एक लहानसे चढणे

मी बरेच दिवसांपासून जायचे जायचे म्हणत होतो त्याला आज शनिवारी मुहुर्त लागला. Twin Pines Park मध्ये फिरायला गेलो. घरा जवळ मोठ्या रहदारीच्या रस्त्याला लागून. सतीश म्हणालाच होता की trail फार लहान आहे. त्याचे म्हणणे खरे ठरले. ट्रेल अशी नाहीच. पण ज्येष्ठ वृक्षांची मांदियाळी मन शांत करते. निलगिरी,आणि पाईनची गगनाला भिडताहेत की काय असे वाटायला लावणारी रुंद धडाची झाडे पाहिली की आपण आपोआप गप्प होतो.

हे पार्क नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या व सभागृहाच्या इमारतींमधून शिल्लक राहिलेली जागा वाटते.
पण तिथे म्हाताऱ्या वयस्क नागरिकांसाठी सुसज्ज इमारत आहे. लोकांना लहान प्रमाणावर काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यासाठीही छोटीश्या दोन इमारती आहेत. एक कला दालन आहे. पार्क मध्ये पिकनिक साठी हिरवळ आहे. तर दोन वेगळ्या जागी मोठ्या शेडस व टेबलांना जोडलेली बाके आहेत. ह्या सर्व गोष्टीभोवती झाडांनी फेर धरलेला असतो! सतीशच्या घरामागील ओढा तिकडेच वाहात येत पुढे जातो. गेला आठवडा पावसाचा होता. त्यामुळे ओढाही थोडा ऐटीत खळाळीची शिटी वाजवत चालला होता.


पार्कमध्ये मोठ्या खडकांवर सुंदर पितळी पाट्यांवर गावातील ज्या लोकांनी नगरसेवक मेयर म्हणून बरीच वर्षे गावासाठी मोठी लोकोपयोगी कामे केली त्यांचा गौरवपर उल्लेखाच्या सन्मानदर्शक प्लेटस आहेत. अशाच एका मोठ्या खडकावर सैनिकांच्या स्मरणार्थ कोरलेले वचन माझ्या पक्के लक्षात राहिले. “All Gave Some. Some Gave All.”

सर्व पार्क मध्ये असतात तशी इथेही काही नागरिकांनी लोकांच्या सोयीसाठी सुंदर बाक वाटेवर ठेवले आहेत. राल्स्टन अॅव्हेन्यूच्या दोन्ही बाजूला उंच टेकड्या आहेत. त्यावर घरेही आहेत आणि भरपूर झाडीही आहे. तर पार्कही एका टेकडीच्या आधारानेच वसले आहे.


एका मोठ्या पिकनिक शेडच्या मागे उंच टेकडीची चढती पाठ आहे. तिच्यावर जायला शाळा काॅलेजच्या मुलांनीच एक दोन पायवाटा केल्या आहेत. आज गर्दी नव्हती. आई वडिलांबरोबर आलेली लहान मुले झोके घसरगुंड्या खेळत होती, तीन चार जोडपी व काही म्हातारे फिरत होती तिथल्या पार्कमध्ये.

मी विचार केला जावे टेकडीवर जेव्हढे जाता येईल तितके.पाऊस पडून गेलेला. खाली पडलेली साचलेली पाने; त्यात भर वरून वाहात आलेली काटक्या पानांची भर पडलेली.पण ही सर्व पावसाने दबलेली. पायवाट ओलसर. पण निघालो. हळू हळू चढत, थांबत वर जात होतो. एक वेळ वर जाईन पण उतरतांना घसरू नये म्हणजे झालं असं स्वत:ला सावध करत जात होतो. मध्ये मध्ये थांबत होतो.पुढे वर, मागे, आजूबाजूला व जिथून आलो तिकडे खाली पाहू लागलो. वर अजूनही झाडातून टेकडी दिसते आहे आणि खाली पाहिले तर ती शेड बाके स्पष्ट दिसत होती! हात्तिच्या! मला वाटत होते की मी पुष्कळ वर आलोय. पुन्हा चढू लागलो. समोर आता वरचे उन्ह दिसत होते. आणखी थोडा वर वर गेलो. टेकडी डोंगराचा माथा जवळच वाटत होता. तरी मीच नको म्हणालो.

आपल्यालाच खालीही उतरायचे आहे. घसरायचे नाही. त्यामुळे असल्या क्षुल्लक पराक्रमाचा मोह टाळून उतरायला सुरवात केली. म्हटले सतीश वगैरे सर्वांच्याबरोबर पुढच्या शनिवार रविवारी पुन्हा येऊ. सगळ्यांबरोबर वर चढून जाऊ. ‘जपून टाक पाऊल जरा’ असे पावलागणिक बजावत हळू हळू पण न घसरता ‘धोपट मार्गा’ न सोडता’ व्यवस्थित खाली आलो!

परत जायला निघालो तर हायस्कूलची वाटणारी चार मुले टेकडीवरच चालली होती. त्यांना विचारले तुम्ही ‘हिल’चढून जाता? टेकडी उतरून पलीकडेही जाता? दोन्ही प्रश्नांना ते होच म्हणाले. रोज जात असावेत.
गावातच, हमरस्त्याच्या बाजूलाच, सुंदर झाडीची हिरवळ असलेले व त्यात लहानशी का होईना trail असलेले निसर्गरम्य ठिकाण पाहिल्यावर मला सुधीरच्या गावातल्या YMC शेजारीच असलेल्या दाट झाडीतील मैल दीड मैलाची रम्य वाट आठवली.हे पार्क हम रस्त्याजवळ असूनही आत आलो की जगाचा संपर्क तुटतो!
मी पार्कमधे आल्यावर काही फोटो काढले.घरून पार्कमध्ये येताना Notredame uni. चे व घरी परत जाताना Ralston Ave चे फोटो घेतले.


मी इतके ड्रामेबाज वर्णन केले पण टेकडी फार तर ४००-५०० फुटापेक्षा थोडी कमी असेल! घराच्या पायऱ्या चढतानाही असावा बरोबर म्हणून झेंडा घेऊनच चढतो. चार पायऱ्यांचा जिना चढून गेलो की मी लगेच झेंडा घेऊन फोटो साठी शेरपा तेनझिंग सारखा उभा राहतो. त्यामुळे दीडदोनशे फूट का होईना टेकडी चढून गेलो;त्याचे एव्हढे नाटक खपून जाईल असे वाटले.त्याचे लिहिणेही केले! चला!एक लहानसे चढणे झाले.

अफाट लेखक – बल्झॅक

बेलमाॅन्ट

नेपोलियनचा फ्रान्स विजेत्याच्या विजेत्याच्या मस्तीत आणि जेत्याच्या रूबाबात राहात होता. नेपोलियनचा पाडाव झाल्यावरही युरोपवर त्याचा प्रभाव होता. त्याच्या नंतरच्या काळातील फ्रान्स कसा होता हे आपल्याला प्रख्यात फ्रेंच लेखक Honore de Balzac (१७९९-१८५०) च्या कथा कादंबऱ्या, कादंबरीका ह्यामधून समजते.

बल्झॅक हा हाडाचा लेखक होता.”कोणी चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता” असे बऱ्याच कीर्तिवंतांच्या बाबतीत वाचतो. बल्झॅक तोंडात लेखणी धरूनच जन्माला आला होता म्हणावे इतके लेखन त्याने केले आहे! एखाद्या फलंदाजाची षटकार आणि चौकार ठोकतच खेळणे हीच त्याची सहज फलंदाजी असते. त्याप्रमाणे बल्झॅकचा लिहिणे हाच त्याचा धर्म झाला होता.
इतके भरमसाठ लिहूनही त्याने आपला उच्च दर्जा कायम राखला. पॅरिस आणि पॅरिसमधील लोक ह्यांच्याविषयी त्याने लिहिले. लिहिताना त्याने कोणतीही गाळणी वापरली नाही.जसे दिसले जाणवले तसे लिहिले.त्यामुळे कादंबऱ्या कथा असल्या तरी त्याच्या साहित्यात वास्तवता आहे. त्यामुळे त्याला ह्या पद्धतीचा प्रणेता मानले जाते.

बल्झॅकचा जन्म १७९९ साली झाला. विसाव्या वर्षा पर्यंत वडिलांच्या ऐकण्यात असल्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे तो कायद्याचे शिक्षण घेऊ लागला.पण त्याला काही ते जमले नाही. त्यांने तो अभ्यास सोडला. वडिलांनी सांगितले काय शिकायचे असेल ते शिक पण पॅरिसमध्ये दिवस कसाबसा काढता येईल इतकेच पैसे पाठवता येतील असे कळवले. त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. त्यामुळे तो गरीबांना परवडेल अशा वस्तीत राहू लागला. बल्झॅक रोज “ दिसामाजी काही तरी लिहित” असे.त्याचा लिहिण्याचा झपाटाही जबरदस्त होता. दहा वर्षांत वीस कादंबऱ्या तरी नक्कीच लिहिल्या असतील.

काही वर्षांनी त्या कादंबऱ्या वाचल्यावर त्याला ह्या आपण लिहिल्या असे वाटले नाही. वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिलेली Choumans ही कादंबरी त्याला आपली वाटते. त्यानंतर तर तो वर्षाला तीन चार पुस्तके लिहित होता.आणि आयुष्याच्य अखेरपर्यंत तो ह्याच वेगाने लिहित होता. वर्षात तीन चार पुस्तके ! लिहिण्याच्या श्रमानेच तो मरण पावला असेल का हा प्रशन् पडतो.

बल्झॅक बायकांच्या बाबतीत फार रंगेल होता. स्त्रीसुखाचा भरपूर उपभोग घेत असे. बल्झॅक चर्चेचा विषय झाला नसता तरच नवल होते. त्याची दिनचर्याही अजब होती. फिरून आल्यावरसंध्याकाळी पाच सहा वाजता जेवायचा. मग एखाद्या मैत्रिणीला, बाईला घेऊन रात्र रंगवायचा. रात्री अकरा वाजेपर्यंत झोप काढायचा. बाईला जायला सांगायचा. आणि मग हा सारस्वत पुत्र लिहायला बसायचा. संपूर्ण रात्र लिहित असे. पण दिवस उजाडल्या नंतरही दुपारी तीन चारपर्यंत लिहित बसलेला असे! बल्झॅक रोज पंधरा सोळा तास लिहित असे. ह्या सोळा तासात त्यास काॅफीची सोबत असे. काॅफीच्या कपावर त्याची रोज सोळा तास लिहिण्याची तपश्चर्या चालत असे.

दुपारी चार वाजता बाहेर जायचा.सहा वाजता घरी आला की जेवण आणि मग…..पंधरा सोळा तास एक टाकी लिहित बसण्याचा हटयोग सुरू!

बल्झॅकला आता कादंबऱ्या नाटके लिहिण्यात रस नव्हता. त्याला माणसाविषयीच काही भरीव विशेष महाकाव्यासारखे काही लिहायचे होते चित्रकाराला अतिभव्य, विशाल चित्र रंगवायचे स्वप्न असते.तशी बल्झॅकला मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांचे; त्यातील नाट्याचे, संघर्षाचे,दिव्य दाहक आणि भव्य भयानक असे काही लिहायचे होते.नवरसांनाही मागे टाकेल असा आपल्या प्रतिभेचा ‘बल्झॅक’हा दहावा रस त्यात असेल अशी साहित्यिक कृति लिहायची होती ! प्रत्येक लेखकाचे आपण असे काही तरी लिहावे ही इच्छा असते. जगातील सर्व उत्कृष्ठ वाड.मय पाहिले तर आताच वर लिहिलेल्या “आपल्या प्रतिभेचा दहावा रस बल्झॅकचा” या वाक्यातील बल्झॅग च्या जागी त्या त्या ‘लेखका’चे नाव लिहावे लागेल!

बल्झॅगच्या मनात होते तितके भव्य दिव्य लिहिले गेले की नाही हे कोणी सांगू शकणार नाही. पण त्याने लिहिलेले La Comédie Humaine /Human Comedy हे त्याचे उत्कृष्ट पुस्तक मानले जाते.

मूळ फ्रेंच भाषेतील ला काॅमेडिए मध्ये नव्वद खंड आहेत. पण इंग्रजी प्रतिमध्ये संपादन करताना त्याचे चाळीस खंड केले आहेत. जाॅर्ज सेन्ट्सबरी ने इंग्रजीमध्ये भाषांतर व संपादित केलेली प्रत प्रमाण मानली जाते. बल्झॅकच्या ह्या ग्रंथात माणसाच्या आयुष्यात केवळ वयानुसार येणाऱ्या टप्प्यानुसारच नाही तर वास्तव्याचा परिसर, परिस्थिती अशा विविध टप्प्यानुसार भाग पाडले आहेत. त्यामध्ये लहान कादंबऱ्या येतात. काही भागांची नावे सांगायची तर Scenes of Private Life, Scenes of Provincial Life, Scenes of Paris Life ही सांगता येतील. पॅरिस लाईफ मधील Old Goriot ही कादंबरिका उत्कृष्ठ मानली जाते. ही वाचल्यावर बल्झॅकची लेखक म्हणून काय ताकद आहे ती समजते असे म्हटले जाते.

Old Goriot पॅरिसच्या गरीब वस्तीत घडते.मुख्य पाच पात्रे आहेत. खाणावळीची मालकीणबाई- मादाम व्हाॅकर, युजेन ड रॅस्टिनॅक – हा धडाडीचा तरुण, त्याच्या नात्यातील सुंदर व श्रीमंत बहिण मादाम डी बोझान्ट आणि स्वत: वृद्ध Goriot. रॅस्टिनॅक आणि वृद्ध Goriotगाॅरिओ ही दोन सगळ्यात महत्वाची पात्रे. गाॅरिओ श्रीमंत असतो. त्याच्या वैभवाला उतरती कळा लागली असते. त्यात त्याच्या दोन मुलींचा उच्च फॅशनेबल वर्तुळातील वावर हेही एक कारण असणार. गाॅरिओचे आपल्या मुलींवर खूप प्रेम असते. त्यामुळे त्यांच्यासाठी होणाऱ्या खर्चामुळेहीवत्याच्या व्यवसाय श्रीमंती बसत चाललेला असणार. तर युजनची प्रगतीची घोडदौड चालू असते. बल्झॅकने गोरिओच्या खालावत चाललेल्या परिस्थितीचे केलेले वर्णन वाचताना वाचकांच्या डोळ्यात पाणी उभे राहील तर रॅस्टिनॅकच् उत्कर्ष वाचक तितक्याच धडधडत्या छातीने उत्सुकतेने वाचत जातो.
कथानकात वाचक गुंगुन जातोच पण बल्झॅकने लेखकाच्या नजरेतून बारकाईने केलेले पॅरिसचे वर्णनही वाचक विसरु शकत नाही. ते वाचताना डिकन्सप्रेमी वाचकाना चार्ल्स डिकन्सची नक्कीच आठवण येईल. त्यानेही जगभरच्या वाचकांना आपल्या पुस्तकातून लंडनमध्ये इतके फिरवले आहे की तेही डिक्सनच्या व्यक्तीरेखांबरोबर लंडनचे रहिवासी होतात! डिकन्सची पुस्तके वाचलेला रसिक लंडनला गेला तर त्याच्या पुस्तकातल्या लंडनचे रस्ते,गल्ली,बोळ चुकणार नाही.स्वत: इतकेच डिकन्स वाचकाला त्याच्या लंडनशी एकजीव करतो.

पण चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यातून संपूर्ण इंग्लंडचे दरशन होत नाही. लंडनमधील वरच्या वर्गाचे वर्णन डिकन्सला नीट जमले नाही. त्याने त्यांचे खरे चित्रण केले नाही. डिकन्स हा लंडनचा चरित्रकार तर बल्झॅक हा पॅरिसचा चरित्रकार म्हणता येईल. बल्झॅकला सर्व थरातील पॅरिस माहित होते. गरीब कनिष्ठांचे पॅरिस. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गाचे पॅरिस ह्या सर्वांची त्याला चांगलीच ओळख होती. ह्या सर्व थरांतील लोकांच्या जगण्यावर परस्परांचा होणारा परिणाम व प्रभाव कसा पडतो हे बल्झॅकने अनुभवले होते. सर्व थरांत होणारे चढ उतार, एका थरातून दुसऱ्या अशी वर खाली होणारी स्थित्यंतरे तो पाहात होता. हे उत्कर्ष आणि अपकर्ष त्याने आपल्या कादंबऱ्यातून हुबेहुब वर्णन केले आहेत. जसे डिकन्सला लंडनच्या वरिष्ठ वर्गाचे चित्रण यथार्थपणे करता आले नाही त्याच्या नेमके उलट बल्झॅकला बकाल गरीब पॅरिसचे चित्रण तेव्हढे नीट रंगवता आले नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे सामाजिक पायऱ्यांवर त्यांची स्थित्यंतरे डिकन्सपेक्षा बल्झॅकने उत्कृष्ठ केली आहेत.

शेवटी विचार करता ह्या भेदांना फारसा अर्थ राहात नाही. ह्या दोन्ही नामवंत लेखकांना लोकांविषयी जी जवळीक होती तीच महत्वाची ठरली. हे लोकांचे लेखक होते. त्या काळची लंडन व पॅरिस ही दोन मोठी शहरे होती. त्यांचा वेग उर्जा, चैतन्य व धडपड हे सर्व ह्या दोन महान लेखकांच्या साहित्यातही दिसते. त्यांच्या कथानकांच्या वेगात आपणही वाहात जातो. पण वाचक बल्झॅकच्या कथा कादंबऱ्यातून जास्त वेगाने पुढे जातो!

फ्रान्सिस बेकन – तत्वज्ञानी, मुत्सद्दी, वैज्ञानिक,विद्वान

पैसा सर्वस्व नाही पण पैशाशिवाय सर्व अडते. साठलेले पाणी आणि साठलेला पैसा दोन्हीही फार काळ उपयोगी पडत नाहीत. संपत्ती विषयी असे बरेच काही आपण वाचलेले असते. पण सोळाव्या शतकातील एका राजकारणी,मुत्सद्दी,आणि विद्वानाचे पैशाच्या बाबतीतले व्यवहार्य मत आजही लक्षात ठेवण्यासारखे आहे.तो आपल्या Of Seditions and Trouble निबंधात लिहितो,”Money is like muck(manure), not good except it be spread.” हे वाचकांना सांगणारा विद्वान म्हणजे लाॅर्ड फ्रान्सिस बेकन !

फ्रान्सिस बेकनचा जन्म १५६१ साली लंडनमध्ये झाला. राजदरबाराशी निगडीत असलेल्या उच्च घराण्यात झाला. फ्रान्सिस बेकनचे वडिल सर निकोलस बेकन हे होत. पहिल्या एलिझाबेथ राणीचे ते Lord Keeper होते. हे पद मोठ्या अधिकाराचे व जबाबदारीचे होते. राणीची सरकारी आज्ञा,हुकूम,संमती,कायदे अशा महत्वाच्या कागदपत्रांवर उमटवण्याची ‘राजमुद्रा’ ह्याच्या ताब्यात व अखत्यारित असे. ती कागदपत्रे कायदेशीर व अधिकृत करण्याचा त्याला अधिकार होता. ह्याच पदाचे विलीनीकरण लाॅर्ड चॅन्सेलरमध्ये झाले. हा काही काळ पार्लमेंटचा सभापतीही असे. न्यायखात्याचे सेक्रेटरीही ह्याच्याच अंतर्गत होते. कॅबिनेट मंत्रिपदही असे. थोडक्यात फ्रान्सिस बेकनला बाळपणापासून अनुकुल परिस्थिती होती.

फ्रान्सिस बेकनने कायद्याचे शिक्षण पुरे केल्यावर तो इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आला. तिथे त्याचा आणि अर्ल आॅफ इसेक्स Essexचा संबंध आला. बेकनला त्याच्या कामात वरच्या आणि त्याही वरच्या पदांवर जाण्यासाठी ह्या अर्लने खूप प्रयत्न आणि मदत केली. कारण अर्ल राणीच्या निकटवर्तियांमधील महत्वाचा माणूस होता.

त्यानंतर आलेल्या पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत फ्रान्सिस बेकनच्या कर्तृत्वाचा तारा तेजाने तळपू लागला.
हल्लीच्या पदाचे नाव वापरून सांगायचे तर साॅलिसिटर जनरल पदापासून तो लाॅर्ड चॅन्सलर ह्या मोठ्या अधिकारपदा पर्यंत पोहचला. पण दुर्दैवाने त्याच्या सोनेरी कारकीर्दीला ग्रहण लागले. इ.स.१६२१ मध्ये असे काही घडले की त्यामुळे फ्रान्सिस बेकनने पार्लमेंट,राजकारण उच्च पदांचा त्याग करून त्याने आपले पुढील सर्व आयुष्य लिहिण्यात घालवले.

बेकनवर लाच घेतल्याचा आरोप आला. चौकशी झाली. त्याने आपण लाच घेतल्याचे कबूल केले.लाॅर्ड आॅफ बकिंगहॅमला बदनामीपासून वाचवण्यासाठी बेकनला ह्यामध्ये पद्धतशीरपणे गोवले गेले. त्याला बळीचा बकरा केला गेला असे काही इतिहासकारांचे मत आहे. काही असो पण बेकनची चाळीस वर्षांची गौरवास्पद राजकीय कारकीर्द संपली हे खरे. फ्रान्सिस बेकन, बॅराॅन व्हेरुलेम व्हायकाउन्ट सेंट अल्बन्स…लाॅर्ड बेकन; पण अधिकृतरीत्या लाॅर्ड सेन्ट अल्बन्स, लाॅर्ड चॅन्सलर फ्रान्सिस बेकन इतकी मानाची बिरुदे किताब पदव्या असणारा उच्च अधिकारपदे भूषविणारा बेकन राजकारणाच्या धकाधकीतून आणि राज्यकारभारातून बाहेर पडला. त्याच्या लाॅर्ड, सर,अर्ल ह्या भूषणावह पदव्यांचे लोकांच्या लेखी महत्व नव्हते. ह्याचे कारण त्याच्या विद्वत्तेमुळे व त्याने लिहिलेल्या ग्रंथांतील ज्ञान आणि विचार ह्यामुळे तो आजही आदरपुर्वक फ्रान्सिस बेकन अशा साध्या नावानेच ओळखला जातो. त्याने मागे ठेवलेला वैचारिक वारसा पाहिला की बेकनने लाच घेतली हे एका अर्थी बरेच झाले असे वाटते.

राजाच्या मर्जीतला असल्यामुळे त्याला तुरुंगवास वगैरे काही घडला नाही. बेकनचा एक गुण उठून दिसतो. ज्यांनी त्याला मदत केली आपला म्हटले त्यांच्याशी तो प्रामाणिक राहिला.भावनात्मकतेने नव्हे तर त्याच्या विचारपूर्वक बनलेल्या मतांमुळेही असेल. कारण आपल्याला बेकनच्या कारकिर्दीची, त्याने लिहिलेल्या पुस्तकांची खूप माहिती मिळते पण त्याच्या हृदयातील मनांतील भावभावनांविषयी फारशी माहिती मिळत नाही.

बेकनने लिहिलेल्या ग्रंथांतून मांडलेल्या विचारांमुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली हे निर्विवाद सत्य आहे. अधिकारपदावरून खाली आल्यावर बेकनने त्याचा मित्र पंतप्रधान बर्ली ह्याला एक पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिलेले एक वाक्य आपले लक्ष निश्चित वेधून घेते. ह्यानंतर बेकन आपण काय करणार आहोत हे स्पष्ट करताना म्हणतो, “I have taken all knowledge to be my province.” पूर्वीपासून चालू असलेल्या त्याच्या अभ्यासाची, विचारांची झेप व बुद्धीचा प्रचंड आवाका ह्यामधून व्यक्त होतो. अर्थातच इथे All Knowledge ह्या शब्दांतील Knowledge ह्या शब्दावर जास्त भर आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

वाड.मय त्यातील सर्व प्रकार, धर्म, व्यवहारातील अनुभवांवर आधारीत ज्ञान, ह्यांचा समावेश बेकनने ज्ञानात केला नाही.त्याचा भर विज्ञानावर आहे. ह्यामध्येही अर्थातच ज्ञानाचे अनेक विषय येतात.त्यात Logic ही येते.समस्त निसर्गसृष्टी येते. म्हणजे विज्ञान येते.

बेकनने आपल्या ज्ञान साम्राज्याचे,त्यावर वेळोवेळी झालेले, होणाऱ्या हल्ल्यांपासून(विरोधी मते,टीका) त्याचे रक्षण करणारी स्वत:ची बाजूही त्यामध्ये मांडली आहे. त्याने वरील पत्रात व्यक्त केलेल्या All Knowledge संबंधात त्याने पुस्तक लिहिले आहे. दुर्दैवाने तो ते पुरे करू शकला नाही. त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर, त्या विषयाचा अफाट आवाका पाहिल्यावर हे एका माणसाचे काम नाही ह्याची खात्री पटते.बेकनच्या ह्या पुस्तकाचे नाव आहे Great Instauration , म्हणजे महान पुनर्बांधणी, पुनर्रचना. ह्या पुस्तकात बरेच विभाग आहेत.

पहिला भाग विषयाची ओळख करून देणारा आहे. ह्याची पाने थोडीच आहेत. “ती वाचताना आपण आपला श्वास रोखून वाचू इतक्या अप्रतिम व ओघवत्या शैलीत बेकनने लिहिले आहे. ती वाचताना शब्दांचे सौदर्य व सामर्थ्य काय असते ते बेकन आपल्या शब्दांतून प्रकट करतो!” असे चार्ल्स व्हान डाॅरेन सारख्या बऱ्याच विद्वान समीक्षकांचे आणि श्रेष्ठ वाचकांचे मत आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग Novum Organon अथवा Modern Logic असा आहे.आणि त्यानंतर येतो Advancement Of Learning हा भाग. त्यामध्ये निरनिराळ्या शास्त्रांचे, मनुष्याच्या बुद्धीच्या, आकलनशक्तीच्या आधारे वर्णन केले आहे. त्यानंतर बरीच प्रकरणे आहेत. त्यामध्ये तत्वज्ञानाला व विज्ञानाला जे प्रश्न पडतात किंवा सोडवायचे आहेत त्यांची चर्चा आहे. ही प्रकरणे, आणि बेकनचे इतर लेखन पाहिले तरी बेकनने काय करायचे योजले होते किंवा मानवजातीनेच काय केले पाहिजे त्याचा अंदाज येतो.

ह्यामध्ये New Logic आणि The Advancement of Learning हे दोन भाग विशेष वाचनीय आहेत.
नोव्हम आॅर्गॅनान मध्ये त्याने मनातील भ्रामक कल्पनांना, चुकीच्या समजुतींना,तर्कबुद्धीचा आधार नसलेल्या कल्पनां-विचारांना Idol म्हटले आहे.ह्यावर त्याने जे विश्लेषण केले आहे ते आजही मानले जाते. Idolविषयी लिहिताना तो म्हणतो की एखादी वस्तु काय आहे , कशी आहे, तिचे वेगवेगळे पैलू हे वस्तुनिष्ठपणे जाणून घेण्यात आपल्या मनातील असलेल्या पूर्व कल्पना किंवा त्यांच्यावर बुद्धीपेक्षा इतर बाबींचा प्रभाव(पूर्वसमजुती,ऐकीव माहिती इत्यादि) अडथळा आणतात.समाजमनावरही ह्यांचा मोठा प्रभाव असतो.माणसाचा कल त्याचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे असतो. त्याला जे दिसावेसे वाटते तेच तो पाहात असतो.निसर्गातही त्याला तीच ती नियमितता नित्य असावी असे वाटत असते. त्याला फारसा कशातही बदल नको असतो. आपल्या अनुभवांचे विश्लेषण विवेकबुद्धी, तटस्थ विचारांच्या आधारे करण्यापेक्षा दिसते,वाटते तेच खरे मानण्याचे तो पत्करत असतो.

सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान करून घेणे अवघड आहे पण अशक्य नाही हे बेकनला माहित होते. पण ह्यातूनही निसर्गावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे असे तो म्हणतो. त्यासाठी निसर्गाचे नियम पाळून त्याच्या कलाने घेत आपल्याला ते करता येईल. ज्ञान मिळविण्यासाठी त्याने प्रयोग, वस्तूंत अंतर्बाह्य होणाऱ्या क्रिया,प्रक्रिया, प्रतिक्रिया ह्यांच्या अभ्यासावर त्याचा भर होता. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी।हे नवमत लोका कळवु द्या’ इतक्या स्पष्टपणे म्हटले नाही तरी त्याने जे लिहिले त्याचा आशय हाच होता.वर सांगितलेल्या पायऱ्यांनी, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून, का व कसे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत असे त्याचे म्हणणे होते. आलेली उत्तरे व निष्कर्षही कसोटीला लावून,म्हणजे त्यांचा वापर करून पाहावा ह्या मताचा त्याने पुरस्कार केला.
हे सांगत असतानाच, बेकन म्हणतो हे सगळे करणे,होणे शक्य आहे पण माणूस समजून घेणे हे त्याहूनही अवघड आहे हे सत्यही तो सांगतो.

पण बेकन माणसाला समजून घेण्याचे ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नातही बराच यशस्वी ठरला आहे. बेकनला माणसाविषयी झालेले ज्ञान त्याने आपल्या प्रख्यात Essays मध्ये मांडले आहे. बेकनच्या इतर पुस्तकांपेक्षा Essays जास्त वाचले जातात. Essays च्या प्रारंभी तो स्वत:च म्हणतो त्याप्रमाणे त्याचे निबंध “Would come home to men’s business and bosoms.” सर्वांना उपयोगी आणि आपलेवाटतात ! बेकनच्या ह्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात थोडक्याच शब्दांत खूप अर्थपूर्ण आशय सांगणाऱ्या वाक्यांची मेजवानी आहे. त्याला काय म्हणायचे आहे त्याचे सार अशा वाक्यांतून येते. ह्या वचन सदृश वाक्यांतून बेकनचा मानवी स्वभावाचा आणि पदार्थांचा अभ्यास किती होता हे दिसून येते. बेकनच्या Essays मधील अशी अनेक वचने उदघृतांच्या पुष्कळ पुस्तकांत आढळतील.

The Truth ह्या निबंधातील सत्यासंबंधात बेकन म्हणतो,” A mixture of a lie doth ever add a pleasure!”ह्यातील गंमतीचा स्वाद घेतल्यानंतर,माणसाला अति शुद्ध प्राणवायु पेक्षा तो निवळलेला प्राणवायु श्वास घ्यायला सोपा जातो ते का हेही पटते! तसेच ” Revenge is a kind of wild justice!” हे वाचल्यावर बेकनच्या ह्या निबंधातून सत्य किती व कसे व्यक्त होते ह्याची कल्पना येईल.

Of Marriage and Single Life ह्या निबंधाची -“He that has wife and children hath given hostages to fortune; for they are impediments to great enterprises, either of virtue or mischief.”- ही सुरुवात वाचल्यावरच निबंध पुढे वाचावासा का वाटणार नाही? प्रेमाच्या सागरात डुंबत असलेले दोघे अतिशयोक्तीच्या लाटांवरच खेळत असतात हा बहुतेकांचा अनुभव आहे. कविता, हिंदी सिनेमातील गाण्यांतून, ‘तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणेन’ अशा ओळीतून तर अतिशयोक्तीचा सुखद अनुभव नेहमी येतोअाणि अतिशयोक्ति किंवा अवाच्या सवा बोलणे हे तेव्हढ्यापुरते ठीक आहे हे आपण जाणून असतो. बेकन म्हणतो “The Speaking in a perpetual hyperbole is comely in nothing but love.” हे वाचून आपणही संमती देत हसतो.

एक वेळ नाविन्याचा ध्यास नाही घेतला तरी चालेल पण निदान नविन ते माणसाने स्वीकारावे हे बेकनचे मत होते. तो स्वत: नविन होणाऱ्या बदलांना सामोरा जात असे. कोणत्याही काळात बदल, नविन विचार-वस्तु-शोध ह्यांना विरोध होत असतो. हे प्रत्येक काळात होणे चालूच असते. पण ‘नाविन्या’ला जे सामोरे जात नाहीत त्यांना सावध करण्यासाठी बेकन भाकित केल्याप्रमाणे इशारा देताना म्हणतो,”He that will not apply new remedies must expect new evils; for time is the greatest innovator.”

तो पुढे आपल्या “OF Beauty” मध्ये सौदर्यातील सत्य कशात आहे ते साध्या शब्दांत किती सुंदर करतो! वाचा, “ Virtue is like a rich stone, best plain set.”

बेकनच्याच एका सुगंधी फुला इतक्या सुंदर आणि पिकलेल्या फळासारख्या मधुर वचनाने लेखाचा शेवट करतो.”God Almighty first planted a garden, it is the purest of known pleasures.”

भक्त जोगा परमानंद

बेलमाॅन्ट

भक्त जसा परिपक्व होत जातो तशी त्याच्यामध्ये शांती क्षमा येऊनि पाही। अखंड वसती त्याचे हृदयी।हे गुण वास करू लागतात. हे सत्वगुणच आहेत पण बरेच वेळा भक्त त्याचबरोबर आपल्या भगवंतावरच्या प्रेमाला, शरीराला पराकोटीचे क्लेश देऊन त्याची भक्ती निष्ठा सिद्ध करण्याचेहीप्रयत्न करतो. पण तसे करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे भक्त आपल्यातील विवेक ह्या गुणाला विसरला का असा विठ्ठलालाही प्रश्न पडतो. पांडुरंग, स्वत:लाच विचारल्यासारखे,भक्ताला म्हणतो,” एव्हढे का मांडिले निर्वाण। काहीच नसता अन्याय जाण। केले देहासी दंडण।।” पण तरीही भक्त स्वत:ला बजावत असतो की माझी दैवतावरील निष्ठा ही केव्हाही शंभर टक्के असली पाहिजे. नव्हे ही त्याची नेहमीच तीव्र इच्छा असते. ह्यासाठी प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही तो पर्वा करत नाही. कारण माझा विठोबा मला ‘कसा मोकलील’हा त्याचा ठाम विश्वास असतो.

भक्तांच्या कथा ऐकण्यातही पुष्कळ पुण्य आहे.तीही भक्तीच आहे.श्रवण,भजन, कीर्तनआणि पठण हे भक्तीमध्ये अंतर्भूत आहेत. सामान्याप्रमाणेच साधकालाही हरीकथा ऐकणे जितके लाभदायक आहे तितकेच पुण्यवान भक्तांच्या कथा ऐकण्यातही आहे असे शंकर पार्वतीला सांगतात. ते काय म्हणतात ते आपण संतकवि महिपती बुवांच्या शब्दांतून ऐकू या.

शुद्ध सत्वगुण तोही।येत लवलाही निजप्रति।।……।सकळ दु:खांचे होय दहन।…….. वर्णिता गुण हरि कीर्तनी।। ऐसा अंतरी देखोनि नेम। मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम। आपुले भजनी देऊनि प्रेम।। ऐसी भक्तकथेची गोडी थोरी। पार्वतीस सांगे त्रिपुरारी।।

भक्तकथा ऐकण्याने किंवा हरिकथा ऐकण्याने थोड्याच दिवसांत किंवा थोडक्या काळातच काही रोकडा (प्रत्यक्ष)फायदा होतो असे नाही. पण हळू हळू सद्भावनेचा उदय होऊन वाढ होते.असा हा अल्प सत्वगुण थोडा फार मुरला तरी त्याची जोपासना होऊ लागते. हया अप्रत्यक्ष फायद्यातून रोजच्या जीवनात कळत न कळत जे सुखाचे आनंदाचे क्षण येतात ते जास्त काळ टिकू लागतात.
भगवंताची एकनिष्ठेने उपासना करणारा असाच एक भक्त सोलापुर जिल्ह्यातील बार्शी गावात राहात होता. त्याचे नाव जोगा परमानंद.

जोगा गावात घरोघरी भिक्षाटनास जात असे. मिळेल त्या भिक्षेत कुटुंबाचे पोषण करीत असे. आंधोळ करून घरातल्या देवाची यथासांग पूजा करून तो गावातल्या प्रसिद्ध भगवंताच्या दर्शनाला जात असे. पण चालत जात नसे. गीतेचा एक श्लोक म्हणून जमिनीवर दंडवत घालायचा. दुसरा श्लोक म्हणायचा दुसरे दंडवत घालून पुढे सरकायचा. उठून तिसरा श्लोक म्हणून झाला की पुन्हा दंडवत……अशा रीतीने गीतेचे सातशे श्लोक म्हणत सात शते दंडवत घालून भगवंताचे दर्शन घ्यायचा. हे झाले की घरी चालत आल्यावर मगच जेवण करायचा. हा नित्यनेम पाहून गावातले लोक तर जोगा परमानंदाला मोठा मानीतच पण परगावातून बाजारहाटासाठी आलेले लोक आणि लहान मोठे व्यापारीही थक्क होत.

त्या रात्री खूप पाऊस पडला. रस्ता चिखल पाण्याचा झाला होता. गेले दोन तीन दिवस जोगाची ही दंडवत भक्ती पाहून एका व्यापाऱ्याच्या मनात आले की ह्या भक्ताला आपल्या मालातील एक पितांबर द्यावा. चिखलातूनही साष्टांग दंडवत घालत येणाऱ्या जोगाला पाहिल्यावर तर तो व्यापारी अचंबित झाला. निष्ठानेम म्हणावा तर हीच व निष्ठावान भक्त पाहावा तर जोगा परमानंदासारखा असे मनात म्हणत तो व्यापारी जोग्याजवळ जाऊन नम्रतेने म्हणाला,” जोगा महाराज! तुम्ही हा पितांबर घ्यावा व तो नेसावा. मला फार फार संतोष होईल.” जोगा म्हणाला,” शेठजी, हा पितांबर माझ्या काय कामाचा? मला स्वत:ला व घरालाही तो अति विशोभित दिसेल. जुन्यापान्या धोतरावर माझे भिक्षा मागून पोट भरते. आणि शेठजी ह्या पावसापाण्यात पितांबर काय कामाचा? राहू द्या तुमच्यापाशी. त्यापेक्षा हा तुम्ही पांडुरंगाला नेसवावा.” जोगाच्या बोलण्यावर शेठजी आदरपूर्वक म्हणाला,” जोगा परमानंद, तुमचे ह्यामुळे पोट भरावे किंवा घरासाठी ह्याचा काही उपयोग व्हावा ह्या विचाराने मी पितांबर दिला नाही. तुमची भक्ती पाहून माझे मन भरून आले म्हणून ही फुल ना फुलाची पाकळी देतोय. पांडुरंगालाही मी दुसरा देईन. चिखल- पाण्याने पितांबर खराब होईल तर त्याचीही चिंता नको. मी आणखी एक पितांबर आपल्याला देईन! आपण हा पितांबर नेसूनच पुढे जावे. माझ्या मनाला बरे वाटेल.”

तरीही जोगी परमानंदाने आढेवेढे घेतले. पण व्यापाऱ्याने मनापासून केलेल्या आग्रहापुढे व देणाऱ्याचे मन मोडू नये ह्या विचाराने जोगा नमला. त्याने तो पितांबर परिधान केला.

गीतेचा श्लोक म्हणत जोगा दंडवत घालणार पण पितांबर पायघोळ होतोय हे त्याच्या लक्षात आले. पितांबर वर खोचला. दंडवत घालायला वाकला पण हा भारी पितांबर चिखलाने घाण होईल ह्या विचाराने तो कुठे कोरडी जागा दिसतेय का पाहू लागला. चिखल तर सगळीकडेच झाला होता. ते पाहिल्यावर जोगाने दंडवत घातले. पुढचा श्लोक तो म्हणाला पण घसरलेले पितांबर पुन्हा वर खोचले. आणि दंडवत घातले. असे होता करता किती प्रहर उलटले ते जोगा परमानंदाच्या आज लक्षात आले नाही. कोणता श्लोक म्हणून झाला हेही त्याच्या बरेच वेळा लक्षात येईना. शरीर थकले होते पण त्यापेक्षाही मन फार ठेचकाळले होते. देवळा बाहेरच बसून राहिला.

हे काय झाले आज! कालपर्यंत रोजच्या धोतराकडे ते जुने का पुराणे, स्वच्छ का मळलेले, ते धुळीने भरते का वाऱ्याने उडते हे विचारही मनात येत नव्हते. भगवंताशिवाय दुसरीकडे अर्धा क्षणही लक्ष गेले नाही. आणि आज दंडवतापेक्षा, पांडुरंगापेक्षा पितांबरातच मन गुंतले होते.मनातच पांडुरंग नव्हता तर तो ध्यानांतही कसा असेल?  जोगा खिन्न झाला. त्याहीपेक्षा त्याला स्वत:चा संताप आला. तो आपलीच निर्भत्सना करू लागला. “अरे कुठे गेला तुझा नेम? मन थाऱ्यावर नव्हते. ते पितांबराच्या भरजरीत होते.ते चिखलाने माखेल ह्याची तुला चिंता होती. पितांबराच्या मोहाने मन बरबटले ह्याची तुला फिकीर नव्हती. अरे जोगड्या, काल पर्यंत काय पितांबर नेसलेल्या पांडुरंगाशिवाय तुला कशाचेही भान नव्हते. दंडवताने कष्ट होतात म्हणजे काय हे तुझ्या खिजगणतीतही नव्हते! एकाग्रता काय असते,ती वेगळी काही असते हे माहित असण्याचीही तुला आवश्यकता पडली नाही. कारण तुझे चित्त पांडुरंगाच्या पायीच रंगले होते.तल्लीनता एकाग्रता अनन्यता हे शब्द तुझ्यासाठी वेगवेगळे नव्हते.कारण तो तुझा सहज भाव होता.पण आज पितांबर नेसलास काय आणि त्याच्याच विवंचनेत गुंगलास काय! अरे जोगी होतास तो चार हात पितांबरामुळे भोगी झालास! लाज वाटली पाहिजे तुझी तुलाच. उठ प्रायश्चित्त घे.शिक्षा भोग. त्यामुळे तरी तुझी भगवंतापाशी थोडीफार पत राहिल. उठ!”

जोगा परमानंद असा विचार करत असतानाच समोरून धष्टपुष्ट बैलांची जोडी घेऊन एक शेतकरी चाललेला दिसला. शेतकऱ्याला आपला हा भरजरी पितांबर घेऊन त्या बदली त्याचे बैल काही वेळासाठी परमानंदाने घेतले. शेतकरीही थोड्या वेळासाठी इतका भारी पितांबर मिळाला ह्या आनंदात होता. परमानंदाने शेतकऱ्याकडून चऱ्हाटाने आपले पाय बैलाच्या जोखडाला घट्ट बांधून घेतले. आणि तो शेतकऱ्याला म्हणाला बैलाना जोरात चाबूक हाणून पळव. भाड्यापोटी भारी पितांबर मिळाल्याच्या आनंदात शेतकऱ्याने जोगा सांगेल तसे केले.

चाबकाचा फटकारा बसल्यावर बैल चौखुर उधळत निघाले. आणि जोगा परमानंद फरफटत चालला. काटेकुटे-सराटे, दगड-गोटेआणि खड्यां-मातीतून जोगा अंग खरचटत फरपटत होता.नंतर कातडे सोलून निघू लागले. रक्त वाहू लागले. बैल वारा प्याल्यासारखे, शेपट्या वर करून पळतच होते. बैलांना आवरणारा कुणी शास्ता नव्हता. त्याही सिथितीत पश्चात्तापाने पोळलेला जोगा तोंडाने,” जय रूक्मिणीमानसरंजना। पयोब्धिवासा शेषनयना । भक्त कैवारिया गुणनिधाना। जगज्जीवना पांडुरंगा।। असा धावा करीत, मध्ये रामकृष्ण हरि हा नाममंत्र जपत, अंगाची कातडी सोलून निघालेल्या,मांसपेशी लळत लोंबत खाली पडत चाललेल्या अवस्थेत फरफटतच होता. बैल थांबण्याचे चिन्ह नव्हते. जोगाचे हाल संपणार नव्हते. आता तर रक्ताने माखलेला हाडाचा सांगाडा तोंडाने जय जय जय रामकृष्ण हरि हे भजन करीत फरफटत होता. तो सांगाडा कोणी पाहिला असता तर तो कुणाचा असा प्रश्न त्याला पडला असता.

अखेर भक्ताची दया देवालाच येणार ह्या न्यायाने चक्रधारी पांडुरंग जोगा परमानंदासाठी धावून आला. बैलांसमोर उभा राहून त्यांची शिंगे धरून त्यांना थांबवले. जोगाच्या पायाचे चऱ्हाट सोडून त्याचे पाय मोकळे केले.मुखाने हरिनाम घेणाऱ्या सांगाड्याकडे अत्यंत प्रेमळ दृष्टीने पाहात पांडुरंगाने आपला कृपेचा वरदहस्त हळुवारपणे जोगाच्या सांगाड्यावरून फिरवला.भक्त जोगा पुन्हा पहिल्यासारखा झाला.

आपल्यासाठी निर्गुण भाव सोडून सगुण साकार रुपात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या दयाघन विठ्ठलाकडे जोगा डोळे भरून नुसता पाहातच राहिला. मग थोड्या वेळाने भानावर आलेल्या परमानंदाने आपले रोजचे दंडवत भगवंतापुढे घातले! परमेश्वरापुढे शरण होऊन तसाच पडून राहिला. पांडुरंगाने त्याला उठवले. जवळ घेतले. विठ्ठलाने त्यानंतर जोगा परमानंदाला सांगितले ते सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.

“रोज रस्त्यावरून दंडवत घालत शरीराला इतके कष्ट देऊन माझ्या दर्शनाला येण्याचे कारण नाही. नित्यनेमात मन काही काळ विचलित झाले तरी त्याचे इतक्या निर्वाणीला येऊन असे पराकोटीचे प्रायश्चित्त घेण्याचे मनातही आणू नये. मी भाव भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तांचे इतके कौतुक असते की त्याने जेवताना घेतलेला घासही माझ्याच मुखात जातो. भक्त सहज चालत येतो जातो ती माझी प्रदक्षिणाच मानतो.आणि माझा भक्त समाधानाने झोपला तरी तेच त्याने मला घातलेले दंडवत मानतो.”
दमहिपतीबुवांनी देवाचेच शब्द आपल्या रसाळ ओव्यांतून सांगितले ते म्हणत भक्त जोगा परमानंदाची कथा संपवू या,
“ जोग्यासी म्हणे रुक्मिणीरमण। एव्हढे का मांडिले निर्वाण । काहीच नसता अन्याय जाण। केले दंडण देहासी । तुम्ही करता अन्नपान । ते माझे मुखी पडता जाण। सहज करीता गमना गमन। तेचि प्रदक्षिणा आमुची। नातरी कोणासी बोलाल वचन। तेचि होतसे माझे स्तवन। की सुख संतोषे करीता शयन। ते साष्टांग नमन मज पावे। ऐसे असता निजभक्त राया। एव्हढे निर्वाण केले कासया।

भगवंताचे हे अमृताचे शब्द ऐकून परमानंदाने देवाच्या पायांवर मस्तक ठेवले व त्याची कृपाछाया आपल्यावर सदैव असो द्यावी ही प्रार्थना केली. जोगा परमानंदाप्रमाणेच भगवंताची आपणा सर्वांवरही अशीच कृपा असू द्यावी ही प्रार्थना करून ही भक्तकथा संपवतो.

प्रसिद्ध पण अनोळखी लेखक

आपल्या सर्वांना ब्रिटिश अमेरिकन किंवा फ्रेंच आणि इटालियन लेखक माहित असतात. पुर्वीचे काही व अलिकडचेही काही.


गेल्या वीस पंचवीस वर्षात आणि त्यातीलही दहा वर्षात मला काही लॅटिन अमेरिकन, एखाद दुसरा पोर्च्युगीझ किंवा मेक्सिकन लेखक माहित झाले. त्यापैकी मी काहींचीच पुस्तके वाचली व इतरांविषयी दुसऱ्या लेखकांनी त्यांच्या संबंधात गौरवाने लिहिलेले लेख किंवा पुस्तकातील उल्लेख वाचले. बहुतेकांना Alchemist कादंबरीमुळे Paulo Coelho ह्या ब्राझेलियन लेखकाचे व ती मूळ पोर्च्युगीझ मध्ये आहे हे माहित झाले. व इंग्रजी फ्रेंच आणि इटॅलियन भाषांप्रमाणेच इतर भाषांतही उत्तम लेखक व साहित्य असू शकते हे कळून आले.

माझा वर्गमित्र कै.प्रा.मधु काळे, मी अमेरिकेला जायला निघालो की एक पुस्तक जरूर वाच म्हणायचा. मी पुस्तकाचे व लेखकाचे नाव एका कागदाच्या कपट्यावर लिहून घ्यायचो. बॅगेत जपून ठेवायचो. इतर पुस्तके पा्हण्याच्या चाळण्या वाचण्याच्या नादात काळेने सांगितलेले पुस्तक वाचायचे विसरत असे. तो कागद तसाच परत यायचा. दरखेपेला, “काळे, ह्या खेपेस नक्की वाचेन” म्हणायचो. काळे दोन वर्षांपूर्वी गेला. मी त्याने सांगितलेले पुस्तक अजूनही वाचले नाही. आता मन घेत नाही. पण अलिकडच्या पद्धतीप्रमाणे म्हणायचे तर, मी ते त्याच्या आठवणीसाठी वाचणार आहे. Octavia Paz हा मेक्सिकन कवि, लेखक आणि मुत्सद्दी. पण साहित्यिक म्हणूनच जास्त सर्वत्र ओळखला जातो. त्याने काही काव्य संग्रहासह अठरा पुस्तके लिहिली आहेत. बहुतेक सर्व प्रख्यात आहेत. त्याला १९९०मध्ये वाड.मयाचे नोबेल पारितोषक मिळाले. त्याचा त्याला आनंद झाला.

पण कोणालाही आपल्या भाषेचा सन्मान करणारे श्रेष्ठ पारितोषिक मिळाल्याचा निराळाच आनंद होतो तसा त्यालाही जेव्हा स्पॅनिश भाषेला जगाच्या नकाशावर ठळकपणे ज्याने आणले त्या अतिशय प्रख्यात कादंबरीकार Miguel de Cervantes च्या नावाने दिले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक मिळाले तेव्हा झाला. हा सर्व्हॅन्टिस म्हणजे सर्वकालीन श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या, आपणापैकी अनेकांना माहित असणारा , Don Quixote ह्या कादंबरीचा लेखक!

आपल्याला पाझ जवळचा वाटावा कारण १९५१ मध्ये तो हिंदुस्थानात मेक्सिकोच्या वकिलातीत अधिकारी म्हणून आला. नंतर पुन्हा १९६२ साली तो वकील (राजदूत) या मोठ्या हुद्द्यावर रुजु झाला. इथल्या अनुभवावर त्याने Light In India हे पुस्तक लिहिले. आणि माझा मित्र काळेने त्याचे गाजलेले पुस्तक सांगितले ते Labyrinth of Solitude. मी काळेचा कागद आपल्याजवळ आहे हे विसरलो होतो. त्यामुळे मी नाव तेच आहे समजून दुसऱे तितकेच गाजलेले पण दुसऱ्या लेखकाचे पुस्तक One Hundred Years of Solitude हे नोबेल पारितोषिक विजेता Gabriel García Marques ह्याचे पुस्तक वाचले!

आता आपल्याला नवे तिसरे नाव समजले.

हा गार्शिआ कोलंबियाचा लेखक. जन्म १९२३ साली झाला. ह्याने आपल्या कादंबऱ्यांतून,जॅार्ज बोर्जेसने आपल्या साहित्यातून आणलेल्या सत्य आणि काल्पनिकता यांच्या बेमालूम मिश्रणातून लिहिण्याच्या प्रकारातून जी एक निराळीच वास्तवता आणली होती तिचाच विकास त्याने सहजपणे केला. तिला magical realismअसे म्हटले जाते. अदभुत वास्तव! ह्याचीही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. Love in the Time Of Cholera, Chronicle of a Death Foretold, The General in His Labyrinth तशीच कथा संग्रह आणि लघुकादंबऱ्यांचा संग्रह ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्याने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी १९६७साली लिहिलीआणि तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा लेखक झाला! इतकेच नव्हे तर लॅटिन अमेरिकेचे हे पहिले “आंतरराष्ट्रीय तडाखेबंद विक्रीचे पुस्तक”असा मान मिळवला! जगभरात वीस कोटी प्रति खपल्या आहेत ! ह्या शतकातील श्रेष्ठ कादंबऱ्यांत तिची गणना होते.

गार्शिआ मार्किझ म्हणतो की कादंबरी लिहिण्याची प्रक्रिया १९५० सालीच सुरवात झाली. त्यावेळी तो आई बरोबर आपल्या आजोळी गेला होता.आठ वर्षापर्यंतचे त्याचे लहानपण आजी आजोबांच्या घरीच गेले होते. त्यामुळे तो आईबरोबर पुन्हा गेला तेव्हा त्याला “आजोळचे ते गाव तिथले रस्ते झाडे-पक्षी,घरे-माणसे, आजोबा आजीने सांगितलेल्या गोष्टी,त्यातल्याही माणसांसह व प्रसंगासह सर्व काही एका प्रचंड प्रकाशात डोळ्यांसमोर उभे राहिले.” पुढे नंतर कधीतरी लिहिताना म्हणतो की त्यावेळी मी कादंबरीचे पहिले संपूर्ण प्रकरणअगदी शब्द न् शब्द घडाघडा टायपिस्टला सांगितले असते. आजोबा आजी जशा आणि ज्या शब्दात गोष्टी सांगत तशाच तऱ्हेने मी लिहित गेलो असेही त्याने म्हटले आहे. १९६१साली लिहायला सुरुवात झाली. लिहायला अठरा महिने लागले.घरात जवळ जवळ बंदिस्त होऊन तो लिहित होता. कागदाचे दस्तेच्या दस्ते आणि सिगरेटची पाकिटे च्या पाकिटे एकामागून एक फस्त होत होती.त्याच बरोबर घरातील एक एक वस्तुही विकायला लागत होती.गहाण ठेवायची पाळी आली होती.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तशी गार्शिआची बायको मर्सिडिझ, खंबीरपणे घर चालवत होती. दोन मुलांचे सर्व काही करणे,घर चालवणे हे तिने एकटीने केले. मोटार विकावी लागली. घरातली ठेवता येण्यासारखी प्रत्येक गोष्ट गहाण ठेवून, परतफेडीच्या मुदती वाढवून घेणे,हेही तिने केले. संसाराचा गाडा रेटत नेला. गार्शिआ मार्किझला १९८२ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले! हा अर्जेंटिनाचा कवि,कथाकार,निबंधकार, भाषांतरकार तत्वज्ञानी, संपादक, आणि अर्जेंन्टिनाच्या सार्वजनिक ग्रंथालयांचा प्रमुख होता.

गार्शिआ सारखाच र्ब्युनासएअर्स युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक पदावर काम केलेला जॅार्ज फ्रान्सिस लुई बोर्जेस हा एक प्रतिभावंत साहित्यिक होता. जॅार्ज लुई बोर्जेसने तत्वदर्शी वाड.मयात मोलाची भर घातली. वाड.मयात एका वेगळ्याप्रकारची शैली आणली. काल्पनिकता,अदभुतता व प्रत्यक्षातले वास्तव सत्य ह्यांचे एकजीव मिश्रण अशा शैलीतून लिहिण्याचा मान ह्याच्याकडे जातो. ह्यात लेखकाच्या मनातील विचारांना कल्पनेत जाण्याचे स्वातंत्र्य जास्त आहे.

ह्याच्या कथासंग्रहात निरनिराळ्या कथा असल्या तरी कथा विषय समान एक असतो. त्यामुळे त्या कथा एकमेकांत जोडल्या जातात. सलग होतात. पण कादंबरी होत नाही हे विशेष. त्यांच्या कथांमध्ये Mirror, Labyrinth , Library इतकेच काय काल्पनिक लेखकही येतात. त्याचे नावाजले गेलेले पुस्तक म्हणजे Collected Fiction. ह्याला नोबेल पारितोषिक मिळाले नाही. पण प्रतिष्ठेची समजली जाणारी आंतरराष्ट्रीय, स्वित्झर्लॅंडच्या Belzan Foundation चे तसेच फ्रान्सचे Knights of the Legion of Honor अशी पारितोषिके मिळाली आहेत.

पोर्च्युगीझ लेखक Jose Saramago हे सुद्धा वरील सर्व लेखकांइतकेच विख्यात आहेत. आपल्यात ते आतापर्यंत म्हणजे २०१० पर्यंत होते. त्यांचा जन्म १९२२ सालचा. त्यांची अत्यंत गाजलेली व जिच्यामुळे त्यांना 1998 सालचे नोबेल पारितोषिक मिळाले ती Blindness ही कादंबरी वाचण्यासारखी आहे. ह्या कादंबरीचे माझे मित्र डॅा.भा.ल.भोळे ह्यांनी मराठीत भाषांतर केले आहे. त्यामुळ मला ती अनायासे वाचायला मिळाली. याच लेखकाची दुसरीही कादंबरी The Cave ही सुद्धा चांगली आहे व तीही वाचण्याची शिफारस श्रेष्ठ वाचक,इंग्रजी वाड.मयाचे प्राध्यापक, समीक्षक चार्ल्स व्हान डोरेन हे करतात.

ब्लाइंडनेस मध्ये, लोक अचानकपणे आंधळे होऊ लागतात. साथ पसरत जाऊ लागते. सरकारने ह्याला प्रतिबंध व्हावा म्हणून अशा आंधळ्यांना एका इमारतीत लोकवस्तीपासून वेगळे ठेवण्यास सुरुवात केली. तिथले आयुष्य, तिथेही काही समाजकंटक आंधळ्यांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा ताबा घेतात. व काही मोबदल्याच्या बदली अन्नवाटप करु लागतात. मोबदल्याच्या वस्तूंमध्ये नंतर बायकांचीही मागणी होऊ लागते.

व्यवहारातील आंधळ्यांना समोर अंधार असतो तर कादंबरीत जे आंधळे होतात त्यांच्या समोर पांढरा पडदा येतो. संपूर्ण कादंबरीत,आंधळा झालेल्या डोळ्यांच्या डॅाक्टरच्या बायकोला मात्र आंधळेपण येत नाही. ती एकटी डोळस असते. ती तशी डोळस नसती तर कादंबरीत जे घडते ते आपल्याला समजले नसते. तिच्या डोळ्यातून आपण, आपलेच आंधळे झालेले जग पाहू शकतो.वाचू शकतो. मनुष्याच्या सर्व वृत्तींचे,वागण्याचे असहाय्यतेचे, त्या आंधळ्यांच्या जगातील- हे जन्माने आंधळे नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे- त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यात रोजच्या हालचाली करण्यात, तिथल्या नरकापेक्षाही जास्त असलेल्या घाणीतून वावरताना होणाऱ्या हालांचे, पोटासाठी शरीरही देण्याचे भोग कपाळी आलेले, बळी कसे कान पिळतात इत्यादींचे दर्शन कादंबरीत होते.

डोळ्यांचा डॅाक्टर आंधळा होणे, डोळ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेले त्याचे पेशंट आणि तो एकाच ठिकाणी येणे;माणसांचे अशा परिस्थितीत वागणे किती एकदम वेगळे होते इत्यादी गोष्टींचे वर्णन वाचायला मिळते. शेवटपर्यंत ती डोळस बाई तिला दिसतेय हे न सांगता इतरांना मदत.करीत असते. पुस्तक वाचण्या सारखे तर आहेच.पण आपल्याला विचार करायला लावणारे पुस्तक आहे. पुष्कळ लिहिण्यासारखे आहे. ‘पांढरे आंधळेपण’ इथूनच विचार करायला लावते.

वानगीदाखल सांगितलेल्या वरील लेखकांपेक्षाही अनोळखी असलेल्या एका लेखकाची ओळख करून देण्यासाठी मी लिहिण्यासाठी बसलो होतो. पण वरील लेखकांत गुंतत गेलो. आणखी एक गंमतीचा योगायोग असा की त्या रात्री मी मुलाला ओझ् झविषयी सांगत होतो. दुसरे दिवशी संध्याकाळी तो म्हणाला,” बाबा ओझची शेवटची मुलाखत घेणारी बाई आज रेडिओवरून त्याच्या विषयीच बोलत होती!”

हा मूळ हिब्रू भाषेत लिहिणारा यहुदी(ज्यू) लेखक आहे. त्याचे नाव Amos Oz. त्याने इझ्रायल संबंधित लिहिलेल्या कादंबऱ्या, लेख, निबंध ह्यामुळे त्याचे नाव प्रथम जगातील ज्यू लोकांमध्ये व त्याचे साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत झाल्यामुळे जगाला माहित झाले. विशेष म्हणजे हा इझ्रायल व पॅलेस्टिनी लोकांमध्ये शांतता निर्माण होऊन ती कायम राहावी ह्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीत होता.

Amos Oz हा इझ्रायलच्या विख्यात लेखकांपैकी होता.पण त्याहीपेक्षा त्याची ओळख शांततेसाठी उभारलेल्या चळवळीतील अग्रणी, -सर्वांत श्रेष्ठ असा पुढारी अशी होती. चळवळ दोन्ही देशांच्या लोकांमध्ये सामंजस्य वाढीस लागावे व कायमची शांतता नांदावी ह्यासाठी होती. पण अशा चळवळींना यशासाठी फार झगडावे लागते.

त्याच्या निधनाची बातमी परवा त्याच्या मुलीने Twitter वर टाकली. ती म्हणते,” माझे वडील फार चांगले, कुटंबवत्सल गृहस्थ होते. ते म्हणजे मूर्तिमंत शांती आणि उदारता आणि समन्वयच होते! कॅन्सरशी अल्पकाळ लढताना, अखेरच्या क्षणी आपल्यावर प्रेम करणारे सभोवती आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. (शेवटच्या श्वासापर्यंत ते शुद्धीवर होते.) त्यांनी मागे ठेवलेला वारसा पुढे चालवून आपण परिस्थिती बदलू या.”

इझ्रायलच्या मातीत घडणाऱ्या कादंबऱ्या आणि इझ्रायलचा संदर्भ असलेले त्याचे लेख आणि निबंध Amos Oz ने पुष्कळ लिहिले आहेत. जगातील जवळपास चाळीस भाषांत त्याच्या कादंबऱ्या, लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके, लघुकथा संग्रह ह्यांची भाषांतरे झाली आहेत. त्यामुळे त्याचा साहित्यिक व त्या दोन्ही देशांतील शांतिदूत म्हणूनही जगात बोलबाला झालाआहे. तो संपूर्ण इझ्रायलमध्ये व West Bank मध्येही फिरला. कितीतरी लोकांना भेटला. त्यांच्याशी आपल्या देशाचा इतिहास आणि भविष्य ह्याविषयी बोलला. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्याचे In the Land of Israel हे पुस्तक लिहिले गेले.

ओझ चे आई वडील पूर्व युरोपातून इझ्रायलमध्ये आले. देश अजून निर्माण झाला होता-नव्हता अशा बाल्यावस्थेत होता. ओझचा जन्म १९३९ साली इझ्रायलमध्येच झाला. त्यामुळे आई वडील आणि त्यांच्या पिढीतल्या लोकांना जे युरोप व पाश्चात्य देशांविषयी जवळीक,आकर्षण व अभिमान होता तसा त्याला नव्हता. तो बाळइझ्राईलमध्येच वाढला. नंतर त्याला आपला इझ्रईली तरुण,तरूण- इझ्राइल घडवत आहेत त्याचे आकर्षण होते. तो आपल्या आठवणींत लिहितो,” नव्या देशाबरोबरच मीही माझ्या आयुष्याचे नवीन गीत गाणार आहे.भर माध्यान्ही पाण्याने भरलेला ग्लास जसा हवासा वाटतो तसे या देशातील माझेच नाही सर्वांचे आयुष्य साधे आणि सरळ रेषेसारखे व्हावे असे वाटते !” ॲमॅास ओझने १९६१ साली लष्करी शिक्षण पूर्ण केले. १९६७ साली इझ्रायलने ईजिप्त आणि सिरिया या देशांना युद्धात पाठिंबा दिला. त्या युद्धात आणि १९७३च्या Yom kippur च्या युद्धातही तो आपल्या देशाकडून लढला होता.

त्याच्या आठवणीतून व्यक्त होणारे आत्मचरित्र A Tale of Love and Darkness प्रख्यात आहे. त्या पुस्तकाला Goethe Prize आणि इतर सन्मानही लाभले. त्यावर आधारित सिनेमाही निघाला आहे. इझ्रायलचा नामांकित मुत्सद्दी व पंतप्रधान शिमन पेरेझ हा ओझचा मित्र होता. ह्या पंतप्रधानाला पॅलेस्टिनींशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात ओझने पुढाकार घेतला होता.ह्यासाठी त्याला शांततेचे नोबेलही मिळाले. ओझने, पॅलेस्टाईनशी शांतता करार व्हावा आणि त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा हे कलमही त्या शांतता करारात असावे ह्यासाठी वर्तमानपत्रांतून व ठिकठिकाणी अनेक लेख लिहिले.

तो व्यथित होऊन म्हणतो की दोन इझ्रायलींमध्ये आपला देश कसा व्हावा धोरण काय असावे ह्यावर एकमत होत नाही! साहित्यिक म्हणून ॲमॅास ओझचे महत्व फार मोठे आहे. त्याने आपल्या हिब्रू भाषेतून लिखाण केले. हिब्रूचे पुनरज्जीवन केले. तिला संजीवन दिले. साहित्यिक जगात स्थान मिळवून दिले. ही त्याची मोठी कामगिरी आहे.

ओझ गेल्यावर त्याला कट्टर विरोध करणाऱ्या पंतप्रधान नेत्यानेहूनेही,ओझने हिब्रू भाषेला जागतिक स्तरावर नेल्याचे मान्य करून त्याचा ह्याबाबतीत गौरव केला आहे. ओझच्या आत्मचरित्रात्मक आठवणींच्या गाजलेल्या पुस्तकाचे शीर्षक वापरून इझ्रायलचे राष्ट्राध्यक्ष रूव्हेन रिव्हलिन ह्यांनी यथार्थ व समर्पक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात,” A Story of Love and light and now darkness!” त्याच वेळी इझ्रायलच्या भेटीसाठी आलेल्या युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने तर ओझचा इझ्रयल व पॅलेस्टाईन ह्या दोन लोकांत शांततेसाठी झगडणारा बुलंद आवाज ह्या शब्दांत गौरव केला. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके ओझला मिळाली असतील पण शांततेचे नोबेल मिळावे ह्या यादीत मात्र तो कायम ‘नामांकन यादीत’ अजून तिष्ठत उभा आहे!

शतकानुशतके समाज , सामाजिक विचार, राजकीय विचारसरणी आणि अप्रत्यक्षपणे माणसाचे जीवन जी वळणे घेत घेत आज जिथे माणूस आला आहे त्यामागे ह्यांच्या सारखे, आणि फार पूर्वीपासून होत गेलेले अनेक लेखक आहेत हे विसरता येणार नाही. साहित्य, वाड•मय काय करते त्याचे उत्तर आपणच, आणि आपले जीवन हे आहे. आजपावेतो माणसाच्या विचारात आणि आचरणात बदल होत झाले त्याला बव्हंशी लेखक त्यांचे साहित्य/वाड•मय, पुस्तके, कारणीभूत आहेत. ऋण मानायचे की नाही हा प्रश्न नाही; त्या ऋणात आपण राहणे ही कृतज्ञता आहे.

ता. क.
वर्गमित्र प्रा. मधुकर काळे ह्याच्या स्मरणार्थ त्याने सतत शिफारस केलेले Octavio Paz चे The Labyrinth of Solitude हे पुस्तक नुकतेच घेतले. वाचायला सुरुवातही केली. १८ फेब्रुवारी २०२२

जगमित्र नागा

बेलमाॅन्ट

परळी वैजनाथ गावात नागा नावाचा ब्राम्हण आपल्या कुटुंबासह राहात होता. गावाबाहेरच तो एका झोपडीत राहात असे.पुढची मागची मोकळी जागा रोज शेणाने सारवली जायची. शेणसड्यांनी शिंपली जायची. झोपडी आतून बाहेरून स्वच्छ असायची. सदाफुली,गुलबक्षी कोरांटीची तीन चार फुलझाडे त्या झोपडीला शोभा आणीत. गावात आणि आजूबाजूच्या दोन तीन वस्त्यांमध्ये भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. रोज रात्री गावातल्या देवळात हरिरसगुण गात कीर्तन करायचा. नागाच्या रसाळ कीर्तनाला लोकही गर्दी करीत. झोपण्या अगोदर घरातील सगळे मिळून थोडा वेळ भजन करून झोपी जायचे.
सगळ्यांशी मिळून मिसळून आणि कोणाच्याही ना अध्यात ना मध्यात असे त्याचे वागणे होते. सर्वांशी नेहमी शांतपणे गोड बोलायचा. इतकेच नव्हे तर गायी वासरेही नागा चालला की त्याला खेटून चालत. तो दिसला की धावत येत. मान हलवून गळ्यातली घंटा वाजवत आम्ही आलो आहोत सांगत. मध्येच हलकीशी ढुशी देत. काही नाही तर त्याला खेटून शांत उभी राहायची. नागाही गायी बैलांच्या वासरांच्या पाठीवर हात फिरवत किंवा त्यांच्या मानेचे पोळ हाताने घासून पुढे जाई. नागा जसा जगाचा मित्रच होता. सगळेजण त्याला जगमित्र नागा म्हणत. थोडक्यात, गावात नागा ब्राम्हणाला कोणीही वाईट म्हणत नसे.

एखाद्याचा चांगुलपणा हाच काहीजणांसाठी त्याचा हेवा द्वेष करण्याचे कारण ठरते. गावातले लोक नागाचा आदर करतात त्याच्याविषयी चार चांगले शब्द काढतात ह्याचाच दुस्वास करणारे, त्यावरून नागाचा विनाकारण द्वेष करणारे तीन चार लोक होतेच. असे लोक सर्व ठिकाणी असतात म्हणा.

एकदा रात्री नामा कीर्तन आटोपून गावा बाहेरच्या आपल्या झोपडीत आला. सगळेजण रोजचे भजन करून झोपले. त्या रात्री नागाच्या वाईटावर असलेल्या लोकांनी नागाच्या झोपडीवर पेटते बोळे फेकून झोपडी पेटवून दिली. ज्वाळा वर जाऊ लागल्या तसे ते दुष्ट गावात निघून गेले. दुरून झोपडी पेटल्याचे पाहात झोपून गेली. इकडे नागाला आणि त्याच्या बायकोला जाग आली. मुलांना पांघरूणात गुंडाळून जवळ घेऊन बसली. नागाने विठोबाचा धावा सुरु केला. सामान्य नागाला देवाशिवाय कोण आधार असणार?

म्हणे धाव आता रुक्मिणीकांता। दीनबंधो अनाथनाथा। तुजवाचोनि आम्हाल रक्षिता। कोण असे ये समयी।।

भक्ताने केलेल्या तळमळीच्या हाकेला आपले सुदर्शन चक्र हाती घेऊन देव धावून आला. च्क्रपाणीने कमाल केली. आगीचे लोळ वरच्यावर उठून हवेतच विझून जात. खाली त्याची ठिणगी नाही. निखाराही नाही,कोळसाही नाही! मग राख तरी कुठे असणार? गावातल्या लोकांना दुरून आगीच्या ज्वाळा दिसल्या. गावात गडबड उडाली. “ जगमित्र नागाच्या खोपटाला आग लागली.” “ लागली का लावली?” “ हे त्यांचेच काम असणार!” अशा चर्चा चालू होत्या. लोक हळहळत होते. तशा पहाटे पहाटेच नागाच्या झोपडीकडे आले. नागा आणि त्याची बायको बसलेली. मुलं पांघरुणात गुंडाळून झोपवलेली होती. नागाचे भजन चालूच होते. बायकोच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते.

नागा आणि त्याचे कुटुंब जिवंत आहे हे पाहून लोकांना आनंद झाला. आश्चर्यही वाटले. वर वर उठत चाललेल्या भडकलेल्या आगीचे लोळच्या लोळ त्यांनी पाहिले होते. पण इथे झोपडीत अंगणात धुमसती राख नाही, निखारे नाहीत की कोळसे नाहीत;जळलेले काटे कुटक्या काही नाही! नागाच्या विठ्ठ्लाच्या तीव्र भक्तीची प्रचिती त्यांना प्रत्यक्षच पाहायला मिळाली. विठोबाने आग वरच्यावर झेलली. एकही लोळ खाली येऊ दिलाच नाही. आग वरच्यावर विरघळून गेली.

हे आश्चर्य पाहून नागाच आपला विठोबा ह्या साध्या भोळ्या भावनेने ते नागाला नमस्कार करू लागले.जमलेल्या सगळ्या लोकांनी जगमित्र नागाबरोबरीने “ पुंडलिक वरदाSS हाSSरी विठ्ठल ! पंढरीनाथ महाराज की जSSय!” अशी हरिनामाची गर्जना केली.

गावकऱ्यांनी नंतर विचार केला की आपण नागाला थोडी शेतजमीन द्यावी. तसे ठरवूनच ते नागाकडे जमले. त्यांनी आपला विचार त्याला सांगितला. त्याच्या नावे कागदपत्र तयार करून आणले होते. ते त्याला दाखवून पुढे म्हणाले की ह्याचे सर्व उत्पन्न तुझे. सगळे ऐकून नागा म्हणाला,” मला भिक्षुकाला जमीनजुमला कशाला हवा? गावातल्या
घरांतून उदार भिक्षा मिळते. त्यात आमचं भागते.

शेतीभातीच्या भानगडीत मला पाडू नका. अहो,पांडुरंग आपले रक्षण करतो. परवा झोपडी जळाली. तुम्ही पाहिलेच की आम्हाला पांडुरंगाने एव्हढीशीही झळ लागू दिली का? पांडुरंग आपल्याला सांभाळतो ह्याची ह्यापेक्षा दुसरी खात्री काय पाहिजे?” नागाने इतके सांगूनही गावकरी ऐकेनात. त्यावर गावकरी म्हणाले,” आम्ही जमीन तुझ्या नावाने करणार. गाव कसेल जमीन. जे पिकेल त्यातले तुला पाहिजे तितके घेत जा.बाकी राहिल ते आम्ही गावाच्या उत्सवा-गावजेवणाच्या खर्चासाठी लावू. कागदपत्रावर गावकऱ्यांच्या सह्या झाल्या. जगमित्र नामा हे सगळे तटस्थपणे पाहात होता. गावकऱ्यांचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तो कुटुंबाच्या पोटापाण्याला लागेल तेव्हढेच दरवर्षी घेई. दिवस असे नेहमीसारखेच चालले होते.

गावात एक यवन नविन हवालदार बदलून आला.हेही काही दिवस चांगले जात होते. पण गावात नव्या साहेबापुढे गोंडा घोळणारे लोक असतात. जगमित्राचा विनाकारण दुस्वास करणारे लोकही तेच करू लागले. एके दिवशी हवालदाराच्या काय मनात आले ते कळेना. त्याने नागाला आपल्या कचेरीत बोलावले. नागाला कचेरीत बोलावले हे कळल्यावर गावचे लोक काही वजनदार लोकांना बरोबर घेऊन कचेरीत आले.

“ नागा तू दुसऱ्या काही लोकांची जमीन हडपून उत्पन्न खातोस असे हुजुराच्या कानावर गेले. त्यांनी तुझी जमीन जप्त करण्याचा हुकुम मला दिलाय. इतकी वर्षे खाल्लंस उत्पन्न आता काही मिळणार नाही.” त्यावर गावातल्या लोकांनी सगळी खरी परिस्थिती हवालदाराला सांगितली.” अहो गावकऱ्यांनीच सह्या-अंगठे करून नागाच्या नावावर खुषीने करून दिलीय. हे कागदपत्र पाहा.” म्हणत कागदही काढले. इतकेच काय त्यांनी नागाचे चांगले गुणही सांगितले. नागा सज्जन आहे. तो कुणाची दिडकी घेणार नाही तिथे तो दुसऱ्याची जमीन कशाला हडप करेल? सगळे सांगून झाले; पण तिकडे दुर्लक्ष करून तो हवालदार घुश्शाने म्हणाला,” ते काही मला सांगू नका, काही दाखवू नका.जमीन जप्त झाली आहे. तिथे आता कुणीच जायचे नाही” हे ऐकल्यावर नागा जगमित्र आहे हेच सहन न होणारे ते चार दोन लोक हातावर टाळी देत एकमेकांत बोलू लागले,” नागाची दिवाळी संपली की रे!”
सुनावणी नाही काही कुणाची बाजू ऐकली नाही आणि नागाची जमीन लगेच जप्तही झली! नामा गप्पच होता इतका वेळ. पण तो आता म्हणाला,” हवालदार मित्रा, जमीन माझी नव्हती आणि नाहीच.पण गावकऱ्यांनी आपल्याच जमीनीतला तुकडा वाटा काढून ती फक्त माझ्या नावावर केली. जप्त केलेली तुम्ही जमीन माझी नाही,गावाची केली. हा अन्याय गावावर का? अहो गावच्या लोकांचे मित्र व्हा. त्यांची जमीन परत करा.” नागाचे बोलणे ऐकून त्या यवन हवालदाराचा घुस्सा आणखीच वाढला. तो कातावून म्हणाला, “ओ नागा, हे काय मित्रा मित्रा चालवलंय मघापासून? तुला लोक जगमित्र म्हणतात म्हणून तू मलाही मित्रा मित्रा कराय लागलास का? तमीजसे बोल, काय?” हवालदाराच्या मनात, नागाला लोक प्रेमादराने जगमित्र म्हणतात त्याचा हेवा वाटत होता! ती मळमळ बाहेर आली! नागा काही बोलला नाही हवालदाराला. त्याच्याकडे तो शांतपणे पाहात उभा होता.गावकरीच पुन्हा पुन्हा त्याची व आपली बाजू मांडू लागले.

अखेर हवालदाराला काय वाटले कुणास ठाऊक? तो नागाकडे आणि गाववाल्यांकडे पाहून नागाला म्हणाला,”नागा,माझ्या मुलीचे लगीन है. तिच्या देवकासाठी आमच्या घरात वाघ लागतो. तो घेऊन ये. नाही तरी तू जगमित्र म्हणवून घेतोस. अरे गावची गाईगुरं वासरं कुणाचेही अंग चाटतील; नजदिक येऊन राहतील. त्यात काय विशेष मोठे आहे. जगमित्र असशीलच तर वाघ घेऊन ये. मला मित्र मित्र म्हणत होतास. मी तुला एक सवलत देतो. बघ,मित्रासाठी वाघ घेऊन ये. हां पण आज संध्याकाळ पर्यंत आणला पाहिजे वाघ! वाघ आण जमीन घेऊन जा. !”

ही जगावेगळी,जीव घेणारी सवलत ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. मनातून सर्वच घाबरून गेले. नागा शांत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, “हवालदार तुला मी चांगल्या भावनेनेच मित्रा म्हणालो होतो. आता तुझ्या लेकीच्या लग्नात देवदेवकासाठी पाहिजे म्हणतोस तर प्रयत्न करतो. पण मला आता माझं काही खरं नाही असे वाटायला लागले आहे.. पण पुन्हा सांगतो ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांनी प्रेमाने ती माझ्या नावे करून दिली. पण वाघ तर मलाच आणला पाहिजे. बघतो.”
नंतर तो आपल्याशी मनात बोलू लागला, जमीन मी मागितली नव्हती. ह्या उपाधीत मला गुंतवू नका अशी गावाची विनवणी करत होतो. पण गावाच्या प्रेमापुढे माझे काही चालेना. माझ्या जवळ पांडुरंगाची आळवणी करत त्याच्याकडे भीक मागण्या शिवाय आता दुसरे काय आहे. विठ्लाच्या भरवशावर आल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे. इतका विचार केल्यावर तो हवालदाराला व गावकऱ्यांना नमस्कार करून तिथूनच तडक रानाकडे निघाला.

आगीचे संकट झोपल्यावर आले होते. हे तर जागेपणी डोळे पांढरे करणारे संकट नागा ब्राम्हणावर आले होते. नागा जंगलात आला. विठोबाची मनापासून तळमळीने, अतिशय तीव्रतेने आळवणी करू लागला. “जय जय अनाथबंधो करूणाकरा। भक्तवत्सला कृपासागरा। पतितपावना विश्वंभरा। दीनोद्धारा रुक्मिणीवरा,पांडुरंगा, माझी तुला करुणा येऊ दे रे दयाघना! कृपा कर ! आता उशीर नको मायबापा! धाव पाव विठाई माऊली, लवकर ये. हवालदार माझा मित्र जाण। त्याच्या कन्येचे आहे लग्न । वाघाचे दैवत प्रतिष्ठे कारण । पाहिजे सत्य तयासि।।त्याच्या कार्यास ह्या समयी पांडुरंगा विठ्ठला तू धावून ये. तू नाही आलास तर तुझ्या पायाशी माझा हा देह लगेच ठेवीन. विठठ्ला गोविंदा अशावेळी तू नाही आलास तर मी जगून तरी काय उपयोग? “
नागाची ती अार्ततेने अनन्यभावाने केलेली विनवणी ऐकून एका मोठ्या वाघाचे रूप घेऊन चक्रपाणी पंढरीनाथ तात्काळ प्रकट झाले.

एक मोठी डरकाळी फोडून वाघरूपी विठ्ठलाने नागास विचारले,” अरे नागा, तुला कोण त्रास दतोय? दाखव तो मला.एका घासात त्याला खाऊन टाकीन!” हे ऐकल्यावर नागा वाघापुढे हात जोडून म्हणाला ,” महाराज! हवालदार माझा मित्र झालाय. त्याच्याकडे मंगल कार्य आहे. म्हणून तुम्हाला मी प्रार्थना करून बोलावले केशवराजा,इथे आज हिरण्यकश्यपु नाही. आणि मी प्रल्हादा एव्हढा महान भक्त नाही. तरी नरहरी श्यामराजाच्या उग्र संतापाची आवश्यकता नाही. पांडुरंगा तुमचे रोजचे सौम्य रूप पाहिजे. अहो त्या यवन हवालदाराच्या मुलीच्या लग्नासाठी आपण चालले आहोत.” त्यावर महाव्याघ्ररूप पुंडलिकवरदायी हरिनारायण नागाला बोलले, “ते ठीक आहे. हरकत नाही. मला घरून ठेवू आणि तू चल. पण जे दुष्ट असतील त्यांना गमजा दाखवतोच ते तू पाहा.”

नागाने आपले उपरणे वाघोबा झालेल्या विठोबाच्या गळ्यात बांधले. एक टोक धरून तो गावाकडे आला. नागाबरोबर मोठा वाघही येतोय हे पाहून गावचे लोक घाबरून आोरडत घराकडे पळत सुटले. घाबरून पळत सुटलेल्या एकेकांची विशेषत: नागाचा अकारण द्वेष करणारी मंडळींची तर भलतीच फजिती होऊ लागली. पळता पळता धोतरात पाय अडकून पडले, तर वाघ कुठे आहे हे मागे वळून पाहताना पुढच्या खाचखळग्यात काही धडपडले. तर काहींची भीतीने गाळण उडून पळताना धोतरे फिटू लागली. वाघाला पाहून घाबरलेली पोरे पळताना तशाही अवस्थेत, मोठ्या माणसांची पळता भुई थोडी झाली हे पाहून, एकमेकांत ओरडून बोलू लागली. “ अरे शिरप्या! त्या गणपतरावाचं मुंडासं उडून चाललय बघ!” “ अरे मुंडाशाचं काय बघतोस त्या जालिंदरमामाचं धोतर गळून पडतेय त्ये बघ!” “ पळ, पळ,पळा “ ओरडत गावातले लोक ऱ्घरात जाऊन कवाडे बंद करून बसली. तेव्हढ्यात “ नागा झाला तरी त्याने वाघाला घेऊन येणे ठीक केले नाही म्हणत वेशीचा प्रचंड दरवाजा बंद करून टाकला.
केशवराज महाव्याघ्र वेशीपाशी आले. आणि त्याने आपली फक्त शेपटी जमीनीवर अशी आपटली की मोठ्या आसुडाचा फाट ऱ्फटाक्क् असा कडाडून आवाज आला! तसा एक धुळीचा मोठा लोट गावावर पसरला! वेशी आतले लोक दचकले. पाठोपाठ ‘प्रलयजलधिनादंकल्पकृत वन्हिवक्त्रम’ अशी नरहरी शामराज, नरसिंहासारखी डरकाळी फोडली. त्या गगनभेदी आवाजानेच वेशीचा दरवाजा तीन ठिकाणी तुटून फळ्या चिरफळ्या होऊन धाडकन खाली पडला. त्या फळ्या चिरफळ्या तुडवत राजेशाही थाटात महाव्याघ्र केशवराज एकेका पावलाने दहा दहा भूकंपाचे हादरे देत आत शिरला!

तो आवाज ऐकून अनेक गर्भगळित होऊन जिथे होते तिथेच मटकन बसले. मोठे बाप्येही दारा आडून फटीतून खिडक्या किलकिल्या करून त्या महाव्याघ्राचे रूप न्याहळीत बसले. बायांनी तर ‘राम राम’ ‘ रामकृष्ण हरीचा’ जप थांबवलाच नव्हता.
“ अरे हे नागाच आहे आपला?” कसला भारी वाघ घेऊन आलाय? भ्रम आहे सगळा!” “ अहो हा जादूटोणा आहे!” “जादूटोणा आहे ना मग घरात का लपून राहिले सकाळचा लोटा घेवून तुमी?” आं? बाहिर जाऊन वाघाच्या नको नागाच्या पाठीवर हात फिरवून ये, जा की.” हे सवाल जवाब चालूच होते. जाणती म्हणवणारी माणसे,”जगमित्राने भक्तीच्या बळावर देवालाच आणले आहे.अहो नाहीतर कोणता वाघ गळ्यात पंचा बांधू देईल?” पण हे सांगताना ह्या सर्व सज्जनांच्या कवळ्या थाड थाड आपटत होत्या.भीतीने सर्वात जास्त तेच काकडले होते. खिडक्यांची अर्धीच फळी किलकिली करून तोतरं बोलू लागले होते! दुसरा एक सांगत होता, “ अहो पंडीत, तो वाघच आहे. नागाने हवालदाराला खाऊन टाकण्यासाठीच आणलाय.” वाघ असो की विठोबा लोकांचे तर्क कुतर्क थांबत नसतात.

नागा मात्र लोकांना ओरडून सांगत होता,” लोकांनो घाबरू नका. हा वाघ कोणालाही काही करणार नाही. मी ह्याला कबूल केल्याप्रमाणे हवालदाराला द्यायला चाललोय.” इतके ऐकल्यावर लोकांनी आपली दारे खिडक्या थोड्या जास्त उघडल्या. इतकेच केले!

नागा वाघाला घेऊन पुढे गेला ह्याची खात्री झाल्यावर बरेच लोक तिकडे निघाले. एरव्ही घरात गावात वाघिणी असलेल्या बाया, राम राम म्हणत, पोराबाळांना छातीशी पोटाशी, मिठीत जवळ घेऊन स्वत:च्या तोंडात पदराचा चुरगळ घेऊन बसल्या होत्या त्या ‘वाघिणी’ही पाठोपाठ निघाल्या.

हवालदाराच्या गल्लीत, नागा वाघ घेऊन आलाय हे पोराटोरांच्या मोठ्या कालव्यावरून सगळ्यांना समजले. घरांची दारे कवाडे पटापट बंद झाली. हवालदारही घाबरून घरात लपून बसला. नागाला आपण जगमित्रावरून म्हणालो काय, त्याची हेटाळणी काय केली,आपण त्याला वाघ आणण्याची अट घालून मोठी ‘सवलत’ दिल्याचे नाटक काय केले ते आठवून हवालदाराने हंबरडा फोडायचेच बाकी राहिले होते. पण गळा काढून रडण्याचे काम त्याच्या बायकामुलांनी अगोदरच जोरजोरात सुरु केले होते!
“ हवालदार मित्रा म्हणू का हुजुर म्हणू! तू सांगितल्याप्रमाणे वाघ आणलाय. बाहेर येऊन पाहा.” नागा इतके म्हणतोय तोच वाघविठोबा नागाला हिसडा मारून हवालदाराच्या अंगणात मोठी डरकाळी फोडून उभा राहिला. फाड् फाट्ट् शेपटी आपटली आणि गुरगुरत एक फेरी मारून उभा राहिला. हे ऐकून घराघरातला गोंधळ आणखीच वाढला. काही जणांची दातखीळ बसली. हवालदाराच्या घरात पुन्हा एकच आकांत झाला. नागा पुन्हा हवालदाराला म्हणाला,” तुझ्या मुलीचे देवक बसवायचे त्यासाठी वाघ आलाय. ये बाहेर ये तो आता तुझाच आहे. “ नागा बोलला की लगेच वाघाने धडकी भरवणारी डरकाळी फोडली. नागाचे बोलणे ऐकून जागचा उठलेला हवालदार डरकाळी ऐकून खालीच कोसळला! गारठून गप्प झालेली गल्लीही आता रडू ओरडू लागली.

नागा वाघाजवळ जाऊन म्हणाला,” तुम्ही मला वाचवलेत. माझे रक्षण केले. मुख्य म्हणजे माझी गरीबाची पत राखलीत. हा हवालदार त्याच्या मुलीच्या मंगलासाठी तुम्हाला घेऊन या म्हणाला. शांत व्हा. तुमचा मूळ प्रेमळ कृपाळूपणा धरा.” इतके विठोबाला सांगून त्याच्या पाठीवर नागा हात फिरवित थांबला.
हवालदाराच्या घरातून बायको त्याला सांगत होती ते बाहेर ऐकू येत होते. “ अहो आपल्या बालबच्चांसाठी तरी बाहेर जा. तुमचे काय वय झालं आहे, होणारच आहे. बिमार पडून तरी तुम्ही जाणारच.पोरांची सब जिंदगी पडलीय अजून. आपल्या बेटीसाठीच आणलाय म्हणतो तो वाघ.जा, बाहेर जा. आम्हाला तरी वाचवा.” ते ऐकून नागाही म्हणाला,” हवालदार तू एकटाच नाही तुम्ही सगळे या. तुम्ही सगळे आबाद राहाल. या, हा वाघदेव तुम्हाला काही करणार नाही. असा वाघ कुणालाच पाहायला मिळत नसतो. हेच महिपतीबुवांच्या शब्दांत नागा म्हणतो,” जे चंद्राहूनि शीतळ बहुत। जे अमृतासीही जीववित। ते दृष्टीसी देखोनि दैवत ।भयभीत मनी का होता। नाना योग याग करिता ऋषी। लवकरी प्राप्त नव्हे तयांसी। प्राप्त नव्हते ज्याचे चरण । ते दैवत दृष्टीसी देखोन । तुम्ही का लपून बैसावे।। “

हवालदार दरवाजा हळूच उघडून भीत भीत बाहेर आला. नागाला हात जोडून करूणा भाकित बोलता झाला,” आता कृपा करूनि मजवर। वाचवी सत्वर दयाळा।” मी तुझ्याशी आकसाने वागलो. त्याचे आज मला तात्काळ फळ मिळाले. तुला जगमित्र का म्हणतात त्या मागचे सत्यही कळले. ह्या वाघाने ते समजावून दिले.तू वाघ आणून दाखवलास. आम्हा घरातल्या सगळ्यांना तुझ्यामुळे दैवताचे दर्शन घडले. माझ्या मुलीचे देवक जगमित्र नागा तुझ्यामुळेच साक्षात “देवप्रतिष्ठे”ने आज झाले.”
हवालदार आणि त्याच्या घरातील सगळी मंडळी जगमित्र नागा आणि वाघासमोर हात जोडून होती!

वाघाला घेऊन जाताना नागा हवालदाराला म्हणाला, “मी जगमित्र आहे की नाही मला ठाऊक नाही. पण तुझ्यामुळे माझे दैवत मला भेटले. तू मात्र माझा मित्र झालास. वाघ आणून दे जमीन परत करतोस म्हणाला होतास.ती जमीन माझी नाही. गावकऱ्यांना परत दे.” नागाच्या प्रत्येक बोलाला हवालदार हात जोडून मान खाली घालून हो हो म्हणत होता.
जमलेले सर्व लोकआमचा नागा खरा जगमित्र आहे असे पुन्हा पुन्हा म्हणू लागले.

नागा आपल्या जीवीच्या जीवाला, विठूरायाला घेऊन पुन्हा अरण्यात गेला. तिथे दाट झाडीत पंढरीच्या परब्रम्हाने, संतांच्या सावळ्या विठूरायाने, शंख चक्र गदाधारी चतुर्भुज रुपात आपल्या भक्ताला दर्शन दिले. नागा त्या अभूतपूर्व, अद्भुताहूनि अद्भूत,आणि डोळ्यांनाही अमृताहूनी गोड अशा सगुण साकार भगवंताकडे डोळे भरून पाहात असतानाच पांडुरंगाने त्याला प्रेमाने आलिंगन देऊन ‘आपणासरिखे केले तात्काळ!”

परिसा भागवत

बेलमाॅन्ट

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, एकनाथ तुकाराम ही नावे त्यांची चरित्रकथा, त्यांच्या जीवनातील काही घटना कुणाला माहित नाहीत? बहुतेकांना माहित आहेत. पण बरीच संत मंडळी अशी आहेत की त्यापैकी काहींची आपणास नावे किंवा प्रसंग घटना बहुतेकांना माहित नसण्याची शक्यता आहे. तर अशा काही संतांच्या मांदियाळीतील, गर्दीतील काही संतांच्या गोष्टी आपण ऐकू या. अशा गर्दीतल्या किती संतांविषयी सांगणे मला जमेल ते मला आज सांगता येणार नाही. पण सुरुवात तरी करायला काय हरकत आहे? खरंय की नाही?

आपले बहुतेक सर्व मराठी संत हे विठ्ठलाचे भक्त आहेत. वारकरी पंथाचे म्हणजेच भागवत आहेत. पण असाही एक भक्त पंढरपुरातच,तेही संत नामदेवांच्या काळातच,होऊन गेला ; तो रुक्मिणीचा भक्त होता. त्याचे नाव भागवत होते पण तो परिसा भागवत म्हणूनच ओळखला जातो.

भागवत रुक्मिणी देवीचा मोठा एकनिष्ठ भक्त होता. रोज पांडुरंगाच्या देवळात जाऊन तेथील देवी रुक्मिणीची तो मनापासून पूजाअर्चा करीत असे. त्यानंतर ध्यानस्थ होऊन तिचेच तो ध्यानचिंतन करत बसे. मग भजन करून नैवेद्य दाखवून घरी येई. घरी आले की संसारप्रपंचातील रोजचे व्यवहार चालू होत असत. भागवत मनापासून दिवसभर ‘उठता बसता खाता पिता’ रुक्मिणी मातेचे स्मरण करण्याचा प्रयत्न करत असे. ते चालूही असेल पण प्रपंचाच्या रहाटगाडग्यात अडकल्याने ते एकचित्ताने होत नाही ह्याची त्याला जाणीव होती. म्हणून तो मनात खंत करीत असे.

असाच एकदा भागवत रुक्मिणीपुढे तल्लीन होऊन ध्यानस्मरण करत बसला असता रुक्मिणीने त्याला दर्शन देऊन त्याच्यबावर कृपा केली. इथेच न थांबता ती भागवताला म्हणाली, “ भागवता बाळा तुझी काही इच्छा असेल तर सांग. आपल्याला आई रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन झाले ह्या परमानंदात असलेला भक्त भागवत म्हणाला,”आई! तुझी भक्ति अखंडित करता यावी ह्या शिवाय माझं तुझ्यापाशी दुसरे काय मागणे असणार? “ रुक्मिणीने ते ऐकून घेतले. पण भक्ताच्या मनातले त्याच्या दैवताशिवाय कोण चांगले जाणू शकते? शिवाय रुक्मिणीकांत पांडुरंगापेक्षा जगाचे व्यवहार कशावर चालतात ह्याचे तिला पूर्ण ज्ञान होते. तिथल्या वास्तवाची तिला चांगली माहिती होती. तिने भागवताला एक परिस दिला. “ आता तुझ्या भक्तीआराधनेत, भजन-पूजनात व्यत्यय नाही ना येणार?असे हसत हसत म्हणाली.

आई रुक्मिणीने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिले ह्या परमानंदात असलेल्या भागवताला देवीने परीसही दिला ह्याचा व्यावहारिक आनंदही दुप्पट झाला!

भागवताने घरी आल्यावर हर्षभरित होऊन देवळात घडलेली हकीकत आपली बायको कमळजेला सांगितली. परिस दाखवला.एका सुईला तो लावून तिचे सोने झाल्याचे पाहून दोघांचाही आनंद पोटात मावेना! भागवत निष्ठावान भक्त होता तरी त्याचे पाय जमिनीवर होते. तो बायकोला आणि स्वत:लाही सावध करत म्हणाला,”आपल्या जवळ परिस आहे हे कुणालाही कळता कामा नये. कुणापाशीही बोलू नकोस. आपण पंढरपुरी राहतो आहोत हे विसरु नकोस. इथे आणि आसपास संतसज्जनांची वस्ती आहे. त्यांना जर समजले की भागवताने रखुमाईला मागून काय मागितले तर परिस! बरं मी न मागता देवीने दिला म्हटले तरी देवी रखुमाईने सुद्धा देऊन दिले काय तर परिस! असे ते माझ्या आईलाही बोल लावतील. त्यापेक्षा गरीबासारखे गप्प बसलेले किती बरे! “

भागवताचा दिनक्रम चालू होता. नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहाने जास्त निश्चिंततेने चालला होता.त्याने परिस एकदम पहारीला लावला नाही. टाचणीलाच लावला. बाहेर वावरताना भागवताचा वेष पूर्वीचाच पण मुद्रा जरा दीनवाणी आणि वागण्यातील वृत्तीही उदास दिसू लागली. घरात सुग्रास जेवण पण बाहेर आपण कदान्न खातो असा चेहरा घेऊन वावर. तरीही, घरात रोज चांगले चुंगले, गोडा धोडाचे, दुधा तुपाचे भोजन होत असे. त्याची देहावर येणारी कांती कशी लपवली जाईल! तरी अनेक पंढरपुरकर त्या कांतीला भक्तीचे तेज मानीत. तेही खरे असणार. पण चांगल्या अन्नाचाही तो परिणाम असणारच.
भागवत हा विरक्ती दाखवत होता. काही प्रमाणात त्याच्या भक्तीचे ते फळ असेलही. पण समाजातले सज्ञान परीक्षक जन होते त्यांना भागवताला काही तरी घबाड लाभले असावे हे त्यांना जाणवत होते. जसे वक्त्याला श्रोत्यांच्या चेहऱ्यावरून आपले व्याख्यान त्यांना समजले, आवडले का ते कंटाळवाणे रटाळ होतेय हे लक्षात येते; दिव्यात तेल आणि वात आहे का नाही हे प्रकाशच सांगतो तसे चतुर, जाणत्या जनांना भागवताची विरक्ति, उदासीन वृत्ती खरी नाही असे वाटत होते.

भागवताची बायको नेहमी प्रमाणे एकदा चंद्रभागेवरून पाणी घेऊन निघाली असता तिला संत नामदेवाची पत्नी राजाई भेटली. कमळजाला पाहताच राजाई म्हणाली,” ही मी आलेच घागर भरून. मी येईतो थांब.दोघी मिळून जाऊ.” राजाई पाणी घेऊन आली. दोघी चालू लागल्या. बोलू लागल्या. मध्येच थांबायच्या. राजाईचे लुगडे साधेच. तसेच खाणेपिणेही बेताचेच. ती रोड झाली होती.अशक्त दिसत होती. राजाईकडे निरखून पाहात कमळजा म्हणाली,” राजाई कसं चाललंय तुझं? बरं आहे ना?खरं सांग. शेजारीण मैत्रिणीपाशी काही लपवायला नको. लपतही नाही.” “अगं लपवायचं काय आहे? सांगण्यासारखं वेगळं काही नाही. आमचे हे पांडुरंगाच्या भजनभक्तीतच रंगलेले. त्यातच गुंगलेले. धंदा व्यवसायाकडे पाहिजे तेव्हढे लक्ष नाही. चाललंय आमचं रुटुखुटू!”नामदेवाची राजाई म्हणाली तशी कमळजा जरा उत्साहानेच सांगू लागली,” “ ह्यांनी रुक्मिणीची भक्ति केली. आमचं बरे चाललेय बघ.”दोघी पुढे निघाल्या. चालता चालता कमळजा सांगू लागली,” अगं भावजींना म्हणावे ज्या झाडाला ना फूल ना फळ लागत नाही त्याला पाणी घालून व्यर्थ का शिणावे? विहिरीसी न लागता जीवन। व्यर्थच उकरायाचा शीण। तेवी प्रसन्न न होता रुक्मिणीरमण। कासया करावे आराधन।। अगं जो सोयरा लग्नमुंजीतही आहेर देत नाही त्याला कोणी कधी बोलावते का? पंढरीनाथाचे इतके भजन करूनही जो आपल्या भक्ताची साधी रोजची पोटापाण्याची चिंता सोडवत नाही त्याची भक्ती का करावी? ती काय कामाची? “इतके कमळजा राजाईला बोलली तरी तिला राजाईबद्दल प्रेम होते.,कमळजाचे घर आले. ती राजाईला म्हणाली, “आत ये, जरा थांब.” कमळजा आत जाऊन परिस घेऊन आली. “माझ्या नवऱ्याने रखुमाईची अनन्यभावाने भक्ती केली. ती माऊली प्रसन्न झाली. तिने आम्हाला हा परिस दिला”हा परिस घे. तुझी गरज भागव. लागलीच मला परत आणून दे. काहीही झाले तरी परिस मला द्यायला विसरू नकोस. माझी तुला विनवणी आहे ही. येव्हढे चुकवु नकोस. आपल्या दोघींच्याही नवऱ्यांना यातले काही समजू न देता सगळे लवकरझाले पाहिजे. कसेही कर पण परिस आणून दे.”
राजाई हरखून गेली होती. घरी आली. घरातल्या सुया कातऱ्या किल्ल्याना परिस लावून सोन्याच्या केल्या. त्यातलेच किडुक मिडुक सोनं घेऊन सोनाराकडे गेली. सोने देऊन द्रव्य घेतले. राजाई, गोणाई, कमळजा काय सर्व बायकाच. राजाई पहिल्यांदा वाण्याकडे गेली. संसाराला लागणारे धान्यधुन्य. पिठ मिठ, तेल तिखट, गूळ पोहे, खारिक खोबरे, हिंग जिरे खडीसाखर बत्तासे सर्व काही घेतले.

नामदेवासाठी धोतर अंगरखा, मोठे पागोटे; मुलांसाठी कापड चोपड, जनीसाठी लुगडे खण आणि सर्वात शेवटी स्वत:साठी अगदी बेताची जरीच्या काठा पदराचे साधेच लुगडे आणि खण घेऊन घरी आली. चारी ठाव स्वैपाक केला. भांडी कुंडी रचून मांडणीवर ठेवली. केरवारे आटपुन नवे लुगडे नेसून नामदेवाची वाट पाहू लागली.

दोन प्रहरी नामदेव आले. जेवायला बसण्यापूर्वी स्वैपाक, धान्य,गूळ खारका खोबऱ्यांनी भरलेले डबे वगैरे पाहून आणि सर्व नवऱ्यांप्रमाणे सगळ्यात शेवटी राजाई आणि तिच्या नव्या लुगड्याकडे पाहून त्यानी विचारले,” ही सगळी इतकी सामुग्री कशी आली घरात?” राजाई काही बोलेना ना काही सांगेना. मग इकडून तिकडे वळणे घेत बोलू लागली. नामदेव म्हणाले,” खरे काय ते स्पष्ट सांग.नाहीतर मी जेवणार नाही.” राजाई रडवा चेहरा करून रुक्मिणीने आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन भागवताला परिस दिला. कमळजाने मैत्रिण म्हणून आपल्याला गरज भागवण्यापुरता तो दिला.कुणालाही, तुम्हालाही आणि भागवतभाऊंनाही ह्यातले काही कळू न देता झाले पाहिजे अशी सर्व हकीकत सुगतवार सांगितली. हे इतके सांगूनही फारसे बिघडणार नव्हते. पण आधीच रडवेला झालेला चेहरा आता केव्हाही रडू कोसळेस असा होतसा ती नामदेवाला म्णाली,”तुम्ही विठ्ठलाची लहानपणापासून इतकी भक्ती करता; त्याचे दिवसरात्र भजन कीर्तन करता पण घरात खायला ल्यायला पुरेसे नसते; मग त्या पांडुरंगाची भक्ती काय कामाची? असे तिने जेव्हा विचारले तेव्हा सगळे गाडे बिघडले आणि घसरले!

नामदेव शांत खरे पण आता थोडे रागानेच उत्तरले,” विठा नारायणाची आई,आपल्याला विठ्ठलाची भक्ती पुरेशी आहे. त्याची भक्ती करता येणे,करणे हीच त्याची आपल्यावर कृपा आहे.ही असली किमया काय कामाची? मला तो परिस बघू दे.”राजाईने भीत भीत तो परिस नामदेवा हाती सोपवला. नामदेव तसाच उठला आणि चंद्रभागेकडे निघाला. तिथे जाऊन त्याने तो परिस नदीत भिरकावून दिला!

नामदेवाच्या मागोमाग राजाई रडत ओरडत,” अहो तो परिस मला कमळजेला दिला पाहिजे. मला द्या तो. नाहीतर तिला शिक्षा भोगायला लागेल. माझ्यामुळे कमळजेला किती त्रास भोगायला लागेल हो! अशी रडत भेकत विनवणी करीत चालली होती.पण नामदेव पार पुढे गेले होते.

नदीकाठी नामदेव पांडुरंगापुढे आपल्याला दोष देत बसले होते. नामदेवांच्या लहानपणापासूनच्या सवयीप्रमाणे आताही ते विठ्ठलाशी बोलत होते. “पांडुरंगा !विठ्ठला,मायबापा!अरे तू मला ह्या मोहा्च्या उपाधीत कसे पाडलेस रे! राजाई झाली तरी ती म्हणजे मीच ना? आम्ही दोघे वेगळे नाहीत पांडुरंगा.तिला मोह झाला असे कसे म्हणू विठ्ठला ! पाणी आणि त्यावरच्या लाटा वेगळ्या असतात का? सूर्य, प्रकाश,आणि किरणे ही वेगळी कशी विठ्ठला? मोह मलाच झाला. ह्या उपाधीत मीच सापडलो ह्यातून मला बाहेर काढ.” असे म्हणत ्सताना तो येई हो विठ्ठले माझे माऊली ये असा धावा करत, उन्हाची तिरिप चुकवण्यासाठी, ‘निढळावरती ठेवूनी कर’, ‘झळकतो का गगनी पितांबर’ हे मोठ्या आशेने पाहू लागला. नामदेवाचे पांडुरंगाशी संभाषण चालू होते.

कमळजेच्या घरी दुसरेच रामायण घडत होते. परिसा भागवतही घरी आला होता. आल्यावर देवपूजेला बसला. अलिकडे लागलेल्या सवयीमुळे देव संबळीतून काढताना त्याला आपला’प्राण’परीस हाताला लागला नाही; डोळ्यांना दिसला नाही.”बाहेर काढला होता का? कशासाठी काढला? कुठे ठेवला?” असे एकापाठोपाठ एक प्रश्न कमळजेला विचारू लागला.कमळजा गोंधळली.पण अखेर तिने आपण तो परिस नामदेवाच्या राजाईला दिला. ती आता लगेच येईलच. आणून देईल.असेसांगितले. ते ऐकून परिसा भागवत कमळजेवर चिडूनम्हणू लागले ,”अगं तो परिस आहे परिस! चिलिम पेटवायची गारगोटी नाही ती. काय समजलीस? रोज चूल पेटती ठेवून गोड खाऊ घालणारी अन्नपूर्णाआहे ती? , “माझे आई! ती राजाई येण्याची वाट पहात बसणार का? तूच ताबडतोब जा आणि घेऊन ये आपला परिस.”

कमळजा धावत पळत राजाईकडे आली. राजाई रडत असलेली पाहून तिच्यापोटात धस्स झाले. राजाईला तिने का रडतेस असे विचारल्यावर तिने नामदेव परिस घेऊन चंद्रभागे तीरी गेला असे म्हटल्यावर कमळजाही छाती पिटीत रडू लागली.
दोघीही रडत रडत नदीकडे निघाल्या. दोन भक्तांच्या बायका रडत भेकत निघाल्या हे पाहून आजूबाजूचे, शेजारी पाजारीसगळे त्यांच्या मागू नदीकडे निघाले. हा हां म्हणता “ परिसा भागवताचा परिस नामदेव घेऊन नदीकडे गेलाय!” नामदेवाने परिसा भागवताचा परिस हाडपला!” “नामदेव परिस कमरेला बाधून चंद्रभागेवर भजन करतोय.” ह्याच्याही पुढे “नामदेव भागवताचा परिस घेऊन पंढरपुरांतून पळून गेला!” अशा नाना तऱ्हेच्या बातम्या अफवा पसरल्या.हे ऐकून परिसा भागवतही लगोलग चंद्रभागेच्या तीरी आला.

काठावर नामदेव शांतपणे विठ्ठल भावात दंग होऊन बसले होते. त्यांना पाहिल्या बरोबर नामदेवाकडे बोट रोखून, मधून लोकांकडे पाहात भागवत म्हणाला,” नामदेवा! हे बरे नाही केलेस.माझा परिस चोरून घेतोस आणि इथे येऊन विठ्ठल भक्ती करतोस.अरे बगळाही इतक्या ढोंगीपणाने ध्यान करणार नाही. मुकाट्याने माझा परिस मला दे.” पहिल्यांदा नामदेव काहीच बोलला नाही. पण रीतीप्रमाणे लोक आपल्याला वाटते ते बोलू लागली.

काही जण,” बघा बघा! संत म्हणवणारे कसे भोंदू असतात !त्या परिसा भागवताचा परिस हाडपलाय आणि आता भजनाचे नाटक चाललेय!” तर दुसरे काही,” अरे हा भागवत तरी कसला! हा स्वत:ला हीन दीन दाखवत
पडलेला चेहरा घेऊन वागत होता. पण बघा आता! परिस असल्यामुळे सोने करून रोज पंचपक्वान्नांचे जेवण हदडित होता. अहो पाहा पाहा! त्याच्या चेहऱ्यावरची तुकतुकी चमक पाहा.” “ नुसते फाटके धोतर आणि अंगावर मळका पंचा पांघरला की माणूस गरीब दिसेल पण गरीब होत नाही. आता परिस गेल्यावर नामदेवावर चोरीचा आळ घेतोय.व्वाह!” तर काही नामदेवाला दोष देऊ लागले. दुसरे आणखी काही जन,” अहो आपण सामान्य माणसं. भक्ती परमार्थ काय समजतो आपल्याला? ही स्वत:ला संत म्हणवून मिरवणाऱ्यांची कामे.आपल्याला नक्की काय माहित असणार आहे? पण एक विठ्ठलाचा लाडका भक्त म्हणवणारा आणि दुसरा रुक्मिणीचा नि:सीम सेवक म्हणवणारी ही देवाची दोन माणसे चार चौघात आरोप प्रत्यारोप करताहेतह्याचा अर्थ दोघांतही काही तरी बरेवाईट असणार !”

नामदेव शांत पण ठामपणे म्हणाला,”परिस माझ्या काय कामाचा? मी तो नदीत फेकून दिला!”त्यावर परिसा पटकन म्हणाला,” तुमच्या कामाचा नव्हता तर माझा मला परत करायचा!”लोक हो हो म्हणू लागले. नामदेव त्यावर उत्तरला, “ भागवता, तुम्ही स्वत:ला विरक्त, संसारात उदास म्हणून दाखवत,व्यवहार करीत होता. तुम्हाला तरी तो कशाला हवा? मी चोरून माझ्यापाशी ठेवला नाही. नदीत फेकून दिला.पाहा नदीत;शोधा. “ “अरे वा! फेकणार तुम्ही आणि शोधायचा आम्ही? तोही ह्या चंद्रभागेच्या तळातल्या वाळूरेतीत? नामदेवा तू टाकलास तूच शोधून काढ.”

हे ऐकून नामदेवांनी चंद्रभागेत मोठी बुडी घेतली. काही वेळाने ते वर आले ते ओंजळभर वाळू घेऊन. ते परिसाला म्हणाले,” परिसा भागवता, ह्यातला तुझा परिस कोणता तो घे!” भागवत कपाळाला हात लावून बोलला,” नामदेवा चंद्रभागेच्या ह्या वाळू गोट्यात कुठे माझा परिस असणार?” पण आता उत्साह संचारलेल्या एकदोघांनी लगेच जाऊन सुया टाचण्या आडकित्ते आणले. नामदेवाच्या ओंजळीतल्या वाळूरेतीला लावून पाहू लागले तर कशालाही ती वस्तु लावा सोन्याची झाली. सगळ्या वस्तु सोन्याच्या झाल्या! वाळूचे सोने झाले! लोकांमधून ओSSSह असा मोठा उदगार उमटला!

नामदेव आपली वाळूने भरलेली ओंजळ पुढे करीत प्रेमळपणे म्हणाले, “परिसा हेघे तुझे परिस!” परिसा भागवत ओशाळला. खाली मान घालून गप्प झाला. नामदेवांना हात जोडून म्हणाला, “नामदेवमहाराजा, रुक्मिणीमातेने दिलेल्या एका परिसाने फुगलो होतो. आज तुमचा हातच परिस आहे हे मलाच काय सर्वांनाच पटले आहे. तुमचा हा कृपेचा हात ज्याला लागेल त्याच्या आयुष्याचे सोने होईल! आपल्या कृपेचा हा वरदहस्त माझ्या मस्तकी असू द्या म्हणजे सर्व काही भरून पावलो!”

संतकवि महिपतीबुवांचा परिसा म्हणतो, “तुमचे चरण लागती जेथे। सकळ ऐश्वर्य ओळंगे तेथे। आता परिस नलगे माते।अभय हस्ताते चिंतितो।।”

( महिपतीबुवांनी ओव्यांतून सांगितलेल्या कथेतील मध्यवर्ती कल्पनेवर आधारित)

फ्रॅन्क काप्रा

सणासुदीचे दिवस आले की सगळ्यात मोठा बदल होतो तो राशि- भविष्यात. सर्व राशींच्या लोकांचे एकगठ्ठा चांगभले होऊ लागते.कालपर्यंत ज्यांच्या पाठीमागे साडेसाती होती, कुणाला राहू गिळू पाहात होता, कुणाच्या मानगुटीवर केतू बसला होता आणि ‘कन्या’राशींच्या मंगलकार्यात मंगळ खदिरांगार डोळ्यांनी पाहात होता त्या सर्वांची भविष्ये इतकी उज्वल होतात की त्यांना हा काय चमत्कार असा आनंद होतो. दिवाळीचे दिवस तर आनंदाचे होतातच पण पुढचे वर्ष कसे आहे ह्याचीही काळजी मिटलेली असते! दिवाळीत जशी सुखदायी नाटके आणि कौटुंबिक सिनेमांची गर्दी होते तसे इकडेही नाताळाचे वेध लागले की कौटुंबिक आणि आनंदी आनंद गडे अशा ख्रिसमसवर आधारलेल्या नव्या जुन्या सिनेमांची लाट येते.

परवा मी एक फार पूर्वीचा पण सदाबहार It’s Wonderful Life हा उत्कृष्ट सिनेमा पाहिला. मुद्दाम black and white पाहिला. ह्या सिनेमाचे नंतर अनेक वेळा रंगीतीकरण झाले आहे. ह्याचे दिग्दर्शन लेखन पटकथा प्रख्यात दिग्दर्शक Frank Kapraचे आहे. सिनेमा उत्कृष्ट आहे ह्यात शंकाच नाही. फ्रॅंक कापराला सहा वेळा Oscar मिळाले आहे. त्यात दुसऱ्या महायुद्धावरील डाॅक्युमेंटरीचा समावेश आहे. त्याच्या सिनेमांना नऊ पेक्षा जास्त वेळा ॲकॅडमी अवाॅर्डसाठी नामांकन मिळाले आहे. त्याने पूर्ण लांबीचे चित्रपट, लघुपट, डाॅक्युमेंटरीज वगैरे एकंदर ५८ चित्रपट काढले. ह्यात तो लेखक पटकथाकार, संवाद लेखक निर्माता अशा विविधरूपाने आहे. तो चांगला लेखकही होता. त्याच् It Happened One Night, Mr.Smith goes to Washington, Mr. Deed Goes to Town, You Can’t Take It With You, Lost Horizon(James Hiltonच्या कादंबरीवरील)ह्यासारखे बरेच चित्रपट गाजले. त्याने मूकपटाच्या काळापासून बोलपटाच्या सुवर्णकाळातही काम केले आहे. क्लार्क गेबल, जेम्स स्टीवार्ट, कॅरी ग्रॅंट, गॅरी कूपर, बेटी डेव्हिस. क्लाॅडेट काॅल्बर्ट, बार्बरा स्टॅनविक अशा त्या काळच्या अनेक नामवंत नट-नट्यांनी त्याच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे.

अमेरिकेतील बरेच नामवंत हे युरोपियन देशातून आले तसा काप्राही वयाच्या सहाव्या वर्षी इटलीतल्या सिसिलीहून आपल्या आईवडील बहिण भावंडांबरोबर अमेरिकेत आला.

लहानपणी लाॅस एन्जल्सच्या रस्त्यावर वर्तमानपत्रे विकून हा शाळेत जायचा. पुढे हायस्कूलचे शिक्षणही लहान सहान नोकरी करत पुरे केले. हा नंतर कॅलटेक इन्स्टिट्यूट मधून इंजिनिअर झाला. काॅलेजचे शिक्षणही घरची मदत व नोकऱ्या करूनच पूर्ण केले. हायस्कूलच्या अखेरच्या वर्षांपासून त्याला कवितेची आवड व गोडी निर्माण झाली. ती इंजिनिअर होत असतानाही त्याने ती जोपासली. पुढे तो लिहू लागला. पण नंतरच्या चढउताराच्या दिवसात त्याला वाटायचे की आपला मित्र एडवर्ड हुबल/हबलसारखा मीही शास्त्रज्ञ,खगोल शास्त्रज्ञ झालो असतो तर किती बरे झाले असते! हो तोच प्रख्यात ‘हबलची दुर्बिण’ वाला हुबल/हबल ह्याचा मित्र होता. ते दोघेही त्याच कॅलटेक इन्स्टिट्यूटमध्ये होते.

फ्रॅन्क काप्राला सिनेमा, सिनेमाच्या शक्तीचा फार अभिमान होता. वर्तमानपत्रकारालाही असाच अभिमान असतो. काप्रा म्हणतो: “ No saint, no pope, no general, no sultan ever has the power to talk to hundreds of millions of people for two hours in the dark.”
मला जाणवली ती गोष्ट म्हणजे ह्या वाक्यातील सेंट, सुलतान पोप वगैरे इंग्रजीत छापलेल्या शब्दांची सुरवात ठळक अक्षराने (Capital letterने होत नाही!)

त्याला लोकांविषयी नेहमी जवळीक वाटायची. सामान्यमाणसाला त्याचेही महत्व मोठे आहे तो कोण आहे हे त्याला समजून दिले पाहिजे असे वाटे. तो म्हणतो : “ Someone should keep reminding Mr.Average Man that he was born free, divine and strong And that goodness is riches, kindness is power and freedom is his glory.”

सिनेमाविषयी,विषयीची त्याची वचने अनेक आहेत. त्यासाठी त्याचे आत्मचरित्र Name Above the Title वाचावे लागेल. त्याने Cry Wilderness कादंबरीही लिहिली आहे. त्याशिवाय त्याच्या काही सिनेकथा व पटकथांचीही पुस्तके आहेत.

फ्रॅन्क कापरा, अनेकांप्रमाणे,हुकुमशाही दडपशाही जुलुमी सत्ता मग ती कोणाचीही,कोणत्याही ‘इझम’ ची असो त्याचा विरोधक होता. सामान्य लोकांचे कल्याण ह्वावे, त्यांच्यासाठी कल्याणकारी दृष्टिकोन व धोरणाचे सरकार असावे असे त्याला वाटे. त्याबरोबरच सर्वांमध्ये एकमेकांविषयी सामंजस्य प्रेम असावे हे त्याचे मत होते. तो सिनेनिर्मिती संबंधात सांगतानाही म्हणतो,” Mankind needed dramatization of the truth that man is essentially good, a living atom of divinity; that compassion for others, friend or foe, is the noblest of all virtues.” Films must be made to say these things, to counteract violence and to demobilize the hatreds.” एखादा मराठी संत इंग्रजीत बोलतोय असे वाटते!

परवा एका लेखकाने अशी आशा व्यक्त केली की May Capra never go out of style.
मी आणि संजीवनी अमेरिकेत आलो त्यावेळी सुधीरकडे आम्ही असाच डिसेंबरमध्ये सदाबहार उत्कृष्ट Miracle on the 34 Street सिनेमा पाहिला होता.

माणसाला त्याच्या चांगुलपणाचे पारितोषिक मिळवून देणारी एका ‘ प्रेमाच्या गावात’ घडलेल्या साध्या सुंदर सिनेमावरून लिहिणे झाले.

असेल माझा हरि तर….

म्हातोबा म्हणजे म्हातोबाच. तोच तसा असू शकतो. आता सकाळचे सहा वाजले.म्हातोबा झोपलेला. बायको उठलेली. चूल पेटवून चहाला पाणी ठेवून ती मागच्या अंगणातल्या चुलाण्यावरच्या हंड्यात पाणी तापवत ठेवून आली.गरम पाण्यात चिमूट दीड चिमूटभर चा ची पत्ती टाकली. लहान गुळाचा खडा टाकला. गप्प बसून राहिली. चा उकळला दिसतंय. दोन्ही हाताने भांडं पटकन खाली उतरवलं. हुळहुळणारी बोटं पदराला चोळली.जर्मलच्या बगुण्यातलं चमचा दोन चमचं असंल दूध ओतलं. पितळीत चा ओकून गरम गरम पिऊ लागली. चा लालभडक असनं का पण लई गुळचाट ग्वोड होता त्याचाच म्हतोबाच्या सवाईला पोटभर जोर आला. सात वाजले. म्हातोबा झोपलेला. आठ वाजले, नऊ झाले, दहा कधीच होऊन गेले. म्हातोबा झोपलेलाच होता. हे काही आजचे नव्हते. रोजचेच. अकरा वाजले आणि डोळे किलकिले करत म्हातोबा पांघरूण नाकापर्यंत खाली आणून बघू लागला. हात पाय ताणत तो उठला.

म्हातोबा उठला म्हटल्याबरोबर सवाई लगबिगिनं बाहेर गेली. दुकानात जाऊन अधेलीभर दूध,पावबटेर आणि भाकरीचं पीठ आणि बेसन व गुळाचा मोठा खडा घेऊन आली. दुकानवाला दसऱ्या म्हातोबाचा दोस्त.तोम्हातोबा कडून पैसे घेत नसे.
म्हातोबाने पावबटेर बरोबर पितळी दोन पितळीभर चहा रिचवला. आंघोळ केली.सवाईला म्हणाला, “सवाई, अगं दनक्यात भूक लागलीय. काही हाये का चावायला. बायकोने भराभरा गरम भाकऱ्या आणि चून वाढलं. म्हातोबा मांडी ठोकून बसला. बुक्कीनं कांदा फोडला. तीन चार भाकऱ्या रिचवल्या. डाईरेक्ट तांब्यातूनच पाणी घटाटा प्याला. डोक्याला मुंडासं आवळून गुंडाळलं. खांद्यावर गमचा टाकून बाहेर पडला. मोठी फेरी मारून भूक लागली म्हणून घरी परतला.

रात्र झाली. होणारच ती. म्हातोबाला झोप येऊ लागली. तीही येणारच होती. म्हातोबा व त्याची सवाई पांघरूणात थोड्यावेळ खुसखुस बोलत राहिली. दोघंही झोपली. पण आज दसऱ्याला मात्र झोप येत नव्हती. “ ह्या म्हातोबाला काय करायचं ? काही काम करत नाही की कसला धंदाही बघत नाही. काही कर म्हटलं तर,” अरे माझ्या दोस्ता! हे बघ काम धंदा सर्वेच करत्यात. मला भूक-झोप-भूक थोडी एक चक्कर मारून येणं. वाटेत कुणी काही उचलून दे, हात लाव रे पाटीला, त्ये पोतं तिथं ठेवतोस का म्हटलं तर तसलं काही कराव. दमलो म्हणून भूक लागली म्हणत घरी यावं भाकरी, मीठ चटणी असेल त्या संगट खावं. झोप येत्येच बघ. अरे असल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणत गप झोपायचं बघ.”असं भाषाण ऐकवतो. पण मी दोस्त म्हणून मागेल ते देतो येव्हढं म्हणायचं इसरला. नेहमीच इसरतो. काही नाही. आता त्याला फुकट नाही द्यायाचं काई.असं ठरवलं आणि दसऱ्याला झोप आली.

रोजच्या प्रमाणे सकाळ झाली. रोजच वाजायचे तसे सहा, सात…नऊ, दहा वाजत वाजत अकरा वाजले. म्हातोबा उठण्याच्या तयारीत की त्याची लाडकी सवाई दुकानाकडे गेली.  “ रोजचंच सामान द्या भावोजी.”असे सवाई म्हणाली. आणि दसऱ्याच्या कपळावरआठ्यांचे जाळे पसरले. “ह्ये बघा, म्हात्याला सांगा आता फुकटचं काई बी मिलनार न्हाई. काम कर म्हनाव. मी दोन खोल्या बांधणार आहे. त्यासाठी डोंगरातल्या खदानातून दगड आणले त्यानं तर चार पैशे मिळतील.सांगा त्येला. तुमी तरी समजावा त्याला वैनी.”

वैनी नुसतीअर्धवट मान डोलवून आली. सवाईनं आज दोस्तानं काई दिलं नाही आणि काम केल्या बिगर फुकट मिळणार नाही सांगितलं. नंतर तिने दसऱ्या नवीन खोल्या बांधतोय त्यासाठी मोठे दगड आणून दिले म्हातोबाने तर त्याला चार पैसेही मिळतील; हा निरोपही सांगितला. ते म्हातोबानं सगळे ऐकून घेतले. नंतर म्हणाला, ते मोठ मोठे हैदर आणणं सोपं न्हाई. फार मेहनत पडते. हातच मोडंल माझा. सवाये, अगं ‘असंल माझा हरि तर देईल खाटल्यावरी!” काय?” सवाईने खरं खरं म्हणत निमूटपणे मान हलवली.

घरात होतं त्यात चा,जेवण केलं.म्हातोबा तोपर्यंत आंघोळ करून आलाच होता. रेट जेवल्यावर थोडा पडला आणि मुंडासे बांधून बाहेर पडला. भेटेल त्याच्याशी बोलत चालत गावाबाहेर आला ते त्याला समजलेही नाही. फक्त एक लांब पांढऱ्या दाढी मिशा असलेला म्हातारा तट्टावर बसून येताना दिसला. दिसला खरा पण तो मोठ मोठ्याने “अरे गाढवाच्या थांब थांब होSs होSS अरे गाजऱ्या ये गाजऱ्या थांब”असं घाबरून ओरडत वेगाने धावत सुटलेल्या गाजऱ्या तट्टाला लगाम ओढून ओढून ओरडत होता. पण गाजऱ्याच्या अंगात आल्यासारखे वेडे वाकडे उधळत चालला होता. तेव्हढ्यात म्हाताऱ्याच्या हातून लगाम सुटला. त्याची मांड सरकली. म्हातारा पडतोय की काय असे वाटत होते. तितक्यात म्हातोबा जोरात पळत त्या गाजऱ्या तटटापुढे घट्ट ऊभा राहिला. एक मोठी उडी खाऊन गाजऱ्यावर धावुन गेला. लोंबकळणारा लगाम पकडून खेचला. गाजऱ्याच्या तोंडावर दोन बुक्के मारले. लगाम फार जोरात खेचला की गाजऱ्याच्या तोंडातून फेसा बरोबर खरचटल्याने रक्तही आले. तट्टू थांबले. पण अजून थयथयाट चालू होता. म्हातारेबुवाही सावरले होते. म्हातोबा तट्टाच्या मानेवरून घसरत उतरला. गाजऱ्यापुढे जाऊन उभा राहिला. त्याच्या कपाळावरून, डोक्यावरून हात फिरवित म्हाताऱ्याकडे पाहात राहिला. गाजऱ्या शांत झाला होता.

म्हातारा म्हणाला,” इकडे बरेच टोळ भैरव येत असतात. गांज्या चिलिम ओढत बसतात. पण लेकरा तू कधी मधी दिसतोस. पण कुठे झाडाखाली डुलकी घेत पडलेला मी एक दोनदा तुला पाहिलाय.” “ बाबा, तुम्ही मायाळू दिसता. पर मला आता लई जोराची भूक लागलीय. जातो.” “ अरे पोरा थांब. तू माझा जीवच वाचवलास की आज. तुला मी काही द्यावं म्हणतो. देवानीच तुला पाठवलं. दमाझ्यापाशी आता तर काई नाई बग.देवच तुलाबी काही दिल. हां पण तू माझ्या संगट डोंगरावर चल. तिथे तुला दावतो द्येतो. बघ. चल.” “ अवो बाबा. ते डोंगराचं उद्या बघू. आत्ताच्या भुकेचं पाह्यला पाहिजे. मला घरी जाउ द्या. तुम्ही मायाळू वाटता, यव्हढी माया करा माझ्यावर.” म्हाताऱ्याने काही ऐकलं नाही. शेवटी कुरकुरत का होईना म्हातोबा आणि तो म्हातारा डोंगरावर आले. तिथे एक झाड होते. काही मोठे दगड होते. म्हातारा म्हातोबाला म्हणाला,” तो मोठ्ठा दगड हलव. म्हातोबा मनात म्हणाला माझ्या दोस्तासाठी दगड वाहून आणायला नको म्हणालो आणि ह्या म्हाताऱ्याचे दगड हलवत बसायलो मी. पण म्हातोबाने तो मोठा दगड हलवला. म्हातारा म्हणाला, “ तिथली पानं बाजूला करून खाली काय ते पाहा.” म्हातोबाने पाने हलवली . त्याला मोठे मोठे सहा पेटारे दिसले. म्हाताऱ्याने न सांगता त्याने ताकद लावून पेटाऱ्याचे झाकण उघडले.

कुंईकर्र्कर्र करत झाकण वर नेले. आत चांदीच्या मोहरा! दुसरी पेटी तिसरी पेटी करत साही पेट्या म्हातोबाने उघडून पाहिल्या सगळ्या पेट्या चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या! म्हातोबाने एकेक पेटारा पक्का बंद करत पहिली पेटी बंद करताना थोडी नाणी हातात घेऊन म्हातारेबाबांना ,” अहो बाबा! हे काय?”असं मागे वळून विचारले तर म्हातारे बाबा नव्हते. गाजऱ्या तट्टूही नव्हते.कुठे गेला बाबा म्हणत ती नाणी मोजली सहा नाणी होती. खिशात टाकली पेटारा घट्ट बंद केला. वर पहिल्यासारखी सगळी पानं पसरली. तो ‘मोठ्ठा हैदरचा बाप’असा दगड ठेवला. आणि भूक लागलेली दमलेला म्हातोबा खाली येत झाडाखाली पडला. पडला तर झोपलाच. बऱ्याच वेळाने उठला. त्या पेट्या ती नाणी तो दगड सगळे स्वप्न होते की काय असे त्याला वाटले. उठला. जाऊ द्या काय करायचे आपल्याला म्हणत भुकेला म्हातोबा घराकडे निघाला. चालता चालता त्याला खिशात काहीतरी खळखुळ वाजतेय असे वाटले म्हणून खिशात हात घालून पाहिले तर तीच चांदीची सहा नाणी! अरेच्या सगळे खरेच होते. स्वप्न काहीच नव्हते. म्हातारे बाबाही खरेच होते. घरी आल्यावर म्हातोबा रेट जेवला. सवाईही जेवली. दोधे पांघरुणात खुसुखुसु बोलत होते. पण आज चांदीच्या नाण्याची खुसखुस होती. म्हातोबा घोरू लागला.रोजचा सूर्यच आजही उगवला. सहा, सात, आठ…दहा वाजून गेले. म्हातोबा आजही अकरा वाजताच उठला.

लगेच सवाई दुकानाकडे निघाली.म्हातोबाच्या दोस्ताला नेहमीच्या वस्तु मागितल्या पण रवा तूपही घेतले. हे पाहून दसऱ्याने आठवण दिली आता फुकटचे जिन्नस बंद. सवाई न बोलता हसली. “ किती झाले?” “चार नाणी” दसऱ्या तुटकपणे बोलला. सवाईने ठसक्यात पदराची गाठ सोडून चार नाणी दिली. दसऱ्यातील दुकानदाराने तिने पुन्हा पदरात बांधलेली दोन नाणीही पाहिली होती. पण सर्व पाहताना त्याच्या तोंडाचा आs झाला होता. सावरून त्याने हे कसे काय झाले ते विचारल्यावर आज रात्री दुकान बंद केल्यावर घराकडे या. तुमचे दोस्त सांगतील समदं” असे म्हणून पदर जोरात फडकावत तो कमरेला खोवत घरी आली. आज म्हातोबाला भाकरी बरोबरच गुळाचा सांजाही तगडा खायला मिळाला.

रात्री दसऱ्या आला. म्हातोबाने डोंगर, भले मोठे दगड, त्याखली पाने त्यांच्याखाली लपवलेले सहा पेटारे चांदीची नाणी भरलेली सगळे सगळे सांगितले.दोस्त दसऱ्या हरखून गेला. तो म्हणाला,” म्हातोबा! …म्हातोबाला आपला म्हात्याच म्हातोबा झाला हे ऐकून हसू आले. “ म्हातोबा, माझ्याकडे बैलगाड्या आहेत. बैलाच्या जोड्याबी दांडग्या आहेत. माणसं आहेत. आपण दोघे जाऊ या उद्या रात्री. पेट्या आणू. तुझ्या तीन पेट्या माझ्या तीन पेट्या. काय पटतंय का?” “ अरं दोस्ता न पटायला काय झालं? तू आनं मी दोस्त हाहोत. है की नै?” दसऱ्याने मान डोलावली.

म्हातोबा आणि त्याची लाडकी सवाई जेवण करून झोपले. इकडे दोस्त दसऱ्याला काही झोप येईना. रात्रभर विचार करत होता. बैल जोड्या, गाड्या माझ्या. माणसंबी माझीच. मेहनत माझी. म्हात्या नुसता पाटलावानी येणार. हिथं तिकडं न्हाई. हां हिथं सांगत हुकुम देणार. इतके दिस त्याला पोसलं . आताही तीन पेटारे त्याचे? ह्ये काई खरं नव्हं” असे म्हणत त्याला पहाटे डोळा लागला.

सकाळ झाली. कालच्या सारखाच आजही सूर्य ऱ्उगवला. सहा,सात , आठ नऊ …. दहा केव्हाच होऊन गेले. म्हातोबा आजही अकरा वाजताच उठला. आज काही सवाई दुकानाकडे गेली नाही. चहात कालपासून दूध जास्त पडत होते. गुळाचा खडाही मोठा टाकत होती. भाकरी बरोबर आता भाजी होती. दुपारी गुळाचा गरम गरम सांजा व्हायचा चा बरोबर. दसऱ्या रात्री येणार होता. सवाई म्हातोबाला आठवण करत होती. रात्रीचे नऊ वाजले. दहा वाजले. दसऱ्या दोस्ताचा पत्ता नाही. सवाई म्हणाली ,”अकरा झाले की!” म्हातोबा म्हणाला, “येव्हढं काय त्यात, उद्या येईल. दुकानाची कामं काय थोडी असतात? हिशोब ठिशोप असत्यो.चला मला झोप आली”. दोघेही गाढ झोपी गेले.

दसऱ्या दुकानदार दुकान लवकरच बंद करून बैल गाड्या जोडून माणसं बरोबर घेऊन डोंगराकडे निघाला होता . रात्र काळी झाली होती. दसऱ्याने सगळे बारिक लक्षात ठेवून काम सुरू केले. तास दोन तास झाल्यावर ते मोठ्या दगडाचे झाड सापडले. मग पुढची कामं सुरू झली. शेवटी पेट्या दिसल्या. तोपर्यंच चंद्राची कोर उगवली होती. पेटारा उघडून पाहिला. दसऱ्याने हात घालून पाहिला. नुसता चिखल माती खडे गोटे! अरे, दुसरा पेटारा उघडला. दसऱ्याने स्वत:च पुन्हा हात घातला. तेच मटेरियल! नंतर तिसऱ्या पेटीत माणसाला हात घालून पाहायला सांगितले. दगड माती चिखला शिवाय काही नव्हते . साही पेट्यात तीच सोनमाती! दसऱ्या मनात म्हणाला लेकाचा म्हात्या मला हासत असंल झोपत बी!” पण दसऱ्याही साधा नव्हता. त्येबी लई खारबेळं होतं त्याने गाड्यात पेटारे चढवले. सगळे निघाले. रात्रीचे तीनचार झाले असतील. दसऱ्याने सगळे पेटारे म्हात्याच्या घराच्या दारासमोर खिडकी समोर त्या पेट्या ओतून रिकाम्या करायला लावल्या. प्रचंड उंच ढिगारे झाले होते. “आता बस घरातच कोंडून. झोपूनच राहा म्हात्या आता!” म्हणत दोस्त दसऱ्या चडफडत आणि इतर सगळे निघून गेले.

सकाळ झाली. सूर्य तोच सकाळही तशीच. आणि म्हात्या झोपलेलाच. बायको लवकर उठली होती. पण चहा वगैरेच्या गर्दीत होती. काही वेळाने दरवाजा उघडायला गेली पण उघडेना. उघडता उघडेना. एक फटही पडेना. ढाराढूर झोपलेल्या म्हातोबाला उठवत म्हणाली, अवं अहो उठा उठा.! “ म्हातोबा झोपलेलाच. बराच वेळ हाका मारल्यावर तो उठला. सवाई म्हणाली, अहो दरवाजा उघडत नाही. काय बी करा एक फटही दिसत नाही.” म्हातोबा आरामात उठला, दात ओठ खात दरवाजा ढकलू लागला. पण उघडेना. मग कशीबशी ताकदीने एक फट पडली.आणि त्यातून “खळखळा ओतल्या मोहरा” तशी चांदीच्या नाण्यांची खळखळ खण् खण् करत धारच लागली. हळू हळू दरवाजा जसा उघडू लागला तशा लाटा येऊ लागल्या.

 

सवाईने व म्हातोबाने पोती भरायला सुरवात केली. सगळी नाणी भरून झाली. जागच्या जागी ठेवली गेली. गुळा पोळीचे जेवण झाले म्हतोबाला लवकर उठायला लागल्यामुळं झोप येऊ लागली. सवाई नवऱ्याकडे कौतुकाने पाहात होती. म्हातोबाला गोडाधोडाचे खाल्यामुळे झोप येत होती. तरी ती म्हणाली, मीम्हणत होते तसेच झाले. भावजी रात्रीच जाऊन काम करून आले. त्यांनी तुमची झोपमोड होईल म्हणून मोहरा ओतून ते गेले.””हो हो, तुझं खरं हाये सवाई, पण मला झोपू दे. दुपारी सवाई दुकानात गेली. मालकासाठी नवं धोतर पैरण फेटा आणि स्वत:साठी एक चांगलं लुगडं चार खण आणि रोजचाच चा ची पत्ती गुळ रवा आणि आज गहू घेतला.तूप तर घेतलेच. ही यादी सगळं ऐकून दोस्त दसऱ्याचे तोंड जे वासले होते ते सर्व देई पर्यंत तसेच होते. सवाईने वीस चांदीची नाणी काढून दिल्यावर त्याचे डोळे कपाळात जायचे तेव्हढे राहिले होते. पैसे दिल्यावर नामदेवाची जनी, तुकारामाची आवली तशी साध्या म्हातोबारायाची साधीभोळी,सरळ मनाची सवाई,मालकाच्या दोस्त दसऱ्याला म्हणाली, भावजी, तुमचं मन मोठ्टं बघा. तीन पेटाऱ्यांपेक्षा तुम्ही जास्त दिलेय वाटतं!”

दोस्त दुकानदार दसऱ्या हळू आवाजात म्हणाला, “नाई वैनी, तुमचा मालक आमचा म्हातोबा म्हणत्यो त्येच खरं. असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी!” पण वैनी म्हणाली,” त्ये काई असंल नसंल,मला समजत न्हई. पन तुमचं मन चांगलं ह्ये खरं!”

 

(मेक्सिकन लोकथेच्या आधारे)

आनंदाचा गुणाकार!

दवाखान्यातले ते दोन्ही म्हातारे रुग्ण बरेच आजारी होते. एकाचा पलंग आता आताच दिवसातून एक तास डोक्याच्या बाजूने वर उचलला जात होता. छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला मदत व्हाही हा उद्देश होता. त्याच्या शेजारच्या पलंगावरच्या पेशंटला मात्र चोवीस तास पाठीवर पडून राहावे लागे. त्यामुऱ्ळे रोगापेक्षा ह्या उताणे पडण्यानेच वैतागून गेला होता.

ज्याला तासभर का होईना बसायची परवानगी होती त्याचा पलंग खिडकी पाशी होता. तो खिडकी बाहेर बघत ,”समोरच्या तलावात पाणी कापत पाण्यावर बदकं नक्षी कशी काढत कशी काय जातात समजत नाही; हिरवळीवर मुलं काय काय खेळतात. कुणी प्रियकर प्रेयसीच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढत मुद्दाम हळू चालतोय, तिच्या तोंडापुढे तोंड नेऊन काही तरी बोलतोय, ती मुलगी मान झटकत हसतेय.; सिनेमाची जाहिरात बॅंड वाजवत चाललीय; अरेच्या ते तीन चार लोक भांडायला लागले की!”असे रोज काहीना काही सांगत असे. “अरे वा आज पोलिसांची परेड चाललेली दिसतेय. त्यांचा बॅंड वाजवणारे किती स्टाईलिश चाललेत !” दोन्ही बाजूला लोक उभे आहेत. काही टाळ्या वाजवताहेत! तिघे चौघे तर पोराला खांद्यावर बसवून ही मजा दाखवताहेत!”

रोज तासभर त्याची ही running commentary चालायची. पलंगावर पडून असलेला रोगी ते मन लावून ऐकायचा. तो म्हणायचा तू रोज बाहेरच्या गमती ऐकून त्या तासाभरामुळे माझा दिवस चांगला जातो.
पण एके दिवशी त्या ‘तासाच्या समालोचक’ रुग्णाचे निधन झाले. व्हायची ती सगळ्यांची सगळी धावपळ झाली.
एक दिवस उलटल्यावर विचारू का नको असे ठरवत तो सतत पडून असणारा पेशंट नर्सला म्हणाला, “सिस्टर, मला तो खिडकी जवळचा पलंग देता का?”

नर्स म्हणाली,” त्यात काय! बदलून देते तुमचा पलंग.”
थोड्या वेळाने तो पेशंट म्हणाला, ह्याच पलंगावर होता तो पेशंट; उठून बसायचा बघा एक तास रोज. मग खिडकीतून दिसणारा तलाव,ती हिरवळ,बाग,आणि जे काही तेव्हढ्या वेळात दिसेल ते उत्साहाने सांगत असे मला. तोच मला ‘पडीक’ माणसाला विरंगुळा होता.”

ते ऐकून नर्स त्याला म्हणाली,” अहो आजोबा तुम्ही सांगतातसे तो सांगत होता?” “हो! रोज! चार दिवसापूर्वी पोलिसांची परेड बॅंडच्या ताला ठेकाच काय सुरावटीसह सांगितली होती त्याने!”

नर्स शांत हळुवारपणे म्हणाली,” आजोबा खिडकी आहे पण तिच्या समोर उंच भिंत आहे. आणि… आणि.. ते आजोबा आंधळे होते हो!” इतके म्हणत ती नर्स डोळे पुसत वाॅर्डाबाहेर गेली.

त्या आंधळ्या आजोबांना माहित असावे की दु:ख वाटल्याने अर्धे होते पण आनंद दिल्याने तो दुप्पट होतो.. मिळालेले आयुष्य देणगी आहे हे खरे पण त्यातील ‘आज’चा दिवस ही सगळ्यात भारी भेट आहे.

कोण जाणे त्यांना इंग्रजीतील “Today is a Gift that’s why it’s Present” हा वाक्यसंप्रदाय माहित होता की काय , कुणास ठाऊक?

(Lessons taught by Lifeवरून)