भेटलेले साधे महाराज

माझी औरंगाबादला बढतीवर बदली झाली. तेव्हा जळगावचे माझे मित्र डाॅ. खटावकर ह्यांनी औरंगाबादच्या जयशंकर महाराजांना एकदा भेटा असे सांगितले होते. कामाच्या गडबडीत व पत्ता नेमका माहित नसल्यामुळे मी काही जयशंकरमहाराजांना भेटू शकलो नव्हतो. कामानिमित्त जळगावला गेलो. डाॅ. खटावकरांशी कामाचे बोलणे झाल्यावर मी निघालो. निघताना मीच म्हणालो, “ डाॅ., जयशंकर महाराजांना कुठे भेटायचे? पत्ता माहित नाही. ते म्हणाले,” औरंगपुऱ्यात आहेत. कुणाचा वाडा ते नेमके माहित नाही.” मी शोधून काढतो,इतके म्हणून दौरा संपवून औरंगाबादला आलो. आल्यावर नुकतेच ओळख झालेले व पुढे चांगले घरोब्याचे मित्र झालेले अनंतराव देशपांड्यांना जयशंकर महाराजांचा पत्ता विचारला. त्यांनी अंदाजाने सांगितला.

मी गेलो. ते राहात होते त्या वाड्यात गेलो. जुना वाडा. मोडकळीला आला नव्हता तरी तसा वाटत होता. आत गेल्यावर बाजूच्या ओवरीत छपरापर्यंत सरपणाची लाकडे भरून ठेवलेली. आजूबाजूलाही काही पडलेली. त्यातच एका कोपऱ्यात, बाजेवर थोडीशी वाढलेल्या पांढऱ्या दाढीचे म्हातारे गृहस्थ झोपलेले होते. तोंडात दातही फारसे नविहते. पण चेहरा हसरा होता.त्या काळात सर्रास वापरात असलेली चट्यापट्याची नाडीची अर्धी चड्डी घालून झोपलेले म्हातारे गृहस्थ दिसले. मी आत गेल्याबरोबर ते हसऱ्या चेहऱ्याने “जयशंकर”म्हणून गप्प झाले.

थोड्या वेळाने आतल्या बाजूने श्री.दातार व सौ.दातार आल्या. त्यांनी माझी चौकशी केली. दातार राज्य सरकारी नोकरीत साध्या पदावर असावेत. दोघे पतिपत्नी शांत,सौम्य पण समाधानी दिसत होते. हे जयशंकरमहाराजांची काळजी घेत होते. मी वारंवार नाही तरी काही वेळा जयशंकरमहाराजांना भेटून येत असे. ते माझी कसे काय चाललंय, मुलांची चौकशी करायचे. पण जयशंकर म्हणण्यात ते रमत असावेत असे वाटले. मध्येच ते मोठ्याने जयशंकर म्हणत. काही वर्षानंतर दातारांनी जागा बदलली व सरस्वती काॅलनीत राहायला आले. ही जागा जास्त प्रशस्त,मोकळी व व्यवस्थित होती. मी जयशंकरमहाराजांना भेटायला जाई तेव्हा दोघेही दातार सौम्य हसत स्वागत करीत. महाराजांपेक्षा अर्थात त्यांच्याशीच जास्त बोलणे होई. एकदोन वेळा मी सुधीरला घेऊन गेलो होतो. सुधीरला पाहून जयशंकरमहाराजांना आनंद झाल्याचे दिसत होते. त्याला ते जवळ बसवून पाठीवर किंवा डोक्यावर हात फिरवत.

अनंतराव देशपांडेसाहेबांनी मला जयशंकर महाराजांविषयी माहिती सांगितली ती ऐकण्यासारखी आहे. ती ऐकल्यावर जयशंकर महाराज महाराज का हे पटू लागले. ते सांगत होते,” मेवाड हाॅटेलचा मालक जयशंकरमहाराजांना रोज सकाळी हाॅटेलात घेऊन जात असे. आजही जात असतील कदाचित. तिथे त्यांना गल्ल्यावर बसवित. जेव्हढा वेळ ते हाटेलात गल्ल्यावर असत तोपर्यंत ते येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला गल्यातून पैसे देत. ते कुणाला किती देत तिकडे मेवाडचे मालक पाहात नसत. मग महाराज म्हणाले निघायचे की मालक त्यांना घरी आणून सोडत असे. हे किती तरी वर्षे चालू होते. आजही असेल कदाचित. रोज नसेल पण केव्हा तरी तो महाराजांना घेऊन येत असेलही.” मेवाड हाॅटेलच्या बरकती मागे जयशंकर महाराजांच्या कृपेचाही मोठा भाग असणार.

ही १९७२-७५ व त्यानंतरच्या काही वर्षातील हकीकत आहे. जयशंकरमहाराजांची सर्व प्रकारे काळजी दातार दांपत्याने मनापासून घेतली. जयशंकरमहाराजांनी मेवाडच्या हाॅटेल मालकाच्या श्रद्धेला किती सफळ सुफळ केले असेल त्याची इतर काही माहिती नाही. पण त्यांचे आणखी एक हाॅटेल सुरू झाले. गुलमंडीवरचे रेस्टाॅरंट जोरात चालतच होते. हे मात्र पाहिले आहे.

माझ्या बाबतीत काहीही चमत्कार घडला नाही. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असे तेव्हा एकदाही माझ्या मनांत त्यांनी मला हे मिळवून द्यावे, असे घडावे असला विचार कधीही येत नसे.बहुधा,मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला ते महाराज वगैरे काही वाटले नव्हते. ह्यामुळेही कदाचित मला त्यांच्याकडे काही मागावे असे वाटले नसेल! पण मला बरे, शांत वाटत असे हे खरे. मी फक्त त्यांना भेटल्यावर व निघतांना नमस्कार करीत असे. ते फक्त नेहमी हात वर केल्यासारखा करून हसतमुखाने जयशंकर म्हणत.

अनंतराव देशपांडे ह्यांनी अशीच हकीकत बाळकृष्ण महाराजांसंबंधी सांगितली होती. औरंगाबादच्या अप्पा हलवाईंचा प्रसिद्ध पेढा हा बाळकृष्णमहाराजांचा कृपाप्रसाद आहे असे देशपांडेसाहेब म्हणाले होते. बाळकृष्णमहाराजांची समाधी अप्सरा टाॅकीजसमोरच्या भागात आहे. तीही मी जाऊन पाहिली.

हे लिहित असता एक लक्षात आले आणि ते आल्यावर माझ्या हातून केव्हढी मोठी चूक झाली, केव्हढा अपराध घडला ह्याची जाणीव झाली. शंभर थोबाडीत मारून घ्याव्यात असे वाटले. सुरवातीला तरी मी बरेच वेळा दातार साहेबांच्या घरी जयशंकर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो असेन. पण मी त्या दोघांना एकदाही ,” आमच्या घरी चहाला या.” असे म्हणालो नाही! आता मी माझे मलाच ‘करंट्या’ शिवाय काय म्हणणार!

त्या दोघांनी कित्येक वर्षे जयशंकरमहाराजांची सेवा करण्यात व्यतीत केली असल्यामुळे दातार मला उदार मनाने क्षमा करतील अशी प्रार्थना करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. जयशंकर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *