्याच्या ठिकाणी थांबत, संध्याकाळी पाच वाजता आम्ही पुण्याला इंजिनीअरींग कॉलेजच्या चौकात आलो.माऊलीची पालखी अजून खूप मागे होती.

चौकातून मी सर्वांचा निरोप घेतला. आमची इतर मंडळी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली.मी घरी निघालो.ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या येणार असल्यामुळे मुख्य रस्ते इतर सर्व वाहनांना बंद होते. त्यामुळे घरी पोचायला मला २.३० तास लागले.

ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा आणि अर्थातच सर्व वारकऱ्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम होता.
११ जुलै रोजी सकाळी सहा वाजताच चि.श्री. श्रीकांत आणि चि.सौ. स्मिता, आम्ही सर्वजण पुण्यातून जिथून निघणार होतो तिथे मला सोडवायला आले होते. सर्वांच्या ओळखी झाल्या. मी आता एकटा नाही, ह्याची खात्री पटल्यामुळे स्मिताईचा जीव भांड्यात पडला
असणार. ती आता निर्धास्त झाली हे तिच्या चेहऱ्यावरूनच मला कळत होते. पण तरीही माझ्या पायाचे दुखणे, लंगडणे हे ध्यानात असल्यामुळे ती मला,”बाबा, पायाचा त्रास हॊऊ लागला की परत या. आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. स्वत:ला जपा.” असे म्हणालीच. माझ्या “काळजीवाहू सरकारची” ही मुख्यमंत्री! लेकीची माया, ती का अशी लपून राहणार?

आम्हा सर्वांना हडपसरच्या दिशेने सोडून ते दोघे घरी परतली.

हडपसरच्या थोडे अगोदरच आम्ही वारीच्या जनसागरात विलीन झालो.

चला! “पुंडलीक वरदा हारी विठ्ठल!” “श्रीज्ञानदेव तुकाराम!” “श्री पंढरीनाथमहाराज की जय” “गुरुमहाराज की जय!” असे थोडे मोठ्याने
(मध्यमवर्गीय शहरी पांढरपेशा असे किती मोठ्याने म्हणणार?) म्हणत म्हणत आमची पायी वाटचाल सुरू झाली. माऊलीच्या पालखीच्या विसाव्याची ठिकाणे माहिती करून घेतली होतीच. आमची दिंडी विसाव्याच्या ठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी कुठे
थांबणार याची माहिती अगोदरच एका तक्त्याद्वारे आम्हाला दिली होती.

प्रथम आम्ही सर्व मंडळी एकमेकांच्या सोबतीने, मग आपोआप काही वेळाने ३/४-५/६ जणांच्या गटा-गटाने चालत होतो. बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांची भजने, टाळमृदुंगाच्या साथीने दिंडीतील वारकरी म्हणत असलेले अभंग ऐकत आमची वाटचाल सोपी होत होती.

दिवे घाट लागला. चढण सुरू झाली. दुपारचे उन चांगलेच तापले होते. वडकी नाल्याची जेवणाची विश्रांती आटोपून बरेच वारकरी पुढे निघाले होते. पण टळटळीत दुपार.एकादशीचा फराळ असला तरी त्याचीही थोडी सुस्ती अंगावर येणारच. त्यातून घाटातील अवघड चढण.पाणी पीत पीत,भजने म्हणत, टाळ मृदुंग वाजवत वारी घाट चढत होती. पण ह्या सगळ्या गोष्टीतच सुस्ती शिरली होती. आवाज वर चढत नव्हते, टाळ मृदुंगात सकाळचा उत्साही नाद नव्हता. वारीचा वेग कमी झाला होता.

दोन अडीच लाखांची ती लोकगंगा वळणे घेत हळू हळू वर चढत चढत अखेर माथ्या जवळ यॆऊ लागली. यानंतर पठार की मग सासवड असे कितीसे दूर ह्या भावनेने वारीला पुन्हा वेग आला. पावले भराभर पडू लागली. टाळ जोरात वाजू लागले. मृदुंगही खणखणीत बोलू लागले.

घाट चढून जाताना जसे आम्ही थोडे पुढे निघालो तेव्हा माझी आणि बरोबर असणाऱ्या सोबत्यांची चुकामुक झाली. आम्हाला एकमेकांचा ठावठिकाणा समजेना. त्याचे असे झाले………….

……. वाटेत सुनील सिद्धमशेट्टीवारांचा डॉक्टरांना फोन आला. फोनवरचे बोलणे आजूबाजूच्या आवाजांमुळे त्यांना नीट ऐकू यॆईना. त्यांनी फोन मला दिला. वारकऱ्यांच्या रांगांतून मी रस्त्याच्या कडेला आलो. “आपल्या गाड्या, घाट संपल्याबरोबर उजव्या बाजूला थांबल्या आहेत. तिथे सर्वांनी थांबायचे आहे.” मी हा निरोप डॉक्टरांना सांगावा म्हणून वारीकडे पाहू लागलो तर डॉक्टर दिसेनात. इतरही कोणी दिसेनात. थोडा वेळ वारकऱ्यांच्या गर्दीतून पुढे पहात, थोडे पुढे चालत जा, पुन्हा मागे या असे झाले तरी डॉक्टर दिसेनात की इतर सोबतीही दिसेनात. डॉक्टरांचा मोबाईल माझ्याकडे आणि निरोपही माझ्यापाशीच राहिला. काय करावे?

चला, पुढे जावे, वाटेत भेटतील आपल्यापैकी कुणीतरी. पण कसचे काय! मी पुढे जात राहिलो. पुढे, पुढे, आणि पुढेच. तरी वाटेत इकडे तिकडे आपली मंडळी दिसतात का ते पहात चाललो होतो. कोणीच दिसेना. मी बराच पुढे आलो असेन. घाटही चढून पार केला. उजव्या बाजूला आमच्या गाड्याही दिसल्या नाहीत. एका मागून एक वारकऱ्यांच्या लाटा येतच होत्या. सर्व दिंड्यांच्या ट्रक-टेंपोही
वर्दळीने जात होत्या. सासवड ४ कि.मी. असा मैलाचा दगडही मी वाचला. वाटेत एके ठिकाणी फराळाचे वाटप चालले होते.वाटप करत होते त्यांच्यापैकी एकाला डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवलेले फोन नंबर पहायला सांगितले. एक ओळखीचे नाव “सुनील” आल्यावर तो नंबर लावायला सांगितला. पण तो नंबर काही लागत नव्हता.

डॉक्टरांचा फोन माझ्याजवळ राहिल्यामुळे तेही मला फोन करू शकत नव्हते.

मला चालत राहण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता. आता सासवड २ कि.मी. अंतरावरच होते.एका मोठ्या ढाब्यापाशी थांबलो. समोर रस्त्याच्या पलीकडे पाणी पुरवठ्याची मोठी उंच टाकी होती. आपल्यापैकी कोणीतरी भेटेल असे वाटत होते. इतक्यात अचानक फोन वाजू लागला. डॉक्टरच बोलत होते. त्यांना मी कुठे आहे ते ढाबा आणि टाकीच्या खुणा देऊन सांगितले. आपली एक गाडी येत
आहे त्यात बसा असा निरोप मिळाला. चला! सर्व भेटणार हे ऐकून बरे वाटले.

हे इतके सर्व होईपर्यंत हजारो वारकरी, रथापुढच्या अनेक दिंड्या अवघड घाट पार करून आल्याचा आपला आनंद टाळ-मृदुंगाच्या खणखणीत पण मधुर सुरा-तालावर दाखवत होते. ह्या ताला-नादाच्या उधाणाला कशाची उपमा देणार आणि कोणत्या शब्दांत त्याचे वर्णन करणार?

अर्ध्या तासानी आमची गाडी आली. सोबत्यांची पुन्हा भेट झाली. आम्ही थोड्याच वेळात सासवडला पोचलो.गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वागताच्या मोठमोठ्या कमानी होत्या. मोठे व्यासपीठ होते. प्रवेशद्वारापाशी नगराध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे स्वागत करणार होते.

पालखीचे असे “सहर्ष स्वागत”सोहळे प्रत्येक लहान सहान गावात होतच होते. आळंदीहून निघाल्यापासून माऊलीची पालखी पंढरपूरला पोहचेपर्यंत माऊलीबरोबर असल्यामुळे सर्व वारकऱ्यांना ह्या अशा “सहर्ष स्वागताच्या” कमानीतून मानाने जायला मिळणार होते.

आमचा चौदा जणांचा गट आता पंढरपूरला जाणार होता. संधाकाळी ५.३० वाजता आम्ही निघालोही पंढरपूरला!

आमची पायी वारी इथेच संपली काय? विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारीतून हा “जवळचा रस्ता” आम्ही काढला की काय? का वारीची ही संक्षिप्त आवृत्ती काढली? असे प्रश्न कुणालाही पडले असणार. पण तसे काही नव्हते.आम्ही आमच्या पायी वारीला असे काही जवळचे फाटे फोडले नव्हते. खरी गोष्ट अशी की………………….

अधिक ते देखणे…..निरंतर पाहणे

१९०२ सालच्या डिसेंबरात “न्यूयॉर्क हेरल्ड” मध्ये एक वृत्तांत आला होता—“बारा वर्षाच्या राल्फ टीटरने पेट्रोलवर चालणारी मोटर बनवली आहे. मूळ आराखडा, रूप वगैरे सर्व काही ह्या बारा वर्षाच्या मुलानेच केले आहे. ह्या शिवाय त्याने वीज निर्माण करणारे जनित्रही तयार केले आहे. राल्फचे हे जनित्र शेजाऱ्यांच्या घरांना आणि त्याच्या स्वत:च्या घरालाही वीज पुरवठा करत आहे.” सर्व तपशीलासह ही माहिती त्या वृत्तकथेत दिली होती.

बारा वर्षाच्या मुलाने स्वत: मोटारगाडी बनवणे, वीज पुरवठा करणारे जनित्र तयार करणे ह्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत याच्त शंकाच नाही. तरीपण “न्यूयॉर्क हेरल्ड” मधील त्या वृत्तकथेमध्ये त्याहूनही विशेष नवलाची, थक्क करणाऱ्या एका लहानशा गोष्टीचा उल्लेख नव्हता. बारा वर्षाचा राल्फ टीटर आंधळा होता!

वार्ताहाराच्या तीक्ष्ण नजरेतून नेमकी हीच गोष्ट सुटली होती. चाणाक्ष बातमीदाराच्या लक्षातही आले नसेल की राल्फ आंधळा आहे! पण राल्फ टीटरला जे ओळखत होते त्यांना ह्या “नजर”चुकीचे आश्चर्य वाटले नव्हते. कारण राल्फ इतक्या सहजपणे आणि डोळस माणसांसारखा सराईतपणे वावरत असे की तो आंधळा आहे हे कुणाच्याही लक्षात येत नसे. बरं कुणाच्या लक्षात आले तरी राल्फच्या सहज सफाईदार हालचाली आणि इकडे तिकडे हिंडता फिरताना त्याचे बोलणेही चालूच असे. या वरून तो आंधळा आहे ह्यावर कुणाचा विश्वासही बसत नसे. मग “न्यूयॉर्क हेरल्ड”च्या बातमीदाराला ह्या तपशीलाच्या अनुल्लेखाबद्दल कोण दोष दॆईल?

हल्लीच्या पिढीतील अनेकांना राल्फ आर. टीटरची फारशी माहिती नाही. पण इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील तज्ञांना,अभ्यासकांना मात्र त्याची योग्यता व थोरवी माहित आहे. राल्फ टीटर हा विसाव्या शतकातील ऑटोमोटिव्ह- स्वयंचलित गति तंत्रज्ञानातील- मोजक्या आद्य, प्रतिभाशाली नामवंतांमध्ये श्रेष्ठ; ह्या क्षेत्रातील नवीन शोध लावणारा, एका कंपनीचा प्रमुख आणि स्वयंचलित यंत्रोद्योगाचा अग्रगण्य नेता आहे याची यांत्रिकी व्यवसायातील सर्वांना जाणीव आहे. म्हणूनच त्यांना राल्फ आर. टीटर विषयी मोठा आदर आहे.
राल्फ टीटर्चा प्रख्यात शोध म्हणजे स्पीडोस्टॅट. सध्या जगातील सर्व मोटारीत ते क्रूझ कंट्रोल म्हणून वापरले जाते. हे त्याचे पहिले स्वयंचलित यंत्र. ह्याशिवायही त्याने अनेक शोध लावले. सर्वप्रथम स्वयंचलित गिअर शिफ्ट तयार करून त्याचे पेटंटही त्याने घेतले. नवीन सुधारित, गवत कापण्याचे -लॉन मोवर-यंत्रही त्याने बनविले. इतकेच काय पण प्रवासासाठी एक सोयिस्कर सूटकेसही त्याने बनवली!प्रवासात कपडे चुरगळतात, घड्या मोडतात त्यासाठी त्याने एक विशेष फोल्डिंग सूटकेस तयार केली!

हे इतके त्याने केले. पण ह्या पेक्षाही त्याचे विलक्षण स्पर्शज्ञान आणि यंत्रांचे ज्ञान पराकोटीचे म्हणावे लागेल. त्याने यंत्रावर नुसता हात फिरवला की त्याला जणू संपूर्ण यंत्र स्पष्ट ’दिसत’ असे. यंत्रात नेमका कुठे बिघाड झाला आहे ,एखादा सुटा भाग हाताळून त्यामधे कसली दुरुस्ती करायला हवी हे तो अचूक सांगायचा.यंत्राच्या निरनिराळ्या भागांत मेळ साधला जात नसेल तर त्याचे कारण कुठे आहे, काही अगदी घट्ट किवा ढगळ झाले आहे वगैरे सर्व बारकावे तो नेमके सांगायचा.

आंधळा असूनही राल्फने कधी काठी वापरली नाही. साधी नाही की ’पांढरी’ही नाही. काठी वापरलीच नाही.गावत तो सगळीकडे एकट्यानेच फिरायचा. आपण कुठे आहोत, एखाद्या कोपऱ्यावर वळताना आपल्या पावलांचा आवाज बदलतो, हे सर्व त्याच्या लक्षात असे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडा-झुडपांना आपला हात सहज लागल्यासारखे दाखवत तो बरोबर जायचा.

अनेक अंध व्यक्तींप्रमाणे राल्फही संगीताचा भोक्ता होता. संगीताबरोबर त्याला नाटकांचीही आवड होती. मोटारींच्या, बोटींच्या शर्यतींनाही तो आवडीने जात असे. त्याच्या मित्रमंडळीत मोटार उद्योगातील नामवंत फ्रेड ड्युझेन्बर्ग आणि जनरल मोटर्सचा प्रमुख चार्ल्स केटरिंग हेही होते.

राल्फ सगळीकडे पायी एकटा जात असे तरी मोटर मात्र स्वत: चालवत नसे. कुणाला तरी सोबत घेऊनच त्याला जावे लागे. मोटार चालवण्याची प्रत्येकाची शैली निराळी, अनेकांच्या अनेक तऱ्हा. काही सफाईदारपणे तर कुणी धुसमुसळेपणाने चालवत. बरेच वेळा त्याचा वकील-मित्र, हॅरी लिंड्से हा गाडी चालवायचा. लिंड्से असला की गाडी वेगाने भरधाव, कशीही धडम धाड करीत जायची.

हॅरी लिंड्सेच्या अशा ड्रायव्हिंगचा सतत अनुभव घेतल्यामुळे राल्फ गमतीने म्हणायचा, “हॅरीच्या ड्रायव्हिंगमुळेच मला क्रूझ कंट्रोलची कल्पना सुचली. हॅरी ड्रायव्हिंग करत नसता तर क्रूझ कंट्रोलचा शोध लागला नसता!” जगातील मोटर चालकांना राल्फ्ने क्रूझ कंट्रोल्चे मोठे वरदानच दिले आहे. आपल्या घराच्या तळघरात दहा वर्षे राबून राल्फ टीटरने स्पीडोस्टॅट तयार केले व १९४५ साली त्याचे पेटंट घेतले. तरीही प्रत्यक्ष मोटार गाड्यांत त्याचा वापर होण्यासाठी १९५८ साल उजाडावे लागले.१९५८ साली ख्राईस्लर कंपनीने आपल्या मोटारींत त्याचा वापर सुरू केला.

१८९५ साली अमेरिकेतील इंडियाना राज्यातील हगर्सटाऊन येथे राल्फचे काका, भाऊ व त्यांच्या मित्रांनी मिळून एक पिस्ट्न रिंग्स बनविण्याची कंपनी सुरू केली. कंपनीची नावे एक दोनदा बदलून १९२६ मध्ये तिचे पर्फेक्ट सर्कल असे नामांतर झाले. ह्या कंपनीचा तो प्रेसिडेंट होता. ४४ वर्षे तिथे काम करून १९७० साली राल्फ टीटर निवृत्त झाला.

राल्फला प्रवासाचीही खूप आवड . राल्फ आपल्या पत्निसह एकदा युरोपच्या सफरीवर निघाला.बोटीतील प्रवाशात “रॉकी माऊंटन्स” ह्या वर्तमान्पत्राचा वार्ताहरही होता. आपल्या युरोपच्या सफरीचा वृत्तांत तो पाठवित असे. राल्फविषयी लिहिताना तो म्हणतो, “इतर अनेक पर्यटकांपेक्षा राल्फने अधिक पाहिले ह्यात शंका नाही. म्युझियम्स, कॅथड्रल्स, राजवाडे आणि इतर अनेक गोष्टी त्याला दिसल्या नसतील ह्यावर माझा विश्वास बसणार नाही. आम्हा सर्वांपेक्षा राल्फने अधिकच पाहिले. मला सारल्हे वाटायचे, आणि आजही वाटते, डोळे नसलेल्या राल्फ्ने जितके आणि जसे पाहिले तसे डोळे असल्यामुळे डोळस म्हणवणाऱ्या मला पाहता यावे एव्हढीच माझी इच्छा आहे.”

९२ वर्षाच्या दीर्घायुषी राल्फ आर. टीटरची प्राणज्योत १९९२ साली मालवली. केवळ डोळ्यांनी दिसते, डोळ्यांनी पाहता येते हे सर्वार्थ सत्य नाही हेच दिव्य दृष्टीच्या राल्फ टीटरने यथार्थ दाखवून दिले!

ऍन आयरिश कंट्री डॉक्टर

रेडवूड सिटी

काल रात्री “ऍन आयरिश कंट्री डॉक्टर” हे पॅट्रिक टेलरचे उत्तम पुस्तक वाचून संपवले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या ५-१० वर्षांच्या काळात नुकताच डॉक्टर झालेल्या एका तरुण ,हुशार डॉक्टराच्या अनुभवाची ही कादंबरी आहे.स्वत: लेखक हा डॉक्टर आहे. खेड्यात वाढलेला आहे. शाळा कॉलेजात अभ्यासू, हुशार तसेच काव्य-शास्त्र-विनोद यात उत्तम रस असलेला असा हा तरुण डॉक्टर. डॉक्टरीची परीक्षा पास झाल्यावर पुढचे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती पण पैशाची अत्यंत गरज होती म्हणून एका लहानशा खेड्यातील अनुभवी डॉक्टराच्या हाताखाली काम करण्यासाठी आला.

खेड्याचे नाव ’बेलीबकलबो’ जिथून डॉक्टर झाला ते बेलफास्ट हेच जवळचे मोठे शहर. ह्या तरुण डॉक्टरचे नाव बॅरी लॅव्हर्टी. ह्याला खेड्यातील निसर्ग सौदर्याची, तिथल्या शांत वातावरणाची मनापासून आवड होती.

बेलीबकलबो कुणालाही फारसे माहित नसलेले गाव. पण तिथला एकमेव डॉक्टर एफ. एफ.ओरॅली तसा प्रसिद्ध होता. ओरॅली म्हणजे एक आडदांड, मस्त व्यक्तिमत्व. त्याच्याकडे काम करताना डॉ.बॅरी लॅव्हर्टीला व्यवसायातील व्यवहारी शहाणपण,रोग्यांविषयी आस्था, गावातल्या लोकांविषयी जिव्हाळा; आपल्या ज्ञानाचा, पेशाचा दबदबा कसा ठेवावा पण त्याच बरोबर रोग्याच्ची जबाबदारी आपण कशी घेतली पाहिजे, त्याच्या कुटुंबाविषयी आस्था, काळजी; आपला थोडा धाक आणि ह्या सर्व गोष्टींबरोबरच इतर गप्पा, धमाल ह्या सर्व गोष्टींचे लॅव्हर्टीला नकळत पण प्रत्यक्ष मिळालेले शिक्षण आणि अनुभव; आणि पुस्तकी ज्ञानपेक्षा लोकांच्या भावना, समजुती, त्यांची रहाणी स्वभाव हे सगळे ध्यानात घेऊन उपचार कसे करावेत ह्याचे फार सुंदर आणि अगदी धमाल विनोदी नसले तरी मनापासून हसवणारे प्रसंग ह्या पुस्तकात आहेत. डॉ.बॅरी लॅव्हर्टीबरोबर आपण वाचकही बॅलीबकलबो ह्या खेडेगावाशी आणि तिथल्या माणसांशी किती एकरूप झालो आहोत हे वाचून झाल्यावरच समजते! डॉ.ओरेली दणकट आडव्या बांध्याची आसामी. त्याचा आवाजही त्याच्या देहाला शोभेल असाच मोठा आणि जीभही धारदार. डॉ. ओरेलीचीही वाचन चौफेर.बायबल, पुराण, कविता, इतिहास, साहित्य, नाटके, शेक्स्पिअर,ऑस्कर वाइल्ड, शॉ ,यांच्या साहित्यातील उतारेच्या उतारे संदर्भासहित पाठ! डॉ. बॅरी लॅव्हर्टीला तोडीस तोड.बोलण्यातही वाकबगार, व्यवहारात बेरकी पण तितकाच मोठ्या मनाचा.उदार हृदयाचा आणि विनोदीही..तो नौदलात डॉक्टर होता.तिथे युद्धात काम केल्यामुळे अनुभव दांडगा.समुद्र आकाश ,वारे ,तारे यांच्या सतत सान्निध्यामुळे त्यातही तज्ञ. अशा डॉ.फिंगल ओरेली ह्या वरून नारळासारख्या टणक,फणसासारख्या काटेरी पण आतून गोड पाण्यासारखा, गोड गऱ्यांसारखा, दणकट तितकाच सहृदयी मोकळ्या मनाच्या , शुद्ध अंत:करणाच्या डॉक्टरवर बॅलीबकलबोच्या लोकांइतकेच आपणही प्रेम करू लागतो. आदराने बोलू लागतो.

गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकरांमुळे माडगूळ आणि तिथली माणदेशी माणसे, गो.नी. दांडेकरांचे हर्णे,श्री.ना पेंडशांची गारंबी आणि तिथला बापू, पु.लंचे’रावसाहेब’, प्रकाश संतांचा ’लंपन’ आणि त्याचे बेळगाव, आर.के. नारायणचे मालगुडी, जेम्स हेरीयटचे ’ऑल क्रिचर्स ग्रेट ऍंड स्मॉल’ मधील —डेल गाव असो की ए.जे. क्रोनिन चे सिटाडेल मधील गाव किंवा होमेर हिकमचे कोलवूड आणि त्या गावातील खाण कामगार असोत, ही आपल्या मनात कायमची घर करून राहिले आहेत. पॅट्रिक टेलरचे बॅलीबकलबो हे गाव आणि डॉ.ओरॅली,तिथली माणसेही अशीच आपल्या मनात कायमची रहातील यात शंका नाही.
आपणही तिथलेच, त्या त्या गावचे रहिवासी आहोत असे वाटायला लागते. ह्यातच ह्या सर्व लेखकांचे मोठेपण आहे.वर नमुन्यादाखल उल्लेख केलेल्या पुस्तकांमुळे आपल्यालाही आपले गाव आणि तिथल्या माणसांविषयी जास्त जिव्हाळा वाटू लागतो!

*****************************

डॉ.बॅरी लॅव्हर्टी डॉ.ओरॅलीचे बोलणे ऐकत होता. पण त्यापण ह्या खेडेगावात कशाला आलो.,इथे रहायचे की नाही हे ठरत नव्हते.ओरॅलीने त्याला आपल्या समोरच्या खुर्चीत बस म्हणून सांगितले. तो बसला. पण बसल्यावर तो घसरायला लागला. खुर्चीचे दोन्ही हात घट्ट धरून बसला. ओरॅली त्याला खेड्यातील प्रॅक्टिसविषयी सांगत होता.पण लॅव्हर्टी खुर्चीतून घसरता घसरता सावरत बसण्यातच गुंतला होता. ही काय खुर्ची आहे की घसरगुंडी? असे मनात म्हणत होता. आता इथे कसले रहायचे?, नको; विचार करू असे त्याचे चालले होते. आणि एकिकडे जमिनीला पाय घट्ट दाबून खुर्चीत पुन्हा वर सरकत होता.त्याचे हात आणि पाय दुखायला लागले ही घसरगुंडीची कसरत करता करता. डॉ.ओरॅलीला हे सर्व दिसत होते. तो बॅरीला म्हणाला,” हात पाय भरून आले ना?” “होय हो. ही खुर्ची अशी कशी? मी सारखा घसरतोय.पुन्हा मागे वर सरकतोय. पाय घट्ट रोवून रोवून दुखायला लागलेत.”बॅरी म्हणाला. “काय झालय काय खुर्चीला?’” त्याने पुन्हा विचारले. “काही नाही. मी स्वत: ती चांगली नीट दुरुस्त केलीय.” डॉ. ओरॅली म्हणाला. पुन्हा त्यांची बोलणी सुरू झाली. पण डॉ. बॅरी लॅव्हर्टीची त्या घसरगुंडीच्या खुर्चीवरची कसरत काही थांबत नव्हती.”अहो. काय दुरुस्ती केलीय तुन्ही डॉक्टर? तो आता जरा चिडूनच म्हणाला.”खुर्चीचे पुढचे दोन्ही पाय मी एकेक इंच कापून टाकले!” डॉ. ओरॅली हसत हसत म्हणाले. काय़?!!” डॉ.बॅरी जवळ जवळ किंचाळतच म्हणाला.
“हो. नीट बसता येत नाही ना?” डॉ.ओरॅली मख्ख्पणे म्हणाला.”नाही हो, हे काय ….” तो घसरता घसरता म्हणाला.”तुला जसे इथे खेड्यात रहावेसे वाटत नाही तसेच ह्या खुर्चीत बसल्यावर पेशंटला इथे दवाखान्यात फार वेळ थांबावे वाटत नाही” डॉ. ओरॅली शांतपणे म्हणाला. अशा घसरगुंडीच्या खुर्चीवर पशंटला बसवून त्याच्या आजाराची माहिती डॉ.ओरॅली कशी काय घेत असतील असा प्रश्न डॉ. बॅरीला पडला.त्यापेक्षा कारखान्यातल्या सरकत्या पट्ट्यावर पेशंटना का बसवत नाही? धन्य धन्य आहेत हे डॉक्टर ओरॅली! असे तो मनात म्हणत होता. त्याच्या मनातील विचार ओळखून की काय डॉ. ओरॅली म्हणाले,”इथे खेडेगावत काही काही पेशंट असे असतात की त्यांना नुसते “हं, काय होतेय?” असे विचारण्याचा अवकाश की ते जे काही रटाळ चऱ्हाट लावतात ते संध्याकाळ झाली तरी थांबत नाही. जसे काही चावडीवर गप्पा मारत बसले आहेत!”डॉक्टर ओरॅली थोड्याशा वैतागाने, किंचित गमतीने सांगत होते. “इकडे इतके पेशंट खोळंबलेले असतात. काम इतके आणि इतक्या तऱ्हेचे असते की मला एकट्याला आटोपणे शक्य होत नाही. म्हणून ही खुर्चीची मी घसरगुंडी केली. दोन तीन वेळा घसरला की पेशंट आपोआप आपले चऱ्हाट वळणे थांबवतो. मी लगेच, चला, पुढचा कोण? असे ओरडतो.” हे सांगताना डॉ. ओरॅलींचे डोळे मजेशीर चमकत होते!

*****************************

डॉ.ओरैलीने इंजेक्शनच्या सहा पिचकाऱ्या काढल्या. त्या गुलाबी औषधाने भरल्या. “हे काय डॉक्टर?” डॉ.बॅरी लॅव्हर्टीने विचारले.ओरैली हसत हसत,”व्हिटमिन बी१२!” म्हणाला.”बी१२? पण ते काही….”डॉ. बॅरी पुढे काही म्हणायच्या आत,”हो,हो बाबा, मला माहित आहे ते काही टॉनिक नाही. मला माहित आहे आणि तुलाही माहित आहे ते टॉनिक नाही, पण, तो आणखीनच हसत म्ह्हणाला,” पण त्यांना त्या पेशंटना माहित नाही ते टॉनिक नाही म्हणून… जा त्या सगळ्यांना बोलाव!”ओरैलीने डॉ. बॅरी लॅव्हर्टीला सांगितले.
ते सहा पेशंट आले. टेबलाच्या कडेला पण भिंतीकडे तोंड करून वाकून उभे राहिले. एका रांगेत.डॉ. ओरेलीने सढळ हाताने प्रत्येक पेशंटच्या कंबरेखाली थबथबा स्पिरिट फासले. नंतर एकामागून एक असे प्रत्येकाच्या त्या जागेवर खस्सकन सुया खुपसल्या. त्या सहात दोन बायकाही होत्या! पण त्याने सुया सरळ सगळ्यांच्या कपड्यातूनच खुपसल्या होत्या! आणि म्हणूनच स्पिरिटचे बोळे थबथबा फासले होते.डॉ. बॅरी इंजेक्शन देण्याची ही अजब पद्धत पाहून चकित झाला.

“हां, झाले. आता तुम्ही लाह्या फुटल्यासारखे टणा टणा उड्या मारायला लागाल.एकदम झक्क झाले. चला.” डॉ. ओरेली पेशंटना म्हणाला. पेशंट ओरेलीकडे कृतज्ञतेने पहात गेले.”त्यांना कसलाही त्रास होणार नाही आणि बहुतेकांना बरे वाटेल. मला महित आहे ह्याचा औषधी उपयोग काही नाही. पण पेशंटला बरे वाटावे म्हणून अशी समजूत काढावी लागते.” डॉ.ओरेली बॅरीला सांगू लागला.”आपण पेशटला बरे वाटावे म्हणूनच आहोत आणि त्यासाठी असे करावे लागते अधून मधून.”डॉ ओरेली सांगत होता आणि डॉ. बॅरी अजूनही जरा साशंकतेनेच ह्या प्रकाराकडे पहात होता! पण हळू हळू त्याला हे पटणार होते.

*****************************

” डॉ.फिंगल आहेत का?” डॉ.बॅरी लॅव्हर्टीने दार उघडल्यावर एका साठीच्या घरात असलेल्या, तोंडाचे बोळके झालेल्या म्हाताऱ्या बाईने डॉ. बॅरीला विचारले. तो काही म्हणाणार तोच ” या ,या, मॅगीआजी असे मोठ्याने म्हणत डॉ. ओरेली स्वत:च पुढे आला.” हे माझे तरूण मदतनीस, डॉ. बॅरी लॅव्हर्टी.आज तेच तुला तपासतील.”
मॅगी आजी बसल्या. बॅरीने तपासणी करायला सुरवात केली. “काय होतय तुम्हाला?”
डॉ. ओरेलीकडे बघत ती म्हणाली”डोकं दुखतय.””अस्सं. केव्हापासून दुखतय?” डॉ.बॅरी. “अरे देवा! काय सांगू! अहो ते किती दिवसांपासून म्हणून काय सांगू? कधी कधी फार ठणकते. पण काल कमालच झाली. रात्रभर डोकं ठणकत होतं! अजूनही तसं दुखतयच.”हे सांगत असतानाही मॅगीबाई मध्येच डॉ. ओरेलीकडे पहात होत्याच.
” असं.आणि आता मला सांगा हे डोकं ठणकतं ते नेमके कुठे?” डॉ.लॅव्हर्टीने कॉलेजात शिकवले होते त्याप्रमाणे शास्त्रशुद्धपणे पेशंटची तपासणी चालू ठेवली. मॅगी आजी थोडे पुढे वाकल्या आणि गुपित सांगावे तसे हळू आवाजात,आपला हात डोक्यावरच्या फुलाफुलांच्या उंच हॅटच्या वर नेत,”इथे”म्हणाल्या! डो. बॅरी लॅव्हर्टी खुर्चीतून उडायचाच बाकी राहिला होता!”तुमच्या डोक्याच्या वर डोके दुखते?” बॅरी थक्क हॊऊन म्हणाला. “हो, डोक्याच्या वर दोन अडीच इंच वरती.”मॅगी मॅकॉर्कल आजी ठामपणे म्हणाल्या. आता डॉ.बॅरी लॅव्हर्टीची डॉ.ओरेलीकडे पहाण्याची पाळी होती!
“बरं. आणि अलिकडे डोकं दुखु लागले की आवाजही ऐकू येतात?”बॅरीने विचारले. “काय? आवाज?”असे जरा घुश्यातच बाईने उलट प्रश्न केला. डॉ.ओरेलीच समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले,” डॉक्टर विचारताहेत की तुमच्या कानात काही आवाज होतात असे वाटते का?” “कसे?डिंग डॉन्ग की ट्ट्र्र्र्र्र्र्र्र?” घसरगुंडीच्या खुर्चीत स्वत:ला सावरत मॅगीआजीनी विचारले?” “तुम्हीच सांगा.”ओरेली म्हणाला. “डिंग डॉन्ग! डॉक्टर.” मॅगीबाई. ओरेलीचा चष्मा खाली घसरला होता.तो सावरत हसत असतानाच आजीबाईंचे आपले”डिंग डॉंग..डिंगी डिंगी डॉन्ग… डिंगी..”चाललेच होते. “आजी, बरं”ओरेली अगदी गंभीरपणाचा आव आणून म्हणाला,”डिंग डॉन्ग आणि दोन इंचांच्या वर. दुखतं कुठे डोक्याच्या मध्यभागी का एका बाजूला?” “मध्यभागी नाही.एका बाजूला,ह्या बाजूला. फार वाईट असते का असे ?”मॅगी बाईंनी विचारले. “नाही.तसे काही नाही.” तिच्या खांद्यावर थोपटत ओरेली म्हणाला. आपण एका झटक्यात बरं करू.” आजीबाईंना बरं वाटलं हे ऐकून.ती डॉ.ओरेलीकडे बघून हसली.आणि लगेच तरूण डॉ.बॅरी लॅव्हर्टीकडे अपल्या थंड नजरेने रोखून पाहू लगली. डॉ.ओरेलीने तेव्हढ्यात औषधाच्या कपाटातून एक बाटली काढली.”ह्या गोळ्या खरं काम करतील”डॉ. ओरेली बाईना म्हणाला. “ह्या गोळ्या अगदी निराळ्या, खास स्पेशल आहेत,बरं का,मॅगी. डॉ.ओरेली त्या बाईना दरवाज्याकडे नेत म्हणाला.” बाईनी मान हलवली.” मी सांगतो त्या प्रमाणेच ह्या गोळ्या घ्यायच्या. नीट लक्ष देऊन ऐका.” ओरेली. “हो, अगदी तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच मी घॆईन. पण कशा घ्यायच्या? मॅगी आजी आता खुषीत होत्या. ओरेलीने त्या आजींसाठी दरवाजा उघडला. “अर्धा तास” इतके म्हणून डॉ.ओरेली थांबला आणि गंभीरपणे तिच्याकडे पहात पुढे सांगू लागला, “बरोब्बर अर्धा तास ,डोकं दुखायच्या आधी बरोबर अर्धा तास आधी.” ” हो का, डॉक्टर? बरं नक्की घॆईन” असे मॅगी आजी डॉ.ओरेलीकडे आनंदाने पहात म्हणाल्या.पण लगेच डॉ.बॅरी लॅव्हर्टीकडे पहात पण डॉ.ओरेलीला म्हणाल्या,”ह्या नवशिक्या तरूण लॅव्हर्टीला अजून बरच काही शिकायचं आहे…”

बिचारा लॅव्हर्टी!

*****************************

डॉ.ओरेली आज तसे घाईतच होते.आज टीव्हीवर त्यांच्या आवडत्या टीमची रग्बीचे मॅच होती. मग ते कशी चुकवणार ती मॅच? त्यामुळे सकाळपासूनच ते प्रत्येक गोष्ट भराभर आटपत होते. कुणाकडेही व्हिजिटला गेल्यावर वेळ घालवत नव्हते.नेहमीच ते मोटार भन्नाट चालवत. त्यात आज ती मॅच चुकवायची नाही ह्याचा ध्यास. घरी परत जाताना गाडी जोरात निघाली. पण रहदारीचे दिवे आले की चौकात नाइलाजाने थांबावे लागायचेच.ओरेलीची अस्व्स्थता आणि चुळबुळ,वाढत जायची.पुढच्या वाहनाच्या ड्रायव्हरवर रागावून स्वत:शीच बोलणे आणि चरफडण्यापलिकडे तो काही करू शकत नव्हता.

एका चौकात रह्दारीचा तांबडा दिवा लागला. डॉ. ओरेलीने गाडी थांबवली. त्याच्या पुढे दोन तीन गाड्या होत्या. अगदी समोर एक ट्रॅक्टर होता. ओरेली अस्वस्थ झाला होता आता. तेव्हढ्यात हिरवा दिवा लागला. पुढच्या दोन मोटारी निघून गेल्या.ट्रॅक्टरचे इंजीनही फटर फटर आवाज करू लागले. पण काय! नुसते फटर, फटर फटर्र्र झाले आणि फट्ट करत ट्रक्टर बंद झाला.त्या ट्रॅक्टरवाल्याने मागे वळून पाहिले तेव्ह्ढ्यात पुन्हा दिवा तांबडा झाला. ओरेली स्वत:शीच चरफडत ओरडत बसला. डॉ. बॅरी हे सगळे पहात होता. त्याने समोरच्या ट्रॅक्टरवाल्यालाही ओळखले. डॉ. ओरेलीचा पेशंटच होता तो. त्या ट्रॅक्टरवाल्याने आरशातून मागे पाहिले आणि डॉ. ओरेलीच मागे आहेत हे पाहिल्यावर तो जरा भेदरला!. दिवा हिरवा झाला. ट्रॅक्टची फटर फटर फटर्र्र्र्र्र्र… सुरू झाली पण तेव्हढेच. पुन्हा फट्ट्ट …. आणि ट्रॅक्टर थंड पडला.पुन्हा त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने मागे वळून ओरेलीकडे पाहिले. ओरेलीच्या गाडीमागे आता पाच सहा मोटारींची रांग लागली. पुन्हा हिरवा दिवा तांबडा झाला. सगळे चिडून हताश हॊऊन बसले. खेडेगावातील तो मुख्य रस्ता. मुख्य असला तरी किती रूंद असणार? त्या ट्रॅक्टरला वळसा घाळून जाता ही येणे शक्य नव्हते!. इतक्यात दिवा हिरवा झाला. सगळ्या मोटारींनी आपापली इंजिने चालू केली. ट्रॅक्टरही चालू झाला…फटर…फटर..फट्ट्टर.. ओरेलीने गाडी किंचित पुढे नेण्याचा प्रयत्न केला तेव्ह्ढ्यात फट्ट्ट करत तो ट्रॅक्टर बंद पडला. आणि हिरवा दिवा तांबडा झाला. आणि डॉ. ओरेलीचा चेहरा त्या दिव्यापेक्षाही लालबुंद झाला.डॉ. ओरेली गाडीतून उतरला आणि इतर मोटार गाड्या चालू असूनही त्यांच्या इंजिनांच्या आवाजावर चढला होता.इतक्यात दिवा हिरवा झाला. आणि डॉ. ओरेली त्या दिव्याकडे बोट दाखवून ट्रॅक्टरवाल्या म्हणाला, “अरे स्वत:ला माणूस म्हणवून घेणाऱ्या क्षुद्र प्राण्या, डोनाल्ड डोनेली! अरे,बोल, बोल! हिरव्या रंगाच्या अशा, कोणत्या खास छटेची तू वाट पहात थांबला आहेस रे मघापासून इतका वेळ? आं,होय रे?……”

स्वातंत्र्य,प्रगती,सुबत्ता समृद्धी……..

जळगावचे माझे मित्र आणि शेजारी डॉ.देसाई यांना अखेर स्कूटर मिळाली. ती आणण्यासाठी त्यांना धुळ्याला जावे लागले. एक दोन दिवस तिथे रहायला लागले.दोन दिवसांची प्रॅक्टिस बुडाली. पण स्कूटर मिळाली त्या पुढे प्रॅक्टिस बुडणे वगैरे गोष्टी क्षुल्लक होत्या. आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगती आणि भरभराटीसाठी इतका थोडा त्याग करायलाच हवा प्रत्येकाने. त्यांनी सर्व कागदपत्रे, पैसे भरून स्कूटर ताब्यात घेतली. नेहमी स्कूटर बरोबर एक जास्तीचे चाकही असते. पण त्या दुकानदाराने ते दिले नाही कारण ते आले नव्हते. त्या ऐवजी एक ट्यूब दिली!तरीही डॉक्टर आपली ती नवीन स्कूटर मोठ्या आनंदाने घेऊन आले.तिला हार घालून नारळ फोडून पेढे वाटून विजयी वीरासारखे आले. जळगावच्या वेशीपाशी पंचवीस सुवासिनींनी त्यांना ओवाळायचे तेव्हढे राहिले. पण घरी आल्यावर त्यांच्या बायकोने प्रेम आणि कौतूकभरल्या डोळ्यांनी त्यांचे -त्यापेक्षा त्या स्कूटरचे- पंचारती करून औक्षण केले असणार ह्यात शंका नाही. दिवसच तसे देशाच्या भरभराटीच्या स्वप्नांचे होते. देश आर्थिक सुबत्तेकडे प्रगतीकडे, भरभराटीकडे मोठी झेप घेत होता. आजही तो तशीच झेप घेतच आहे.

नंतरचा महिना दीड महिना डॉक्टर नाटक-सिनेमातल्या शिवाजी सारखी मान थोडी तिरपी वर करून आणि छाती पुढे काढून जात होते. स्कूटरवर असतानाही हीच स्टाईल! पायी चालताना तर ते कुणाकडे ढुंकुनही पहात नसत.त्या काळात कुणी असे चालू लागला की सगळ्यांना समजायचे ,ह्यांचा स्कूटरचा नंबर लागला. ह्यांना स्कूटर मिळाली!अखेर स्कूटरचा नंबर लागला, स्कूटर मिळाली की पुढे आयुष्यात काही करायचे बाकी नसे! आपली स्कूटर असणे म्हणजे काय असते ते आताच्या केव्हाही, कुठेही, पैसे फेकले की ’बाईक’ मिळणाऱ्या,आणि ती घेणाऱ्या पिढीला कळणार नाही. तो गगनात न मावणारा आनंद, तो अभिमान, ते आपले कर्तृत्व,आपले स्वप्न सत्यात उतरले त्या यशाचा उत्साह आणि मनात मारलेल्या आनंदाच्या उड्या, ह्या सर्व शुद्ध आनंदाची चव आणि अनुभव आता कुणाला येणार नाही!

ह्याचे कारण डॉक्टरांना ती स्कूटर पैसे भरून पाच वर्षांनी नंबर लागल्यावर मिळाली होती!

हे सगळे सांगण्याचे कारण आमच्या वासुनाने सांगितलेला किस्सा. वासुनानाच्या मित्रानी काटकसर करून, बऱ्याचशा इच्छा मारून पैसे साठवले आणि पैसे घेऊन तो स्कूटरसाठी नाव नोंदवायला स्कूटरच्या शोरूममध्ये गेला.निमुटपणे पैसे भरले. कुठे राहतो, त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड विजेची तीन बिले वगैरे सर्व सोपस्कार पूर्ण झाले. पावती घेतली. दुकानदाराला नम्रपणे विचारले,”स्कूटर केव्हा मिळेल? दुकानदाराने आपल्या पुस्तकात पाहिले आणि सांगितले,” बरोबर ह्याच तारखेला म्हणजे १५ ऑगस्टला पण पाच वर्षांनी या.” वासुनानाचा मित्र म्हणाला,”शेठजी,पाच वर्षांनी स्कूटर ताब्यात घ्यायला सकाळी येऊ का संध्याकाळी?” शेठजींना हा असे का विचारतो ते समजेना. तो म्हणाला,का, तुम्ही असे का विचारता?” मित्र म्हणाला,” त्याच दिवशी ग!असचा सिलिंडरही येणार आहे घरी…म्हणून… म्हणून….”

[१६ ऑगस्ट,२००८ द इकॉनॉमिस्ट्च्या अंकात एका वाचकाच्या पत्रावरून मला हे सुचले. त्याने रशियात मोटार मिळणे किती अवघड होते,असते ह्या संबंधी विनोदी किस्सा पाठवला होता. त्याचा आधार माझ्या लिखाणाला आहे.]

हसण्यासाठी जन्म आपला!

रेडवूड सिटी

मला एकदम हसू आलं. कारण काही नाही. सोनियाची आठवण झाली आणि
तिची हसरी मूर्ती डोळ्यांसमोर आली. हसण्यासाठी तिला विशेष कारण
लागत नाही. आणि म्हणूनच तिचे हसणे इतकं गोड असावे. सोनिया अवघी दोन
अडीच वर्षांची. सोनियाला हसताना पाहणे ह्यापरते दुसरे सुख नाही,
भाग्य नाही. सोनिया हसू लागली की–खरं म्हणजे कोणतेही लहान मूल हसू
लागले की-प्रकाश जास्त उजळतो, पक्षी अंगणात येतात, झाडे डोलू लागतात,
वारा फ़ुलांचा सुगंध घेऊन येतो, बाल-निर्झर हसत-खेळत झुळुझुळ वाहत
येतो, काळज्या मिटून जातात, खेद-खंत मावळतात, राग-लोभ पळून जातात;
सारे जग हसू लागते.

हसवणारा सगळ्यांनाच आवडतो. मग तो विनोदी लेखक,कवि, वक्ता, विनोदी
कलाकार, नट-नटी, विदूषक, व्यंग चित्रकार,गोष्टीवेल्हाळ कोणीही असो,
तो सर्वप्रियच होतो.विनोद,चुटके, किस्से, आठवणी, गप्पा म्हणजे रोज येणाऱ्या
आनंदाच्या सरीच! त्यांत भिजणे कुणाला आवडत नाही?

हसणे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नव्हे ते आयुष्यवर्धक संजीवक आहे
असे डॉक्टरही म्हणतात.कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा युनिव्हर्सिटीच्या
हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या आणि ह्रुदयविकाराच्या रुग्णांना “आय लव्ह ल्युसी”
सारखे विनोदी कार्यक्रम रोज दाखवतात. ते पहाताना रोगी आपले दुखणे विसरून
हसत असतात. ह्यामुळे शरीरातील टी-सेल्स वाढून त्यांची प्रतिकारशक्ती
वाढल्याचे आढळून आले.

“सॅटर्डे रिव्ह्यू” ह्या प्रख्यात मासिकाचा संपादक नॉर्मन कझीन हा मणक्यांच्या
विकाराने अंथरुणात पडून होता. त्यावेळी तो मार्क्स ब्रदर्सचे विनोदी चित्रपट
पहात असे. आठ दिवसात पूर्ण बरा होऊन तो चालू लागला.हे पाहून डॉक्टरही
चकित झाले.

नाटकातील, कथा-कादंबऱ्यातील संवादात कुणी हसला किंवा हसणे हे हा:
हा: ; ही ही; हो हो; असे लिहून दर्शवतात.इंग्रजी आणि इतर भाषांतही असे
ह-च्या बाराखडीतून “हसणे” सुचवतात.स्वराच्या मागे ह हे व्यंजन
वापरलेले असते. आपण श्वासोश्वास घेतानाही “ह” असाच काहीसा आवाज होत
असतो. म्हणजे श्वासोश्वासा इतकेच हसणेही आपल्या जीवनाशी किती निगडित
आहे पहा! इतर भाषांत ’हसणे’ यासाठी जे शब्द आहेत त्या शब्दांची सुरवात
’ह’ या व्यंजनाने होत नाही; उदा. इंग्रजीत ’लाफ”लाफ्टर’; पण मराठीत मात्र
’हसणे’ ’हास्य’ हे शब्द ’ह’नेच सुरू होतात! आपल्या मराठीचे हे एक खास
वैशिष्ठ्य आहे.

कुणी”हसून हसून बेजार होतो” पण हसल्यने तो आजारी पडल्याचे
कोणी ऐकले नाही. “हसून हसून आपले पोट दुखले” असेही कुणी सांगतो पण
हसण्याने कधी तब्येत बिघडल्याचे आपल्याला माहित नाही. प्रख्यात इंग्रजी
लेखक आणि निबंधकार मॅक्स बीरभॉमने म्हटल्याप्रमाणे, ह्या पृथ्वीतळावर
आपल्यापूर्वी आणि आजपर्यंत इतके लोक हो़ऊन गेले पण हसण्यामुळे, हसून
हसून कोणी दगावला आहे अशी इतिहासात कुठेही नोंद नाही.
बायबलच्या जुन्या करारातील जेनेसिस[विश्वोत्पत्ती संबधीचा भाग]मधील एक
प्रसंग लक्षात घेण्यासारखा,गमतीचा आहे.:- आणि देव ऍब्रॅहमला
म्हणाला,”मी तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर प्रसन्न झालो आहे. माझ्या
आशीर्वादाने तुम्हाला मुलगा होईल!” हे ऐकून ऍब्रॅहम पोट धर धरून हसू
लागला.अगदी जमिनीला डोके टेकेपर्यंत हसत होता. त्याला वाटले, माझी
म्हाताऱ्याची देव किती थट्टा करतोय!”
ही देववाणी ऐकून ऍब्रॅहमची बायको-सेरा-सुद्धा हसायला लागली. ह्या
वयात-त्यावेळी ती नव्वद वर्षांची होती- आपल्याला मूल होणार ह्या नुसत्या
कल्पनेनेही तिला हसू लोटलं. देव आपली गंमत करतोय असे तिला वाटले.
देवाने त्या मुलाचे नावही ठरवले होते. देव पुढे म्हणाला,”तुमच्या मुलाचे
नाव आयझॅक असेल.” खरी गंमत पुढेच आहे–’आयझॅकचा अर्थही,’हसरा’ ’तो
हसेल’ ’हसणारा’ असा आहे!

आपले मूळ स्वरूप आनंदच आहे असे आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानातही म्हटले
आहे. ही आनंद साधना करणे ह्यात आपल्या आयुष्याचे सार्थक आहे असे आपले
संत, ज्ञानी पुरूषही सांगतात.

आपले हसणे, हास्य म्हणजे आनंदाचा प्रकट आविष्कार. आनंदाचे मूर्त स्वरूप
म्हणजे हसणे, हास्य! इजिप्तमध्ये सापडलेल्या, इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या
शतकातील एका कागदपत्रात म्हटले आहे: “जेव्हा देव मोठ्या आनंदाने
पहिल्यांदा हसला तेव्हा प्रकाश निर्माण झाला…..दुसऱ्यांदा मोठ्याने हसला
तेव्हा पाणी निर्माण झाले…. आणि जेव्हा देव सातव्यांदा [सात मजली?] हसला
तेव्हा मानव, मनुष्य प्राणी निर्माण झाला!” परमेश्वराच्या आनंदाच्या
परमोच्च क्षणी आपला जन्म झाला ही कल्पना किती रम्य आहे!

हे सगळं हसण्यावारीच जाण्याची शक्यता आहे.हसण्यासंबंधी इतके
वाचल्यावर तुम्ही, हे म्हणजे अगदी, “अति झालं आणि हसू आलं” असे म्हणून
हसाल.हरकत नाही. तुम्ही असे हसण्यातही मजा आहे!