पाणी

आम्ही बसमधून उतरलो. स्टॅंडमध्ये बाजूला जाऊन बसलो. त्या दोघी आणि थोडे अंतर ठेवून तेही बसले. तिघेही गप्पच होते तसे. त्या एकमेकींशी मधून बोलत असाव्यात. हळू आवाजात. मीच म्हणाले, ” मी आपली परतीची तिकीटे काढून येते.” कोणी काही म्हणाले नाही. 

तिकीट घेऊन आले; आणि त्यांना म्हणाले, “दुपारी ४ची काढली बरं का? आज दुपारी निघायचंयआपल्याला.” “काय? आज दुपारीच? लगेच? मग आलो तरी कशाला इथं आपण ? “  ” पण निघतानाच हे ठरलं होतं आपलं.” मी म्हणाले. ” मला कुणी विचारलं नाही, की सांगितलंही नाही!” ते रागानेच म्हणाले. “ह्या दोघींनी मला सांगितलं तसं मी केलं. मला वाटले तुम्हाला माहित आहे सगळे.” ” अगं, त्या बोलतात का माझ्याशी कधी? तुला माहितेय हे सगळं.”ते चिडूनच बोलत होते. आणि रागारागाने दूर जाऊन बसले. हे असे बऱ्याच वेळा होते. घरातही रागवारागवी झाली की ते कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसतात. मी म्हणाले,” मी आले तिकीटं परत करून. उद्या सकाळी काय ते ठरवू.” म्हणत मी निघाले. त्या दोघी काहीही बोलल्या नाहीत. मी परत आले. त्या दोघींजवळ बसत म्हणाले,” तुम्ही त्यांना काहीही सांगितले नाहीत, बोलला नाहीत? आताही काही म्हणाला नाहीत दोघीजणी तुम्ही!” ” अगं, काय बोलायचं त्याच्याशी? आणि का बोलायचं? तुला माहित नाही तो आमच्याशी कसा वागत होता ते.”  ” मी कधी तुम्हाला विचारले नाही म्हणा. पण तुम्हीही मला  आपणहून कधी काही सांगितलं नाही.  बरं जाऊ दे ते. चला निघूया.” असे म्हणत, मी त्यांच्याकडे गेले.  बसता बसताम्हणाले, आता घरी जायचे, चला, म्हणत मी उठले. “जायचं ठरले वाटते” असे पुटपुटत तेही उठले. आम्ही

घरी आलो. संध्याकळी मी मैत्रीणींकडे गेले. रात्री आले. दोघींशी आणि मग त्यांच्याशीही बोलत बसले.

दोन तीन दिवस मैत्रिणींबरोबर मजेत गेले.सिनेमा,पार्कमध्ये, भेळ भत्ता, हाॅटेलात जाणे, सगळ्यात मजा येत होती. पण गप्पांइतकी चव कशात नव्हती. आमच्या घरीही मैत्रिणी यायच्या. दोघींशीआणि त्यांच्याशीही त्या बोलत बसत. ते तिघेही हसत, मैत्रिणींची माझी गंमत करत बोलायचे. दोन तीन दिवस छान गेले. मग तेच म्हणाले आता आपण निघूया. त्या दोघींचीही तीच इच्छा दिसली. मी म्हणाले, “माझे उद्या थोडं काम आहे. ते झालं की दुपारी निघूयात.” 

परत आम्ही इकडे आलो. इकडे आल्यावर इथले झालो. दुपारी बोलत बसलो होतो. त्या दोघी त्यांच्या जागी. ते त्यांच्या सोफ्याच्या खुर्चीत. मी माझ्या ठरलेल्या खिडकीपाशी.काही वेळ त्या दोघींच्या जवळ तर थोडा वेळ त्यांच्या बाजूला. मध्येच माझे चहा पाणी आणणे चालू होते . बोलता बोलता त्या दोघी म्हणाल्या,”दोन दिवस किती छान गेले तिकडे.” तेही पुस्तकातून वर पाहात म्हणत होते, “मलाही फार बरे वाटत होते तिथे. असे नेहमीच होते.” मी म्हणाले, “अहो तुम्ही तिघेही तर निघायचे म्हणलात की.” त्या म्हणाल्या, “अगं,तिकडे गेल्यावर इकडची आठवण येते,” त्या आणखी काही म्हणायच्या आत ते हळू आवाजात म्हणाले, “इथे आलो की तिथल्या घराची आठवण येते.” मीही थोडे थांबत थांबत म्हणत होते, “मलाही त्या घराची फाSर आठवण येते.” दोघी म्हणत होत्या,”अगं,आमचं सगळं आयुष्य त्या गावात, घरात गेले.” तेही तेच सांगत होते. तिघांचे आवाज बदलले होते. मी सांगू लागले,” अहो, मीही तिकडे येत असे. आम्ही सगळे येत असू सुट्टया लागल्या की दरवर्षी! “  ‘सगळे’ शब्द एकदम बाहेर पडत नव्हता. माझ्या एकेका हुंदक्यातून एकेक अक्षर कसे तरी येत होते. पुन्हा ‘आम्ही सगळे’म्हणू लागल्यावर मात्र माझा बांध फुटला!  डोळ्यांतले पाणी वाढू लागले. पाण्याच्या डोळ्यांनीच पाहू लागले, तिघांचेही डोळे पाण्यांनी वाहात होते. 

इतके दिवस त्या पाण्यानेच आम्हाला जवळ आणले होते! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *