सुगीहारा

१९३९ सालची ही गोष्ट आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते . युरोपच्या इतिहासातील हा काळ म्हणजे एक काळेकुट्ट प्रकरण आहे.

ह्या काळात जपानच्या सरकारने केवळ ज्यू लोकांनाच नव्हे तर इतर कोणालाही सरकारच्या परवानगीशिवाय आपल्या कोणत्याही वकिलातीने व्हिसा देऊ नये असा हुकूम काढला होता.पण…

लिथ्वानिया येथील जपानी वकिलातीतील चिउने सुगीहारा एक अधिकारी. हा मात्र येईल त्या ज्यूला व्हिसा देत होता.नाझींच्या गॅस चेंबर,छळ छावण्या ह्यापासून कित्येक ज्यू लोकांना ह्या कनवाळू जपानी अधिकाऱ्याने वाचविले. दुसरे महायुद्ध संपल्यावर काही वर्षे माणुसकी जपणाऱ्या सुगीहाराचे नावही कुणासमोर आले नव्हते. मग त्याने केलेल्या कार्याची माहिती तरी कोणाला होणार? पण काळ स्थिरावल्यावर सुगीहाराने ज्यांचे प्राण वाचवले होते ते लोक आपण कसे वाचलो आणि कुणामुळे वाचलो हे वर्तमानपत्रे, रेडिओ अशा माध्यमातून सांगू लागले तेव्हा चिउने सुगीहाराचे नाव थोड्याच काळात सर्वतोमुखी झाले. अनेक पुस्तकांतून सुगीहाराचा उल्लेख ‘जपानी शिंडलर असा होवू लागला.

इझ्रायलच्या सरकारने, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांना आश्रय देऊन, इतर मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या सुगीहारासारख्या तारणहारांचे ऋण फेडण्याचे ठरवले. त्यापैकी अनेकांना, त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा गौरव म्हणून आयुष्यभर निवृत्ती मानधन दिले आहे. आणखी एका प्रतिकरूपाने इझ्रायलने कृतज्ञता व्यक्त केली. त्या तारणहारांच्या नावाने वृक्षारोपण केले आहे.

सुगीहाराच्या नावानेही वृक्षारोपण करण्याचे ठरवले. प्रथम त्याच्या नावे चेरीची झाडे लावण्याचे सरकारच्या मनात होते. पण चेरीपेक्षाही दीर्घायुषी वृक्षांची राई लावून करण्याचे योजले. त्यामुळे सुगीहाराचा योग्य प्रकारे सन्मान होईल ही त्यामागची भावना होती.सुगंधी देवदार==सेडर्= वृक्षाशिवाय दुसरे कोणते डोळ्यांसमोर येणार? शिवाय सेडर वृक्षाचे महत्व ज्यू धर्मात मोठे आहे. त्यांचे जे अगदी पहिले सिनेगॉग आहे तेथेही सेडर वृक्षच लावले होते. म्हणून सुगीहाराचा गौरव देवदार वृक्षांच्या मोठ्या राईने करण्याचे ठरले आणि तशी ती झाडीही लावली. ह्यापेक्षा दुसरा कोणता मोठा सन्मान असेल?

योगायोग पहा, ही सेडर वृक्षांची राई लावून झाल्यावर इझ्रायली अधिकाऱ्यांना समजले की जपानी भाषेत ‘सुगीहारा’म्हणजे सेडर वृक्षांची राई असाच होतो!

सुगीहारा’सेडर वृक्षांचे’ उपवन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *