दमलो होतो थकलो होतो …

मला पंढरपुरची पायी वारी करण्याची बरेच वर्षापासून इच्छा होती. पण तसा योग येत नव्हता. मी तसा ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर सासवडपर्यंत बरेच वेळा जात असे. त्यातहीमोठा आनंद होता.मला स्वत:ला मात्र दुधाची तहान ताकावर भागवली असे वाटायचे. अखेर ती संधी चालून आली. माझी पंढरपुरची पायी वारी सफळ झाली!

ही हकीकत २००७ सालची. त्यानंतरहा मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा माऊलीबरोबर सासवडपर्यंत जाउन येत असे. असाच २०१४ साली निघलो. पण हडपसरच्या पुलापाशीआल्यावर फार दमलो होतो. एक पाऊल टाकवत नव्हते. दम खाण्यासाठी पुलाखाली बसलो होतो.समोर वारी दिसत होती…..

 

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो

समोरुन वारी वाहात होती
वारकऱ्यांची पावले पळत होती
विठोबाला पाहाण्यासाठी.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

किती पावले चालत होती
गणती करता येत नव्हती!
चपला होत्या सॅंडल्स होत्या
फ्लोटर्स होते वहाणाही होत्या.
हवाई होत्या स्लीपर्स होते
बूट होते शूज होते
वाॅकर्स होते रनर्स होते
पण हे सगळे थोडे होते.
चपलाच सगळ्यात जास्त होत्या.
कोल्हापुरी होत्या कानपुरी होत्या
बऱ्याच काही अनवाणी होत्या!

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो. ।।

सलवार होती कुडते होते
टाॅप होते खमिजही होते
पॅंट होत्या जिन्स होत्या
पण सगळ्या अगदी मोजक्या होत्या
शर्ट होते टिशर्ट होते
पण सदरे पायजमे सर्वत्र होते
ओढणी होती सलवार होती
पण साड्या लुगडी भरपूर होती.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो. ।।

पटका होता मुंडासे होती
कॅप कुठे दिसत नव्हती
फेटा कुठे क्वचितच होता
गांधी टोपीचा सागर होता.
डोक्यावर तुळस होती
एखादीच्या कळशी होती.
ओझी होती बोचकी होती
पावले झपझप पडत होती।।
पोरे होती लेकरं होती
आजे होते आजी होती
काठी टेकत चालली होती
मी मात्र …

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

आवाज होता घोष होते
गजर होता गोंधळ नव्हता.
नाद होता ताल होता
टाळ मृदुंग वाजत होता
वारी अभंग म्हणत होती
दिंड्या पताका नाचत होत्या.
ज्ञानोब्बा माऊली तुकाराम तुकाराम
हा एकच मंत्र चालला होता.
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली तुकराम
हेच परवलीचे शब्द होते
सगळे वेद ह्यातच होते.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

घेणारे हात हजार होते
देणारेही तितकेच होते
विठ्ठल- प्रसाद वारीचा
आनंदाने खात होते.
सर्वच काही हसत नव्हते
पण सगळे आनंदाSत होते.
समोर वारी वाहात होती
सद्भाव वाटत चालली होती.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसून होतो.।।

वारी कधी नाचायची
मधीच थोडी थांबायची
टाळ मृदुंग दणदणायची!
लगबग होती धावपळ होती
विठोबाला भेटण्यासाठी
सागर नदीला मिळण्यासाठी
वेगात वारी चालली होती.
काठावर मी बसलो होतो
तरीही मी भिजलो होतो
आता मी उठलो होतो
चार पावले टाकीत मी
वारी बरोबर जात होतो …।।

2 thoughts on “दमलो होतो थकलो होतो …

  1. उन्मेष

    वारीचा अनुभव शब्दातून उभा झालाय्! हे लिखाण (ब्लाॅग) प्रकाशित केला तर जास्त वाचकांपर्यंत पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *