François-Marie Arouet (व्हाॅल्टेअर)

व्हाॅल्टेअरचे खरे नाव François-Marie Arouet. पण त्याने आपले नाव लेखनासाठी व्हाॅल्टेअर असे घेतले. आणि तो आजही जगभर ह्याच नावाने तो ओळखला जातो. व्हाॅल्टेअरचा जन्म १६९४ साली पॅरिसमध्ये झाला. त्याला उत्तम शिक्षण मिळाले. त्याने साहित्यिक व्हायचे ठरवले. त्याने नाटके लिहायला घेतली. त्याची अनेक नाटके खूपच यशस्वी झाली. पण त्याच सुमारास व्हाॅल्टेअरचा राजाच्या जवळच्या आणि मर्जीतल्या एका माणसाशी तंटा झाला. त्यामुळे व्हाॅल्टेअरला हद्दपार केले. ही १७२७ सालची घटना.

हद्दपार झाल्यामुळे तो इंग्लंडला आला. इंग्लंडमध्ये आल्यावर त्याला एका निराळ्या जगाची ओळख झाली. इंग्लंडमधील सार्वजनिक, खाजगी, सरकारी संस्था ह्या फ्रान्समधील संस्थांपेक्षा जास्त स्वतंत्र आहेत. त्या आपले धोरण,निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात हे व्हाॅल्टेअरच्या लक्षात आले.तसेच चर्चा वादविवाद ह्यावरही फारशी बंधने नव्हती. फ्रान्सपेक्षा येथील वातावरण खूपच मोकळे आहे हे त्याला जाणवले. ह्यामुळे इंग्लंडविषयी त्याचे मत खूपच अनुकूल झाले. इथे विज्ञानाचा अभ्यास खूपच पुढे गेला आहे हे सुद्धा लक्षात आले. व्हाॅल्टेअरवर न्यूटनचा खूपच प्रभाव होता. इंग्लंडमधील वास्तव्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे व्हाॅल्टेअरचा विज्ञानवादी दृष्टिकोन जास्त दृढ झाला. त्याचप्रमाणे शेक्सपिअरचाही तो चाहता झाला. इंग्लंडमधील ह्या सर्व आधुनिक विचारांचे तो नेहमी गुण गात असे. ह्यामुळेच तो जेव्हा फ्रान्समध्ये परत आला तेव्हा त्याने संस्थांचे स्वातंत्र्य, भाषणाचे स्वातंत्र्य,ह्यावर बरेच लिहायला सुरुवात केली.धर्माच्या अधिकाऱ्यांवर, चर्चवर, खुळचट प्रथांना,श्रद्धेच्या आवरणाखाली लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतवून ठेवणे,तिला उत्तेजन देणे ह्याबद्दल धारेवर धरले. तसेच राजसत्तेने व चर्चनेही सहिष्णूतेचे धोरण स्वीकारावे ह्यासाठी एकप्रकारे व्हाॅल्टेअरने चळवळी सुरू केल्या.

व्हाॅल्टेअर हा इतिहासकार आणि इतिहासाचे तत्वज्ञान ह्यातील विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याने लिहिलेल्या इतिहास विषयक पुस्तकांमुळे इतिहास कसा लिहावा ह्याचे धडे देणाराही मानला जातो. सर्व बाबतीत स्वतंत्रतेचा व सहिष्णूतेचा त्याने पुरस्कार केला. धर्म,राजकारभार ह्यांनी घातलेले निर्बंध काढावेत, विचार व उच्चार स्वातंत्र्य असावे; धर्म, राजसत्ता, राज्यकारभार ह्यापासून पूर्णपणे वेगळा असावा, त्यांचे परस्पर संबंध नकोत ह्या विचारांचा पुरस्कार करणारा म्हणून व्हाॅल्टेअर प्रसिद्ध होता. ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात याव्यात ह्यासाठी त्याने चळवळी केल्या. लेख तर हजारो लिहिले. व्हाॅल्टेअरने लिहिलेले History Of Charles XII(१७३१), The Age of Louis XIV(१७५१)आणि त्याचा Essay on the Customs and Spirit of the Nations(१७५६) ही इतिहासाची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या इतिहासकारांप्रमाणे त्याने लष्करी कारवाया, लढाया, तह वाटाघाटी ह्यावरच भर न देता,त्या काळच्या सामाजिक परिस्थिती ती तशी का झाली, त्यावेळी विज्ञान, साहित्य, कला ह्यांत काय घडत होते ह्यासंबंधात जास्त लिहिले आहे. त्याच्या Essay on Customs…ह्या पुस्तकात त्याने संस्कृतीचा प्रवास आणि प्रगती ह्यांचा,फक्त देश समोर न ठेवता, जगाचा संदर्भ घेत मागोवा घेतला आहे. त्यामुळे केवळ एका राष्ट्राचा विशिष्ट संस्कृतीचा विचार येत नाही.किंबहुना राष्ट्राच्या संस्कृतीविषयी लिहूनही त्याने राष्ट्रवाद बाजूला ठेवूनच त्याने इतिहास, संस्कृति विज्ञान ह्या विषयी लिहिले आहे. हे सगळे लिहित असताना त्याने ज्ञात असलेल्या पुराव्यांची, संदर्भांची पुरेपुर छाननी करून व बुद्धिला प्रमाण मानून लिहिले आहे असे अनेक समीक्षकांचे मत आहे. वर अगोदर म्हटल्याप्रमाणे त्याने चर्चवर, त्यांचे इतर पंथ आणि धर्मासंबंधात जे असहिष्णूतेचे, वेळी क्रूरपणाचे वागणे होते; लोकांमध्ये श्रद्धेच्या आवरणाखाली अंधश्रद्धा जोपासण्याचे काम चालत असे, तसेच फसवणूकीचे वर्तन असे त्यावर कोरडे ओढले आहेत.

विशेषत: कॅथलिकांवर. राजसत्तेचे वाढते नियंत्रण घालण्याचे, विरोधी विचार मते ह्यांना दाबून टाकण्याचे, राज्यकारभारात चर्चचाही सहभाग असणे ह्या सर्वांवर त्याने पुस्तके, लेख लिहून तसेच आपल्या पत्रव्यवहारातूनही धारदार टीका केली आहे. ह्यामुळेच तो मत-विचार-भाषण-धर्म स्वातंत्र्याचा मुख्य पुरस्कर्त्यांपैकी मोठा मानला जातो. त्याच्या ह्या विचारांचा दूरगामी परिणाम झाला आहे. राजसत्तेच्या धोरणांमुळे इतरांप्रमाणे खुद्द व्हाॅल्टेअरलाही त्याचे चटके बसले आहेत. त्याचीही पुस्तके जाळली गेली.त्यालाही पोलिसांचा पाठलाग चुकला नव्हता.व्हाॅल्टेअरने आपली ही मते त्याच्या Treatise On Toleranc मध्येही चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहेत. व्हाॅल्टेअर इंग्लंडमधून परत फ्रान्समध्ये आल्यावर काही वर्षांने त्याने बाजारात पैसे गुंतवायला सुरूवात केली. त्यातून त्याने खूप संपत्ती मिळवली. त्याकाळी तो सर्वात श्रीमंत साहित्यिक होता. पैशाची सुबत्ता येण्यास राजा पंधरावा लुईची रखेल मादाम पाॅम्पिदूॅंशी असलेली त्याची मैत्रीही उपयोगी पडली असावी.

राजाच्या योजनांची माहिती ती व्हाॅल्टेअरला देत असे. पण मादाम पाॅंम्पिदूॅं किंवा दरबारातील मानाच्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या काहीजणांशी असलेल्या मैत्रीचा व्हाॅल्टेअरला फार फायदा करून घेता आला नाही. ह्याचे कारण त्याची धारदार वाणी आणि लेखणी. उपरोधिक विनोदाच्या वेष्टणातून बोलणे; उपहास विडंबनात्मक किंवा उपरोधिक लिहिणे ही त्याची वैशिष्ट्ये होती. पण सत्ता हाती असलेला राजा किंवा दरबारी माणसे त्यांच्यावरील टीका किती काळ सहन करतील! एकदा त्याने Le Encyclopedie मध्ये जिनिव्हा संबंधी लिहून त्यात स्विस लोकांचा अपमान केला. त्याचा उत्तम मित्र स्वत:ला व्हाॅल्टेअरचा विद्यार्थी मानणारा प्रशियाचा सम्राट फ्रेडरिक द ग्रेट बरोबरही व्हाॅल्टेअरने झगडा केला. त्यामुळे फ्रान्सचेच नव्हे तर स्वित्झर्लॅंडचे, जर्मनीचे पोलिसही त्याचा पिच्छा पुरवीत. एकदा म्हणण्यापेक्षा त्याला जास्तवेळा तुरुंगवासही घडला आहे. अशातच मादाम पाॅम्पिदूॅंचाही मृत्यु झाला. त्यामुळे फ्रेंच राजापाशी त्याची रदबदली करणारे बाजू घेणारे कोणी राहिले नाही.

सर्व अडचणी संकटे एकदम येतात तशी आली. त्यातली बरीच त्याने आपल्या स्वतंत्र विचार व धारदार लेखणी आणि वाणीने ओढवून घेतली होती. पण ह्या परिस्थितीतही व्हाॅल्टेअरने आपल्या चतुराईने व संपत्तीच्या बळावर मात केली. स्वित्झर्लॅंड व फ्रान्सच्या एकमेकांशी लागूनच असलेल्या सरहद्दीवर स्वित्झर्लॅंडच्या हद्दीत फर्नी येथे त्याने मोठा जमीन जुमला आणि घर घेतले. आणि दुसरे प्रचंड घरदार फ्रान्सच्या हद्दीत पण फर्नीला लागूनच टर्नी गावात घेतले. फ्रान्सचे पोलिस अधिकारी चौकशीला आले की हा,” माफ करा! मी दुसऱ्या परकी देशात राहात आहे.”असे सांगायचा. हेच उत्तर स्विस पोलिस अधिकाऱी आले की हा पटकन उंबरा ओलांडून ,” मी माझ्या देशात आहे.” असे खणखणीतपणे सांगायचा. त्याचा हा दोन्ही देशांतील सरकारांशी “तळ्यात की मळ्यात”खेळ चालू होता. व्हाॅल्टेअर त्याच्या अलिकडच्या व पलिकडच्या उंबरठ्यांच्या दोन्ही गावातील व आजूबाजूच्या गावातील सामान्य आणि गोरगरीबांसाठी, शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जायचा.फक्त लेख लिहून पत्रकांच्या द्वारेच नव्हे तर प्रत्यक्ष कोर्टकचेऱ्यांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवायचा. कोर्टात जाऊन उघड उघड अन्यायकारक व पक्षपाती निकालांविरुद्ध दाद मागून त्या निर्णयांवर पुन्हा विचार करायला भाग पाडायचा.गोरगरीबांना जाचक ठरणारे, भरडून काढणाऱ्या न्यायाधीशांची हकालपट्टी करवून घेतली.सामान्य लोक व गरीब माणसे व्हाॅल्टेअरच्या पाठीशी असत. जुलुम करणारे लहानांना छळतात. मोठे त्यांना दाद देत नाहीत किंवा सापडत नाहीत. हा नियम व्हाॅल्टेअर व सामान्यांनाही माहित होता. हे लोक वेळप्रसंगी व्हाॅलटेअरच्या बाजूने उभे राहात.

व्हाॅल्टेअरची ही दोन्ही घरे मोठी होती. व्हाॅल्टेअरची ख्यातीही दूरवर पसरली होती. त्याला भेटायला देशोदेशीचे विद्वान विचारवंत साहित्यिक येत असत. जवळपास वीस वर्षे व्हाॅल्टेअर फर्नी येथे एखाद्या संस्थानिकासारखा राहात होता. त्याचे घर “विचारवंतांचे माहेर”च झाले होते. आणि तो “बुद्धीमंतांचा राजा” अशा थाटात तिथे राहिला. बरेच वेळा पन्नास पन्नास नामवंत पाहुणे त्याच्या घरी पाहुणचार घेत असत! त्यांच्याशी व्यक्ति स्वातंत्र्य, धर्म, सहिष्णूता, तिच्याबरोबर येणारी बंधुता, साहित्य काव्य ह्यावर व्हाॅल्टेअरचे चर्चा सत्र, मता मतांतरातील वादविवाद सुरू असत.पाहुणचारासह अशा बौद्धिक मेजवान्याही झडत! अशीच चर्चा चालू असताना एकदा व्हाॅल्टेअर जे म्हणाला त्याची नोंद सर्व जगात आजही घेतली जाते. प्रत्येकाला आपले मत,विचार मांडण्याचा मूलभूत हक्क आहे ह्या तत्वावर तो किती ठाम होता त्यासंबंधीचा एक प्रसंग इतिहासात कायम नोंदला गेला आहे. एकजण बराच वेळ आपली बाजू मांडत आपल्या मताचे समर्थन करत होता. त्याचे सांगून झाल्यावर व्हाॅल्टेअर म्हणाला,” महाशय, तुम्ही मांडलेली मते व त्यासाठी केलेला युक्तिवाद बिनबुडाचा आहे. तो कुठेही टिकणारा नाही. मी तुमच्या विचारांशी सहमत नाही.” “ पण”, (पुढचे ऐका) व्हाॅलटेअर पुढे म्हणतो, “पण तुम्हाला तुमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचा तो हक्क कायम राहावा ह्यासाठी मात्र मी शेवटपर्यंत लढत राहीन.”

व्हाॅल्टेअर चांगला साहित्यिकही होता. त्याची सुरवातीची नाटके अत्यंत यशस्वी झाली होती. तो कविही होता. त्याच्या लेखनाची सुरवातही कवितेनेच झाली. त्याने एक मोठे दीर्घकाव्य लिहिले. त्याचे नाव Henriade. त्यानंतर तसेच एक Maid of Orleans हे आणखी एक काव्य लिहिले. आधुनिक काळात Henriade कुणी वाचणार नाही खरे. ते कंटाळवाणे वाटेल. पण त्याच्या काळात त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली होती. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात त्याच्या एकूण पासष्ठ आवृत्या प्रसिद्ध झाल्या होत्या! फ्रेंच राजा चौथ्या हेन्रीवर ह्या काव्याचा खूप प्रभाव पडला. त्याच्यात मोठा बदल घडून आला असे तो म्हणतो. त्या काव्यातील सहिष्णूता व उदारमतवाद ह्यांचा चौथ्या हेन्रीवर चांगला परिणाम झाला होता. त्याने आपल्या कारभाराचे धोरण ह्या तत्वावर आखले होते. त्याचे प्रतिबिंब त्याच्या Edict of Nantes ह्या आज्ञापत्रात पहायला मिळते! साहित्याचा परिणाम समाजावर फारसा कधी होत नाही किंवा साहित्याने क्रांति घडून येत नाही ह्या मताला हेन्रीच्या राज्यकारभाराचे धोरण ठरवणाऱ्या त्याच्या ह्या मार्गदर्शक राजाज्ञेतून उत्तर मिळते! ह्या बरोबरच व्हाॅल्टेअर धार्मिक स्वातंत्र्याचा, धर्म व राजसत्ता ही पूरणपणे वेगळी असावीत, विचार व उच्चार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ह्या बाबतीत तो लेखन व चर्चा करीत असे.

हा नागरी हक्कांचाही पुरस्कर्ता होता. त्यामध्ये सर्वांना समान न्याय हवा, जे दुबळे गरीब आहेत त्यांच्या बाबतीत तर तो कोर्ट कचेऱ्यात त्यांचे खटले स्पष्टपणे न्याय्य पद्धतीने चालून योग्य न्याय मिळावा ह्यासाठी झगडत होता. तसेच करपद्धतीत जी विषमता होती त्यात बदल व्हावा ह्यासाठीही तो सत्ताधाऱ्यांना सुनावत होता. फर्नी येथे असताना व्हाॅल्टेअरने आपली जगप्रसिद्ध Candide ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी म्हणजे त्या वेळी फार चर्चिल्या व मोठे पाठबळ मिळालेल्या आदर्श अशा आशावादाची चलती होती. आशावादाचे तत्वज्ञान सांगते की विश्वातील वेगवेगळ्या जगामध्ये हे आपले जग सर्वांत चांगले आहे आणि इथे सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच होते. हे तत्वज्ञान लोकप्रिय होते आणि त्याच काळात व्हाॅल्टेअरवर अनेक संकटे आली. संकटांना व इतर अडचणींना तो तोंड देत जगत होता. म्हणजे आशावादाने सांगितलेल्या विरूद्ध स्थितीत व्हाॅलटेअर दिवस काढत होता! म्हणून काही अंशी त्याची Candide कादंबरी ह्या आशावादी तत्वज्ञानाला व काही अंशी व्हाॅल्टेअरच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून लिहिली गेली.

कॅन्डाईडCandide हा राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुखातच वाढला. त्याच्या राजवाड्यासारखाच ह्याचाही प्रासाद. आईवडील प्रेमळ,चांगले. डाॅ.पॅनग्लाॅस हे सुद्धा त्याहून चांगले. त्यानींच कॅन्डाईडला हे जग चांगले; ह्यातील सर्व काही चांगले; घडते ते आपल्यासाठी चांगलेच अशी सगळी चांगली शिकवण दिली. आणि इथूनच महाभयंकर घटनांना सुरुवात होते.कॅन्डाईडवर लेखक व्हाॅल्टेअर इतके भयानक घोर-अघोरी प्रसंग आणतो. पण कॅन्डाईडचा चांगल्यावरचा विश्वास ढळत नाही. पण जवळचे सर्व काही गमावल्यावर अखेर तो एका बेटाला लागतो व तिथे तो व्हाॅल्टेअरच्या शब्दांत- “तिथे तो आपली बाग फुलवत राहतो”! आशावादी तत्वज्ञान उदयाला आले. सतत चर्चेत राहिले त्याच वेळेस व्हाॅल्टेअर विपरित प्रतिकूल परिस्थितीतून जात होता. त्यामुळेच त्याने प्रतिक्रिया म्हणून ही कादंबरी लिहिली. पण कादंबरीत त्याने आशावादाचे समर्थन केले नाही किंवा निराशवादाला उचलून धरले नाही. चांगले आणि वाईट दोन्ही लिहिले आहे.तटस्थपणे वस्तुस्थिती काय असू शकते हे लिहिले आहे. आजूबाजूचे भान ठेवून ज्याचे त्याने आपले नंदनवन फुलवावे असे म्हणत त्याने काय ठरवायचे ते वाचकांवरच सोपवले आहे. व्हाॅल्टेअरने वीस हजार पत्रे लिहिली, दोन हजार पुस्तके, पुस्तिका,लेख लिहिले. नाटके कविता सर्व लिहिले. पण आजही टिकून आहेत ती त्याची पत्रे व Candide! ही कादंबरी! त्यानेआपले इतर सर्व व्याप सांभाळत असताही, फक्त चारआठवड्यात ती लिहिली ! कथानक अतिशय वेगवान आहे. वाचायला घेतलीत तर दोन अडीच तासांत वाचून संपवालही. पण कित्येक दिवस विचार करत राहाल अशी आहे. वाचकासाठी हाच उत्कृष्ट वा•डमयकृतीचा हा बोनस असतो!

इतके सर्व चांगले होत असूनही प्रत्येक मोठ्या माणसाला टीकाकार असतातच. स्वत: व्हाॅल्टेअरने रूसाॅंवर बरेच वेळा टीका केली. त्याच्या कादंबऱ्य्वर उपरोधपूरण टीका केली. पण व्हाॅल्टेअर रूसाॅंचे साहित्य वैचारिक निबंध काळजीपूर्वक वाचत असे. रूसाॅंची वीस पंचवीस पुस्तके त्याच्या लायब्ररीत होती. त्यातील सर्व महत्वाच्या पुस्तकांत व्हाॅल्टेअरने केलेल्या टीपा टिपणीही आढळतात. रूसाॅंनेही व्हाल्टेअरवर तो ज्या सहिष्णुतेचा इतका डंका वाजवतो ती त्याने जिन्हिव्हाच्या संसदसभासदांबाबत का दाखवली नाही? असा प्रश्न विचारून सहिष्णुता बाळगणे व्हाॅल्टेअरलाच आवश्यक आहे असा टोला मारला आहे. तर व्हाॅल्टेअरने रूसाॅंच्या Discourse on the Origin of Inequality वर टीका करताना, “हे म्हणजे आता सगळ्यांनी चार पायांवर चालावे असे सांगण्यासारखे आहे; मी साठ वर्षाचा असल्यामुळे मला ती जुनी सवय पुन्हा अमलात आणणे शक्य नाही!” अशी खवचट टीका केली होती. इंग्लंडचा तत्वज्ञानी व इतिहासकार व्हाॅल्टेअरच्या इतिहासलेखन व मतांविषयी टीका करताना म्हणतो की त्याने इतिहास विषयाला इतिहासाला वाहून घेतलेले नव्हते; व लिहिले ते जास्त करून कॅथलिकांविषयीच्या विरोधामुळे लिहिले असे वाटते.

व्हिक्टर ह्युगो म्हणतो की ,”अठरावे शतक म्हणजे व्हाॅल्टेअर!” रूसाॅं हा जवळपास त्याचा समकालीन. तोही व्हाॅल्टेअरसारखाच प्रतिभावान. दोघांचेही कीर्तिसूर्य तळपत होते. पण डेव्हिड ह्यूमच्या मते काही काळ असा होती की रूसाॅंने व्हाॅल्टेअरला पूर्ण झाकले होते. आपल्यासाठी अर्थ इतकाच की दोघेही थोर होते. त्यासाठी फ्रान्स व जिन्हिव्हाने दोघांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त केली ते सांगतो. ज्या Ferney येथे व्हाॅल्टेअरने वीस वर्षे वास्तव्य करून फर्नेला मोठे केले त्या फर्नीचे नाव फ्रान्सने व्हाल्टेअरच्या जन्मशताब्दीला कृतज्ञतेने ‘व्हाॅल्टेअरचे फर्नी’Ferney-Voltaire असे केले! तसेच अखेरच्या वर्षांत ज्या अर्मनव्हिल येथे रूसाॅं राहात होता तिथल्या सुंदर पार्कला रूसाॅंचे नाव दिले आहे. आणि जिनिव्हाने तिथल्या सरोवराकाठी रूसाॅंचा पुतळा उभा केला आहे. १९४४ साली दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नाझींच्या ताब्यात गेलेल्या फ्रान्सची मुक्तता झाली त्यानंतर फ्रान्सने आणि रशियातही व्हाॅल्टेअरची २५० वी जयंती साजरी केली. त्यावेळी रशियाने म्हटले होते की व्हाॅल्टे्अरचे नावच नाझी फॅसिस्टांचा थरकाप उडवित असे! व्हाॅल्टेअर “, नागरी हक्क,विचार स्वातंत्र्य, न्याय ह्यांचे प्रतिक होता.” रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट म्हणाली,की “ती सोळा वर्षाची असल्यापासून व्हाल्टेअरचे विचार वाचत असे.” व्हाॅल्टेअरच्या अखेरच्या वर्षांत तिचा त्याच्याबरोबर पत्रव्यवहारही चालू होता. तिच्या पत्रातून ती विद्यार्थिनीच्या भूमिकेतून लिहिते असे दिसते.

व्हाॅल्टेअर गेल्यावर त्याचा सर्व ग्रंथ संग्रहालय तिने विकत घेतला. त्यानंतर तो आता रशियाच्या राष्ट्रीय संग्राहालयात पीटस्बर्गमध्ये आहे. व्हाॅलटेअर जसा प्रतिभावंत साहित्यिक होता तितकाच बुद्धिमान विचारवंत होता. साहित्यिक व्हाॅलटेअरवर फ्रान्सचा उपरोधिक विनोदी लिहिणारा नाटककार मोलिअे, शेक्सपिअर, स्पॅनिश कादंबरीकार सर्व्हॅंटिस, महाकवि होमर, वैज्ञानिक न्यूटन ह्यांचा प्रभाव होता. तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरवर फ्रान्सिस बेकन,जाॅन लाॅक,व धर्म संस्थापक झरतुष्ट्र ह्यांचा प्रभाव होता. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकेतील क्रांति, मार्क्स, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, कॅथरिन द ग्रेट आणि तीनशे वर्षानंतर आजही ह्या ना त्या रूपात दिसतो. त्या विचारांची चांगली फळेही आपण उपभोगत आहोत, हे विसरता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *