पारले-जी

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.


१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.


फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!


भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.


मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.


डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.


खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.


पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.


पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.


पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.


चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!


आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *