टॉम स्टोनहिल सलग चार तास मोटार चालवत होता. वाटेत कुठेही थांबला नव्हता. अजून बरेच अंतर कापायचे होते. पण त्याला कुठेतरी थांबणे भागच होते; इत्क्या घाईची त्याला जोरात लागली होती. वाटेत बरेच पेट्रोल पंप लागले होते तेव्हाच थांबलो असतो तर? पण आता असे म्हणून काही उपयोग नाही अशी टॉमने स्वत:ची समजूत घातली.
रात्र बरीच झालीहोती. आणि थांबवतही नव्हते. वाटेत एक लहान गाव दिसले. त्याने मोटारीचा वेग वाढवला. तो भलताच जोरात जाऊ लागला. इतक्यात पोलिसांची गाडी पाठीमागे आलीच. थांबणे भागच होते. पोलिसाने अर्थातच चौकशी केली.लहान गाव दिसले म्हणून नियम तोडायचे का असेही विचारले. टॉम अगदी केविलवाण्या चेहऱ्याने खरे कारण सांगू लागला. “इथे कुठे सोय आहे क?” असे विचारले. टॉमचा चेहराच त्याची अडचण सांगत होता. पोलिसाने त्याला, सरळ जाऊन एखादे दुकान उघडे असेल तर पहा म्हणत टॉमला जाऊ दिले. टॉमला पुढे एके ठिकाणी दिवा दिसला. चोवीस तास उघडे असणारे दुकन मिळाले म्हणत टॉम पुढे जाऊ लागला. पण जसे तो जवळ जवळ गेला तेव्हा त्याला समजले की अरे ही तर अंत्यविधीची इमारत आहे. “अंत्यविधी तर अंत्यविधी! इथे मलाही मरणप्राय होतेय” असे काही तरी मनात म्ह्णत तो आत गेला.
आत गेल्यावर त्याचे मोकळेपणे चांगले या! या! झाले.”या! इथे नाव लिहिता का?'” असे तिथल्या डायरेक्टर गिफर्डने विचारले. मला फक्त शौचालयात जायचेय हो!” असे टॉम मोठ्या काकुळतीने म्हणाला.”जरूर जा, इथे सोय आहे. पण आधी नाव लिहिल्यास बरे होईल”. गिफर्डने नम्रपणे टॉमला आज्ञा केली. टॉमने रजिस्टरमध्ये नाव लिहिले.”कुणीकडे , तिकडे जायचे का?”असे गिफर्डला विचारून तो दोन पावले पुढे गेला. पण गिफर्डने लक्ष न देता ,”तुमचा पूर्ण पत्ता लिहा आणि सही करा असे सौजन्यपूर्वक सुनावले.
साध्या नैसर्गिक विधीसाठी अंत्यविधीच्या कार्यालयात इतके नियम आणि कायदे? असे टॉमच्या मनात आले.”अहो पण मला केवळ शौचालयात जायचे आहे, त्यासाठी नाव, पत्ता, सही, टेलिफोन नंबर इतकी माहिती द्यावी लागते?” टॉमने न राहवून अखेर विचारलेच. पण त्यावर ,”सर, कृपा करून तेव्हढी माहिती लिहा रजिस्टरमध्ये, इतकेच गिफर्ड शांतपणे म्हणाला. टॉमने पत्ता वगैरे तपशील भरला. गिफर्ड त्याला शौचालय कुठे आहे तिकडे घेऊन निघाला.
टॉम मोटारीत बसण्या आधी त्याने तिथल्या दफनभूमीतील मृतात्म्यांना मान लववून नमस्कार केला. बाहेर मोटारीकडे निघाला तिथे मघाचाच पोलिस उभा! टॉमने गिफर्डचे मनापासून आभार मानले आणि पोलिसाचेही. दोघांकडे पहात हात हलवून तो मोटारीत बसला.
तीन आठवड्या नंतर, टॉमला फोन आला. फोनवरच्या गृहस्थाने टॉमला आपली ओळख करून देताना माहिती दिली. “तुम्ही काही दिवसांपूर्वी ज्या अंत्यविधी करण्याच्या संस्थेत गेला होतात, त्या संस्थेचा मी वकील आहे. ह्या गुरुवारी दुपारी दोन वाजता माझ्या ऑफिसमध्ये या.” टॉम हादरला. हे काय नवीन लचांड पाठीमागे लागले? घाबरून त्याने विचारले,” माझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? येताना माझ्याबरोबर वकील आणावा लागेल का? “नाही तसे काही नाही. पण वेळेवर या.,” इतके बोलून वकीलाने टॉमला आपला पत्ता दिला.
त्यानंतरचे दोन चार दिवस टॉमला चैन पडत नव्हते. त्याचे मन वकीलाचा फोन आल्यापासून थाऱ्यावर नव्हते. तो सतत त्या रात्रीच्या प्रसंगाचा, तो पोलिस दोनदा भेटला, माझ्या मागावरच होता की काय? अशा विचारांनी हैराणझाला होता.
गुरवार उजाडला. टॉम मानसिक तणावाखालीच वकीलाच्या ऑफिसमध्ये आला. बाहेर वकील उभाच होता.दोघांनी एकमेकांची ओळख करून झाली. टॉमला वकील आपल्या खोलीत घेऊन गेला. तिथे डायरेक्टर गिफर्ड आणि तो पोलिस दोघेही हजर होते! टॉमला घाम फुटण्याच्या बेतात होता. या बसा झाल्यावर वकील टॉमकडे पाहत बोलू लागला,”स्टॅन्ले मरोचे इच्छापत्र वाचून दाखवायचा अधिकार कोर्टाने मला दिला आहे. ” वकीलाने अंत्यविधीच्या संस्थेचे रजिस्टर उघडले आणि डायरेक्टर गिफर्डला त्या रात्री रजिस्टरमध्ये सही करणारे गृहस्थ हेच का?” असे टॉमकडे बोट दाखवून विचारले. गिफर्ड हो म्हणाल्यावर टॉमकडे बघत वकीलाने बोलण्यास सुरुवात केली…..
“मला वाटते स्टॅन्लेची तुम्हाला काहीही माहिती नाही. स्टॅन्ले मरो हा खूप श्रीमंत होता.. जवळपास संपूर्ण गाव त्याच्या मालकीचे होते. पण तो एकटा होता. गावातल्या कोणालाही तो आवडत नव्हता. गावातल्या सर्व घरांचे दरवाजे त्याला बंद होते. त्याच्यावर जणू बहिष्कार टाकला होता. मरोने त्याच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी माझी नेमणूक केली. इतले लहान मृत्युपत्र माझ्या पाहण्यात नाही. मी ते वाचून दाखवतो.”
” गावातील कुणालाही माझ्याविषयी प्रेम नाही. म्हणून जो कोणी माझ्या अंत्यसंस्कारासाठी येईल त्याला माझ्याविषयी थोडी तरी आस्था असणार.आस्था असो की नसो, तो आला तरी; एखादे वेळेस त्याला माझी माहितीही नसेल; त्याने दाखवलेल्या अल्पशा का होईना माझ्याविषयी व्यक्त केलेल्या आस्थेमुळे माझी सर्व स्थावर जंगम रोख मालमत्ता त्याला द्यावी. एका पेक्षा जास्त हजर असल्यास त्या सर्वांमध्ये समान वाटून द्यावी..” वकील टॉमकडे पाहात पुढे म्हणाला,”स्टॅन्लेच्या अंत्यसंस्काराला येणाऱ्यांची ह्या रजिस्टरमध्ये फक्त तुमच्या एकाचीच नाव, पत्ता, सहीनिशी नोंद असल्याने स्टॅन्ले मरोच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्याची सर्व संपत्ती तुम्हाला मिळत आहे.”
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]