रेडवुड सिटी
अशी सफर पुन्हा न होणे कधीही….
आताच मी Ted Talkवर David Baronने खग्रास ग्रहणाचा त्याचा एक अलौकिक – त्याने हाच out of this world हा शब्दप्रयोग केला – अनुभव सांगितला, तोऐकत होतो. चंद्र, सूर्याला काही क्षणात पूर्णपणे झाकणार त्या आधीच्या थोड्याच क्षणांत वातावरण कसे एकदम बदलते, सावल्याही वेगळ्या विचित्र दिसूलागतात, क्षणात अंधारुन दिवसाची रात्र कशी होते ते सांगत असताना, त्याच्यासारखाच विज्ञान वार्ताहर असलेल्या David (अरेच्या! दोघांच्या नावातही साम्य! ) Perlman ने १९६० साली सूर्य ग्रहणाच्या वृत्तांतकथेत व आताच त्याने लिहलेल्या परवाच्या लेखातील काही ओळी डोळ्यांसमोर आल्या.
David Perlman काय म्हणतो त्या अगोदर तो कोण, काय करतो, कुठे असतो हे सांगायला हवे. डेव्ह (David Perlman)हा नुकताच ११आॅगस्टलाSanFrancisco Chronicleमधून निवृत्त झाला. तिथे तो विज्ञान-विभागाचा संपादक होता. पण तो स्वत:लाआजही साधा विज्ञान-वार्ताहरच म्हणवून घेतो!
तसे पाहिले तर अनेक लहान मोठ्या, नामांकित, जागतिक दर्जाच्या ते महानगरीतल्या, मोठ्या शहरातल्या वर्तमानपत्रांत निरनिराळ्या विभागाचे, जसे, वृत्तसंपादक, रविवार आवृत्तीचे, तसेच उपसंपादकही असतात.मग डेव्हिड पर्लमनचे असे वैशिष्ठ्य काय?….
….डेव्ह हा तिथे सुमारे ८० वर्षे काम करतोय! काॅपी-बाॅय ह्या सर्वात खालच्या जागेपासून त्याची कारकीर्द सुरू झाली ! आणि त्या नंतर मात्र आपल्या अंगच्यागुणांवर चढत चढत संपादक या मानाच्या पदावरून निवृत्त होत आहे. वयाच्या ९८व्या वर्षी! आज अमेरिकेतील तो एकमेव, सर्वात ज्येष्ठ, पूर्णवेळ काम करणारा, पत्रकार आहे. अमेरिकेतील या ज्येष्ठ पत्रकाराला निरोप देण्यासाठी त्याचे सध्याचे सहकारी आणि त्याच्याबरोबर पूर्वी काम केलेले अनेकजण, कंपनीचे सर्ववरिष्ठ जमले होतेच पण सॅनफ्रॅन्सिस्कोचे महापौर, खासदार, आमदार,प्रतिष्ठित सगळे हजर होते.
या निरोप समारंभात महापौरांनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अाजचा दिवस हा David Perlman Day म्हणून ओळखला जाईल असे जाहीर करून पर्लमनचा मोठाचगौरव केला! ते पुढे म्हणाले,” ह्या शहरात पहिल्या महायु्द्धानंतर होत असलेल्या प्रत्येक घडामोडीचे, शहराच्या अंतर्बाह्य होणाऱ्या सर्व स्थित्यंतराचे साक्षीदारअसलेले पर्लमन आपल्या बरोबरीने आपल्या शहरात आहेत हीच एक आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे!” बोलण्याच्या ओघात ते पुढे म्हणाले, “इतक्या वर्षांच्यावृत्तपत्रीय अनुभवाने पर्लमन यांना कोणती बातमी बनावट, खोटी आहे ते सहज ओळखता येते.” ह्यावर हजरजबाबी पर्लमन ताबडतोब म्हणाला, ” येवढेच नाही, मीतशी बातमी लिहूही शकतो!” लोक जोरात हसले हे सांगायला नको. त्याच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या गाण्यावर ९८वर्षाचा हा उत्साही, भीष्माचार्य पत्रकारथोडावेळ नाचलाही!
पर्लमनने, माणूस चंद्रावर उतरला, तो चालला तेही पाहिले, त्यांचे वृत्तांत लिहिले. त्यामागच्या विज्ञानावर लिहिले; अंतराळवीरांच्या मुलाखती घेतल्या; लहान-मोठी, खंड, खग्रास ग्रहणांविषयी लिहिले, ती पाहिली, पाहात असतानाचे अनुभव लिहिलेच, त्यांचा इतिहास आणि शास्त्रही लिहिले. किती तरी अशी चंद्र-सूर्यग्रहणे पाहिली. भुकंपाचे धक्के सोसले, त्यानंतर काय घडले त्याचीही कथा लिहिली. पुढे काय काळजी घ्यावी त्याचेही शास्त्रीय विवेचन लिहिले. डायनोसारआणि त्यांच्या अंड्यासाठी, सांगाड्यांसाठी प्रदेश पालथे घालणाऱ्या संशोधकांना त्यांच्या कामाच्याठिकाणी युटाहला जाऊन मुलाखती घेतल्या. उत्क्रांतीचेसंशोधन चालूच आहे. Galápagos Islands इथे जाऊन त्या संशोधकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. अगदी परवाच्या खग्रास सूर्य ग्रहणाविषयीलिहिलेला त्याचा अखेरचा लेखही छापून आला आहे.
” खग्रास ग्रहण दिसणाऱ्या सगळ्या टापूत संशोधक त्या अतिदुर्लभ अशा २-३ मिनिटाच्या काळात घडणार असलेल्या स्थित्यंतरातून, निसर्गाच्या अत्यंत वेगळ्यादर्शनातून, किती वैज्ञानिक माहिती गोळा करता येईल ह्याच ध्यासात असतात.” हे १९६५ साली त्याने लिहिले होते. “दिवस मध्यरात्रीत बदलून जाईल… दिवसाचीरात्र कधी होईल ते कळणारही नाही. उन्हाळ्यातील झळा क्षणभरात थंडीचा गार बोचरा वारा होऊन वाहू लागेल… अचानकझालेल्या अंधाऱ्या रात्रीमुळे पक्षीबावचळून विचित्र कलकल करू लागतीलआणि आकाशात तारे प्रकट झालेले दिसतील! ” … हे त्याने २१ तारखेला होणाऱ्या सूर्य ग्रहणाविषयी लिहिलेल्यापरवाच्या लेखात म्हटले आहे
Ted-Talk वरील David Baron संबंधी वर लिहिताना मी ह्याच ओळीं आठवल्या म्हणालो होतो .
इतकी वर्षे एका ठिकाणी काम केले त्याविषयी डेव्ह पर्लमन म्हणाला, ” काय सांगावे? काय सांगणार! तुमच्या आणि माझ्या, लहान सहान सहली बऱ्याच झाल्याअसतील. पण अशी७८-८० वर्षांच्या सफरीसारखी दुसरी सफर होणार नाही! ”
कंपनीने पर्लमनला आणि सगळ्यांना खूष करणारी खबर देऊन आपल्या मनाचा मोठेपणाही दाखवला. डेव्ह पर्लमन आपल्या वर्तमानपत्राचा पहिलाच, सन्माननीय(Emeritus) विज्ञानाचा संपादक राहील असे जाहीर केले. तो आता केव्हाही येऊन एखादा वृत्तांत, वृत्तकथा किंवा पुस्तकही लिहू शकतो. त्याची खुर्ची आणि टेबलत्याच्यासाठी असेच राहिल. हे ऐकल्यावर ९८ वर्षाचा पर्लमन पटकन म्हणाला “एक वृत्तकथा माझ्या खिशात आता तयारही आहे!”