शेवटचे पान

रेडवूड सिटी

वॉशिंग्टन स्क्वेअरच्या पश्चिमेकडचे रस्ते म्हणजे न सुटणारे कोडेच आहे. किती वळणे आणि आडवळणे! कुणालाही चक्रावून सोडणारे. आत शिरलात तर फिरून फिरून तुम्ही परत त्याच ठिकाणी येता.

एका चित्रकाराने तिथल्या वस्तीत जागा घेतली. तो गमतीने म्हणायचा, ” अहो, कागद, कॅनव्हास रंगाची बिलं वसूल करणारा आला तर पत्ताच लागत नाही म्हणून रिकाम्या हाताने जाईल इथून ! पण त्या वस्तीतील डच पद्धतीची घरे, उत्तरेचा वारा घेऊन येणाऱ्या खिडक्या पाहून एकेक करीत अनेक चित्रकार त्या वस्तीत राहू लागले. त्यांची ‘कॉलनी’ म्हणूनच तो भाग ओळखला जाऊ लागला.

कॉलनीतला भागात असलेल्या हॉटेलात, ओळख नसलेल्या सुझी आणि जॉन्सी सहज भेटल्या. कॉफी पिता पिता, गप्पा मारताना त्यांच्या लक्षात आले की दोघींच्या बहुतेक आवडी निवडी सारख्याच आहेत. अनोळखी सुझी आणि जॉन्सी मैत्रिणी झाल्या.

दोघीही चित्रकार. त्यांनी त्याच कॉलनीत जागा घेतली. ही मे महिन्यातली गोष्ट. दोघी मिळतील ती कामे करत मजेत राहात होत्या.

नोव्हेंबर आला. त्यांच्या बरोबर थंडी आली. पण या खेपेला थंडी एकटी आली नाही. तिने आपल्या सोबत मि. न्युमोनियालाही आणले !

वॉशिंग्टन स्क्वेअरच्या पूर्व भागात न्युमोनियाने कहर केला. पश्च्चिमेच्या चक्रव्यूहात शिरायला त्यालाही बरेच कष्ट पडले असावेत ! कारण एक दोघानाच त्याने बेजार केले होते. थोड्याच दिवसांनी जॉन्सीलाही न्युमोनिया झाला.!
जॉन्सी अंथरुणात पडून असायची. खिडकीतून शेजारच्या रिकाम्या भिंतीकडे पाहात असायची. सुझी गडबडून गेली होती. पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ती जॉन्सीची शुशृषा करत होती. त्यातच वेळ काढून चित्राची कामेही करीत असे. पण तिला उसंत मिळत नव्हती.

एके दिवशी जॉन्सीला तपासून निघताना बाहेरच्या खोलीत सुझीला ते म्हणाले,” सुझी, तू तिची चांगली काळजी घेतेस. मीही औषधे देतो आहे.पण मला तिची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत. मल विचारशील तर दहा टक्केच खात्री देता येईल! ” ते ऐकल्यावर सुझीला बोलणेच सुचेना. डॉक्टर पुढे म्हणाले, तिच्या मनावर दडपण आहे कसले?” ” तसे काही मला वाटत नाही, डॉक्टर”, हां ! पण ती नेहमी म्हणते, तिला, बे ऑफ नेपल्स ची चित्रे काढायची आहेत.” ह्हे:! मी ते म्हणत नाही. तिचा कुणी मित्र अगर.. .ती कुणात गुंतली आहे का?” “छे! छे ! तसे काही नाही डॉक्टर.” “तिला बोलती कर. साध्या एखाद्या नविन फॅशनविषयी तिने विचारले तरी मला थोडी आशा वाटेल. थोडी जास्त खात्री देईन.” “पेशंट जर मनाने खचला तर औषधेच नाही तर माझे उपचार आणि वैद्यकीय शास्त्रही काही करू शकणार नाही. पेशंटने उभारी धरली पाहिजे.” असे म्हणत डॉक्टर गेले.

सुझी तिथेच बराच वेळ रडत बसली होती. पण किती वेळ असे बसणार. तोंडावरून पाण्याचा हात फिरवून, पुन्हा आपल्या मैत्रिणीसाठी तिने स्वत:ला सावरले. चित्रे काढायचे सामान घेऊन शीळ वाजवत जॉन्सीच्या खोलीत आली. जॉन्सी अजूनही झोपली होती. पलंगावर झोपलेली पण कसलीच हालचाल दिसत नव्हती. खिडकीकडे तिचे तोंड होते. ती झोपलेली पाहून सुझीने शीळ वाजवणे थांबवले. मासिकाला द्यायचे चित्र काढायला बसली. लेखक आणि चित्रकार दोघांच्याही कीर्तिचा मार्ग मासिकातूनच चालू होतो!

चित्र रेखाटण्यात गुंग झाली असताना मध्येच सुझीला जॉन्सीचा कण्हल्यासारखा आवाज ऐकू आला. ती लगेच तिच्या जवळ गेली. जॉन्सीचे डोळे चक्क उघडे होते. खिडकीबाहेरच्या भिंतीकडे पाहात ती काहीतरी मोजत होती.
ती आकडे उलटे मोजत होती. “बारा,” ती पुटपुटली. थोड्या वेळाने “अकरा;” आणि नंतर “दहा”, आणि “नऊ”. नवानंतर मात्र लगेच तिने “आठ”आणि “सात” एका पाठोपाठ एक एकदम म्हटले. सुझीने खिडकीकडे पाहिले. मोजण्यासारखे काय होते तिथे,कुणास ठाऊक? भिंतीवर एका वेलाची फांदी चढत गेली होती. भिंत चांगली वीस फूट अंतरावर. वेलाच्या बऱ्याच फांद्या सुकून गेल्या होत्या. एक फांदी मात्र अजून तग धरून होती. पानगळतीचा मोसम होता. पाने गळतच होती.

सुझीने विचारले, “काय पाहतेस तू?” “सहा,” जॉन्सी क्षीण आवाजात म्हणाली. आता भराभर पडायला लागलीत. तीन दिवसांपूर्वी तिथे शंभर तरी असावीत. मोजता मोजता माझं डोकं दुखायचं. आता सोपं झालय थोडं. बघ, आत्ता आणखी एक गेलं. सुझी, फक्त पाच उरलीत आता!”

“पाच काय उरलीत? मला तरी सांगशील ना ?” सुझी प्रेमळपणे विचारत होती. “पाने,” त्या वेलीची पानं. शेवटचं पान गळून पडेल तेव्हा मीही जाणार !” सुझी, मीही जाणार. जाणार मी आता”! तीन दिवसापासून मला माहित आहे. माझी वेळ आलीय. डॉक्टरांनी सांगितलं नाही तुला?!”

” म्यॅडकॅप आहेस का काय तू,जॉन्सी? होय गं? मी असलं कधी ऐकलं नव्हतं. ती पानं पडण्याचा तुझ्या बरं होण्याशी,न होण्याशी काही संबंध आहे का? आणि तो वेल तर तुझा आवडता आहे. तुझ्या चित्रात तो कुठे ना कुठे डोकावतोच.हो की नाही? असं काही मनात आणू नकोस. डॉक्टर इतकंच म्हणाले की तुला बोलतं कर. काढून टाक हे खूळ डोक्यातून.”
सुझी आता थोरल्या बहिणीसारखी सांगत होती जॉन्सीला.

मग सुझीच पुन्हा म्हणाली,” हे बघ मी तुला चांगलं, गरम गरम सूप करून आणते. ते घे. शांत पडून रहा. अगं मला ते चित्र उद्या संपादकाला द्यायचय. आपल्याला पैसे मिळतील. येताना आमच्या वेडाबाईसाठी पोर्ट वाईन आणेन आणि माझ्यासाठीही काहीतरी खायला आणेन. आणि हे बघ, कसलाही वेडा वाकडा विचार आणायचा नाही हं”
सुझी, जॉन्सीला थोडे खुलवण्यासाठी उत्साहाने बोलत होती. पण….

“हे बघ,सुझी, काही आणू नकोस माझ्यासाठी ती वाईन आणि फायीन,” जॉन्सी समोरच्या भिंतीवरच्या फांदीकडे टक लावून पाहात म्हणाली.” “ते पहा, अजून एक पान खाली पडले. नको मला सूपही नको. आता फक्त चारच राहिलीत. अंधार पडायच्या आत शेवटचे पानही पडलेले मला पहाचंय. म्हणजे मीही जाईन.” जॉन्सी खोल गेलेल्या आवाजात म्हणत होती.
” जॉन्सीच्या अगदी जवळ जाऊन सुझी तिचे डोके थापटत हळू आवाजात म्हणाली,”जॉन्सी, माझी शपथ आहे. तू डोळे मिटून झोप. आणि त्या खिडकीतून बाहेर अजिबात पाहायचं नाही. मला थोडा उजेड पाहिजे आहे चित्र काढताना म्हणून, नाहीतर मी खिडकी लावून पडदाही लावून टाकला असता.” ” तू त्या खोलीत जाऊन काढ ना?” थंडपणे जॉन्सी म्हणाली.
“नाही.मी इथेच बसणार चित्र काढत. तुला मी त्या खिडकीकडे पाहू देणार नाही.” सुझीही ठामपणे म्हणाली.

“बराय, पण तुझं संपल्यावर सांग मला.” जॉन्सी किंचित समजुतीने म्हणाली. तिने डोळे मिटून घेतले. “कारण ते शेवटचे पान पडताना मला पाहायचंय. मी वाट पहून थकले. मृत्यु किती लवकर येईल त्याची मी वाट पहाते आहे.” जॉन्सी निकराने म्हणाली. ” हे बघ तू झोप. मी बेहर्मनकडे खाली जाते. जाते आणि लगेच येते. त्याला मॉडेल म्हणून घ्यायचे आहे मला चित्रासाठी. मी आलेच. मी येईपर्यंत तिकडे तोंड करून झोप. हलू नकोस.” सुझी निराश आणि खचून गेलेल्या जॉन्सीच्या बोलण्याकडे लक्ष न देता म्हणाली. ती खाली गेली.

तळमजल्यावर बेहर्मन रहात होता. साठी ओलांडली होती त्याने. अशक्तही होता. चित्रकार म्हणून मात्र त्याला थोडेसेही यश मिळाले नाही. ज्या चित्रकारांना व्यावसायिक मॉडेल्स परवडत नसत ते बेहर्मनला घेत असत. रस्त्यात वाटतात अशा जाहिरातीची लहानसहान कामे मिळायची तेव्हढीच. कशी तरी हाता तोंडाची गाठ घालत होता बेहर्मन. पण नेहमी तब्येतीत बोलायचा. दारुही प्यायचा. पण स्वभावाने चांगला आणि मनाने कणखर. त्याला कुणी लेचापेचा आवडत नसे. सगळ्यांना जमेल तशी मदत करायचा. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सुझी आणि जॉन्सीचा तर तो पालकच होता जणू. त्याच्या खोलीत गेल्यावर चित्र काढायचा फळा ठेवायच्या घोडीवर एक कॅनव्हास दिसेल. बेहर्मन नेहमी म्हणायचा,” एक दिवस माझे तुम्हाला मास्टरपीस चित्र दिसेल.सर्वोत्कृष्ट! सुरु करणार आहे काढायला. पहात राहाल असे चित्र दिसेल या कॅनव्हासवर तुम्हाला. हसण्यावारी नेऊ नका. थोडी वाट पहा. या कामातून मोकळा झालो की करतोच सुरुवात.” अजूनही तो कॅनव्हास कोराच होता. रंगाची एक रेषही ओढली नव्हती.

सुझी त्याच्याकडे आली. तिने जॉन्सीची मनस्थिती सांगितली. तिच्या डोक्यातले आत्मघातकी विचारही सांगितले. ते ऐकल्यावर बेहर्मन मोठ्याने म्हणाला,” वेडी का खुळी,जॉन्सी? अरे हे कसले विचार? वेलाची पाने पडताहेत म्हणून ती मरणार? त्या जॉन्सीला झालय तरी काय? मी तर असलं कधी ऐकलं नव्हतं.” ” बेहर्मन, जॉन्सी फार आजारी आहे. डॉक्टरांनी तर आशा सोडली आहे.आणि तिच्या डोक्यात असले विचित्र खूळ शिरलेय.” सुझीचे बोलणे ऐकून म्हाताऱ्या मॉडेलला वाईट वाटले. “जॉन्सी अणि तुझ्यासारख्या मुलींसाठी यापेक्षा चांगली जागा पहिजे. माझ्या डोक्यात असलेले चित्र झाले की आपल्याला भरपूर पैसा मिळेल. मग आपण तिघेही महालासारख्या घरात राहू! चल.” बेहर्मन बापाच्या अंत:करणातून बोलत होता.

दोघेही वर आले. जॉन्सी झोपली होती. सुझीने बेहर्मनला दुसऱ्या खोलीत आणले. खोलीच्या खिडकीतून दोघांनी भीत भीतच बाहेर पाहिले. मग दोघे एकमेकाकडे काही न बोलता पाहात राहिले. बाहेर अजूनही पाऊस पडत होता. मध्येच बर्फही पडत होता. पाऊस आणि बर्फ थांबायची चिन्हे दिसत नव्हती.
बेहर्मन मॉडेलच्या जागी बसला. सुझीचे काम चालू झाले.

सुझी सकाळी जागी झाली. जॉन्सीच्या खोलीत गेली. जॉन्सी जागीच होती. खिडकीकडे डोळे लावून त्या अंगावर झोपली होते.लगेच जॉन्सी म्हणाली,”सुझी, खिडकी उघड बरं” मोठ्या नाखुशीने सुझीने खिडकी उघडली. वारा पाऊस रात्रभर चालूच होता. त्याला तोंड देत त्या वेलाचे पान टिकून होते. जॉन्सीचे ते पान तोंडपाठ झाले होते. देठाशी अजूनही हिरवट. पानाच्या दातेरी कडा पिवळसर तपकीरी… वेलाला धरून होते.

“हे अखेरचे राहिलेले. शेवटचे. मला वाटले रात्रीच पडले असणार. आज पडेल. पडणारच. ते पान गिरक्या घेत पडेल आणि इकडे मी खोल खोल अंधाऱ्या दरीत तशाच गिरक्या घेत कोसळेन ! आम्ही दोघंही एकदमच जाणार.”
तिचे बोलणे ऐकून पाणावलेल्या डोळ्यांनी सुझी तिच्या जवळ गेली. “जॉन्सी, अगं माझा तरी थोडा विचार कर. मी काय करू मग?” जॉन्सी काही बोलली नाही.

दिवस संपत आला. ‘संध्याछाया दोघींच्या भिववीत हृदया’ पसरू लागल्या. अंधार ही मागोमाग आलाच. बरे झाले सुझीने लागलीच खिडकी लावून घेतली ते. रात्री पाऊस पडत होता. पण जोराचा नव्हता. पण वारा वहातच होता. वळचणीतून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज रात्रभर ऐकू येत होता.

पहाट हो ऊन झुंजुमुंजु झाल्यावर जॉन्सीने सुझीला खिडकी उघडायचा जणू हुकुमच सोडला. सुझी सूप करत होती. धावत आली. खिडकी उघडून सुझी पुन्हा आत गेली. जॉन्सीने त्या प्रकाशात डोळे मोठे करून पाहिले. ते शेवटचे पान अजूनही होते! जॉन्सी बराच वेळ पाहात राहिली. तिने सुझीला पुन्हा हाक दिली. “मी खरीच वेडी झाले होते ना गं? ते पान आजही आहे. मी तुला किती त्रास दिला ते सांगण्यासाठीच ते अजूनही आहे. मरणाचे विचार डोक्यात येणे पापच आहे. सुझी मला थोडे सूप दे. आणि हो, माझ्यासाठी पोर्ट वाईनही आण.दुधातून थोडी घेईन मी. पण ते राहू दे. अगोदर मला आरसा दे. माझ्या पाठीशी आणि डोक्याखालीही अजून उशा दे. तू काय करतेस ते, मी सूप घेता घेता बघत बसते. सॉरी सुझी.मी तुला फारच छळलं”जॉन्सी पुन्हा म्हणाली,”सुझी, मी नक्की बे ऑफ नेपल्सची चित्रे करणार !”

दुपारी डॉक्टर आले. जॉन्सीला तपासले. ते निघताना त्यांच्या बरोबर नेहमीप्रमाणे सुझीही गेली. ” मी आता पन्नास पन्नास टक्के म्हणेन. सुझी , तू खूप काळजी घेतलीस म्हणून हे शक्य झाले. आणि मला खाली अजून एक पेशंट बघायचाय. म्हातारा आहे.तोही चित्रकार किंवा असाच काहीतरी आहे. त्यालाही अगदी तीव्र न्युमोनिया झाला आहे. अगोदरच म्हातारा,अशक्त आणि त्यात हा न्युमोनिया. मी त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे.तिथे जास्त काळजी घेतील त्याची.” इतके म्हणून डॉक्टर गेले.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले. जॉन्सीला तपासले. सुझीला म्हणाले”आता ती सुखरुप बाहेर आली आहे! तू जिंकलीस, सुझी! आता फक्त तिला चांगले खाऊ घाल आणि थोडे दिवस नेहमीची काळजी घ्यायची. बस्स इतकेच !” डॉक्टरांनाही आपला पेशंट बरा झाल्याचा आनंद असतोच की.

दुपार उलटून गेली. सुझी जॉन्सीच्या पलंगापाशी आली. जॉन्सी पलंगाला टेकून बसली होती. काहीतरी विणत होती. सुझी
तिच्या गळ्याभोवती आपला हात घालत म्हणाली, ” जॉन्सी, अगं तुला सांगायचय मला काहीतरी. आपला बेहर्मन आज हॉस्पिटलमध्ये न्युमोनियाने गेला! दोनच दिवस आजारी होता. रखवालदाराला, बेहर्मन त्याच्या खोलीत गारठून पडलेला दिसला. त्याचे बूट कपडे बर्फामुळे ओले झाले होते म्हणे. कुणाला कल्पना नव्हती हा इतक्या बर्फात, त्या थंडीत रात्री, कुठे आणि काय करत होता ते ! नंतर त्यांना त्याचा कंदिल दिसला.कंदिल अजून जळतच होता. शेजारी शिडीही होती.

आजुबाजुला ब्रश पडलेले, पॅलेटवर हिरवा, पिवळा असे रंगही कालवलेले होते. जॉन्सी, वेलाचे ते शेवटचे पान पहा. इतका वारा पाऊस पडत असतानाही ते हलत नव्हते. लक्षात नाही आले तुझ्या? जॉन्सी ! ते पान ! आपल्या बेहर्मनचे मास्टरपीस आहे ! त्या रात्री वेलीचे शेवटचे पान पडून गेल्यावर त्याने ते रंगवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *