वाचनालय विद्यापीठाचा पीएचडी

दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. युरोपमध्ये कित्येक इमारतींतून कोंदलेल्या धुराचे लोटअद्यापही बाहेर येत होते. शहरे उध्वस्त झाली होती. ग्रंथालयांच्या इमारतीसुद्धा अपवाद नव्हत्या. त्यांचीही पडधड झाली होती. आगी आतल्या आत धुमसत होत्या. जळालेल्या पुस्तकांची राख पसरली होती. ह्याच सुमारास …..


…..ह्याच सुमारास लॅास एन्जलिस मध्ये रे ब्रॅडबरीच्या डोक्यात एक पुस्तक घोळत होते. त्याचे नावही त्याने ठरवले होते. The Fireman. हा फायरमन आग विझवणारा नाही. ज्याला आगवाला आपण म्हणतो तसा Fireman. आगगाडीच्या इंजिनमध्ये कोळसे टाकणारा, किंवा कारखान्यात भट्टी पेटती ठेवणारा तशा प्रकारचा. . .. एका अर्थी आगलाव्याच !


रे ब्रॅडबरी लॅास एन्जलिस मध्ये वाढला होता. १९३८ मध्ये तो बारावी पास झाला. काळ फार मोठ्या मंदीचा होता. त्यामुळे व घरच्या परिस्थितीमुळे कॅालेजमध्ये जाणे त्याला शक्यच नव्हते. त्याला वाचनाची आवड होती. तो चांगल्या गोष्टीही लिहायचा. विशेषत: विज्ञान कथा. त्याही विज्ञानातील अदभुत गूढरम्य कथा. त्याच्या गोष्टी Amazing Stories, Imagination, Super Science Stories ह्या सारख्या मासिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या.


ह्यामागे त्याची प्रतिभा आणि वाचनाची आवड व ती भागवणारी लायब्ररी ह्यांचाही मोठा सहभाग होता. कॅालेजमध्ये जाणे शक्य नाही ही खात्री असल्यामुळे तो लायब्ररीत जाऊ लागला. त्याचे सर्वात आवडते ग्रंथालय म्हणजे ‘ लॅास एन्जलिस पब्लिक सेन्ट्रल लायब्ररी’. सतत तेरा वर्षे ह्या ग्रंथालयात जात होता. प्रत्येक विभागात त्याचा संचार होता. त्या प्रत्येक विभागातली सर्व पुस्तके वाचून काढली. त्या लायब्ररीचा एकूण एक काना कोपरा त्याला माहित होता. रे ब्रॅडबरी म्हणतो की,” ह्या लायब्ररीतल्या प्रत्येक खोलीत मी बसलो. प्रत्येक खोलीतली सर्व पुस्तके मी वाचली.” त्याने काय वाचले नाही? जगातल्या सर्व कविता वाचल्या. नाटके वाचली.रहस्यकथा, भयकथा, सर्व निबंध संग्रह वाचले. तत्वज्ञान,इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, कादंबऱ्या,चरित्रे आत्मचरित्रे सगळी पुस्तके वाचून काढली. सुरवातीला गरज म्हणून ग्रंथालयात जात असे. पण नंतर ग्रंथालय हे त्याचे प्रेम प्रकरण झाले ! पक्ष्याला जसे घरटे; तसे ब्रॅडबरीला ग्रंथालय हे त्याचे घर,महाल, राजवाडा होता. तो म्हणतो, “मी तिथेच जन्मलो,तिथेच वाढलो.” उगीच तो स्वत:ला अभिमानाने ‘ Library Educated ‘ म्हणवून घेत नसे!


लॅास एन्जलिसची ही मुख्य लायब्ररी १९८६ साली प्रचंड आगीच्या भक्षस्थानी पडली तेव्हा रे ब्रॅडबरीला—सच्च्या पुस्तकप्रेमी वाचकाला—काय झाले असेल! Fiction विभागातील A to L पर्यंतची सर्व पुस्तके जळून गेली. ही सर्व पुस्तके ब्रॅडबरीने वाचून काढली होती!


रे ब्रॅडबरीने आपले पुस्तक The Fireman लिहिण्याचे मध्येच थांबवले. कारण माहित नाही. चार पाच वर्षांनी सिनेटर जोसेफ मॅकार्थीने जेव्हा,”परराष्ट्र खात्यात कम्युनिष्टांची भरती आहे. त्यांची अमेरिकेविषयी निष्ठा संशयास्पद आहे.” म्हणत त्या खात्यातील व इतरही क्षेत्रातील अशा अनेक संशयितांची शोध घेण्याची मोहिम उघडली तेव्हा त्याला ,” हे काही चांगले चिन्ह नाही. परिस्थिती कसे वळण घेईल नेम नाही !” असे वाटल्याने त्याने आपली The Fireman कादंबरी पूर्ण करायची ठरवले.


रे ब्रॅडबरीचे घर लहान. घरात दोन मुले होती. बाहेर खोली भाड्याने घेणेसुद्धा परवडत नव्हते. पण त्याला लॅास एन्जल्सची बहुतेक वाचनालये माहित होती. एलए विद्यापीठाच्या पॅावेल लायब्ररीच्या तळघरात टाईपरायटर्स होते. अर्ध्या तासाला दहा सेंट भाडे होते. तिथे बसून त्याने फायरमन पुस्तक लिहून पूर्ण केले. ९ डॅालर्स ८० सेंट खर्चून नऊ दिवसात त्याने ते पूर्ण केले! पुस्तकांनी भरलेल्या ग्रंथालयात बसून पुस्तके जाळण्यासंबंधीचे पुस्तक लिहावे हा चमत्कारिक योगायोग म्हणावा लागेल !


पुस्तक लिहून झाले पण रे ब्रॅडबरीला ‘फायरमन’हे नाव योग्य वाटेना. त्याला दुसरे नावही सुचत नव्हते. एके दिवशी जणू झटका आल्याप्रमाणे त्याने लॅास एन्जलिसच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखालाच फोन करून ,” कोणत्या तापमानाला पुस्तके जळून खाक होतात?” विचारले. त्यावर त्या मुख्याधिकाऱ्याने सांगितले तेच ब्रॅडबरीने आपल्या पुस्तकाचे नाव ठेवले, Fahrenheit 451.


रे ब्रॅडबरीचा जन्म १९२० साली झाला. ९१ वर्षाचे दीर्घायुष्य अनुभवुन व जगून तो २०१२ साली वारला. आयुष्यभर तो लेखन करत होता. त्याला आपण लेखक व्हावे ही स्फूर्ती कशी झाली ती घटनाही मोठी गमतीची आहे. १९३२ साली घडलेला हा प्रसंग आहे. त्यावेळी गावात मोठा उत्सव होत असे. त्या उत्सवी जत्रेत अनेक करमणुकीचे कार्यक्रम, खेळ, संगीत ह्या नेहमीच्या रंजक गोष्टी असत.


त्यावर्षी प्रख्यात Mr. Electrico नावाचा विद्युत शक्तीचा वापर करून जादूचे व इतर खेळ करणारा जादुगारही आला होता. प्रयोगातील अखेरीच्या खेळात Mr. Elctrico ने त्याच्या खेळात ‘जम्बुरे ऽऽ’ झालेल्या बारा वर्षाच्या लहान रे ब्रॅडबरीच्या डोक्यावर निळ्या प्रकाशाची तलवार ठेवून जणू भाकित केल्याप्रमाणे तो मोठ्याने , “Live Forever!” असे ओरडून म्हणाला! मि. इलेक्ट्रिकोच्या ह्या वरदानाने रे खूष झाला. “ त्या दिवसापासून मी नेमाने लिहू लागलो.” असे ब्रॅडबरी म्हणतो. त्याने ठरवले की आपण लिहायचे,लेखक व्हायचे. आयुष्यभर त्याने लेखन केले. त्याने पाचशेच्यावर कथा लिहिल्या. त्यातील जास्त विज्ञान-अदभुत कथा आहेत. कविता लिहिल्या. कादंबऱ्या,नाटके, नाटिका, सिनेमाच्या कथा पटकथा लिहिल्या. TV मालिकाही लिहिल्या. त्यात Alfred Hitchcock Presents मालिकेतील बरेच भाग त्याने सादर केले होते.


साहित्याच्या सर्व प्रकारात त्याची प्रतिभा व लेखणी सहजतेने संचार करत होती. पण वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी, आपण लेखक होऊन आपल्या पुस्तक रूपाने अजरामर होऊ असे वाटणे हे किती कौतुकाचे आणि तितकेच विस्मयकारक आहे!
रे ब्रॅडबरीने काय लिहिले नाही? त्याने विज्ञान-कल्पनारम्य कथा लिहिल्या. अदभुत कथा, भयकथा, रहस्यकथा लिहिल्या. कल्पना आणि वास्तव ह्यांचे बेमालूम मिश्रंण असलेल्या -ज्याला जादुई वास्तव म्हणले जाते- कथाही लिहिल्या. नाटके, पटकथा लिहिल्या. वाड•मयातील सर्व प्रकारांचे लेखन केले. पण तो प्रामुख्याने ओळखला जातो ते त्याच्या दोन तीन पुस्तकांमुळे. ती म्हणजे Fahrenheit 451, Martian Chronicles आणि The illustrated Man ह्या पुस्तकांमुळे. Fahrenheit 451 विषयी लिहायचे तर तो स्वतंत्र लेख होईल.


वरील पुस्तकांबरोबर त्याच्या निबंधांच्या पुस्तकांचाही उल्लेख करावा लागेल. त्या पुस्तकात त्याने वाचलेल्या पुस्तकांसंबंधी, त्याच्या आवडत्या लेखकांविषयीही लिहिले आहे. तसेच लिहावे कसे हेसुद्धा सांगितले आहे. पण बहुतेक निबंधातून त्याचा लिहिण्याविषयीचा दृष्टिकोन आढळतो. मुख्य सुत्र हेच की,” लिहिणे हा आनंदोत्सव आहे!” त्याने लिहायचे म्हणून कधी लिहिले नाही. त्याने कधीही ‘कर्तव्य’ भावनेने लिहिले नाही.


रे ब्रॅडबरीला भविष्याची वेध घेण्याची प्रतिभा होती. दृष्टी होती. आगामी काळात बॅंकेत टेलर येतील. ते इलेकट्रॅानिक असतील. म्हणजे आजच्या एटीमचे पुर्वरूप त्याच्या कथातून आले आहे. तसेच त्याच्या फॅरनहाईट ४५१ मध्ये प्रा. फेबर्स कानात लपणारे radio telephone वापरतो. त्याला तो ear thimble म्हणतो. हेच आज Bluetooth headphones, EarPods म्हणून ओळखले जातात. ब्रॅडबरीने त्याचे १९४९-५० मध्ये भविष्य केले होते. त्याने त्याचे कधी Cacophonus असेही वर्णन केले आहे.


इतक्या विज्ञान कथा लिहिणाऱ्या रे ब्रॅडबरीने आयुष्यात कम्प्युटर कधी वापरला नाही. त्याने आपले लिखाण टाईपरायटरवरच केले. तसेच त्याने कधी मोटारही चालवली नाही. लायसन्स काढण्याचा प्रश्नच नव्हता. ह्याचे कारण तो दृष्टीने अधू होता. बरेच वेळा प्रख्यात नटी कॅथरीन हेपबर्नने त्याला आपल्या मोटारीतून नेले व परत त्याच्या ॲाफिसमध्ये आणून सोडले आहे. तो सायकल किंवा टॅक्सीने ये जा करायचा. तो सायकलवरून जात असताना दुसरी प्रसिद्ध नटी डोरिस डे सायकलवरून जात असली तर ती हसत हसत त्याला हात करून मगच पुढे जाई.


रे ब्रॅडबरीच्या पुस्तकाने अक्षरश: अंतराळ प्रवास केला आहे. नासाचे मंगळावर जाणाऱ्या फिनिक्स यानातून रे ब्रॅडबरीचे Martian Chronicles हे पुस्तक मंगळावर पोचवले. तसेच नासाने मंगळावरील एका विवराला त्याच्या एका कादंबरीचे Dandelion Wines नाव दिले आहे. रे ब्रॅडबरीच्या मृत्युनंतर दोन अडीच महिन्यांनी नासाचे Curiosity Rover मंगळावर जिथे उतरले त्या तळाला Bradbury Landing हे नाव त्याच्या स्मरणार्थ देऊन त्याचे नाव व आठवण जतन केली आहे.


भविष्याचा वेध घेणाऱ्या, विज्ञानाची जाण असणाऱ्या त्याच बरोबर वाड•मयीन प्रतिभा असणाऱ्या रे ब्रॅडबरीविषयी सध्या इतकेच पुरे.

Social Media Fad

प्रत्येक काळात काही गोष्टींचा सुकाळ येत असतो. पन्नास ते साठ सत्तरच्या दशकांत स्टेनलेसच्या भांड्यांचा, वस्तूंचा सुकाळ आला होता. कोणत्याही प्रसंगी एकमेकांना स्टेनलेसची भांडी देण्याचा सपाटा चालू होता. प्रत्येकाची घरे स्टेनलेसच्या भांड्यांची दुकाने झाली होती. नंतरचा काळ कॅसेटसचा आला. कॅसेटसनी कहर केला होता. प्रत्येक घरात हॅालमधले एक कपाट शोकेस कॅसेट्सनी गच्च भरलेली असे. त्यातच काही घरांत जर व्हिडिए कॅसेटस किंवा नंतर डीव्हीडी कॅसेटस् असल्या तर त्यांच्या आरत्या ऐकाव्या लागत. अशांची प्रतिष्ठा वेगळीच असे. एकूणात काय तर कॅसेटच्या ढिगाऱ्यावर माणसाची पत प्रतिष्ठा मोजली जायची.


बायकांच्या साड्यांमध्ये तर वॅायलच्या साड्यांनी तर वेड लागायची पाळी आली होती. पुरुषांवर. त्यातही खटावचीच वॅायलची साडी सर्वोत्तम हाही एक अस्मितेचा भाग झाला होता.तशा कॅलिको,अरविंद, नंतर बॅाम्बे डायिंग व आमच्या लक्ष्मी विष्णु मिलच्या ( माधव आपटे यांची) ह्यांच्या वॅायल्स गाजू लागल्या. मग मी का मागे म्हणून नंतर वेगळ्या स्वरूपात रिलायन्सही त्यांची गार्डन वरेली साड्या घेऊन स्वतंत्र दुकानेच काढू लागले! सर्वांचा सुकाळ झाला.

पुरुषांतही ह्या लाटा येत पण त्या लहान लहरींसारख्या येत. विजारींच्या कापडांत समर सुटिंग, तर कधी शार्कस्किनच्या चमकदार सुटिंगच्या मग रेमंडमुळे टेरुल ह्यांची लहर विहरत होती. तयार शर्टांच्या बाबतीत क्रांतीची सुरुवात सॅमसन ब्रॅन्डने केली. पण पुढे लिबर्टी मिल्टन सेरिफ हे अधिराज्य गाजवू लागले. ही मंडळी नामशेष झाल्यावर झोडियाक, रेमन्डचे पार्क ॲव्हेन्यू आले ते आज परदेशी ॲरो, पीटर इंग्लॅन्ड व्हॅन ह्युजन इत्यादी परदेशी ब्रॅन्डमध्ये टिकून आहेत . ह्यांचाही सुकाळ होती म्हणायचा.

तसाच सध्या सुविचार,सुसंस्कार, प्रेरणादायी वचना-उदघृतांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातही कुणालाही झेपणारा म्हणजे एकमेकांना फेकून मारण्याचा प्रकार म्हणजे गुड मॅार्निंग शुभप्रभातींचा सतत मारा.


जिथे ज्ञानेश्वरही ह्या ‘सुकाळु करी’ मधून सुटले नाहीत ( त्यांनी ‘ब्रम्हविद्येचा सुकाळु करी’ हा निश्चय केला होता हे लक्षात नसेल म्हणून सांगतो) तिथे माझ्यासारखा त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे ‘ जीवजंतू’ कसा मागे राहील? तर जमल्यास मीही काही सकाळी एक सकाळचे वचन पाठवून तुमच्या दिवसाची सुरुवात हसण्याने करावी म्हणतो.

साऽऽवधाऽऽन!

देवाची डबा पार्टी !

काय लहर आली कुणास ठाउक ! पण एका लहान मुलाच्या मनात आपण देवाला भेटून यावे असे आले.
मुलाने आपल्या बॅकपॅकमध्ये दोन दिवसाचे कपडे भरले. आणि मधल्या सुट्टीतल्या खाण्याचा डबा भरून घेतला. पाण्याची बाटलीही घेतली. सवयीप्रमाणे कॅप उलटी घालून, “आई जाऊन येतो “ म्हणत दरवाजा धाडकन ओढून निघालाही.

खूप चालून झाले. मुलगा दमला. एका पार्कमध्ये बसला. घोटभर पाणी प्याला. माथ्यावरचा सुर्य थोडा ढळला होता . त्याने आपला डबा काढला. आईने दिलेल्या पोळीच्या भरलेल्या सुरळ्या खायला लागला. तितक्यात त्याला जवळच बसलेली एक बाई दिसली. त्याच्या आईपेक्षा मोठी होती. ती मुलाकडे ‘हा छोटासा मुलगा काय करतोय्’ हे हसून पाहात होती. मुलाला तिचे हसणे इतके आवडले की त्याने तिला जवळ जाऊन आपल्या पोळीचा घास दिला. तो तिने न खळखळ करता सहज घेतला. खाल्ला. आणि ती मुलाकडे पाहात हसली. मुलाला आनंद झाला. त्याने तिला आणखी एक पोळी दिली. तीही तिने न बोलता घेतली, खाल्ली आणि ती पुन्हा हसली. तिचे हसणे पुन्हा पुन्हा पाहायला मिळावे म्हणून तो मुलगा एक घास खाऊन दुसरा घास तिला देई . प्रत्येक घासाला तिचे हसणे त्याला पाहायला मिळे. दोघांचे बोलणे मात्र काही झाले नाही. मुलगा आणि ती बाई आपल्यातच जणू दंग होती.

बराच वेळ झाला. सुर्य मावळतीला आला. उशीर झाला असे मनाशीच म्हणत मुलगा उठला. डबा बॅगेत टाकला. निघाला. दह पंधरा पावले पुढे गेला असेल. त्याने मागे वळून पाहिले. बाई तिथेच होती. मुलगा पळत तिच्याकडे गेला. तिला त्याने आनंदाने मिठी मारली. बाईसुध्दा त्याच्याकडे हसत पाहात त्याचा मुका घेत हसत पाहू लागली.

मुलगा घरी पोहचेपर्यंत अंधार होऊ लागला होता. मुलाने बेल वाजवली. दरवाजा आईनेच उघडला. इतके दूरवर चालत जाऊनही मुलाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून तिने विचारले,” अरे ! काय झाले आज तुला? इतका मजेत दिसतोस ते!

“आई आज मला एक बाई भेटली. तिचे हसणे इतके सुंदर आणि गोड होते म्हणून सांगू! काय सांगू! मी इतके सुरेख छान हसणे कधी पाहिलेच नव्हते. हो, खरंच सांगतो आई!” आणि ते हसणे व तो हसरा चेहरा पाहाण्यात पुन्हा रमला.

बाईने दरवाजा उघडल्यावर सर्वात मोठा मुलगा म्हणाला,” आई आज काही विशेष झाले का? नेहमीच्या पार्कमध्येच गेली होतीस ना? किती प्रसन्न दिसतोय तुझा चेहरा आज! फिरून आल्यावर इतकी आनंदी पाहिली नव्हती तुला!

“अरे आज फार मोठी गंमत झाली. आज मला देव भेटला! खरेच! देव भेटला मला. पण देव इतका लहान असेल अशी माझी कल्पना नव्हती ! अरे त्याच्या बरोबर डबा पार्टीही केली मी!” सोफ्यावर बसत ती म्हणाली. पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर तिला तो मुलगा दिसू लागला.

१९ मार्च २०२१ युट्युबवरील एका स्थळावर वाचलेल्या अति लघु बोधकथेवर आधारित.अशाच किंवा ह्याच कथेवर एक short film ही आहे असे वाचले.

रिकामा पाट

चक्रदेव मंगल कार्यालय आम्ही चालवायला घेतले. तेव्हा पासून पंगतीत इतर ताटांसारखेच तेही ताट वाढले जायचे. पंगतीत सगळे लोक जेवायला बसले तरी तो पाट रिकामा ठेवावा लागे. असे का करायचे आम्हाला माहित नव्हते. चक्रदेवांनी सांगितल्यामुळे तो एक पाट रिकामा ठेवत असू. थोडा वेळ वाट पाहून मगच वाढपी तूप वाढायला घेत.

काही महिने पंगतीत तो पाट रिकामाच राहिला होता. नेहमीप्रमाणे आजही पंगत बसली होती. एकाने मला रिकाम्या पाटाविषयी विचारले. “ कार्यालयाच्या मालकांनी ह्या कार्यालयातली ही पद्धत आहे व ती आम्हीही पाळावी असे सांगितल्यावरून आम्ही तो पाट रिकामा ठेवतो. पंगतीच्या एका टोकाला उभी राहून मी हे सांगत होते. ते ऐकून जवळच बसलेल्या एका विशीतल्या मुलाने मला त्या मागची हकीकत सांगितली…..

… तो सांगू लागला,” ही पद्धत आम्हीच सुरू केली. तुमच्या आधी आम्ही हे कार्यालय चालवत होतो. एकदा सर्व लोक जेवायला बसले असता, एक गृहस्थ आला व वडिलांना विचारू लागला ह्या पंगतीत जेवायला बसू का?” वडील म्हणाले, “तुम्ही जेवायला जरूर बसा. पण आता पंगत सुरु झालीय्. एकही पाट रिकामा नाही. नंतर आमच्या घरच्यांबरोबर व इथे काम करतात त्यांची पंगत असते. तुम्ही आमच्या बरोबर बसा.” तो माणूस थोड्या अजिजीने म्हणाला,” अहो अशा पंगतीत बसून जेवायची माझी खूप इच्छा आहे. बघा कुठे कोपऱ्यात पाट मांडता आला तर.” वडिलांनी सगळीकडे पाहिले पण जागा दिसेना. वडील आमच्या घरच्यांच्या बरोबर बसा असे त्याला पुन्हा सांगू लागले. पण तो माणूस काही न बोलता निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा कधी आला नाही. दिसला नाही. आम्हाला एक दीड वर्षांनी हे कार्यालय ….”

त्या मुलाचे बोलणे अर्धवट सोडून मी प्रवेदाराकडे पाहू लागले. नेहमीप्रमाणे वाट पाहून आजची पंगत सुरु झाली. थोड्याच वेळात एक पंचवीस- तिशीतला माणूस ह्यांना काही विचारु लागला. माझ्या मिस्टरांनी बोट दाखवून त्याला त्या रिकाम्या पाटावर बसायला सांगितले.

मला काय वाटले कुणास ठाऊक मी भाजी आमटी कोशिंबिरीचे पंचपात्र घेऊन पंगतीत आले. आज स्वत: आपल्या मालकीणबाई वाढताहेत पाहून आमचे वाढपी बुचकळ्यात पडले. त्यांना, मीच ह्यांना वाढणार आहे हे हळूच सांगितले. मी त्याला सगळे पदार्थ वाढायला सुरू केली. वाढताना माझ्या न कळत उत्स्फूर्ततेने मी त्याला वाढू लागले. “ सावकाश होऊ द्या. कसलीही घाई नाही.” “ कोशिंबीर कशी झालीय्?” “ ही भाजी आवडत नाही वाटते, मग ही बघा म्हणत दुसरी भाजी वाढे. जिलब्या प्रत्येक वेळी , “ अहो घ्या, संकोच करू नका. आमची जिलबी आवडेल तुम्हाला!” असे म्हणत एक जास्तच वाढे.

पंगतीचे जेवण आटोपले.सगळी मंडळी हात धुवायला जाऊ लागली. तो माणूस बसूनच होता. मग उठला, ते पाहून मी लगेच त्याला वाकून नमस्कार केला. ते पाहून तर त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले.तो मला म्हणत होता,” तुम्ही वाढत असताना मला सारखी आईची आठवण येत होती.” मी त्याची समजुत घातल्यासारखे सांगत होते, “अहो मीही तीन मुलामुलींची आई आहे. वाढतांना मलाही खूप बरे वाटत होते. पण आज अचानक तुम्ही कसे आलात?”

त्यावर तो गृहस्थ गहिवरून सांगू लागला, “आमच्या सोसायटीत काम करणारा माणूस मला नेहमी सांगे की लग्नाच्या अशा पंगतीत मला जेवायची खूप इच्छा होती. मी लग्नामुंजींच्या दिवसात कार्यालयांत जात असे. पण कुठे दाद लागली नाही. पाट रिकामा नाही म्हणून सांगायचे.नशिब म्हणत ती एक इच्छा सोडल्यास दिवस चांगले काढले.” काल पर्यंत तो मला त्याची ही इच्छा सांगत होता. काल सकाळी मी त्त्याची ही इच्छा पूर्ण करेन असा शब्द दिला. काल संध्याकाळीच तो वारला. आज मी इथे आलो. तुम्ही मला मायेने वाढले.”

हे ऐकल्यावर मी त्याला पुन्हा नमस्कार केला. हात धुवायला जाताना त्याने समाधानाने ढेकर दिली. ती तृप्तीची ढेकर आम्हाला आशीर्वाद होता.

मी मागे वळून पाहिले तर तो विशीतला तरूण बसूनच होता.मी जवळ गेले तर त्याचे डोळेही भरून आले होते. त्याला रडायला काय झाले असे हळूच विचारल्यावर तो कुठेतरी पाहात असल्यासारखा बोलू लागला,”त्यानंतर तो माणूस आला नाही की दिसला नाही. पाट मांडलेला, ताट वाढलेले तसेच राही. आमचे कंत्राट गेले. कारण आमचे कार्यालय तितके चालेना. दिवस वाईट आले. आई वडील अकाली थकले. मला कॅालेजात जाता आले नाही. एका छापखान्यात साधे काम लागले आहे. कसेतरी चालले आहे. डोळ्यांत का पाणी आले सांगता येत नाही. तुमच्या पंगतीतला पाट रिकामा राहिला नाही ह्याचा आनंद झाला की तुम्हाला त्या ‘अवचित अतिथीला’जेवायला घालता आले; आम्हाला ती संधी मिळाली नाही; ह्याचे वैषम्य म्हणून, का तुम्हाला बरकत येईल ह्याचा हेवा किंवा द्वेष वाटला, काही सांगता येत नाही. पदवी मिळाल्यावर मलाही आमच्या आई-वडीलांचा हा व्यवसाय करायचा होता. पण तसे जमेल असे वाटत नाही.” इतके झाल्यावर तो पुन्हा डोळे पुसत हात धुवायला गेला.

इकडे मी कोठीघरात गेले. परत आले. तो मुलगा दिसला. त्याला हाक मारली. “ हे बघ हे शकुनाचे पैसे घे. ह्याने तुला व्यवसाय सुरू करता येणार नाही हे माहित आहे. पण तुझी हिंमत टिंकून राहील. तुझ्या स्वप्नातील पंखातले हे लहानसे पिस आहे.” असे म्हणत त्याच्या हातात शंभराच्या चार पाच नोटा ठेवल्या. तो मुलगा पाहात राहिला. त्यानेही मला नमस्कार केला. द्यायचा तो आशिर्वाद मी दिला.

तो मुलगा म्हणाल्या प्रमाणे आमची बरकत होत गेली. खरं म्हणजे हे कार्यालय तसे गैरसोयीचे होते. का कुणास ठाऊक पण ते लग्ना मुंजीच्या दिवसात एकही दिवस रिकामे नसे. मालकांनाही त्यामुळे चांगले उत्पन्न होऊ लागले. त्यांनी कार्यलयाचे पूर्ण नूतनीकरण करायची योजना आखली. त्यामुळे आमचा एक मोसम रिकामा जाणार होता. पण आम्ही चक्रदेवांना विचारले की ,”नविन कार्यालयाचे काम आम्हाला मिळेल नां?” त्यावर ते म्हणाले, “अहो तुमच्यामुळेच हे मी करू शकतोय्. तुम्हाला मी कसा विसरेन?”…..

….. काळ पुढेच जात असतो. “आमचे आई वडील गेले. आमच्या सासूबाई गेल्या. पाटांच्या पंगतीही गेल्या. टेबल खुर्च्यांच्या पंगती झाल्या. आजही आम्ही एक खुर्ची रिकामी ठेवतो. कोणी अवचित पाहुणा येतो. सासरहून कधी आमच्या बहिणी त्या पाहुण्याला वाढायला येतात.” “ आम्ही दोधीही त्या रिकाम्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थाला किंवा बाईंना वाढतो.” मुले व सुना सांगत होत्या. स्वत:ला विसरून मी त्यांचे बोलणे ऐकत होतो.

वैद्य

एक बिगारी कामगार होता. परिस्थितीमुळे रोज काम मिळणे मुष्किल झाले. सरकारच्या रोजगार हमी योजनेचीही कामे हल्ली निघत नव्हती.काय करावे ह्या विचारात पडला.
गावातल्या वैद्याचे काम मात्र कमी होत नाही. त्याची रोजची कमाई जोरात आहे हे लक्षात आल्यावर त्याने वैद्यकी करायचे ठरवले.

घरातल्या बाहेरची खोली चुन्याने रंगवली. बऱ्यापैकी सतरंजी पसरली. स्वत:साठी घरातली उशीच टेकायला घेतली. पाच सहा लहान मोठ्या बाटल्या भोवती ठेवल्या. स्वत: डोक्याला पांढरा पटका बांधून कपाळाला गंध लावून व खांद्यावर उपरणे गुंडाळून बसू लागला. बाहेर पाटी लिहिली. “तब्येत दाखवा. शंभर रुपयात उपाय! गुण नाही आला तर दोनशे रुपये घेऊन जा!” हळू हळू एक दोघे येऊ लागले.

दोन चार दिवसांनी गावातल्या वैद्याने आपली प्रॅक्टिस खलास होऊ नये म्हणून वेळीच ह्याचे पितळ उघडे करायचे ठरवले. वेष बदलून रुग्ण म्हणून वैद्यराज बिगाऱी वैद्याकडे गेले.

खरा वैद्य बिगारी वैद्याला म्हणाला, ”वैद्यबुवा माझ्या तोंडाची जिभेची चवच गेली बघा..” बिगारी बुवा आपल्या जवळच्या बाटल्यांची उगीच जागा बदलत, घरात पाहात म्हणाला, “हरी ४१ नंबरची बाटली आण बाळ.” बाळ्या हऱ्याने बाटली बिगारी बुवाच्या हातात दिली. बुवांनी खऱ्या वैद्याला ‘आऽऽ’ करायला सांगितले. त्याच्या जिभेवर तीन थेंब टाकले. खरे वैद्यराज लगेच थूथू: करत ओरडून म्हणाले,” अरे हा तर कार्ल्याचा रस आहे!” बिगारी वैद्यबुवा म्हणाले,” बघा अचूक उपाय झाला की नाही? चव आली की नाही तुमच्या तोंडाला! शंभर रुपये द्या. खऱ्या वैद्यबुवाने तोंड वेडेवाकडे करत शंभर रुपये दिले.

दोन दिवसांनी पुन्हा वैद्यराज रुग्णाच्या वेषात आले आणि म्हणाले,” वैद्यबुवा माझी स्मरणशक्तीच गेली हो!” बुवानी घरात डोकावत हाक दिली,” हरीबाळा, ती एकेचाळीस नंबरची बाटली घेऊन ये बाबा.” हऱ्याने ती बाटली बुवांना दिली. ती बाटली पाहिल्यावर वैद्यराज जवळ जवळ किंचाळलेच, ४१ नंबरची बाटली? “बुवा ही बाटली तर कडू कारल्याच्या रसाची आहे!” ते ऐकून बुवा म्हणाले,” बघा तुमची स्मरणशक्ती तात्काळ जागी झाली. काढा शंभर रुपये.” वैद्यराजांनी नाईलाजाने शंभर रुपये काढून दिले.

आठ दहा दिवस होऊन गेले. बिगारी वैद्यबुवाकडची गर्दी वाढू लागली.

वैद्यराज आज त्या बोगस बिगाऱी वैद्याची चांगलीच फजिती करायची ह्या निश्चयाने गेले. हातात पंढरी काठी घेऊन निघाले. बिगारी वैद्यबुवाच्या घराशी आले. पायऱ्या चढतांना एकदोनदा त्यांचा तोल गेला. हातातली पांढरी काठी सावरत असताना पायरी चुकली.पडता पडता वाचले. बिगाऱ्याने हे पाहिल्यावर त्यांचा हात धरून त्यांना आत आणले. वैद्यराज बुवांला म्हणाले,” बुवा, गेल्या महिन्यापासून माझी दृष्टी फार कमी झालीय. दिसतच नाही म्हणालात तरी चालेल. उपाय करा काही तरी.”

वैद्यराजांची ही अवस्था ऐकून बिगारी बुवा हात जोडून म्हणाले,” ह्याच्यावर माझ्याकडे उपाय नाही. हे घ्या तुमचे दोनशे रुपये.” हे ऐकल्यावर वैद्यराजाला आत आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. त्याने पैसे घेतले आणि म्हणाले, “बुवा पण हे दीडशे रुपयेच आहेत की!“ बिगारी वैद्यबुवा, वैद्यराजांच्या हातातील नोटा पटकन काढून घेत म्हणाले,” बघा तुमची दृष्टी आली की नाही परत? माझ्या फीचे शंभर रुपये द्या!”

वैद्यराज पांढरी काठी टाकून ताड ताड पावले टाकीत गेले.

[‘भांडी व्याली भांडी मेली’ ह्यासारखी ही पण एक जुनी ‘पिढीजात’ गोष्ट;माझ्या शब्दांत.]

चांगभले! सगळ्यांचेच चांगभले!

बेलमॅान्ट

एक तरुण मुलगा होता. तो अगदी पोरका होता. एका शेठजी कडे पडेल ते काम करायचा. काम संपल्यावर घरी जाताना शेठजी त्याला पीठ मीठ द्यायचा.

घरी आल्यावर तो मुलगा पिठाच्या चार भाकऱ्या करायचा. मीठा बरोबर किंवा कधी शेठजीनी चटणी दिली असेल तर चटणी बरोबर खायचा. दोन रात्री खायचा आणि उरलेल्या दोन, सकाळी कामाला जाताना खायचा. एकदा सकाळी जेवायला बसला तर दुरडीत एकच भाकरी! एक भाकरी काय झाली असा विचार करत त्याने जेवण संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच प्रकार; एकच भाकऱी शिल्लक. हे रोज होऊ लागले तेव्हा एका रात्री झोपेचे सोंग घेउन पडून राहिला. एक मोठा गलेलठ्ठ उंदीर येऊन भाकरी घेऊन पळून गेला.

दुसऱ्या रात्री त्याने उंदराला भाकरी पळवतानाच पकडले. उंदराला म्हणाला,” अरे तू माझी भाकरी पळवतोस. रोज माझी भूक मारावी लागते. अगोदरच चार भाकऱ्या त्यातलीही तू एक पळवतोस! मी करू काय?” “ एऽ बघ , मी माझ्या नशिबाने खातोय. तुझं तू पाहा.” उंदीर असे म्हणाल्यावर तरूण मुलगा म्हणाला,” अरे कसले नशीब आणि फिशिब. मी गरीबीने व्यंगून गेलोय. काय करावे सुचत नाही.” असे म्हणून कपाळाला हात लावून उंदराकडे पाहू लागला. मुलाचे बोलणे ऐकून उंदीरही आपले डोळे मिचकावित म्हणाला, “ तुझ्या प्रश्नाचे उत्तर एकच माणूस देईल. तू गौतम बुद्धाला जाऊन भेट. तो सांगेल.”

तरूण मुलगा मालकाची रजा घेऊन निघाला. प्रवास लांबचा. मुलाच्या अडचणीत आणखी अडचणींची भर घालणारा तो प्रवास! एका रात्री त्याला जंगलातून जाताना दूरवर दिवा दिसला. त्या दिव्याच्या रोखाने निघाला. ते मोठे घर होते. मुलाने दार ठोठावले. एका बाईने दार उघडले. मुलाने त्या बाईला आजची रात्र इथे काढू का असे विचारल्यावर बाई हो म्हणाली. तिने मुलाला खायला दिले पाणी दिले. जेवण झाल्यावर तो कुठे चालला ते विचारले. तरुण मुलगा म्हणाला,” माझा प्रश्न विचारायला मी बुध्दांकडे निघालो आहे.” ते ऐकून बाई म्हणाली,” अरे माझाही एक प्रश्न आहे तोही विचार. माझी वीस वर्षाची मुलगी बोलत नाही. मुकी आहे. ती कधी बोलू लागेल ते विचार गौतम बुद्धाला.” मुलगा हो म्हणाला.

दुसरे दिवशी मुलाचा प्रवास सुरु झाला. जाता जाता वाटेत एक प्रचंड बर्फाने झाकलेला उंच पर्वत दिसला. आणि त्याला शिखरावर माणसासारखा एक ठिपका दिसला. तरूणाला प्रश्न पडला हा पर्वत ओलांडून कसा पार करायचा. शिखरावरच्या माणसाने त्याला पाहिले असावे. तो तिथूनच ओरडला,” मुला वर चढायला सुरुवात कर.” हे ऐकून चढावे की नाही असा विचार करत असतानाच तो माणूस पुन्हा म्हणाला, “ घाबरू नको. वर ये.” मुलगा पर्वत चढू लागला आणि एका क्षणात तो शिखरावर आला. मुलगा थक्क झाला. इतका थक्क झाला की आश्चर्याने तो बोट तोंडात घालायचेही विसरला. बोटात तोंड घालताना, दोन्ही कानात बोटे घालून तोंड आऽऽऽ करून त्या माणसाकडे पाहात राहिला. माणसाने विचारले,” अरे इकडे कुणी येत नाही. तू कसा आलास?” तरुण मुलगा म्हणाला, “ ते नंतर. आधी मी इथे एका क्षणात वर कसा आलो ते सांगा.” त्यावर तो माणूस आपल्या हातातली सुंदर छडी दाखवत म्हणाला,” अरे मला ही जादूची शक्ती मिळाली आहे. तू कुठे चाललास ?” त्यावर मुलगा म्हणाला, मी माझा प्रश्न विचारायला गौतम बुद्धाकडे निघालोय्.” ते ऐकल्यावर तो माणूस म्हणाला,” अरे मी इथे हजार वर्षे तप करत बसलो आहे. जादूच्या शक्तीशिवाय मला काही मिळाले नाही.मला स्वर्गात जायला केव्हा मिळेल ते बुद्धांना विचार.” तरूण हो म्हणाला. शिखरावरच्या माणसाने त्याला पर्वत पार करून दिला.

मुलगा निघाला. विचार करू लागला, माझा प्रश्न घेऊन निघालो आणि आता ह्या दोघांच्या प्रश्नांची आणखी भर पडली.चला. असे स्वत:शी म्हणत पुढचा प्रवास करू लागला. तर एक नवीनच संकट पुढे वाहात असताना दिसले. भल्या रुंद पात्राची महानदी समोरून वाहात होती. काय करावे. पोहता येत होते तरी आडा विहिरीतले पोहणे त्याचे. इतकी अफाट रुंदीची नदी पार करणे अशक्यच होते त्याला. अधेमध्येच गटांगळ्या खाऊन बुद्धाला न भेटताही चौघांचेही प्रश्न सुटले असते!

तेव्हढ्यात एक फार मोठे कासव पोहत येत असलेले दिसले. कासव जवळ आले. मुलगा म्हणाला,” कासवराव मला नदी पार करून देता का? “ “ का नाही? चल माझ्या पाठीवर बस. तरुण मुलगा कासवाच्या महाप्रचंड पाठीवर बसला. जाताना कासवाने मुलाला तो कुठे , कशासाठी चालला विचारले. मुलाने तो बुद्धाकडे स्वत:ची समस्या सोडवण्यासाठी चालल्याचे सांगितले. त्यावर कासव म्हणाले,” बाळा माझाही एक प्रश्न तथागतांना विचार.. मला डायनासोर व्हायचं आहे. मी काय करू?” मुलगा म्हणाला नक्की विचारेन. पण मनात म्हणत होता माझा एक म्हणता म्हणता आता चार प्रश्न झाले! चला.

तरूण मुलगा गौतमबुद्धांच्याकडे पोचला. पुष्कळ लोक होते. गौतम बुद्धाने प्रथमच सांगितले की प्रत्येकाला फक्त तीनच प्रश्न विचारता येतील!”
हे ऐकून मुलगा निराश झाला. विचारात पडला. त्याची पाळी येईपर्यंत तो मनाशी बोलत होता. फक्त तीनच प्रश्न विचारायचे. मला तर चार प्रश्न विचारायचे आहेत. तो तिघांचे प्रश्न घोळू लागला. तिघेही त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. कुणाचा प्रश्न बाजूला ठेवायचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडू लागला.
त्याने विचार केला मुलगी मुकी. त्यामुळे बाई व मुलगी वीस वर्षे त्या एकमेकींशी बोलू शकत नाहीत. तसेच तो जादूगार कित्येक वर्षे तप करतोय; आणि कासवदादा किती वर्षे पाण्यातच पोहतोय. माझा प्रश्न काय फक्त पोटापाण्याचा आहे. आज कोरडीसुकी का होईना पोटाला भाकरी मिळतेच आहे नां?

मुलाची पाळी आली. त्याने कासव डायनासोर केव्हा होईल ते विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला म्हणावं ते पाठीवरचे अगडबंब कवच फेकून दे!” नंतर त्याने जादुगाराला स्वर्गात जायला केव्हा मिळेल हे विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला अगोदर त्याच्या त्या शक्तीचा त्याग कर म्हणावे.” त्यानंतर मुलाने वीस वर्षे मुकी असलेली मुलगी केव्हा बोलेल हा प्रश्न विचारला. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, “ तिचे लग्न झाल्यावर ती बोलेल.”

मुलगा परत निघाला. कासवाने त्याला पाठीवर घेऊन पैलतीराला सोडताना विचारले,” विसरलास ना तू माझा प्रश्न विचारायला?” मुलगा म्हणाला,” मी तुला कसा विसरेन ? बुद्धाने तुला कवच काढून टाकायला सांगितले आहे!” हे ऐकताक्षणीच कासवाने सर्व शक्ती पणाला लावून आपले कवच तोडून फाडून टाकले. प्रचंड आवाज होत कासवाचा महाकाय डायनासोर झाले! ते होत असतानाच कवचातून रत्नामोत्यांचा वर्षाव झाला. पूर्वीचे कासव म्हणाले. “ तरूण मित्रा ही सर्व रत्ने मोती तुझी!”

मुलगा ती रत्नं मोती मिळाल्याने मालामाल झाला. प्रवास करत पर्वतापाशी आला. पर्वतावरच्या माणसाने वरूनच विचारले,” पोरा माझा प्रश्न विचारलास नां ? का गडबडीत विसरलास?” विचारला असलास तरच तुला वर घेईन.” हे ऐकल्यावर मुलगा हो म्हणाल्याबरोबर त्याच क्षणी तो शिखरावर आलाही! “ बुद्धांनी तू तुझ्या शक्तीचा जेव्हा त्याग करशील तेव्हाच तू स्वर्गात जाशील असे सांगितले आहे.” हे ऐकल्यावर तो जादूई शक्तीचा माणूस म्हणाला, “ आताच मी माझ्या शक्तीचा त्याग करतो.” तो पुढे म्हणाला,” हे मुला ही माझी शक्ती मी तुलाच देतो !” असे म्हणून त्याने जादूची सुंदर कांडी त्या मुलाला दिली. क्षणार्धात त्या तपस्व्यासाठी “उघडले स्वर्गाचे दार!”

रत्नं मोती आणि जादुची ती छडी घेऊन एका क्षणात तो तरुण त्या बाईंच्या घरी पोचला. बाईंनी बुद्धाने काय सांगितले असे विचारल्यावर मुलाने बुद्धाचा निरोप बाईंना सांगितला. ते ऐकून बाईला फार आनंद झाला. आपल्या वीस वर्षाच्या तरूण सुंदर मुलीला घेऊन आल्या. त्या म्हणाल्या,” अरे तुझ्यासारखा तरुण समोर असताना माझ्या मुलीसाठी दुसरा नवरा का शोधायचा?”

त्सा तरुण मुलाचे व मुक्या मुलीचे लग्न झाले. मुलीने आनंदाने ,” आई! आई! मला बोलता येऊ लागले”म्हणत आईला मिठी मारली.
कासवाची, तप करणाऱ्याची व मुक्या मुलीच्या आईची – तिघांच्याही मनातल्या इतक्या वर्षांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या चिंता मिटल्या. प्रश्न सुटले. आणि त्या तरुण मुलाने गौतम बुद्धांना आपली चिंता प्रश्न न विचारता तोही धनवान शक्तिमान आणि चांगली बायको मिळाल्याने भाग्यवानही झाला.

एकाच्या भलेपणाने इतर सगळ्यांचेही चांगभले झाले.


आपण पंढरपूर, तुळजापूर किंवा कोल्हापूरला किंवा एखाद्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जाणार हे कळल्यावर काहीजण “आमचाही नमस्कार सांगा” असे सांगतात. तिथे गेल्यावर कितीजण लक्षात ठेवून त्यांचे नावे नमस्कार करतात हे माहित नाही.

(युट्युबवरील एका व्हिडिओत काही जण गप्पा मारत असता त्यातील एकजण ही लहानशी गोष्ट सांगतो. त्यावरून अखेरच्या परिच्छेदाची भर घालून मी ही लिहिली.)

टॉम  हॅन्क्स

अनेकांना टॉम  हॅन्क्स Forrest Gump सिनेमामुळे माहित आहे. मला तो सुधीरकडे पाहिलेल्या The Green Mile मुळेही माहित आहे. तसेच गाजलेल्या Toy Story मध्ये Woody चा आवाजी म्हणूनही माहित असेल. टॉय स्टोरी च्या चारी सिनेमात Woody ला आवाज त्यानेच दिला आहे. आता नाताळ आहे म्हणून त्याचा Polar Express सिनेमा सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जाईल. ह्या सिनेमात तर त्याने मुलगा, बाप, कंडक्टर, ड्रायव्हर (हा स्वत:च) इतक्या जणांना आवाज दिला आहे! ह्या २५ डिसेंबरला काही टॅाकीजमध्ये व HBO वर त्याचा News From The World हा नवा कोरा सिनेमा येतोय.

बहुधा टॉम हॅन्क्सला ह्या भूमिकेमुळे Oscar मिळण्याची किंवा नामांकन तरी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कथा अमेरिकेतील यादवी युद्ध नुकतेच संपले ह्या काळातली आहे. कॅप्टन केयल /केयल किड्ची(Kayla Kidd) बायको वारली. युद्ध संपल्यावर करायचे काय म्हणून हा सरहद्दी सरहद्दीवरील खेड्यापाड्यात जाऊन माणशी दहा पैशे(डाईम)घेऊन तो वर्तमानपत्र वाचून दाखवत प्रवास करत असतो. त्यातच त्याला युद्धामुळे पोरकी झालेली दहा वर्षाची मुलगी सापडते. टेक्सासमधील तिच्या आजी आजोबा कडे पोचवण्याची जबाबदारी घेतो. आणि एका मोठ्या प्रवासाला आपल्या घोडागाडीतून मजल दरमजल करत निघतो. त्यात काय होते ते ….

वर्तमानपत्र वाचून दाखवण्यावरून मला पूर्वी लहानमोठ्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक लाकडी उतरते डेस्क घेऊन एक जण बसलेला असे, त्याची आठवण झाली.

डेस्कवर निळ्या आणि तांबड्या शाईच्या दौती, दोन तीन टाक व बाजुला डेस्कवरच टीपकागदाचा ठसा डुलत बसलेला; एव्हढाच सरंजाम. लागली तर असावीत म्हणून पाच सहा मनीऑर्डरचे फॉर्म,थोडी तिकीटे-पाकीटेही डेस्कच्या कप्प्यात असत. बरेच निरक्षर लोक आपली पत्रे मनीऑर्डरचे फॉर्म त्याच्या कडून लिहून घेत. त्याचे पैसे तो अर्थातच घेत असे. कामगार,मजूरवर्गाला,आणि इतर अनेकांना हा गृहस्थ मोठी विद्या शिकलेला वाटायचा ह्यात नवल नाही. त्या सर्वांसाठी ही फार मोठी सोय होती हे खरे.

कोर्टातही असे लोक होते व आजही आहेत. तिथे तर कोर्टाच्या मोठेपणा प्रमाणे दोन तीन ते आठ दहा जण असत. पोस्टाप्रमाणे ही माणसं साधी नसत. कोर्टाच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. कोर्टाजवळची ही लिहिणारी माणसे कायदा कोळून प्यालेली असत. आज तर ते कियोस्को सारख्या टपऱ्यात कंम्प्युटर घेऊन व जोडीला झेरॅाक्सचे मशिन घेऊन आहेत. हे सुद्धा कोर्टकचेरीला नवख्या शिक्षितांना व चागल्या शिकल्या सवरलेल्यांनाही तसेच अशिक्षितांना ही ह्यांची गरज असते. पण पैसे काढायलाही बेरकी असतात. कोर्टाती पायरी चढलेला अडला नारायण काय करणार! देतात बिचारे.

टॉम हॅन्क्सने तीन चार सिनेमाच्या कथा किंवा पटकथाही लिहिल्या आहेत. फॅारेस्ट गम्प च्या कामासाठी त्याला एक रकमी मोबदला नव्हता. त्याऐवजी सिनेमाला जे उत्पन्न होईल त्याचे काही टक्के रक्कम मिळेल असा करार होता. त्याला त्याकाळी, वीस बावीस वर्षापुर्वी, ४०मिलियन डॅालर्स एव्हढी रक्कम मिळाली!
टॉम हॅन्क्स हा पंधरा सोळा वर्षाचा असतांना तो ओकलॅन्डच्या हिल्टन हॅाटेल मध्ये प्रवाशांचे सामान उचलून नेण्याचे काम करत होता. हॅालिवुडच्या चेर, सिडने पॅाइशे सारख्या अनेक नामवंतांचे सामान उचलून त्याने खोल्यात ठेवले आहे. आजही ते फोटो त्या हिल्टनमध्ये आहेत. तसेच ओकलॅन्ड टीमच्या बेसबॅालच्या मॅचेस वेळी त्याने पॅापकॅार्न चॅाकलेट विकली आहेत.

टॉम हॅन्क्सला टाईपरायटर फार आवडत. त्याच्या जवळ त्याने जमवलेले देशोदेशीचे २५० टाईपरायटर्स आहेत! तो टाईपरायटरवरच लिहायचा. आता लॅपटॅाप किंवा स्मार्ट फोन वरील कीबोर्ड वापरत असेल.

टाईपरायटरवरील प्रेमाने त्याने स्वत: एक साधन App केले! त्याचे नाव त्याने Hanks Writer ठेवले आहे. की बोर्डवरील अक्षर उमटताना टाईपरायटरच्या ‘की’चाच आवाज येतो व ओळ संपली की तशीच बेल वाजते! चला, माझ्या लिखाणाचीही ओळ संपली. टिंग्!

कर्ण

कर्णाच्या रथाचे चाक रक्ताचिखलात रूतले. कर्ण रथाखाली उतरून ते चाक बाहेर काढू लागला. कर्ण ? महारथी कर्ण खाली उतरून चाक काढू लागला? सारथी नाही उतरला चाक काढायला? सारथी नव्हता का?

सारथी होता.आणि तोही श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी होता. राजा शल्य!

शल्याने दुर्योधनाला तो त्याच्या कौरवांच्या बाजूने लढेन असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यासह कौरवांकडे येण्यास निघाला होता. पण वाटेत पांडवांनी त्याला आग्रहाने थांबवून घेतले. पाहुणचार केला. आपली बाजू सांगितली. आमच्या बाजूने तू लढ अशी विनंतीही केली. शल्यही जवळपास तयार झाला होता. पण आपण दुर्योधनाला अगोदरच त्याच्या बाजूने लढणार असे आश्वासन दिल्याची त्याला जाणीव झाली. पांडवांना,” पण मी आधीच दुर्योधनाला त्याच्या बाजूने लढेन असे कबूल केले आहे. माझी इच्छा असूनही मला तुमची बाजू घेता येत नाही असे सांगितले. पण त्याच बरोबर मी तुम्हाला मदत करेन” असेही सांगितले.

शल्याचे बोलणे ऐकून कृष्ण नेहमीप्रमाणे स्वत:शी हसल्यासारखे हसत म्हणाला,” शल्या,तुझी वाणी जरी वापरलीस तरी ती खूप मदत होईल!” कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ कुणाला समजला असेल असे वाटत नाही. पण शल्य, कृष्णाने आपले वर्म काढून डिवचले की आपल्या शैलीचे कौतुक केले ह्यावर विचार करत पांडवांचा निरोप घेऊन कौरवांच्या युद्ध शिबिरात आला.

दुर्योधनाने शल्याचे स्वागत केले. द्रोणाचार्य पडल्यानंतर कर्णाकडे सेनापतीपद आले. दुर्योधनाने व कर्णाने त्याला आपले सारथ्य करावे अशी विनंती केली. सारथ्यात शल्याच्या तोडीचा,एक श्रीकृष्ण सोडल्यास कोणीही नव्हता. म्हणूनच दुर्योधनाने शल्याला तशी विनंती केली. शल्य मनात म्हणत होता,कर्ण पराक्रमी वीर आहे पण एका सूतपुत्राचे मी सारथी व्हावे हे कसे शक्य आहे. पण दुर्योधनाची मैत्री व त्याच्याविषयी वाटणारी जवळीक यामुळे तो कबूल झाला. पण एक अट घालून. तो फक्त कर्णाच्या रथाचे सारथ्यच करेल. सारथ्याची इतर कामे तो मुळीच करणार नाही. शिवाय मी कर्णाशी बोलताना किंवा मी कर्णाला काहीही बोललो तरी त्याला ते मुकाटपणे ऐकून घ्यावे लागेल. प्रत्युत्तर दिले तर माझीही प्रत्युत्तरे सहन करून ती ऐकावी लागतील. ह्या अटी मान्य असल्या तरच मी कर्णाचा सारथी व्हायला तयार आहे.

कर्णाला शल्याच्या अटीच्या पहिल्या भागाविषयी काही विशेष वाटले नाही. सारथ्य तर फक्त सारथ्य कर चालेल! असेच तो मनात म्हणाला असेल. पण शल्याने दुर्योधनाला मदत करण्या बद्दल अशा अटी घालाव्यात हेच कर्णाला पटण्यासारखे नव्हते. कर्णाला, आतापर्यंत राजमंडळात आपला विषय निघाला की त्याचा एखादा दोष काढता येत नाही असे जाणवल्यावर , मग केवळ “तो काय शेवटी सूतपुत्रच!” असे म्हणत अनेक राजे काय बोलत असतील ह्याचा त्याला अंदाज होता. त्यामुळे शल्य काय बोलेल ह्याची शक्यता त्याला माहित होती. तरीही आपला मित्र दुर्योधनाचे सांगणे मान्य करत शल्याची ती अट त्याने मान्य केली.

रणांगणावर शल्य कर्णाचा किती उपहास, उपमर्द, अपमान करत असे त्याला सीमा नाही! कर्णाच्या पुर्वीच्या पराभवांचा उल्लेख करीत त्याच्या वर्मावर बोट ठेवून झोंबणाऱ्या शब्दात बोलत असे. पराक्रमात अर्जुनाचे गोडवे गायचे;प्रत्येक बाबतीत अर्जुनाची स्तुती करून कर्णाला हिणवायचे. कर्ण अर्जुनाच्या तोडीचा नाही असे सांगत त्याची सर्वतोपरी खच्ची करण्याची संधी सोडत नसे. कर्णाचा शल्याने सतत तेजोभंग करीतच तीन दिवस सारथ्य केले होते. कर्णाच्या पराभवात शल्याचा मोठा वाटा होता. सुरुवातीला कर्णानेही उत्तर देतांना शल्याचा उल्लेख न करता सगळ्या मद्रदेशीयांच्या संदर्भात बोलत त्यांची निंदा केली होती. पण शल्यानेही त्याला तिरकस शब्दांत सुनावले होते. ह्या पार्श्वभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक जमीनीत रूतल्यावर कर्णालाच ते बाहेर काढण्यासाठी उतरावे लागले ह्यात आश्चर्य वाटायला नको!

कर्ण रथचक्र शक्ति लावून काढत असता कृष्ण उदारदात्या कर्णाला विचारु लागला,” कर्णा तुला रथ देऊ का दुसरा?” मुळात दानशूर, उदार कर्ण दुसऱ्याची मदत मग तो कृष्ण असला तरी कशी घेईल? किंबहुना कृष्णाची मदत तो कशी घेईल? कर्णाचे उत्तर त्याला साजेसेच होते. तो म्हणाला,” कृष्णा ज्याच्या बाजूने, ज्याच्या साठी मी लढतो आहे त्या राजा दुर्योधनापाशी अनेक रथ आहेत. पण मी माझ्याच रथातून युद्ध करत असतो. म्हटले तर कौरवांचा राजा माझ्यासाठी दहा रथ पाठवेल. त्यामुळे मला तुझे सहाय्य घेता येणे शक्य नाही कृष्णा!” पण तुझी इच्छाच असेल तर कृष्णा तुला बरे वाटावे म्हणून मागतो. द्यायचेच असेल तर मला लाकडाचे मोठे दांडके दे. ते जास्त उपयोगी येईल.” पण कृष्णाला मानी कर्णाचे असले क्षुल्लक मागणे आपण पुरे करणे कमीपणाचे वाटले असावे. तो पुन्हा कर्णाला म्हणाला, “कर्णा,मी तुला रथ देत असता तू मला लाकडाचे दांडके मागतोस ! आणि मी ते देईन अशी अपेक्षा करतोस? अजूनही विचार कर! मी तुला पाहिजे तसा रथ देईन, बघ! “

कर्ण मनांत म्हणाला असेल,” रथापेक्षा दुसरा सारथी देतो म्हणाला असतास तर माझ्या स्वभावाला मुरड घालूनही ते मी लगेच मान्य केले असते.”

कर्णाने समोर मोडून पडलेल्या रथांपैकी एका रथाचा दांडका काढून आणला. ते मोठे दांडके चाकाच्या पुढे ठेवून त्यावरून चाक बाहेर काढण्याच्या खटपटीस लागला.

पण अखेर कर्णाची वेळ आली होती. कर्णाच्या त्या स्थितीत अर्जुनाने युद्धधर्माच्या विरुद्ध कृत्य करीत त्याच्यावर बाण मारायला सुरुवात केली. तेव्हा कर्णाने अर्जुनाला अशा परिस्थितीत लढणे हे युद्धधर्माविरुद्ध आहे; ह्याला धर्मयुद्ध म्हणत नाहीत असे सांगितले. पण “तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?” (कवि मोरोपंत) अशी एकेका प्रसंगाची आठवण करून देत, प्रश्न विचारत, अर्जुनाने कर्णावर शरसंधान चालूच ठेवले… इत्यादी इत्यादी …. भाग माहित आहेच.

कर्णानंतर शल्यच कौरवांचा सेनापती झाला. पण एका दिवसातच शल्याचा फडशा पडला. पांडवांकडून निघताना कृष्ण हसत शल्याला जे म्हणाला त्याचा अर्थ शल्याला अखेरीस लक्षात आला असेल!

आमच्या गावचे पाणी – १

वि
ही
री
ती

पा णी

बेलमॅान्ट

विहीर दिसली की तिच्यात डोकावून पाहण्याचा मोह कुणाला होत नाही? लहानपणी तर प्रत्येक जण विहीरीच्या भिंतीवर ओणवे होऊन, पाय उचलून, वाकून वाकून खोल पाण्याकडे पाहात असतो.

विहीर ! खोल, आणि दिवसाही आतून थोडेसे उन झेलणारी; किंचित अंधारी, काळोखी अशी वाटणारी! त्यामुळे विहीरीत पाहिले की, “ रात्र काळी बिलवर काळी । गळामुखी माझी काळी हो माय” असा विहिरीत सर्व काही थोडा प्रकाश मिसळलेला काळोख दाटलाय असे वाटायचे.

विहीर म्हटले की मी माझ्या डोळ्यासमोर येते ती मी पाहिलेली पहिली विहीर- खारी विहीर! सात की नऊ बुरुजी गढीसारख्या ( मी लहान असल्यामुळे तितके बुरुज होते की नव्हते हे पाहिल्याचेही आठवत नाही. दोन तीन पाहिल्याचे आठवते. तेही ढासळत आलेले) आमच्या आजीच्या मोठ्या वाड्यातील विहीर लहान कशी असेल ? खारी विहीरही प्रचंड वाड्याला शोभेल अशीच होती.

तिची प्रत्येक पायरी उतरताना कमरेला भरजरी शेला, त्यात जांभळ्या मखमलीच्या म्यानात तेजतरार तलवार लटकावलेली, दोन्ही बाजूला उभे असलेल्या मानकऱ्यांचा मुजरा घेत उतरतो आहे, असे त्या अर्ध्या चड्डीसदऱ्याच्या, मनगटाने नाक पुसण्याच्या वयातही वाटत असे. पायऱ्या उतरून कमानी खालच्या पाण्याजवळच्या पायरीवर उभे राहिले की मात्र त्या मोठ्या चौकोनी विहीरीतले ते शांत,पसरलेले पाणी पाहून जीव घाबरा घुबरा होत असे. पोहायचे नसतानाही छातीवर दडपण येई! पण हे सुरवातीचे पाच दहा क्षणच! तोपर्यंत वरच्या उंच कठड्यावरून धाडकन मुटका मारून चारी बाजूला उंच उडवलेले जोरदार पाणी तितक्याच वेगाने स्वत:भोवती फिरत गोल पसरत गेलेले असे. पाण्यावर पांढऱ्या काळसर फेसांची गोल गोल वर्तुळे फिरू लागली असत.बराच वेळ बुडबुडे दिसत. हळूच एक डोके वर येत असे. पाण्यातच उभे राहून हाताने केस मागे सरकवत,मान हलवून पाण्याचे थेंब उडवत,आवाज न करता हात मारत आईचे कुणी चुलत मामा, काका,भाऊ पोहत पलीकडे गेलेलेही असे.

लहान असल्यामुळे डोळेही लहान. डोळ्यांना सगळे काही मोठेच दिसायचे. त्यात भर म्हणजे बालपणातले कुतुहल, आश्चर्य व थक्क होण्याची सवय. सर्व काही विस्फारलेल्या डोळ्यांनीच पाहावे लागे. त्यामुळे खाऱ्या विहीरी सारखी मोठी विहीर जास्तच मोठी दिसायची. प्रत्येक वस्तु मोठी वाटायची. त्यानंतर आजीच्या गावी पुन्हा जाणे झाले नाही. आज तो बुरुजी वाडाही आहे का नाही माहित नाही.. विहीरही असेल नसेल. असली तरी कशा अवस्थेत असेल कुणास ठाऊक. झाडा ढगांच्या सावल्यांनी ‘झांकळोनि जळ काळिमा पसरलेला’ असेल. पण आजही कधीऽ तरी स्वप्नात ती ‘खारी विहीर’ येते. कारण नसता उत्सुकतेने क्षणभर छातीचे ठोके वाढतात. पण लगेच समोर पसरलेल्या पाण्याच्या गारव्याने स्वप्नातही धीर येतो.

विहीरीचा विषय निघाला आहे तर आजही आमच्या गावात पूर्वीपासून असलेल्या दोन विहीरी लक्षात येतात. एक डाळिंबाचे आड. म्हणताना तिचे डाळिंब्याचे आड व्हायचे. दुसरी म्हणजे नव्या पेठेतली गंगा विहीर. ही तेव्हाही बंदच असायची. डाळिंबाचे आड लहान विहीरच म्हणायची. ती काही वर्षे तरी रोजच्या वरकामासाठी वापरात होती. आज तीही नाही. बऱ्याच गावातील विहीरींप्रमाणे, आमच्या ह्या दोन विहीरींचाही पत्ता सांगण्यासाठी तरी मोठा उपयोग होत असे!

पण अंगावर काटा आणणाऱ्या एका विहीरीचा उल्लेख केला नाही तर गावाचेही वर्णन पूर्ण होणार नाही. ती म्हणजे ऐतिहासिक किल्यातली ‘बाळंतीणीची विहीर’ ! नावापासूनच रहस्यमय भयपटातील “ कॅुंईऽकर्रऽऽ किर्रऽऽकॅ किं ऽऽईऽ करत किंचितच उघडणाऱ्या दरवाजाची व त्यातून फिकट पिवळसर किंवा निळसर प्रकाशाच्या रेघेची व पडद्यामागील थरकाप वाढवणाऱ्या संगीताची” आठवण येऊन आपण खुर्चीच्या अगदी काठावर येऊन बसतो! आणि त्या विहीरीच्या एकाच गोष्टीच्या झालेल्या अनेक चित्तथरारक रूपांच्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता वाढते! ह्याला म्हणायचे ‘नावात काय नाही’?

खाऱ्या विहीरीच्या अगदी उलट अशी एक विहीर आमच्या गावात होती. दीनवाणी! जणू दुर्दैवाच्या दशावतारात सापडलेली. वारदाच्या कोर्टासारख्या राजेशाही इमारतीच्या मागे पसरलेल्या आवारातील एका भागात ती होती. त्यावेळीही ती ‘होती’ म्हणावी अशीच होती. भोवताली काटेरी झुडपे; त्यावर चढलेल्या रानवेलीं मधून ती जेमतेम दिसायची. मोठ्या ओबड धोबड झालेल्या गोलाकार खड्ड्याला विहीर का म्हणायचे तर आजूबाजूचे अनुभवी लोक विहीर म्हणायचे म्हणून. विहीरी भोवती दगड विटांचे तुकडे पडलेले. कधी काळी असलेल्या तिच्या भिंतीच्या तुकड्यांचे एक दोन अवशेष कलंडून उभे होते. पाला पाचोळा केर कचरा आणि शेवाळ्यांमधून हिरव्या पाण्याचे चार दोन पसरट दिसत. निर्जन भागातली, जणू वाळीत टाकलेली ती विहीर होती. आमच्या सारखी लहान पोरे, दुसरे काही उद्योग नसले तर कधी तरी एकदा त्या काट्याकुट्यांतून उड्या मारत,दगड विटावर पाय ठेवून आत डोकावल्यासारखे पाहून परत येत असू. स्वत:ला थोडे भेदरवून घेत,गप्प होऊन परत मागे फिरत असू.

काही वर्षांनी तिथले कोर्ट गेले. महापालिका आली. मागच्या मोकळ्या जागेत बांधकाम झाले. त्यात नावापुरती राहिलेली ही ‘विहीर’ नाहीशी झाली.

पण विहीरींचा खरा उपभोग व उपयोग आम्ही भावंडे, मित्र, लहान मुले-मुली व तरुण उन्हाळ्याच्या सुटीत पोहण्यासाठी करून घेत असू. गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील विहीर ही त्यासाठीच होती. गोपाळरावही दिलदार माणूस. दरवर्षी त्यांनी आमच्यासारख्या लहानांना आणि मोठ्या मुलांनाही पोहायला शिकवले. अशी बरीच वर्षे! कुणाकडूनही एक पैसा न घेता! ॲकडमी, स्पोर्ट जिम, हेल्थ क्लब, रेक्रिएशन स्किल्स अशापैकी एकही नाव किंवा जलतरण विद्या मंडळ, केंद्र, तरंगिणी, तरणतारण, असलीही नावे न ठेवता ते फक्त जो येईल त्याला पोहायला शिकवीत असत. बरं विहीर म्हणायची खरी पण तशी लहान वाटायची.

गोपाळरावांच्या विहीरीत उतरायला पायऱ्या होत्या. पायऱ्या नेहमीच्या नाहीत. विहीरीच्या एका गोलाईच्या भिंतीतून एकेक हैदर आडवा बाहेर आलेला. एका खाली एक हैदर होता. त्यांमधील अंतर लहानांसाठी जास्त होते. कारण दोन हैदरमध्ये काही नव्हते. दोन दातामधला एक एक दात पडल्यावर राहिलेले दात दिसावेत सल्या पायऱ्या! पण कुणाच्या तरी मदतीने लहान मुले विहीरीत येत. तरीही त्या दगडी पायऱ्या उतरत येताना सिनेमातील आलिशान बंगल्याच्या आतील वळणदार जिन्यावरून गाऊन घातलेला व तोंडात सिगरेट धरून उतरणाऱ्या अशोककुमारची आठवण यायची. गोलाकारावरून खाली उतरताना पहिल्या तीन चार पायऱ्या काही वाटत नसे. पण जसे खाली खाली यावे तेव्हा काळ्या विवरात शिरत आहोत किंवा अंधाऱ्या गाभाऱ्यात चाललो आहोत असे वाटायचे. पाण्याच्या भीतीत ही भीती मिसळा मग लक्षात येईल की पोहायची भीती का वाटते. पण काही तरूण मुले एकापाठोपाठ धाडकन उड्या तरी किंवा मुटका मारून एन्ट्री घेत. पण नंतर अशा नाट्यमय पण पाण्यात असणाऱ्या व उडी घेणाऱ्या दोघांनाही धोकादायक एन्ट्रीला गोपाळरावांनी बंदी घातली.

पहिले काही दिवस प्रत्येकाच्या कुवतीनुसार स्वत: आणलेले डालडाचे पाच-दहा पौडी डबे पाठीला बांधून पाण्यातल्या पायऱ्यांपाशीच डुबक डुबुक करावे लागे. माझ्यासारख्या, दंड दालचिनी एव्हढे आणि गोळा मिरीएव्हढा,पाय ज्येष्ठमधाच्या काड्या, अशा ‘गब्रु सॅंन्डोला’ डबा बांधण्या ऐवजी मलाच डब्याला बांधावे लागे. म्हणून गोपाळराव म्हणत,” अरे ह्याचा डबा सोडा. हा कसला बुडतोय! “ मग माझ्याकडे पाहात म्हणायचे,” पाण्यांत राहा. वर हवेत तरंगायचं नाऽही!”

पण हे डबा प्रकरण फार तर एक दोन दिवस चाले. त्यानंतर लगेच गोपाळरावांचे पोहण्याच्या बिगरीतील पोरांसाठी पायरीला धरून “ हात मार पाय मार”चे लेफ्ट राईट् सुरू होई. त्या नंतर मुलांच्या पोटाखाली ते हात ठेवल्यासारखा करत पाण्यांतून “हात मार पाय मार” करत फिरवायचे. त्यांनी मध्येच हात कधी काढला हे पोराला एक दोन गटांगळ्या खाल्यावरच समजे.त्यांची पुढची पायरी म्हणजे ते मुलांच्या हनुवटीला बोटांनी वर उचलून ते पाण्यातून त्याच्याकडे पाहात मागे मागे जात. पोराला आपण पाण्यात असूनही हात पाय मारत अर्धी फेरी मारली हे समजतही नसे. कारण तेव्हढ्यात गोपाळराव दुसऱ्या पोराकडे “ए हात मार पाय हलव” करत गेलेले असायचे! आम्हा सगळ्यांना, न शिकताच आम्ही पोहू लागलो असा भ्रम व्हायचा. ह्यामुळेच गोपाळराव व त्यांची विहीर तिथे पोहायला शिकलेल्या सर्वांच्या आठवणीत असते!

गोपाळराव केळकरांच्या वाड्यात दुपारचे तीन तास तर सहज निघून जात. ज्यांचे नंबर लागायचे असतील ते पत्त्याचा डाव मांडून बसायचे; ज्यांचे पोहणे झाले असे तेही दुसरीकडे खेळत बसत. वसंता आणि भालू , दत्ता,बंडू सारखी किंवा आमचे थोरले भाऊ नाना, मुकुंद, अरूणआणि मधू हे मात्र पाण्यात आवाज न करता निरनिराळे हात मारत चकरा घेत असत. मध्येच कासवासारखे पाण्याच्या आतून पोहत.त्यांना त्यांच्या कौशल्याचे हे पारितोषिक असे. मग तीन सव्वा तीन वाजता तिथल्याच अंगणात वाळलेले, किंवा आंबट ओले कपडे खांद्यावर टाकून मजेत घरी यायचो!

एकदा पोहायला आल्यावर मग काय! आज वारदाच्या बागेतल्या विहिरीत तर परवा गुलाबचंदशेठच्या पंख्याच्या विहीरीत, तर कधी गणेशराम मुरलीधर यांच्या बागेतील विहीरीत पोहण्याच्या मोहिमेवर निघायचो. मोहिमेवर का म्हणायचे तर ह्या तीन विहीरी शहराच्या तीन दिशेला होत्या. ह्या मोठ्या धनवान माणसांचे मोठेपण की ते आमच्या सारख्या मुलांना त्यांच्या खाजगी विहीरीत पोहायला उदार मनाने परवानगी देत. पण आम्हीही तिथे कधी गडबड धिंगाणा केला नाही. पंख्याची विहीर म्हणजे दुरुनही दिसणारी तिची पवनचक्की असलेली विहीर! तिथली नारळाची उंच झाडे व आंबा चिक्कू पेरूंची व तऱ्हतऱ्हेंच्या फुलांचीही झाडे असलेली सुंदर बाग ह्यामुळे पंख्याची विहीर शोभिवंत होती! तिच्या पाण्यावर ही फळाफुलांची बाग बहरलेली असे.

थोडा भाजीपालाहू पंख्याची विहीर काढत असे. वारदाच्या बागेतील विहीर ही त्यांची उपवनासारखी बाग ताजी तवानी ठेवायची व जवळच असलेल्या शेतालाही पाणी पुरवत असावी. तशीच गणेशरामचीही विहीर. ह्या तिन्ही विहीरी खऱ्या विहीरी वाटायच्या. ह्या तीन विहीरी शहराच्या तीन टोकाला असल्यामुळे चालत जाणे किंवा सायकलवरून जाणेही रोज कधीच जमत नसे.त्यामुळे संपूर्ण सुट्टीत फार तर एक दोन वेळा प्रत्येक विहीरीत पोहणे होत असेल. पण जितके होई ते उत्साहाला भरतीच आणत असे.

गोपाळराव केळकरांच्या वाड्यातील बेतशीर विहीर म्हणजे अनेकांची पोहण्याची Alma Mater च होती! त्यांच्या वाड्यातील लोकांच्या धुण्या भांड्यांसाठी ती वापरली जाई. पिण्याच्या पाण्यासाठी शहरात नळाने पाणी पुरवठा होतच असे. ह्या सर्व विहीरींनी आम्हाला पाण्याचे वेगळे, गंभीर तितकेच खेळकर रूप दाखवले. भव्य, देखण्या,खाऱ्या विहीरीकडे,मी दोन तीन दिवस जवळून फक्त एकटक नजरेने समोर पसरलेले पाणी पाहत असेन.किती वर्षे उलटून गेली.पण ती माझ्या डोळ्यांच्याही लक्षात राहिली आहे.

पुढे बरेच जणांनी आधुनिक स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचे सुख उपभोगले. पण ह्या चार विहीरींच्या पाण्यातील गंभीरतेची, भयोत्सुकतेची, मध्येच घाबरलेल्या नवशिक्यांच्या चित्कारांची, त्यांची गंमत करणाऱ्यांच्या हसण्या खिदळण्याची, उड्या आणि मुटक्यांनी सपकन चौफेर उडवलेल्या उंच फवाऱ्यांची, ‘गावच्या पाण्यात’ पोहण्याच्या आठवणी ते विसरले नसतील. कसे विसरतील? त्या आठवणी म्हणजे भाग्यानेच लाभावी अशी आमच्या गावच्या पाण्याची चव होती!

पैसा झाला मोठा!

वजन-मापाची, लांबी- रुंदीची, अंतराची कोष्टके प्राथमिक शाळेत पाठ करावी लागत त्यावेळेस कंटाळा यायचा. इंच फूटांपासून, यार्ड ,फर्लांग ते मैल ह्यांची कोष्टके पाठ करण्यापेक्षा मैलो न् मैल चालणे बरे वाटायचे. आपल्याकडे एक मैला नंतर दोन मैल हे अंतर सुद्धा कोष्टकात होते. दोन मैल म्हणजे एक कोस. एका मैलापेक्षा जास्त अंतर कोसात सांगितले जात असे. खेड्यात पलीकडचे गाव ,”अहो हे काय चार कोसावर तर आहे!” असे म्हणत.

काय गंमत आहे पाहा. पैशा नाण्यांची कोष्टके पाठ करताना मात्र मजा वाटायची. माणसाला लहानपणापासून पैशाचे आकर्षण आहे हेच खरे. आम्हा लहान मुलांना पैशाचे महत्व माहित नव्हते. पण पैसे खुळखुळायला मजा येत असे. सुट्या पैशांची नाणी बाजूला करत चवड रचणे हा एक वेगळाच विरंगुळा असे. नोकरीत फिरतीवर असताना भुसावळ मेडिकल स्टोअर्समध्ये रात्री दुकान बंद केले की बरेच वेळा गप्पा मारत, मालक बाळासाहेब आचार्यांच्या बरोबर नाण्यांची; रूपये, दोन रुपये, पाच रुपयांच्या नाण्यांची चवड करत त्यांचा गल्ला मोजत असे. आचार्य विनोदी बोलायचे. त्यांच्यामुळे माझे कोमट विनोदही कढत व्हायचे. पण ह्या हसण्या खिदळण्यामुळे नाणी व चवड पुन्हा मोजायला लागायची! पण बाळासाहेब हुशार. नोटा मात्र ते स्वत: मोजत !


बाजारात शिरताना, कापडाची पथारी पसरून पैशाची, एक आण्याची, चवल्यांची (दोन आण्यांचे नाणे) , पावल्यांच्या (चार आण्यांचे एक नाणे, अधेली ( आठ आण्यांचे नाणे) आणि रुपयांच्या नाण्यांच्या चवडी रचून चिल्लर देण्याचा व्यवसाय करणारे दिसले की आता बाजारात आलो हे समजायचे. नाण्यांच्या त्या चवडी व बाजूला नाण्यांच्या सरमिसळीचा ढिगारा मागे वळून वळून पाहात पुढे जात असू.

‘पैशांची चवड’ घेऊन बसलेले तीन चार जण पाहिले की मनात यायचे, “इतके पैसे! हे उघड्यावर घेऊन कसे बसतात? “ आम्हाला पैसे मुठीत घाम येईपर्यंत घट्ट धरून तरी ठेवायचे किंवा चड्डीच्या खिशात तळाशी खोल दडवून ठेवायचे येव्हढेच माहित होते. दुसरा प्रश्न पडायचा की हे एव्हढे पैशेवाले लोक आणि रस्त्यावर पथारी पसरून का बसलेत? आणि ह्यांचा अवतार इतका साधा कसा? ह्या व अशा सगळ्या प्रश्नांना श्यामने एकाच प्रश्नाने वाचा फोडली. त्याने वडिलांना विचारले की,” हे आपला पैसा का विकतात? आणि दुसरे लोक तो कशाने विकत घेतात? “ अण्णांनी आम्हाला समजेल असे थोडक्यात सांगितले की,”ही माणसे,ज्यांना सुटे पैसे, मोड हवी असते त्यांची ती मोठी नाणी, नोटा घेऊन त्याबदली सुटे पैसे देतात. त्याबद्दल ते थोडे पैसे कापून घेतात; म्हणजे पैसे कमी देतात.”

आज रस्त्यांवर पैशांच्या नीटनेटक्या रचलेल्या चवडी व तो व्यवहार करणारी ती लहान माणसे दिसत नाहीत. ती आता गगनचुंबी इमारतीतील काचेच्या चकाचक ॲाफिसातून डॅालर्स, पाउंड, युरो,येनच्या खरेदी विक्रीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतात !

पैशाची मोजणी पै ह्या एकाक्षरी लहान नाण्याने होई. तीन पै मिळून एक पैसा होई! पण पै हे नाणे बंद झाले होते. दोन पैशांचा एक ढब्बू होत असे. हे तांब्याचे मोठे नाणेही एक दोनदाच पाहिल्याचे लक्षात आहे. तेही बंदच झाले होते. पण त्या ऐवजी ब्रिटिश सरकारने दोन पैशाचे एक लहानसे चौकोनी नाणे काढले होते. तेही लवकरच बंद झाले! पै वरून चिं. वि. जोशींच्या लहानपणी त्यांनी केलेल्या विनोदाची आठवण येते.. ते आपल्या वडिलांबरोबर जात असता म्हणाले, “बाबा,तो पहा एक पैसा येतोय.” चिंवि काय म्हणत होते ते वडिलांना समजेना. . त्यांनी विचारले,” अरे कुठाय पैसा?” “तो काय,समोरून पै काका आणि त्यांची दोन मुले येताहेत. तीन पै एक पैसा!”


महायुद्धाचे ढग येऊ लागले तसे पैशाच्या नाण्यांच्या जोडीनेच व्यवहारात नोटांची चलती सुरु झाली. नोटा होत्याच पण सामान्यांच्या वाट्याला कमी येत. पगारदार नोकर, व्यापारी लोकांत, बॅंकात, नोटांची उठबस जास्त होती.नाण्यांचे आकार कमी होऊ लागले. रुपयातली चांदी एकदम कमी झाली. इतर नाण्यातील स्टेनलेस एकदम वाढले. पैशाची तर फार नाटके झाली. पहिल्या प्रथम तांबडा पण साधा एक पैसा असूनही त्याचा आकार नेटका होता. तो निम्याने कमी झाला.
युद्ध सुरू झाल्यावर तर त्याला मध्यभागी भोक पाडले! त्याला भोकाळी पैसा नाव पडले. त्याकाळची जुनी मंडळी पैशाचे हे हाल पाहून नेहमीची शेरेबाजी करू लागली. “चिंतामणराव! काही खरं नाही आता. ”कलियुग आलं हो कलियुग!काय काय पाहावं लागणार आहे आणखीन! पांडुरंगा तुलाच माहित!” हे केवळ एका पैशाचा आकार कमी झाला व हे कमी झाले म्हणून की त्याचा कोथळाच बाहेर काढला त्यामुळे ही थेट कलियुगापर्यंत नेणारी नेहमीची पराकोटीची शेरेबाजी!

पण लोकही इतके डोकेबाज की स्टोव्ह रिपेर करणाऱ्यांनी त्याच्या पंपाच्या दट्ट्यात वॅाशर म्हणून; सायकल दुरुस्ती करणाऱ्यांनी, लहान यंत्रे दुरुस्त करणाऱ्यांनी तो पैसा वॅाशर, चकती म्हणून वापर करायला सुरुवात केली. काही पेंटर लोकांनी कल्हई करून पाट्यांच्या अक्षरात, बॅार्डरच्या नक्षीत,तर बायकांनी लहान मुलींच्या परकराच्या घेराला कल्हई केलेला व साधा पैसा वापरून फॅशन करायला सुरुवात केली. बऱ्याच हौशी पोरांनी तांबड्या करदोट्यात तो ओवून गळ्यात घातला. तर पैलवान लोक काळ्या दोऱ्यात ओवून दंडात ताईत म्हणून बांधू लागले! पैशाचे व्यवहारातील हे असले चलनवलन पाहून, पैशाचे अवमूल्यन आहे का मूल्यवर्धन आहे ते अर्थशास्त्र्यांनाही समजेनासे झाले!

चार पैसे एक आणा, दोन आण्यांची एक चवली. चार आण्यांची एक पावली किंवा सोळा आण्यांचा एक रुपया होतो हे कोष्टक न पाठ करताही शाळकरी मुलांनाही माहित असे. आजही अनेकांना,पैसा जवळ नसला तरी, पैशाचे कोष्टक मात्र तोंडपाठ असते. अनेक गरीबांना फक्त कोष्टकच येत असते.

रुपया म्हणताना तो,”चांगला एक बंदा रुपया,” किंवा “खणखणीत एक रुपया दिला की त्याला !”असे जोर देऊनच म्हटले जाई. रुपया हे नाणे खरेच मोठे होते. चांदीचा रुपयाही पाहिला व हातात घेतल्याचे आजही अनेकांच्या लक्षात असणार ह्यात शंका नाही. कुणी आपली वस्तु किंवा बाजू खरी व भक्कम असल्याची ग्वाही,”अहो आमचे नाणे खणखणीत आहे!” तसेच लग्नाच्या स्थळा संबंधात मुलाची किंवा मुलीची ग्वाही देताना, “अहो आमचा मुलगा-मुलगी म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे!” असे अभिमानाने सांगितले जाई!

चांदीचे रुपये ह्या हातातून त्या हातावर ओघळत नेताना होणारा आवाज आजही ऐकू येतो ! आजही कधी चार पैसे खिशात खुळखुळतात तेव्हा जगाचा राजा झाल्याचा आनंद होतो.

नाहीतरी पैशाचाच आवाज सर्वात गोड असतो म्हणा!


बेलमॉंट