शर्यत

एक मुलगा होता. अत्यंत जोरात पळायचा. उत्तम धावपटू होता. शर्यतीत भाग घ्यायची तीव्र इच्छा होती. त्याचे आजोबा होते. त्यांनाही नातवाचे कौतुक होते.


दुसऱ्या गावात पळण्याची शर्यत होती. मुलाने त्या शर्यतीत भाग घेतला. गावातल्या मुलांबरोबर तो गेला.आजोबानाही राहवले नाही. नातवाची शर्यत पाहायला तेही त्या गावात पोचले.


नातवाच्या बरोबर दोघे स्पर्धक होते. शर्यत सुरु झाली. नातू आणि एक मुलगा चांगल्या वेगाने पळत होते. तिसरा मागे पडू लागला. हे दोघे अटीतटीने पळत होते. लोक श्वास रोखून पाहात होते. कोण जिंकेल ह्याची उत्सुकता वाढत होती. आजोबा शांत होते. नातवाने शर्यत जिंकली. लोकांनी मोठ्या आनंदाने आरोळ्या ठोकून शिट्या टाळ्या वाजवून मुलाचे कौतुक केले. मुलाची मान ताठ झाली. स्वत:च्या पराक्रमाने त्याची छाती फुगली.आजोबा शांत होते. त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवून कौतुक केले.

दुसरी शर्यत जाहीर झाली. ह्या खेपेला दोन नव्या दमाची ताजीतवानी मुले नातवाबरोबर शर्यत खेळायला उतरली. नातू पहिल्या विजयाने अधिकच जोमात आला होता. शर्यत सुरू झाली. दोन्ही नवे धावपटू जोशात होते. त्यांनी नातवाला मागे टाकायला सुरुवात केली. आजोबा पाहात होते. नातू आता इरेला पेटला. सगळे कौशल्य शक्ति पणाला लावून धावू लागला. तिघे जातिवंत धावपटू एकाच रेषेत बरोबरीने पळू लागले. अंतिम रेषा जवळ येऊ लागली. नातवाने मान खाली घालत जोरदार मुसंडी मारून अंतिम रेषा लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ओलांडली. किती वेळ टाळ्या शिट्या वाजत राहिल्या होत्या! नातू धापा टाकत होता. जग जिंकल्याच्या ताठ्यात उभा होता. आजोबांच्या जवळ येऊन उभा राहिला. आजोबांनी शाबासकी दिल्यासारखा त्याच्या पाठीवर हात थापटला.

नातू ‘इजा बिजा आणि आता तिजा’ जिंकण्याच्या इर्षेने,“पुन्हा एक शर्यत होऊ द्या !” म्हणून ओरडू लागला. आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवित त्याला शांत करीत ते पुढे गेले. ह्या खेपेला आजोबांनी पुढाकार घेऊन एक अशक्त, दुबळी म्हातारी व एका आंधळ्याला शर्यतीत उतरवले. नातू थोड्या घुश्शातच म्हणाला,”आजोबा! ह्यांच्याशी मी, मी,ह्यांच्याशी शर्यत खेळू?” आजोबांनी एकाच शब्दात त्याला सांगितले,” खे-ळ.”

शर्यत सुरू झाली. मुलगा जरा घुश्शातच होता. त्याच्या वेगाने धावत सुटला. अंतिम रेषा पार केली. शर्यत जिंकली. दोन्ही हात वर करून ओरडत नाचू लागला.लोक गप्प होते. ना टाळ्या ना शिट्या ऐकू येत होत्या. मैदान शांत होते. अशक्त दुबळी म्हातारी मोजून एक दोन पावलेच पुढे आली होती. आंधळा जागीच उभा होता. नातवाचा चेहरा पडला होता.आजोबाजवळ आला. ,” मी शर्यत जिंकली पण लोक आनंदाने ओरडले नाहीत की टाळ्या वाजवून कौतुक केले नाही!” आजोबा शांत होते. ते नातवाला घेऊन पुन्हा शर्यतीच्या प्रारंभ रेषेकडे गेले. त्यांनी नातवाला त्या दोघा स्पर्धकाकडे तोंड करून उभे केले. काहीही न बोलता आजोबा हळू हळू आपल्या जागी गेले. नातू सुरुवातीच्या रेघेवर उभा राहिला.

शर्यत सुरु झाल्याचा इशारा झाला.सुरुवातीला सवयीने नातू पळणारच होता. एक दोन पावले त्याने तशी जोरात पुढे टाकलीही. पण लगेच तो दुबळ्या म्हातारीच्या व आंधळ्या माणसाच्या मध्ये जाऊन उभा राहिला.त्याने त्या दोघांचे हात धरले. तो त्यांच्या बरोबरीने चालू लागला. तिघेही चालू लागले. हलकेच एक दोन टाळ्या वाजल्या. मग तिघांच्या पावलांच्या ठेक्यावर त्या वाजू लागल्या. तिघांनीही हात धरून अंतिम रेषा ओलांडल्यावर कौतुकाच्या टाळ्यांचा पाऊस पडू लागला. लोक आनंदाने नाचू लागले.

“आजोबा,कुणासाठी टाळ्या वाजवताहेत लोक? कुणी जिंकली शर्यत? “ नातू विचारत होता. “ बाळा, लोक शर्यतीला टाळ्या वाजवताहेत.” आजोबा शांपणे म्हणाले. “बाळ तू जोरदार धावतोस. शर्यती जिंकतोस. पण फक्त शर्यत जिंकण्यालाच महत्व नाही. शर्यत कशी पळतोस ते महत्वाचे आहे. आयुष्यात शर्यत जिंकणे हेच एक सर्वस्व नाही. ह्या शर्यतीत दीन दुबळ्यांना आधार देत पळणे हीच जिंकण्याहून मोलाची गोष्ट आहे.”

(इंटरनेट वरील एका लहानशा इंग्रजी बोधकथेवरून ही विस्तारित कथा केली.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *