छटाकभर लेख!

बेलमॅान्ट

जुनी वजन मापे आठवताना अडीशेर किवा अडीसेर,अडीसरी हे चटकन आठवते. त्यातही लब्बा म्हणत असे ती हाक “छलो अडकी कुडरी अडीसरी वेंकटीऽ!” ही आजही ऐकू येते. त्यातला कानडी हेलातून म्हणलेला अडीसरी शब्द फार गोड वाटे! पासरी व धडा. किती अडीसरी म्हणजे पासरी? दोन? का ….? तसेच किती पासरी म्हणजे धडा?

मला बरोबर माहिती असलेली वजन मापे रुक्ष वाटली तरी वाचनीय आहेत.

धान्ये, मटकी चवळी सारखी कडधान्ये,डाळी, पीठे मोजण्याची मापे
सर्वात लहान माप चिमूट व नंतर मूठ . पण ही फक्त सोयीची व अंदाजाची. त्यामध्येच माशीच्या पंखाइतकी, नखभर, किंवा ‘ किंचित’ ह्यांचा समावेश करता येईल.

पण प्रमाणित मापे म्हणजे सर्वात लहान निळवे/ निळवं. २ निळवी = १ कोळवं. २ कोळवी = १ चिपटं . २ चिपटी= १ आठवा किवा आठवं. २ आठवी = १ शेर ही मापी वजने. चिपटे व शेर प्रत्येक घरात असे. लोखंडी पत्र्याचा किंवा काही ठिकाणी लाकडी. साधारणत: वाळूच्या घड्याळाच्या किंवा डमरुच्या आकाराचे. मान अवटाळली तर हा शेर डोक्याखाली घेऊन झोपले तर मान मोकळी होऊन दुखणे हमखास थांबायचे. दुखण्याच्या शेरावर हा शेर सव्वाशेर असायचा!

४ शेर = १ पायली. १६ पायल्या = १ मण. २० मण= १ खंडी.

दुधा तेलाची मापे.

दूध मापून देत व तेलही.
१ पावशेर ; २ पावशेर = १ अच्छेर (बहुधा अर्धा शेर ह्या अर्थी) २ अच्छेर = १ शेर.

तेल मोजून देताना १ १/२,(दीड पाव) पाव = १ अडीशेर (अडीच शेर) किंवा अडीसरी , २ अडीशेर किंवा अडीसरी = १ पासरी. २ पासरी = १ धडा. नमनाला धडाभर तेल तो हाच धडा!

मिठाई तोलताना (तराजूत वजने ठेवून) छटाक (हे लहान माप तेल मापतानाही असायचे.) हे सगळ्यात लहान माप होते; ४ छटाक = १ पावशेर. २ पावशेर = अर्धा शेर. २ अर्धा शेर किंवा ४ पावशेर = १ शेर , मिठाई नंतर शेराच्या पटीतच मागत. पण तेही फार थोडेजण.

वर सांगितलेली दीड पाव = १ अडीशेर किंवा पासरी ही मापे वांगी भेंड्या गवारी घेवडा ह्या सारख्या भाज्या तोलून देतानाही वापरत. तसेच सुपारी तीळ खोबरे साखर वगैरे वजन करून देतानाही वापरत.

सरपणाची लाकडे, कोळसा मोठ्या तराजूत तोलून देताना धडा, मण ही वजने असत. सोने तोलताना गुंज हे सर्वांत लहान माप. गुंजा दिसायलाही सुंदर असत. केशरी लाल व त्यावर देठाच्या जागी काळा ठिपका. गुंज चमकदार असे. सशाच्या डोळ्यांनाही गुंजेचीच उपमा आहे. ‘गुंजेसारखे लाल ( व लहान)डोळे लुकलुकत होते’.

तर अशा ८ गुंजा= १ मासा. १२ मासे= १ तोळा.

एखादी वस्तु अगदी थोडी घ्या किंवा द्या म्हणायचे असेल तर आधी म्हटल्याप्रमाणे, दोन बोटांच्या चिमटीत मावेल, चिमूटभर, माशीच्या पंखाएव्हढी, गहूभर, गव्हा एव्हढी म्हणले जात असे. कमी लांबीची सांगताना “ उगीच बोटाचे अर्धे किवा एका पेरा एव्हढे घ्या /द्या म्हटले जाई. नाहीतर “ एक टिचभर म्हणजेच अंगठा ते तर्जनी एव्हढे अंतर, जर त्या पेक्षा जास्त असेल तेव्हा एक वितभर म्हणत. विटी दांडू किंवा गोट्या खेळताना ही दोन मापे वारंवार उपयोगात यायची. पण कुणाची हेटाळणी करण्यासाठीही ह्याचा सढळ ‘हाताने’ वापर होत असे.

कापडाच्या दुकानात गज (तीन फुटाची धातूची,इंचाच्या व फुटांच्या खुणा असलेली जाड पट्टी ;आठवा रामसे बंधूंचा भयानक सिनेमा ‘ दो गज नीचे’ !!) सापडला नाही तर दुकानदार ‘हातभरा’चे माप काढून कापड मोजून द्यायचा. हातापासून खांद्यापर्यंत कापड ताणून घडी घालत एक, दोन अगदी अडीच ‘वार’ सुद्धा मोजून द्यायचा! दुकानदार किंवा नोकर लहान चणीचा असला तर त्यांचा फायदा! उंचापुरा मालक किंवा नोकर कधी ‘हातभर’ कापड मोजून देत नसे. पक्के गिऱ्हाईक त्याच उंचापुऱ्या नोकराकडून मोजा म्हणायचे. “ मोजून देताना हा दीड ऱ्फूट बांबू मोजणार; आम्ही परत आणले तर हा ताडमाड मोजणार. आणि तुम्ही निम्मेच पैसे देणार ! अरे वा!” असे सिनेमा छाप संवाद म्हणत लगेच दुसरे दुकान गाठले जायचे तिरिमिरीत ! आठवडे बाजारात बरीच वर्षे ही मापाची ‘हस्तकला’ मान्यता प्राप्त प्रथा होती. पण लवकरच हे हातघाईचे मोजमाप बंद झाले.

तराजूंचीही गोष्ट सुरस आणि चमत्कारिक आहे. तराजूची मधली दांडी गोल सळईसारखी असे. त्यावर मध्ये काटा.काटाही स्वयंभू असे. तो मखरात नसे. गिऱ्हाईकाच्या अंगावर हाच काटा येत असे. म्हणजे काय स्थिती असेल बघा तराजूची! वाळलेल्या तांबड्या मिरच्या मोजणाऱ्या तराजूंच्या करामती विचारू नका. तराजू टांगलेले नसत. फक्त किराणा दुकानात दर्शनी एक तराजू टांगलेला असे. त्यात एका तागडीत कायमचे वजन ठेवलेले असे. तुम्हाला पाहिजे असलेल्या भाराचे वजन ठेवल्यानंतरच ते अढळपद लाभलेले वजन काढले जाई. केव्हाही दोन्ही तागड्या रिकाम्या दिसणार नाहीत.”बाजारपेठेत भोसकाऽऽ भोसकी” ही बातमी दुसऱ्या दिवशी आली तर समजायचे की त्याने रिकामी तागडीचा तराजू पाहिला होता !

बहुतेक व्यापारी, भाजीवाले हातात तागडी धरूनच वस्तू मोजून देत.ती त्यांची खरी हात चलाखी. दोन चार वांगी टाकली नाहीत तोवर ते तागडं खाली आलंच. अरे थांब पुन्हा बघू म्हटल्याव एक दोन वांगी टाकायला परवानगी मिळे गिऱ्हाईकाला. काय तो झटका किंवा पुन्हा बघू म्हणल्यावर मधल्या काट्यामागे तळहाताचा जोर लावून तो काटा वस्तुच्या तागडीकडे ढकलला की काटा साष्टांग नमस्कार घालतोय की काय वाटायचे. वा! किती ढळढळीत माप करून घेतले ह्या समाधानात अडीसरीत अदपाव वांगी घेऊन घरी आलो की फुगा फुटायचा.

तिखटाच्या मिरच्या मागितल्या तेव्हढ्या कुणाला मिळाल्या असतील ह्यावर श्रद्धाळू आस्तिकही विश्वास ठेवणार नाही. कुणी स्वस्त देऊ लागला तर “ माप बरोबर देणार ना? “ असे विचारून व्यवहारात किती मुरब्बी आहोत हे दाखवणारेही धडाभर मिरच्याचे पैसे देऊन पासरीभरच घेत आले आहेत! तिथे त्या तिखटाच्या खाटांत, नाक पुसत, शिंकत कुणाचे लक्ष तागडीकडे जातेय! गिऱ्हाईक आल्याबरोबरच विकणाऱ्याची बायको सुपात मिर्च्यांचे तुकडे बिया गिऱ्हाईकाच्या तोंडावर पाखडायला सुरुवात करायची. कधी पोरगं मिरच्याचा डोंगर खालून वर सारखा करायला लागे! साट् साट् शिंकत, रुमाल काढतांना पैशे खाली पडत नाहीत ना ह्या धसक्यात पुन्हा डोळे मिटून शिंकताना धडाभर मिरच्यांनी अर्धी(च)पिशवी भरलेली असे. मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत ना म्हणून पिशवी हलकी लागते असं म्हटल्यावर लहान भाऊ म्हणायचा , “मग तर जास्तच भरल्या पाहिजेत ना?” विषय बदलत, फसलेले वडील आपण पेरू घेऊ या म्हणत तिकडे वळायचे.

हे सगळे फार लहान व्यापारी असत. गुळाच्या दोन चार ढेपी घेऊन बसलेले किंवा भाजी बाजारात गवारीच्या शेंगा,मटार विकणारे तर नैतिक सफाई दाखवत. गुळवाला सुरुवातीला एकदम मोठेच ढेकूळ टाकायचा. आम्हाला आनंद व्हायचा. हा सढळ दिसतो बरं का. मग ते मोठ्ठे ढेकूळ काढून त्याहून बरेच लहान, ते काढून मध्यम आणि वर तुकडा तुकडा, चुरा टाकत निमिषार्धात ती तागडी खाली वज्रासन घालून तिचे कपाळ जमीनीला कधी टेकली समजायचे नाही. कारण तोपर्यंत डबल कागदात तुकड्यां- चुऱ्यासह तो खडा दोऱ्ऱ्याने गुंडाळलाही असे.

हीच तऱ्हा सोन्याच्या भावाचे मटार किंवा जवारी गवारीची. तागडी भसकन् त्या ढिगाऱ्यात खुपसली जायची. शिगोशिग भरलेली तागडी एकदाच दिसे त्यामुळे ती डोळे भरून पाहताना हा इकडे हाताने त्यातली तितक्याच वेगाने भसा भसा खाली टाकत असे. राहिले ते गंगाजळ म्हणत पिशवीत घ्यायची. तोपर्यंत तराजूच्या दोन्ही बाजूला असलेल्या कड्यांच्या भिकबाळ्यांचा आवाज करत तागडी घडी घालून निमूट बसलेली असे. वजनांकडे पाहिले तर अडीसेराची बरोबर असत. “पुन्हा मोज;”थांब थांब; “घाई नको करू “ ह्या विनवण्या प्रत्येक ओट्याकडून ऐकू येत.पण हे असे होणारच. ते भाजीवालेही हे आपले रोज फसवून घेणारे गिऱ्हाईक म्हणून अधून मधून मूठभर घेवड्याच्या शेंगा, तीन चार वांगी “राहू द्या, घ्या, आज बक्कळ हैत” म्हणत पिशवीत टाकत.

मोठ्या व्पापाऱ्यांपुढे किंवा कधी जायची पाळी आलीच तर सराफा- सोनाराकडे, तिथे शब्द काढायची हिंमत नसलेले आम्ही गिऱ्हाईक मंडळी आपला धीटपणा भाजीबाजारात दाखवण्याचा प्रयत्न करीत असू. इतकाच सारांश.

असाच काहीसा प्रकार लाकडाच्या वखारीत व्हायचा. मालकाचा विश्वासू नोकर सरपणाची लाकडे, किंवा साली, बंबफोड तागडीत टाकायचा. खंडी भराची वजने बाहेर ठेवायचा. की लाकडांनी भरलेली तागडी खाली यायची. मग आमच्या सारख्या गिऱ्हाईकाला पाहिजे तितक्या भाराची वजने टाकायचा. काटा पूर्ण मागे जाण्या पूर्वीच लाकडाची चौकोनी तागडी सराईत पणे ओतायचाही!
पावसाची वाट शेतकऱ्यांपेक्षा लाकडाची वखारवाले आतुरतेने पाहात. सुक्याबरोबर चार ओलीही वजनात भर टाकता यायची नां!

लेखकाने शक्यतो तोलून मापून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण टीकाकार ‘दीड दांडीचा तराजू वापरून’ लिहिले अशी टीकाही करतील. सध्या न्यायालयांचा तराजूही झुकलेला आहे तिथे माझ्यासारख्या छटाकभर लेखणीच्या लेखकाची काय कथा! वजन मापाच्या तपशीलातील चु. भू. द्यावी घ्यावी!

‘एका’ लग्नाच्या गोष्टी

बेलमाॅन्ट

माझ्या आठवणीतील शाळेत शिकलेली व व्यवहारात असलेली वजने मापे, अंतर, मोजण्याची कोष्टके बरीच विसरलो आहे.काही चुकीचीही लक्षात असतील. पूर्वी छटाक, तोळा मासा,अदपाव, अशी बरीच मापे होती. आठवायचीच तर सोन्यापासूनच सुरुवात का नको?


सोने तोलायचे असेल तर गुंजा, मासा,व तोळा ही वजने वापरली जात.८ गुंजा= १ मासा ; १२ मासे = १ तोळा
तोळ्याच्या पुढचेही मोठे वजन असेल. पण ५-६ माशांच्या पुढे सोन्याची कल्पनाच नसल्यामुळे तोळा हेच शेवटचे वजन आमच्यासाठी होते. कित्येक कुटुंबांचा सोन्याचा संबंधही घरातल्या बहिणींच्या लग्नावेळीच येई.


प्रत्येकाला लग्ने काही काव्यात्मक गोष्टींनी लक्षात राहतात. पण काही गद्य भागही लक्षात राहण्यासारखा असतो. त्यातील सगळ्यांत मोठा गद्य पण नाट्यमय भाग म्हणजे लग्नाच्या ‘याद्या’! याद्या करताना दोन्ही बाजूंचे -मुला-मुलीचे- वडील काका मामा किंवा अगोदर झालेले व्याही व असलाच तर घरोब्यातील मित्र. पण मित्र किंवा शेजारी फार क्वचितच असत. शेजारी येतच नसत. कारण नंतर त्यांना उखाळ्या पाखाळ्या काढायला वाव राहात नाही !
राजकीय, परराष्ट्रांच्या किंवा मालक आणि कामगार नेते किंवा उद्योगातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या वाटाघाटीत जशी मुरब्बी बेरकी लोक असतात तशी लग्नाच्या याद्यांच्या वेळीही दोन्ही बाजूंकडे असे एक दोघे असत.

सुरुवात कोणी करायची व तोंड कुणी, केव्हा,कोणाला कोणत्या बाबतीत, द्यायचे ह्याची रंगीत तालीम, दोन्ही कडचे नानुकाका, आबामामा, गुंडोअप्पा, धोंडोपंत अशी वाकबगार उस्ताद मंडळी, करून आली असत. सगळ्यात खणाखणी सुरु व्हायची जेव्हा मानापानाच्या बाबतीत व हुंडा (रोख) व दागिने किती तोळ्यांचे ह्या मागण्यांचा तिढा सोडवायच्या वेळी होत असे. आवाज चढलेले असत, सभात्यागाच्या नाटकांतील प्रवेश दोन्ही बाजूंकडून होत. मध्येच दोन्ही कडचे प्रमुख वाटाघाटीवाले आणि मुलाचे व मुलीचे वडील आपापल्या विंगेत जाऊन कितपत ताणायचे,कशात किती ढील द्यायची हे ठरवून पुन्हा रंगभूमीवर प्रकट व्हायचे.

त्यातही नाट्य वाढवण्यासाठी कुठल्या तरी एका बाजूच्या मागच्या खोलीतून खाणाखुणांतून बोलावले जायचे! त्यावेळी दोन्ही बाजूच्या आया, लेकाच्या किंवा लेकीच्या सुखासाठी, “आता हे स्थळ तरी हातचे जाऊ देऊ नका!” अशी भरल्या गळ्याने सुचवले जात असायचे. पण दोन्ही कडची पुरुष मंडळी रस्सीखेच, कुस्तीचे डावपेच, रबर किती ताणायचे त्याची लांबी व वेळ हे सगळे कोळून प्यालेले असत. मग कुठल्या तरी सामान्य बाबीत देवाण घेवाण व्हायची. मध्ये पुन्हा चहा यायचा. त्यामुळे पुन्हा तरतरीत होऊन आवाज वाढू लागत.

अखेर किती तोळ्यांचे दागिने, मुला-मुलीचा पोशाख कुणी व काय काय आणि किती म्हणजे शालू कोण घेणार व वरमाईला किती भारी किंमतीचे किंवा पद्धतीचे लुगडे,शाल ह्याची चर्चा. कुणा कुणाचे मानपान कसे करायचे ह्याचीही तपशीलवार बोलणी व्हायची. मग मुलाकडची किती माणसे आदल्या दिवशी व लग्नाच्या दिवशी किती ह्यावर चकमकी झडून एकदा ‘याद्या ‘ नावांचे प्रकरण संपायचे.

याद्या म्हणजे एकप्रकारचा करारनामा किंवा तपशीलवार मान्य कलमे किंवा मिनिटस् म्हणायची. तोंडीपेक्षा लेखी बरे हेच खरे!

याद्यांच्या हातखंडा खेळात नवऱ्या मुलीच्या बापाची स्थिती केविलवाणी व्हायची.; किंवा तशी दाखवलीही जात असावी. परंपरेने चेहरा कीव करावी असा व अंग चोरून बसल्यासारखे बसायचे असल्यामुळे असे होत असेलही. पण वरपक्षाकडील किती माणसे, किती पंगती कोणत्या दिवसापासून आणि मानापानाचे कापड चोपड, सोने किती, हुंड्याची रक्कम ही कलमे आली की मग मुलीचा बाप कितीही तालेवार, ऐपतदार असला तरी याद्यांच्या दिवशी त्याला हाच गरीब कोकराचा अभिनय करत बसावे लागे!

सीमांत पूजन व लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडील किती माणसे येणार, यावीत ही चर्चा चालली असतांना आणि किती तोळे सोने द्यायचे ही निर्णायक खणाखणी चालू असताना, प्रत्येक वेळी मुलीच्या बापाचे प्राण कंठाशी येत. आवंढे गिळून नंतर नंतर तर गिळण्यासाठी आवंढाही शिल्लक नसे.

काही अनुभवी सांगतात की रुखवताची कोणती भांडी किती, आणि त्यातली चांदीची किती, ह्यावरही रंगात आलेल्या याद्यांचे प्रयोग मध्येच पडदा पाडून थांबवावे लागत! बरे, त्यावेळी रुखवत ही सजावटीची गोष्ट नसे. नाहीतर ठेवला तांबड्या लाईफबाॅय साबणाचा गॅस सिलिंडर किंवा पेनिसिलिन इंजेक्शनच्या व्हायल्सचा ‘असावा सुंदर’ बंगला की झाले रुखवत ! ह्यांचा काळ अजून पाच सहा वर्षानंतर उदयाला येणार होता! पण ह्यावरही काही लग्नाच्या रुखवतात पितळेच्या भांड्यांना चांदीचा मुलामा देऊन चांदीची म्हणून वरपक्षालाही चकवणारे वधूपक्ष होतेच!


लग्नाच्या ‘याद्यां’पासून सुरु असलेले हे युद्ध संपले असे समजू नका. सीमंत पुजनाच्या रात्रीच,लग्नाच्या दिवशीच्या कावेबाज लढाईची सुरुवात होत असे. दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांची ओळख करून देण्याचा एक कौटुंबिक सोहळा असे. मुलाच्या मामाशी मुलीच्या मामाची, काका-काकांची अशा भेटी सुरू होत. त्यात वधूकडची मंडळी खवचट असली तर तांत्रिक दृष्ट्या अगदी बरोबर असलेला नेमका पोरसवदा मामा मुलाकडच्या मामूमियाॅं शोभेल अशा मामाला भेटवत. वरमंडळी आतून जळफळत पण उद्याचा दिवस आपलाच आहे अशी स्वत:ची समजूत घालत त्या पोरवयाच्या मामाच्या पाठीवर मामूमियाॅं ‘कौतुकाने’जोरदार थाप मारत! तो मामा डोळे पुसत मागे यायचा!


सीमंत पूजनाच्या दिवशी मुलीच्या बापाला घरच्या गनिमांशीही लढावे लागे. ‘ज्येष्ठ जावयांची पुजा’ हा सत्काराचा प्रसंग असे. पण गनिम, लग्नाची तारीख ठरल्यापासूनच आपल्या घरांत,” आम्हाला हजार बाराशेत गुंडाळले आणि आज? कुठून आले एकदम इतके? सोन्याच्या दागिन्यात दोन ‘गिलिटाचे खोटेही घुसडले तुम्ही!” असे म्हणत ज्वालामुखी धुमसत!


यानंतर मग नव्या जावयाची पूजा. त्याला याद्यांबरहुकुम द्यायचा पोशाख,ठरली असो नसो पण मुलीची आई जावयाचे कौतुक करते हे सिद्ध करणारी अंगठी देणे व्हायचे. ठिणगी पडली! ज्येष्ठ जावयांच्या बायका म्हणजेच मुलीच्या थोरल्या बहिणी आत आपल्याच आईशी ,” ह्याला भारी पोशाख आणि वर अंगठी! आमच्या नवऱ्यांना काय दिले होते? आठव! कसला तो सूट आणि काय ती टोपी! विदुषकही घालणार नाही! सगळी गरीबी काटकसर नेमकी आमच्याच वेळी!” इथे स्फुंदणे सुरू… आम्ही साध्या मॅट्रिक ना? पण आमचे नवरे तरी ग्रॅज्युएट आहेत ना? आणि हिचे काय कौतुक चाललेय बघा. साधी इंटर झाली. तेही दुसऱ्या खेपेला. काॅलेजात गेली ना? तिचे राहू दे. पण आई आम्हीही तुझ्याच मुली ना?” इथून मुसमुसून ते ओरडण्यापर्यंतचे आवाज बाहेर मंडपात येऊ लागतात.

लगेच मानभावीपणे ज्येष्ठ जावईही येतात. बायकोची समजुत काढण्याच्या निमित्ताने ते सासरेबुवांची उणीदुणी काढायला लागतात. मुलीच्या बापाला अजुन एक दोन दिवस ‘अल्लाकी गाय’ म्हणूनच वावरायचे असते.तो त्यांची दादाबाबा करीत समजूत काढतो. पण मुली बदल्यात काही मागण्या पुऱ्या करून घेतातच!

दुसरा मंगल दिवस उजाडतो. “ काय तो फराळ?” अहो चहा की रंगीत पाणी? चिवड्यांत तेल,मसाला, शेंगादाणे घालायचे माहित नाही का ह्यांना?” “ माहित आहे हो चांगले. त्यांच्याकडच्या पाव्हण्या रावळ्यांना दिलेला चिवडा संगीत होता! मी पाहून आलो.चकल्याही खुसखुशीत होत्या!” वगैरे संवाद पसरत होते.


मुहुर्त जवळ येतो;तरीही बरेच वेळा नवरा मुलगा आलेला नसे! मुलीचा मामा विंगेत तिला घेऊन एन्ट्री कधी करायची ह्याची वाट पाहात उभा असतो. मुलगी तरी किती वेळ मान खाली घालून अंगठ्याने जमीन उकरत बसणार! बऱ्याच लग्नांत नवरीच्या अंगठ्याची नखं तुटायची!

शेवटी मुलीकडचे जबाबदार नातेवाईक शत्रूच्या गोटात जावे तसे जात आणि कुणाशी बोलून परत येत असे. दोन तोळ्यांची सोन्याची साखळी मिळाल्यावर नवरामुलगा लगेच येईल हा निरोप घेऊन मुलीच्या वडिलांच्या कानाशी लागतो. मुलीचा बाप लठ्ठ असला तरी ताडकन उडण्याचा प्रयत्न करतो. अखेर एक तोळ्याच्या साखळीवर तडजोड होऊन समर प्रसंग टळतो.

मंगलाष्टकांची ती ‘काळरात्र’ येऊ लागते! सर्व उपस्थितांचे कान आपोआप किटावे अशा आवाजातील ‘मंगल संकष्टी’सुरु होते. दक्षिणा घेतली तरी भटजीही माणूसच की. दोन्ही बाजूंची ती चित्रविचित्र आवाजांची चॅम्पियन स्पर्धा केवळ भटजी म्हणून किती वेळ ऐकणार? तो मध्येच ‘ताराबलं चंद्रबलं च…’ सुरू करतो. लोकही मंगलाष्टकांच्या आरिष्टातून सुटल्याचा आनंद टाळ्या वाजवून साजरा करतात. वाजंत्री वाजू लागते.पण बॅन्ड नसल्यामुळे लहान पोरेही तिकडे फिरकत नाहीत. मुलांकडच्यांना मुलीच्या वडिलांना नावं ठेवण्यासाठी हे एक कोलित मिळते.

जेवणाच्या पंगती सुरु होतात. वरपक्षांकडील स्त्रियांना बोलावण्यासाठी मुलीच्या बहिणी-काकू- मावशा-वहिनी ये जा करू लागतात. व पुरुषांना आमंत्रित करायला मुलीचे काका, मामा (आता पोरसवदा नाही; चांगला बाप्या), मुलीचा थोरला भाऊ जात येत असतात. प्रत्येक लग्नात हा भाव खाण्याचा प्रकार म्हणून नाही पण पूर्वीच्या काही वधूपक्षांच्या बेफिकीर व आता काय लग्न ठरले, लागले,कशाला करायची ह्यांची वरवर अशा वागण्यामुळेही नंतरचा वरपक्ष सावध झालेला असतो.

वरपक्षाकडील ‘वगैरे’मंडळी पंगतीत बसलेले असतात. पण वरमाई, वधूची नणंद, आतेसासु असे कोणी व्हीआयपी, वराचे वडील यायचे असतात. त्यांच्या साठी मुलीकडचे तितक्याच तोलाची मंडळी बोलवायला जातात.पुन्हा पैठणी,शालू , इरकली लुगड्याची किंवा काही वस्तुंची मागणी. वधूचे आईवडील,नक्की पूर्ण करू पण जेवून घ्या अशी विनवणी करतात. काही वेळेस हे मान्य होते. काही वेळा वधू कडील पैशांची बाजू माहिती असते. ती ताबडतोबीने मागणी पुर्ण झाल्यावरच मानाची मंडळी पंगतीत बसतात. तरीही पंगत सुरू होत नाही. कारण आता शेवटचे हत्यार उपसले असते. नवरा मुलगा स्वत:च किंवा त्याचे नातेवाईक भरीस घालून त्याला रुसायला लावतात.

पुन्हा विनवण्या. पुन्हा मागणी. जशी दोन्ही कडची कुटुंबाची परिस्थिती दर्जा, तशी मागणी. कुठे व्यवसायासाठी रक्कम, तर कधी मोटरसायकल, तर कुठे सहा व्हाॅल्वचा रेडिओ पर्यंत हा रुसवा खाली येतो. वराचे हे रुसणे म्हणजे निवडणुका ऐन तोंडावर आल्या असतानाच सरकारी नोकरांनी संप जाहीर करण्यासारखेच म्हणायचे. अखेर नवरामुलगा येतो.इतका वेळ रुसलेला मुलगा आता नव्या नवरीला घासही भरवतो. सगळे कसे आनंदी आनंद गडेच होते.

संध्याकाळी मुलगी सासरी जाणार. तर त्याआधी पासूनच मुलगी चांगल्या घरी पडली, एक ओझे उतरले अजून एक धाकटी आहे पण अजून दोन चार वर्षे तरी आहेत ह्यावर समाधान मानत लग्नघरातली आवरा आवरी चालू असते. संध्याकाळ जवळ येते तशी त्यावेळी लग्नाचे राष्ट्रगीत झालेले “जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा” मधील ‘कढ मायेचे तुला सांगती जा’ ह्या ओळीच्या वातावरण निर्मितीस प्रारंभ झालेला असतो. मुलगी धाकट्या बहिणीशी विशेष मायेने बोलत असते. आपल्या आवडत्या वस्तू धाकटीला उदारपणे देत असते. हे करतांना डोळे भरलेले असतात. मग निघण्याचा क्षण आला की घरांतल्या सगळ्यांशी गळाभेटीचा निरोप समारंभ हुंदक्या हुंदक्याच्या तालावर चालू होतो. सगळेच थोडेफार भावुक झाले असतात.

वडील कार्यालयाचे, मंडपवाले, इतर काॅंट्रॅक्टरांचे पैसे चुकते करण्यात मुद्दाम गुंतलेले असतात. मुलगी सासरी मोटारने, सजवलेल्या बग्गीत किंवा साध्या टांग्यातून सासरी जाते. घरातले सगळे पुन्हा पुन्हा मागे पाहात मुलीच्या सासरी लक्ष्मी पूजनासाठी जाण्याची तयारी करू लागतात. —-


—-सर्वसाधारणपणे हे दृश्य सर्व लग्नसमारंभाचे असते.पण काही वेळा ‘कढ मायेचे तुला सांगती, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हया ओळी बॅन्डवाले वातावरण निर्मितीसाठी वाजवायला लागले की इकडे त्या गाण्याचा अतिशय मोठा परिणाम होत असे. आईच्या डोळ्यातील पाणी संपत नसते, सख्ख्याच नाही तर लग्नाला आलेल्या चुलत मावस मामे आत्ये वगैरे सर्व प्रकारच्या बहिणींना ही मुलगी तरी किंवा ह्या तरी तिच्या गळ्यात पडून रडायच्या थांबत नाहीत.ह्या बहिणींपैकी अनेकजणी हिला वर्षातून एकदोनदाच भेटल्या असतील. पण ‘‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ‘ बॅन्डवर वाजायला सुरुवात झाली की जवळच्या,शेजारच्या, वर्गातल्या मुली एकसाथ स्फुंदू लागतात. हुंदक्यांची लाट पसरू लागते. हे कसेतरी संपवून मुलगी निघावे म्हणते तर काकू मावशी मामी शेजारच्या काकू, दूरच्या नात्यातली एकदा पाहिलेल्या अंबूअक्का,” निघाली का गं माझी सुमीऽ ऽ…! मला न भेटताच चाललीस?” असे म्हणत,मध्ये मध्ये खोकत, येतात. नवऱ्या मुलीला जवळ घेतात. जवळचा शकुनाचा एक रुपया काढून मुलीला देतात. तिच्या तोंडावरून हात फिरवून मुलीने लावलेला ‘स्नो’ ‘आशा’किंवा ‘उटी’ची फेस पावडर पुसून टाकतात!

नवरी मुलगी चिडल्याचे न दाखवता रागावून आत जाते पुन्हा ‘रेमी’ किंवा ‘एकलॅट’च्या स्नोची दोन बोटे फासून बाहेर येते! इकडे बॅन्डवाले ‘ जा मुली जा …’ हीच ओळ वारंवार गाल फुगवून फुंकून फुंकून दमले तरी मुलीला ह्या भेटीगाठींतून कुणी सोडत नसते.नवरी मुलगीच अखेर पुढाकार घेऊन ‘दिल्या घरी सुखी’राहण्यासाठी निघते. सासरी पोचल्यावर तिथले बॅन्डवाले ‘उंबरठ्यावरी माप ठेविले मी पायाने उलटूनी आले’ हे गाणे वाजवायला सुरुवातही करतात! अशा रीतीने एका शुभकार्याच्या मंगल नाट्याचा नेहमीच सुखांत शेवट होतो! इतकेच नव्हे तर अशा नाट्यमय ताणतणावात झालेल्या लग्नाचे संसार सुखाचे झालेले आहेत. टिकले आहेत.

इतकी ओढाताण, मानापमानाचे काहीही तणाव नसताही झालेल्या अलीकडच्या काळातल्या सर्वच लग्नाविषयी असे म्हणता येत नाही.


काय म्हणावे ह्या स्थितीला? “झपुर्झा गडे झपूर्झा” !

भाज्यांतील लोकप्रिय राग

संगीतात यमन, मल्हार, केदार, असे काही राग लोकप्रिय आहेत; त्याप्रमाणे भाज्यांतही लोकप्रिय रागांच्या भाज्या आहेत. काही राग सहज गुणगुणले जातात तशाच काही भाज्याही सहज आपोआप आणल्या जातात!

भाजी आणायला बाजारात जाणे हा एक मनप्रसन्न कार्यक्रम असतो.भाजी बाजार म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्याच्या मंडपात भरलेली मयसभाच!

पालेभाज्यांचे वेगवेगळ्या छटांतील हिरवे रंग, फळ भाज्यांचे निळे जांभळे पिवळसर दुधी,हिरवे, तांबडे रंग पाहून कोणती घेऊ, किती घेऊ असे व्हायचे.नावे तरी किती घ्यायची. कागद आणि शाई पुरणार नाही इतके पालेभाज्यांचे आणि फळ भाजांचे प्रकार!

आळू-चुका ह्यांचा द्वंद्व समास, चुका-चाकवत, चंदनबटवा ही त्रिमूर्ती ! अंबाडी,करडई किंवा करडी ह्या त्यांच्या नावावरूनच करारी वाटणाऱ्या भाज्या; इतर भाज्यांवर ढाळणाऱ्या हिरव्या चवऱ्या वाटाव्या अशा शेपूच्या पेंड्या, तांदुळसा, राजगिरा,चवळी अशा राजस भाज्या तर मानाची आणि लाडाची मेथी ! तिचे किती कौतुक आजही होते! उखाण्यातून ती संस्कृतीचाही भाग झाली! मेथी आणि पोकळा ह्या विशेष मानाच्या दर्जेदार भाज्या तर असतच, जोडीला मायाळू (ही भाजीपेक्षा भज्यांसाठी जास्त मायाळू होती), आपले वेगळे वैशिष्ठ्य सांभाळत येणारी हादग्याची फुले, थंडीत हरभऱ्याचा हिरवा पाला. (तो वाळवून पुढे केव्हाही त्याची वेळ भागवणारी तातडीची भाजी व्हायची.) ;स्थानिक गावरान पालेभाज्यात नुकताच प्रवेश केल्यामुळे कौतुकाची पण स्वत:ची चव नसलेली पालकाची भाजी. अवचित कुठे तरी शेवग्याची कोवळी पाने व फुलेही भाजी म्हणून दिसायची. ह्यांची भाजी घरोघरी सर्रास होत नसे. तरी बाजाराची शोभा वाढवत. काहींची आवडही पुरवत असतील.

फळभाज्यातील पहिल्या क्रमांकाची , Forever वांगी; भाजीची, भरीताची, काटेरी जांभळी, काटेरी हिरवट, पांढरट, लहान अंडाकृती गोल, तर नुसती पाणथळ लांब जांभळी, भरिताचीही निळी जांभळी,मोठी गोल किंवा लंबगोल, खानदेशी किंचित लांबट पण जाड.हिरवट पांढरसर.आणखीही काही प्रकार असतील. आपला दुधी भोपळा; कोणतीही भूमिका ह्याला द्या, उत्तमच करेल. भाजी, रायते, दुधी हलवा करा वा वड्या करा, चौफेर चविष्ट,व सौम्य आणि सात्विक; पण जहाल पक्षाचे ह्याला नेमस्त, नेभळट म्हणून हिणवतात; घोसाळी,म्हणजे खानदेशातील गिलकी, भाजी करा,भजी करा किंवा वाफून रायते करा, भाज्यांतील नागराज पडवळ, त्याचीही भाजी करा, गोल चकत्या कापून कढीला कर्णफुले घालून तिची मजा वाढवा. अथवा महालक्ष्मीला कोशिंबिरींच्या संख्येचा कोरम पूर्ण करण्यासाठी वाफून कोशिंबीर करा. तांबडा भोपळा. हाही बहुगुणी आहे.भाजी करा, रायते करा, पुऱ्या करा किंवा शास्त्रोक्त घागरे करा. शिवाय दोन दिवस ठेवला तरी ऐन वेळी कामास येणारा हा भोपळा आहे. बरे आकारानेही मोठा. त्यामुळे म्हातारीही त्याच्यात बसून लेकीकडे जाऊन लठ्ठगुठ्ठ झाली तरी परतीच्या प्रवासात त्यात मावायची! भाजीसाठीच नव्हे तर हा काशी भोपळा पेपर तपासताना, मास्तरांच्या खूप उपयोगी येतो.

भोपळ्यांतही नेहमीच्या दुधी भोपळा,काशी भोपळ्यांबरोबरच आज फारसे माहित नसणारे चक्री ,डांगर, देवडांगर हेसुद्धा असत. ही भोपळे मंडळी दीर्घायुषी! टिकाऊ म्हणून प्रसिद्ध होती. पण फारशी घेतली जात नसत. हे दीर्घायुषी असल्यामुळे ह्यांचे रंग बदलत जातात. फिकट पिस्त्यापासून फिकट गुलाबी रंगाच्या छटा ते घेतात.ह्यांची पीठ पेरून किंवा भरपूर तेल घालून व डाळ घालून केलेली भाजी बरी लागे. पण नेहमीसारखी केलेली भाजी श्राद्ध-पक्षाला द्रोण रोवून ठेवण्यासाठीच वापरत!

भोपळ्यांवरून त्यांच्याच नात्यातील एक सामान्य नातेवाईक आठवला. त्याचे नाव किती ओबड धोबड ! ढेमसे किंवा ढेमसं! ढेमसं लहान असताना ती इतकी ‘लहान सुंदर गोजिरवाणी’ दिसतात. सुरेख हिरवा रंग. अदृश्य वाटावी अशी लव असलेली ती ढेमसे कुणीही पोतंभर घेईल! पण थोडी मोठी होऊ लागली की ती निबर दिसू लागत. पण मराठावाड्यातील रखरखीत उन्हाळ्यात पाण्याबरोबरच भाज्यांची आवकही आटली की ही ढेमसंच आपल्या मदतीला धावून येत! चव दुधी भोपळ्यासारखीच. दर्शनही look ही दुध्या सारखेच. पण आकाराने,लहान चेंडूसारखा बसका गट्टम गोल! “ ढेमसं घ्या ना”असे कुणी म्हणाले तर लोक पुढे जायचे. घ्या ना! म्हणणारी भाजीवाली असली तरी! आणि शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे?! त्याला ढेमसं घ्यावी लागत नव्हती म्हणून ही असली वचने सुचली. पण औरंगाबादच्या भाजीवाल्यांनी मात्र ढेमशांचं , कसलीही चळवळ नसतानाही, इतके सुंदर नामांतर केले की लोक ती ढेमसंच आहेत हे विसरून त्यावर उड्या पडू लागल्या! तिथे त्याला ‘दिलपसंद’ म्हणतात! का नाही होणार आपले ‘दिल’ खुष! शेक्सपिअरला म्हणावे बघ एका नावाने आमच्या ढेमशाला श्रीमंती आणि हृदयांत स्थान मिळाले!

त्यानंतर तोंडली. ही कोवळी,ताजी असतांना गोल चकत्या करून करा किंवा सुरेख लांबट, ओठाच्या आकाराची पातळ कापे करून भाजी करा. तेलासाठी फार सढळ हाताची आवश्यकता नाही. ‘हेल्दी’पेक्षा तेल थोडे जास्त टाकले तर तोंडल्यांनाही आनंद होतो. त्यामुळे त्या लुसलुशीत ओठांची माधुरी आपल्यालाही चाखता येते!

सुरवातीला बटाटे नवीन होते तोपर्यंत फार भाव खाऊन होते. पण त्यांच्यापेक्षाही रईस, श्रीमंत काॅली फ्लाॅवर, श्रीमान कोबी आले व गाड्या बरोबर नळ्याची यात्रा न्यायाने फक्त नावाचे आकर्षक नवलकोलही शिरले; तेव्हा मात्र बटाट्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. नवलकोलची नवलाई त्याच्या नावात होती. चवीला पपईपेक्षा काही वेगळी नव्हती. नारळाच्या वाट्यांसारखी कापून, खोवून करीत किंवा कच्च्या पपईसारखी खिसूनही करीत.

थंडीत फ्लाॅवर, कोबीबरोबरच, शेंगावर्गीय असूनही फ्लाॅवर कोबींच्या पंक्तीत मानाने बसले ते मटार ! पुढे जसे ह्यांचे पीक वाढले तसे त्यांनी भाजी म्हणून स्थान मिळवलेच पण पुलाव किंवा मसाले भात त्यांच्याशिवाय शिजेना. मग पोहे उपमा तरी कसे मागे राहतील! प्रत्येकाला आपल्या बरोबर थोड्या का होईना मटारांचा हिरवा सहवास हवासा वाटू लागला. म्हणूनच फ्लाॅवर,कोबी,बटाटे ह्यांची भाजी मटाराशिवाय सुनी सुनी वाटू लागली. आपले पोहे त्यामानाने मटारची इतकी फिकीर करत नसत. त्यांचा जानी दोस्त कांदा त्यांच्याबरोबर सदैव असतो त्यामुळे पोह्यांना मटाराची मातब्बरी वाटत नाही. पण हिरव्या गोड मटारांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांची बेताचा मसाला व तेल घालून थोडा रस ठेवलेली भाजी म्हणा किंवा उसळ म्हणा तिला तोड नाही.तिचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी मटारला आपले कोडकौतुक पुऱ्यांकडूनच व्हावे अशी इच्छा असते ! थोरा मोठ्यांच्या सहवासात असावे असे सर्वांना वाटते; यामुळेच जो तो मटारांशी निकटचे संबंध ठेवायला धडपडतो. त्यासाठी बटाटे स्वत:ला उकडून घ्यायला तयार होतात तर टोमॅटो स्वत:ला चिरून किंवा प्रसंगी चेचून घेऊन हुतात्मे होण्यासही मागे पुढे पाहात नाहीत.

भेंडीला तिच्या आकारावरून फळभाजीत घ्यावी की शेंगेच्या प्रकारात टाकावी असा प्रश्न पडला होता. चुकीचाही असेल. पण तिला अखेर फळभाजीत स्थान दिले. भेंड्यांविषयी दोन जबरदस्त तुल्यबल पक्ष आहेत.भेंडीच्या बाजूचे तिला सात्विकतेची मूर्ती मानतात. सौम्यपणात तिला प्रतिस्पर्धी नाही म्हणतात. आजाऱ्यालाही चालणारी भाजी म्हणून गौरव करतात. ती नुसती भाजून,मीठ लावून खाऊन तर पाहा असे आव्हानही देतात. तर तेच मुद्दे विरुद्ध बाजूचे तिच्यावर उलटवतात. अहो तिच्याहून सात्विक तर आमचा दुधी भोपळाही आहे. आरोग्यास पोषक गुणधर्म तर त्या नावातच आहे. त्याला उगीच दुधी म्हणत नाहीत! आणि काय हो त्या भेंडीला स्वत:ची यत्किंचितही चव तरी आहे का? मसाला घालून भरली भेंडी करावी लागते! पेंढा भरलेल्या प्राण्यांप्रमाणे. बरे झाले तो Taxidermist करत नाही भरली मसाला भेंडी. म्हणूनच ती जास्त करून घरांपेक्षा हाॅटेलातच केली जात असावी. बरे कुठल्याही प्रकारे तिची भाजी करायची म्हणजे तिचे फार सोपस्कार करावे लागतात! मग ती परतून करा किंवा कधी तिला चिंच गुळाचे वाण देऊन लाडाकोडाने तिची भाजी करा. त्यातही ती स्वच्छतेची अति भोक्ती. सर्जननेच तिच्या भाजीचे ‘ॲापरेशन’ करावे ! तिला दहा वेळा धुवुन पुसून कोरडी ठक्क करूनच मग करायची ती भाजी! बायकांसारखाच भेंडीलाही नट्टापट्टा करायला वेळ लागतो. म्हणूनच तिला लेडीज् फिंगर म्हणत असावेत! नाहीतर चिकटपट्टीपेक्षा चिकट होते ती! तरीही लहान मुलांचीच काय मोठ्यांनाही तिची तेलावर परतून केलेली भाजी आवडते.

षटकोनी गोल चकत्यातील मोत्यांसारख्या दाण्यांनी तर ती ताटातील अलंकारच वाटते!
दोडक्यांना विसरलो तर ‘दुसरे लाडके झाले, दोडक्याला कोण विचारतो’असे पूर्वी बुटबैगण व धारदार कड्यांचे असलेले; पण आता एकदम लंबूटांग आणि त्यांच्या हातापायाच्या शिरांतील धार गेलेले,दोडकेमहाराज तक्रार करतील. ह्याच्या शिरा काढून त्या किंचित भाजून तीळ, वाळलेले खोबरे घालून तेलात परतलेली चटणीही खमंग लागते.त्यामुळे ‘ एका तिकीटात दोन खेळासारखे’ दोडक्यांची चटणी आणि भाजी एकाच वेळी करता येते !

आमच्याकडे बेलवांगी म्हणतात त्याचीही भाजी करतात. पण बेलवांग्याची चटणी चविष्ट असते. ती वाफून त्यात कधी भाजलेले कारळ तर कधी भाजलेल्या तीळाचा कूट किंवा दाण्यांचा कूट घालून केलेल्या चटण्यांना मागणी असते.शिवाय आमसुल चिंचेऐवजी कशातही बेलवांग्याच्या दोन चार फोडी खपून जातात. पण खरी गंमत शेंगाचा कूट घालून केलेल्या करकरीत बेलवांग्याच्या कोशिंबिरीत आहे. आणि जेव्हा कांदे रजेवर असतात तेव्हा बारीक चिरलेली बेलवांगी पोह्यांना वेगळीच मजा आणतात! हो सांगायचे राहिलेच की! बेलवांगी म्हणजे हल्ली ज्याला कच्चे किंवा हिरवे टोमॅटो म्हणतात तेच.

पाले भाज्यांविषयी कितीही लिहिले तरी अपुरेच होईल. त्यांचे विविध प्रकार आणि त्या किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात हे लक्षात आल्यावर आपण स्वत:शीच थक्क होतो. त्यामुळे एकच पालेभाजी सलग तीन चार दिवस केली तरीही कंटाळा येणार नाही. किंवा लक्षातही येत नसेल कालचीच आहे म्हणून ! साधा हिरव्या पातीचा लहान कांदा किंवा कोवळ्या ताज्या पानांसकट मुळे घेतले तरी त्यांच्या पानांची किंवा ती पाने घालून केलेल्या भाज्यांच्या प्रकारांचे उदाहरण पुरेसे आहे.त्या शिवाय निरनिराळी सरमिसळ करून केलेल्या पालेभाज्या वेगळ्याच! त्यासाठी चवळी,मूग,मटकी,मुगाच्या डाळीही त्यांच्या सहाय्याला धावून येतात.

फळभाज्यांचीही हीच गंमत आहे.पाले भाज्या, फळभाज्या ह्यांची मोजदाद व त्यांचे प्रकार आणि त्यांचा वापर करून केलेले पदार्थ ह्याविषयी लिहायला कोणत्याही भाषेत पुरेसे शब्द असतील असे वाटत नाही. पालेभाज्यांची पाने मोजण्या इतकेच ते अशक्य आहे ! पण त्यांच्यापासून मिळणारा आनंदही तितकाच अमर्याद आहे. म्हणून ज्यांनी एकदा तरी भाजी बाजारात जाऊन निवांतपणे फिरत भाजी आणली नसेल तर कविवर्य बा.भ. बोरकरही अशांना “जीवन त्यांना नाही कळले हो” असेच म्हणतील! बालकवींनीही बाजारात जाऊन भाजी आणली नसावी. नाही तर त्यांनीही ‘मंडईमाजीं हर्ष मानसी भाजी बहरली चोहीकडे’अशीही एक कविता केली असती!

कागद,शाई आणि वेळ पुरणार नाही इतक्या लिहिण्यासारख्या कैक भाजा अजून कितीक आहेत. म्हणून अखेर थांबायचे.

सृष्टीची विविधता पाहायची असेल तर बाजारात रमत गमत भाज्या पाहात फिरत राहावे.मन आणि डोळ्यांसाठी हा खरा नव नवलोत्सव आहे. ज्याने बाजारात जाऊन, आरामात, घाई न करता फिरत फिरत भाजी आणली नाही तो जगाची प्रदक्षिणा करून आला तरी ती व्यर्थच गेली असे खुशाल समजावे !

भाज्यांमधील अनवट राग!

भाजीऽ!भाजी घ्याऽऽ! आली लई ताजी ताजी.” “ हिरवीग्गार! ताजी फ्फाऽर! कितीत्त्ताजी !” “ सस्ती झाली हो! लई सस्ती लावली वांगी! मेथी घ्या! चुका घ्या!चाकवत घ्घ्या करडीची भाजी घ्घ्याऽऽ ! अशा निरनिराळ्या शब्दांत गुंफलेल्या आरोळ्यांच्या निरनिराळ्या आवाजांनी सकाळ सुरु व्हायची. भाज्यांच्या हातगाड्या, टोपल्या,मोठ्या पाट्या भरभरून भाज्यांची वर्दळ सुरु व्हायची. पाले भाज्या खूप तजेलदार दिसत. वांगी,टमाटे, दुधी भोपळेही चमकत असत! हे दारावर येणाऱ्या भाज्यांचे झाले. भाजी बाजारात(मार्केट) मध्ये गेलो तर मग पहायलाच नको. निरनिराळ्या रंगांच्या भाज्यांची रंगपंचमीच असे. आणि त्यात रविवार असावा. तोही दसरा दिवाळीच्या थंडीतला.मग काय! तिथे असंख्य भाज्यांचे डोंगर रचले जात. सगळे ओटे, फरशा , खाली जमीनीवर भाज्या लिंबं, भाज्या हिरव्या मिरच्या काय काय आणि किती नाना तऱ्हेच्या रंगांच्या भाज्या ओसंडत असत.

त्या मोसमांत आणि एरव्ही सुद्धा भाजी बाजारात जाणे हा सहलीला जाण्याइतकाच मोठा आनंद होता. हा भाजीपाल्याचा तजेलदार रंगीत बाजार पाहून एकच पिशवी आणल्याचा पश्चात्ताप होई.

भाजीतील नेहमीचे यशस्वी कलाकार मेथी, आळु चुका , राजगिरा, करडी/ करडई, शेपू, तांदुळसा, अंबाडी, असतच. पालकाची एन्ट्री अजून व्हायची होती. चुका, चाकवत आणि चंदनबटवा ही च च्या ‘च’मत्काराची त्रिमूर्तीही विराजमान झालेली असे.

संगीतात जसे काही नेहमी न गायले जाणारे अनवट राग असतात तशाही भाज्या असायच्या.
त्यामधील पालेभाज्यातील दोन ठळक नावे म्हणजे माठ आणि घोळ! ही नावेही ज्यांनी ठेवली असतील ते खरेच मिष्किल बेरकी असले पाहिजेत! वाक्प्रचारातला ‘ घोळात घोळ’ ह्या भाजीवरून आला की भाजीचे रूप पसाऱ्यावरून भाजीला हे नाव दिले! ह्या दोन्ही भाज्या एका अर्थाने खऱ्या अपौरुषेय, स्वयंभू म्हणाव्या लागतील. घराच्या अंगणात काही पेरावे लागत नाही की वाफे आळे अशी विशेष सरबराई सुद्धा ह्यांना लागत नाही. आपोआप उगवतात,त्यांची ती वाढतात,पसरतात! माठ व तांदुळसा एकाच जाति प्रकारातला. पण माठाची पाने लहान असतात. घोळाची पाने लहान,गोलसर जाड आणि गुलाबी देठांची. गवतासारखी पसरलेली.

आणखी दोन अनवट भाज्या म्हणजे मायाळू व शुक्रवारच्या कहाणीमुळे प्रसिद्ध झालेली कनीकुरडु किंवा कनी कुरडईची. मायाळूचे वेल असतात. दोन प्रकारचे. एक नेहमीसारखा हिरव्या वेलीचा तर दुसरा गुलाबी देठांचा. पानांची पाठही फिकट, कळत न कळत अशा गुलाबी रंगाची. भाजीही करत असतील पण भज्यांसाठी प्रसिद्ध होती. तशीच कनी कुरडुचीही. आणखी असाच एक भाजीपाला होता. तो म्हणजे पाथरीचा! खरा गावरान! भाजी करतही असतील पण जास्त करून तो थेट मीठ लावून शेंगदाण्यासह खायचा. त्यामुळे भाकरीचा घास आणखीनच चविष्ट लागायचा.

आणखी दोन भाज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या अनवट रागांतील भाज्यांची मालिका पूर्ण होणार नाही. पठाडीच्या शेंगा आणि चौधारी ! पठाडीच्या शेंगा ह्या साधारणत: आठ-दहा इंच लांब,हिरव्या आणि मऊ असतात. चौधारी ही भाजी की सॅलाडचा प्रकार माहित नाही. कधी खाल्ली नाही. पण आकारामुळे लक्षात राहिलेली आहे. ह्याचीही सहा ते आठ इंच लांबीचे चौकोनी तुकडे/कांड असत. चारी कडांना, फिरत्या दरवाजाला असतात तसे पांढरट हिरवे, उभे काचेचे पाखे किंवा पडदे म्हणा असत. पडदे म्हटल्यावर लगेच फार काही मोठे डोळ्यासमोर आणू नका. कल्पना यावी म्हणून तसे म्हटले. अगदी अरुंद. त्यांच्या कडा अगदी फिकट कोवळ्या हिरव्या असत. त्या पालवीसारख्या वाटत. चौधारी नाव अतिशय समर्पक वाटते. पण म्हणताना मात्र आम्ही ‘चौधरीच्या’ म्हणत असू!
कडवंच्यांच्या विषयी सांगितले नाही तर काहीच सांगितले नाही !

कडवंच्या नावही वेगळे रुपही आगळे! बहुतेक सर्व भाज्याप्रमाणे ह्यासुद्धा हिरव्या रंगाच्याच. लहान; बोटाच्या एका पेराएव्हढ्या. दुधी भोपळ्याला आपण लिलिपुटच्या राजधानीत आल्यासारखे वाटेल. आकार मध्ये फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला. दोन लहान शंकू एकमेकाना चिकटवल्यावर जसा निमुळत्या होत जाणाऱ्या इटुकल्या मृदुंगासारखा. पृष्ठभागही रेघांचा. आत मध्ये थोड्या अगदी लहान बिया असतील नसतील इतपत. पण त्यामुळे चावताना कडवंच्या किंचित कुरकुरीत लागायच्या. तेलाच्या फोडणीत परतून तिखट मीठ आणि तळलेले किंवा भाजलेले ऱ्शेंगदाणे घालायचे. भाकरी बरोबर खायला एकदम झकास. थोडीशी कडसर चव असलेल्या ह्या कडवंच्या आपल्या वेगळेपणाने ही भाजी की चटणी असे वाटायची.तरी स्पेशल तोंडी लावणे म्हणून जेवताना मधून मधून खाण्यात गंमत यायची.

रानमेव्यातल्या बोरं पेरू आवळा ह्यातील चिंचा कुठेही सहज मिळणाऱ्या! चिंचा होण्याआधी त्याच्या कळ्या व लहान लहान फुलांचे गुच्छ आल्यावर, त्यांच्या गुलाबी पांढऱ्या बहराने झाड सुंदर दिसायचे. ती कळ्या फुले म्हणजे चिगुर. त्यांच्या बरोबरीने चिंचेची कोवळ्यांपेक्षाही कोवळी पालवी तर खायला किती मजा येते ते सांगता येत नाही. कोवळा चिगुर पालवी खाणे हा सुट्टीतला खरा उद्योग असे. रस्त्याच्या कडेला दिसला आणि हाताशी असला तर सोपेच. नसला तर फांद्या खाली ओढून तो ओरबडून मूठी भरून घ्यायचा. नुसता खाल्ला तरी झकास आणि किंचित मीठ व चवीला गुळ घालून खाल्ला तर खातच राहावा असा चिगुर असे. तर ह्या चिगुराचीही बाजारात आवक होत असे. (काही ठिकाणी चिघोळ,चिगोळही म्हणूनही ओळखत असतील) ह्या चिगुराची, तो व तीळ भाजून केलेली चटणीही खमंग लागते. आणि ती त्या मोसमात अनेक घरात होत असे.

समाजातील विषमता वेगवेगळ्या प्रकारे असते. पण ठळकपणे उच्च, मध्यम व,कनिष्ठ वर्ग ह्यातून दिसतेच. भाज्यांतही हे वर्ग आहेत. कारण आमच्या ह्या माठ,घोळ, पाथरीची पाने, तांदुळसा, आणि चिगुर ह्यांना बाजारात मोक्याच्या जागी प्रतिष्ठित भाज्यांच्या बरोबरीने जागा मिळत नसे. बाजारातील रुळलेल्या मळवाटा सोडून वाकडी वाट करून गेलो तर एखाद्या कोपऱ्यात,जमिनीवर हे विक्रेते साधी पोती, कापड पसरून त्यावर घोळाचे,पाथरीच्या पानांचे,कडवंच्या आणि चिगुराचे लहान लहान ढिगारे ठेवून बसलेले दिसत. विकणारेही ह्या भाज्यांसारखेच साधे व गरीब वाटत. आमच्यासारखे सामान्य माहितगार तिकडे वळले की त्यांचे चेहरे खुलत. ते सावरून बसत. तांदुळसा किंवा माठाची पेंडी, कडवंच्याचे, चिगुराचे एक दोन ढिगारे घेतले की ती गावाकडची मंडळी खूष होत. मग वर एक चिमुटभर चिगुर व चार कडवंच्या आपणहून पिशवीत टाकत! पठाडीच्या शेंगाही ह्यांच्या पथारीवर दिसत. पण क्वचित. पठाडीला ती नेहमी मिळणारी नसल्यामुळे जेव्हा येत तेव्हा त्यांना ओट्यांवर स्थान मिळे. तीच गोष्ट सुंदर हादग्याच्या फुलांची.

आणखी एका भाजीची ओळख करून द्यायची राहिली. ती शेंगाच्या प्रकारातली आहे. ती आजही मिळते पण आमच्याकडे पूर्वी तिचे स्वरूप निराळे व नावही निराळे होते. आज मुळ्याच्या शेंगा ह्या नावाने मिळणाऱ्या लांब शेंगा पूर्वी डिंगऱ्या ह्या नावाने ओळखल्या जात. त्यावेळी त्या अशा लांब नव्हत्या.दीड दोन पेराएव्हढ्याच पण फुगीर. भाजीत रस (पाणी) ठेवायचा. जेवायला बसेपर्यंत त्यांतील हे खमंग रसपाणी थोडेसे ह्या डिंगऱ्याच पिऊन टाकीत. भाजी खाताना रसपाण्याने जास्त टपोऱ्या झालेल्या ह्या डिंगऱ्या खाताना त्यांतील रसाची एखादे वेळी लहानशी चिळकांडी तोंडात उडाली की कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. आमच्या बहिणीने ह्या डिंगऱ्यांचे रसमधुर बारसे केले होते. ती त्यांना तिखट मिठाच्या जिलब्या म्हणायची!

आज ह्या भाज्या आमच्या गावात मिळतात की नाही माहित नाही. मिळत असतील तर लोक अजूनही भाग्यवान आहेत म्हणायचे. लहान गावात मिळतही असतील. पण शहरातील मंडईत दिसत नाहीत.

मंडईत गेलात आणि ह्या अनवट भाज्यांपैकी काही मिळाल्या तर नमुन्याला का होईना जरूर घ्या. तोंडाला चव येईल !

भेटलेले साधे महाराज

माझी औरंगाबादला बढतीवर बदली झाली. तेव्हा जळगावचे माझे मित्र डाॅ. खटावकर ह्यांनी औरंगाबादच्या जयशंकर महाराजांना एकदा भेटा असे सांगितले होते. कामाच्या गडबडीत व पत्ता नेमका माहित नसल्यामुळे मी काही जयशंकरमहाराजांना भेटू शकलो नव्हतो. कामानिमित्त जळगावला गेलो. डाॅ. खटावकरांशी कामाचे बोलणे झाल्यावर मी निघालो. निघताना मीच म्हणालो, “ डाॅ., जयशंकर महाराजांना कुठे भेटायचे? पत्ता माहित नाही. ते म्हणाले,” औरंगपुऱ्यात आहेत. कुणाचा वाडा ते नेमके माहित नाही.” मी शोधून काढतो,इतके म्हणून दौरा संपवून औरंगाबादला आलो. आल्यावर नुकतेच ओळख झालेले व पुढे चांगले घरोब्याचे मित्र झालेले अनंतराव देशपांड्यांना जयशंकर महाराजांचा पत्ता विचारला. त्यांनी अंदाजाने सांगितला.

मी गेलो. ते राहात होते त्या वाड्यात गेलो. जुना वाडा. मोडकळीला आला नव्हता तरी तसा वाटत होता. आत गेल्यावर बाजूच्या ओवरीत छपरापर्यंत सरपणाची लाकडे भरून ठेवलेली. आजूबाजूलाही काही पडलेली. त्यातच एका कोपऱ्यात, बाजेवर थोडीशी वाढलेल्या पांढऱ्या दाढीचे म्हातारे गृहस्थ झोपलेले होते. तोंडात दातही फारसे नविहते. पण चेहरा हसरा होता.त्या काळात सर्रास वापरात असलेली चट्यापट्याची नाडीची अर्धी चड्डी घालून झोपलेले म्हातारे गृहस्थ दिसले. मी आत गेल्याबरोबर ते हसऱ्या चेहऱ्याने “जयशंकर”म्हणून गप्प झाले.

थोड्या वेळाने आतल्या बाजूने श्री.दातार व सौ.दातार आल्या. त्यांनी माझी चौकशी केली. दातार राज्य सरकारी नोकरीत साध्या पदावर असावेत. दोघे पतिपत्नी शांत,सौम्य पण समाधानी दिसत होते. हे जयशंकरमहाराजांची काळजी घेत होते. मी वारंवार नाही तरी काही वेळा जयशंकरमहाराजांना भेटून येत असे. ते माझी कसे काय चाललंय, मुलांची चौकशी करायचे. पण जयशंकर म्हणण्यात ते रमत असावेत असे वाटले. मध्येच ते मोठ्याने जयशंकर म्हणत. काही वर्षानंतर दातारांनी जागा बदलली व सरस्वती काॅलनीत राहायला आले. ही जागा जास्त प्रशस्त,मोकळी व व्यवस्थित होती. मी जयशंकरमहाराजांना भेटायला जाई तेव्हा दोघेही दातार सौम्य हसत स्वागत करीत. महाराजांपेक्षा अर्थात त्यांच्याशीच जास्त बोलणे होई. एकदोन वेळा मी सुधीरला घेऊन गेलो होतो. सुधीरला पाहून जयशंकरमहाराजांना आनंद झाल्याचे दिसत होते. त्याला ते जवळ बसवून पाठीवर किंवा डोक्यावर हात फिरवत.

अनंतराव देशपांडेसाहेबांनी मला जयशंकर महाराजांविषयी माहिती सांगितली ती ऐकण्यासारखी आहे. ती ऐकल्यावर जयशंकर महाराज महाराज का हे पटू लागले. ते सांगत होते,” मेवाड हाॅटेलचा मालक जयशंकरमहाराजांना रोज सकाळी हाॅटेलात घेऊन जात असे. आजही जात असतील कदाचित. तिथे त्यांना गल्ल्यावर बसवित. जेव्हढा वेळ ते हाटेलात गल्ल्यावर असत तोपर्यंत ते येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला गल्यातून पैसे देत. ते कुणाला किती देत तिकडे मेवाडचे मालक पाहात नसत. मग महाराज म्हणाले निघायचे की मालक त्यांना घरी आणून सोडत असे. हे किती तरी वर्षे चालू होते. आजही असेल कदाचित. रोज नसेल पण केव्हा तरी तो महाराजांना घेऊन येत असेलही.” मेवाड हाॅटेलच्या बरकती मागे जयशंकर महाराजांच्या कृपेचाही मोठा भाग असणार.

ही १९७२-७५ व त्यानंतरच्या काही वर्षातील हकीकत आहे. जयशंकरमहाराजांची सर्व प्रकारे काळजी दातार दांपत्याने मनापासून घेतली. जयशंकरमहाराजांनी मेवाडच्या हाॅटेल मालकाच्या श्रद्धेला किती सफळ सुफळ केले असेल त्याची इतर काही माहिती नाही. पण त्यांचे आणखी एक हाॅटेल सुरू झाले. गुलमंडीवरचे रेस्टाॅरंट जोरात चालतच होते. हे मात्र पाहिले आहे.

माझ्या बाबतीत काहीही चमत्कार घडला नाही. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असे तेव्हा एकदाही माझ्या मनांत त्यांनी मला हे मिळवून द्यावे, असे घडावे असला विचार कधीही येत नसे.बहुधा,मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला ते महाराज वगैरे काही वाटले नव्हते. ह्यामुळेही कदाचित मला त्यांच्याकडे काही मागावे असे वाटले नसेल! पण मला बरे, शांत वाटत असे हे खरे. मी फक्त त्यांना भेटल्यावर व निघतांना नमस्कार करीत असे. ते फक्त नेहमी हात वर केल्यासारखा करून हसतमुखाने जयशंकर म्हणत.

अनंतराव देशपांडे ह्यांनी अशीच हकीकत बाळकृष्ण महाराजांसंबंधी सांगितली होती. औरंगाबादच्या अप्पा हलवाईंचा प्रसिद्ध पेढा हा बाळकृष्णमहाराजांचा कृपाप्रसाद आहे असे देशपांडेसाहेब म्हणाले होते. बाळकृष्णमहाराजांची समाधी अप्सरा टाॅकीजसमोरच्या भागात आहे. तीही मी जाऊन पाहिली.

हे लिहित असता एक लक्षात आले आणि ते आल्यावर माझ्या हातून केव्हढी मोठी चूक झाली, केव्हढा अपराध घडला ह्याची जाणीव झाली. शंभर थोबाडीत मारून घ्याव्यात असे वाटले. सुरवातीला तरी मी बरेच वेळा दातार साहेबांच्या घरी जयशंकर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो असेन. पण मी त्या दोघांना एकदाही ,” आमच्या घरी चहाला या.” असे म्हणालो नाही! आता मी माझे मलाच ‘करंट्या’ शिवाय काय म्हणणार!

त्या दोघांनी कित्येक वर्षे जयशंकरमहाराजांची सेवा करण्यात व्यतीत केली असल्यामुळे दातार मला उदार मनाने क्षमा करतील अशी प्रार्थना करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. जयशंकर!

शर्यत

एक मुलगा होता. अत्यंत जोरात पळायचा. उत्तम धावपटू होता. शर्यतीत भाग घ्यायची तीव्र इच्छा होती. त्याचे आजोबा होते. त्यांनाही नातवाचे कौतुक होते.


दुसऱ्या गावात पळण्याची शर्यत होती. मुलाने त्या शर्यतीत भाग घेतला. गावातल्या मुलांबरोबर तो गेला.आजोबानाही राहवले नाही. नातवाची शर्यत पाहायला तेही त्या गावात पोचले.


नातवाच्या बरोबर दोघे स्पर्धक होते. शर्यत सुरु झाली. नातू आणि एक मुलगा चांगल्या वेगाने पळत होते. तिसरा मागे पडू लागला. हे दोघे अटीतटीने पळत होते. लोक श्वास रोखून पाहात होते. कोण जिंकेल ह्याची उत्सुकता वाढत होती. आजोबा शांत होते. नातवाने शर्यत जिंकली. लोकांनी मोठ्या आनंदाने आरोळ्या ठोकून शिट्या टाळ्या वाजवून मुलाचे कौतुक केले. मुलाची मान ताठ झाली. स्वत:च्या पराक्रमाने त्याची छाती फुगली.आजोबा शांत होते. त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवून कौतुक केले.

दुसरी शर्यत जाहीर झाली. ह्या खेपेला दोन नव्या दमाची ताजीतवानी मुले नातवाबरोबर शर्यत खेळायला उतरली. नातू पहिल्या विजयाने अधिकच जोमात आला होता. शर्यत सुरू झाली. दोन्ही नवे धावपटू जोशात होते. त्यांनी नातवाला मागे टाकायला सुरुवात केली. आजोबा पाहात होते. नातू आता इरेला पेटला. सगळे कौशल्य शक्ति पणाला लावून धावू लागला. तिघे जातिवंत धावपटू एकाच रेषेत बरोबरीने पळू लागले. अंतिम रेषा जवळ येऊ लागली. नातवाने मान खाली घालत जोरदार मुसंडी मारून अंतिम रेषा लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ओलांडली. किती वेळ टाळ्या शिट्या वाजत राहिल्या होत्या! नातू धापा टाकत होता. जग जिंकल्याच्या ताठ्यात उभा होता. आजोबांच्या जवळ येऊन उभा राहिला. आजोबांनी शाबासकी दिल्यासारखा त्याच्या पाठीवर हात थापटला.

नातू ‘इजा बिजा आणि आता तिजा’ जिंकण्याच्या इर्षेने,“पुन्हा एक शर्यत होऊ द्या !” म्हणून ओरडू लागला. आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवित त्याला शांत करीत ते पुढे गेले. ह्या खेपेला आजोबांनी पुढाकार घेऊन एक अशक्त, दुबळी म्हातारी व एका आंधळ्याला शर्यतीत उतरवले. नातू थोड्या घुश्शातच म्हणाला,”आजोबा! ह्यांच्याशी मी, मी,ह्यांच्याशी शर्यत खेळू?” आजोबांनी एकाच शब्दात त्याला सांगितले,” खे-ळ.”

शर्यत सुरू झाली. मुलगा जरा घुश्शातच होता. त्याच्या वेगाने धावत सुटला. अंतिम रेषा पार केली. शर्यत जिंकली. दोन्ही हात वर करून ओरडत नाचू लागला.लोक गप्प होते. ना टाळ्या ना शिट्या ऐकू येत होत्या. मैदान शांत होते. अशक्त दुबळी म्हातारी मोजून एक दोन पावलेच पुढे आली होती. आंधळा जागीच उभा होता. नातवाचा चेहरा पडला होता.आजोबाजवळ आला. ,” मी शर्यत जिंकली पण लोक आनंदाने ओरडले नाहीत की टाळ्या वाजवून कौतुक केले नाही!” आजोबा शांत होते. ते नातवाला घेऊन पुन्हा शर्यतीच्या प्रारंभ रेषेकडे गेले. त्यांनी नातवाला त्या दोघा स्पर्धकाकडे तोंड करून उभे केले. काहीही न बोलता आजोबा हळू हळू आपल्या जागी गेले. नातू सुरुवातीच्या रेघेवर उभा राहिला.

शर्यत सुरु झाल्याचा इशारा झाला.सुरुवातीला सवयीने नातू पळणारच होता. एक दोन पावले त्याने तशी जोरात पुढे टाकलीही. पण लगेच तो दुबळ्या म्हातारीच्या व आंधळ्या माणसाच्या मध्ये जाऊन उभा राहिला.त्याने त्या दोघांचे हात धरले. तो त्यांच्या बरोबरीने चालू लागला. तिघेही चालू लागले. हलकेच एक दोन टाळ्या वाजल्या. मग तिघांच्या पावलांच्या ठेक्यावर त्या वाजू लागल्या. तिघांनीही हात धरून अंतिम रेषा ओलांडल्यावर कौतुकाच्या टाळ्यांचा पाऊस पडू लागला. लोक आनंदाने नाचू लागले.

“आजोबा,कुणासाठी टाळ्या वाजवताहेत लोक? कुणी जिंकली शर्यत? “ नातू विचारत होता. “ बाळा, लोक शर्यतीला टाळ्या वाजवताहेत.” आजोबा शांपणे म्हणाले. “बाळ तू जोरदार धावतोस. शर्यती जिंकतोस. पण फक्त शर्यत जिंकण्यालाच महत्व नाही. शर्यत कशी पळतोस ते महत्वाचे आहे. आयुष्यात शर्यत जिंकणे हेच एक सर्वस्व नाही. ह्या शर्यतीत दीन दुबळ्यांना आधार देत पळणे हीच जिंकण्याहून मोलाची गोष्ट आहे.”

(इंटरनेट वरील एका लहानशा इंग्रजी बोधकथेवरून ही विस्तारित कथा केली.)

पारले-जी

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.


१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.


फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!


भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.


मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.


डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.


खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.


पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.


पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.


पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.


चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!


आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

संत कान्होपात्रा

पंढरपुरपासून मंगळवेढा १४-१५ मैलावर आहे. म्हणजे जवळच आहे. आपल्याला मंगळवेढे, दुष्काळात उपासमारीने गांजलेल्यांसाठी बादशहाचे धान्याचे गोदाम ज्यानी स्वत:च्या जबाबदारीवर खुले केले; अनेकांचे प्राण वाचवले त्या भक्त दामाजीमुळे माहित आहे. दामाजीचे मंगळवेढे अशी त्याची ओळख झाली.

त्याच मंगळवेढ्यात श्यामा नावाची सुंदर वेश्या राहात होती.तिला एक मुलगी होती. ती आपल्या आईपेक्षाच नव्हे तर अप्सरेपेक्षाही लावण्यवती होती. तिचे नाव कान्होपात्रा होते.

व्यवसायासाठी श्यामाने आपल्या ह्या सौदर्यखनी कान्होपात्रेला गाणे आणि नाचणे दोन्ही कला शिकवल्या. नृत्यकलेत आणि गायनातही ती चांगली तयार झाली. सौदर्यवती असली तरी समाजात गणिकेला काही स्थान नव्हते.

पण श्यामाला मात्र आपली मुलगी राजवाड्यात राहण्याच्याच योग्यतेची आहे असे वाटायचे. राजाची राणी होणे कान्होपात्रेला अशक्य नाही ह्याची तिला खात्री होती. तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे तिने ठरवले. कान्होपात्रेला ती म्हणाली, “ अगं लाखात देखणी अशी तू माझी लेक आहेस. तुला राजाची राणी करण्यासाठी आपण राजदरबारात जाणार आहोत. तयारी कर.” त्यावर कान्होपात्रा म्हणाली, “ आई, माझ्याहून राजबिंडा आणि तितकाच गुणवान असणाऱ्या पुरुषालाच मी वरेन. पण मला तर माझ्या योग्यतेचा तसा पुरुष कोणी दिसत नाही.” थोडक्यात कान्होपात्रेने आईच्या विचारांना विरोध केला.

काही दिवस गेले. एके दिवशी कान्होपात्रेच्या घरावरून वारकऱ्यांची दिंडी, आपली निशाणे पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर, विठ्ठलाचे भजन करीत चालले होते. तीही त्या तालावर ठेका धरून डोलत होती.तिने वारकऱ्यांना विचारले, “ तुम्ही कुठे निधाले आहात? इतक्या आनंदाने आणि तल्लीन होऊन कुणाचे भजन करताहात?”

“ माय! पुंडलिकाच्या भेटी जो पंढरीला आला, आणि इथलाच
झाला त्या सावळ्या सुंदर, राजीव मनोहर अशा रूपसुंदर वैकुंठीचा राणा त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललो आहोत!”
वारकरी कान्होपात्रेला सांगत होते. त्यांनी केलेल्या विठ्ठ्लाचे रूपगुणांचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने त्यांना काहीशा संकोचानेच विचारले,” अहो,तुम्ही वर्णन केलेला हृषिकेषी माझ्यासारखीचा अंगिकार करेल का?” हे ऐकल्यावर वारकी तिला मोठ्या उत्साहाने सांगू लागले,” का नाही? कंसाची कुरूप विरूप दासी कुब्जेला ज्याने आपले म्हटले तो तुझ्यासारख्या शालीन आणि उत्सुक सुंदरीला दूर का लोटेल? आमचा विठोबा तुझाही अंगिकार निश्चित करेल ! तू कसलीही शंका मनी आणू नकोस. तू एकदा का त्याला पाहिलेस की तू स्वत:ला विसरून जाशील. तू त्याचीच होशील !”

वारकऱ्यांचे हे विश्वासाचे बोलणे ऐकल्यावर कान्होपात्रा घरात गेली. आईला म्हणाली,” आई! आई! मी पंढरपुराला जाते.”
हिने हे काय खूळ काढले आता? अशा विचारात श्यामा पडली. कान्होपात्रेला ती समजावून सांगू लागली.पण कान्होपात्रा आता कुणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. केव्हा एकदा पंढरपूरला पोचते आणि पांडुरंगाला पाहते असे तिला झाले.

कान्होपात्रा धावत पळत निघाली. दिंडी गाठली. आणि रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।। म्हणत आणि वारकऱ्यांच्या पाठोपाठ ते म्हणत असलेले अभंग भजने आपल्या गोड आवाजात म्हणू लागली.तिचा गोड आवाज ऐकल्यावर एकाने आपली वीणाच तिच्या हातात दिली !

वारकऱ्य्ंबरोबर कान्होपात्रा पंढरीला आली. विठठ्लाच्या देवळाकडे निघाली.महाद्वारापशी आल्याबरोबर हरिपांडुरंगाला लोटांगण घातले.राऊळात गेल्यावर तिला जे विठोबाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वत:ला पूर्णपणे विसरली.तिच्यात काय बदल झाला ते तिला समजले नाही. पण ती पंढरपुरातच राहिली.

कान्होपात्रा रोज पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर महाद्वारापाशी कीर्तन करू लागली.दिवस असे जात असताना एका दुर्बिद्धीने बेदरच्या बागशाहाला कान्होपात्रेच्या अप्रतिम लावण्याचे मीठ मसाला घालून वर्णन केले. बादशहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले.

बादशहाचे शिपाई पंढरपुरात आले तेव्हा कान्होपात्रा कीर्तन करत होती. तिच्या सौदर्याला आता भक्तीचा उजाळा आला होता.बादशहाचे शिपाई तिला पाहिल्यावर आपण कशासाठी आलो हे विसरून कान्होपात्रेकडे पाहातच राहिले.नंतर भानावर येऊन तिला जोरात म्हणाले,” बादशहाने तुला बोलावले आहे.चल आमच्या बरोबर. कान्होपात्रा घाबरली.शिराई तिला पुढे म्हणाले,” निमुटपणे चल नाहीतर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल.” ती दरडावणी ऐकल्यावर कान्होपात्रेला तिच्या विठोबाशिवाय कुणाची आठवण येणार? ती शिपायांना काकुळतीने म्हणाली,” थोडा वेळ थांबा. मी माझ्या विठ्ठ्लाचे दर्शन घेऊन येते.” कान्होपात्रा तडक राऊळात गेली आणि विठोबाच्या चरणी डोके टेकवून त्याचा धावा करू लागली.भक्त दुसरे काय करू ऱ्शकणार?

“पांडुरंगा, तू चोखा मेळ्याचे रक्षण केलेस मग माझे रक्षण तू का करत नाहीस? एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून तू गोपींचे गोपाळांचे, गायी वासरांचे संपूर्ण गावाचे प्रलयकारी पावसापासून रक्षण केलेस आणि मला का तू मोकलतो आहेस? विठ्ठ्ला, माझ्या मायबापा! अरे मी तुला एकदा वरले, तुझी झाले आणि आता मला दुसऱ्या कुणी हात लावला तर कुणाला कमीपणा येईल? विठ्ठला तुलाच कमीपणा येईल. बादशहाने मला पळवून नेले तर सर्व साधुसंत तर तुला हसतीलच पण सामान्यांचा तुझ्यावरच निश्वास उडेल. ती धावा करू लागली. “नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धाव हे जननी विठाबाई।। पांडुरंगा, माी सर्व आशा,वासना कधीच सोडल्या आहेत. आता तरी “घेई कान्होपात्रेस हृदयात” ही कान्होपात्रेची तळमळून केलेली विनवणी फळाला आली. कान्होपात्रेचे चैतन्य हरपले. विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला !

देवळातल्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी लगेच देवळाच्या आवारात दक्षिणदारी कान्होपात्रेला घाईगडबडीने पुरले.आणि काय चमत्कार! लगेच तिथे तरटीचे झाड उगवले.

बाहेर बादशहाचे शिपाई कान्होपात्रेची वाट पाहात ताटकळले.त्यांनी पुजाऱ्यांना आवाज दिला. भेदरलेले पुजारी धावत आले.त्यांनी शिपायांना कान्होपात्रा गेली. आम्ही तिचे प्रेत पुरले. लगेच तिथे झाडही उगवले!” हे ऐकल्यावर शिपाई संतापाने ओरडले, “ हरामजादों ! तुम्हीच तिला लपवून ठेवले. आणि मेली काय, लगोलग पुरली काय आणि वर झाड उगवले म्हणता? सरासर झूट.” असे म्हणत त्यांनी पुजाऱ्यांना पकडून बादशहाकडे निघाले. तेव्हढ्यात एक पुजारी सटकला. देवळाकडे जाऊ लागला. त्याच्या मागे शिपाई धावले.कुठे पळतोस म्हणत त्याच्या पाठीवर दोन कोरडे ओढले. पुजारी म्हणाला,” बादशहासाठी प्रसाद आणायला चाललो होतो” हे ऐकल्यावर शिपाई ओरडले,” तू भी अंदर जाके मर जायेगा! आणि तिथेच बाभळीचे झाड उगवले म्हणून तुझेच हे ऱ्भाईबंद सांगतील.” पण शेवटी गयावया करून तो पुजारी आत गेला. नारळ बुक्का फुले घेऊन आला.

पुजाऱ्यांना राजापुढे उभे केले.पुजाऱ्यानी आदबीने बादशहापुढे प्रसाद ठेवला. शिपायांनी घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून बादशहा जास्तच भडकला. “ काय भाकडकथा सांगताय तुम्ही. कान्होपात्रा अशी कोण आहे? एक नाचीज् तवायफ! आणि तुम्ही सांगता तुमच्या देवाच्या पायावर डोके ठेवले और मर गयी?” वर तरटीका पेड भी आया बोलता?” असे म्हणत त्याने प्रसादाचा नारळ हातात घेतला. त्याला त्यावर कुरळ्या केसांची एक सुंदर बट दिसली. “ये क्या है? किसका इतना हसीन बाल है?” म्हणूनओरडला; पण शेवटच्या तीन चार शब्दांवर त्याचा आवाज हळू झाला होता. पुजारी गडबडले. काय सांगायचे सुचेना. कान्होपात्रेचा तर नसेल? असला तरी सांगायचे कसे? शेवटी विठोबाच त्यांच्या कामी आला. ते चाचरत म्हणू लागले,” खा-खाविंद! वो वो तो आमच्या पांडुरंगाची बट है !” शाहा संतापला.” अरे अकलमंदो! दगडी देवाला कुठले आले केस? क्या बकवाज करते हो?!” पुजारी पुन्हा तेच सांगू लागल्यावर बादशहाने फर्मान सोडले.ताबडतोब पंढरपुरला जायचे. केसाच्या बटेची शहानिशा करायची. पुजाऱ्यांच्या पोटात गोळाच उठला.पण करतात काय!

बादशहाचा लवाजमा निघाला.दोरखंड बाधलेले पुजारी भीतीने थरथर कापत चालले होते. जस जसे पंढरपुर जवळ आले तशी पुजाऱ्यांनी विठ्ठलाची जास्तच आळवणी विनवणी सुरू केली.देऊळ आले.पुजाऱ्यांचे प्राण कंठाशी आले होते. राजा सभामंडपातून थेट मूर्तीपाशी गेला.आता काय होईल ह्या भीतीने पुजारी मटकन खालीच बसले.

राजाने ती सावळी सुंदर हसरी मुर्ती पाहिली.विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुट प्रकाशाने झळाळू लागला. त्यातूनच विठ्ठलाच्या केसांचा रूळत असलेला संभार दिसू लागला! पांडुरंगाचे दर्शन इतके विलोभनीय आणि मोहक होते की बादशहाच्या तोंडून,” या खुदा! कमाल है! बहोत खूब! बहोत खूब! “ असे खुषीत येऊन बादशहा म्हणाल्यावर पुजारीही विस्फारलेल्या डोळ्यांनी पंढरीनाथमहाराजांकडे पाहू लागले. त्यांचा विश्वास बसेना.डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.

बादशहाने कान्होपात्रेचे तरटीचे झाड पाहिले.ते पाहिल्यावर कान्होपात्रेची योग्यता त्याच्या लक्षात आली. त्याच बरोबर त्याने प्रत्यक्ष जे पाहिले त्यामुळे त्याला मोठे समाधान आणि आनंदही झाला होता.

अतिशय सुंदर असली तरी कान्होपात्रा समाजातील खालच्या थरातली होती.सौदर्य हाच तिचा मानसन्मान होता.प्रतिष्ठा राहू द्या पण समाजात तसे काही स्थान नव्हते.सौदर्य हीच काय ती तिची प्रतिष्ठा होती! अशी ही सामान्य थरातली कान्होपात्रा अनन्यभक्तीमुळे विठ्ठलमय झाली होती. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात तसे तिच्या ‘ध्यानी मनी पांडुरंग होता तर ‘हरि दिसे जनी वनी’ अशी तिची अवस्था होती.

कान्होपात्रेच्या आईला तिची कान्होपात्रा राजाची राणी व्हावी अशी इच्छा होती. पण आमची सामान्य, साधी कान्होपात्रा वारकरी हरिभक्तांची सम्राज्ञी झाली. संत कान्होपात्रा झाली!

पंढरपुरच्या विठोबाच्या देवळाच्या परिसरात आजही तिथे तरटीचे झाड आहे.प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सान्निध्यात, देवळाच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे— ती आहे संत कान्होपात्रेची !

अप्रूप

आमचे पहिले घर टेकड्यांमध्ये होते. अनेक घरे टेकड्यांवर होती. काही खोलगट भागात होती. टेकड्या झाडावृक्षांनी नटलेल्या तसेच खोलगट भागही वृक्षराजींने भरलेला असायचा. त्यामुळे घरांची संख्या कमी होती असे नाही. किंवा घरे लहान किंवा आलिशान महाल होते असेही नव्हते. सर्व प्रकारची घरे होती. कौलारू होती. उतरत्या साध्या पत्र्यांची होती. सिमेंटची होती. तांबड्या विटाची होती. पांढरी होती. पिवळी होती. निळसर होती. विटकरी होती. काचेच्या खिडक्यांची होती. लाकडी दरवाजांची होती. काही अतिशय देखणी होती. बरीचशी चारचौघींसारखी होती. काही दहा जणांत उठून दिसणारी होती. तर काही दोन-चार असामान्यही होती. पण सगळी झाडां झुडपांचे अभ्रे घातलेली असल्यामुळे हे टेकड्यांवरचे,टेकड्यांमधले गाव दिवसाही पाहात राहावे असे होते. त्यातच निरनिराळ्या ऋतुत फुलणारी विविध फुले अनेक रंग भरून टाकीत! रंगीत फुले गावची शोभा दुप्पट करत!
रात्री तर गाव घराघरांतल्या लहान मोठ्या दिव्यांनी, त्यांच्या सौम्य ,भडक, मंद प्रकाशांच्या मिश्रणाने स्वर्गीय सौदर्याने खुलत जायचे! काही रात्री तर गावाच्या ह्या सौदर्यापुढे आपण फिके पडू ह्या भीतीने चंद्र -चांदण्या,तारे ढगांच्या आड लपून राहत!


गॅलरीत उभे राहिले की ‘आकाशात फुले धरेवरि फुले’ त्याप्रमाणे आकाशात चंद्र तारे नक्षत्रे व समोर, खाली, सभोवतालीही,तारे, नक्षत्रे ह्यांचा खच पडलेला दिसे! आकाशातून दुधासारखे चांदणे खाली येऊन टेकड्यांवरच्या गावातील निळसर दुधाळ प्रकाशात सहज मिसळून पसरत असे. हात नुसते पुढे केले की चंद्राच्या गालावरून हळुवारपणे सहज फिरवता येत असे. तर मूठभर चांदण्यांची फुले गोळा करून ओंजळ भरून जात असे! आपल्या प्रेयसीला ओळी ओळीतून चंद्र आणून देणारे, येता जाता तारे-नक्षत्रे तोडून तिच्या केसांत घालणारे जगातले सर्व कवि इथेच राहात असावेत. किंवा एकदा तरी इथे राहून गेले असावेत! इतके अप्रूप असे आमचे गाव होते.

आज पंधरा वर्षांनी पुन्हा त्याच गावात राहायला आलो.थोडे काही बदल झाले असणारच. पण गाव आजही बरेचसे पूर्वीप्रमाणेच होते. मोठ्या उत्सुकतेने मी रात्री गॅलरीत गेलो. सगळीकडे नजर फिरवत पाहिले. आनंद झाला. पण मन पहिल्यासारखे उचंबळून आले नाही. काही वर्षे रोज पाहिले असल्याने, मधली वर्षे ह्या गावाच्या फार दुर राहात नसल्यामुळेही सवय झालेली असावी. सवय, संवेदना बोथट करते. त्याहीपेक्षा सवय, उत्कटता घालवते ह्याचे जास्त वाईट वाटते!


हे लघुनिबंधाचे गाव राहू द्या. ह्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गावापेक्षा साठ पासष्ठ वर्षांपूर्वीच्या गावात जाऊ या.

नव्या पेठेतल्या दुकानांच्या, व्यवसाय आणि लोकांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर मोकळे मोकळे वाटते. नविन वस्ती सुरु झाली हे सांगणाऱ्या उंबरठ्यावर आपण येतो. थोडा त्रिकोणि थोड्या अर्धवर्तुळाकाराच्या चौकांत आपण येतो. आणि समोरचा बंगला पाहून हे हाॅटेल असेल असे वाटतही नाही. बरीच वर्षे ह्या हाॅटेलच्या नावानेच हा चौक ओळखला जात असे. लकीचा चौक किंवा लकी चौक!

लकी रेस्टाॅरंट अर्धगोलाकार होते. गोलाकार सुंदर खांबांनी जास्तच उठून दिसे. आत गेले की समोर चार पायऱ्या चढल्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या दोन दोन खांबांमध्ये लहानसे चौकोनी टेबल व समोरासमोर दोन खुर्च्या. इथे बसायला मिळाले की आगगाडीत,बसमध्ये खिडकीची जागा मिळाल्याचा आनंद होई.रस्त्यावरची गंमत पाहात बसायला ही फार सोयीची टेबले होती. मघाशी चारपायऱ्या चढून आल्याचा उल्लेख केला. तिथल्या दोन गोलाकार खांबांवर मधुमालती होत्या. आमच्या गावात मधुमालती बरीच प्रिय होती. वेल व तिची फुले!
ह्या व्हरांड्याच्या समोरची गोलाकार जागा,जाई जुईच्या वेलांच्या मांडवांनी बहरलेली असायची. त्यांचेही आपोआप चौकोन होऊन त्याखाली तिथेही गिऱ्हाईके बसत. ती जागा ‘प्रिमियम’च म्हणायची. कारण जवळच्या वेलींनी केलेल्या कुंपणातून रस्त्यावरचे दृश्य दिसायचे; शिवाय खाजगीपणही सांभाळले जायचे.


चार पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मालकांच्या गल्ल्याचे टेबल. मालकांचे नाव भानप. भानप अगदी जाडजूड नव्हते पण बऱ्यापैकी लठ्ठ होते. आखूड बाह्यांचा शर्ट घातलेला. काळ्या पांढऱ्या केसांचे राखाडी मिश्रण. त्यांचा सकाळी भांग पाडलेला असणार. पण दुपारपर्यंत हात फिरवून त्याच्या खुणा राहिलेल्या दिसत. ओठ जाडसर. सिगरेट प्याल्याने काळसर पडलेले. ते कधी कुणाशी गप्पा मारतांना दिसले नाहीत. मालक नेहमीच्या गिऱ्हाईकांशी सुद्धा ‘कसे काय’इतकेच बोलत. कारण बहुतेक सर्व गिऱ्हाईके नेहमीचीच. न कळत त्यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या.व्हऱ्हांड्याच्या दोन्ही बाजूच्या कोपऱ्यात एक एक फॅमिली रूम होती. पासष्ट वर्षांपूर्वी हाॅटेलातली फॅमिली रूम वर्दळीची नव्हती. काॅलेजमधली मुले मुलीही ते धाडस करत नसत. असा माझा समज आहे.


वऱ्हांड्यातील खांबांमधील टेबलांचे आकर्षण असण्याचे कारण म्हणजे रस्त्यावरच्या वर्दळीची गंमत पाहात चहाचे घुटके घ्यावे ह्यासारखे सुखकारी काही नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला बंदी नव्हती. पण जी पोरे लवकर सिगरेट प्यायला लागायची ती टोळक्याने जाईच्या मांडवाखाली बसून पीत. व्हरांड्यातील खांबामधल्या एका टेबलावर ठराविक खुर्चीवर आमच्या मावशीचे सासरे बसलेले असत. चहाचा कप समोर आणि करंगळी व तिसऱ्या बोटामध्ये विडी किंवा कधी सिगरेट धरून ते दमदार झुरके घेत बराच वेळ बसलेले असत. रोज. भानपही इतके नियमितपणे त्यांच्याच लकीत येत नसतील. अण्णा बसलेले असले की आम्हाला लकीत जाता येत नसे. कारण लगेच “हा हाॅटेलात जातो!” ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार व तो शिक्का कायमचा बसणार ही भीती! अर्थात काही दिवसांनी ही भीती मोडली तरी पण मावशीचे सासरे नसताना जाणेच आम्ही पसंत करत असू.

त्या वेळी बटाटे, फ्लाॅवर, मटार ह्या भाज्या मोठ्या विशेष असत. भाज्यांमधल्या ह्या खाशा स्वाऱ्या होत्या! काॅलीफ्लाॅवर व मटार थंडीच्या दिवसांतच मिळायचा. बटाटे त्या मानाने बरेच वेळा मिळत. पण बटाट्याची भाजी ही सणासुदीला व्हायची. विश्वास बसणार नाही पण लकीमध्ये बटाटा-भाजी हा वेगळा, स्वतंत्र पदार्थ होता! स्पेशल डिश म्हणा ना!


लकीने आमच्या दृष्टीने क्रांतीच केली होती. लकीची बटाट्याची भाजी केवळ बटाटा अप्रूप होता म्हणून नव्हे तर चवीनेही अप्रूप होती. मी लकीच्या मधल्या हाॅलमध्ये गोल टेबलाच्या खुर्चीवर बसून ती मागवत असे. किंचित लिंबू पिळलेले, एक दोन कढीलिंबाची पाने सहजरीत्या कुठेतरी तिरपी पडलेली. कोथिंबिरीची पाने त्यांना लाजून आणखीनच आकसून काही फोडींना बिलगून बसलेली, अंगावर एखादा दागिना हवा म्हणून एक दोन मोहरीचे मणि बटाट्यांच्या फोडींना नटवत.केशरी पिवळ्या तेलाचा ओघळ प्लेटचा एखादा कोन, भाजी ‘अधिक ती देखणी’ करायचा. साखरेचे एक दोन कण मधूनच चमकायचे. लकीतली बटाट्याची भाजी शब्दश: चवी चवीने खाण्यासारखी असायची.भाजी संपत येई तसे शेवटचे दोन घास घोळवून घोळवून खायचो! आता पुन्हा कधी खायला मिळेल ह्याची शाश्वती नसल्यासारखी ते दोन घास खात असे. नंतर कळले की मीच नाही तर जे जे लकीची बटाट्याची भाजी मागवत ते ह्याच भरल्या गळ्याने,भावनाविवश होऊन खात असत. प्रत्येक वेळी!


एकमेव ‘लकीचे’ वैशिष्ठ्य नसेल पण तिथे चकल्याही मिळत. कांड्या झालेल्या असत. पण चहा बरोबर ब्रेड बटर खाणाऱ्यांसारखेच चहा आणि लकीची खुसखुशीत चकली खाणारे त्याहून जास्त असत. तशाच शंकरपाळ्याही. घरच्या शंकरपाळ्यांच्या आकारात नसतील पण हल्ली बरेच वेळा घट्ट चौकोन मिळतात तशा नव्हत्या. चौकोन होते पण डालडाने घट्ट झालेले नसत.


घरीही सणासुदीला श्रीखंड,बासुंदी, पाकातल्या पुऱ्यांचा बेत असला की बटाट्याची भाजी व्हायचीच. तीही लकीच्याच नजाकतीची किंवा त्याहून जास्त चविष्ट असेल. मुख्य पक्वान्ना इतक्याच आदबीने व मानाने बटाट्याची भाजी वाढली जायची. तितक्याच आत्मीयतेने पुरी दुमडून ती खाल्लीही जायची. लगेच श्रीखंडाचा घास किंवा बासुंदीत बुडलेल्या पुरीचा घास. बटाट्याच्या भाजीचे अप्रुप इतके की लहान मुलगाही तिला नको म्हणत नसे की पानात टाकत नसे.


लकी चौक, सुभाष चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. बटाट्याची भाजी बारमाही झाली. सणासुदीचा वेगळेपणा तिला राहिला नाही. तिने दुसरी रूपेही घेतली. ती सार्वत्रिक झाली. चवीचेही वेगळेपण विसरून गेली. आजही सणवार होतात. सवयीने बटाट्याची भाजी त्या दिवशीही होते. सुंदर होत असेल पण दिसत नाही. चविष्टही असेल पण तशी ती जाणवत नाही. अप्रूपतेची उतरती भाजणी म्हणायचे!

आजही बटाट्याची भाजी आहे. पण लकी नाही. बटाट्याची भाजी दैनिक झाली. सवयीची झाली. अप्रूपता राहिली नाही.


अर्थशास्त्रातल्या घटत्या उपयोगितेचा किंवा उपभोक्ततेचा नियम आमच्या टेकडीवरच्या दाट वृक्षराजीत लपलेल्या, रात्री आकाशातून तारे चांदण्या ओंजळी भरभरून घ्याव्यात इतके ‘नभ खाली उतरु आले’ अशा स्वप्नवत गावाची अप्रूपता घटली तर बटाट्याच्या भाजीचीही अप्रुपता आळणी व्हावी ह्यात काय नवल!
हाच आयुष्यातील Law of Diminishing Joy असावा!

पहिले पाढे

प्रत्येक पहिली गोष्ट रोमांचक असते. अविस्मरणीय असते. शाळेचा पहिला दिवसही विसरु म्हणता विसरला जात नाही. तशीच पहिली शाळासुद्धा आपण विसरत नाही. त्यातही ती मुन्शीपाल्टीची असली तर विचारुच नका. काळ्या दगडावरच्या रेघेसारखी तहहयात ती आपल्या बरोबर असते.

आमच्या शाळेचे नाव पाच नंबरची शाळा. शाळा अकरा वाजता सुरू व्हायची. मधल्या सुट्टीपर्यंत थोडे फार शिक्षण होई. बेरजा, वजाबाकी, मराठीच्या पुस्तकातील धडा. शुद्धलेखन; मग पुन्हा मास्तर बेरजेची कधी वजाबाकीची गणिते घालायचे. सोडवून झाली की “तोंडे फिरवून पाटी पालथी टाका ” ही बसल्या जागी कवायत करायची. लवकर पाटी पालथी टाकणारी दोनच प्रकारची पोरं होती. हुशार आणि ढ. बाकीची सगळी डाव्या हाताची बोटं मुडपून मुडपून ती तुटेपर्यंत कशाची मोजदाद करत ते अजूनही मला आणि त्यांनाही समजले नाही. कधी भेटलेच ते तर ह्या बोटे दुमडण्याच्या आठवणीतच भेट संपते! पाटी पुन्हा पुन्हा पुसण्यात, पाणी किंवा ओले फडके चाळीस पोरांत एक दोघांकडेच असायचे. ते कशाला देतील दुसऱ्याला. मग बोटे जिभेवरून फिरवून किंवा पाटी तोंडाजवळ नेऊन चक्क पटकन थुंकी लावून पुसायची.

ह्या कर्मकांडांत ही मधली पोरे व्यग्र असत. तोपर्यंत मास्तर शेजारच्या वर्गातील मास्तरांशी सुपारीच्या खांडाची किंवा एकाच पानाच्या विड्याची देवाण घेवाण करत. तोपर्यंत सगळी पोरे तोंडे फिरवून पाट्या पालथ्या टाकून आपापासात सुरवातीला हळू, मग भीड चेपली की ‘अबे!काय बे’ची द्वंद्व युद्धे सुरू व्हायची. त्याची “ आता तुला मधल्या सुट्टीत बघतो! तू बघच बे” ह्याने सांगता व्हायची. मधल्या सुट्टीत तरटाच्या रस्साीखेची झाल्या की मग भांडणाला सुरुवात व्हायची. त्याचीही सांगता “शाळा सुटल्यावर कुठं जाशील बे?” मंग बघ; न्हाई दाताड मोडलं तर ..” ह्या वीररसाच्या संवादाने व्हायची. शाळा सुटल्यावर त्या दोघा चौघांचे दोस्त मिळून दहा बारांची जुंपायची. जास्त करून शाब्दिक किंवा फार तर ढकला ढकलीने जुंपायची. “ अबे जातो कुठं बे तू?आं? उद्या शाळेत येशीलच की साल्या! मग बघ काय होतं त्ये!” हे भरतवाक्य होऊन दिवसभराच्या शाळेवर पडदा पडायचा. ही त्यावेळची त्रिकाळ संध्या होती! तिन्ही वेळेला सौम्य ते किंचित तिखट फुल्यांचा मारा होत असे. पण त्यामुळे तिन्ही खेळातील संवाद खटकेबाज आणि चटकदार होत. ह्या तिन्ही युद्धात माझ्या सारख्याची भूमिका दिग्दर्शकाची किंवा साऊंड इफेक्ट वाढवायची होती.

ह्या चकमकी, लढायांची कारणेही महत्वाची असत. कुणी कुणाची शाईची दौत सांडली- तीही दप्तर किंवा चड्डीवर – मग तर विचारूच नका-हे म्हणजे महायुद्धाचे कारण होते- कोणी कुणाची पाटीवरची पेन्सिल तोडली, तोडून तुकडा घेतला, कुण्या तत्वनिष्ठाने म्हणजे खडूसने सोडवलेली वजाबाकी दाखवली नाही. ही ह्या दैनिक लढायांची कारणे असत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोडवलेली बेरीज कुणी कुणाला दाखवलीच पाहिजे अशी सक्ती नव्हती. ते कायमच्या तहातील एक कलम होते!

मधली सुट्टी संपली की मास्तरांसकट पोरेसुद्धा जरा आळसावल्यासारखी होत. पुजारी मास्तरांची एक डुलकी झाल्यावर मला पाणी आणायला सांगत. आव्वाचे घर समोरच होते. तेव्हढ्या वेळात मी आणखी स्वत:चा वेळ घ्यायचो. पाण्याचा तांब्या, वर तिरक्या टोपीसारखा ठेवलेल्या पेल्यासह, आणून मास्तरांना दिल्यावर सगळी पोरे रोज क्षणभर -क्षणभरच- मला दबून असत. मास्तरांचे पुन्हा शेजारच्या वर्गातील मोरे किंवा पवार मास्तरांच्या बरोबर जलपान आणि सुपारीच्या खांडांची अदलाबदल झाली की पुजारी मास्तर गोष्ट सांगत. झकास सांगत. ती झाली की मग शहराच्या भूगोलाचा धडा. तो लवकर आटपायचा. मग पाढे म्हणायला सुरुवात. पहिल्यांदा मास्तर “बें एकें बें” ह्या नांदीने सुरुवात करीत. त्यांच्या मागोमाग चाळीस पोरे आपापल्या स्वतंत्र गायकीत म्हणत. असे तीन चार पाढे झाले की शाळेत पुन्हा जीव यायचा. कारण कमी जास्त प्रमाणात साथीच्या रोगाप्रमाणे बहुतेक वर्गांत पाढे सुरू झालेले असत.

पाढे म्हणणे सोपे नाही.एक मुलगा बेचा पाढा म्हणतांना ‘ बे एके बेअे’ इतके सफाईने व झटक्यात म्हणायचा की त्याच्या पुढचा मुलगा ‘तीन एके तीऽनं’ची मनात सुरुवातही करायचा. पण बे दुणे आले की हा पुन्हा क्षणभराने ‘बे दोनी’ निराळ्या आवाजात म्हणायचा. असे हे ‘बे दोनी’ तीन वेळा झाले की मग हा निराळा सुर लावून पुन्हा ‘ बे दोन्ही’ निराळ्या ढंगाने म्हणू लागायचा. त्याच्या पुढचा मुलाच्या मनातल्या मनातले ‘तीन एकं तीनं’ कधीच थांबले असत. ह्या ‘बे दोनी’ कडे सगळा वर्ग आनंदाने तल्लीन होऊन पाहात,ऐकत राही. मास्तर मात्र “अरे पुढे” पुढे काय?” असे टेबलावर छडी आपटत विचारायचे. पण ह्याची निरनिराळ्या ढंगाने,अंगाने अर्धा तास “बाबुल मोरा”म्हणणाऱ्या कुण्या बडे खाॅंसारखे ‘ बे दुणे,बे दोनी,बे दोन्ही’ चालूच राही! पुजारी मास्तर झाले तरी त्यांच्या सहनशक्तीलाही मर्यादा होतीच की. ते पुढच्या मुलाला म्हणायचे “हां, तू म्हण रे पुढे ; “बे दोनी? “ हा भाऊ त्याच्या तीनच्या पाढ्यात गुंग झालेला. तो सहज म्हणू लागला,”बे दोनी साहा!” बे त्रिक नऊ “ फटकन छडी बसली तेव्हा पुढचे ‘बे चोक बारा’ कळवळण्यातच विरून जायचे.

रोज असे व्हायचे. त्यामुळे काही दिवस आमच्या वर्गाला कविता ओरडायला मिळाल्या नाहीत. तेव्हा लच्छ्या शिंदेनीच सांगितले,”मास्तर त्या तोतऱ्याला शेवटी ठेवा. म्हणजे नंतर आम्हाला कविता तरी म्हणता येतील.” मास्तरांनाही पटले.

काही वेळा संपूर्ण वर्गाला एकसाथ पाढे म्हणायला लावत मास्तर. हे बऱ्याच जणांना फायद्याचे होते. काहीजणांच्या दुधात ह्यांचे पाणी बेमालूम मिसळून जाई. त्यातही एक लई खारबेळं होतं. कुठलाही पाढा असला तरी हा नेहमी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव करत पंच्याण्णव पासून घाई करत ‘धावर पूज्य शंऽऽभर “ म्हणत मांडी ठोकायचा. पुढच्या वर्गात गेला की “धा एक्के धा करत ‘धाही धाही शंभर” हाच पाढा घाई घाईत म्हणायचा. त्याही पुढच्या वर्गात पुन्हा हा “वीसेके वीस” करीत वीस धाय दोनशे” म्हणत उडी मारायचा. त्याने असे “ तीस धाय तीनशे” पर्यंत मजल मारली होती! ह्यानेच पुढे “पाढे मेड ईझी” हे पुस्तक लिहिले! का लिहिले तर तो नंतर खरंच एका लघु उद्योगाचा का होईना मालक झाला होता.

आमच्या पाढ्यांची आणखीन एक खासीयत होती.सुरुवातीला सगळी मुले “एक्कोण चाळीस, एक्कूण चाळीस पर्यंत व्यवस्थित म्हणत. पण एके चाळीस ची गणती सुरू झाली की सगळा वर्ग ‘एकेचाळ’ , बेऽचाळ… , स्हेचाळ,… अठ्ठेचाळ असेच म्हणत. मग त्यात शिंदे, कोठे,जाधव, रशीदसह पट्या,गुंड्या,उंड्या,सोहनी,सावकार, देशपांडे हे सुद्धा आले!

शेवटच्या तासाला खरी शाळा सुरु होई! सगळ्या गावाला समजे की इथे शाळा भरते. कारण कविता म्हणायला सुरुवात झालेली असे. “पाखरांची शाळा भरे …” ही कविता वर्गाला असो नसो पण कुठलेही दोन तीन वर्ग ह्या कवितेतच हमखास ओरडत असत. त्यानंतर दुसरी हिट कविता म्हणजे “धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे!”

कविता म्हणायला सगळी मुले एका पायावर तयार असत. एरव्ही मुकी बहिरी असणारी मुलेही कवितेच्या आवाजात आपला आवाज बिनदिक्कत मिसळत. मोर्चा, मिरवणुकीत भित्राही शूर होतो त्याप्रमाणे ही मुखदुबळी मुलेही कवि होत काव्यगायन करू लागायचे. बरं, चाल एकच असली तरी म्हणणारा ‘आयडाॅल’ आपल्या पट्टीत थाटात म्हणणार. त्यामुळे ‘धरू नका ही बरे’ ह्या ओळीपासूनच कुणाच्या गळ्यामानेच्या तर कुणाच्या कानशीलापासल्या शिरा फुगलेल्या असत! निरनिराळ्या वर्गातून काही त्याच तर काही वेगळ्या कवितांचा कोलाहल ऐकू येत असे.

कवितेमुळे शाळेत निराळेच वारे भरले जायचे! शाळाही आताच भरल्यासारखी वाटायची. शाळा भरूच नये असे शाळेला जाताना वाटायचे. पण शाळा सुटूच नये असे फक्त ह्या शेवटच्या तासाला वाटायचे.

पाढ्यांवरून सुरवात झाली पण शेवट आम्ही ‘ पोरे भारी कवितेचा गोंगाट करी” ह्या ओळीच्या गोंगाटातच करावा म्हणतो !