Monthly Archives: February 2019

म्हैपत, विठोबा आणि विठोबाचा विठोबा

म्हैपतचे किराणा मालाचे लहानसे दुकान होते. दुकान लहान आणि झोपडपट्टीच्या भागातले. त्याच्याकडे येणारी गिऱ्हाइके सुद्धा त्याच्यासारखीच! म्हैपत रोज घंटी सोडून दोन्ही मडगार्ड खडखडऽ वाजणाऱ्या, चारी दिशेने गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेल व चेनचे चाक कुंईंऽकुईंऽखटक् खटक् करणाऱ्या खडार्डम स्टाप सायकलवरून यायचा.

त्याची गिऱ्हाईकेही चालत चालतच यायची. कोणी दोन्ही पायांनी लंगडा असला तरी बूट पाॅलिशमधल्या डेव्हिड सारखा एकच कुबडी घेत पण दुप्पट लंगडत येई, तर लहान पोरं चड्डी नसल्यामुळे बापाचा किंवा थोरल्याचा मोठा सदरा घालून, पोरी डोक्याला सटी सा महिन्यात तेल लागलेले आपले झिंज्यापकाडीचे केस मिरवत, तर बायाबापड्या रोजच तेच दंड घातलेले लुगडे किंवा पातळ लेवून येत, बोळक्या तोंडाचे म्हातारे दाढी करणे परवडत नसल्यामुळे अनायासे वाढलेल्या दाढीने गालाचे खड्डे बुजवून येत, तर रशीद मामू धेलेका गूड उधार घ्यायला यायचा ते मात्र दाढीला मेंदी लावून!

गंगव्वा आजी छातीच्या फासळ्यावर गळ्यातले चांदीचे काळपट लिंग आदळत, तर बाबूची भारदस्त आई आपलेच वजन कसे बसे उचलत तीन महिन्याच्या उधारीतील फक्त एक आणा देऊन तांबड्या मिरच्या,मीठ आणि दोन कांद्याची तीन आण्याची नविन उधारी करून जाई, बौद्धवाड्यातले लोक येत,सुताइतकी जाड मेणबत्ती, नीळीची पूड घेऊन जात. ही गिऱ्हाइकं. स्कोडा जाऊ द्या मोडीत गेलेल्या मारुती ८०० मधून येणारे गिऱ्हाइक कुठून येणार? हां! आला तर झोपडपट्टीच्या व लहान लहान टपरींच्या वसुलीसाठी फटफटीवरून गाॅगल लावलेला रम्या यायचा. पण त्याला दिलेल्या सिगरेटच्या पाकिटाचे पैसे मागायला म्हैपतची काय छाती होती!

आता सांगा ह्याच्याकडे स्कोडात बसून येणारे कुणी गिऱ्हाइक कसे येईल? आणि म्हैपतीला त्याची गरजही नसे.

तो सकाळी आपली ‘खड खड खडा्र्ड’ प्रख्यात सायकल बाजूच्या बोळात ठेवत असे. दुकान उघडून करायची तेव्हढी झाडलोट करून विठोबाच्या तसबिरीला उदबत्ती दाखवून नमस्कार करून गिऱ्हाइकाची वाट बघत बसे. थोड्या वेळाने रस्ता झाडणारी,खराट्यापेक्षाही बारीक असलेली अक्की येई. कधीमधी खोकत, अर्धशिशीच्या डोकेदुखीमुळे बिब्याच्या फुल्यांनी रंगवलेल्या भुवया कपाळ दाबत रस्ता झाडायची. म्हैपत तिला हाक मारून कधी ज्येष्ठमधीच्या तुकड्या बरोबर काथाचा लहान खडा चघळायला देई. कधी लवंग तर कधी खडीसाखरेचा तुकडा देई. अक्की ते तुकडेकपाळाला लावून मानेनेच नमस्कार करून तोंडात टाकायची. काम चालू करायची. आलाच कधी ह्या वस्तीत तर कुणाची मनिआॅर्डर घेऊन पोस्टमन येत असे.

तो पत्ता विचारायला म्हैपत शिवाय कुणाकडे जाणार? त्याच्याच फळीवर बसणार. मग म्हैपत समोरून जाणाऱ्या पोराला अरे,” त्या लिंबेराव पोतराजाला पाठव रे दुकानात. पोस्टमनभाऊ आलेत म्हणावं; आन हां चाबूक नको आणू म्हणावं. काय? जा सांग.” तो यायचा. अंगठा द्यायचा. म्हैपत साक्षीदार म्हणून सही करायचा. दहा रुपये पाहून हरखलेला पोतराजा निघाला की म्हैपत त्याला,” अरे माझी उधारी कधी देणार? द्यायची विसरू नको बाबा.” इतकंच म्हणायचा. पोस्टमनला सुपारीचे लहान पाकिट द्यायचा.

पोस्टमनही ती लहान पुडी तिथेच फाडून त्यातले चार सुगंधी तुकडे चघळत कागद फेकून निघून जायचा. म्हैपतचे मग च्याची पत्ती, साखर, काडी पेटी, एक बिडी बंडल हिरवा दोरा, निरमाची लहान वडी, लाईफबाॅय, शेंगादाणे, मसुरची लाल डाळ,गोडबोले सातारी जर्द्याचा तोटा, कुणाला गाय छाप जर्दाच पाहिजे तर कुणाला अंमळनेरचा पटेल जर्दाच चालत असे पण हे सगळे पटापटा देणे सुरु होई. दिलेल्याचे पैसे घ्यायचे उरलेली चिल्लर मोड द्यायची;उधाऱ्याची उधारी लिहायची; लिहिताना “आता उधारी मिळणार नाय बघ.ही शेवटची!” असा रोजचा दम द्यायचा. म्हैपतचा दम फुसका हे गिऱ्हाइकालाही माहित असते. तो फक्त मान हलवत जायचा. ह्याचा अर्थ म्हैपतचा दिवस सुरू झाला.

पण म्हैपतचा एक कायदा होता. तो जर्दा तंबाखू सिगारेट कुणालाही कधीही उधार देत नसे. असं का विचारले तर म्हणायचा तेव्हढीच कमी खातात हो; कमी ओढतात रोख द्यायचे म्हटल्यावर! मग बिडी बंडल का देतो उधार? ह्यावर तो सांगेल,” अवो, बिडी ती केव्हढी! तिच्यात तंबाखू निम्मीच असते. आन बिडी ओढणारा किंवा ओढणारी बी जास्त करून गरीबच असतात.कितेकदा अर्धीच ओढून बंडलात ठेवतात!” म्हैपतचे हे इतकेच आर्थिक,नैतिक व सामाजिक तत्वज्ञान!

थोड्या वेळाने वेळाने झोपडपट्टीतून कोणी दोन माणसे साधु बनून शहरात फेरी मारायला निघायचे. त्यांना म्हैपती,” ए चंगू मंगू! माझे पैसे केव्वा देणार?” निघाले चिमटा वाजवत!”ते दोघे हसत पण केविलवाणे तोंड करत,काय म्हैपतभाऊ असली पैली भोनी करतो कायरे ? आधीच आम्हाला लोक हडत हुडुत करतात. मोटारवाले तर आमाला पाहिले की काचा वर करतात.,एक दोघे ट्रकवाले, रिक्षावाले काही द्येतात.पन काऽय रया नाही राहिली. सगळी नावं घेतो ज्या त्या वस्तीत, सोसायटीत. अलख निरंजन! बम् भोले नाथ!गुरूद्येव द्त्त! अवधूत चिंतन… ! घसा दुखतो. अान तू हे उधारीचे काढले.” असे म्हणत सटकतात.


म्हैपत दुपारी आपला डबा खायला बसणार ह्याचा सुगावा कोपऱ्यावरच्या एका पायावर उभे राहून काही न बोलता भिक मागणाऱ्या ‘ हटयोगी’ मौनी भिकाऱ्याला आणि पलिकडच्या मोरपिसाच्या झाडूवाल्या फकिराला कसा काय लागतो ते म्हैपतलाही समजले नाही. अर्धा डबा झाला की हटयोगी दोन्ही ढांगा भराभर टाकत आणि फकीर झाडू खाकोटीला मारत, क्या म्हैपतबाबा म्हणत आलाच. म्हैपतही डोळ्यांनीच या म्हणत डब्यातले जितके देता येईल तेव्हढे दोघांना देत असे. दिस संपला. रात्रीचे अकरा वाजता दुकान बंद करून गल्ला रेक्सिनच्या पाकिटात, पाकीट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी सायकलच्या गर्रकन चारी दिशेला फिरणाऱ्या हॅन्डवेललाअडकवत म्हैपत सायकलवर टांग मारून मडगार्ड खड खड खाडार्ड खड वाजवत,चेन व चाक कुईं कुईं खटक् करत घरी जाई.बायका पोरांची चौकशी करून अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिया दारी’ हा अभंग व सुंदर ते ध्यान’ भजन झाले की ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत हात जोडत झोपी जायचा.

एके रात्री म्हैपतीच्या स्वप्नांत विठोबा आला. आला तो डोक्यावर किरीट, तुळशी हार घातलेला, कानात मकर कुंडले, कंठी कौस्तुभ मणि विराजत असलेला मुक्तफळांचा कंठा घातलेला, झळाळता पिवळा पितांबर नेसलेला, अशा भरजरी रूपातच! विठोबाचे ते रूप पाहून म्हैपत इतर सर्व काही विसरला. विठोबा म्हणाला, “म्हैपत तुला भेटायला मी उद्या येणार आहे.” “म्हणजे मला दर्शन देणार?” माहित असलेले मोठे शब्द वापरून म्हैपत विठोबावर इम्प्रेशन मारत होता. विठोबा फक्त त्यालाच जमेल आणि शोभणारे मधुर हसत, न बोलता फक्त मानेने हो म्हणाला आणि गायब झाला. सकाळ झाली म्हैपत उठला पण विठोबाला आपण नमस्कारही करायचा विसरलो ह्या चुटपुटीने सारखा हळहळत होता.

म्हैपत आज त्याच खड खड खडार्ड आणि कुंईं कुंईं खटक् करणाऱ्या सायकल वरून येत होता. पण विठोबा भेटणार त्यामुळे त्याला आज ते आवाज ऐकूच आले नाहीत. हिरव्या रॅलेवरून येतोय ह्या थाटात दुकानापाशी आला. सायकल बाजूच्या बोळात ठेवली. रोजचा दिवस सुरू झाला.

पण आज रस्ता झाडायला अक्की आली नव्हती. तिच्या ऐवजी दुसरीच कुणी बदली आली होती. थोडा वेळ म्हैपत विचारांत होता. पण पांडुरंगाला उदबत्ती ओवाळण्यात त्याचा वेळ गेला. मग रस्याकडे पाहात असता ती बदलीबाई आली. विचारू लागली, “म्हैपतशेठ तुमीच का?” म्हैपतचा शेठ झाल्याने तो कोड्यात पडला. पण तो हो म्हणाल्यावर ती बाई म्हणाली, “शेठ अक्की लै बिमार हाये फार. डाॅक्टरकडे नेले पायजे तिला. पर… “ म्हैपतला समजले.त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला मेंदीबाबा रशिदमामू दिसला. “ओ मामू जरा दुकानाकडे ध्यान दे. मी आलोच.” अरे मै क्या ध्यान देणार? कुणी आलं गिऱ्हाईक तर?” “काडी पेटी बिडी बंडल साबुन अस दे . दुसरं काही देऊ नको.”इतके सांगून तो त्या बाई बरोबर अक्कीच्या झोपडीकडे गेला.

तिथलं चित्र पाहिल्यावर म्हैपतला आपण कुठं आलो ते समजेना. पण गटारी, ओघळ,शेवाळ, घाण चुकवत टपरीजवळ आला. अक्की शुद्ध नसल्यासारखी बोलत होती. म्हैपत दुसऱ्या बाई बरोबर डाॅक्टरकडे गेला. दादा बाबा करून डाॅक्टरला आणला. त्याने अक्कीला तपासले. दोन इंजेक्शने दिली. गोळ्या लिहून दिल्या. म्हैपत झपाट्याने दुकानाकडे गेला.औषधे आणली. दोन फळं घेतली. सर्व त्या बाईजवळ दिले. आणि म्हणाला. बाई आज तुम्ही तिच्याजवळ थांबा.मी तुमच्या मुकादमाला सांगतो.” म्हैपत दुकानात आला. मेंदीवाल्या मामूने विकलेल्या वस्तुचे पैसे त्याला दिले. आणि रशिद मामू गेला.


दिवस सुरू झाला होताच. रोखीची कमी,उधारी जास्तीची अशी रोजची विक्री सुरू झाली. तेव्हढ्यांत नरसू तेलगी एक पाय खुरडत खुरडत पोराला घेऊन आला. “ म्हैपतबाबा, हे माझा नातू. तेन्ला कारखान्यात बोलावलंय. पैसे नाहीत. कारखान्यात जायाला. रिक्षा लागंल, लांब हाये म्हनतो फार. आणि बघ, चहा पाव खायलाही काही लागतील. आज येव्ढी वेळ भागव. नोकरी लागली तर तुझे पैसे दुपटीने देईन”. म्हैपतने पैसे काढून त्या पोराला दिले. नरसू तेलगी आणि नातू म्हैपतला हात जोडून गेले. म्हैपतचे हात चालत होते. वस्तु देत होता. उधारी लिहित होता. कुणी रोख दिले ते घेत होता. पण आज काही झाले तरी एक आण्याचा आवळा देऊन चार आणे उधारीचा कोहळा घेऊन जाणाऱी बाबुची आई आली तर तिला उधारी द्यायचीच नाही असं तिला येताना पाहूनच त्याने ठरवले.

बाबुची आई आली. नेहमीच्या हळू आवाजात बोलून तिने दोन आणे दिले.आणि नविन वस्तु मागितल्या.म्हैपत ढिम्म बसला. पण तिने गयावया केल्यावर उधारी दिलीच! म्हैपत स्वप्न, विठोबा विसरला होता. पण आता लक्षात आले. अरे इतका वेळ झाला. पण विठोबा काही आला नाही. चुटपुट लागली. “नमस्कार करायचा विसरलो. विठोबा रागावला असेल. पण त्याला समजू ने का मी गांगरून गेलतो.” असे पुटपुटत गिऱ्हाइकी करत होता. मध्येच मोठ्या रस्त्याकडे पाहायचा, विठोबा तिकडून येईल म्हणून! मोठ्या रस्त्यावरून रोजची ट्रक बस रिक्षा मोटारी जातच होत्या. ती रहदारी तेव्हढी दिसली!

दुपार झाली. डबा खायची वेळ झाली. अर्धा डबा खाऊन झाला.तेव्हढ्यात एक कुत्रा आला. काटकुळा. मागचा एक पाय न टेकता चालत होता. कुत्रा रोज कधी दिसत नव्हता. पण म्हैपत खात होता, कुत्रा पाहात होता. म्हैपतने एक पोळी त्याला दिली. कुत्र्याने शेपटी हलवली. पोळी घेऊन गेला. ‘हटयोगी’ दोन्ही ढांगा टाकत व फकीर पंखा खाकोटीला मारत दोघेही आले. म्हैपतीने त्यांना रोजच्या प्रमाणे आपल्या डब्यातले खायला दिले. फकीर दुवा देत आणि ‘हटयोगी’ एक हात उचलून नमस्कार करत गेला. दुकान सुरू झाले. लिंगायत गंगव्वा आली ती रडतच. काय झालं असे विचारताच ती जास्तच रडू लागली.मग पुन्हा विचारल्यावर,” काय सांगायचं म्हैपतभाऊ!” म्हणत गावाकडे तिचे वडील वारल्याचे तिने सांगितले. म्हैपतने न बोलता पेटीतल्या थोड्या नोटा काढून दिल्यावर ती आपले हाडं आणि शिराच राहिलेले दोन्ही हात जोडून म्हैपतच्या पेटीवर डोके टेकून स्फुंदत स्फुंदत रडत काही तरी बोलली. पुन्हा पुन्हा हात जोडून ती माघारी गेली. दिवस संपत आला. रात्र झाली. अकरा वाजले. आज काही गल्ला नव्हताच. काय जो होता तो रेक्सिनच्या पाकिटात, पाकिट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी चारी दिशेला गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेलला अडकवून सायकलवर टांग मारून खड खड खाडार्ड खड वाजवत, कुंईं कुंईं खटक् करत घरी आला.

बायका पोराची चौकशी केली.अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिये दारी’ हा अभंग आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे भजन म्हणून ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत पडला. आणि आज विठ्ठलाने फसवले. भेटायला येतो,दर्शन देतो असे मधाचे बोट लावून गेला पण आला नाही! जाऊ द्या. तो देव आहे. आपण काही देव नाही. असं म्हणत झोपी गेला. स्वप्नात पुन्हा विठोबा आला. त्याला काही बोलू न देता म्हैपत एकदम बोलू लागला, “विठ्ठला,पांडुरंगा मला फशिवलस आज. येतो म्हणालास पण तू काही आला नाहीस. काल तुला नमस्कार करायचा विसरलो म्हणून आला नसशील. आता आधी मी नमस्कार करतो तुला”असे एका दमात म्हणत म्हैपतने पांडुरंगाला दंडवत घातले.पांडुरंग नेहमीप्रमाणे त्यालाच जमणारे व शोभून दिसणारे मधुर हसला. म्हणाला, “म्हैपत,मी तीन चार वेळा येऊन गेलो.” “ तीन चार वेळा? अरे एकदाही दिसला नाहीस तू मला विठ्ठला!आणि तीन चार वेळा काय म्हणतोस तू?” “ म्हैपतबाबा, अरे अरे अक्की आजारी आहे हे सांगणारी बाई आणि अक्कीच्या रूपाने, नरसू तेलगी आणि त्याचा नातू, रोज न दिसणारा कुत्रा, लिंगायत गंगव्वा आणि आणखी किती किती रूपानी मी तुला दर्शन देणार? “ हे ऐकल्यावर म्हैपतचा गळा दाटून आला. आपोआप हात जोडले गेले. विठोबा पुढे म्हणाला, “ खरं सांगू म्हैपत ! अरे त्या सगळ्यांच्या डोळ्यांनी मीही तुलाच पाहात असतो! अरे तूही माझा विठोबाच ! पांडुरंगच असे म्हणाल्यावर म्हैपतच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. त्याबरोबर त्याच्याही तोंडावर विठ्ठलालाच जमणारे आणि शोभून दिसणारे मधुर हसू उमटू लागले! म्हैपत आणि स्वत: पांडुरंग “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ‘ भजन केव्हा म्हणू लागले ते दोघांच्याही लक्षात आले नाही!

जय जय रामकृष्ण हरी।जय जय जय रामकृष्ण हरी!

जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार

मी एक ओळीत जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार… !
माणूस आयुष्यभर शिकत असतो. जन्मभर विद्यर्थी असतो हे अनुभवाचे बोल प्रत्येकाला पाठ असतात. हे बोल ऐकल्यावर अनेकांना गुरु दत्तानी एकवीस गुरू केल्याची कथाही आठवते. त्याच त्या चुका वारंवार करत जीवनाच्या शाळेतील मी किती पारंगत विद्यार्थी आहे हे सगळ्यांना माहिती झाले आहे.
अनेक चुकांतील एक माझी नेहमीची ठळक चूक कोणती ते…..


आज मी उन्हे उलटण्याच्या सुमारास म्हणजे सावल्या लांब पडण्यास सुरुवात झाली नव्हती पण लवकरच पडू लागतील अशा वेळे आधी निघालो. साडे चार वाजता. फाटकातून बाहेर पडलो आणि नाॅटरडेम हायस्कूलच्या दिशेने निघालो.चुला व्हिस्टा’च्या वळणापाशी आलो. जावे का ह्या चढाच्या रस्त्याने? स्वत:लाच विचारले. “पण चढ खूप मोठा आहे. आपण ल्युनार्डीवरून ‘चुला व्हिस्टाकडे’ वळून दोन तीनदा गेलोय. कारण काय तर इकडूनही चढच आहे. पण ह्यापेक्षा कमी म्हणून तिकडून आलो होतो. पण हा जमेल का चढून जायला?” मळ्यात जाऊन “काय वांगी घेऊ का ?” असे वांग्यांच्या झाडांनाच विचारून भरपूर वांगी तोडून घेणाऱ्या भिकंभटासारखे मीही स्वत:लाच विचारून, जाऊ का नको ते ठरवत होतो! शेवटी देवाचे नाव घेतले व चुला व्हिस्टाचा चढ च-ढ-त,च—ढ—त निघालो.


वर मध्ये स्वल्प विराम टाकलाय पण एक एकेक पावलानंतर अर्धविराम घेत मी चाललो होतो. एका बाजूने डोंगर,झाडी दुसऱ्या हातालाएकीकडे खोलगट दऱ्या. घाटातला रस्ता म्हणावा तसा. पण झाडी दोन्ही बाजूला.आणि दोन्ही बाजूला घरे! काही झाडीतून दिसणारी, काही डोकावणारी! व वरच्या चढा चढाच्या हाताला वर वर बांधलेली. इकडे खाली उताराच्या बाजूलाही घरे. सगळी सुंदर! मी ज्या घाटातल्या रस्त्यावरून चढत जाण्याचा प्रयत्न करत होतो तो रहदारीचा. पण फार वर्दळीचा नाही. तिथे राहणाऱ्यांच्याच मोटारींची रहदारी. चढण त्रासाची होती. हे लोक मोटारीतूनही कशी सारखी ही चढण पार करत असतील व उतरतही कशी असतील!


अखेर वाटेत तीन चार वेळा प्रत्येक थांब्याला अर्धा एक मिनिट थांबत, ती रम्य आणि मनोहारी चढण पाहात पाहात पठारावर आलो. आणि हे काय आता आलीच की ती कार्लमाॅन्टची शाळा म्हणत पाय एक दो-न करत पडू लागले. डोंगर-चढाच्या चंद्रभागेचा रस्ता चढून-उतरून घरी आलो. एक तास लागला असेल. घाटातली अर्धचंद्राकार वळणाची गल्ली तीच चुला व्हिस्टाचीच; आज दुसऱ्या बाजूने आलो इतकेच.पण शहरातल्या खंडाळ्यातून फिरून आलोय इतका ताजा आनंद झाला!
ल्युनार्डीवरून भर रहदारीच्या नेहमीच्या रस्त्याने घरी सुखरूप आलो.
………………


वरचा संपूर्ण परिच्छेद मी पत्राच्या रूपात मुलांना पाठवला. त्याला काय उत्तर आले आले ते पाहा.
“बाबा, “आज उन्हे उलटण्याच्या ……निघालो” ह्याची काय गरज आहे? साडे चार वाजता निघालो. इतके पुरे.


पुढचे फाटकातून वगैरे कशाला? तुम्ही नेहमी फाटकावरून उड्या मारून बाहेर पडता? “चुला व्हिस्टापाशी आलो. इतके बास.नंतर तुम्ही जावे की न जावे वगैरे लिहिलेय. हॅम्लेटचे नाटक लिहिताय का भूमिका करताय? पुढचे ते देवाचे नाव कशासाठी? फिरायला निघाला होतात का लढाईला? आं?चुला व्हिस्टा तिथला चढ वगैरे अगोदर येऊन गेलंय. पुन्हा ते शिवणाचे टाके घालत काय लिहिलेय! चढ चढत किती वेळा? चढ चढतच जायचा असतो. ते लिहायची आवश्यकता नाही.बरं ते मध्ये स्वल्प वि…. ..का काय ते व्याकरण का आणले? अनावश्यक. आतातुम्ही शहरात राहता. घरे असणारच. बरे डोंगरातल्या रस्त्यावरून जाता आहात. तुम्ही अमेरिकेत असता. तिथे भरपूर झाडी आहे हे इथल्या देगाव-दवंड्यांचे गावच्या लोकांनाही माहित आहे. पुढे रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे काय.? कशासाठी प्रयत्न? आता निघालात ना फिरायला? पुन्हा प्रयत्न कसला? रहदारीचा पण फार वर्दळीचा नाही म्हणजे काय समजायचे वाचणाऱ्यांनी? असे हेही नाही तेही नाही तऱ्हेचे वाचून कुणी तो रस्ता ओलांडून गेला तर काय होईल त्याचे? अहो तुमचे हे पत्र वाचून अमेरिकेतले लोक खटला भरतील तुमच्यावर. तसेच ते पुढचे ‘मोटारीतूनही कशी ही चढण…..असतील’ ह्या वाक्याने वाचकाच्या माहितीत काय भर पडते? कित्येक वर्षे ते असे मोटारीतून जात येत आहेत.ते म्हणतील मोटारवाल्यांनी तुमच्याकडे किंवा सरकारकडे काही तक्रार केलीय का? काहीही लिहायचे आपले!


तुम्ही चालत गेला होता का बसने? मध्येच थांबे कुठून आले? काढून टाका तो सर्व मजकूर. बरं इतका वेळ तुम्हाला हा घाटाचा रस्ता चालवत नव्हता. मग एकदम ती चढण रम्य मनोहारी वगैरे कशी काय झाली?


पुढे, “पाय एक दो… “ लिहिले आहे.परेड करत होता का चालत होता? इतका वेळ एका ओळीतही पाण्याचा ओहोळ राहू द्या थेंबही नव्हता. मग ही डोंगर चढाचीच चंद्रभागा(म्हणजे काय ?!!)कुठून उगम पावली?खोडून टाका ते. बाबा तुम्हाला शाळा तर कधीही आवडत नव्हती. नेहमी ती बुडवत होता तुम्ही. कशाला ती कार्लमाॅन्ट का फाॅन्टची शाळा पाहिजे? बंद करा ती. त्यातही “अर्ध चंद्राकार काय … आज दुसऱ्या बाजूने आलो… “. तुम्हाला कुणा पोलिसाने अडवले होते का काय तिथे? कशाला हवा तो कबुली जबाब.”मी ह्या बाजूने आलो त्या बाजूने गेलो…?” खराय ना. गाळा तो मजकूर. आणि कुणाचा तरी आनंद शिळा असतो का हो? तुमचाच तेव्हढा ताजा? हल्ली काहीही शिळे नसते. बातमी,विनोद सुद्धा. आणि हो! ती ल्युनार्डी म्हणजे काय देऊळ आहे का रेल्वे स्टेशन की पार्क आहे का सरडा? कुणाला माहित आहे ल्युनार्डी? का जगातले कितवे आश्चर्य आहे ती ल्युनार्डी का खोटारडी? नको तिथे भरपूर खुलासेच्या खुलासे, विशेषणांची खैरात आणि ल्युनार्डी जसे काही कोथरुडच्या येनापुरे वडापाववाल्याही माहित अशा पद्धतीने लिहिले आहे. अहो तुमच्या ह्या पत्रापेक्षा मोटारीतला GPS चांगला की. शेवटी, फिरून घरीच येताना नेहमी? आणि सुखरूप ते काय? आजच सुखरूप आलात का? मग ते वाक्य लिहिण्याने विशेष काही सांगितले जाते का?

तुमच्या लक्षात येते का माहित नाही. तुमचे हे संपूर्ण पत्र फक्त दोन शब्दांचे आहे. “ फिरून आलो.”आणि हे शब्द फोनवरूनही पटकन पाठवता आले असते.

मुलांचे हे उत्तर वाचले आणि पत्रकाराची गोष्ट आठवली:-

वृत्तपत्रविद्येच्या वर्गात पत्रकाराने कमीत कमी शब्दात पण आशय तर स्पष्ट व्हावा असे लिहावे ह्यावर भर देत असतात. अशाच एका तासाला निरिक्षक म्हणून काही अनुभवी पत्रकारही आले होते.
प्राध्यापक शिकवत असता त्यांनी एक प्रश्न दिला. एका मच्छिमाराने मासे विकण्यासाठी दुकान टाकले. ताजे मासे विकत होता. चारी बाजूंनी काचा असलेल्या पाण्याच्या पेट्यांत निरनिराळ्या जातींचे मासे ठेवलेले. व्यवस्थित ठेवले होते. आणि दुकानाच्या समोर लोकांना माहिती व्हावी असा एक फलक त्याला ठेवायचा होता. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तो फलक लिहायला सांगितला.

विचारासाठी दिलेला वेळ संपल्यावर एक एक विद्यार्थी येऊन लिहू लागला. कुणी पाच सहा ओळींचा तर कुणी चार ओळींचा काही जणांनी तर कमालच केली. निबंध लिहावा तसे लिहिले. मुले,सर व ते अनुभवी पत्रकार सगळे चर्चा करत ते तपासून दुसऱ्या मुलांना लिहायला सांगत. होता होता एका हुषार विद्यार्थ्याने मात्र फक्त एकच वाक्य लिहिले. सगळे विद्यार्थी एकदम ओह! वाह वा म्हणू लागले. सर व निरीक्षकांचेही समाधान झाले असावे. वाक्य होते:

‘Fresh Fish Are Sold Here’

तरीही सरांनी हे आणखी सुटसुटीत करता येईल का असे अनुभवी निरीक्षक पत्रकारांना विचारले. त्यावर एक पत्रकार फळ्याकडे आले व म्हणाले, “हे बघ तुझ्या दुकानासमोर हा बोर्ड लावणार ना?” “ हो” मग here कशाला हवा? “ असे म्हणत त्यांनी त्यातला तो शब्द काढला. “Fresh Fish are sold “
“ आता पहाare कशाला हवा? तो नसला तरी अर्थ तोच राहतो ना?” “ हो सर. “ त्यांनी are काढून टाकला.

“Fresh Fish sold “

मग ते निरीक्षक म्हणाले, हे पाहा मासे ताजे नसले तर त्याचा कुबट दुर्गंध येतो. तसा वास आला तर कोणी फिरकेल का?” “ नाही सर.” “ हे पाहा तुमचे मासे चांगले ताजे आहेत हे सगळ्यांना दिसते. ताज्या माशांसाठीच लोक येतात. मग fresh शब्द अनावश्यक आहे. हो की नाही?” “ yessSSir!”
“तर आता वाक्य बघा कसे होते ते.”

Fish Sold”.

पुढे त्यांनी विचारले,” तुम्ही मासे लोकांना फुकट वाटायला दुकान टाकले आहे ?
“नाही सर. विकण्यासाठीच टाकले”
“ मग ते Soldकशाला लिहिले?”आता बघा कसे थोड्याच म्हणजे एकाच शब्दात लोकांना समजते ते.”

“FISh”

प्रोफेसरांनी, विद्यार्थ्यानी बाके वाजवली. अनुभवी पत्रकारांनी डस्टर टेबलावर ठेवून विचारले, “हे दुकान मासे विकण्याचेच आहे हेतर स्पष्ट दिसतेय. हो नां ?” सगळेच “होऽऽ ! म्हणाले. मग हा Fish शब्द तरी का हवा? म्हणत त्यांनी तोही खोडून टाकला!

माझ्या मुलांनीही माझ्या पत्राचे अनुभवी पत्रकारासारखेच केलेले संपादन तुम्ही अगोदर वाचलेच. केले. त्यांनी ता.क. लिहिला; तो असा:-


ता.क. बाबा तुम्ही रोजच फिरायला जाता, म्हणून ‘फिरून’ हा शब्द काढून टाका. तुम्ही फिरून आल्यावर पुन्हा ‘आलो’ हे निराळे का सांगायला हवे? तोही शब्द काढून टाका.बघा बरं आता वाचायला किती छान सोपे झाले.


पुन्हा ता.क. लिहू नका!

रिकामा डबा, डबा भरलेला!

गाडीला आज गर्दी नव्हती.डब्यात येऊन बसण्यापूर्वी सगळी गाडी पाहातच आलो होतो. तुरळक गर्दी असेल नसेल. माझ्या डब्यात तर मी एकटाच होतो. कुणी तरी यावे असे मनात बरेच वेळा घोकून झाले. शेवटी मुंबईत दुकानांच्या समोर,” या साहेब चांगला कपडा आलाय; बघायला काय हरकत आहे;”या ताई एकदम नव्या फॅशनच्या साड्या आल्यात, कांजिवरम मधुबनी प्रिंट बघातर ताई!” असे गिऱ्हाईकांना हिंदीत बोलत बोलवतात तसा डब्याबाहेर जाऊन,” या या, डबा खराच आपलाच आहे! मोकळा, एकदम रिकामा; झोपा, पसरा, वरचा बर्थ घ्या,खालती बाकावर झोपा,सगळा डबा तुमचा,या या ! पटकन गर्दी होईल बसून घ्या बसून घ्या भाऊसाहेब!” असे ओरडून बोलवावे वाटू लागले. आणि खरंच उतरलो डब्यातून. उभा राहिलो. थोडे खाकरून घेतले. पण तो विक्रेत्याचा आवाज आणि स्टायलीत ओरडणे जमणार नाही हे समजायला अर्धा क्षणही लागला नाही. त्या गायकीचे ‘घराणे’च निराळे! तरी नोकरीत असताना आमचे एक जनतेसाठी असलेले “प्राॅडक्ट” विकण्यासाठी, दुकानांत माल सजवून रस्त्यात उभारून लोकांना हाकारून आणणाऱ्या विक्रेत्याच्या कामासाठी तरूण मुलांच्या मुलाखतीत अगोदर मी त्याचे प्रात्यक्षिक स्टाइलीने करून दाखवत असे. शिक्षणाची अट नव्हती. १०-२२वी ची मुलेही चालली असती. पण फारशी हाताला लागत नव्हती. दोन चार मिळायची. हे असू दे.

कोणी येतेय का आपल्या डब्याकडे हे मी जो दिसेल त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहात विचार करत होतो. कोणी येत नाही पाहून आज रेल्वेवर बहिष्कार तर नाही घातला कुणी अ.भा. संघटनने ही शंकाही मनात आणली. डब्यात येऊन खिडकीजवळच्या जागेवर बसलो. समोरच्या बाकावर पाय पसरून बसलो.पुन्हा असा योग केव्हा येईल ते कुणाला माहित.? मग वरच्या बर्थवर, ह्या वयात,कुणी नाही पहायला तोपर्यंत, कसाबसा चढून पसरलो.पुन्हा खाली आलो.डब्यात प्रत्येक सीटवरचे नंबर वाचत संपूर्ण डबा फिरून आलो. दूरच्या दरवाजाजवळच्या बाकावर एक माणूस पेंगत होता. पुन्हा ते नंबर उलट्या क्रमाने वाचत जागेवर येऊन बसलो. रामरक्षा म्हणावी का असा उगीच एक विचार आला.उगीच का म्हणायचे तर ती येत नव्हती मला. पण अशावेळी म्हणतात हे वाचल्याचे, सांगितल्याचे आठवले इतकेच.

गार्डाने शिट्टी वाजवली. अरे वा गार्ड तरी आलाय. त्याने एकदा शिट्टी वाजवली की गाडी लगेच सुटत नाही. प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. तसा इंजिनच्या ड्रायव्हरलाही असणारच की.त्याने शिट्टी वाजवली की इंजिनड्रायव्हर कधीच लागलीच गाडी चालू करत नाही. तो आपला राग फक्त इंजिनाची वाफ फस्स करत थोडावेळ सोडतो. गार्ड शिट्टी न वाजवता उगीचच दिवसासुद्धा दिवा हलवतो.ड्रायव्हर फक्त एक लघु शिट्टी कुक् करून वाजवतो. व वाफेचा जोरदार फवारा सोडून खदाखदा हसतो! हे सगळे आता माहित झाले होते. एएसएम एक वहीसारखी गुंडाळी हातात घेऊन गार्डापाशी जाऊन दमात घेतल्यासारखे फक्त दाखवत पण अजिजीने गार्डाला व त्याच्या शेजारी फर्स्ट सेकंडच्या स्लीपरच्या कंडक्टरला काही तरी सांगतो. हे इंजिनड्रायव्हरला सहन होत नाही. तो लगेच सगळ्या स्टेशनला हादरा बसेल अशी शिट्टी तर वाजवतोच पण चाकेही तिथल्या तिथेच वरच्यावर फिरवतो न फिरवतो तेव्हढ्यात माझ्या डब्यात दहा बारा तरुण मुलांचा घोळका मोठ्याने बोलत हसत ओरडत शिरतो. मला बरे वाटते. पण तितक्यात संपूर्ण डबा रिकामा असूनही, “ ओ आजोबा तुमच्या पादुका खाली घ्या ना!” “ दुसऱ्यांनाही बसायचं असतं.” मी म्हणतो, “अरे सगळी बाकं रिकामी आहेत तिथे बस.”रिकामी आहेत ना?” मग तुम्ही बसता का तिकडे?” तो मला खोट्या नम्रतेने सांगतो. मी पाय खाली घेतो. इतरांची आपापसांत काही तरी बोलणे,गप्पा चालू असतात. गाडी सुरू होऊन बराच वेळ झाला, हे मी आतल्या आत मुलावरच्या रागाने धुमसत होतो त्यात,लक्षातच आले नव्हते.

मुलांच्या गप्पा हसण्या खिदळणे गाणी ह्यातून त्यांचा विषय गाडीची साखळी ओढण्यापर्यंत येऊन पोचला होता. “ अरे व्हिकी, साखळी खेचायची का?” “का काय करणार खेचून? दंड कोण भरणार? तुझा होणारा सासरा?” “ तो कशाला भरेल? तूच भरायचा. नाहीतरी तुझं तिकीट शशानेच काढलंय की!” “ अबे तिकिट कितीचं आणि दंड केव्हढा माहित आहे ना? त्याला पाचशे रूपये म्हणतात. काय समजला का? किती शून्य असतात माहित तरी आहे का?” सगळं कुणाच्या ना कुणाच्या खिशात हात घालून चालतंय म्हणून बरं आहे.” हो ना करता सगळ्यांनी वर्गणी करून पैसे गोळा करायचे ठरले त्यांचे. दंड आणि तुरुंगाची हवा दोन्ही खायला लागती म्हणे कधी. त्या गार्डाच्या मनावर आहे ते: थोडे जास्तच टाका बे सगळ्यानो.” असं बोलत एकजण पैसे गोळा करू लागला.”अरे वा! १२००रुपये जमलेत!” एकूण १२०० रू. जमले. ते एका मुलाने खिशात कोंबले. मी हे सर्व पाहात होतो. आता साखळी कुणी ओढायची ठरले. तेव्हढ्यात एकाला शुद्ध हवा लागली असावी. तो म्हणाला, “अबे साखळी कुणी ओढली तर कुणाकडे बोट करणार?” अरे जो साखळी खेचेल त्याच्याकडे! ते ऐकल्यावर मग तू ओढ,तू खेच”सुरु झाले.

एक खरा हुषार होता. मला पाय खाली ठेवायला लावणारा तो. तो म्हणाला, अरे आपले आजोबा आहेत ना! ते येतील मदतीला!” “ हो रे हो” हो की, आपले आजोबा आहेतच मदतीला!” म्हणजे दंडही भरायला नको आपल्याला. काय?”त्यांच्या मोठ्या आरड्या आोरड्यात मी गयावया करून म्हणालो, “अरे साखळी ओढू नका रे. काय करणार साखळी ओढून? हा कसला खेळ चाललाय?”. नका ओढू रे.” मी असे म्हणाल्यावर तर ते जास्तच चेकाळले. “ अहो आजोबा आम्ही काही कुण्या बाईच्या गळ्यातली साखळी ओढत नाही! साध्या आगगाडीची ओढतोय. गंमत असते ती.” “अरे आजोबा घाबरले रे!” म्हणायला लागले. मी केविलवाणा होऊन म्हणालो, “अरे बाळांनो माझ्याकडे पैसेही नाहीत. म्हणजे मला तुरुंगातच पडावे लागणार.” माझ्या गयावया करण्याकडे लक्ष न देता मुलांनी साखळी जोर लावून खेचली. गाडी थांबली. पोरं खुषीत होती. पराक्रमाची पावतीही मिळाली. गाडी थांबली. गार्ड पोलिस तिकीट इन्स्पेक्टर आले.

साखळी कुणी ओढली चौकशी सुरू झाली. मुलांनी कुणी हसणे दाबत गंभीर चेहरे करून माझ्याकडे बोट दाखवले. पोलिस गार्ड सगळे माझ्यावर चालून आले.” येव्हढे म्हातारे झाला आणि साखळी ओढता!? अहो ह्या पोरांनी ओढली तर समजू शकतो. पण तुम्ही? येव्हढं वय झालं तरी खेळ सुचतात असले?” आणिही बराच संस्कार वर्ग घेतला माझा त्यांनी. ते ऐकल्यावर दोघे तिघे एकदम म्हणू लागले,” साहेब आम्ही सांगत होतो त्यांना आजोबा! साखळी ओढू नका नका म्हणून; पण त्यांनी ऐकले नाही.”हे ऐकल्यावर तर ती सगळी अधिकारी मंडळी आणखीच खवळली. मी त्यांना हात जोडून चेहरा केविलवाणा करत म्हणालो,” साहेब, मला साखळी ओढलीच पाहिजे होती हो. मला दमदाटी करून माझ्या म्हाताऱ्याचे बाराशे रुपये ह्या मुलांनी काढून घेतले की हो! काय सांगू! ते पहा त्या मुलाजवळ आहेत. तपासा त्याचे खिसे!” ते दोन पोलिस लगेच सरसावून त्यांनी त्या पोराला घेरून पकडले. त्याच्या खिशांत सापडले बाराशे रुपये. पोलिसांनी ते मला परत दिले. त्या पोरालाच नाही तर सगळ्यांना घेऊन ते निघाले. खाली उतरल्यावर ती मुलं माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने पाहात होते. माझ्या डोक्यावरील पांढऱ्या केसात हात फिरवत मी पैसे खिशात ठेवत,न हसता इतकेच म्हणालो,”अरे उगीच नाही चार पावसाळे जास्त पाहिले!”

(स्वामित्व नसलेल्या डाव उलटवण्याच्या एका चुटक्याची ही गोष्ट केली आहे.)

François-Marie Arouet (व्हाॅल्टेअर)

व्हाॅल्टेअरचे खरे नाव François-Marie Arouet. पण त्याने आपले नाव लेखनासाठी व्हाॅल्टेअर असे घेतले. आणि तो आजही जगभर ह्याच नावाने तो ओळखला जातो. व्हाॅल्टेअरचा जन्म १६९४ साली पॅरिसमध्ये झाला. त्याला उत्तम शिक्षण मिळाले. त्याने साहित्यिक व्हायचे ठरवले. त्याने नाटके लिहायला घेतली. त्याची अनेक नाटके खूपच यशस्वी झाली. पण त्याच सुमारास व्हाॅल्टेअरचा राजाच्या जवळच्या आणि मर्जीतल्या एका माणसाशी तंटा झाला. त्यामुळे व्हाॅल्टेअरला हद्दपार केले. ही १७२७ सालची घटना.

हद्दपार झाल्यामुळे तो इंग्लंडला आला. इंग्लंडमध्ये आल्यावर त्याला एका निराळ्या जगाची ओळख झाली. इंग्लंडमधील सार्वजनिक, खाजगी, सरकारी संस्था ह्या फ्रान्समधील संस्थांपेक्षा जास्त स्वतंत्र आहेत. त्या आपले धोरण,निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात हे व्हाॅल्टेअरच्या लक्षात आले.तसेच चर्चा वादविवाद ह्यावरही फारशी बंधने नव्हती. फ्रान्सपेक्षा येथील वातावरण खूपच मोकळे आहे हे त्याला जाणवले. ह्यामुळे इंग्लंडविषयी त्याचे मत खूपच अनुकूल झाले. इथे विज्ञानाचा अभ्यास खूपच पुढे गेला आहे हे सुद्धा लक्षात आले. व्हाॅल्टेअरवर न्यूटनचा खूपच प्रभाव होता. इंग्लंडमधील वास्तव्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे व्हाॅल्टेअरचा विज्ञानवादी दृष्टिकोन जास्त दृढ झाला. त्याचप्रमाणे शेक्सपिअरचाही तो चाहता झाला. इंग्लंडमधील ह्या सर्व आधुनिक विचारांचे तो नेहमी गुण गात असे. ह्यामुळेच तो जेव्हा फ्रान्समध्ये परत आला तेव्हा त्याने संस्थांचे स्वातंत्र्य, भाषणाचे स्वातंत्र्य,ह्यावर बरेच लिहायला सुरुवात केली.धर्माच्या अधिकाऱ्यांवर, चर्चवर, खुळचट प्रथांना,श्रद्धेच्या आवरणाखाली लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतवून ठेवणे,तिला उत्तेजन देणे ह्याबद्दल धारेवर धरले. तसेच राजसत्तेने व चर्चनेही सहिष्णूतेचे धोरण स्वीकारावे ह्यासाठी एकप्रकारे व्हाॅल्टेअरने चळवळी सुरू केल्या.

व्हाॅल्टेअर हा इतिहासकार आणि इतिहासाचे तत्वज्ञान ह्यातील विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याने लिहिलेल्या इतिहास विषयक पुस्तकांमुळे इतिहास कसा लिहावा ह्याचे धडे देणाराही मानला जातो. सर्व बाबतीत स्वतंत्रतेचा व सहिष्णूतेचा त्याने पुरस्कार केला. धर्म,राजकारभार ह्यांनी घातलेले निर्बंध काढावेत, विचार व उच्चार स्वातंत्र्य असावे; धर्म, राजसत्ता, राज्यकारभार ह्यापासून पूर्णपणे वेगळा असावा, त्यांचे परस्पर संबंध नकोत ह्या विचारांचा पुरस्कार करणारा म्हणून व्हाॅल्टेअर प्रसिद्ध होता. ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात याव्यात ह्यासाठी त्याने चळवळी केल्या. लेख तर हजारो लिहिले. व्हाॅल्टेअरने लिहिलेले History Of Charles XII(१७३१), The Age of Louis XIV(१७५१)आणि त्याचा Essay on the Customs and Spirit of the Nations(१७५६) ही इतिहासाची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या इतिहासकारांप्रमाणे त्याने लष्करी कारवाया, लढाया, तह वाटाघाटी ह्यावरच भर न देता,त्या काळच्या सामाजिक परिस्थिती ती तशी का झाली, त्यावेळी विज्ञान, साहित्य, कला ह्यांत काय घडत होते ह्यासंबंधात जास्त लिहिले आहे. त्याच्या Essay on Customs…ह्या पुस्तकात त्याने संस्कृतीचा प्रवास आणि प्रगती ह्यांचा,फक्त देश समोर न ठेवता, जगाचा संदर्भ घेत मागोवा घेतला आहे. त्यामुळे केवळ एका राष्ट्राचा विशिष्ट संस्कृतीचा विचार येत नाही.किंबहुना राष्ट्राच्या संस्कृतीविषयी लिहूनही त्याने राष्ट्रवाद बाजूला ठेवूनच त्याने इतिहास, संस्कृति विज्ञान ह्या विषयी लिहिले आहे. हे सगळे लिहित असताना त्याने ज्ञात असलेल्या पुराव्यांची, संदर्भांची पुरेपुर छाननी करून व बुद्धिला प्रमाण मानून लिहिले आहे असे अनेक समीक्षकांचे मत आहे. वर अगोदर म्हटल्याप्रमाणे त्याने चर्चवर, त्यांचे इतर पंथ आणि धर्मासंबंधात जे असहिष्णूतेचे, वेळी क्रूरपणाचे वागणे होते; लोकांमध्ये श्रद्धेच्या आवरणाखाली अंधश्रद्धा जोपासण्याचे काम चालत असे, तसेच फसवणूकीचे वर्तन असे त्यावर कोरडे ओढले आहेत.

विशेषत: कॅथलिकांवर. राजसत्तेचे वाढते नियंत्रण घालण्याचे, विरोधी विचार मते ह्यांना दाबून टाकण्याचे, राज्यकारभारात चर्चचाही सहभाग असणे ह्या सर्वांवर त्याने पुस्तके, लेख लिहून तसेच आपल्या पत्रव्यवहारातूनही धारदार टीका केली आहे. ह्यामुळेच तो मत-विचार-भाषण-धर्म स्वातंत्र्याचा मुख्य पुरस्कर्त्यांपैकी मोठा मानला जातो. त्याच्या ह्या विचारांचा दूरगामी परिणाम झाला आहे. राजसत्तेच्या धोरणांमुळे इतरांप्रमाणे खुद्द व्हाॅल्टेअरलाही त्याचे चटके बसले आहेत. त्याचीही पुस्तके जाळली गेली.त्यालाही पोलिसांचा पाठलाग चुकला नव्हता.व्हाॅल्टेअरने आपली ही मते त्याच्या Treatise On Toleranc मध्येही चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहेत. व्हाॅल्टेअर इंग्लंडमधून परत फ्रान्समध्ये आल्यावर काही वर्षांने त्याने बाजारात पैसे गुंतवायला सुरूवात केली. त्यातून त्याने खूप संपत्ती मिळवली. त्याकाळी तो सर्वात श्रीमंत साहित्यिक होता. पैशाची सुबत्ता येण्यास राजा पंधरावा लुईची रखेल मादाम पाॅम्पिदूॅंशी असलेली त्याची मैत्रीही उपयोगी पडली असावी.

राजाच्या योजनांची माहिती ती व्हाॅल्टेअरला देत असे. पण मादाम पाॅंम्पिदूॅं किंवा दरबारातील मानाच्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या काहीजणांशी असलेल्या मैत्रीचा व्हाॅल्टेअरला फार फायदा करून घेता आला नाही. ह्याचे कारण त्याची धारदार वाणी आणि लेखणी. उपरोधिक विनोदाच्या वेष्टणातून बोलणे; उपहास विडंबनात्मक किंवा उपरोधिक लिहिणे ही त्याची वैशिष्ट्ये होती. पण सत्ता हाती असलेला राजा किंवा दरबारी माणसे त्यांच्यावरील टीका किती काळ सहन करतील! एकदा त्याने Le Encyclopedie मध्ये जिनिव्हा संबंधी लिहून त्यात स्विस लोकांचा अपमान केला. त्याचा उत्तम मित्र स्वत:ला व्हाॅल्टेअरचा विद्यार्थी मानणारा प्रशियाचा सम्राट फ्रेडरिक द ग्रेट बरोबरही व्हाॅल्टेअरने झगडा केला. त्यामुळे फ्रान्सचेच नव्हे तर स्वित्झर्लॅंडचे, जर्मनीचे पोलिसही त्याचा पिच्छा पुरवीत. एकदा म्हणण्यापेक्षा त्याला जास्तवेळा तुरुंगवासही घडला आहे. अशातच मादाम पाॅम्पिदूॅंचाही मृत्यु झाला. त्यामुळे फ्रेंच राजापाशी त्याची रदबदली करणारे बाजू घेणारे कोणी राहिले नाही.

सर्व अडचणी संकटे एकदम येतात तशी आली. त्यातली बरीच त्याने आपल्या स्वतंत्र विचार व धारदार लेखणी आणि वाणीने ओढवून घेतली होती. पण ह्या परिस्थितीतही व्हाॅल्टेअरने आपल्या चतुराईने व संपत्तीच्या बळावर मात केली. स्वित्झर्लॅंड व फ्रान्सच्या एकमेकांशी लागूनच असलेल्या सरहद्दीवर स्वित्झर्लॅंडच्या हद्दीत फर्नी येथे त्याने मोठा जमीन जुमला आणि घर घेतले. आणि दुसरे प्रचंड घरदार फ्रान्सच्या हद्दीत पण फर्नीला लागूनच टर्नी गावात घेतले. फ्रान्सचे पोलिस अधिकारी चौकशीला आले की हा,” माफ करा! मी दुसऱ्या परकी देशात राहात आहे.”असे सांगायचा. हेच उत्तर स्विस पोलिस अधिकाऱी आले की हा पटकन उंबरा ओलांडून ,” मी माझ्या देशात आहे.” असे खणखणीतपणे सांगायचा. त्याचा हा दोन्ही देशांतील सरकारांशी “तळ्यात की मळ्यात”खेळ चालू होता. व्हाॅल्टेअर त्याच्या अलिकडच्या व पलिकडच्या उंबरठ्यांच्या दोन्ही गावातील व आजूबाजूच्या गावातील सामान्य आणि गोरगरीबांसाठी, शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जायचा.फक्त लेख लिहून पत्रकांच्या द्वारेच नव्हे तर प्रत्यक्ष कोर्टकचेऱ्यांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवायचा. कोर्टात जाऊन उघड उघड अन्यायकारक व पक्षपाती निकालांविरुद्ध दाद मागून त्या निर्णयांवर पुन्हा विचार करायला भाग पाडायचा.गोरगरीबांना जाचक ठरणारे, भरडून काढणाऱ्या न्यायाधीशांची हकालपट्टी करवून घेतली.सामान्य लोक व गरीब माणसे व्हाॅल्टेअरच्या पाठीशी असत. जुलुम करणारे लहानांना छळतात. मोठे त्यांना दाद देत नाहीत किंवा सापडत नाहीत. हा नियम व्हाॅल्टेअर व सामान्यांनाही माहित होता. हे लोक वेळप्रसंगी व्हाॅलटेअरच्या बाजूने उभे राहात.

व्हाॅल्टेअरची ही दोन्ही घरे मोठी होती. व्हाॅल्टेअरची ख्यातीही दूरवर पसरली होती. त्याला भेटायला देशोदेशीचे विद्वान विचारवंत साहित्यिक येत असत. जवळपास वीस वर्षे व्हाॅल्टेअर फर्नी येथे एखाद्या संस्थानिकासारखा राहात होता. त्याचे घर “विचारवंतांचे माहेर”च झाले होते. आणि तो “बुद्धीमंतांचा राजा” अशा थाटात तिथे राहिला. बरेच वेळा पन्नास पन्नास नामवंत पाहुणे त्याच्या घरी पाहुणचार घेत असत! त्यांच्याशी व्यक्ति स्वातंत्र्य, धर्म, सहिष्णूता, तिच्याबरोबर येणारी बंधुता, साहित्य काव्य ह्यावर व्हाॅल्टेअरचे चर्चा सत्र, मता मतांतरातील वादविवाद सुरू असत.पाहुणचारासह अशा बौद्धिक मेजवान्याही झडत! अशीच चर्चा चालू असताना एकदा व्हाॅल्टेअर जे म्हणाला त्याची नोंद सर्व जगात आजही घेतली जाते. प्रत्येकाला आपले मत,विचार मांडण्याचा मूलभूत हक्क आहे ह्या तत्वावर तो किती ठाम होता त्यासंबंधीचा एक प्रसंग इतिहासात कायम नोंदला गेला आहे. एकजण बराच वेळ आपली बाजू मांडत आपल्या मताचे समर्थन करत होता. त्याचे सांगून झाल्यावर व्हाॅल्टेअर म्हणाला,” महाशय, तुम्ही मांडलेली मते व त्यासाठी केलेला युक्तिवाद बिनबुडाचा आहे. तो कुठेही टिकणारा नाही. मी तुमच्या विचारांशी सहमत नाही.” “ पण”, (पुढचे ऐका) व्हाॅलटेअर पुढे म्हणतो, “पण तुम्हाला तुमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचा तो हक्क कायम राहावा ह्यासाठी मात्र मी शेवटपर्यंत लढत राहीन.”

व्हाॅल्टेअर चांगला साहित्यिकही होता. त्याची सुरवातीची नाटके अत्यंत यशस्वी झाली होती. तो कविही होता. त्याच्या लेखनाची सुरवातही कवितेनेच झाली. त्याने एक मोठे दीर्घकाव्य लिहिले. त्याचे नाव Henriade. त्यानंतर तसेच एक Maid of Orleans हे आणखी एक काव्य लिहिले. आधुनिक काळात Henriade कुणी वाचणार नाही खरे. ते कंटाळवाणे वाटेल. पण त्याच्या काळात त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली होती. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात त्याच्या एकूण पासष्ठ आवृत्या प्रसिद्ध झाल्या होत्या! फ्रेंच राजा चौथ्या हेन्रीवर ह्या काव्याचा खूप प्रभाव पडला. त्याच्यात मोठा बदल घडून आला असे तो म्हणतो. त्या काव्यातील सहिष्णूता व उदारमतवाद ह्यांचा चौथ्या हेन्रीवर चांगला परिणाम झाला होता. त्याने आपल्या कारभाराचे धोरण ह्या तत्वावर आखले होते. त्याचे प्रतिबिंब त्याच्या Edict of Nantes ह्या आज्ञापत्रात पहायला मिळते! साहित्याचा परिणाम समाजावर फारसा कधी होत नाही किंवा साहित्याने क्रांति घडून येत नाही ह्या मताला हेन्रीच्या राज्यकारभाराचे धोरण ठरवणाऱ्या त्याच्या ह्या मार्गदर्शक राजाज्ञेतून उत्तर मिळते! ह्या बरोबरच व्हाॅल्टेअर धार्मिक स्वातंत्र्याचा, धर्म व राजसत्ता ही पूरणपणे वेगळी असावीत, विचार व उच्चार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ह्या बाबतीत तो लेखन व चर्चा करीत असे.

हा नागरी हक्कांचाही पुरस्कर्ता होता. त्यामध्ये सर्वांना समान न्याय हवा, जे दुबळे गरीब आहेत त्यांच्या बाबतीत तर तो कोर्ट कचेऱ्यात त्यांचे खटले स्पष्टपणे न्याय्य पद्धतीने चालून योग्य न्याय मिळावा ह्यासाठी झगडत होता. तसेच करपद्धतीत जी विषमता होती त्यात बदल व्हावा ह्यासाठीही तो सत्ताधाऱ्यांना सुनावत होता. फर्नी येथे असताना व्हाॅल्टेअरने आपली जगप्रसिद्ध Candide ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी म्हणजे त्या वेळी फार चर्चिल्या व मोठे पाठबळ मिळालेल्या आदर्श अशा आशावादाची चलती होती. आशावादाचे तत्वज्ञान सांगते की विश्वातील वेगवेगळ्या जगामध्ये हे आपले जग सर्वांत चांगले आहे आणि इथे सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच होते. हे तत्वज्ञान लोकप्रिय होते आणि त्याच काळात व्हाॅल्टेअरवर अनेक संकटे आली. संकटांना व इतर अडचणींना तो तोंड देत जगत होता. म्हणजे आशावादाने सांगितलेल्या विरूद्ध स्थितीत व्हाॅलटेअर दिवस काढत होता! म्हणून काही अंशी त्याची Candide कादंबरी ह्या आशावादी तत्वज्ञानाला व काही अंशी व्हाॅल्टेअरच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून लिहिली गेली.

कॅन्डाईडCandide हा राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुखातच वाढला. त्याच्या राजवाड्यासारखाच ह्याचाही प्रासाद. आईवडील प्रेमळ,चांगले. डाॅ.पॅनग्लाॅस हे सुद्धा त्याहून चांगले. त्यानींच कॅन्डाईडला हे जग चांगले; ह्यातील सर्व काही चांगले; घडते ते आपल्यासाठी चांगलेच अशी सगळी चांगली शिकवण दिली. आणि इथूनच महाभयंकर घटनांना सुरुवात होते.कॅन्डाईडवर लेखक व्हाॅल्टेअर इतके भयानक घोर-अघोरी प्रसंग आणतो. पण कॅन्डाईडचा चांगल्यावरचा विश्वास ढळत नाही. पण जवळचे सर्व काही गमावल्यावर अखेर तो एका बेटाला लागतो व तिथे तो व्हाॅल्टेअरच्या शब्दांत- “तिथे तो आपली बाग फुलवत राहतो”! आशावादी तत्वज्ञान उदयाला आले. सतत चर्चेत राहिले त्याच वेळेस व्हाॅल्टेअर विपरित प्रतिकूल परिस्थितीतून जात होता. त्यामुळेच त्याने प्रतिक्रिया म्हणून ही कादंबरी लिहिली. पण कादंबरीत त्याने आशावादाचे समर्थन केले नाही किंवा निराशवादाला उचलून धरले नाही. चांगले आणि वाईट दोन्ही लिहिले आहे.तटस्थपणे वस्तुस्थिती काय असू शकते हे लिहिले आहे. आजूबाजूचे भान ठेवून ज्याचे त्याने आपले नंदनवन फुलवावे असे म्हणत त्याने काय ठरवायचे ते वाचकांवरच सोपवले आहे. व्हाॅल्टेअरने वीस हजार पत्रे लिहिली, दोन हजार पुस्तके, पुस्तिका,लेख लिहिले. नाटके कविता सर्व लिहिले. पण आजही टिकून आहेत ती त्याची पत्रे व Candide! ही कादंबरी! त्यानेआपले इतर सर्व व्याप सांभाळत असताही, फक्त चारआठवड्यात ती लिहिली ! कथानक अतिशय वेगवान आहे. वाचायला घेतलीत तर दोन अडीच तासांत वाचून संपवालही. पण कित्येक दिवस विचार करत राहाल अशी आहे. वाचकासाठी हाच उत्कृष्ट वा•डमयकृतीचा हा बोनस असतो!

इतके सर्व चांगले होत असूनही प्रत्येक मोठ्या माणसाला टीकाकार असतातच. स्वत: व्हाॅल्टेअरने रूसाॅंवर बरेच वेळा टीका केली. त्याच्या कादंबऱ्य्वर उपरोधपूरण टीका केली. पण व्हाॅल्टेअर रूसाॅंचे साहित्य वैचारिक निबंध काळजीपूर्वक वाचत असे. रूसाॅंची वीस पंचवीस पुस्तके त्याच्या लायब्ररीत होती. त्यातील सर्व महत्वाच्या पुस्तकांत व्हाॅल्टेअरने केलेल्या टीपा टिपणीही आढळतात. रूसाॅंनेही व्हाल्टेअरवर तो ज्या सहिष्णुतेचा इतका डंका वाजवतो ती त्याने जिन्हिव्हाच्या संसदसभासदांबाबत का दाखवली नाही? असा प्रश्न विचारून सहिष्णुता बाळगणे व्हाॅल्टेअरलाच आवश्यक आहे असा टोला मारला आहे. तर व्हाॅल्टेअरने रूसाॅंच्या Discourse on the Origin of Inequality वर टीका करताना, “हे म्हणजे आता सगळ्यांनी चार पायांवर चालावे असे सांगण्यासारखे आहे; मी साठ वर्षाचा असल्यामुळे मला ती जुनी सवय पुन्हा अमलात आणणे शक्य नाही!” अशी खवचट टीका केली होती. इंग्लंडचा तत्वज्ञानी व इतिहासकार व्हाॅल्टेअरच्या इतिहासलेखन व मतांविषयी टीका करताना म्हणतो की त्याने इतिहास विषयाला इतिहासाला वाहून घेतलेले नव्हते; व लिहिले ते जास्त करून कॅथलिकांविषयीच्या विरोधामुळे लिहिले असे वाटते.

व्हिक्टर ह्युगो म्हणतो की ,”अठरावे शतक म्हणजे व्हाॅल्टेअर!” रूसाॅं हा जवळपास त्याचा समकालीन. तोही व्हाॅल्टेअरसारखाच प्रतिभावान. दोघांचेही कीर्तिसूर्य तळपत होते. पण डेव्हिड ह्यूमच्या मते काही काळ असा होती की रूसाॅंने व्हाॅल्टेअरला पूर्ण झाकले होते. आपल्यासाठी अर्थ इतकाच की दोघेही थोर होते. त्यासाठी फ्रान्स व जिन्हिव्हाने दोघांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त केली ते सांगतो. ज्या Ferney येथे व्हाॅल्टेअरने वीस वर्षे वास्तव्य करून फर्नेला मोठे केले त्या फर्नीचे नाव फ्रान्सने व्हाल्टेअरच्या जन्मशताब्दीला कृतज्ञतेने ‘व्हाॅल्टेअरचे फर्नी’Ferney-Voltaire असे केले! तसेच अखेरच्या वर्षांत ज्या अर्मनव्हिल येथे रूसाॅं राहात होता तिथल्या सुंदर पार्कला रूसाॅंचे नाव दिले आहे. आणि जिनिव्हाने तिथल्या सरोवराकाठी रूसाॅंचा पुतळा उभा केला आहे. १९४४ साली दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नाझींच्या ताब्यात गेलेल्या फ्रान्सची मुक्तता झाली त्यानंतर फ्रान्सने आणि रशियातही व्हाॅल्टेअरची २५० वी जयंती साजरी केली. त्यावेळी रशियाने म्हटले होते की व्हाॅल्टे्अरचे नावच नाझी फॅसिस्टांचा थरकाप उडवित असे! व्हाॅल्टेअर “, नागरी हक्क,विचार स्वातंत्र्य, न्याय ह्यांचे प्रतिक होता.” रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट म्हणाली,की “ती सोळा वर्षाची असल्यापासून व्हाल्टेअरचे विचार वाचत असे.” व्हाॅल्टेअरच्या अखेरच्या वर्षांत तिचा त्याच्याबरोबर पत्रव्यवहारही चालू होता. तिच्या पत्रातून ती विद्यार्थिनीच्या भूमिकेतून लिहिते असे दिसते.

व्हाॅल्टेअर गेल्यावर त्याचा सर्व ग्रंथ संग्रहालय तिने विकत घेतला. त्यानंतर तो आता रशियाच्या राष्ट्रीय संग्राहालयात पीटस्बर्गमध्ये आहे. व्हाॅलटेअर जसा प्रतिभावंत साहित्यिक होता तितकाच बुद्धिमान विचारवंत होता. साहित्यिक व्हाॅलटेअरवर फ्रान्सचा उपरोधिक विनोदी लिहिणारा नाटककार मोलिअे, शेक्सपिअर, स्पॅनिश कादंबरीकार सर्व्हॅंटिस, महाकवि होमर, वैज्ञानिक न्यूटन ह्यांचा प्रभाव होता. तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरवर फ्रान्सिस बेकन,जाॅन लाॅक,व धर्म संस्थापक झरतुष्ट्र ह्यांचा प्रभाव होता. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकेतील क्रांति, मार्क्स, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, कॅथरिन द ग्रेट आणि तीनशे वर्षानंतर आजही ह्या ना त्या रूपात दिसतो. त्या विचारांची चांगली फळेही आपण उपभोगत आहोत, हे विसरता येणार नाही.

Jean-Jacques Rousseau (रूसाॅं)

दिवाळीसारख्या सणासुदींच्या सुट्ट्यांत आम्ही सगळे नातेवाईक एकमेकांकडे एकत्र जमत असू. तेव्हा जेवणापूर्वी व नंतरही दुपारचा चहा होईपर्यंत चालू घडामोडी व इतर बऱ्याच विषयांवर गप्पा चर्चा होत असत. त्यातच कधी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातले टप्पे, त्या जुलैत झालेला उठाव अशा अनेक बाबींवर चर्चा होत असे. त्यावेळी आणि शाळेत परशुराम हरी बर्वे ह्यांचे इतिहासाचे भले जाडजूड पुस्तक उघडायला लावून सर,फ्रेंच राज्यक्रांती संबंधी सांगत त्यावेळीही रूसाॅं आणि व्हाॅल्टेअर ही दोन नावे कानावर पडत. त्यांचे विचार-स्वातंत्र्य, भाषण-स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य किंवा धर्म आणि राज्यसत्ता, व कारभार ह्यांचा एकमेकांशी संबंध, सरमिसळ असू नये असे ऐकल्याचे व संक्षिप्तात वाचल्याचेहीआठवते. आणि परीक्षेत तसे लिहिल्याचेही आठवते.व्हाॅल्टेर व रूसाॅं हे दोघे विचारी आणि जगाला त्यांच्या काळी काही नवीन विचार तत्वज्ञान देणारे असावेत इतपत माहिती असायची.

व्हाॅल्टेअर व रूसाॅं तसे समकालीन. व्हाॅल्टेअर १६९४ साली जन्मला तर रूसाॅंचा जन्म त्याच्यानंतर १८ वर्षांनी १७१२ साली झाला. पण योगायोग असा की ज्यांच्या विचारांचा प्रभाव तीन शतकंनंतर आजही टिकून आहे ते हे दोघे विचारवंत एकाच साली म्हणजे १७७८ साली वारले. दोघांच्या आयुष्यातील काही घडामोडीत पुष्कळच साम्य आहे. दोघांनीही बरेच वेळा देशांतरे करावी लागली. पण त्यातही रूसाॅंला तर फारच वेळा. व्हाॅल्टेअर रूसाॅंपेक्षा बराच जमीनीवर पाय रोवून उभा असायचा.म्हणायचेच तर रूसाॅं हा आयुष्यभर असमाधानी,अस्वस्थ आत्म्यासारखा होता. त्यात त्याचाही दोष नाही. तो त्याच्या काळाच्या फार पुढचा विचार करीत असे.,तो स्वतंत्र कल्पनाविश्वात विहार करणारा म्हणा किंवा स्वप्नवादी -इंग्रजीत Romantic म्हणतात तसा होता.पण तशा काळाच्या पन्नास वर्षे आधी तो जन्मला होता! रूसाॅं तितकाच बुद्धिवादी होता. व्हाॅल्टेअरला त्याच्या राजदरबारी चांगले संबंध असूनही दोन वेळा लहान मोठे तुरुंगवास भोगायला लागले. रूसाॅंवर तशी पाळी आली नाही. कारण अशा संकटकाळी त्याला बायकांनीच मदत केली. रूसाॅं जेथे गेला तिथल्या बायका, ह्या कलंदर पण फटकळ, दुसऱ्यांशी फार दिवस न पटवून घेणारा, मतभेदांचे रुपांतर भांडणात करणारा, पण बुद्धिमान व स्वतंत्र विचारांच्या ह्या तरूण व देखण्या विचारवंतावर फिदा असत.त्याची सोबत रूसाॅंला बरेच वेळा मदत करणारी ठरली. अनेक देशांतून त्याला बाहेर काढण्यात आले होते. बरेच आयुष्य देशांतरातच गेले. कारण त्याचे विचार त्या काळात स्फोटक होते. पण एक गोष्ट निर्विवाद होती की रूसाॅं हा युरोपमधील प्रसिद्ध माणूस होता. त्याला सगळे बुद्धिमंतही दबून होते. समाजातील कोणी महत्वाचे धार्मिक अधिकारी,धार्मिक पुढारी असो की निधर्मी मतांचे विचारी असोत, तो त्या धार्मिक व निधर्मी दोघांचाही नावडता होता. दोघांनाही रूसाॅंचा मोठा धसका होता.पण गंमत अशी की रूसाॅं दैवी देणगीला मानत होता. तो नास्तिक नव्हता पण धर्माबाबत त्याचे स्वतंत्र विचार होते. निसर्गाचा तो भोक्ता होता. निसर्गातील सौदर्याकडे , निसर्गाकडे त्याने समजाचे लक्ष पुन्हा वेधले. पण प्रस्थापित व्यवस्थेतील सगळ्या संस्थांना त्याची भीती वाटत असे. रूसाॅंला फार थोडे मित्र होते. त्याला आयुष्यात अनेक अपयशे पचवावी लागली. पुढच्या काळातील शेली, बायरन सारखे कवि आणि व्हिक्टर ह्युगो सारखे त्यावेळच्या अनेकांपेक्षा वेगळ्या प्रतिभेचे लेखक निर्माण झाले त्याचे श्रेय रूसाॅंच्या विचारांना आहे. त्याचा ह्या साहित्यिकांवर मोठा प्रभाव होता. रूसाॅंच्या A Discourse on the Origin of Inequality आणि The Social Contract ह्या दोन्ही पुस्तकातील विचार व तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आजच्या सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञावर आहे. त्याच प्रमाणे व्हाॅल्टेरच्या भाषण-स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व्यवहारातील मोकळेपणा, धर्माचा आणि सत्तेचा एकमेकांशी संबंध असू नये ह्या मतांचा पगडा आजही आहे.त्या दोघांच्या विचारंचा अलिकडच्या जडण घडणीत फार मोठा वाटा आहे. Jean-Jacques Roussaeu चा जन्म १७१२ साली जिन्व्हा येथे झाला. त्यावेळी ते स्वतंत्र होते. त्याच्या आईवडिलांना जिन्न्हीव्वाचा अभिमान होता.आई तर जिन्हिव्हा स्पार्टन सारखे Republic आहे म्हणायची. झाला उणेपुरे ५५-५६ वर्षाचे आयुष्य लाभलेला

रूसाॅं १७७८ मध्ये वारला. तो युरोपमधील प्रख्यात विचारवंत होता. पण त्याला एका देशात फार दिवस राहता आले नाही. ज्या ज्या देशात तो जाई तिथून त्याला बाहेर पडावे लागत असे.किंवा तो स्वत:हून बाहेर पडत असे. आयुष्यभर तो हद्दपाराचे जीवन जगला. त्याच्या,काळाच्या पुढच्या स्फोटक विचारांचा धसका धार्मिकांना आणि निधर्मींना दोघांनाही होता.प्रस्थापित व्यवस्थेला,संस्थांना,त्याच्या विचार व युक्तीवादाने तो केव्हाही खाली खेचू शकतो; सुरुंग लावून ते उध्वस्त करू शकतो ही त्यांची कायमची भीती होती. त्यामुळे रूसाॅं जेव्हा मेला त्यावेळी धर्मवाद्यांनी व निधर्मी विद्वानांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार ह्यात शंका नाही. पण पुढील अर्धशतक रूसाॅंच्या विचारांनी भारले होते.तसेच त्यानंतरच्या काळातही रुसाॅंच्या विचाराने तरूण पिढीही प्रभावित झाली होती. रूसाॅंचा जन्म स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथे झाला. पण त्याकाळी जिनिव्हा हे स्वतंत्र राज्य होते. ते प्राॅटेस्टंट राज्य होते. प्राॅटेस्टंट पंथाला रूसाॅंचा विरोध नव्हता. पण त्याचे वादळी व्यक्तिमत्व व विचारांना प्राॅटेस्टंटवादी समजू शकत नव्हते. रूसाॅंने जिन्हीव्हा सोडले.काही काळ तो फ्रान्समध्ये राहिला. पण नंतर लगेच तो त्यावेळी स्वतंत्र असलेल्या व्हेनिसमध्ये आला. पण व्हेनिस मधूनही तो लवकरच बाहेर पडला.

डाॅ. सॅम्युअल जाॅन्सन ह्या प्रख्यात इंग्लिश विद्वानाचा मित्र व त्यांचा चरित्रकार जेम्स बाॅस्वेलच्या सहाय्याने व लेखक तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम यांच्या सोबतीने रूसाॅं इंग्लंडमध्ये वास्तव्यास आला. पण थोड्याच काळात त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्यांच्या मदतीने व आधाराने तो इंग्लंडमध्ये आला होता त्या बाॅस्वेल व ह्यूम ह्यांच्याशीच वादविवाद घालून, भांडून,तो वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पुन्हा फ्रान्समध्ये आला! पण ह्या मागे रूसाॅंला वाटणारीही कारणे होती. रूसाॅं इग्लंडमध्ये आल्यावर खूप लोकप्रिय होता. काही दिवसांनी जेव्हा त्याने त्याच्या मतांनुसार काही गोष्टींवर व लोकांवर टीका केली. त्यातून अनेक गोष्टी वाद निर्माण झाले. वर्तमानपत्रातून रुसीॅंवर वैयक्तिक टीका, नालस्ती व त्याने पूर्वी काही लिहिलेले लेख प्रसिद्ध होऊ लागले. ह्यात व्हाॅल्टेअरनेही लेख पुरवले होते. अशावेळी आपला मित्र ह्यूमने आपली बाजू घेऊन उभे राहायला हवे असे रूसाॅंला वाटत होते. पण ह्यूम गप्प राहिला. शिवाय रूसाॅंच्या काही व्यक्तीगत गोष्टी ह्यूमलाच त्याने सांगितल्या होत्या त्याही सार्वजनिक झाल्या.ह्याचा विषाद व राग रूसाॅंला येणे स्वाभाविक असे रूसाॅंच्या बाजूच्या लोकांचे म्हणणे आहे. त्या ुळे तो फ्रान्समध्ये परत आला. आणि काही वर्षे राहून तेथेच १७७८ साली पॅरिस जवळील अर्मनव्हिल येथील लहानशा बंगल्यात त्याचे निधन झाले.

रूसाॅंची साहित्यिक कारकिर्द त्याच्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी सुरु झाली. Academy of Dijon ने निबंध स्पर्धा जाहीर केली होती. विषय होता Has the Progress of the Arts and Sciences Contributed more to the Corruption or Purification of Morals? त्यात भाग घेऊन आपल्या लेखात,रूसाॅंने त्यावेळी स्फोटक वाटणारा आपला विचार निबंधातून मांडला. त्याने संस्कृतीनेच- सुधारणेनेच नैसर्गिक चांगुलपणाचा नाश केला असा थेट हल्ला चढवला. रूसाॅंनेच स्पर्धा जिंकली हे निराळे सांगायला नको.त्याने बक्षिस व नाव दोन्ही मिळवले! ह्या निबंधामुळे L’ Encyclopedie चा संपादक तत्वज्ञानी व लेखक डाइडेराॅचे Diderot चे लक्ष वेधून घेतले. त्याने रूसाॅंकडे आपल्या एनसायक्लोपिडियेसाठी लेख मागितला.रूसाॅंने आपला Discourse on Political Economy हा राजकीय अर्थशास्त्रावर लेख लिहून पाठवला. हा लेख १७५५ साली प्रसिद्ध झाला.ह्या लेखामुळे रूसाॅं आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आला! ह्या यशानंतर त्याने आपली पहिली कादंबरी La Nouvelle लिहून प्रसिद्ध केली. कादंबरीत एका सामान्य परिस्थितीत वाढलेल्या मुलीची कथा आहे. ही कादंबरी वाचकांना आवडली. ह्या कादंबरी पाठोपाठ त्याची दुसरी कादंबरी Emile आणि त्याच बरोबर त्याचा आजही महत्वाचा मानला जातो तो The Social Contract हा वैचारिक तत्वज्ञानाचा ग्रंथ १७६२ मध्ये प्रकाशित झाला.

एमिल ही कादंबरीचे रूप घेऊन आलेली रूसाॅंच्या, निसर्गाशी जवळीक साधून त्याचे ज्ञान करून देणारी शिक्षण पद्धती असावी, ह्या विचारांची कथा आहे. रूसाॅचे शिक्षणपद्धतीविषयीचा आणखी एक महत्वाचा विचार आजही मानला जातो. लहान मुलांना शिक्षणाची सुरवात करतांना ते मूल हेच मध्यवर्ति केंद्र मानून अभ्यासक्रम असावा हे त्याचे मत होते. ते आजही आपल्याला माॅंन्टेसरी पद्धतीत पाहायला मिळते. त्याचे Confessions हे अति धक्कादायक आत्मचरित्रात्मक पुस्तक मात्र त्याच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. धक्कादायक अशासाठी की आतापावेतो कोणत्याही मान्यवर लेखकाने स्वत:च्या वैयक्तिक बाबी, घटना, प्रसंग इतके उघड व स्पष्ट करून लिहिले नव्हते. पुस्तकातून रुसाॅंच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाज कळतात. ह्या अगोदर, १७४९मध्ये झालेल्या निबंध स्पर्धेनंतर १७५५ साली Dijon Academy ने आणखी एक स्पर्धा जाहीर केली. विषय होता How has a Condition Of Inequality among come about? ह्या प्रश्नाचे जे उत्तर रूसाॅंने आपल्या प्रबंधातून दिले ते रूसाॅंच देऊ शकेल असे आहे. त्याच्या पहिल्या प्रबंधात मांडलेल्या विचारांचाच विस्तार ह्या दुसऱ्या विचारपरिपूर्ण निबंधात आहे. रूसाॅं ह्यामध्ये प्रश्नाचे स्वरूप थोडेसे बदलून म्हणतो, माणसाच्या दु:खाचा,निराशेचा उद्भव, उगम कसा झाला हा मूळ प्रश्न आहे. माणूस मुळात स्वाभाविकरीत्या दु:खी होता की त्याच्या प्राथमिक अवस्थेतून सुधारणेच्या क्रियेतून जात असता (सुसंस्कृत होण्याच्या क्रियेतून)तो दु:खी होत गेला? प्राथमिक अवस्थेतला माणूस ज्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांतून गेला त्यातच माणसाच्या दु:खाचा उगम आहे असे रूसाॅंचे म्हणणे आहे. पुढे त्याचे विश्लेषणही तो करतो.

माणसाच्या स्वभाववृत्तीविषयी रूसाॅंसारखेच विवेचन हाॅब्स आणि जाॅन लाॅक या दुसऱ्या राजकीय तत्वज्ञांनीही केले. पण त्यांच्या मतात व रूसाॅंच्या मतात फरक आहे. हाॅब्सच्या “ प्रारंभी माणूस एकटा,गरीब,आोंगळ असभ्य, पशूसारखा रानवट व अपूर्ण होता”, किंवा लाॅकच्या “ प्रारंभी माणूस त्याच्या सभोवताी असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना घाबरत होता.” ह्या मतांशी सहमत नव्हता.तो उलट विचारतो,” माणूस त्याच्या त्या अवस्थेतही सुखी आनंदी होता असे का म्हणू नये? तो आनंदी समाधानी असण्यासाठी जरूर त्या सर्व गोष्टी त्याच्या जवळ होत्या. अन्न, स्त्री, आणि निद्रा, सर्व काही त्याला प्राप्त होते. शिवाय त्याची प्रगती आणि तो परिपूर्ण होण्याच्या क्रियांतून पुढे मिळणाऱ्या सोयींचे वा सुखाचे त्याला ज्ञानही नव्हते. त्यामुळे ती आता नाहीत ह्याचे दु:ख व निराश होण्याचे त्याला कारणही नव्हते. बरे दुसऱ्या कुणाशी तुलना करता तो असमाधानी होता म्हणायला त्याच्या सारखा दुसराही त्याच स्थितीत होता. फरक असेल तर उंची वजन, देहयष्टी, चालण्या पळण्याचा वेग ह्यामध्ये असेल!”

माणसात हा बदल कसा घडून आला, म्हणजेच माणूस दु:खी निराश कसा झाला? तर त्याचे खापर रूसाॅं सुसंस्कृततेच्या क्रिया प्रक्रिया ह्यावर फोडतो. तो आपल्याला परखड शब्दांत सांगतो,” ज्या क्षणी माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज वाटू लागली, ज्या क्षणी कुणाही एकाला दोघांसाठी तरतूद करावी वाटू लागले, त्या क्षणी समानता संपली व मालकी,मालमत्ता आली. काम करणे, राबणे आवश्यक झाले. विशाल जंगले तोडली जाऊ लागली. त्या ठिकाणी वाऱ्यावर डोलणारी हिरवी पिवळी पिकांची शेती दिसू लागली. शेतीत राबणे आले. आपला घाम गाळून पिकाला पाणी देणे भाग पडले. त्यातूनच पुढे शेतातल्या पिकांबरोबरच गुलामगिरी आणि वेठबिगारीही वाढू लागली! “ धातुशास्त्र आणि शेती ह्या दोन्हींमुळे माणसाच्या जीवनात क्रांति झाली. साहित्यिक,कवि सांगतात सोन्या चांदीमुळे क्रांति झाली.पण तत्वज्ञानी म्हणतात धातु म्हणजेच लोखंड आणि मका( तांदूळ गहू इ. कोणत्याही धान्याचे नाव चालेल) ह्या दोन वस्तूंनी प्रथम माणसात सुधारणा आणली.त्याला सुसंस्कृत केले आणि मानवाची मोठी हानि केली.रूसाॅंच्या मते प्रगतीने माणसात विषमता आणली व त्याला दु:खी केले. प्रगति,विकास हा माणसाला उध्वस्त करण्यास कारणीभूत आहे असे जाॅन डनला वाटते तसेच रूसाॅंलाही. नुकतीच औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली होती. समाजव्यवस्थेत मोठी उलथापालथ घडून येत होती. त्याचाही परिणाम रुसाॅंसारख्या संवेदनाशील बुद्धिमान व प्रतिभाशाली विचारवंतावर होणे अपरिहार्य आहे. असे असले तरी आपल्या ह्या उदास किंवा नकारात्मक निष्कर्षांनाही त्यानेच आपल्या The Social Contract ह्या वैचारिक प्रबंधात उत्तर दिले आहे.

माणूस प्राथमिक अवस्थेतच असावा असे त्याचे म्हणणे नव्हते.तरीही त्याच्या ह्या प्रबंधाला मोठा विरोध झाला. व्हाॅल्टेअरनेही केला. पण त्याही पेक्षा फ्रान्सच्या मंत्रिमंडळाने रूसॅांच्या निबंधावर टीकेचा भडिमार केला. त्यामुळे तो बरीच वर्षे फ्रान्सबाहेरच राहिला. रूसाॅं आपले विचार स्पष्ट थोडक्या आणि नेमक्या शब्दांत मांडणारा लेखक होता. त्याचे हे The Social Contract हे पुस्तक छोटे खानी फक्त पन्नास पानांचे आहे. रूसाॅंने पन्नास पानात जेव्हढे परिणामकारक लिहिले आहे तसे लिहायला दुसऱ्या कोणा लेखकाला पानेच्या पाने खर्चावी लागली असती! त्याची ही वाक्येच पहा-Man is born free; and everywhere he is in chains. One thinks himself the master of others,and still remains a greater slave than they. How did this come about? I don’t know. What can can that make it legitimate ? That question I think I can answer. स्पष्ट, चांगल्या लिखाणाचा हा एक सुंदर नमुना आहे. पण वाचक रुसाॅंच्या केवळ शैलीसाठी त्याचे प्रबंध वाचत नसतो.तो विचारतो ते प्रश्न व त्यांची जी उत्तरे तो देतो त्यासाठी तो रुसाॅंच नव्हे तर जाॅन लाॅक, व्हाॅल्टेअर, जाॅन स्टुअर्ट मिल सारख्यांचे विचार वाचतो.अर्थात शैली आणि विचारांतील व लेखनातील स्पष्टता हे सुद्धा वाचकाला आकर्षित करतात.पण विचार महत्वाचे. लो. टिळकांची प्रसिद्ध गर्जना “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ह्याचे मूळ रूसाॅंच्या पहिल्याच “Man is born free’ मध्ये आहे. रूसाॅंला माणसाने प्रगती केली आहे, करत आहे हे मान्य आहे.पण त्यामुळे होणारे समाजाला घातक ठरणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी काही केले पाहिजे ह्याचेही भान त्याला आहे.

माणूस एकट्याने जे करील त्यापेक्षा सर्व एकत्रित होऊन जे काम करतील त्याचे फळही तितकेच मोठे असणार. आपल्या “गाव करेल ते राव काय करेल” ह्या म्हणीची आठवण होईल. ह्या बरोबरच काही प्रश्न निर्माण होतात. त्या साठी सर्वांनी एकत्र येणे,प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार श्रम, कौशल्य, धन हे समुहासाठी देणे हा मार्ग तो सुचवतो. पण हातभार लावण्यात कुणाचाही अपवाद असणार नाही(ह्या अटीत समानतेचे तत्व अध्याहृत आहे). प्रत्येकाच्या सहभागातून सामूहिक उत्पादन व त्याचे मोठे फळ समुहाला मिळेल. प्रत्येकाला त्याच्या सहभागापेक्षा जास्त फळ मिळेल.सुह व सामूहिक प्रयत्नांचे फळ हे, ‘ते ते सगळ्या गावाचे’असे कविवर्य बोरकर म्हणतात. सामुहिक सहभागाच्या विचारांचा कार्ल मार्क्स व एन्गल्स वर प्रभाव पडला असणार. त्यामधूनच मार्क्सला शेतकरी, कामगारांचे, मजुरांचे श्रम कष्ट हे सुद्धा त्यांनी गुंतवलेले भांडवलच आहे हा विचार सुचला असावा. रशिया, चीन मधील ‘कम्युन’ चा उगमही रुसाॅंच्या विचारांत आहे. आपल्या महाराष्ट्रातील अर्थतज्ञ डाॅ.धनंजयराव गाडगीळांनी व औपचारिक शिक्षण फार न झालेल्या विखे पाटलांनी ती ‘सहकार’, ‘सहकारी संस्था’ ह्या रूपाने प्रत्यक्षात आणली. यशवंतराव चव्हाणांनी सहकारी चळवळीला सरकारचे धोरण म्हणून आणखी वाढवले. एकत्रित आलेल्या समुहाचे संघटनेत रूपांतर होते. मग त्या संघटना, संस्था ह्यांचे स्वरूप वेगवेगळेही असेल. सामुहिक कार्याचे फळ प्रत्येक घटकाला जास्तच मिळेल. पण प्रत्येक घटकांने (व्यक्तीने) त्यासाठी आपले पूर्ण बळ दिले तरी आपले -स्व -स्वातंत्र्य गमावता कामा नये. कोणत्याही संघटनेतील, संस्थेतील एकाच्या अथवा इतर दुसऱ्या काही जणांच्या म्हणण्यास संस्था, संघटना, त्यातील काही व्यक्ती किंवा गटाविषयीच्या श्रद्धेमुळे किंवा आस्थेमुळे, हो ला हो करू नये. आपण होयबा होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी स्वत:ही विचार करून मत ठरवणे आवश्यक आहे.,रूसाॅंची ही सूचना महत्वाची आहे. तो धोक्याची घंटा वाजवतोय.

राजकीय तत्वज्ञानी रूसाॅंवर प्लेटो, हाॅब्स, जाॅन लाॅक Diderot , व्हाॅल्टेअर ह्यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर रूसाॅंचा प्रभाव हा पाश्चात्य जगातील प्रबोधन काळावर पडला. हा ज्ञानप्रकाशाच्या काळत रूसाॅंचा मोठा वाटा आहे. रूसाॅंचा ज्यांच्यावर प्रभाव पडला त्यात तत्वज्ञ कान्ट, फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकन राज्यक्रांति, फ्रान्सचा राॅब्सपियेर, डेव्डिड ह्यूम, कार्ल मार्क्स, एन्गल्स, लिओ टाॅलस्टाॅय, बाल शिक्षणतज्ञ माॅन्टेसरी अशा अनेक मोठ्या व्यक्तीं व त्याच्या विचारसरणीवर पडला आहे. आज हे विचार आपल्याला विशेष वेगळे स्फोटक वाटत नाहीत. कारण आपण त्यांचीच फळे चाखत आहोत हे माहित नसते. पण आपल्याला ते विचार माहित आहेत असे वाटते. पण रूसाॅं, व्हाॅल्टेअर,लाॅक,मिल, चाणक्य, कणाद, चार्वाक अशा सारख्या तत्वज्ञानी विचारवंतांनी असे कितीतरी वेगळे विचार अनेक शतकांपूर्वी सांगितले आहेत. मधल्या काळातील विद्वानांनी, विचारवंतांनी त्यात काळानुरूप बदल करत त्यामध्ये भर घातली. ते सुविचार काळाच्या प्रवाहातून झिरपत आपल्यापर्यंत आले. त्यांची फळे आज आपल्याला चाखायला मिळतात.

रूसाॅंवरही त्याच्या काळात टीका झाली. विशेषत: रूसाॅं ज्याचा नेहमी आदरपूर्वक मान ठेवायचा त्या व्हाॅल्टेअरने तर रूसाॅंच्या कादंबऱ्यांवर उपरोधातून कडक टीका केली. रूसाॅं व व्हाॅल्टेअर हे दोघेही मोठे बुद्धिमान व थोर विचारी होते.फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर ह्या दोघांचा प्रभाव होता. दोघांनाही क्रांतीतील सर्व पुढारी मानत होते. पण त्यांच्या काळांत ते दोघे एकमेकांचे विरोधक होते असे वाटते. विरोधक असूनही, रूसाॅं व्हाॅल्टेअरविरूद्ध कोणी वावगे बोलले किंवा काही लिहून दाखवायला अाला तर तो त्यांना कठोर शब्दांत सुनवत असे व व्हाॅल्टेअर हा फार मोठा माणूस आहे ह्याची जाणीव करून देत असे. रुसाॅं वारला. त्यानंतर, फ्रान्मधील सर्व थोरामोठ्या श्रेष्ठ लोकांच्या समाध्यांच्यारूपाने जिथे स्मारक उभे बअसते, त्या Pantheion मध्ये व्हाॅल्टेअरच्या शेजारी, स्वत:ला नेहमी Citizen of Geneva असे अभिमानाने म्हणवून घेणाऱ्या रूसाॅंचे,अवशेष सुंदर समाधीच्या रूपात जतन केले आहेत. त्यांच्या काळात विरोधक असलेले विद्वान शेजारी शेजारी चिरनिद्रा घेत आहेत. रूसाॅंवर बरेच वेळा अन्याय झाले. मित्र,विरोधक, चाहते ह्यांच्या वैयक्तिक टीकेला तोंड द्यावे लागले.व्हाल्टेअरला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो,” माझ्या मनात तुमच्या अनेक चांगल्या गोष्टीविषयी प्रेम व आदर होता. पण आता आणि अजूनही फक्त तुमच्या बुद्धिमत्तेविषयी आणि तुमच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या लिखाणाविषयी प्रेम आहे.”

अखेरच्या दिवसांत रूसाॅंला एक माणूस भेटायला आला होता. तो लोकांविषयी काही बोलत असता रूसाॅं जे म्हणाला ते विसरता येण्यासारखे नाही. रूसाॅं म्हणाला,”हो, माणसे वाईट आहेत पण माणूस चांगला आहे!” Yes, Men are bad, but Man is good !” असा हा चतुरस्त्र प्रतिभेचा विचारवंत अलिकडच्या आधुनक राजकीय तत्वज्ञानाची कोनशिला रचणारा राजकीय त्त्वज्ञानी,, बुद्धिमान लेखक, संगीतकार, विज्ञानप्रेमी वनस्पतिशास्त्राचा अभ्यासक शिक्षणतज्ञ,व । अनेक मोठ्यांचेही पाय मातीचेच असतात हे दाखवणारा, व सामान्यांतील एखादा असामान्य गुण पुढे आणून त्यांचा गौरव करणारा,स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी आत्मचरित्रात्मक ग्रंथ Confessions लिहून त्या काळी खळबळ उडवणारा रूसाॅं, त्याच्या बरोबरीचा व तोडीचा विचारवंत तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरच्या मृत्युनंतर दोन महिन्यांनीच वारला!